फेअर अँड हँडसम

Submitted by स्वप्नील on 25 September, 2016 - 11:40

फेअर अँड हँडसम -

आरशासमोर उभा राहून केस विंचरत, तोंडाला पावडर लावत नीलची तयारी चाललेली. शाळेत आज मूल्यशिक्षणाच्या तासानंतर फक्त गप्पा, गोष्टी, गाणी, फिशपॉंड, भेंड्या असा कार्यक्रम. नील गाणं म्हणणार होता - 'दिलवाले' मधील 'जिता था जिसके लिये'. गेला एक आठवडा गाणं गाऊन पक्कं केलेलं. इतकं कि घरातलेही वैतागले होते कि कधी हा एकदाचा गाऊन मोकळा होतोय. कधी नव्हे तो आईच्या पाया पडला. तर आईला भलतंच टेन्शन - "कुणा मुलींसाठी तर नाही ना हे गाणं गात आणि ती मिळावी म्हणून हा पाया पडला???" त्याने आरशातून आईकडे पाहत तिच्या मनातलं हे बोलणं स्पष्ट ऐकलं आणि केस नीट करत स्वारी घराबाहेर निघाली.

'मॅच हरलो तरी फायनल मध्ये जाऊच' अशा वेळेस भारतीय क्रिकेट टीम जशी निर्धास्त खेळत असते तसंच काही वर्गात वातावरण होतं. कुठले तास नाही, गृहपाठ तपासणं नाही - फक्त मज्जा. नीलही आनंदात. शिक्षकही मित्रासारखे वागत होते. निदान दिसत तरी तसं होतं. नाहीतर दुसऱ्या दिवशी "काय रे नील्या, गाणं गाता येतं, पोरींना फिशपॉंड लिहता येतं, पण या गृहपाठाचं काय?" म्हणून 'थोबाडीत मिळणार' हे आधीच लक्षात ठेऊन नीलने 'लो प्रोफाइल' राहायचं ठरवलं. कार्यक्रमाला सुरवात झाली. भेंड्या, फिशपॉंड, एकत्रित वनभोजन, दुपारून गाणी आणि शेवटी शिक्षकांचं भाषण - जंगी बेत होता.

'बैठे बैठे क्या करे' ने भेंड्यांची नांदी झाली. कार्यक्रम रंगू लागला. 'किशोर ते सोनू' आणि 'आशा ते साधना' पर्यंत सगळेच गाण्यात आले. नील 'फुल फॉर्म' मध्ये गात होता - त्याच्या 'लो प्रोफाइलचा' निश्चय झुगारून. मुलींवर एक एक भेंड्या अशा काही चढत होत्या कि त्या भेंड्या 'खऱ्या' असत्या तर भाजीवाल्याचा चांगलाच धंदा झाला असता. नीलने गायलेल्या शेवटच्या गाण्याने मुलींवर भेंडी चढली आणि त्या हरल्या. मुलांचा धिंगाणा सुरु झाला. काही मुली नीलकडे रागाने बघत होत्या पण जिंकण्याच्या आनंदात भारतीय क्रिकेट टीम जशी विरोधी टीमला 'दुर्लक्ष' करते तसंच काही नीलने केलं.

फिशपॉंडचा कार्यक्रम सुरु झाला. तोही मस्त रंगला. 'वर्गातल्या प्रेमीजोड्या', 'एकतर्फी प्रेम प्रकरणं', 'शिक्षकांचा लाळघोट्या' 'पुस्तकी किडा' अशा वेगवेगळ्या विषयांवर फिशपॉंड आले. नील मनातल्या मनात खुश होता. त्याच्यावर एकही फिशपॉंड नव्हता. झालं - बोलायची खोटी - पुढचा त्याच्यावरच आला आणि तोही असा काही. "भेंड्याच्या कार्यक्रमात तू चांगलाच गाजला, तुझं काळं रूप पाहून कावळाही लाजला". जोरात एक थोबाडीत दिल्यावर डोळ्यांपुढे येणारी अंधारी आणि त्याबरोबर सुन्न झालेले कान आणि त्यातली निःशब्दता - अशी काही त्याची स्थिती झाली. सर्व वर्गात हसू फुटलं. शिक्षकही हसू लागले. काही मुली मुद्दाम नील कडे बोट दाखवत हसल्या. त्याला सगळ्यांचे फक्त हसणारे चेहरेच दिसत होते- आवाज काहीच नाही - टोटल म्यूट. डोळ्यातून अश्रू बाहेर येण्यासाठी धडपडत होते पण ते पाणी त्यांनी आतल्याआत गिळून टाकलं. शिक्षकांनी पुढचा फिशपॉंड वाचा सांगितलं आणि सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे वळालं .

पण नील पुढे वळालाच नाही - तो त्या जागी नव्हताच - त्याचा खचलेला प्रवास सुरु झाला - आपल्या काळ्या रंगाच्या तिरस्काराने भरलेल्या गोठडीसोबत - न्यूनगंडाच्या दिशेने!!!

- स्वप्नील पगारे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@स्वप्नील, चांगलं लिहिलंय. बऱ्याचदा असं होतं समाजात वावरताना. का, कोण, कधी आणि कसं खच्चीकरण करेल, हे सांगता येत नाही. म्हणून मनाला लाऊन न घेणे, हे उत्तम.
अवांतर: दोनदा क्रिकेटचा उल्लेख आलाय. तो अकारण, कथेच्या प्रवाहात आलेला अडथळा वाटतोय.

चांगलं लिहिलंय! काही शेरे नकळत आयुष्यभराच्या जखमा देऊन जातात. पण एक दिवस कुरूप बदकाला कळतंच की तो राजहंस आहे!

चांगलं लिहिलंय! काही शेरे नकळत आयुष्यभराच्या जखमा देऊन जातात. पण एक दिवस कुरूप बदकाला कळतंच की तो राजहंस आहे! +१

हम्म...

मस्त लिहिलय .
शाळेत अन विशेषतः कॉलेजमधे असताना काळ्या रंगावरून प्रचंड फिशपाँड अन टीका ही खाल्यात . ( बुरी नजरवाले पासून ए काळ्या वांडरापर्यंत)
आधीच आमचा रंग काळा अन त्यात दिवसभर खेळण Happy

पण ना कधीच त्याचा राग आला न वाईट वाट्ल . माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भागच आहे तो Happy

एक म्हणजे जी गोष्ट जन्मापासून मिळालीये त्यात वाईट काय वाटायच , दुसर म्हणजे याचा अर्थ असा की त्याला तुमच्यात दुसरा दोष सापडत नाहीय अन तिसर म्हणजे रंगावरून परि़क्षा करणार्याला महत्व किती द्यायच ? Happy

एक म्हणजे जी गोष्ट जन्मापासून मिळालीये त्यात वाईट काय वाटायच , दुसर म्हणजे याचा अर्थ असा की त्याला तुमच्यात दुसरा दोष सापडत नाहीय अन तिसर म्हणजे रंगावरून परि़क्षा करणार्याला महत्व किती द्यायच ? >>>>>हो.प्ण हे सगळ झेपण्यासाठी बरीच वर्श जावी लागतात.

चांगल लिहले आहे. Happy

थँक्स ऑल!!!

त्या त्या वयातील ती ती आकर्षणं आणि न्युनगंड प्रत्येकालाच असतात. तसंच काही हा एक अनुभव मी शेअर केला. केदार, आता खरंच त्याचं काही वाटत नाही पण त्या वयात ते सगळं समजण्याची कुवत नव्हती.

छान लिहिलंय.

क म्हणजे जी गोष्ट जन्मापासून मिळालीये त्यात वाईट काय वाटायच , दुसर म्हणजे याचा अर्थ असा की त्याला तुमच्यात दुसरा दोष सापडत नाहीय अन तिसर म्हणजे रंगावरून परि़क्षा करणार्याला महत्व किती द्यायच ? >>> केदार, हे सगळं समजायला बरीच वर्ष, बराच काळ लागतो शिवाय त्यानंतरही तेवढी मॅचुरिटी असावी लागते. लेख शाळेतल्या मुलाचा आहे. त्यावेळ्च्या भावना अशाच असतात.

अकु , सस्मित , स्वप्निल ,
मान्यच आहे की हे समजायला वेळ लागतो . अन अशावेळी तुम्हाला समजून घेणारी , तुमची माणस जवळ असणही गरजेच असत .
मी फक्त स्वानुभव सांगितला . Happy

त्यानी लिहल्य तर अगदी हुबेहूब अन वास्तववादीच . त्यामुळेच रिलेट झाल .

आता उलट टॅन ला जास्त डिमांड आहे.सुंदर मेंटेन्ड बॉडी आणि तरतरीत निरोगी डार्क स्किन हे कोम्बो प्रचंड आकर्षक दिसते.

उत्तम लेख.
पण वर्णभेद नष्ट होणे जवळपास अशक्य दिसतंय. वर्षानुवर्षे सामाजिक कारणांनी भारतात प्रत्येकाच्या मनात उजळ वर्णाचे सुप्त आकर्षण दडून बसलेलं आहे. उजळ वर्णाचा संबंध सुंदरतेशी जोडण्यात शास्त्रीय कारणे कमी, सामाजिक कारणेच जास्त दिसतील (जाणकारांनी प्रकाश टाकावा).
अन हा भेद सर्वच वर्णांकडून, मग तो गोरा असूदे व सावळा, सारखाच पाळला जातो. एकदा लग्नाच्या संकेतस्थळांवर आणि जाहिरातींवर नजर टाकली, की लगेच याचा प्रत्यय येईल.
अशा परिस्थितीत, न्यूनगंड निर्माण होणे अगदी सहज घडते, अन त्यातून बाहेर येणे तितकेच कठीण ठरते. कारण अशा व्यक्तीने या सगळ्याची कारणमीमांसा आपल्या रंगाशी जोडलेली असते, अन आपला वर्ण बदलणे, हाच त्याला यावरच उपाय वाटतो.

छान लिहिलेय. त्याचं वाईट वाटणं जाणवल. उगाचच फॅण्ड्री आठवला..

कित्येक ग्रूप्समध्ये "ए काळ्या" याच टोपणनावाने हाक मारली जाणारा एखादा मुलगा असतो. त्या हाकेमागे दुखवायचा हेतू बरेचदा नसतोच, किंबहुना आपल्या काळ्या मित्राला आपणच बिनधास्त ए काळ्या हाक मारू शकतो हि एक आपलेपणाची मैत्रीच्या हक्काची भावनाही असू शकते. पण अश्या एखाद्या प्रसंगी दुखावणारा दुखावला जातोच. फिशपाँड हा प्रकार कधीच आवडला नाही Sad

आता उलट टॅन ला जास्त डिमांड आहे.सुंदर मेंटेन्ड बॉडी आणि तरतरीत निरोगी डार्क स्किन हे कोम्बो प्रचंड आकर्षक दिसते.
>>>>

बॉलीवूडचा एखादा हिरो सांगाल यात मोडणारा? चटकन आठवत नाहीये..

बॉलीवूड हिरो नाही,बॉलीवूड हिरो मुख्यत: नॉर्थ्/पंजाबी आहेत आणि बोअर आहेत.
पण साऊथ इंडस्ट्रीत खूप चांगले तरतरीत हिरो आहेत.
(खरं सांगायचं तर बायकांना पालीसारखे पांढरे फटक्क मेल्स कधीच अपील होत नाहीत.एक टॅन आणि एक साधारण नर्गिस फाखरीच्या रंगाचा शेजारी ठेवून बघा, ८०% बायका टॅन ला निवडतील.)

फारतर गेलाबाजार अजय देवगण.
पण तो ही अपवादापुरताच. बाकी कितीही चांगला अभिनय येत असला तरी वर्णापुढे अभिनेते डावलले जाण्याची शक्यता जास्त वाटते.
बाकी किती उजळ वर्णाची मुले-मुली ठरवून सावळ्या रंगाचा जोडीदार निवडतील, हा संशोधनाचा विषय ठरावा.

चांगलं लिहिलय.

हो.प्ण हे सगळ झेपण्यासाठी बरीच वर्श जावी लागतात.
अन अशावेळी तुम्हाला समजून घेणारी , तुमची माणस जवळ असणही गरजेच असत .
>>>>> दोन्हीला अनुमोदन. फक्त रंगच नाही. बर्‍याच बाबतीत हे खरं आहे.

थँक्स ऑल अगेन!! Happy

तुम्हा सर्वांच्या कंमेंट्स वाचून छान वाटलं. मला नेहमी वाटतं कि काळ्या-पांढऱ्याचा वाद पूर्वेला पश्चिमेला किती वेगवेगळ्या प्रमाणात बघायला मिळतो. साहजिकच इकडे (अमेरिकेत) वर्णद्वेषातून जे काही झालंय आणि चाललंय ते गंभीर आहे. पण भारतात वर्णामुळे तयार केलेलं चित्र वेगळ्या पद्धतीचं आणि तितकंच गंभीर आहे. शिवाय आपल्या समाजव्यवस्थेत रंगामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या सोबत जोडल्या जातात. त्याचे उदाहरण vt220 ने शेअर केलेल्या शॉर्ट फिल्ममधे दिसतेच. किंवा फँड्री सारख्या फिल्म मध्ये पण दिसतं. विलभ यांनी म्हंटल्याप्रमाणे यांवर संशोधनही व्हावे. ऍज ए मॅटर ऑफ फॅक्ट, फेअर आणि लव्हली सारख्या कंपन्यांनी तो आधीच केला असेल आणि म्हणून हि गत झालीये.