तवा तापतच ठेवला होता. फोन हातात घेऊन फेसबुक चाळायला लागलो. एकेका पोस्टमधून ज्ञानाचे झरे असे काही वाहत होते कि जणू काही महापूरच! एवढं सगळं ज्ञानामृत एकदम वाचायचा मोह टाळला - भूक लागली होती ना...
तेवढ्यात एका पोस्ट मध्ये रामदेवबाबाचे काही गमतीदार आसनांचे फोटो आणि त्यांचे फायदे दिसले. त्याच्या खालोखाल दुसऱ्या पोस्ट मध्ये हाय प्रोटीन खाऊन तब्येत कशी बनवावी याचे धडे. अचानक अंगात उर्मी आली पण हलगर्जीपणात व्यायामाबद्दल काही निश्चय करायचा मोह टाळला - भूक लागली होती ना...
शेवटी तवा तापला आणि चपात्या गरम झाल्या (हो मी पोळी नाही म्हणत). चिकनचं कालवणंही गरम झालं. ताट मस्त कांदा, टोमॅटो, काकडीने सजवलं आणि माझी एकटी पंगत आनंदात बसली. घाईघाईत पाणी घ्याचही राहिलं. पण टेबलावरून उठायचा मोह टाळला - भूक लागली होती ना.
पहिला घास तोंडात गेला. भन्नाट अशा झणझणीत भाजीने जिभेला चटक बसली. मनोमनी बायकोच्या हातांची पप्पी घेतली. जीभ आणि तीस दात (हो दोन अक्कलदाढा काढल्यात) तोंडात चीअरगर्ल सारखे नाचून हाताला पुढचा घास घेण्यासाठी उद्युक्त करत होते. शेवटी पहिल्या घासाला आत ढकलत जिभेच्या आणि दातांच्या हट्टापायी आधीच तयार करून ठेवलेला घास घाईतच खाऊन टाकला. त्यालाही थांबवण्याचा मोह टाळला - भूक लागली होती ना...
फेसबुकवर टेहाळणी चालूच होती. देवांचे, बायकांवरील फालतू जोक्सचे आणि राजकारणाचे पोस्ट एका मागून एक सुपरफास्ट ट्रेन सारखे ढकलत होतो. अचानक गाडीला ब्रेक मारावा तसा स्क्रोलला ब्रेक मारला. एका लहान मुलाची पोस्ट दिसली. काय लिहलंय पाहण्यासाठी पोस्ट उघडली तर पाठीवर गोणीभर बोझं घेऊन निघालेल्या मुलाचा फोटो होता. त्यात मुलाला तू हे का करतोस असं एका गृहस्थाने विचारलं. तर तो म्हणाला या रद्दीचे पैसे मिळतात. गृहस्थ म्हणाला बोझं उचलून कंबर दुखत नाही का? मुलगा म्हणाला हो दुखते तर. पण जितकी जास्त कंबर दुखते तितके जास्त पैसे मिळतात आणि तितकं जास्त घरी सगळ्यांना खायला मिळतं. हे वाचून स्थिर झालो. कुणास ठाऊक का पण जिभेचा आणि दातांचा नाच थांबला. जेवणासाठी घातलेला घाट निरर्थक वाटला. सोशल नेटवर्किंगच्या कट्टयावर वास्तवाच्या दोन्ही टोकांचा बाजार किती व्यवस्थित मांडलेला असतो? एका मोठ्या मॉल सारखं - आत खोटी सुखं विकणारी दुकानं आणि बाहेर दुःख ओकत बसलेल्या गरिबीचा स्टॉल.
पुढचा घास हातात तयार होताच - पण आता भूक नव्हती...
- स्वप्नील पगारे
परीणामकारक!!
परीणामकारक!!
अशा ढीगाने सेंटी पोस्ट असतात
अशा ढीगाने सेंटी पोस्ट असतात फेबुवर.
बरं तुम्ही पोळी नाही म्हणत त्यात काही विशेष नाही. आमच्यात पण नाही म्हणत. चपाती म्हणतो आम्ही. पण ते चिकनची भाजी ????? वाचुन एकदम घशात घास अडकल्यासारखं वाटलं.
छान
छान
कटू सत्य पुढील लेखनास
कटू सत्य
पुढील लेखनास शुभेच्छा
सस्मित - धन्यवाद! भाजीची
सस्मित - धन्यवाद! भाजीची दुरुस्ती केली. मी आधी कालवण लिहलं होतं पण काहींना ते कळत नाही. तसंच पोळी/चपाती वरून मी एका तापलेल्या चर्चेत भाग घेतला होता. म्हणून मुद्दामून नमूद केलं. मी पूर्णपणे सहमत आहे अशा ढिगांनी पोस्ट आहेत फेसबुकवर पण कदाचित त्या 'ढिगांमुळेच' आज लोकं निबर झालेत. संवेदना गमावल्यात.