बाबूने मंजुघोषाला बापाच्या पकडीतून आपल्या हातात घेतले मग मंजुघोषाचा मुका घेत घेत विजयी नजर टाकत बंडयाला जळवले. बाबूच्या मुक्यांनी गुदमरत मंजुघोषाने जरा फडफड केली.
“जपून रं. नीट धर. सुटता नये.” बापाने मुलाला बजावले. टपरीवाला मंजुघोषाची समजूत काढू लागला, “आरं लेकरा असल्या टिनपाट लोकांबरूबर राहण्यापरिस आमच्या बरूबर र्हा राजा. आमी तुझी कशी राजावानी बडदास्त राखू बघ. रोज भजी, मिर्ची डाळ मिळती बघ आमच्यासंग. कसली भिकार लोकां ती. काय खाया, पिया तरी घालीत होती का नायसं दिस्तं. कसं सुकून गेलया रं माझं लेकरू.”
“आता मला जाऊ दया की हो,” बुडाखालचं पोतेरे बोलले. तसा एक शिवी घालून टपरीवाला उठला एकदाचा. चुरगाळलेला भिकाजीचा देह उठून सरळ झाला. त्याची एकतारी उचलून घेऊन तो सुरक्षित अंतरावर गेला. तिथून टपरीवाला व सरलकाकावर शिव्यांची लाखोली त्याने वाहिली. सरलकाका हात झटकून त्याच्याकडे पाठ फिरवून निघाला. आणि बंडया धुमसत, वळलेल्या मुठींनी सरलकाकाच्या मागोमाग. टपरीवाल्याने बाबूला इशारा केला. तसा बाबूने एक दगड घेऊन भिकाजीच्या दिशेने भिरकावून दिला. भिकाजीने पोबारा केला. भिकाजी देखिल पळून गेल्यावर बघ्यांची मनोरंजनाची उरली, सुरली आशा संपुष्टात आली. खेळ एवढया सहज आटोपल्यामुळे वाटणारी हळहळ त्यांच्या चेहर्यावर साफ दिसत होती. श्यामरावाने दामदुप्पट जोराने पानपट्टीवाल्याच्या पाठीत धपाटा घालत म्हटले, “हांगाशी हे बेस काम झालं.” तर दाजी दुकानदाराने पाटील गिर्हाईकाला त्याचेच पाच रूपये, पदरचे पैसे गेल्यासारखे तोंड वाकडे करत परत केले. पाटीलला काही कळले नाही. तो आपले खुषीत ते रूपये घेऊन निघाला. अर्ध्या वाटेत कधीतरी त्याला तो गिर्हाईक बनल्याचे कळलेही असेल. कदाचित!
“बंडया आपण तुझ्या घरी जाऊया. तुझ्या आईबाबांची परवानगी मिळवली पाहिजे.” सरलकाकाने सुचविले. बंडयाचे तिथे लक्ष नव्हते.
“आपण सगळे सुटलो होतो. मंजुघोषाने सगळे बिघडवून टाकले.” बंडयाला राहावले नाही. त्याची तगमग बाहेर पडली. “मालक पैसे, मालक पैसे ओरडत बसला. वर पैसे जमवून त्या ढेरपोट्याला दिले. बरी शिक्षा झाली. आता बसेल दोन दिवस पिंजर्यात तडफडत. स्वतःला तो खूप जादा शहाणा समजतो ना.” बंडया चरफडत म्हणाला.
“आहेच तो खूप शहाणा.” सरलकाका शांतपणे म्हणाला. “दोन दिवस कसले, त्याची इच्छा नसली तर दोन मिनिटात तो परतून येईल बघ. ती तर खूप साधी भोळी माणसं आहेत. त्यांच्याकडून थोडे लाड करून घेईल. त्यांना थोडावेळ रिझवेल आणि मग येईल परत.” ज्या ठाम विश्वासाने सरलकाका म्हणाला ते ऐकून बंडया अचंब्यात पडला. शिवाय ती शिवीगाळ करणारी, मारकुटी माणसं साधी, भोळी? हे तर फारच होतेय. आणि असेलही मंजुघोष मोठा दिडशहाणा. पण म्हणून काय त्याने बंडयाला शेंबडं पोर समजून वागवावं.
“तो मला सारखा सारखा बाळ, बाळ म्हणत असतो. मी काय कुक्कुलं बाळ आहे?” बंडयाने तक्रार केली.
सरलकाकाला बंडयाचा राग पाहून खरेतर खूप खूप हसू आले. पण ते गालाआड दडवून तो म्हणाला, “तसाच आहे तो. त्याला सगळेच लहानगे, अजाण बालक वाटत असतात आणि तो त्यांची काळजी घेत बसतो. आता आला की मलासुद्धा केवढा उपदेशाचा डोस पाजेल बघ. मी पैसे न देताच निघालो होतो ना. बंडयाचे कान लगेच लांब झाले.
बंडयाने कुठेतरी आत, मनात डाचत असलेला प्रश्न विचारून टाकला, “पण तू पैसे का दिले नाहीस?”
“होती तेवढी सगळी नाणी दिली तर? “ सरलकाकाने खांदे उडवत म्हटले.
“अं!...,” बंडयाला स्पष्ट काही विचारायचे धाडस होईना. पुरेसे पैसे नसताना मोठ्ठे बिल करायला नको होते. पण उघड, उघड सरलकाकाच्या पदरात त्याची चूक घालणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास बंडयाला जे डाचत होते ते मनातल्या मनात कुथमणे देखिल सहन होईना. शेवटी धीर एकटवून तो म्हणाला, “आपण एवढे बिल करायला नको होते.”
सरलकाकाला यावर काय म्हणावे समजेना. बंडयासारख्या लहान मुलासमोर आपली चूकही कबूल करवेना. बंडयाचे म्हणणे खोडून काढण्यासारखे नव्हते. नकळत त्यांच्यात एक प्रकारचा ताण निर्माण झाला. सरलकाकाची या अवघड प्रसंगातून अवचित सुटका झाली. त्याच्या समोर पांढरी शुभ्र फडफड झाली.
“मंजुघोष!” बंडया आश्चर्याने ओरडला. सरलकाका म्हणाला ते पूर्णपणे खरे होते. त्याला हवे तेंव्हा मंजुघोष स्वतःची सुटका करून घेऊ शकत होता. आल्या आल्या मंजुघोषाने सरलकाकाचे केस चोचीने बोचकारले.सरलकाकाला तंबी दिली की ताबडतोब त्या गरीब माणसाचे पैसे दऊन यावेत.
“माझ्याकडे कुठे पैसे आहेत. मगाशी दिले नसते का?” सरलकाका त्राग्याने म्हणाला.
“तुझ्या कनवटीच्या कडेसरीत त्या कागदी मुद्रा आहेत ना. त्यातली एक नेऊन त्यांना दे बरे.” मंजुघोषाने सुनावले.
“ते कागदाचे कपटे. त्यांना काय किंमत आहे?” सरलकाका त्याच वैतागात उत्तरला.
“अदिक्षितांच्या व्यवहारात त्यांनाच जास्त किंमत आहे हो.” मंजुघोषाने ठणकावून सांगितले.
“होऊच शकत नाही. मला नाही पटत.” सरलकाकाने आपला हेका चालूच ठेवला.
“अरे मित्रा, ते सिद्ध केलेले कागद आहेत. त्यात सुर्याची शक्ति आहे. पहा. सुर्यप्रकाशासमोर ती मुद्रा धर. तुला त्यातली सुप्त मंत्रणा दिसेल.” वाचासिद्ध ऋषिप्रमाणे मंजुघोषाची वाणी दुमदुमली. सरलकाकाने एक नोट कडेसरीतून काढली आणि खरेच सुर्यप्रकाशात धरली. त्यात त्याला गांधीजींचा चेहरा प्रगटलेला दिसला. सरलकाकाच्या चेहर्यावर प्रचंड आश्चर्य उमटले.
“कमाल आहे. अदिक्षितांना ही सिद्धी कशी मिळाली कोण जाणे?”
“आता आधी तू त्यांची माफी मागावीस आणि ही मुद्रा त्यांच्या स्वाधीन करावीस हे उत्तम. एकाने त्यांचे समाधान झाले नाही तर दोन दे. जा मित्रा. तुझ्याकडून होऊ घातलेल्या अन्यायाचे परिमार्जन कर. सर्व कुशल असो.” मंजुघोषाची मंजुळ वाणी स्वस्तिवचन म्हणत निनादली.
नाईलाज झाल्यासारखा सरलकाका हात झटकुन मागे वळला आणि टपरीवाल्याच्या दिशेने निघाला. बंडयासाठी त्याचे हे सारे वागणे मोठे कोडे होते. मंजुघोष म्हणजे एक मन ओळखणारा ऋषी होता जणू. तो बोलू लागला. “त्याचे काय आहे ना बाळ, बिचारा सरल कायम साबरींच्या जंतर मंतर जगात वावरल्याने, अदिक्षितांच्या या लौकिक जगाची व इथल्या व्यवहारांची जाण त्याला तितकीशी राहत नाही. साबरी जगाचा व्यवहार सगळा धातुंच्या नाण्यात चालतो. खणखणीत धातुंच्या नाण्यापेक्षा कागदाच्या हलक्या कपटयांची किंमत अनेक पट असू शकते, हे नाणं न नाणं वाजवून बघणार्या सरलसारख्याच्या मनाला पटणे कठीण हो. बरे मी किती समजवावे तरी समजूत पटवून घेणार म्हणून नाही. अगदि हट्टी. त्याला त्याच्या भाषेतच समजवावे लागते बरे.” मंजुघोषाने सरलकाकाला कसे मामा बनवले हे आता बंडयाच्या लक्षात आले. त्याला पटकन हसु आले. तरी सरलकाकाविषयी त्याचे मन पूर्ण साफ झाले नव्हते.
“मंजुघोष आम्ही एवढे बिल करायला नको होते ना?” बंडयाची मनातली रूखसुख बाहेर पडलीच.
“सरल ना खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी सढळ, अगदी पूर्वीपासून हो. त्यात साबरी जगात कायम कुठे ना कुठे महाप्रसादांच्या, लक्षभोजनाच्या जेवणावळीत वाढलेला तो, अन्नाची वेगळी म्हणून किंमत दयावी लागते हे त्याच्या मुळी लक्षात राहत नाही. मग असे घोटाळे करतो बापडा.”
मंजुघोषाच्या एवढया विवरणानंतर बंडयाच्या मनात सरलकाकाविषयी कोणतेही किल्मिष उरले नाही. उलट त्याला आता सरलकाका म्हणजे गंमतीदार प्राणी वाटायला लागला. मंजुघोष बंडयाला एवढयावरच सोडतोय होय.
“बंडया तू तरी त्याला थांबवायचे हो. चहावाल्यांचे पैसे बुडवून पळ काढणे बरे नाही हो, बाळ.” मंजुघोषाने बंडयाला समजावले. आता आरोपीच्या पिंजर्यात बंडया स्वतःच उभा राहिल्यावर बंडया चरफडला. सरलकाकाची झाली तशी चमत्कारीक स्थिती बंडयाची झाली. काय उत्तर दयावे त्याला सुचेना. चुक होती हे कबूल. पण ते उघड कबूल करवेना. त्यात पुढे मंजुघोषाने त्याची तुलना थेट चांगदुष्टाशी केल्यावर तर त्याची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी गत झाली.
“आपण सारेच चुका करतो हो. कधी भले करतो, कधी वाईटही करतो कुणाचे. एक चांगदुष्टच का तसा आहे, बाळ? आपण सगळे त्यातलेच. कोणी कोणाचा राग करू नये हो.” मंजुघोषाने तर शालजोडीतले मारायचे व्रतच घेतले होते जणू. बस् बस्! पुरे आता हे पुराण. बंडयाच्या मनात आले. मंजुघोषाकडे पाहणेही त्याला असहय झाले. बंडयाने त्याच्याकडे पाठ फिरविली.
आता बंडयाचे लक्ष टपरीवाला आणि त्याचा वाह्यात कारटा बाबू काय करत होते तिकडे गेले. दुरून त्यांच्या चेहर्यावरचे भाव कळत नव्हते. सरलकाकाने काहीतरी बोलाचाली करून एक नोट टपरीवाल्याच्या हातात कोंबली. ती नोट खरी आहे का खोटी हे पाहण्यासाठी टपरीवाल्याने सुर्यप्रकाशात धरली. हे त्याच्या अविर्भावावरून दूर अंतरावून सुद्धा बंडयाला कळले. आणि नोट बघता, बघता टपरीवाला जागच्या जागी कोसळला. तेव्हा बाबू पुढे सरून सरलकाकाला काहीतरी बोलला. सरलकाकाने त्याच्याही हातात एक नोट कोंबली. त्याबरोबर बाबू देखिल शुद्ध हरपून खाली कोसळला. पानपट्टीवाल्या राघवने अश्या दणक्यात श्यामरावाच्या पाठीत घातली की यंव रे यंव! तर गिर्हाईक पाटील पैजेचा जाब विचारायला मारे दणक्यात दाजी दुकानवाल्याकडे चाललेले, ते अळीमिळी गुपचिळी करून मागच्या मागे कनवटीचे पाच रूपये सांभाळत पळाले. बंडयाला सगळया प्रकाराचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा त्याने सरलकाकाच्या त्या तथाकथित मुद्रांवरचा “हजार” आकडा पाहिला. बंडया जरी कोसळला नाही तरी त्याने गपकन् डोळे मिटून घेतले. त्याच्यासमोर हजार रूपयांनी मिळणार्या हजार चॉकलेटांचा पाऊस पडताना दिसला. सरलकाकाने हजार रूपयांच्या नोटा दिल्या?
बंडया भानावर आल्याचे पाहिल्यावर मंजुघोषाने त्याला आठवण करून दिली, “बरे का बाळ, बाबूच्या गळयातील माळेतले मणी या पुत्रंजीवाच्या बिया आहेत हो. ईडा-पिडा, भूत-प्रेत, आधी-व्याधी समस्तही टळावी म्हणून त्याच्या आईने त्याच्या गळयात बांधल्या आहेत. पुत्राच्या जिविताचे रक्षण करतो तो पुत्रंजीवी. मोठा सामर्थ्यवान वृक्ष बरे.” बंडयाच्या नजरेसमोर नक्षत्रवनातल्या सुकून मेलेल्या पुत्रंजीवी वृक्षाचे दृश्य आले. बंडयाला असे जाणवले की त्याला काहीतरी कळले आहे. पण त्याला काय कळले आहे हे मात्र त्याला उलगडेना.
“अलख”, मंजुघोष म्हणाला.
“अलख” सरलकाकाने निरोप दिला. विचाराच्या नादातून बंडया बाहेर आला.
“अलख” बंडयाकडे बघून मंजुघोष म्हणाला. बंडयाला त्या नथचढेल पक्ष्याशी काही देणे घेणे नव्हते. बंडयाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मंजुघोष गुमान आकाशात दूर उडून गेला. काळया निळया आकाशात हळूहळू मंजुघोषाची पांढरी शुभ्र आकृती मिळून गेली.
“बंडया आता तु दिक्षित झालास. निरोप घेताना आपल्या जगात एकमेकांना आपण अलख म्हणायचे असते.” सरलकाकाने त्याला शिकवायचा प्रयत्न केला.
“माहित आहे.” बंडयाने जरा घुश्श्यात उत्तर दिले.
“अरे मग मंजुला,” सरलकाकाला बोलणे पुरेही करू न देता बंडयाने तोफ डागली.
“मला नाही बोलायचे त्याच्याशी. तो सारखा सारखा मला बोलतो.”
“काय बोलतो? बाळ?” बंडयाच्या या पवित्र्याने बुचकळयात पडत सरलकाकाने विचारले.
“तो मला म्हणाला की”, पुढे बंडयाला बोलता येईना. त्याची परत कुचंबणा झाली. आपल्याच तोंडाने आपली चुकी मंजुघोषाने काढली हे कसे सांगणार? शेवटी बंडयाने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि बोलून टाकले. “तो म्हणाला मी सुद्धा बिल बुडवून पळालो हे खुप वाईट केले.” सरलकाकाच्या अगदी ओठावर शब्द आले होते की, मग त्यात काय, खरेच तर बोलला मंजुघोष. पण सरलकाकाने ते न बोलता तोंडातल्या तोंडात आत गिळले.
“आणि... आणि तो म्हणाला आपण सगळेच चांगदुष्टासारखे आहोत. अर्धे बरे, अर्धे वाईट.” बंडयाच्या बालमनाला खरेतर ही तुलना सर्वात जास्त दुःख देवून गेली होती. चांगदुष्टाची ठकबाजी बंडयाने स्वतः अनुभवली होती. मंजुघोषाने त्याला त्या ठकाच्याच रांगेत बसवावे हे बंडयासारख्या मानी मनाच्या मुलाला बरेच लागले.
सरलकाकाच्या लक्षात बंडयाची समस्या आली. मंजुघोषाला नीतीचे पाठ देताना, मोठा माणूस आणि लहान मुलाला समजावताना करायचा फरक कळला नव्हता. बंडयाचा मंजुघोषावरील राग कसा दुर करता येईल त्याला माहित होते.
“छे छे. चांगदुष्ट अगदी ठरवून छानपैकी दुष्टपणा करतो. नेहमी नेहमी करतो. आपल्याकडून तर चुकून नकळत एखादा वाईटपणा होतो. आपण चांगदुष्टाप्रमाणे नव्हेच तर. मंजु चुकला. आता भेटू दे. चांगली खरडपट्टी काढतो त्याची.” सरलकाकाने बंडयाला पटवले. बंडया खूष झाला. चांगदुष्टशी त्याची तुलना इतकी व्यवस्थित खोडली गेल्यावर त्याच्या मनाची घालमेल शांत झाली. त्याच्या स्वतःवरल्या विश्वासाला, स्वतःच्या चांगुलपणावरच्या विश्वासाला धक्का लागला होता. तो स्थिर झाला.
“आता एखादा आकाशमोती शोधून काढू आणि मंजुला देऊन टाकू की झाली फिट्टंफाट. मंजुने तुझ्यासाठी त्याचा आकाशमोती दिला होता ना?” सरलकाकाने बंडयाला पाठीवर हात घालून जवळ घेत विचारले. बंडयाने होकारार्थी मान हलवली. तो विचारात पडला.
“कुठे असतो आकाशमोती?” त्याने विचारले.
“आकाशात”. अगदी सहजपणे सरलकाकाने सोप्पे उत्तर दिले. बंडयाचे डोळे हे मोठ्ठे झाले.
“दरवर्षी वर्षा ऋतूत असे दहा बारा मोतीच आकाशातून, पावसाबरोबर पडतात. कुठेही. समुद्रात, वाळवंटात, शेतात, जंगलात, गावात, शहरात. ते सापडणं केवढी दुर्मिळ गोष्ट आहे. त्यांच्या योगाने कुठलाही असाध्य विकार, रोग बरा होऊ शकतो.” सरलकाकाने आकाशमोती आख्यान पुढे चालू केले. मंजुघोषाने किती सहज तो मोती काढून दिला होता. तो काढताना बंडयाला वाटलेही नव्हते की, त्याचं एवढं बखान असेल. तरीच सोनं लाथाडणार्या नक्षत्रकपिला मोती मात्र हवासा झाला.
“आता हे नक्षत्रकपि सतत काही ना काही बाही चरत असतात. खात असतात. त्यांच्या पोटदुखीवरील हा रामबाण इलाज असतो.” सरलकाकाने आख्यान पुढे रेटले. हे ऐकताच बंडयाचे डोळे लकाकले. नक्षत्रकपि हे कारकून आहेत याची बंडयाला पूरेपूर खात्री झाली. त्याच्या नितिनच्या शाळेच्या फर्नांडीसमॅम सुद्धा नेहमी कुरमुर्याच्या भडंगाच्या पिशव्या व तिखट शेंगदाण्याच्या पुडया चरत असत. मग जिर्या-मिर्याच्या पाचक गोळयांची फैरच्या फैर त्यांच्या तोंडात रवाना होत असे. कारकून मंडळींचे हे व्यवसाय निदर्शक एवं गुणवैशिष्ट्य असावे.
“मंजुलासुद्धा कधी कधी वेदनांचे तीव्र झटके येतात. त्याचे पंख बधिर होऊन तो उडता उडता कोसळायचा. म्हणून मोठ्या मुश्किलीने आम्ही तो मिळवला होता. तो बाळगल्यापासून मंजुला परत कधी दौर्याचा त्रास झाला नव्हता.”
बापरे! सरलकाकाचे बोलणे ऐकून बंडयाच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्याच्यासाठी मंजुघोषाने केवढा धोका पत्करलेला. मंजुघोषावर केवढं संकट कोसळू शकत होतं. बंडयाला मंजुघोषाने केलेली सगळी मदत आठवली. त्याच्यासाठी केलेली सगळी धडपड, श्रम आठवले. मंजुघोष नसता तर त्याला कधीच दिक्षा मिळू शकली नसती. बंडयाच्या मनाच्या आरश्यावर, बंडयाच्या चेहर्यावर बंडयाचे मनातले भाव उमटले. ते सरलकाकाने अचूक ओळखले. बाण निशाणावर लागला तर अचूक!
“तसा मंजु भारी प्रेमळ आणि उदार. पण म्हणून काय जेव्हा तेव्हा उपदेशच करत बसायचे? एखादयाच्या चुकीवर असे कावळयासारखे टोचत बसायचे? बंडया नकोच बोलू त्याच्याशी अजिबात. एका पोपटाची काय एवढी मिजास? गेला खड्डयात तर गेला, त्याची काय एवढी पत्रास!” सरलकाकाला बोलणे आवरायला लागले. कारण बंडयाच्या डोळयातून पश्चातापाच्या धारा खळखळू लागल्या. बंडया रडू लागला. नंतर बंडयाला शांत करायला सरलकाकाला बराच वेळ लागला. मग सरलकाकाने बंडयाच्या आईबाबांना पटवायची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतलेली. तेव्हा ते त्याच्या घरी निघाले.
तार्यांनी भरलेले आकाश पाहून बंडयाला घरी परतायला किती उशीर झालाय याची जाणीव झाली. आईबाबा आता त्याला खाऊन टाकतील. बंडयाने शाळा बुडवल्याचे नितिनच्या घरी चौकशीत कळले असणार. बंडयाच्या छातीत धक् धक् व्हायला लागले. उदयापासून तो नेहमीच्या शाळेत न जाता वेगळयाच शाळेत जाणार आहे. हे त्यांना कसे सांगायचे? तेही गुप्ततेची शपथ न मोडता. तो मोठया धर्मसंकटात पडला. भरीला त्याचे आईबाबा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रीय सभासद होते. ते त्यांचा मुलगा जादूटोण्याच्या शाळेत पाठवणार? विचाराने बंडयाचे डोळे गच्च जड झाले. हळूहळू ते कोकणनगरातील इमारतीपाशी पोहोचले. सिंधुलहरी इमारतीतील बरेचसे रहिवासी जागे होते. लिफ्टने ते त्याच्या चौथ्या मजल्यावरील घरी पोहोचले. घराला कुलूप होते. बंडयाने चावीच्या नेहमीच्या ठिकाणाहून चावी घेतली. अंगचे कुलूप उघडले. सवयीने फोनचा निरोप नोंदणार्या यंत्राकडे गेला. ते चालू केले.
यंत्रावर बंडयाच्या आईचा आवाज ऐकू येऊ लागला. नेहमीप्रमाणे तिला व बाबांना अचानक कुठेतरी मिटींगला (पार्टीला) जावे लागणार होते. त्याला त्याचे आटपून, जेवून बाहेरच्या दाराला आतून कडी न लावता झोपायची सुचना होती. तरी बंडया आईबाबा परतल्याशिवाय झोपणार नव्हता. टिव्ही, कॉम्प्युटर, व्हिडीओ गेम. करायला चाळे खूप होते. फ्रिजमध्ये तोंडात टाकण्यासारखे खूप होते. बंडयाने आईस्क्रिम काढून स्वतःसाठी व सरलकाकासाठी बश्या भरल्या. सरलकाकाने आईस्क्रिम खायला नकार दिला. नुकतीच पोटपूजा झाली होती, म्हणूनही असेल. सरलकाका बंडयाचे घर व तिथला कारभार पाहून कावराबावरा झाल्यासारखा वाटत होता.
“अलख.” यावेळी बंडया न विसरता म्हणाला. सरलकाका निरोप घेऊन निघून गेला. आईबाबा उशिरा कधी परतले. आईबाबांचे व्यवहार नित्याचे होते. काही वेगळे घडलेच नव्हते जसे. सगळयाच गोष्टी नेहमीच्या होत्या. अंथरूणात पडल्यावर बंडयाचे लक्ष त्याच्या खिडकितून दिसणा-या समोरच्या खिडकिकडे गेले. तिथले पडदे ओढून घेतलेले होते, आणि रोज रात्री दिसत असे तशी त्यांच्यावर पंख्याची सावली गरगरताना दिसत होती. बंडयाला भय वाटले होते तशी त्याच्या जगाची पार उलथापालथ वगैरे झाली नव्हती. सगळे नेहमीसारखे होते. आणि म्हणूनच बंडयाला अविश्वसनीय, फसवे वाटत होते. त्याने डोळे मिटले. मनोमन प्रार्थना केली की दुपारच्या त्या प्रत्यक्ष भासांसारखा हाही एक भास नसू दे. सारं खरं खरं असू दे. उद्या त्या पिवळया बसमध्ये तो चढू दे. गुंडीला भेटू दे. मग लहान मुलांनाच जमते त्या सहजतेने सारे श्रम, सारे भ्रम विसरून तो स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेला. स्वप्ने काही बरी, काही वाईट. चांगदुष्टासारखी.
(Story) बंडया - गुंडी ६
Submitted by Pritam19 on 12 August, 2016 - 10:53
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बंडया - गुंडी
बंडया - गुंडी ५
http://www.maayboli.com/node/59714
बंडया - गुंडी ४
http://www.maayboli.com/node/59693
बंडया - गुंडी ३.
http://www.maayboli.com /node/59680
बंडया - गुंडी २
http://www.maayboli.com /node/59649
बंडया - गुंडी १
http://www.maayboli.com /node/59647
बंडया - गुंडी
बंडया - गुंडी ५
http://www.maayboli.com/node/59714
बंडया - गुंडी ४
http://www.maayboli.com/node/59693
बंडया - गुंडी ३.
http://www.maayboli.com /node/59680
बंडया - गुंडी २
http://www.maayboli.com /node/59649
बंडया - गुंडी १
http://www.maayboli.com /node/59647
वाचतोय...छान आहे...पुढचे भाग
वाचतोय...छान आहे...पुढचे भाग लवकर येऊद्या...पुलेशु...
छान
छान
chhan lihitay.. avadatay...
chhan lihitay.. avadatay...