प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. त्यात एक सर्वमान्य असा भाग असतोच पण त्याशिवाय त्या शब्दाच्या अनुशंगाने आलेले आपले वैयक्तीक अनुभव, एखादी विशेष घटना, एखाद्या व्यक्तीने केलेला त्या शब्दाचा खास उच्चार अशा अनेक पातळींवर तो शब्द आपल्या मेंदूत कोरला जातो. 'टाटा' याचा अर्थ एक विशेषनाम असा असला तरी माझ्याकरता त्या शब्दाचा अर्थ 'उद्योग आणि विश्वास' असा कोरला गेला आहे. टाटांचे उत्पादन खरेदी करताना कधीकधी दर्जा थोडा कमी होता असेही झाले आहे पण तरीही आपण लुबाडले गेलोय असे कधीही वाटले नाही. याचे कारण तो दर्जा सुधारत जाणार आहे याची खात्री असते. नाहीतर नावात विश्वास असूनही प्रत्यक्षात ग्राहकांच्या विश्वासाला जराही पात्र ठरू न शकलेले उद्योग आजूबाजूला दिसतातच. तर असा हा विश्वासू उद्योग कसा घडत गेला याची छोटिशी झलक आपल्याला टाटायन या पुस्तकात वाचायला मिळते. छोटिशी अशाकरता की या पुस्तकात असे अनेक दिग्गज झळकतात की ज्यापैकी प्रत्येकावर स्वतंत्र पुस्तक आहे / होऊ शकते. पण ते सगळे दिग्गज एका पुस्तकातच बंदिस्त करायचे म्हटल्यावर काही काटछाट करावीच लागणार. आणि दुसरे कारण म्हणजे लेखकाने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे रतन टाटांकडून जी कागदपत्रे उपलब्ध झाली त्यांचा प्रामुख्याने वापर करत हे पुस्तक लिहीले गेलय. त्यामुळे जुन्या काळाची माहिती आणि महती काहीशी त्रोटकपणे आली आहे.
मराठीत जे फार थोडे अर्थविषयक लिखाण होत असते त्यात गिरीश कुबेरांचे नाव लक्षणीय असले तरी ते साहित्यीक म्हणून गणले जात नाहीत. पण तरीही हे पुस्तक त्यांनी कादंबरीच्या रुपात लिहीले आहे. एवढा मोठा कालखंड, त्यात येणारे अनेक नायक आणि इतर महत्वाची पात्रे, त्यांचे एकमेकांशी असलेले ताणेबाणे हे सगळे त्यांनी खूप रंजकपणे मांडलय आणि म्हणूनच पुस्तक खूप ओघवते झालय. नुसतीच माहिती वाचतोय असे न वाटता मी ते पुस्तक खूप मस्त एंजॉय करू शकलो त्याला ही शैलीच कारणीभूत होती आणि त्याचे श्रेय लेखकाला दिलेच पाहिजे. आणि दुसरी मला खूप आवडलेली बाब म्हणजे पुस्तकात असलेली सकारात्मकता. अनेक वाईट घटना आहेत पण नायकाने त्यांच्यावर कशी मात केली किंवा त्यांचा काय प्रभाव पडला एवढेच कुबेरांनी दाखवून दिले आहे. ते स्वतः विश्लेषक असताना घटनांचे विश्लेषण करून 'खल'पात्रांच्या पदरात पुरेपुर माप टाकणे सहज शक्य होते पण तो मोह त्यांनी टाळला आहे. सुरवातीला मला जरा ते खटकले होते पण नंतर ते योग्यच होते हे पटत गेले.
पुस्तकाचे शिर्षकच इतके चपखल आहे! एक तर टायटन ह्या शब्दाशी खूप साधर्म्य असल्याने टाटा हा ब्रँड आपसूकच अधोरेखीत होतो (माझी लेक खूप दिवस ते टायटन असेच वाचत होती ) दुसरे म्हणजे शिर्षकामुळे यातील नायकांची रामासारख्या मर्यादापुरुषाशी आपसुकच तुलना होते आणि ती फारशी चुकीची आहे असे मला वाटत नाही. मर्यादा हा सगळ्या टाटांचा गुणविशेष राहिला आहे - अगदी कायमच. तिसरे म्हणजे सगळ्याच टाटांना न्याय देण्याचा लेखकाचा प्रयत्न शिर्षक अधोरेखीत करते. त्यामुळे 'रतन'भक्त असलेल्या कुबेरांचे पुस्तक माझ्यासारख्या 'जहांगीर'भक्ताला पण आवडतेच.
सुरुवातीलाच लेखकाने व्यापार आणि उद्योग यातला फरक ठळकपणे दाखवून दिला आहे. व्यापार-उदिम हा आपण जोडशब्द म्हणून वापरतो पण दोन्ही घटक शब्दात खूप फरक आहे. व्यापार हा निव्वळ स्वत:च्या फायद्याकरता केला जातो तर उद्योग हा आपल्याबरोबरच अनेकांचा फायदा करून देतो, अनेकांची घरे वसवतो. सुरवातीला अफूचा व्यापार करणार्या टाटांनी उद्योगाचे साम्राज्य उभे केले. हा सगळा प्रवास खूप रंजक आणि बरेच काही शिकवून जाणारा आहे. जमशेदजींची असामान्य व्हिजन आणि त्या व्हिजनला आपली मिशन बनवून झटलेले त्यांचे सुपुत्र दोराबजी यांनी सुरवात केली (आपण जरी जमशेदजींना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखत असलो तरी त्यामागचे खरे कष्ट दोराबजींचे होते.) मग जेंव्हा जेआरडींकडे त्याची सूत्रे आली तेंव्हा त्याचा कसा विस्तार झाला हे सगळे प्रत्येकाने जाणून घेतलेच पाहिजे; शाळेत शिकवला जाणारा राजकीय इतिहास खूप अपूर्ण असतो.
पुस्तकात काही त्रुटीही आहेत. इंग्रजांपासून इदिरा गांधींपर्यंत ज्या चूका घटल्या त्याबद्दल सौम्यपणे लिहिणारे कुबेरांचे रुसी मोदींच्या बाबतीत बरेच जहाल होतात. पहिल्या दोघंच्या तुलनेत रुसींची चूक अगदीच नगण्य होती. पण ते एकवेळ समजू शकते. रतनजीसारख्या टाटांच्या प्रत्यक्ष सहवासात आल्यावर त्यांना विरोध करणारा माणूस खलनायक वाटणे हे मला पूर्णपणे पटू शकते. (एकेकाळी जेआरडींची जागा घेणारे रतनजी मलाही पसंत नव्हतेच की) पण एके ठीकाणी मोदींच्या शयनगृहापर्यंत कुबेर घसरतात तेंव्हा मात्र पुस्तकाला गालबोट लागल्यासारखे वाटते. पण हा एवढा काळा ठिपका वगळता बाकी पुस्तक लखलखीत आहे.
सगळ्या पुस्तकात म्हत्वाचे प्रकरण म्हणजे टाटा हे टाटा का आहेत ते उलगडून दाखवणारे. मी इथे त्याबद्दल काही लिहायचा मोह आवरतोय कारण ते मूळापासूनच वाचण्यासारखे आहे. वाचल्यावर डोक्यात विचार चालू होतातच.
हं, वरचा लेख वाचला
हं,
वरचा लेख वाचला नाही..
पुस्तकाची गोष्ट कळायची जाम भिती वाटते,, त्यातली मज्जा निघुन जाते ना मग
हे पुस्तक टूबीरी लिस्ट मधे आहे कधीच.. इतरही पुस्तक यांचे.. वाचेल नक्की..
मागे मी वाचलेले पुस्तक या धाग्यावर चर्चा वाचलेली आठवते..
असो..
वाचत राहा
छान लिहिलय माधव. बरेच दिवस हे
छान लिहिलय माधव. बरेच दिवस हे पुस्तक वाचायचं ठरवतोय, बघू आत्ता केव्हा जमतं ते.
मीही आधी टायटनच वाचल. चांगला
मीही आधी टायटनच वाचल.
चांगला आहे पुस्तक परीचय.
चांगला परिचय . माझ्याही
चांगला परिचय . माझ्याही रिडींग लिस्ट मध्ये आहे हे पुस्तक
चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन
चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन दिलात.
हे पुस्तक आणून ठेवलं आहे!
हे पुस्तक आणून ठेवलं आहे! वाचायचा मुहूर्त लागत नाहीये फक्त. वाचतो आता.
चांगला परिचय.
चांगला परिचय.
मलाही हे पुस्तक आवडलं. पण
मलाही हे पुस्तक आवडलं. पण थोडं अजून balanced असायला हवं होतं असं वाटलं. पुस्तक वाचून खूप दिवस झाल्यामुळे आता पटकन उदाहरण आठवत नाही, पण टाटांबद्दलच्या भक्तिभावाने लिहिलं आहे हे जाणवतं. दुसरं असं की टाटांच्या इतिहासाच्या अनुषंगाने भारतीय कॉर्पोरेट जगताचा त्रोटक का होईना, पण एक इतिहास लिहिला असता, तर एक परिपूर्णता आली असती असं माझं मत. बिर्ला, अंबानींसारख्या इतर भारतीय उद्योगसमूहांचा उदय, विकास हे त्रोटक का होईना, पण. यायला हवं होतं असं वाटलं. अर्थात हा लेखकाचा choice आहे आणि पुस्तक खूपच मोठं होऊ शकलं असतं.
मला वाचायलाच हवे. टाटा कंपनीत
मला वाचायलाच हवे. टाटा कंपनीत काम करतानाही असे अनेक किस्से कानावर पडत असत, ते सारे एकत्र वाचताना खूपच आंनद होईल मला.
उत्तम परिचय. चांगलं पुस्तक
उत्तम परिचय. चांगलं पुस्तक आहे.. पण बर्याच ठिकाणी तेच प्रसंग पुन्हा पुन्हा आले आहेत. जर पुस्तकाची संरचना थोडी वेगळी करता आली असती तर वाचायला अजून मजा आली असती. शिवाय काही गोष्टी अधिक विस्ताराने येऊ शकल्या असत्या.
उत्तम परिचय. चांगलं पुस्तक
उत्तम परिचय. चांगलं पुस्तक आहे.. पण बर्याच ठिकाणी तेच प्रसंग पुन्हा पुन्हा आले आहेत.>>>+1
छान परिचय.पुस्तक वाचायचं आहे.
छान परिचय.पुस्तक वाचायचं आहे.
पण टाटांबद्दलच्या भक्तिभावाने
पण टाटांबद्दलच्या भक्तिभावाने लिहिलं आहे हे जाणवतं. >>> हो अगदी. पण त्यामुळे पुस्तकाला एक सुंदर लय आली आहे.
शिवाय काही गोष्टी अधिक विस्ताराने येऊ शकल्या असत्या. >>> १००% सहमत.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.
वाह, सुरेख परिचय करुन
वाह, सुरेख परिचय करुन दिलाय..... वाचायलाच पाहिजे हे पुस्तक...
अनेक धन्यवाद ...
या वेळेस वाढदिवसाला मिळालंय
या वेळेस वाढदिवसाला मिळालंय हे पुस्तक!
वाचायला सुरुवात केली आहे.
मी पण जेह वालाच... त्यामुळे अजून फारसे नवीन काही हाती लागले नाहीये पण टाटाच आवडते असल्याने पुस्तक आवडत आहे.
छान परिचय! लिस्टीत घेतोय
छान परिचय!
लिस्टीत घेतोय टाटायन.
उत्तम परिचय.
उत्तम परिचय.
अगोदर दुसय्रा कोणाचेतरी
अगोदर दुसय्रा कोणाचेतरी पुस्तक वाचल्याचं आठवतंय.( मेस्त्रि?/मुळगावकर?)
छान परिचय करून दिलाय. वाचलं
छान परिचय करून दिलाय. वाचलं पाहिजे. टाटा हा जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय आहे