सुहासला एकदम आठवलं. सदाच्या तोंडात कमळीचं नाव आल्याचं रेखा म्हणाली होती. म्हणजे कब्रस्तानात कमळीलाच पुरली होती तर . म्हणजे सदा रेखाचा खरा मामा. रेखाची आई ती आपली मावशी. खरं तर वाडा रेखाच्या आईचा. मग तो उत्तेजित होत म्हणाला " भाऊ, तुमची कमळी मी तुम्हाला देऊ शकतो. जाधवला एकदम आनंद झाला तो म्हणाला, "खरच ? " .... हो, पण जिवंत नाही, पुरलेली . आता तिचा सांगाडा उरलेला आहे. तुम्ही असं करा, उद्या वाड्यावर या. मी परवा जाणार आहे. मी तुम्हाला तुमची कमळी दाखवीन." सुहासने त्याला आश्वासन दिले. मग तो जड मनाने घरी गेला. वेगळ्याच गोष्टी कळल्याने सुहास परत वाड्यावर जायला निघाला. म्हणजे मामांनी कमळीवर जबरदस्ती करून मारून टाकली तर. एखाद्या स्त्रीवर बलात्कार करणं मुळातच चुकीचं. शिवाय तिचा जीव घेणं ?.... छे, छे, या मामाला जगायचा काही अधिकार नाही. खरं तर रेखाने वाडा सोडून जायला हवं. असल्या विचारांनी त्याचं डोकं भणाणून गेलं. ...... संध्याकाळचे पाच वाजत होते. मामा मुख्य दरवाजाशी उभे होते. त्यांच्या मुद्रेवर वेगवेगळे भाव दिसत होते. तो घरात शिरताच ते म्हणाले, " झालं का डोकं शांत ? रेखानी झटकला ना तुला ? अरे मला सगळं माहित आहे. " सुहासला असल्या हलकट आणि पाजी माणसाशी बोलण्याची इच्छाच नव्हती. त्याने रागातच विचारलं, " मामा, कमळी कुठे आहे ? " मामांच्या लक्षात आलं, याला कोणीतरी फितवलाय. तरीपण ते थंडपणे म्हणाले, " आपल्या कामाशी काम ठेव सुहास. चार दिवस आलायस , सुखानी राहा. वाड्याच्या (म्हणजे त्यांच्या) उलाढालीत डोकं घालू नकोस. .... .. परवा जायचय ना ? मंदी करता साडी आणि तुझ्या करता कपडा घ्यायचाय मला , तो तेवढा घेऊन जा. "
"मामा , अरे तू कमळीचा जीव घेतलायस. एका माणसाचा तू खून केलायस. तुला लाज नाही वाटत ? तो उत्तेजित होऊन म्हणाला . मामांच्या कपाळावरची शीर थाड थाड उडू लागली. ते दात ओठ खात म्हणाले, सांगितलं ना तुला, चार दिवस सुखानी राहा आणि कमळीचं म्हणशील तर ती कोण आहे हे मलाही माहित नाही. वाटेल ते बरळू नकोस. रेखाला जेवणाचं बघायला सांग. नुसतीच पोसावी लागत्ये तिला. "सुहासने कपडे बदलले. तो रेखाच्या खोलीत डोकावला. नैना त्याला पाहताच त्याच्याकडे आली. रेखा मात्र काही न बोलता स्वैपाकघरात गेली. ती त्याच्याशी एक अक्षरही बोलायला तयार नव्हती. थोडावेळ तो स्वैपाकघरात रेंगाळला. पण तिचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तो दिवाणखान्यात येऊन बसला. .... जेवताना तिघांपैकी कोणीच बोलले नाही. नैनाची तेवढी बडबड चालू होती. रेखा तिला अधून मधून गप्प बसवित होती. आजची भाजी तिखट असल्याचे सर्वांनाच जाणवले. जेवणं झाली ...... साडे नऊ वाजले. जो तो आपापल्या विचारात होता. मामा, सुहासचं आता काय करायचं , या विचारात् होते. त्याला जरुरीपेक्षा जास्त माहिती होती. तो मंदीलाही सांगेल. याला तळघरात बंद करून ठेवावा. रेखा विचार करीत होती. आपण सुहासला आधीच का हो म्हंटलं नाही ? निदान ते थडगं तरी शोधायला नको होतं. पण सुहासच्या आगाऊपणामुळे हे झालं. शिवाय कमळी आपल्याला च का त्रास देते ? मामांनी तिला मारली होती , त्यांच्या मागे ती लागत नव्हती. सुहास तर रेखाला भेटायला अधीर झाला होता. त्याने साडेदहा पर्यंत वाट पाहिली . मग मामांची नजर चुकवून रेखाच्या खोलीत तो डोकावला. त्यावर ती , त्याला मामा झोपल्यावर त्याला बोलवील. म्हणून तोही अंथरूणावर पडून राहिला. स्वतःच्या वस्तू त्याने गोळा केल्या होत्या. परवा त्याला जायचं होतं. उद्याचाच दिवस मध्ये होता.
मामाही तो झोपण्याची वाट पाहात पडून होते. तो अधून मधून घड्याळ पाहात होता. हळू हळू त्याला झोप लागली. मामांनी ते पाहिलं. आणी मनाशी काही ठरवून ते झोपले. इकडे, रेखामध्ये बदल होऊ लागला. अंगाची कांती काळवंडू लागली. मग कालच्या सारखेच सर्व बदल होऊ लागले. तिने दरवाजा हळूंच उघडला. कमळी म्हणालि, " बोलाव तुझ्या याराला. तुझ्याशी लग्न करतोय ना तो ? " मग रेखानी सुहासला हाक मारली. मामांच्या घोरण्याचा आवाज येत होता. तिने खोली बाहेर पाऊल टाकलं आणि तिच्यातल्या कमळी ने सुहासला गोड आवाजात हाक मारली. तो उठत नाही असं पाहून कमळीने आपला हात लांब करून त्याला धक्का दिला. थंड स्पर्श झाल्याने सुहासची झोप चाळवली . हाका ऐकू आल्याने तो बिछान्यावर उठून बसला. त्याने घड्याळ पाहिलं. एक वाजत होता.त्याला लक्षात आलं , रेखानी त्याला बोलावलय. जाताना तो लायटर घेऊन जायला विसरला नाही. लायटरच्या प्रकाशात तो तिच्या खोलीच्या दाराशी आला. कमळी रेखाला म्हणाली, " त्याच्याशी नीट बोलून आत घे. ". रेखा म्हणाली, " सुहास , ये ना ... तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवय ना ? ... कंदिलाच्या अंधुक प्रकाशात रेखाच्या आकृती शिवाय सुहासला काहीच दिसत नव्हतं. त्याने लायटर पेटवला त्या प्रकाशात तो आत गेला. म्हणाला, " रेखा , काय निर्णय आहे तुझा ? ". त्यावर ती म्हणाली, " परत लायटर पेटव आणि माझ्याकडे बघून सां ग . करशील तू माझ्याशी लग्न ? मी तयार आहे . " त्याने परत लायटर पेटवला. त्याच्या निळसर पिवळसर प्रकाशात त्याची नजर तिच्या चेहेऱ्याकडे गेली. आणि त्याच अंग शहारलं..... खोल गेलेले डोळे, डोक्यावरचे केस उडालेले, दात पुढे येऊन त्यातून रक्तवर्णी लाळ गळत असलेली पाहून त्याला भोवळ येईल की काय असं वाटू लागलं. त्याच्या हातातला लायटर गळून पडला. आणि तो कसातरी धडपडत बिछान्यापर्यंत पोचला. त्याच्यामागे रेखातली कमळी जोरजोरात हासली. आणि दरवाजा लावला गेला. सुहासने ती रात्र कशीतरी तळमळत काढली . रेखाचं हे काय झालं ? तरी ती सांगत होती थडग्यात हात घालू नकोस म्हणून. तिच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत, अशी त्याला टोचणी लागली. उद्या जाधव येईल. मग त्याच्या मनात आलं , रेखा कसल्यातरी अमानवी सापळ्यात अडकली आहे, आणि तो सापळा कमळीने टाकलेला आहे. आपण ठरल्याप्रमाणे, नैनाला घेऊन परवा निघून जावं हे बरं. नैनाला आपण समजावू आणि सांभाळूही. आईलाही हे नक्कीच पटेल. शेवटी ती तिची नातच नाही का ?
एक प्रकारचा मंदपणा आणी आळशीपणा घेऊनच वाड्यातला दिवस उजाडला. सर्वांवर एक प्रकारची अवकळा पसरली होती़. उठल्या उठल्या त्याने मामांकडे पाहिलं. बिछान्यावर त्यांचा पत्ता नव्हता. आता मामा कुठे गायब झाला ? दहा अकरा वाजेपर्यंत वेळ गेला. चहा , नाश्ता वगैरे झालं. सुहासने आपली बॅग पॅक केली. रेखाचं लक्ष होतं पण ती काहीच बोलली नाही. तिची कामं यंत्रवत चालू होती . सुहासने ही तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शेवटी तिनी नैनाकडून सुहासला बोलावून घेतलं. ति स्वैपाक करीत होती. तो आत येताच ती मंद हसलि. म्हणाली, " , मला तुमच्याशी थोडं बोलायचय. " त्याने फक्त "हूं " म्हंटलं. ती म्हणाली, " तुम्ही म्हणता ते खरं आहे. .. मी..... मी लग्नाला तयार आहे. " त्यावर तो म्हणाला, " लग्न ? आता ते शक्य नाही. तुला वाटतं आपल्याला संसार करणं जमेल? तुझ्या रात्रीच्या प्रॉब्लेमचं काय करायचं ? नैनाला काय सांगणार आहेस ? " ती म्हणाली, " काय हरकत आहे ? आपण दिवसाचा संसार करू . " तरीही त्याची तयारीनव्हती. तो थोडा चिडून म्हणाला, " रेखा एखाद्याच्या बायकोचं रात्री नागिणीत रुपांतर होतं असं काहीतरी वाचलं होतं. तरीही कोणी अशा स्त्रीशी लग्न करणार नाही. इथे तर तू झपाटलेली आहेस्स. तुझ्यात संचार होतो. पण एक गोष्ट मात्र मी करणार आहे , नैनाला बरोबर घेऊन जाणार आहे. एवढ्या लहान मुलीचे हाल कशाला ?, तुझ्याबरोबर राहून ? " तिला ते फारसंआवडलं नाही. पण ती दीनवाणेपणाने म्हणाली, " आपण एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवू किंवा नरसोबाच्या वाडीला जाऊ , म्हणजे काही तरी उपाय नक्की सापडेल. " पण सुहासला ते काही पटेना. मग मात्र तिलानिराशा आली. तिच्या मनात आलं , आई होती तेव्हा तिला आपल्याकडून काहीच सूख मिळालं नाही, आपण अविनाशवर एवढं प्रेम केलं, त्याचं ही आयुष्या आपल्यामुळे फुकट गेलं. खरं तर आपला जगून काही उपयोग नाही. तिने बोलण्याकरता तोंड उघडलं, पण सुहास तिथून निघून गेला. तिला निराशेने हलकासा घाम आला. पदराने घाम पुसून ती पुढच्य कामाना लागली. मामांकडे येण्यात आपली चूक झाली. आपल्याला बीन त्रासाचं सगळं हवं होतं. लोक आयुष्याशी झगडतात, आपण काय केलं ? आपण आता पुरत्या अडकलो असल्याचं तिला जाणवलं. पिंजऱ्यात अडकलेल्या श्वापदासारखी तिची स्थिती झाली. तिची विचार शक्ती खूंटली. अतिनिराशेने ती स्वस्थ बसून राहिली.
त्या ओघात चुलीवरती भात ठेवल्याचं तिच्या लक्षात आलं नाही. तो जळून सगळीकडे वास पसरला. धावतच सुहास स्वैपाकघरात आला. म्हणाला, " अगं रेखा, भात जळतोय. जवळ बसून तू करतेस काय ? " तिने मनाच्या विच्छिन्न अवस्थेत भाताकडे पाहिलं. खरच भातातून धूर येत होता. तिने पटकन भाताचं पातेलं उतरलं. ती तशीच उठून स्वतःच्या खोलीत दरवाजा लावून पडून राहिली. कोणाला विचारायचं , कोणाला सांगायचं ? तिला काही सुचेना. गावात तिची कोणाशीही ओळख नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपली जगण्याची लायकी नाही. तिने दिवाणखान्यात खेळणाऱ्या नैना कडे पाहिलं. काय हरकत आहे , नैना सुहास बरोबर गेली तर ? निदान तिचं आयुष्य तरी सावरेल. आपण आधीच सुहासला होकार द्यायला हवा होता. आता पुन्हा रात्र पडेल, पुन्हा कमळी आप्ल्या शरिराची वाट लावेल. सकाळी पुन्हा नॉर्मल. आताअ हेच आपलं आयुष्य.नेमके जेवायच्या वेळेला मामा आले. मामांच्या हातात दोरखंड आणि धारदार विळा होता. सुहासने मामाला विचारलं, " मामा हे कशासाठी ? " मामा सहजतेचा आव आणित म्हणाले, " अरे , माळावर झुडपं फार झालयेत, कापायला हवीत. आणि दोन बालद्या विहिरीत पडल्येत त्या गळ टाकू न काढायच्येत म्हणून हा दोर. " मग त्यांनी तो दोरखं ड आणि विळा "त्या" खोलीत टाकून दिला. सुहासचा पारा चढतच होता. पण त्याने तावा ठेवला. इतक्यात जाधत येईल. रेखा जेवायला बोलवील अशी त्याची अपेक्षा होती. साडे बारा वाजले होते. मामांना तो न सांगता जाण्याबद्दल विचारणार होता, तेवढ्यात रेखाने जोरात खोलीचं दार उघडलं. तिचे केस मोकळे होते . विव्हळल्यासारखा आवाज करीत ती धावतच निघाली. तिने काही सेकंदातच "त्या " खोलीच्या दरवाजापर्यंतचा मार्ग कापला. काहीतरी गडबड होणार असं वाटून सुहास तिच्यामागे धावला. त्या अवधीत नैना कडे मात्र त्याचं दुर्लक्ष झालं.
सुहास रेखाच्या मागे धावत सुटला. तिच्या अंगात कुठून एवढं बळ आलं होतं कोण जाणे. ती एखाद्या खुळावलेल्या जनावरासारखी "त्या " खोलीच्या दरवाजातून वाड्यच्या मागच्या भागात आली. बघता बघता ती तापवणाऱ्या उन्हातून चढण ओलांडून माळावरल्या उतारावरून नदीकडे निघाली. तिच्या लक्षात आलं नाही की माळ उतरल्यावर नदीजवळ दलदल आहे. सुहास तिच्या मागे ओरडत धावत होता, " रेखा, अगं थांब, काय करत्येस तू ? कुठे निघालीस ? ", मग त्याला कळलं की ओरडण्यात वेल घालवण्यापेक्षा आपण तिच्यासमोर जाऊन तिला अडवायला हवं . तो कसातरी तोल सांभाळत नदीकडे जाणारी उतरण उतरू लागला. माणूस उतरणीकडे बघत बसला की त्याला घसरण्याची भीती जास्तच वाटते. जवळपासची झाडे झुडपे पकडत तो उतरत होता. अनेक ठिकाणी त्याला खरचटत होतं. शिवाय वरून ऊन आणि गरम वारा. रेखा मात्र स्वताशीच बडबडत साडी वर धरून पळत होती. तिचे केस आणी पदर वाऱ्यावरती भन्नाट उडत होते. एखाद्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर पळणारी स्त्री दाखवलेली असते ना , तशी. आता ती निराहसेने पक्की ग्रासली होती. एकीकडे म्हणत होती, "आता मला जगून काय उपयोग ? " .... इतरही बडबड चालू होती. हातून गेलेल्या सगळ्याच गोष्टींची तिला आठवण येत होती. मग तिला आठवलं. तिच्या वडलांनी पण आत्महत्याच केली होती, असं आत्या म्हणाली होती. मग तिला डोळ्यासमोर आई, आत्या आणि एक वडिलधारं माणूस (तिचे वडिल असावेत. कारण तिने वडलांना पाहिले नव्हते ) दलदलीत उभे असलेले दिसले. ते तिला त्यांच्याकडे येण्यासाठी खुणावत होते. दुर कुठेतरी तिला डोक्याला बँडेज बांधलेला अविनाश दिसला. वेगवेगळ्या भासांमुळे तिला दिसलं नाही की पुढच्याच खडकावर गर्द हिरब्या रंगाचं बुळबुळीत शेवाळ माजलेले आहे. इकडे सुहासही त्याच्या बाजूच्या खडकावर पाय ठेवणार तेवढ्यात तो ओरडला, "रेखा, जाऊ नकोस, पुढे दलदल आहे...... तू म्हणालीस तसा आपण दिवसाचा संसार करू. रेखा प्लीज परत फीर.... " असं म्हणता म्हणता त्यालाच हुंदका फुटला. रेखाला काहीच ऐकू येत नव्हतं. तिला लांबून कमळीच्या हसण्याचा आवाज येत होता....... समोर दिसणारे आई, आत्या आणि न पाहिलेले वडील हात पुढे करून तिला कवेत घ्यायला उत्सुक असलेले दिसले..... दलदल , निसरडं याचं तिला काहीच वाटलं नाही. तिचे पाय पटकन त्या निसरड्या खडकावर पडले.......... आणि ती काळ्या कुट्ट दलदलीत घुसली . मग मागे वळून तिने सुहासला सांगितलं, " माझ्या मागे येऊ नकोस. नैनाला सांभाळ....... मला ज गा य चं ना ही. ... " असं म्हणता म्हणता प्रथम ती कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत आणि शेवटी तिचा चेहरा दलदलीत बुडू लागला. नाकातोंडात घाणेरडी दलदल शिरली. त्या घाणेरड्या वासाची जाणीव् होण्या आधीच ती बुडाली.... . डुबुक . डुबुक.. डुब ... डुब असा आवाज करीत मोठमोठे बुडबुडे आले. .... आणि दलदल शांत झाली......... पोट भरलेल्या .. डा कि णी सा र खी ..... .
सुहास तिथेच खडकावर डोकं धरून रडत बसला. त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडलेला त्याला जाणवला. त्या हाताची पकड घट्ट होती. तो आश्वासणारा हात नव्हता. त्याला धक्का देण्याचा हेतू त्यातून स्पष्ट जाणवला. त्याने मान वळवली . तो हात मामांचा होता ......... त्याने कसंतरी धडपडत ती पकड सोडवली आणि मामांच्या कानफटात मारली. आणि म्हणाला, " मामा माझ्या जिवावर उठलास ? आधीच तू दोन जिवांच्या हत्यांना तू जबाबदार आहेस " मामा कानफटात खाऊन दुसऱ्या खडकावर भेलकांडला . उठत धडपडत तो माळ चढू लागला. सुहास त्याच्या मागेच होता. त्याने पटकन मामांचा एक पाय ओढला. त्याच्या हातात त्यांच्या धोतराचं टोक आलं. त्याने ते खसकन ओढलं. पण मामांनी दुसऱ्या पायाने त्याच्या तोंडावर लाथ मारली. सुहासने तोल सांभाळला. पण मामा तोपर्यंत माळावर चढले होते. मामा माळावर मोठया कष्टाने आले खरे, पण समोर जाधव उभा असेल याची त्यांना कल्पना नव्हती. ते जेमतेम उभे राहिले असतील नसतील , तोच जाधवने त्यांच्या छातीत एक ठोसा लगावला. ...... पण मामा काही कच्चे खिलाडी नव्हते. त्यांनी पण जाधवाच्या पोटात दोन ठोसे मारून त्याचा एक हात पिरगळला आणि दुसऱ्या हाताने त्याची मान पकडली . म्हणाले, " जाधव शेवटी तू नोकर माणूस. वाड्याच्या अन्नाशी गद्दारी केलीस. थांव , साल्या तुला पण दलदलीत फेकतो." असं म्हणून त्यानी त्याच्या कमरेत हात घालून त्याला उचलायचा प्रयत्न केला. पण जाधवने जीवाच्या आकांताने मामांच्या गुडघ्यावर जोरात लाथ मारली. आणि मामांचा विळखा सैल पडला. मामा धडपडले. आता सुहासही वर आला होता. त्याने मामांच्या बरगडित लाथ मारली. वेदनेने विव्हळत त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. पण जाधवने पटकन त्यांच्या छाती वर उडी मारली आणि त्यांच्या नाकातोंडावर दोन चार ठोसे मारले. त्यांच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागले. आता तो छातीवर घट्ट मांड घालून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणाला" मामा , तू माज्या कमळीला मारलीस. तिचा जीव घेतलास. भडव्या, हरामजाद्या , आता मी तुला जिवंत ठेवीत नाही . " तो पुन्हा गळा दाबू लागला. पण सुहास ओरडला, " नाही जाधव त्याला मारू नकोस. आपण त्याला पोलिसांच्या हाव्यात देऊ. त्याला असाच पकडून बांधून ठेवू " त्यावर जाधव भडकून म्हणाला, " मी याला मारणार माजी कमळी कशी तळमळली असेल ह्ये कळलच पायजे साल्याला "
सुहासनी मग जाधवला कसंतरी समजावलं. कायदा हातात घेणं बरोबर नाही. शिवाय याला असा मारून टाकला तर तो मरून सुटेल लेकाचा. याचे हालहाल व्हायला हवेत्. ह्याच्या मुळे तू , कमळी , रेखा आणि सदा यांनी किती मनस्ताप आणि हाल सोसले आहेत याची तुला कल्पना आहेच. यालाही जरा पोलिसी पाहुणचार आणि कोर्ट कचेरीच्या चकरा करू देत की. हे जाधवला पटलं. मग त्या दोघांनी मामांचा बनियान आणि धोतर फाडून त्यांचे हातपाय बांधले. मामा रागाने बडबडत होते, " लेको, तुम्हाला याचा जाब द्यावा लागेल. मी काहितरी करून सुटका करून घेईन. आता वाडा फक्त माझ्या मालकीचा आहे. रेखा पण गेली. मग सुहास भडकून म्हणाला, " ए, तोंड बंद कर सुकळीच्च्या., गप एकदम गप. तुला काय वाटतं रे, तू सुटशील दोन खुनांचा आरोप आहे तुझ्यावर, फाशी तुला नक्कीच होणार. काही नाही तरी जन्म ठेप कुठेच गेली नाही. आता मरेपर्यंत सड तुरुंगात. मधून मधून आम्ही येऊच तू कसा सुखात आहेस ते. " मामांना त्या दोघांनी उचलत ढकलत , लाथाळत वाड्यात आणून "त्या " खोलीत ढकलले. त्यांना खोलीत बांधण्यासारखी वस्तू दिसेना. सुहासला अचानक आठवलं, की मामांनी आजच दोरखंड आणलाय. शोधाशोध केल्यावर त्यांना तो मिळाला. एक तारेचं वेटोळंही मिळालं. त्यांनी मामांना दोन्ही गोष्टींनी पक्कं बांधून ठेवलं. मग जाधव म्हणाला, "मालक, आपण याला रेखाताईंच्या खोलीत वंद करून ठेऊ. मी तालुक्याच्या गावाला जाऊन पोलिसांना घेऊन येतो. " त्यावर सुहास म्हणाला, " अरे मी कसला मालक ? काहितरीच. " पण तो म्हणाला, " अवं तुमच्या मुळं तर मला माज्या कमळीबद्दल कळालं. आनी आता दुसरं कोन जितं हाय ? " . सुहास म्हणाला, " ते जाउ दे. तू याच्याकडे लक्ष ठेव. मीच पोलिस घेऊन येतो. तुला ते जमणार नाही. " मग त्याला नैनाची आठवण झाली. ती कुठे गायब झाली ? त्याने जाधवला नैनाबद्दल सांगितलं. त्याने मामांना एक वाजवली आणि विचारलं, " काय रे ए ... नैना कुठे आहे ? " ते तिला रेखाच्या खोलित ठेवल्याचं म्हणाले. रेखाच्या खोलीत नैना त्यांना हात पाय बांधलेल्या स्थितीत सापडली. ती रडतच म्हणाली, " मला आईकडे जायचयं. "तिला कशी तरी समजावली. सुहासने घड्याळ पाहिलं. दुपारचे तीन वाजत होते. म्हणजे दोन अडीच तासात सग्ळं घडलं तर. मग त्या दोघांनी मिळून मामांना रेखाच्या खोलीत नेऊन ठेवलं. बाहेरून कुलुप लावलं. सुहास नैनाला घेऊन निघणार तेवढ्यात जाधव म्हणाला, " मगाचच्या खोलीत ( "त्य " खोलीत ) एकदम कुजल्यासारखा वास मारतोय. पाह्यला हवं. " सुहास ने ते आपण आल्यावर पाहू असं म्हंटलं.
सुहास गेल्याचं पाहून मग मामांनी नाटक करण्याचं ठरवलं. जाधव मामांना बंद करून दिवाणखान्यात बसला होता. मामांनी विव्हळायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून जाधव दाराशी आला आणि म्हणाला , " मामा , नाटक करू नकोस. आता सडत बस जेलमधे. पोलिस येतील आनी तुला घेउन जातील. मामा रडत रडत म्हणाले, " अरे बाबा , मला तहान लागल्ये, पाणी तरी पाज . " जाधवने मग पाणी आणू दरवाजाच्या फटीतून आत फेकलं. त्ते त्यांच्या तोंडावर पडलं. आणि तो परत दिवाणखान्यात जाऊन बसला. मामांनी सरकत सरकत , खोलीच्या कोपरा गाठला, जिथे एक सोटा पडला होता. त्यांनी मागे बांधलेल्या हातांतून आधी आपलं बूड आणि नंतर पाय बाहेर काढायचा प्रयत्न केला. त्यांना त्यात यश आले. हात बांधलेले असले तरी ते आता पुढे होते. थोडा जोर लावून दोरखंड फाकवले आणि सोटा कसातरी दोन्ही हातात धरून उचलला. ते धडपडले. पण दरवाजाच्या कोपऱ्यात एका भिंतीच्या आधाराने उभे राहिले. जाधव परत बघायला येणार असा त्यांचा अंदाज होता. आणि तसच झालं. बराच वेळ मामांचा आवाज न आल्याने जाधव दरवाजाशी येऊन कानोसा घेऊ लागला. त्याला काही हालचाल जाणवली नाही. हा मेला तर नाही ? असं वाटून त्याने किल्लीने कुलुप उघडलं. मामांना पाशवी आनंद झाला. आता त्यांनी मोठ्या कष्टाने हातातील सोटा उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर धरला आणि दार उघडण्याची वाट पाहू लागले,. अपेक्षेप्रमाणे जाधवने अडसर दूर केला आणि अगदी सावधपणे तो आत शिरला. मामा दिसेनात म्हणून त्याचे कुतुहल वाढलं आणि तो दोन पावलं पुढे गेला आणि इथेच चुकला. मामांनी खांद्यात येणारी कळ कशी तरी दाबत वर केलेला सोटा जाधवच्या डोक्यात सर्व बळ एकवटून हाणला. .. जाधव ओरडून खाली पडला. त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. मग मात्र मामांनी उशीर न करता जवळच असलेला पेटारा सरकवला. पेटाऱ्या खाली तळघरात जाण्याचा जिना होता . त्यांनी प्रथम दरवाजा आतून लावून घेतला. आणि ते हळू हळू तळघरात उतरू लागले. ते आत गेले आणि प्रथम हाताचा दोरखंड तिथल्याच एका बंद खिडकीच्या गजाला घासाय्ला सुरवात केली. हळू हळू दोरखंडाची ताकत कमी झाली आणि दोन्ही हातांना बांधणारा दोरखंडाचा दुवा एकदाचा तुटला. मग त्यांनी स्वतःचे हात पाय सोडवून घेतले. तळघर बऱ्यापैकी मोठं होतं. एका कोपऱ्यात मामांनी एक शिल्प आणलेलं ठेवलेलं होतं. तो एक पक्षी होता. ज्याच्या चोचीत दात होते आणि पंखांना नख्या होत्या. लाल डोळ्याचा पक्षी मोठा विचित्र दिसत होता. मामा कदाचित त्याची आराधना करीत असावेत. त्याच्या बाजूला दोन तलवारी होत्या. त्या घेऊन ते सुहास आणि इतर लोकांशी सामना करणार होते. गेटजवळ जीप थांवलेली त्यांना ऐकू आलं नाही. ते थोडावेळ थांबून तळघरातून वर येउ लागले.
इकडे सुहासने मग नैनाला उचललं आणि तालुक्याला जाणाऱ्या बससाठी तो स्टँड वर आला. बस एकच असल्याने तिच्या फेऱ्या मार्यादित होत्या. तसच ती उशिरा यायची आणि वेळही नक्की नव्हती. मग बस आता चार वाजल्याशिवाय नसल्याचे समजले. त्याने समोरील हॉटेल मध्ये नैनाला घेऊन जेवण केलं. चारच्या सुमारास बस आली. तसा अर्धा तास लागायचा , पण चालत एखाद तास नक्कीच लागला असता. आणि उन्हाची वेळ असल्याने नैनाला घेऊन जाण कठिण होतं. तालुक्याच्या बस स्टॉप समोरच पोलिस स्टेशन होतं. तो आत शिरला आणि पाहिलं तर आज बरीच गर्दी दिसली. एक हवालदार दरवाजाजवळच बसला होता. त्याला विचारल्यावर कळलं की आतल्या साहेबांना भेटल्याशिवाय तक्रार नोंदवता येत नाही. म्हणून तो बसून राहिला. पाचच्या सुमारास त्याला आतून बोलावलं.तो "गुड आफ्टरनून " म्हणून तो आत शिरला. काही कारणाने खुर्चित वळलेले साहेब समोर आले आणि त्यांना बघितल्यावर ते पाचारणे काका असल्याचं दिसलं. तेही ओळखीचं हसू हसले, म्हणाले, " बस ना . (नैना कडे पाहून )तू लग्न कधी केलस ? इथे काय काम काढलस ? " त्यांना पाहून त्याला जरा धीर आला. मग त्याने त्यांना सगळीच कहाणी सांगितली. त्यावर ते म्हणाले, " अरे, हा प्रभा मामा मला माहित आहे. चोरीचा माल विकत घेतो आणि विकतो. पण इतकी काळजी त्यानी घेतली की त्याच्याविरुद्ध आमच्याकडे एकही पुरावा नाही. आधी आपण एफ आय आर वगैरे नोंदवून घेऊ आणि निघू. " मग त्यांनी स्टाफला सुचना देऊन निघण्याची तयारी केली. दोन कॉन्स्टेबल, दोन शिपाई घेऊन मग ते निघाले . वाटेत सुहासने त्यांना बरीच माहिती दिली . त्यावर ते म्हणाले, "अरे, या तुझ्या मामाचा आमच्या खात्याला पहिल्यापासून संशय. पण गावातल्या लोकाना आणि आमच्या खात्यातल्या काही लोकांना त्यांनी मिंध करून ठेवलय. म्हणून त्यांच्याविरुद्ध कोणी तक्रार नोंदवायला तयार होत नाही " अर्ध्या पाऊण तासात जीप वाड्याच्या लोखंडी गेट पुढे उभी राहिली. ........
इन्स्पे. पाचारणे, चार पोलिस शिपाई आणि सुहास घाईगर्दीने घरात शिरले. जाधवला हाक मारूनही सुहासला तो दिसला नाही . त्याने प्रथम रेखाच्य खोली कडे पाहिलं, कुलुप नव्हतं. त्याने पाचारणे काकांना याची कल्पना दिली. मग त्या चौघांनी मिळून दरवाजा ढकलून पाहिला. पण तो आतून ब्ंद होता...... मामांनी जाधवचं काय केलं ? आतून बंद असलेला जाडजूड दरवाजा लवकर उघडेना. आत मध्ये मामा दोन्ही हातात तलवारी घेऊन वर येत होते. त्यांनी दारावरच्या धडका ऐकल्या आणि ते स्वतःशिच हसले. मारा लेको , धडका मारित बसा. आणि एकवार पडलेल्या जाधव कडे तुच्छतेने पाहात ते समोरच्या भिंतीतला जिना चढू लागले. आस्ते आस्ते दाराची जिद्द संपली आणि ते कोलमडून पडलं. मामा जिन्यावरून पळून गेले. नक्की कोणत्या खोलीत गेले कोणास ठाऊक . आत शिरल्या शिरल्या शिरल्या पाचारणेना जाधव पडलेला दिसला. त्याच्याकडे पाहण्यासाठी सुहास ला सांगून ते जिन्याने एकाहातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात पिस्तूल घेउन ते निघाले. त्यांनी आणखी दोघांना बाजूच्या खोल्या उघडण्यासाठी सांगून त्यातील ज्जिन्यांची नाकेबंदी करायला सांगितलं. अर्थातच कुलुपं गोळ्या घालूनच तोडली गेली. दर आवाजाला नैना मात्र जोरजोरात ओरडत असे. तिला गप्प करणं कठीण जात होतं. शेवटी एकदाची जाधवला शुद्ध आली. मग त्याने सगळी कहाणी सांगितली. तो म्हणाला हे सगळेच जिने आणि खोल्या आतून एकमेकांना जोडले आहेत. पाचारणे वरच्या खोल्यां मधून शिपायांसहित पळत होते. मग त्यांनी निर्वाणिचं शस्त्र उपसलं. साधारणपणे प्रत्येक गुन्हेगार ज्या युक्तीला बळी पडतो. अधून मधून मामा पाचारणेना चिडवीत होते. " अरे तुम्ही काय मला शोधणार ? आता बसा फिरत चक्रव्यूहात. " असं म्हणून ते पळत होते. शेवटी मामा म्हणाले, " इन्स्पेकट्र मला मुकाट्यानं वाड्याबाहेर जाऊ द्या, नाहीतर खून खराबा होईल. तुमच्या हातातलं पिस्तूल खाली टाका. तुमच्या माणसांना बाजूला व्हायला सांगा . मी कुठून जाईन ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. " पाचारने म्हणाले, " ठिक आहे मामा , हे टाकलं पिस्तूल. " म्हणून त्यांनी जवळच असलेलं एक जुनं पुराणं भांड होतं ते भिरकावलं. मामांना ते कळलं नाही. त्यांच्या डोक्यात इथून जिव्ंत बाहेर पडणं हा एकच विचार होता. मग पाचारने म्हणाले, " मामा , आम्ही जातो. मग आप ण मांडवली करू. तुम्ही स्टेशनला या. बघू काय ते. " असं म्हणून त्यांनी जिथे आहेत तिथेच आपले बूट वाजवले. खात्री करून घेण्यासाठी मामांनी हातातली एक तलवार फेकली. ती खणखणत खाली आली. मग मामा जिना उतरू लागले. ते इतके मूर्ख असतिल असं पाचारणेना वाटलं नाही . हळू हळू उजव्या हातातली तलवार समोर धरीत ते त्याच जिन्याने खाली उतरले. जिथे पाचारणे उभे होते. ते पाचारणे उभे होते त्या पायरीजवळून गेले आणि पाचारण्यांनी त्याच्या मानेवर हाताने विळखा घातला आणि हात पिळून त्यांच्या हातातली तलवार काढून घेतली. मामा जेरबंद झाले. मग त्यांना बेड्या ठोकून सगळेच जण माळावर गेले. मामांना पक्के धरून ठेवले होते. सुहास ने मग कमळीचं थडगं दाखवल. त्यातील सांगाडा पाहून जाधवला फार वाईट वाटलं. तो मामांच्या तोंडावर थुकला आणि म्हणाला, " अरे , मामा हरामखोरा, नरकात सुद्धा तुला कोणी जागा देणार नाहि. मग पंचनामा करून पाचारण्यांनी कमळिचा देह चादर घालून झाकून ठेवला. ते सुहासला म्हणाले. " तू म्हणतोस, रेखा या दलदलीत बुडाली, पण सगळी यंत्रणा आणून तिलाबाहेर काढायला बेळ लागेल. तो पर्यंत मामांना आपण पो. कस्टडीत ठेवू. मामा आता यापुढचे पाहुणचार तिथेच झोडतील. काय मामा, बरोबर आहे ना ? " उत्तरादाखल मामा फक्त गुरकावले.
सुहास ने मग ज्या खोलीत वास मारत होता. तिथे इन्स्पे. ना नेले. सर्वानाच नाकाला रुमाल लावावा लागत होता. टॉर्चच्या प्रकाशात भिंतितला जिना चढून ते सगळेच वर गेले . तिथे खाटेवर सदाचं प्रेत कुजलेल्या अवस्थेत पडलेलं दिसलं. जवळच एक दोन तीन दिवसांपूर्वी वाढलेलं ताट दिसलं. सगळ्याच ठिकाणी किडे वळवळत होते. मग शववाहिका मागवली ती सात सव्वा सात वाजता आली. आणि दोन्ही बॉडिज घेऊन गेली. मामाना पण पुढील रात्री कस्टडीत काढण्यासाठि इन्स्पे. साहेबांनी बांधून नेले. जाताना मामा अतिशय तिरस्काराने सुहासला म्हणाले, " तू मंदीचा मुलगा. तिच्यावर माझा जास्त जीव . मी तुमच्यावर प्रेम केलं. चांगले पांग फेडलेस, मामाला तुरुंगात पाठवून. सुहास काहीच बोलला नाही. फक्त "जा आता " एवढच बोलला. सर्व प्रकारात नैनाचे प्रश्न चालुच होते. तिला शेवटी त्याने सांगितलं, की तुझीआई नदीवर कपडे धुवायला गेली होती ती घसरून पडली. रात्री दहाच्या सुमारास जिल्ह्याच्या गावाहून पोलिसांच्ं आणखी एक पथक आलं . त्यांच्याकडे दलदलीतून बॉडी काढण्याची सर्व यंत्रणा होती. इन्स्पे. पाचारणे पंचांसहीत आले. अर्ध्या पाऊण तासात रेखाची बॉडी बाहेर काढली गेली . आणि खडकावर ठेवली. तिचा चेहरा अर्धवट दिसत होता. जाधवने एक बालदी भर पाणी आणून तिच्या अंगावर ओतले. तेव्हा दलदलिची घाण बाजूला झाली. जीव एखाद तासात गेला असावा असं पाचारणे साहेबांचं म्हणणं होतं. रेखा हकनाक बळी गेली होती. केवळ परिस्थिती वाईट असल्याने तिला अशा कपटी मामाचा आश्रय घ्यावा लागला.
आता मामांविरुद्ध तीन माणसांचा जीव जायला जबाबदार असल्याचे गुन्हे नोंदले जातील असं सुहासच्या मनात आलं. पण रेखाची आठवण मात्र काही केल्या जाईना. दुसऱ्याच दिवशी वाडा सोडून तो जायला निघाला. तेव्हा जाधव म्हणाला, " आता कधी येनार तुमी वाड्यावर राहायला ? " त्यावर तो म्हणाला, " वाड्यावर राहायला? मी इथे येईन अस्ं वाटत तुला ? मी आता हा वाडा विकणार . पण इथे राहणार नाही. वाडा विकून जे पसे येतिल त्यातली काही रक्कम मी तुला देईन , पाहिजे तर शेती विकत घे. बघ काय ते. त्याने एकदा वाड्याकडे पाहिलं. आणि मागे न पाहता तो नैनासहित निघून गेला.
*********संपूर्ण **********
रेखा वाचायला हवी होती.....?
रेखा वाचायला हवी होती.....?
आवडली रेखाच्या स्वप्नाने खुप
आवडली
रेखाच्या स्वप्नाने खुप आधीपासुनच तिला भविष्यकाळ(वाईट) दाखविला.बिचारी रेखा.
(सुहासला एकदम आठवलं. सदाच्या
(सुहासला एकदम आठवलं. सदाच्या तोंडात कमळीचं नाव आल्याचं रेखा म्हणाली होती. म्हणजे कब्रस्तानात कमळीलाच पुरली होती तर . म्हणजे सदा रेखाचा खरा मामा. रेखाची आई ती आपली मावशी.) मावस बहीणीशी लग्न?????????????????????
अरे, लवकर आवरली...!! अजुन
अरे, लवकर आवरली...!! अजुन फुलवता आली असती....!!! मला वाटले, याचे अजुन भाग येतील....!!!
सुरुवातीला जी पकड घेतली होती
सुरुवातीला जी पकड घेतली होती कथेनी, ती नंतर कथा रिअलिस्टिक करण्याच्या गोंधळात सुटून गेली. तसंच, कथा संपवायची प्रचंड घाई झालेलीही दिसून येते. थ्रिलर प्रकारातल्या कथा नीट फुलवल्या नाहीत तर मूळ बीज चंगलं असूनही कथेतला इंटरेस्ट कमी होत जातो!
अर्थात, हेमावैम!
आणि तुम्ही खूप छान लिहिता म्हणून आवर्जून सांगितलं, चुभुदेघे!
नाही आवडली.... रेखाच्या
नाही आवडली....
रेखाच्या स्वप्नांचि लिंक लागत नाही, तसेच कमळी जर दिड दोन वर्शापासुन मेलिये तर रेखाला लहानपणापासुन स्वप्ने का पडतात हे अनुत्तर्च आहे
भानुप्रिया +१
भानुप्रिया +१
पूर्वी पडणार्या स्वप्नात
पूर्वी पडणार्या स्वप्नात कमळीचा उल्लेख आलेला नाही. फक्त आत कोणि स्त्री होती एवढंच म्हंटलेलं आहे. ती कमळी निघाली हा योगायोग आहे. फक्त तिला स्वप्नाने पुढे काय घडणार हे दाखवले, इतकेच. मला वाटतं त्यात एवढा विचार करण्याची गरज नाही. कथेमुळे गूढ भितीचा परिणाम साधला आहे की नाही ते पाहाणे बरे. आणी ती एंजॉएबल झाली आहे का नाही ते पाहावे. तसेही मावसबहीणीशी लग्न निषिद्ध आहे हे मला ही माहीत आहे , पण मी अशा केसेस पाहिलेल्या आहेत. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही असे वाटते. अर्थात ही माझी मते आहेत. पटावीत अशी अपेक्षा नाही. आता कथा लवकर संपवल्यासारखि वाटली कारण रेखाने आत्महत्या केली. पण तिची कारणे तिला आलेली निराशाच कारणीभूत आहे. तिला जगावं अस वाटण्यासारखं काहि राहिलंच नाही. नाहीतर तिने सुहासने दिलेली लग्नाची मागणी नाकारली नसती . आणि अशा स्त्री बरोबर संसार करणं सुहासला कितपत जमलं असतं ते सांगणं कठीण आहे . याउलट सुहासला स्वतःचं असं आयुष्य आहे. आणि तो नैनाची जबाबदारीही घेतोय. याची रेखाला कुठेतरी खात्री असावी. आणी दिवसाचा संसार ही कल्पना म्हणून ठीक आहे पण प्रत्यक्षात निभावून नेणं कठीण असण्याची शक्यता आहे. जे सुहास बोलून दाखवतो. कथा पुढे कोणत्या आधारावर फुलवणार ? मामांची अडचण जरी दूर झाली असली तरी बर्याच गोष्टी पुढील आयुष्यात विस्कळीत राहण्याची शक्यता वाट्ली. त्यामुळे सुखांत करणं जमलं नाही. आणि म्हणूनच रेखाचा शेवट असाच व्हावा असे मला वाटले. असो , हे माझे स्पष्टीकरण आहे. त्यातही काहि त्रुटी सापडतील. तुमच्या हरक्ती बरोबर असतील , तो तुमचा दृष्टिकोन आहे . तो चुकीचा आहे असे मी म्हणणार नाही. काहीही असो, आपण सर्वांनी कथा नुसती न वाचता तपशीलवार व विचार पूर्वक
अभिप्राय दिल्याबद्दल मी फार आभारी आहे.
सदा म्हणून कोणितरी होता
सदा म्हणून कोणितरी होता त्याचे काय झाले? सॉरी, कदाचित मी एखादा भाग वाचला नाही म्हणून मला कळलं नाही का
पोलिसांना सदा मेलेल्या
पोलिसांना सदा मेलेल्या स्थितीत सापडला.