दिवस सावकाश जात होते. दसऱ्याचा दिवस उजाडला. काकांना सुटी नव्हती. रविवारची सुटी त्यांना मोठ्या मुश्किलीने मिळत होती. आज रमेश घरीच होता. सकाळचा चहाही आरामात मिळाला. ते नेहमी प्रमाणे निघाले. दसरा म्हणजे त्यांचा आवडता दिवस. त्यांच्या आयुष्यात रोहिणीने पदार्पण केलेला दिवस. ते प्रथम जवळच्याच गणेश मंदिरात दर्शनासाठी गेले. नाही तरी घरी पुजा होत नव्हतीच. शिक्षा होईपर्यंत सगळं होत असे. पण....... ते थोडे भावनाशील झाले. त्यांनी गणपतीच्या मूर्ती कडे पाहिलं. तो स्वस्थ बसला होता. आपल्यातच मग्न. का कोण जाणे, काकांना त्यातून संदेश मिळाल्यासारखं झालं. ते स्वतः शीच म्हणाले, " आपण पण आपल्यातच मग्न राहायचं. बाजूच्या वातावरणाची पर्वा तेव्हाच करायची, जेव्हा आपल्यावर परिणाम होऊ लागेल. " देवाने एक बरं केलं होतं, माणसाला त्याच्या मुद्रेचा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. काकांना जरा वेगळा 'नजरिया' मिळाल्यासारखं वाटलं. आतापर्यंत त्यांनी देवाच्या मुद्रेवरच्या भावनांचा विचारच केला नव्हता. आपल्याला जरी देवाचं दर्शन आवडत असलं तरी देवाला आपलं दर्शन आवडतंय की नाही, असा कोणीच विचार करीत नाही, त्यांच्या मनात सहज आलं. ते एका धुंदीतच ऑफिसला गेले. उत्साहाने कामाला लागले. म्हणजे येणाऱ्या फोनची वाट पाहू लागले. त्यांना आज जास्त काम करायचा उत्साह लोटला होता. पण त्यांना दुसरं काही काम नव्हतं. दुसरं काम करणं, म्हणजे निष्कारण बोचकपणा करण्यासारखं होतं. ते स्वस्थ बसले. आलेले मेसेज त्यांनी निर्विकार पणे आत पाठवले. आता त्यांना येणाऱ्या मेसेजेसचं फारसं कुतूहल नव्हतं. पण तरी ते जागरूक होते.
त्यांना फिरायची फार आवड होती. तेही पायी. त्यांचं पूर्वीचं कामही तसंच होतं. त्यामुळे त्यांना मुंबईची बरीच माहिती झाली होती. त्यांना असं टेबलवर्क करण्याची सवय नव्हती. त्याचा कंटाळा यायचा. निलंबन कालावधीत ते जिथे अनधिकृत रित्या काम करायचे तिथला बॉस सुद्धा त्यांना म्हणायचा, " तुम्हाला आत बसायला..... ला काटे टोचतात का? बाहेर जायचं म्हटलं, की उत्साहाने निघता. " त्यामुळे त्यांना ती नोकरी गमवावी लागली होती. नंतर लहानसा का होईना त्यांनी हिशेबाची पुस्तकं लिहिण्याचा धंदा केला होता. पैसे तुटपुंजे मिळायचे, पण ते स्वतंत्र होते. कोणाचं बॉसिंग नव्हतं. ओढाताण तशीही व्हायची आणि अशीही व्हायची....... दुपारचे चार वाजायला आले. काकांनी थर्मास उघडला. खणात आणून ठेवलेल्या कागदी कपातून त्यांनी गरमागरम चहा घेतला. ते जरा रेळले...... त्यांची नजर कपाटातल्या पुस्तकांकडे गेली. कुतूहल पुन्हा जागं झालं. विशेष म्हणजे पुन्हा सर्व खण भरलेले दिसले. म्हणजे त्यातल्या मालाची डिलिव्हरी झाली असणार. पण उपयोग काहीच नव्हता. उठून ती पुस्तकं काढून बघता येत नव्हती. मग त्यांना सूर्यनारायणने पहिल्या दिवशी सांगितलेलं आठवलं. " तुम बाहर जो करते हो वो हम इघर बैठके देख सकते है. " याचाच अर्थ इथे कॅमेरे लावले असले पाहिजेत. मग त्यांना एका विचाराने अस्वस्थ करून सोडले. आपण मध्यंतरी सूर्यनारायणच्या केबिनमध्ये जी शोधाशोध केली ती कॅमेऱ्याने टिपली असणार. "बा प रे! " ते स्वतःशी च म्हणाले....... आणि तेवढ्यात फोन वाजला. थरथरत्या हाताने त्यांनी तो घेतला. "काकाजी जरा अंदर आना " सूर्यनारायणने त्यांना बोलावले होते. ते घाबरले. हे विचार संक्रमण म्हणायचं की काय? त्याने मागच्या आठवड्यातलं रेकॉर्डिंग पाहिलं असणार, म्हणूनच त्याने बोलावलं असणार. आज तो आपल्याला झापणार, कदाचित बाहेरही काढील. त्यांचे तळहात घामाने ओलसर झाले. ते तसेच अस्वस्थ मनाने उठले.
धडधडणाऱ्या छातीला सावरत ते केबीन मध्ये शिरले. सूर्यनारायण काहीतरी करीत होता. त्याने मान वर केली.
त्याची सौम्य मुद्रा पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. आपण आधीच सगळं कबूल करावं, म्हणजे बरं. पण तो म्हणाला, " आईये, बैठिये. " ते समोरच्या खुर्चीत बसले.......
त्याने बाजूचा खण उघडला. आतून नोटांची बंडलं काढीत म्हणाला, " काकाजी, आपकी वजहसे रेडमे हम बच गये. इसलिये, ये आपको बक्षिश देनेको दादाने बोला है. "....... ते पाहतच राहिले..... एवढी बंडलं? त्यांच्या मनात आलं. त्याने शंभराची पाच बंडलं त्यांच्यापुढे सरकवली. ते थोडे घाबरतच म्हणाले, " लेकीन............. "....... इतना सारा पैसा मेरेको देनेकी क्या जरुरत? पण त्यांनी तसं काही विचारलं नाही. ते पाहून तो म्हणाला, " देखिये, ये पचास हजार है, ये अगर कम लगता है तो एक और रखो. साठ हो जायेगा, तब तो आप खुश होगे ना? आज दशहरा है, ये बोनस समझो. आप ऐसेही हमारे काम आया करो, हम आपके काम आयेंगे. सिवाय आपका पगार तो आपको मिलेगाही. डरना नही. "..... काकांपुढे शंभराची सहा बंडलं त्याने सरकवली. ती थरथरत्या हाताने घेत ते "थँक्स " म्हणाले. बंडलं घेऊन ते बाहेर आले. खुर्चीत जवळ जवळ कोसळलेच. याच पैशांची जरूर आपल्याला पाच वर्षांपूर्वी होती. तेव्हा जामीन मिळाला असता. अपील करता आलं असतं. निदान लगेच आत तरी जावं लागलं नसतं. कदाचित रोहिणी आणखीन थोडी जगली असती. त्यांचा गळा भरून आला. ते स्वतःशीच म्हणाले, " वा रे देवा, ही तुझी लीला की थट्टा? " त्यांना अशा अवेळी आलेल्या पैशांचं काय करायचं कळेना. आता मी एकटा आहे, हे पैसे बँकेत ठेवणं कठीण, घरी ठेवणंही कठीण.. बँकेत आजकाल खातं. उघडायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी लागतात. पाहू नंतर काय ते. असं म्हणून त्यांनी सावकाश टेबलाच्या खणात प्लॅस्टिकची पिशवी शोधली. पण ती मिळाली नाही. त्यांना ती बंडलं पंतच खिशातच ठेवावी लागली. त्यामुळे खिशांना फुगवटा आला. हळू हळू ते पूर्ववत झाले...........
पैसे मिळाल्याने त्यांना आता बरंही वाटू लागलं. आता दर महिन्याला हजार रुपये लागणार नसले तरी संशयाला कारण नको म्हणून घ्यावे लागणार होते. अशा रितीने त्यांच्या जवळच्या पैशात नको असताना भर पडणार होती. आयुष्यात असेही दिवस गेले, जेव्हा खिशात पैसे न ठेवताच बाहेर पडावं लागायचं. रस्त्यावर लोकांना खाताना पाहून त्यांच्याही पोटात भूक पेटायची. पण पैसे जवळ नसायचे. तरीही ते रोहिणीवर कधी रागावले नाहीत. ती तरी जेवायला वेगळं काय करणार होती. घरात येत होते तेवढेच पैसे तिला वापरता येत होते. रोज तेच तेच जेवण पाहून रमेश मात्र चिडायचा. पण काका त्याच्यावर याबाबतीत कधीच त्याच्यावर चिडले नाहीत. त्यांना फक्त वाईट वाटायचं. काही कर्ज घ्यावं तर लोकांना तारण म्हणून स्थावर मिळकत लागायची. मग काका चिडून स्वतःशीच म्हणायचे, "लेका स्थावर मिळकत असती तर ती विकून पैसे नसते का उभे केले, तुझ्याकडे कशाला आलो असतो. " थोडक्यात त्यांना कर्ज मिळणंही कठीण होतं. रोहिणी हे सगळं ओळखून होती. ती त्यांना समजवायची, "अहो, हेही दिवस जातील. केव्हातरी तर आपले दिवस येतीलच ना? आणि रमेश शिकून मोठा झाला की आपल्याला तेवढा त्रास होणार नाही. " पण तिला अपेक्षित असलेले" आपले दिवस" कधी आलेच नाहीत. आता पैसे आहेत, पण जिच्यासाठी काही कौतुकाने खरेदी करायचं तीच नाही. या विचाराने त्यांचं मन खंतवाला. सहा वाजले. सूर्यनारायणने त्यांना जायला सांगितलं. फुगलेल्या खिशांनी ते बाहेर आले. पैशांना सांभाळीत ते घरी गेले. त्यांना सारखं वाटत होतं, की लोक त्यांच्या खिशांकडे पाहतायत. पण तसं नव्हतं. लोक नेहमीप्रमाणेच पाहतं होते. घरात गेल्यावर रमेश आणि नीता त्यांची जणू वाटच पाहतं होते, असं त्यांना जाणवलं. रमेश म्हणाला" बराच उशीर झालाय तुम्हाला. आज सुटी कशी नाही हो? की आणखीन कुठे गेला होतात? " मनातला राग दाबून ते म्हणाले"काहीतरीच काय? आणखीन कुठे जाणार? " असं बोलून ते गॅलरीत आले. त्यांच्या पिशवीतून त्यांनी आणलेला फ्रॉक काढला, आणि रमेशला दिला. " हा घे श्रेयाला दसऱ्याचं काहीतरी घ्यायला हवं ना " त्याने नीताकडे पाहिलं. जणू काही तो परवानगी मागत होता. त्याबरोबर काका म्हणाले, " अरे तिला काय विचारतोयस? घे. आणि घाल श्रेयाला. तुम्ही दोघेही श्रेयाला घेऊन एखाद्या मंदिरात जाऊन या. दसरा आहे ना! ".
रमेश म्हणाला, "निघालोच होतो. ".....
थोडं थांबून काका म्हणाले, " अरे मग तो फ्रॉक तिला घालूनच जा की. " मग ते पुन्हा गॅलरीत आले. त्यांची पिशवी त्यांना एक खलास झालेलं कपाट दिलं होतं, त्यातून त्यांनी पिशवी परत काढली. खिशातली सहा बंडलं त्यांनी घाईघाईने त्यात लपवली आणि ती कपाटात ठेवली. कपाटाला कुलूप लावलं. चावी खिशात टाकली. ते फ्रेश होण्यासाठी वळले, तेवढ्यात श्रेयाला घेऊन रमेश आणि नीता बाहेर आले. त्यांनी दिलेला फ्रॉक श्रेयाला घातला होता. ते तिघेही बाहेर गेले. त्यांना जरा बरं वाटलं. त्यांनी कपडे बदलले. आणि स्वतःसाठी चहा ठेवला. चहाचा कप घेऊन ते प्रथमच आतल्या बेडवर बसले. सहजच त्यांची नजर रोहिणीच्या फोटो कडे गेली. चहा पिता पिता ते म्हणाले, " पाहिलंस, आज साठ हजार रुपये मिळाले. तू असतीस तर किती आनंदात असतो आपण. तुला काहीतरी आणता आलं असतं. " गहिवरल्या अवस्थेत ते पंधरावीस मिनिटं बसले. मग ते भानावर आले. हॉलमध्ये बसले. तासाभराने रमेश आला.
सकाळचा उरलेला स्वैपाकच रात्री खावा लागला. त्यात त्यांना आवडणारे श्रीखंड होतं. कमी होतं, पण होतं. बरेच वर्षांनी दसऱ्याला घरचं जेवण मिळत होतं. समाधानाने ते जेवले. परंतु अचानक मिळालेल्या पैशांचं समाधान त्यांना जास्त सुखावीत होतं. अकरा वाजत आले. रमेश नीता आत झोपले होते. काकाही बिछाना घालून पडून राहिले. त्यांना झोप येत नव्हती. मिळालेल्या पैशांबद्दल त्यांना कुणाला तरी सांगावंसं वाटत होतं. त्यांचं स्वप्नरंजन चालू झालं. रोहिणीच्या अंगावरून हात फिरवण्यात ते सगळंच विसरू लागले. अर्धा पाऊण तास झाला. ते डोळे मिटणार, एवढ्यात त्यांना मुख्य दरवाज्याबाहेरून दबलेल्या आवाजात कोणीतरी हाक मारीत असल्यासारखं वाटू लागलं. रोहिणी तर नाही?..... त्यांनी थोडा वेळ तसाच जाऊ दिला. आत्मा दिसतो असं त्यांनी ऐकलं होतं. पण शब्द?..... ते अर्धवट उठून बसले. नीट कान देऊन ऐकू लागले. हळूच का होईना कडी वाजल्याचा आवाज आला. हा भास तर नाही?.... म्हणून ते उठले. चोरपावलांनी दरवाज्याजवळ गेले. मग त्यांना "काका, दार उघडा, काका.. ऽ दार उघडा " असे शब्द ऐकू आले. हा आवाज रोहिणी चा नक्कीच नाही. सावकाश लॅच उघडून त्यांनी दरवाजा किलकिला केला. फटीतून व्हरांड्यातल्या पिवळट प्रकाशात त्यांना स्त्रीची आकृती दिसली. पण चेहरा दिसला नाही...... त्यांनी दरवाजा अर्धवट उघडला. बाहेर पुष्पा उभी असलेली दिसली...... निळसट रंगाचा मॅक्सी घातलेली, केस मोकळे सोडलेली पुष्पा त्यांना दिसली. मॅक्सीच्या वरच्या भागातून उघड्या दिसणाऱ्या तिच्या छातीकडे ते वेड्या सारखे पाहतं राहिले. त्यांना एकदम वेळेची जाणीव झाली. रात्रीचे बारा वाजत होते. यावेळी ही इथे?..... इथे काय करत्ये?..... ही इथे का आली? मग त्यांना जरा भीती वाटली. तिच्या बोलण्याने ते जास्तच घाबरले. ती म्हणाली, " मी आज तुमच्याकडे झोपणार आहे. मला घरात भीती वाटते. मला आत घ्या ना. "..... ते ऐकून काका जवळ जवळ ओरडलेच, काऽ ऽय? तुला वेड लागलंय का?..... तिच्या रूपानं मोह मूर्तिमंत उभा होता. काकांची स्थिती दोलायमान झाली. पण तिच्या पुढच्या बोलण्याने त्यांना धक्काच बसला...... ती म्हणाली, " अरे काका, आज पहिल्यांदाच आपला दिमाग ठिकाणावर आलाय. तू मर्द आहेस, माझ्या बापाला घाबरत नाहीस. मी तुला माझं सर्वस्व द्यायला आल्ये. मी लग्नाशिवाय राहीन. "..... "म्हणजे? " न समजून त्यांनी विचारलं. ती चिडून म्हणाली, " अरे, डोकं चालत नाही का तुझं? " काकांचं रक्त उसळू लागलं. मोठ्या कष्टाने स्वतःवर ताबा ठेवीत ते म्हणाले, "पुष्पा, चालायला लाग तुला अक्कल नाही आहे समजलीस. काका म्हणतेस ना मला? मग जा बरं......... त्यांना आता मात्र तिच्या डोळ्यात वेडाची झाक दिसली. ती म्हणाली, " अरे यार, तुमको अपून अर्पण करनेको आया, लेकीन तू नामर्द निकला रे. ऽ. ऽ. "..... तरीही काकांवर काही परिणाम न झाल्याने ती म्हणाली, " अंदर नही लेगा ना, तो अपून रमेश और उसकी औरत को उठाएगी, और कपडा फाडके बोलेगी तूने अपने साथ जबरदस्ती की, समझा? " मग टिचक्या वाजवीत म्हणाली, " तू अभी के अभी अंदर जायेगा..... सो... ऽ. ऽ.. च ले..... ". काका तिला म्हणाले, " ए, चल, चल. एकदा आत जाऊन आलोय बदनामही झालोय. ओरडच तू, बघ मी काय करतो ते ". पुष्पाला लक्षात आलं असावं. ती निराशेने काळवंडली, आणि "नामर्द स्साला "... असं म्हणत जिन्यावरून धावतच खाली गेली. ते सावकाश आत आले, हळूच दरवाजा लावून वळले. तेवढ्यात आतल्या दारात नुकताच उठून आलेला रमेश म्हणाला, " बाहेर कोण आलं होतं? "...... ते चटकन म्हणाले, " अरे, मला कडी वाजल्यासारखी वाटली म्हणून मी दार उघडून पाह्यलं. " त्याचं समाधान झालेलं असावं असं दिसलं. ते बिछान्यावर आडवे झाले.... दोन वाजायला आले तेव्हा कुठे त्यांना झोप लागली.
थोड्या वेळानं त्यांना वाटलं, बरं झालं, आपण मोहावर ताबा ठेवला ते. नाहीतर आज आपलं काही खरं नव्हतं. त्यांना पुष्पाची कींव आली. मग त्यांना त्यांच्या ऑफिसमधल्या शेख नावाच्या सहकाऱ्याची आठवण झाली. तो म्हणाला होता, " अरे काका (पहिल्यापासून त्यांना सगळे काकाच म्हणायचे) आपून जहाँ रहता है और जहाँ काम करता है ना वहाँ कभी औरतका लफडा नही करना चाहिये. जीना हराम हो जाता है. " त्यांना ते आत्ता पटलं. हळू हळू ते झोपण्याचा प्रयत्न करू लागले. खिशातला मोबाईल वाजला. त्यांनी तो पटकन घेतला. फोन नंबर नवीन होता. पण जास्त आवाज नको म्हणून हॅलो म्हणाले. पलीकडचा माणूस म्हणाला, " अरे काका, कैसा है तू? मिल गया ना बोनस? " त्यांनी आवाज ओळखला. तो किशा दादा होता. त्यांनी त्याला "थँक्स " म्हटलं. मग पुढे म्हणाले, " अरे दादा आपने बहोत पैसा दिलवाया. " तो म्हणाला, " अरे, ये कुछ नही, आगे आगे देख होता है क्या. काम करते रहना. मेरेको एक पढेले आदमी की जरुरत थी. छे महिने बाद मै बाहर आऊगा. दोनो मिलकर खूब कमायेंगे. चल रखता हूं. " दोन वाजायला आले. तेव्हा कुठे त्यांना झोप लागली.
हा ही भाग मस्त..
हा ही भाग मस्त..
हा हि भाग छान झालाय
हा हि भाग छान झालाय
मस्त सुरु आहे..
मस्त सुरु आहे..
प्रतिसादाबद्दल स्वरा ,
प्रतिसादाबद्दल स्वरा , क्रिशन्त , आणि अभि यांचा आभारि आहे.
हा भाग ही छान शेवटच्य पॅरा
हा भाग ही छान
शेवटच्य पॅरा मधे सेंकड लास्ट पॅरा ची ओळ आली आहे का ????
अंकु आपलं म्हणणं बरोबर आहे.
अंकु आपलं म्हणणं बरोबर आहे. पुढच्या वेळेला काळजी घेईन सर्वांचेच प्रतिसादाबद्दल आभार.
वाचकांसाठी हा भाग वर आणत आहे
वाचकांसाठी हा भाग वर आणत आहे
disla bhag 6 thanx n khp mst
disla bhag 6 thanx n khp mst chalu a katha
मिरींडा, हा भाग फक्त ग्रूप
मिरींडा, हा भाग फक्त ग्रूप सभासदांसाठी मर्यादित झालाय. तो सार्वजनिक केला की सगळ्यांना दिसेल.
मस्त चालूये कथा.
आता हा भाग सार्वजनिक केला
आता हा भाग सार्वजनिक केला आहे. कृपया पाहावे आणि कळवावे.