आबासाहेब इनामदारांना जाऊन आता पाचेक वर्षे झालीत, गावकरयांच्या भाषेत त्यांचा 'भूताटकीने झपाटलेला वाडा' आता ओस पडला आहे. गढीसारख्या आकाराच्या त्या मोठ्या चौसोपी वाडयात आता चिलारीची झाडं मधोमध उगवलीत. वाडयाचे प्रशस्त शिसवी दरवाजे कायमस्वरूपी बंदच असतात. वाडयात प्रकाश कसला म्हणून तो येत नाही. खिडक्याची तावदाने अजून शाबूत आहेत. त्यातून दिवसा जो काही अंधुक प्रकाश आत येतो तितकाच काय तो उजेड. संध्याकाळ झाली की इनामदारांचा वाडा अजूनच भकास वाटतो. एक भयाण शांतता तिथं नांदत असते. गावातले लोक रात्रीच काय दिवसादेखील वड्याच्या आसपास देखील फिरकत नाहीत. सगळ्या पंचक्रोशीत वदंता आहे की इनामदारांचा वाडा झपाटलेला आहे, वाड्यात आबासाहेबांचे भूत राहते. चुकून माकून एखाद्या अमावास्येला वा पौर्णिमेला वाड्यातले दिवे बंदचालू होतात, कुणी सांगतं की वाडयाच्या खिडक्यासुद्धा उघडल्या जातात आणि आपोआप बंद होतात. आतून हसण्याचा, खिदळण्याचा, बोलण्याचा क्वचित कधीतरी आरडाओरडा देखील कानी पडतो असे गावकरी सांगतात. काहींच्या मते तर काचा फुटल्याचा आवाज येतो तर काही सांगतात की सिगारेटीचा वास आसपास घुमतो म्हणे ! अशाच सतराशे साठ कहाण्या या वाडयाबद्दल ऐकायला मिळतात. माझा मात्र अशा भाकडकथांवर विश्वास नाहीये. मी विज्ञानावर विश्वास ठेवणारा एकविसाव्या शतकातला आधुनिक विचारांचा पुरस्कर्ता, त्यामुळे मला हे सर्व काही पटत नाही. पण माझं म्हणणं ऐकणार तरी कोण ? माझं बोलणं जरी ऐकलं तरी ते पटायला पाहिजे, तेही होताना दिसत नाही. त्यामुळे माझं प्रवचन सांगायला मी कोणाच्या दारात जात नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं !
आबासाहेब इनामदार म्हणजे आमच्या गावचे मोठे प्रस्थ. शंभर एकर बागायती जमीन आणि गावातल्या घराव्यतिरिक्त शेतशिवारातला एखाद्या गढीसारखा भरभक्कम दगडी वाडा इतकीच त्यांची ओळख नव्हती. कुणालाही मदत करणारा भला माणूस, झाडाझुडपां पासून ते मुक्या प्राण्यापर्यंत सर्वांवर माया करणारा एक हळव्या मनाचा माणूस, मोठ्या मनाचा आणि मोठ्या हाताचा दाता, काकडआरतीला वेळेवर हजर राहणारा, गावातल्या दिंडीच्या वारीचा खर्च ते एकहाती उचलणारा माणूस, सर्वांच्या सुखदुखात सामील होणारा अन पंचक्रोशीतल्या गावांतले तंटे बखेडे मिटवणारा हा माणूस अख्ख्या गावाला देवमाणूस वाटायचा. इतकं ऐश्वर्य, कीर्ती, मानसन्मान असून आबासाहेब अगदी सज्जन आणि पापभिरू होते. त्यांच्या घरात सर्व सुखे नांदत होती, लक्ष्मी पाणी भरत होती असं म्हटलं तरी वावगं ठरू नये इतका पैसा अडका त्यांच्याकडे आपोआप पैशाला पैसा जोडून येतो म्हणतात तसा येत होता. घरात शेतातलेच दुभदुभते होते, खंडीभर धान्य कोठारात पडून असे. त्यांना कुठल्याच गोष्टीची ददात नव्हती. अशा आबासाहेबांच्या आयुष्याला एकच दुःखाची झालर होती, त्यांना मुलबाळ झाले नव्हते. पण त्यांच्या वागण्या- बोलण्यातून याविषयीचे वैषम्य कधीच जाणवत नसे. त्यांच्या पत्नी वनमालाबाई म्हणजे गावासाठी अक्कासाहेब ! त्यांचा स्वभाव आपल्या नवरयाला साजेसाच होता. सगळं गाव या लक्ष्मीनारायणाच्या जोडीवर आपला जीव ओवाळून टाकत असे.
साठी गाठलेल्या आबासाहेबांनी आपल्याला मुलबाळ नाही म्हणून कधी फिकीर केली नाही, आपल्या भावांच्या मुलांना ते आपली मुलं समजत. इतकंच नव्हे तर त्यांच्या वाट्याची शेती देखील त्यांनी आपल्या भावांना अन पुतण्यांना कसायला देऊन टाकली होती. शिवाय त्यांचे भाऊ आणि पुतणे देखील मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते या दोघांची मनापासून काळजी घेत असत, त्यांना जीव लावत असत. अशा या देखण्या कुटुंबाला एके दिवशी मोठा धक्का बसला. एका लग्नसमारंभाहून परतताना वनमालाबाईंचा अपघाती मृत्यू झाला. वनमाला अक्का घरच्या गाडीतूनच प्रवास करत होत्या पण त्यांच्या कारला बसलेली टक्कर इतकी मोठी होती की कारच्या चालकासह आत बसलेले सर्वचजण जागीच मृत्यूमुखी पडले. त्यांच्या देहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. त्या दिवशी अख्खं गाव हळहळलं, कुणाच्याच घरी त्या दिवशी चूल पेटली नाही. लोकांना आता चिंता लागून राहिली होती की उतारवयात आपल्या प्रेमळ जिवलग पत्नीचा विरह कसा सहन करणार ? आणि लोकांची शंका रास्त ठरली. आपल्या प्रिय पत्नीच्या अकस्मात झालेल्या निधनामुळे आबासाहेब उदास राहू लागले, एकांतात बसून राहू लागले, त्यांनी लोकांत मिसळणं हळूहळू कमी केलं. गावातल्या घरी येणंजाणं बंद केलं. दिवस दिवस ते वाड्याबाहेर पडेनासे झाले. त्यांची प्रकृती खालावू लागली. त्यांच्या भावंडांनी त्यांना दवाखान्यात नेऊन आणले पण काही फरक पडला नाही. एक चालता बोलता माणूस एकाएकी अबोल एकलकोंडा होऊन गेला. गाव त्यांच्यासाठी हळहळ व्यक्त करण्या पलीकडे काही करू शकले नाही..
एके दिवशी आबासाहेबांना भेटायला त्यांचे बालमित्र दिगंबरभाऊ गावात आले. दिगूभाऊ मुळचे आमच्याच गावाचे पण गावातल्या शिक्षणानंतर पुढचे शिक्षण घेऊन ते मोठ्या कंपनीत कामाला लागले, नंतर त्यांनी स्वतःची कंपनी मुंबईत काढली होती. त्यांची मुलेच त्यांचा सर्व कारभार बघत असत. दिगूभाऊंसोबत त्यांचे दोन मित्र देखील होते, जे ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी आमच्या गावी आले होते. तर दिगूभाऊंना मुख्यत्वे आबासाहेबांना भेटायचे होते. आबांच्या भावानेच त्यांना निरोप देऊन बोलावून घेतले होते. आपल्या भावाच्या तब्येतीस आराम पडावा म्हणून त्यांनी भावाच्या जिवलग बालमित्रास बोलावून घेतले होते. दिगूभाऊ आणि त्यांचे मित्र इनामदारांच्या वाडयावरच उतरले होते. बघता बघता त्यांना येऊन पाचसहा दिवस उलटले आणि आबासाहेबांच्या चेहऱयावर बरयाच दिवसांनी थोडेसे स्मित उमटले. आबासाहेबांना किंचित विरंगुळा मिळाला असावा असे लोकांना वाटू लागले. पण वास्तव वेगळेच होते. आबासाहेबांच्या मनात एक रुखरुख राहून गेली होती की, आपण आपल्या पत्नीच्या अखेरच्या क्षणी तिच्या जवळ नव्हतो. तिला आपल्याला काही सांगायचे होते का ? तिची कुठली इच्छा अपूर्ण राहिली होती का ? हे प्रश्न त्यांचा सतत पिच्छा पुरवत असत. /आपल्याला मुलबाळ झाले नाही, पत्नीला मातृत्वाचे सुख देता आले नाही त्याबद्दल तिची एकवार हात जोडून माफी मागावी/ असे त्यांना मनोमन वाटे. आमचं शेत आणि शेतातली वस्ती इनामदारांच्या शेताला लागून असल्याने मी आबासाहेबांच्या अंधश्रद्धाळू स्वभावाला चांगलाच ओळखून होतो. माझं त्यांच्या घरी येणं जाणं असे, चीजवस्तू द्यायची घ्यायची झाली तर आबासाहेब मला बोलावून घेत असत. त्यांची माझ्यावर फार श्रद्धा होती. वनमाला अक्का देखील मला आपला भाऊ मानत. घरी काही गोडधोड केलं की आमच्या घरी पाठवून देत असत. एकूणच मी त्यांच्या घरातला माणूस होतो अन त्यामुळे त्यांच्या घरातली खडा न खडा माहिती मला होती. कधीकधी तर मला त्यांचा हेवा वाटे. लिंबू मिरची पासून कणकेच्या बाहुलीपर्यंतचे टोटके ते अवलंबत, पण त्यामागचे हेतू - कारण चांगले असल्याने त्याचा कधी गावभर बभ्रा झाला नव्हता. आतामात्र त्यांचे मित्र आल्यावर त्यांनी मित्रांपाशी आपल्या मनातली रुखरुख बोलून दाखवली होती.
आपल्या मित्राची अशी उलघाल होत असलेली पाहून अन त्याची बिकट मानसिक - शारीरिक अवस्था पाहून दिगूभाऊंना खूप वाईट वाटले. त्यांनी आबासाहेबांना धीर दिला आणि यावर काही मार्ग निघतो का बघू असं बोलून त्यांनी त्यांचे तात्पुरते समाधान केले. पण त्या अमावस्येच्या रात्री त्यांनी यावरचा उपाय करायचे ठरवले. आबासाहेब आणि त्यांचे मित्रच त्या रात्री वाडयावर मुक्कामाला थांबले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास सगळे त्यांच्या दिवाणखाण्यात जमा झाले. मंद प्रकाश देणारे दिवे त्यानी चालू ठेवून बाकीच्या सर्व लाईटस बंद केल्या. त्यामुळे आत काय चाललेय याची बाहेरून कुणालाही कल्पना येणे अवघड होते. दिगूभाऊंनी आणि त्यांच्या मित्रांनी प्लँचेटची सगळी तयारी करून ठेवली होती. त्या भयाण अंधाररात्रीस त्यांच्या घरात असलं मंत्रतंत्रविद्येचं काही कारस्थान सुरु असेल याची मला कल्पना नव्हती आणि जरी असलं काही मला कळलं असतं तरी मी त्यात भाग घेणे दूर उलट खिल्ली उडवली असती. पण आबासाहेबांना दुखवायला नको म्हणून मी या विषयावर त्यांच्याशी कधीच बोललो नव्हतो. आबासाहेब आणि त्यांचे मित्र एकमेकाचे हात धरून समोरासमोर बसले. मेणबत्त्याच्या उजेडात त्यांचे चेहरे भीतीदायक दिसत होते, त्यांचा वाडा देखील बहकल्यासारखा वाटत होता. दिगूभाऊंनी आबासाहेबांना सारं काही आधीच सांगितले होते. पाटावर सोंगटया आणि दोन रिकाम्या वाट्या आणून मधोमध मांडून ठेवले होते, मधोमध एक मेणबत्ती पेटवून तिच्याकडे एकाग्र चित्ताने पाहत त्यांनी पुटपुटायला सुरुवात केली. 'वनमालाच्या आत्म्यास त्रास द्यायला नको, दुसरया कोणाकडून तरी आपण सर्व प्रश्नाची उत्तरे घेऊ म्हणून आबासाहेबांनी त्यांच्या एका परिचिताचे नाव दिगूभाऊच्या कानात सांगितले. दिगूभाऊंनी काही सेकंद डोळे मिटले, त्यांच्या दोन्ही बाजूस बसलेल्या मित्रांचे हात त्यांनी गच्च धरून ठेवले. आणि आबासाहेबांनी सांगितलेल्या व्यक्तीच्या नावाचा पुकारा करताच तिथली परिस्थिती बदलू लागली. मेणबत्त्यांच्या ज्योती कमीजास्त होऊ लागल्या, खिडक्या आपोआप उघडझाप होऊ लागल्या, उघडलेल्या खिडक्यातून रोरावणारा वारा आत घुसला, तिथला पाट त्या वारयाने उधळला, सगळं साहित्य उधळून पडलं. इतक्या गदारोळात दिगूभाऊंचे प्रश्न विचारणे सुरूच होते. पण कसला तरी चित्कारण्याचा आवाज त्या वारयाबरोबर वाडयात घुमू लागला. दिगूभाऊंनी बजावून सांगितलेले असल्याने त्यांचे मित्र डोळे गच्च मिटून, श्वास रोखून, हातातले हात गच्च धरून बसले होते. पण असा प्रकार पहिल्यांदाच अनुभवणारे आबासाहेब मात्र त्या आवाजाने, गोंगाटाने भयभीत झाले होते. त्यांची एकाग्रता भंग पावली, त्यांनी डोळे उघडले आणि समोर जे काही पाहिले ते बघून ते इतक्या मोठ्याने किंचाळले की ऐकणारयाचा श्वास रोखला जावा. अन झालेही तसेच. किंकाळीच्या आवाजाने दिगूभाऊंनीही डोळे उघडले, सर्वांची एकाग्रता लोप पावली. त्यांनी देखील जे काही पाहिले ते त्यांच्या कल्पनेपलीकडेचे होते. त्यांनी लाईटस सुरु करण्याचा प्रयत्न केला पण लाईट्स लागल्या नाहीत, फोन करण्याचा प्रयत्न करून पाहिला पण फोन लागला नाही, उजेड करावा म्हटलं तर काडीपेटीही सापडेनाशी झाली. काय करावे कुणालाच सुचेनासे झाले आणि अचानक सगळ्या खिडक्या आपोआप धाडकन आवाज करून बंद झाल्या. दिवाणखान्याची दारे बाहेरून बंद झाली. बराच वेळ आतून आवाज येत राहिले अन काही वेळाने सारे आवाज बंद झाले. सोसाटयाचा वाराही एकाएकी लुप्त झाला.
सकाळ होताच गावभर बातमी पसरली. आबासाहेब रात्री झोपेतच गेले. दिगूभाऊ आणि त्यांचे मित्र तिथेच बेशुद्धावस्थेत आढळले. काय झाले असावे याचा गाव कयास लावत राहिले. पण सत्य कुणाला कळले नाही. दिगूभाऊ आणि त्यांच्या मित्रांना दवाखान्यात भरती केले गेले पण ते पुन्हा कधीच गावी परतले नाहीत. आबासाहेबांच्या भावांशी देखील त्यांनी कधी संपर्क केला नाही. त्या दिवसानंतर रोज रात्री त्या वाडयात लोकांना विविध भास होऊ लागले. आवाज ऐकू येऊ लागले अन हळूहळू वाडा ओस पडू लागला. आबासाहेबांचे आप्तदेखील केवळ शेतातल्या कामापुरता सकाळी येऊन अंधार पडण्याआधी गावाकडे परतू लागले. गावभर अफवांना ऊत आला. काही महिन्यात वाडा पूर्ण ओस पडला. सर्वत्र कोळ्याची जाळीजळमटे झाली. घरात केरकचरा साठून राहिला अन अंगणात पालापाचोळयाचे ढीग लागून राहिले. अमावस्येला मात्र वाड्यास आतूनच जाग आलेली असते. लोक म्हणतात आबासाहेबांचे भूत वाडयाला लागले, वाडा झपाटून गेलाय. मला मात्र लोकांचे हसू येते. आबासाहेब बिचारे त्या दिवशी घाबरून धक्का बसल्याने हृदयक्रिया बंद पडून जागेवरच बसल्याबसल्या गेले. मरताना त्यांच्या तोंडून बाहेर पडलेली किंकाळी हाच त्यांचा अखेरचा आवाज. त्या दिवसानंतर त्यांचा आणि जगाचा संबध तुटला तरी लोक त्यांना दोष देतात, त्यांनी वाडयाला झपाटले अशी चर्चा करत बसतात.
मी अशा लोकांत सामील होत नाही, कारण मला हे बोलणेच पटत नाही. कारण असं कसं शक्य आहे ? पाचेक वर्षापासून मी त्या वाडयात एकटा राहतोय मला कधी आबासाहेबांचेच काय कुणाचेही भूत दिसले नाही. लोकांच्या या लोकोपवादाची मला कीव येते. त्यावर हसावे की रडावे हे कळत नाही. मात्र ज्या दिवशी वनमालाअक्कांचे वर्षश्राद्ध असते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या फोटोलाही हार चढवतात तेंव्हा मात्र मला राग येतो.वनमाला अक्कांचा अपघात ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्यांचा नेहमीचा ड्रायव्हर आला नव्हता म्हणून त्या दिवशी त्यांची गाडी मीच चालवत होतो. त्या दिवसापासून मी वाद्यात येण्याची वाट पाहत होतो, ती संधी मला खुद्द आबासाहेब आणि दिगूभाऊंनी दिली ! आता या वाड्यात माझे आयुष्य अगदी सुखात आहे. वाडयातली हरेक अमावास्या मी दणक्यात साजरी करतो..
- समीर गायकवाड.
ब्लॉगलिंक -
https://sameerbapu.blogspot.in/2016/10/blog-post_12.html
भारीच !!! आवडले
भारीच !!!
आवडले
AavaDalee!
AavaDalee!
समीर भाउ, तुम्हाला वाइट
समीर भाउ, तुम्हाला वाइट वाटेल, पण खरच माझ्या असल्या गोष्टीवर विश्वास नाहीये...!!! हा जो 'प्लँचेट' प्रकार आहे, तो मी लहानपणापासुन माझ्या बहीण - भावाबरोबर आणि मित्रासोबत खेळलेलो आहे, पण कधीही माझ्यासोबत काही वाइट असे घडलेले नाही...!!!
भारी आहे
भारी आहे
अतिशय भारी लिहिलेय,
अतिशय भारी लिहिलेय,
@ समीर गायकवाड, एक गूढकथा
@ समीर गायकवाड, एक गूढकथा म्हणून लिखाणाची भट्टी बाकी मस्त जमलीय. वाचताना शेवटपर्यंत जागेवर खिळून रहायला होते. आणि शेवट तर अगदी दणक्यात झालाय. आवडलं!!!
बाप रे! वाचता वाचता स्क्रोल
बाप रे!
वाचता वाचता स्क्रोल करुन खाली येई पर्यंत काही दिसलंच नव्हतं !!!! भयानक!!
'प्लँचेट' एकदम खरे असते.
'प्लँचेट' एकदम खरे असते. स्वनुभवावरुन सांगु शकते.....
बापरे. तो फोटो भयानक आहे.
बापरे. तो फोटो भयानक आहे.
भारीच !!!
भारीच !!!
Hi Katha train madhe vachli
Hi Katha train madhe vachli itkya mansat asun pan jorat oradli na photo pahun, ekdam anpekshit hota
समीर नेहमीप्रमाणेच जबरदस्त
समीर नेहमीप्रमाणेच जबरदस्त कथा. खूपच आवडली.
उगीच अशा कथा लोक पाल्हाळीक लिहितात.
मस्तच जमलीये कथा. अजुन वाढवली
मस्तच जमलीये कथा.
अजुन वाढवली असती तरी चालले असते....
सुन्दर
सुन्दर
बापरे. तो फोटो भयानक
बापरे. तो फोटो भयानक आहे.+++++++१००००००
पण कथा १ नम्बर खुप आवड्लि
बापरे, कथा वाचून नॉर्मल आणि
बापरे, कथा वाचून नॉर्मल आणि फोटो पाहून जाम घाबरले.
बापरे
बापरे
मस्त
मस्त
शेवट छान आहे...
शेवट छान आहे...