बंडया - गुंडी १९

Submitted by Pritam19 on 25 August, 2016 - 02:00

“या गंजिफा आहेत ना?” पंडीची उत्सुकता फार वेळ तिला गप्प राखू शकत नव्हती.
“खेळणार?” आचार्यांनी स्मित रूंदावत म्हटले. बाजूला बसायची खूण केली.
“कसं खेळायचं?” गुंडीने बसकण मारत विचारले.
“पत्त्यांसारखे,” पंडीचे लगोलग उत्तर तयार होते.
आचार्यांनी सर्व गंजिफा एकत्र जमविल्या आणि त्यातून घोडेस्वारवाल्या चित्रांच्या शोधून बाजूला ठेवल्या. ढिगावर हात ठेवून कसलासा जप केला.
“हे पहा, एरव्ही तुम्ही पत्ते खेळता त्यात चार रंग असतात. कोणते?” आचार्यांनी विचारले.
“बदाम, चौकट, किल्वर, ईस्पिक.” वांडाने कधी नव्हे ते पंडीला उत्तर देण्याआधी पिछाडले.
“इथे दहा रंग असतात. या दशावताराच्या गंजिफा आहेत. त्यामुळे प्रत्येक अवताराचा एक एक रंग. प्रत्येक रंगाच्या एक्का ते दश्शी हया दहा अवताराचे पानभर चित्र असलेल्या राजा आणि राजासोबत घोडेस्वाराचे चित्र होते त्या प्रधान. आपण पाच जण आहोत म्हणून ते बाजूला काढले. तेव्हा प्रत्येकाच्या वाटयाला येतील एकशे दहा भागिले पाच?”
“बावीस.” पंडीने वांडाआधी डाव साधला.
आचार्यांनी प्रत्येकाला समोर उपडी ठेवलेल्या पानांमधील पाच-पाच पाने उचलायला सांगितली. पत्ते खेळायच्या नेहमीच्या सवयीने प्रत्येकाने एकमेकांना न दाखवता गुपचूप ती पाहिली. पण आचार्यांनी प्रत्येकाला ती समोर ज्या क्रमाने घेतली त्याच क्रमाने उघडी मांडायला सांगितली.
“आपण पत्ते नाही, रमल खेळणार आहोत. हा एकप्रकारे तुमचे जीवनसर्वस्व पणाला लावायचा खेळ आहे. “ आचार्यांनी धीर गंभीर स्वरात जाणीव दिली आणि सर्वजण गार झाले.
बंडयाचे मन भयशंकित झाले. हा जीव पणाला लावायचा जुगार असला तर? सर्वतोभद्र यक्षाची परीक्षा त्याला आठवली. पुन्हा डोक्याची शंभर शकले होण्याची नस्ती जोखीम त्याला नको होती. मंजुघोषाने तेव्हा वेळ निभावून नेली होती. यावेळी निभावायला त्याच्याशी मनोसंवाद नेमका साधता येईलच याची त्याला खात्री नव्हती.
“आता तुम्ही जे पत्ते निवडलेत ते तुमच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करतायत. वेगवेगळया जुळण्या वेगवेगळे योग दर्शवितात. या दोन नव्व्या एकत्र आहेत, हया लवकरच होणा-या भाग्योदयाचे सुतोवाच करतायत आणि त्यांच्यापुढे हा मत्स्यराजा आहे, म्हणजे पाण्यावर वावरणा-या एखाद्या खूप प्रभावशाली व्यक्तिकडून तो होणार आहे,” त्यांनी गुंडीला सांगितले. गुंडी भाग्योदय म्हटल्यावर खुशालून गेली.
“मला दोन अठ्ठया आहेत.” वांडाने लगोलग त्यांचे लक्ष आपल्या पानांकडे वेधले.
“हं! मित्रांशी भांडण, दुरावा असा अर्थ होतो,” आचार्यांच्या या वाक्यावर वांडाचा चेहरा हिरमुसला.
“माझा राजा त्यांच्या दोन पत्ते पुढे आहे. परशु घेतलेला. तसा माणूस भांडण लावणार का?” वांडाने जोडास जोड उत्तर लावायचा प्रयत्न केला.
“नाही. त्याचा वेगळा अर्थ होणार पाहूया. या रमलविद्येच्या पुस्तकात सविस्तर वर्णन,” आचार्यांनी त्यांच्या कफनीच्या आतल्या भागातून एक जाडजूड पोथीवजा पुस्तक काढले. रमलविवेकसार असे त्यावर हिरव्या चकाकत्या रंगात लिहीलेले होते. पुस्तक पाहताच पंडीचे डोळे लकाकले.
तिच्याकडे दुहेरी जोड तर कोणते नव्हते. पण दुर्री, तीर्री, चौर्री अशी क्रमवारी लागत होती. त्या तिघांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता आचार्यांना पुरे झाले. बंडयाला आपल्या तीन दश्यांचा अर्थ विचारायची फार उतावीळ लागली होती. पण ईतर तिघांच्या घाईगर्दित त्याला संधी मिळत नव्हती. आचार्यांचेही त्याच्याकडे पुरेसे लक्ष नव्हते. खजिल होऊन बंडया आपली पाळी कधी येईल ती येईल, असे मानून आसमंतात भोवताली नजर फिरवू लागला.
बापरे! त्या पलिकडच्या लॉन्चीवर लाल चौकडीवाल्या शर्टातला तो माणूस होता आणि त्याच्या हातात बंदुकिसारखे काही होते. ते त्याने बंडयाच्या दिशेने रोखले होते.
“ह्या काय? इथ आहेत ना तीन दश्श्या. मृत्युयोग. तुम्ही म्हणता तो कधीच येत नाही?” वांडाने आव्हानात्मक स्वरात आचार्यांना विचारल्याचे बंडयाच्या कानावर आले. कोणीतरी त्या लाल शर्ट वाल्याला थांबवा. त्याचे मन आक्रंदले. त्याला किचाळायचे होते, पण स्वर घशात आतल्याआत कुठेतरी भयाने घुसमटले. बाहेर पडले नाहीत.
बंदुकिच्या बाराचा आवाज बंडयाच्या कानापर्यंत आला नाही. फक्त धूर दिसला. मागोमाग सावलीच्या टपरीमागे काहीतरी धडपडले आणि पाण्यात धप्पकन पडल्याचा मोठ्ठा आवाज आला. बंडयाने धावत जाऊन लॉन्चीच्या त्याच्या मागच्या कठडयापासून खाली पाहिले. एक दांडगा माणूस लॉन्च काढत जाणार्या फेसाळल्या रेषांमध्ये धडपडत होता. वेगाने जाणार्या लॉन्चमुळे तो मागे मागे पडत ओळखता येण्यापलिकडे दूर गेला. मागच्या कुठल्यातरी लॉन्चीने त्याला वर घेतले. बंडयाने लाल शर्टवाला होता, त्या लॉन्चीच्या टपाकडे नजर टाकली. तिथे आता कोणी नव्हते. तो पसार झाला होता. बंडया वाचला होता. नेम चुकला होता. पण मग तो त्यांच्या टपावर चोरून बसलेला माणूस कोण होता?
त्या माणसाच्या वरून धपाककन् पडण्यामुळे खाली तांडेलनानांच्या लॉन्चीवर मोठी खळबळ माजली होती. उघडाबंब शिडीवरून वर डोकावला. त्याने सर्व मुले व आचार्य टपावर असल्याची खात्री करून घेतली.
“इथे सर्व कुशल आहे. मला इथे कोणाची अडचण नको आहे.” आचार्य गरजले आणि तो लगोलग खाली दडी मारून गेला.
तीन दश्श्यांमुळे किवा माणसामुळे म्हणा आचार्यांच्या सा-या लक्षाचे आकर्षण केंद्र आता बंडया झाला. ते बंडयाकडे पाहून काही विचित्रसे हातवारे करू लागले. बंडयाच्या मनाची ओढ त्यांच्या दिशेने होऊ लागली. त्याचा डावा पाय फुरूफुरू थरथरू लागला. जणू तो बंड्याच्या नियंत्रणाबाहेर गेला होता. डाव्या पायाच्या या नव्या नाटकामुळे बंड्याला तोल सावरणे कठीण होऊन बसले. होता होता उजव्या पायावर कसरत करणे अशक्य होऊन बंडया धडामकन खाली पडला. डाव्या पायातला बूट बाजूला निघून पडला होता. या आवाजाने पुन्हा खाली खळबळ माजली आणि एक डोके शिडीवरून वर डोकावले.
“मला आता इथे अजिबात व्यत्यय नको.” आचार्य तिथे न बघताच गरजले. पण नंदू त्या हुकुमाला न बधता वर आला व त्याने बंडयाला जवळ घेऊन उठवले. नंदूचा स्पर्श होताच बंडयावरचा बेभान अंमल झपाटयाने ओसरून गेला. ते जाणवून आचार्यांनी नंदूवर नाराजीचा कटाक्ष टाकला.
“जे काही घात धरून बसले आहे ते आता समोर आले असते.” आचार्य उद्विग्नतेने म्हणाले. नंदूला त्याचा काही अर्थबोध झाला नाही. पंडीने त्याला सुरूवातीपासून आतापर्यंत काय काय घडले ते कमीतकमी तिखटमीठ लावून सांगितले. म्हणजे बंडया अधांतरी हवेत नाच करीत होता, असे सांगणे पदरचा मसाला नसेल तर.
“आपण?..” नंदू डोक्यात आचार्यांची ओळख आठवायचा प्रयत्न करत होता.
“या देहाला रमलाचार्य म्हणतात.” आचार्यांनी त्याचा गोंधळ ओळखून सांगितले. त्याबरोबर नंदूने त्यांच्या पायावर झोकून दिले. त्यांनी हात उंचावून त्याला आशिर्वादपर काही पुटपुटले. नंदूचे सफेदपोष कपडे साफ मळले. नंदूला आता त्याची काही पर्वा वाटत नाहीशी दिसत होती. तो उठायला तयार नव्हता. आचार्यांनी त्याला हातांनी उचलून उभे केले. नंदू अपराधी भावनेने त्यांच्या नजरेला नजर देत नव्हता.
“झाले ते झाले. असो. यापुढचा या मुलाचा काही विचार व्हायला हवा.” त्यांनी नंदूच्या पाठीवर आश्वस्त हात ठेवत म्हटले. मग ते बंडयाकडे वळले.
“मुला, रमल ही फार मायावी विद्या आहे. मृगजळाप्रमाणे अनेक भासमय रूपे धारण करीत ती अदृष्टातील गोष्टी दृष्ट जगात कथन करायचा प्रयत्न करत असते. इथे सारेच जसे दिसते, भासते तसेच असते असे नाही. त्याचे वेगवेळे अर्थ लागत असतात. ज्याने त्याने आपल्या बुद्धिच्या सापेक्षतेने त्याचे मर्म ओळखावयाचे असते.”
बंडयाला त्यातल्या एकाही वाक्याचा अर्थ धड कळला असेल तर खरे. त्याच्या पारदर्शी चेह-यावरचे भाव ओळखायला समोरची व्यक्ति रमलाचार्यांसारखी द्रष्टी असायला हवी होती असे नाही.
“थोडक्यात इतकेच म्हणावयाचे आहे की तीन दश्या म्हणजे मृत्युयोग हे विवेचन फार मोघम झाले. ते कधी, कुठे हे कुठे विवेचले आहे? शंभर वर्षानंतरही असेल.” आणि मग त्यांनी त्यांचे ते लाघवी स्मित केले. नाही. बंड्या आता या मोठ्या माणसांच्या या छलाव्यांना ईतक्या सहज फसणार नव्हता. दरवेळी इतर सर्व मुलांसाठी वेगवेगळे आशिर्वाद जायचे, बंडयाच्या वाटयाला प्रत्येकजण आयुष्य का चिंतायचा? बंडयाचे डोळे भरून यायला लागले. ते मरणाच्या भीतीचे दुःख नव्हते. मोठी माणसे त्याची सतत फसवणूक करीत आली होती त्या खोटेपणाचे होते.
“मुला, ज्याचा शोक करू नये त्याचा तू शोक करतो आहेस. तुझ्या गुरूंनी तुला जे सांगितले, त्यावर तुझा विश्वास नाही का?” रमलाचार्य बंडयावर रागावले. तसा बंडया वरमला.
“भिऊ नकोस, तुझ्या पानांचा योग्य तो साधक बाधक विचार करून मी निर्णय देईन. तोपर्यंत धीर धर.”
मग आपल्याजवळचे पोथी पुस्तक उघडून ते बराच काळ त्यात गढून गेले. त्यात आपल्या गळयातल्या सात पदरी रंगीत मण्यांच्या माळातले मणी ते एका विशिष्ट पद्धतीने मागे, पुढे सरकवत. तो काही नुसता मण्यांशी चाळा नव्हता. बंडयाचे त्यांच्या मण्यांच्या हालचालींकडे लक्ष आहेसे पाहून, पंडी त्याच्या कानात पुटपुटली. “ते अबॅकस सारखे गणित, आकडेमोड करायचे यंत्र आहे.”
तेवढयाने तिथली शांती भंगली. आपल्या तंद्रीतून बाहेर येत रमलाचार्यांनी बंडयाला विचारले, “मुला तुझे जन्मनक्षत्र कोणते? “
“अभिजीत.” बंडयाचे हे उत्तर ऐकताच प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अचंब्याच्या झाल्या.
गुंडी आणि पंडीला जरी ही बातमी नवी नव्हती तरी, रमलाचार्यांच्या बोटांनी माळेला ओढ बसून त्यातले मणी टपावर सगळीकडे विखुरले गेले, ही गोष्ट दोघींना फार अचंबित करणारी होती. नंदू एकटक बंडयाकडे व रमलाचार्यांकडे आळीपाळीने पाहत राहीला. वांडाची नजर बंडयावर रोखलेली राहीली. त्याच्या चकित डोळयात हळूहळू तिरस्कार दाटत गेला.
“म्हणजे, मंत्रप्रभुचे?” ओठांच्या घट्ट विणीतून त्याचा प्रश्न निसटला.
“गुरू मंत्रप्रभुंचे म्हण.” रमलाचार्यांनी धक्क्यातून स्वतःला सावरत वांडाला ताकिद दिली.
“गुरू मंत्रप्रभुंचे.” वांडाने नाईलाजाने आचार्यांचा मान राखत म्हटले.
नंदू, गुंडी, पंडीला हा मंत्रप्रभुंचा विषय माहित नसावा. ते गोंधळले होते.
आचार्यांनी वांडाविषयी समाधान दर्शवित त्यांच्यासाठी स्पष्ट केले, “विलक्षण. गेल्या शंभर वर्षातली हा मुलगा या जन्मनक्षत्रावर जन्म घेतलेली केवळ दुसरी व्यक्ति आहे. अजून कोणी?... नाही. अजून कोणाचा आजपावेतो कोठेही संदर्भ, उल्लेख नाही.”
आपले जन्मनक्षत्र काही खास आहे. हे बंडयाला सुरूवातीला साबरी जगात प्रवेश घेताना कळले होते. खास म्हणजे किती खास ते आजपर्यंत कळले नव्हते. हे मंत्रप्रभु कोण? आणि त्यांचे व त्याचे नक्षत्र सारखे असल्याबद्दल वांडाने त्याचा तिरस्कार का करावा?
“आता चित्र बरेच स्पष्ट होते आहे. रमल ईतकी विसंगत उत्तरे याच्याबाबत का देते ते. रमलची दशावतारी गंजिफा पद्धत २७ नक्षत्रांच्या जातकागणिक रचलेली आहे. अभिजीतकांसाठी वेगळे साधन, वेगळी पद्धत वापरली पाहिजे. याच्या मागे बळी मिळवण्यासाठी कोणी लागलेले आहे. दैवी शक्ती की आसुरी याचा निवाडा करता येईनासा झाला होता. आता मात्र उघडच आहे, कापालिकांना हा हवा असणार. नागडे, पशुमित्रांना माझा निरोप द्या. याला कुठेही एकटा सोडू नका. जपा. नीट लक्ष ठेवा.” रमलाचार्यांनी सुचना केली.
“आचार्य कापालिक या छोटयाश्या मुलाचा बळी देऊन काय साधणार? त्यांना कुट्टनिमंता सारखे महारथ साबरी बळी साठी लागतात.” नंदू बंडयाला काही खास किंमत द्यायला तयार नव्हता.
“तंत्रावर्णात सांगितलेला, निकुंभिलिकेचे मुर्त शरीररूप प्रगट करण्यासाठी जो नक्षत्रयाग आहे, त्यात सर्व नक्षत्रांचे जातक यज्ञात बळी द्यावे लागतात. हे अभिजीतक शतकातून एखाद दुसरेच जन्माला येतात आणि यांचा माग लागणे याहून दुर्मिळ. याच्या अभिजीत जातकपणाचे रहस्य विरूद्ध पक्षाला कोणाकडून तरी याआधीच कळले आहे. या जलयानावरून समुद्रात पडला तो त्यांचा हस्तक होता,” आचार्यांनी नंदूला जरा त्राग्याने सांगितले. मग ते बंडयाकडे वळले. “मुला तीन दश्या मृत्युयोग नव्हे, तर जीवाला होणारा धोका दर्शवित होत्या. योग्य ती काळजी घेतली तर यातून तुला निभावून जाता येईल. सावध रहा. तुझ्या उपयोगी पडावी म्हणून ही विद्या तुला देत आहे. तिचा स्वीकार कर. येऊ घातलेल्या घाताची कल्पना त्यायोगे तुला आधी मिळू लागेल. घे.” असे म्हणून त्यांनी हातातली पोथी बंडयाला देवू केली. बंडयाने हात पुढे केले. पण ते हातात ठेवीनात. त्यांनी नंदूकडे सूचक नजरेने पाहिले. तसा नंदू बंडयाला समजवायला पुढे सरसावला.
“बंडया याप्रमाणे गुडघ्यात वाकून आधी गुरूंना प्रणिपात करायचा. मग डोळे मिटून मान खाली घालून ही हातांची ओंजळ अशी वर धरायची की गुरू समंत्र विद्येची पोथी त्यात ठेवतील.”
सारे जण बंडयाकडे अपेक्षेने पाहू लागले. वांडा व जोडीला नंदूच्या चेह-यावर बंडयाला फुकटफाकट मिळणा-या विद्येची असूया दिसत होती. गुंडी आणि पंडीच्या चेह-यावर आनंद, उत्सुकता दिसत होती. बंडयाला विद्या मिळणे म्हणजे ती आपल्यालाही मिळाल्यासारखी अशी एक खात्री दिसत होती. बंडया स्थितप्रज्ञासारखा उभा होता. आजी वारल्यानंतरच्या इतक्या वर्षांत अशी गुडघे वाकवून, नाक घासून नमस्कार घालायची वेळ त्याच्यावर कधी आली नव्हती. परक्या माणसासमोर लाचारी पत्करायला त्याचे मन मानेना. ज्या आचार्यांनी त्याला एका पायावर थय्या थय्या नाचवले त्यांच्यासमोर अजिबात नाही. आचार्यांच्या डोळयाला डोळा न देता बंडया भोवतालच्या आसमंताचे निरीक्षण करू लागला. लॉन्चींची मिरवणूक आता फिरून पुन्हा आपल्या मुळ जागी परत निघाली होती. जेट्टी थोडी दूर दिसत होती. धमाल कोळीगीतांच्या लकेरी वा-यावर अवचित ऐकू येऊ लागल्या होत्या. आजुबाजुचा उत्सवी कोलाहल इथे टपावरली अवघड शांतता सपक करून टाकीत होता.
“बंडया खाली बस आणि पोथी घे,” नंदूला तो ताण सहन न होऊन त्याने बंडयाला फर्मावले. तसे बोलून आपली किंमत घसरविण्याआधी, बंडयाच्या हट्टीपणाचे किस्से बंडयाच्या आई बाबांकडून त्याने ऐकायला हवे होते.
आचार्यांनी थंडपणे पोथी पुन्हा गुंडाळून कफनीत ठेवायची तयारी केली, “नम्रतेवाचून माणसाअंगी कोणतेही थोर गुण येत नाहीत. स्वतः आधी वाकायला शिकल्याशिवाय, इतरांना वाकवता येत नाही.”
“आचार्य, मी तुमची करूणा भाकते. मला विद्या द्या.” पायापाशी शब्द ऐकू आले म्हणून आचार्यांनी खाली नजर टाकली. पंडी त्यांच्या पायापाशी बसून नाक घासत होती. मग डोळे मिटून, मान लववून तिने हातांची ओंजळ वर धरली. आचार्यांचे हात क्षणभर रोखले गेले. मग अलवार ती पोथी त्यांच्या हातातुन त्या सुकुमार हातांमध्ये जाऊन विसावली.
“तथास्तु. प्रज्ञावंत भव.” असा आशिर्वाद उच्चारून ते ताडताड पावले टाकून तिथून शिडीवरून उतरून गेले.
लॉन्चवरचा भोंगा आपल्या ठरलेल्या ठिकाणी आल्याची वर्दी द्यायला जोरदार वाजला. थोडा वेळ शांततेत गेला. लॉन्च हिंदोळली. मागे बांधलेला पडाव सुटून धक्क्याकडे जाताना दिसायला लागला. त्यात एक उघडाबंब कोळी आणि एक काळीभोर कफनी घातलेला माणूस होता.
“बंडया ही नस्ती नाटकं करायची तुला काय गरज होती? ते केवढे मोठ्ठे योगी आहेत माहित आहे? तू तुझ्या पायावर धोंड मारून घेतलीस. मूर्ख!” नंदू तिरसटून बंडयाला बोलला. बंडयाला या बोलण्याचे काही वाटले नाही. त्याला अशी बोलणी वरचेवर खायला लागत.
जिथे ते सारे धक्क्यावर यायला एकत्र जमले होते त्याच ठिकाणी, शिवाजी मैदानाजवळच्या नाक्यावर, एकमेकांचा निरोप घेण्यासाठी ते पोहोचले. तो सगळा प्रवास नंदूच्या तिरसट बोलण्यांनी तणतणत झाला. राजन, बंटी धक्क्यावरच आपल्या मामाबरोबर थांबले. तंटा, कंटांनी लॉन्चीच्या टपावर काय घडले जाणून घेण्यासाठी जंग, जंग पछाडले. त्यांना नंदूने सरळ तोडून निराप दिला आणि वाटेला लावले. धुंडीला वर विषय काय झाला माहित नव्हते तरी बंडयाची कड घेऊन तो नंदूशी भांडला. नंदूने त्यालाही बदडायचा मोह आवरून चालता केला. बंडयाचे नक्षत्र अभिजीत, गुरू मंत्रप्रभुवाले आहे, हे कळल्यापासून वांडाने जो अघोषित बहिष्कार टाकला होता तो चालूच राहिला. फक्त नंदूशी बोलून तो गेला. नंदू रागात आचार्यांनी केलेली सुचना विसरला. बंडयाला एकटा न सोडता त्याने घरापर्यंत पोचवण्याची जबाबादारी घ्यायला हवी होती. तोही गेला.
पंडी विसरली नव्हती. नंदू गेला तरी ती बंडया, गुंडीबरोबर थांबली होती.
“ए पंडी, तुझं झालं की मला पण दे ते पुस्तक वाचायला.” गुंडीने ताबडतोब आपली मागणी पुढे रेटली. “माझा भाग्योदय कस्सा होणाराय पाहायचेय.”
“गुंडी, जरा बंडयाच्या धोक्याचा विचार तरी करशील?” पंडीने कृतक कोपाने म्हटले.
“छट्! त्यात काय? सरलकाका मला नेहमीच ते सांगत असतो. विसरलीस का त्याने तुला पण सांगितले होते ते?” रोज मरे त्याला कोण रडे, या थाटात गुंडीने सांगून टाकले आणि बंडयाच्या मनावरचा ताणही एकदम हलका झाला.
“अरे हे दुखणे तर नेहमीचेच आहे.” बंडयाने मोठया आढयतेने वीर बनत सांगितले, “त्यावर माझ्याकडे मस्त उपाय आहे.”
गुंडीने हात कमरेवर टेकले आणि त्याच्याकडे बघत काय? अश्या भुवया उडवल्या. पंडीने ओठांचा चंबू केला.
“ओळखा?”
“ए बंडया, फुकट भाव खाऊ नकोस, चल सांगून टाक पटकन,” गुंडीने त्याची कॉलर धरत धमकवत असल्यासारखा अभिनय केला. तसे घाबरल्याचा अभिनय करत बंडया बोलला, “सांगतो सांगतो गुंडी दादा, आधी कॉलर तर सोडा.”
“नाय नाय भावखाऊ, आधी सांग. सांगल्याशिवाय नाय.”
“ही काय माझ्या पॅन्टीच्या खिशात अंकदाण्याची पुडी आहे. तो माणूस परत माझ्या वाटेला आला तर त्याला जाडयापेक्षा जास्त फुगवेन,” बंडयाने पॅन्टीच्या खिशात हात घालून पुडी बाहेर काढायचा प्रयत्न केला, “मी नेहमी जवळ ठेवतो आताश्या, कधी लागली तर? मगाशी मला आठवलीच नाही.” ऐनवेळी दगा देणार्या आपल्या स्मरणशक्तिने खजिल होत, बंडया म्हणाला.
“अय्या! आचार्यांवर का तू तिचा वापर करणार होतास बंडया?” पंडीने आपल्या दोन्ही गालांवर हात ठेवत विचारले.
“आचार्यांवर नव्हे गं, ती बंदूक रोखणारा लाल शर्टवाला होता ना, त्याच्यावर.” हिला काहीच कसं समजत नाही. अशा वैतागाने बंडयाने उत्तर दिले.
“बंदूक रोखणारा? लाल शर्टवाला? कधी? कोण?”
बंडयाला आठवले. बंदुकिचा आवाज झाला नव्हता आणि बाजूच्या लॉन्चवर कोणी बघत नव्हते. “अगं तो माणूस आपल्या लॉन्चीवरून पडला ना, तो त्या लाल शर्टवाल्याच्या बंदुकिने पडला. लाल शर्टवाला आपल्या शेजारच्या लॉन्चीवर मला गोळी घालायला उभा होता. त्याचा नेम चुकला.” पुढे तिने काही विचारायच्या आत उत्तरला, “तोच तो राजन बंटीला पाठवणारा कॅमेरावाला, नलीच्या मागे लागलेला बेवडा. तुमचा चिकणा हिरो.” म्हणताना बंडयाचे तोंड वाकडे झाले.तशा त्या दोघी गो-यामो-या झाल्या. पंडीने त्यातून तोड काढली.
“कशावरून तो तुला मारणार होता. उलट त्या कापालिकांच्या हस्तकाला मारून त्याने तुला वाचवला.”
“तुला कशाला त्याचा एवढा पुळका येतो. तू त्याच्या प्रेमात पडलीस का?”
“बंडया चूप. आम्ही आपला तो टाईमपास चाळा करतो. आमची वयं आहेत का प्रेमं करण्याची?”
“तेच म्हणतोय मी. हि तुमची वयं आहेत का प्रेमं करण्याची?”
यावर गुंडीने बंडयाची कॉलर सोडून त्याच्या पाठीत एक जोरदार गुद्दा घातला, “पंडी हा बंडया फार शेफारला आहे. मुलींशी कसे बोलावे याला कळत नाहीय. ठिकाणी लावू काय?”
“आपण कशाला, कापालिक लावणारच आहेत.”
एवढे होईस्तोवर त्यांच्या बाजूला मैदानावरच्या कट्टयावर बसलेले म्हातारे जोडपे तरातरा उठले. म्हातारे आजोबा म्हाता-या आजीच्या कानात बडबडले, “पाहिलेस काय वाह्यात झालीत ही आज कालची कार्टी? हा सगळा टिव्ही आणि मालिकांचा परिणाम बरे. नखाएवढी चिमुरडी पोरं आणि प्रेमं काय? खून बंदुका काय? छे. छे. वागण्या बोलण्याला कशाचा काही धरबंद म्हणून राहिला नाही.”
“आमच्या काळात नव्हती ही असली थेरं. या गुंड मुलीएवढी असताना तर बाई मी आमच्या दादाच्या कडेवर बसून फिरत होते नं दादाशी काऊ-चिऊच्या गोष्टी करायचे.” हे बोलताना आजी सोयीस्कररीत्या तिचा दादा, दादाची चिऊ म्हणजे पलिकडच्या घरातल्या चित्राला, अल्याडच्या घरामागे आंब्याच्या राईत येण्याची खूण करुन बोलवायला, कमरेवरल्या आजीला काव काव ओरडायला सांगायचा, हे विसरल्या. याच त्या काऊ चिऊच्या गोष्टी. विस्मरण हा म्हातारपणाचा गुणच आहे.
“छे. छे. आपण उघड्यावर काय बोलतोय सगळं. चला आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊया.” पंडी म्हणाली.
मग ते तिघे मोकाशींच्या बंगल्याच्या गर्द वई कुंपणाच्या झाडो-यात आडोशाला जाऊन बसले. संध्याकाळचे चार वाजत होते. त्यामुळे घरी जाण्याची कोणाला घाई नव्हती. बोलण्यासारखे खूप होते. रमलाचार्यांच्या भेटीनंतर अनेक गोष्टींना उत्तरे मिळाली होती आणि अनेक प्रश्न नव्याने निर्माण झाले होते. बंडयाला देखिल मनोमन या सगळया गोष्टी कोणाबरोबर तरी बोलाव्या, चर्चा करावी अशी फार आच लागली होती. सरलकाका आणि मंजुघोषापाशी सगळया गोष्टींची उत्तरे असत. पण ते ती नीट देत नसत. नेहमी हातचे काही महत्वाचे राखून ठेवत. बंडयाच्या शंकांचे समाधान होण्याऐवजी असमाधान वाढायचे काम होई. ते दोघे त्याला जणू दुधखुळा समजत. गुंडी, पंडी समजणार नव्हत्या. त्या देखिल त्यांच्या इतक्याच दुधखुळ्या होत्या.
“मी खरेच मरणार का?” बंडयाने शुन्यात नजर लावून विचारले. त्याच्या आईवडीलांना हे कळले तर दुःख होईल की हायसे वाटेल यावर विचार चालू होता.
“बंडया,” पंडी स्पष्ट नापसंती दाखवत म्हणाली, “आचार्यांनी मरणार नाही, मरण्याचा धोका आहे असे सांगितलेय.” तिला तो विचार अजिबात सहन होत नव्हता.
“बंड्या मी मरणार आहे, पंडी मरणार आहे, सरलकाका मरणार आहे, आपण सगळे कधी ना कधी मरणार आहोत,” गुंडीने कधी नव्हे ते खरेखुरे शहाणपणाचे बोल काढले. “आई म्हणते माणसाचे मरण कधीच कोणी सांगू शकत नाही. जेव्हा ते यायचे आहे तेव्हा ते येते. ते कोणी टाळू शकत नाही आणि जेव्हा ते नसते तेव्हा कोणी किती काय केलं तरी मरू शकत नाही.” गुंडीच्या चेह-याला असले गंभीर तत्त्वज्ञान शोभत नव्हते.
“मग त्याचा विचार करून भ्यायचे कशाला? रडायचे कशाला?”
बंडयाने यावर थोडा विचार केला. “हे पुस्तक सांगतेय ना मी मरणार म्हणून?”
पंडी यावर दात उचकटत म्हणाली, “अरे मी तुला कितीवेळा सांगतेय ना. आचार्य तसे म्हणाले नाहीत. हे पुस्तक सांगतेय ते नीट बघायला, वाचायला ना मी घेतले?”
“हुँ! नाक घासून, गुडघे टेकून.” बंडया हेटाळणीने मान उडवत बोलला.
“आचार्य म्हणाले या पुस्तकाच्या विद्येच्या सहाय्याने धोका आधी हेरून तुझा जीव वाचवता येईल. जर कोणाचा जीव वाचवायचा असेल तर मी नाक घासणे आणि नुसते गुडघे टेकणे कशाला? मातीसुद्धा खाईन,” एवढे बोलताना पंडीच्या डोळ्यात पाणी तराळले. बंडयाला बोलण्याचा पश्चाताप झाला. काही विषयांतर करणे भाग होते.
“हे गुरू मंत्रप्रभु कोण?”
गुंडी व पंडीला दिक्षित घराण्यामधल्या असून देखिल माहित नव्हते.
“बरं मग हे कापालिक कोण?”
“मला माहिताय. ते लोक दुष्ट मांत्रिक असतात. ते नरबळी देतात आणि काली देवीकडून सिद्धी मिळवतात.” गुंडीने उत्तर दिले.
“आचार्य तर निकुंभिलिका म्हणाले. तिला सशरीर करण्यासाठी...” बंडयाने पुढचे वाक्य अर्धवट सोडले. “माझा बळी” म्हणणे पंडीला आवडले नसते.
“निकुंभिलिका... निकुंभिलिका देवी?” पंडी विचारमग्न स्वतःशी पुटपुटत राहिली. “ऐकल्यासारखे वाटतेय कुठेतरी, गुंडी?” तिने अपेक्षेने गुंडीकडे पाहिले. गुंडी काही न बोलता गवताच्या काडया मोजत बसली.
“कुट्टनीमंत?” बंडयाने नाव घेतले. दोघींनी नकारार्थी मान हलवली.
“वांडा.” बंडया एकदम हुरूप येऊन बोलला. दोघींनी भिवया उंचावल्या.
“वांडाला माहित आहे गुरू मंत्रप्रभु कोण ते.” बंडयाने खुलासा केला.
“हां, तोच बोलला पयला.” गुंडीलाही हुरूप आला.
बोलणे पुढे चालूच राहिले असते तो पावसाची सर आली. ते बसले होते त्या सखलवटात लगेच चिखल व्हायचा. घाईघाईने एकमेकांचा निरोप घेऊन ते पांगले.
“मी बंडयाला घरापर्यंत सोबत करीन.” निघताना गुंडीने पंडीला आश्वस्त केले. बंडयाने अंकदाण्याची पुडी चाचपडत स्वतःला आश्वस्त केले

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लैच मजा आली हा भाग वाचुन...पुढचे भाग येऊ द्या लवकर... आणि हो...पुर्ण कथा पोस्ट केल्याशिवाय अजिबात थांबु नका...मधेच थांबुन आम्हाला अधांतरी ठेवु नका..

Hi, very interesting story was waiting for next parts so just googled the name and found the story here - http://bandyagundi.blogspot.in/search?updated-max=2010-07-18T06:49:00-07...

All who are waiting for the story will found it here, sorry Pritam19 but it was a long wait so searched for the story online.

I found this then I searched for Kamthe Kaka story also and found the full story here -

http://www.manogat.com/node/22380

Sorry to the author.

Hi, very interesting story was waiting for next parts so just googled the name and found the story here - http://bandyagundi.blogspot.in/search?updated-max=2010-07-18T06:49:00-07...

All who are waiting for the story will found it here, sorry Pritam19 and Mirinda but it was a long wait so searched for the story online.

I found this then I searched for Kamthe Kaka story also and found the full story here -

http://www.manogat.com/node/22380

Sorry to the author.

कृपया कोणी पुढच्या भागांची लिंक देईल का ? मिनू१६ यांनी दिलेल्या लिंक मधे १९ वा भागच आहे. कोणी २० पासून पुढील भागांची लिंक दिली तर बरे होईल. गोष्ट अर्धवट राहिलेय आणि उत्कंठा वाढलेय.