९ ऑगस्ट २०१६
हल्ली आम्ही एक नवीन प्रकार सुरू केला आहे. डोळ्यावर हात ठेवून गुडघ्यात डोके खुपसून बसायचे आणि आपण लपलो असे डिक्लेअर करायचे. मग पप्पा उगाचच्या उगाच शोधायचे नाटक करणार आणि ती अचानक भॉ केल्याच्या आवेशात मोठ्याने किंचाळणार..
तर गेल्या रविवारी असाच काहीसा खेळ मॅकडोनाल्डमध्ये चालू होता. दरवाज्याजवळच्या पॅसेजमध्ये अशीच ती स्वत:ला लपवून बसली होती. जवळून दोन अठरा-वीस वर्षांची मुले गेटबाहेर पडत होती. ईतक्यात अचानक बॉम्ब फुटावा तशी ही किंचाळत उसळली. या अनपेक्षित प्रकाराने तिच्या जवळून जात असलेला मुलगा अक्षरश: अंग काढून दचकला. तर त्या बरोबरचा दात काढून हसायला लागला.
तरी बरेय एवढावेळ त्या दोघांनी बर्गर खात खात या मुलीची दंगामस्ती आवडीने पाहिली होती. म्हणूनच या ह्युमन बॉम्बवर न चिडता, कपाळावर हात मारत हसत हसत बाहेर पडले.
.
.
११ ऑगस्ट २०१६
काल रात्री बारा वाजता..
मम्माने केक आणला, परीने केक कापला, दोघींनी मिळून खाल्ला.. पप्पांचा बड्डे सेलिब्रेट झाला!
केकवर साधी फुंकरही मारायचे कष्ट मला घेऊ दिले नाहीत..
बघूया आजतरी काहीतरी मलाही खाऊ घालतील
.
.
१४ ऑगस्ट २०१६
आमचा एक फेवरेट खेळ आहे. अद्रुश्य कॅटी आणि डॉगीचा. कधी ते आमचे फ्रेंड बनून आमच्याशी भातुकली खेळतात, तर कधी आमचे शत्रू बनूत आमच्यावर आक्रमण करतात. अश्यावेळी मग पप्पा एकेकाला फाईट देत हाकलून लावतात.
आज दुपारी असेच बेडरूममध्ये बसल्याबसल्या हा खेळ चालू होता.
ए तो बघ डॉगी आला, डॉगी आला..
आss Dhishhoom एक फाईट दिली .. गेला तो उडून.
ए तो बघ परत आला.. परत आला..
एss Dhishhoom यावेळी जोरात फाईट दिली आणि उचलून त्याला खिडकीच्या बाहेर फेकले. आता तो परत येणार नव्हता.
ए ती बघ कॅटी आली, कॅटी आली...
हा खेळ असाच चालू राहतो म्हणून मी कॅटीला फाईट न देता प्रेमाने उचलून घेतले आणि कुरवाळून बाजूला बेडवर झोपवले.
त्यानंतर मग उंदरांची फौज आमच्यावर चाल करून आली. छोटा उंदीर, मोठा ऊंदीर, ब्लॅक उंदीर, ब्राऊन ऊंदीर, एकेकाचा समाचार घेत ढिश्शूम ढिश्शूम करत अखेर मी वैतागलो आणि आता पप्पा दमले जरा, झोपतो जरा, म्हणून बेडवर आडवा होत डोके टेकतो न टेकतो तेच धडाधड माझ्या अंगावर बुक्के पडू लागले..
ए उठ उठ.. तू कॅटीवर झोपलास.. कॅटीला लागले.. बघ ती रडायला लागली.. ए तू हे काय केलेस
अरे देवा.. त्या कॅटीला मी नेमके तिथेच झोपवले होते हे मी विसरून कसा गेलो. वर चक्क तिच्यावरच झोपलो. भूतदया नावाचा काही प्रकार आहे की नाही माझ्यात याची माझी मलाच लाज वाटू लागली..
आणि मग काय, नंतर आपण मम्माला सांगून तिला मलम लावूया म्हणत त्या मिस्टर ईंडिया कॅटीला ओंजारून गोंजारून परीशी मांडवली केली
.
.
१६ ऑगस्ट २०१६
कधीतरी मी कंबरेवर हात ठेवून उभा असतो,
मला कॉपी करत ती सुद्धा कंबरेवर हात ठेवते.
कधीतरी मी हात उंचावून आळस देतो,
मला कॉपी करत ती सुद्धा आळस देते.
काल मात्र ती बेडवर उताणी झोपून पायांची सायकल चालवत होती,
मी सुद्धा तिच्या बाजूला पडल्या पडल्या सायकल चालवू लागलो.
मग तिने काटकोनात पाय वर उंचावले,
मी सुद्धा पाय वर उचलले.
मग तिने पाय आणखी मागे घेत डोक्याला लावले,
माझ्या कंबरेचे हाडच मोडले ..
.
.
२३ ऑगस्ट २०१६
मेमरीज - वॉल पेंटींग
.
.
२८ ऑगस्ट २०१६
आज मी माझ्या आयुष्यातील पहिले अंडे उकडले
हल्ली दर रविवारी मी आणि परी दोघेच घरी असतो. त्यामुळे दिवसभर तिच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी माझीच असते. यात आम्ही दोघेही रविवारी स्कूल ऑफिस नसल्याचा फायदा घेत बारा वाजता उठत असल्याने एक प्रहर तिथेच संपते. तिला आंघोळ घालणे, ब्रश करणे, दूध पाजणे आणि मग खेळवणे या सर्वांची मला तशी सवय असल्याने तितकेसे जड जात नाही. जेवणही तिची मम्मीच करून जात असल्याने मला फक्त भरवायचे कामच असते. पण आज तिला अंडे खायचे डोहाळे लागले. ते देखील अंड्याची पोळी नाही (जी मला बनवतात येते) तर व्हाईट अंडेच खायचे होते. व्हाईट अंडे म्हणजे उकडलेले अंडे!
काही हरकत नाही! असे म्हटले खरे. पण नंतर मला साक्षात्कार झाला, की मी आजवर आयुष्यात स्वत: असे एकही अंडे उकडले नव्हते. एका अंड्याला पाण्याचे किती प्रमाण घ्यायचे आणि त्याला किती वेळ त्या उकळत्या पाण्यात ठेवायचे ईथपासून बोंब होती. तसेच त्या कवचाच्या आत अंडे उकडले आहे की नाही हे आपल्या दिव्यदृष्टीने कसे ओळखायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता. पण थॅन्क्स टू टेक्नोलॉजी आणि ईंटरनेट, ईथून तिथून पटपट माहीती मिळवली. आणि दहाव्याच मिनिटाला माझे उकडलेले अंडे तयार होते.
बर्यापैकी बरे झाले होते. नाही म्हणायला आतले पिवळे बलक जरा कमी उकडल्यासारखे चिकट राहिले होते. पण नो प्रॉब्लेम. तसेही ‘व्हाईट परी आणि येल्लो पप्पा’ ही आमची ठरलेली विभागणी असते. त्यातही दहापैकी आठ वेळा ती अंडे पुर्ण खात नाही. पण आज मात्र पुर्ण संपवले. ईतकेच नव्हे तर आणखी मागू लागली. एका आईने मुलासाठी काहीतरी खायला केले आणि मुलाने ते पोटभर खाल्ले कि तिला काय समाधान मिळते ते नेमके आज समजले. त्याच समाधानात मग मी दुसरे अंडे उकडवायला घेतले
काहीही असो, कॉन्फिडन्स तर सध्या ईतका वाटत आहे की उद्या तिने उकडीचे मोदक मागितले तरी काहीतरी खटपट करून देईनच
.
.
२९ ऑगस्ट २०१६
कोण म्हणते देशभक्ती फक्त तारखेपुरती ऊगवते.
आज पंधरा ऑगस्ट होऊन दोन आठवडे उलटले तरी आमचे जन गण मन चालूच आहे. किंबहुना आता शब्दांसोबत सूरही पक्के होत आहेत. ‘भारतमाता की जय’ सोबत ‘वंदे मातरम’ ही म्हटले जात आहे. त्या दिवशी तर चक्क बाहुलीला झोपवताना अंगाई गीत म्हणूनही तेच चालू होते
आता तिला कोण समजवणार, बाई ते गीत कोणाला झोपवत नाही तर अंगात वीरश्री संचारत जागवते
.
.
३ सप्टेंबर २०१६
काही महिन्यांपूर्वी देव्हारा पाच फूटांवर नेलेला. पण हल्ली त्या शेजारील तीन फूट टेबलवर आम्ही सहज चढू लागल्याने तो पुन्हा दोन फूटांवर आलाय. आज पुन्हा एकदा आल्याआल्या तिथूनच धाड पडली. कृष्णाची हंडी फुटली, मारुतीला शेंदूर फासला गेला. दोघांना उचलून एका प्लास्टीकच्या डब्यात कैद केले गेले. वरतून व्यवस्थित झाकण लावले गेले.
भूतांना बाटलीत ऊतरवणे एक ऐकले होते, देवांवर अशी वेळ येईल असे वाटले नव्हते
.
.
४ सप्टेंबर २०१६
स्टोरी टेलिंग हा आमचा आवडता खेळ! "ईटस स्टोरीss टाईम" म्हणत बरेचदा तीच आम्हाला स्टोरी बनवून सांगते. पण हल्ली आमचा उलटा गेम होऊ लागलाय. दररोज झोपताना आम्हालाच काहीबाही स्टोरी बनवून तिला सांगावी लागतेय. मला फक्त लिहीता येते, पण सांगणे जमणार नाही म्हणत मी आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे रोज तिच्या मम्मालाच ही ड्यूटी लागते. पण परवा दुर्दैवाने तिची मम्मा ठार झोपी गेली, आणि आम्ही दोघेच जागे राहिलो.. आणि तिचा स्टोरी ऐकायचा मूड झाला...
मग काय, नाईलाजाने सुरू झालो,
... तर बाबड्या,
एक मोठ्ठे गार्डन असते. त्यात खूप मुले खेळत असतात.
"ए कित्ती मुले, कित्ती मुले?"
खूप सारी मुले. खूप सारी मुले..
मग तिथे कोण येते., एक छोssट्टूशी खारुताई.. (ही आमची खूप फेव्हरेट) .. खारुताई त्या मुलांना बोलते, "ए मला पण घ्याना तुमच्यात खेळायला." पण मुले हसायला लागतात. बोलतात, "अग तू केवढी लहान आहेस. तू आमच्यात कशी खेळणार? उगाच पडली बिडलीस तर कोण सांभाळणार तुला. आम्ही नाही घेणार तुला खेळायला." हे ऐकून खारुताई एकटीच रडायला लागते.. ऊं ऊं उऊ.. ऊं ऊं उऊ... मग तिथे परी सुद्धा खेळत असते. परीला तर खारुताई खूssप आवडत असते. परी खारुताईला विचारते, "ए तू का रडतेयस?" खारुताई म्हणते, "मला कोणीच खेळायला घेत नाही"
मग परी तिला म्हणते, "चल तू माझ्याबरोबर खेळ" आणि खारुताईचा हात पकडून तिला घसरगुंडीवर घेऊन जाते. पण खारुताईला काही शिडीवर चढायला जमत नाही. मग पप्पा कसे परीला खांद्यावर घेऊन घरभर फिरतात, तसे परी खारूताईला आपल्या खांद्यावर घेते आणि वर चढते. वर जाऊन खारुताईला घसरगुंडीवरून खाली सोडते. खारूताई घसरगुंडीवरून घसरत घसरत खाली येते. एकदम जोरात.. एs झूमss झुपूक .. एs झूमss झुपूक.. (सोबत गुदगुल्यांचा स्पेशल ईफेक्ट).. मग खारुताईला खूप मज्जा येते, खूप मज्जा येते. मग परी खारूताईला झोपाळ्यावर घेऊन जाते. झोक्यावर बसवते आणि एणम जोरात (एकदम जोरात) झोका देते. खारूताई ऊंच उंच जाते आणि झोक्यावरून खाली पडते. आणि रडायला लागते. ऊऊं उउ.. ऊऊं उउ..
मग तिथे परीची मम्मा येते. मम्मा खारुताईला कैलासजीवन लावते. (परीचे फेव्हरेट औषध. थॅन्क्स टू आज्जी).. मग खारूताईचा बाऊ बरा होतो. तरीही खारुताई काही रडायची थांबत नाही.
मग तिथे परीचेss ... पप्पा येतात.. ढॅण्गटेडॅssण्ग (हिरोच्या एंट्रीला साऊंड इफेक्ट तर हवाच)..
मग ते खारुताईची पाss घेतात. (हा डॉक्टर पप्पांचा एक रामबाण उपाय आहे. तेवढेच पा घ्यायचा चान्स असतो तो)..
मग खारुताई बरी होते आणि हसायला लागते. मग परी पण हसायला लागते. आणि दोघी मिळून पुन्हा खेळायला जातात. संपली स्टोरी! (हे 'संपली स्टोरी' सेम टू सेम तिच्या स्टाईलमध्ये)
...
....... आणि मग मी मोठ्या आशेने वन्स मोअर घ्यायच्या तयारीत तिच्या तोंडाकडे बघू लागलो ... पण ,
"पप्पा तू डोळे मिट. आणि झोप. मम्मा तू स्टोरी सांग.." .. पोपट झाला!
...
पण स्टोरी ईथेच संपत नाही.
काल पुन्हा खारूताई, परी, मम्मा-पप्पा आणि घसरगुंडीची सेम स्टोरी सांगायची फर्माईश आली. सांगताना लक्षात आले की अर्धीअधिक स्टोरी तिलाही पाठ झाली होती. ईतकेच नव्हे तर आज दुपारी टेडीला देखील तिच स्टोरी सांगितली जात होती. माझ्या पहिल्यावहिल्या बालकथेचे सार्थक झाले होते
नुस्तं क्यूट क्यूट बाळ आहे
नुस्तं क्यूट क्यूट बाळ आहे हे...... अ बिग हग !!!!!!!!!!!
मम्माने केक आणला, परीने केक
मम्माने केक आणला, परीने केक कापला, दोघींनी मिळून खाल्ला.. पप्पांचा बड्डे सेलिब्रेट झाला!......मस्त हा:)
दृष्ट काढत जा अधून मधून परी
दृष्ट काढत जा अधून मधून परी बरोबर स्वतःची पण!
किती क्युट ...क्युटी आहे
किती क्युट ...क्युटी आहे परी..
गोडंबी आहे नुसती
गोडंबी आहे नुसती
काय मस्त वाटत हे सगळं वाचताना
काय मस्त वाटत हे सगळं वाचताना . खूप छान.
परीकथेचे सगळेच भाग मस्त आहेत
परीकथेचे सगळेच भाग मस्त आहेत पण हा भाग मला खुपच आवडला.
प्रतिसादांचे धन्यवाद हर्पेन,
प्रतिसादांचे धन्यवाद
हर्पेन, हो काढतो अधनामधना. पण ते डिपार्टमेंट तिच्या आई आज्जींचे
निल्सन, मला तर प्रत्येक भागाला असेच वाटते
भारी आवडला हा पण भाग
भारी आवडला हा पण भाग
आणखी एक भातुकली... मस्तच
आणखी एक भातुकली... मस्तच मस्त,,
दाद आणि टीना, धन्यवाद
दाद आणि टीना, धन्यवाद
दृष्ट काढत जा अधून मधून परी
दृष्ट काढत जा अधून मधून परी बरोबर स्वतःची पण!>>>>>>>>> +१.असाच एक हळवा बाबा, माझा कलीग आहे.
मस्त !
मस्त !