कामाठीपुरयाची वेदना - हिराबाई.............

Submitted by अजातशत्रू on 28 July, 2016 - 02:35

कामाठीपुरयाच्या ११व्या गल्लीत अरुंद बोळांच्या आणि खेटून उभ्या असलेल्या कळकटलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत उभी आहे 'आशियाना' ही आता पडायला झालेली इमारत. या इमारतीच्या आठवणी हिराबाईशी अन तिच्या मुलीशी ताजेश्वरीशी निगडीत आहेत. आजही 'आशियाना' हिराबाईच्या मधुर आवाजाला आसुसलेला असेल असं वाटते. 'बच्चुची वाडी' पासून उजव्या हाताला वळून पुढे आले की गल्लीतली सर्वात जुनी इमारत म्हणजे 'आशियाना'. जागोजागी भितींच्या गिलाव्याचे पोपडे निघालेले, आतल्या विटांचे लाल काळे आतडे बाहेर डोकावणारे अवशेष पहिल्या नजरेत तिरस्करणीय वाटतात. इथल्या लाकडी खिडक्यांनी केंव्हाच माना टाकलेल्या तर दरवाजांची फळकुटे नावाला आहेत, इमारतीच्या दर्शनी भागातल्या खोल्यांचे सज्जे पार वाकून गेलेले अन त्यांचे कठडे कलून गेलेले, त्या कठड्यावर आतल्या बायकापोरींनी नाही नाही ते सर्व धुवून वाळत घातलेले. अगदी बेडशीटपासून ते ब्लाऊजपर्यंत सगळं तिथं बाहेर लटकत राहते. 'आशियाना' एक चौकोनी इमारत आहे, चार विंगा असाव्यात तशी हिची रचना. मधोमध मोकळी जागा जणू काही मेघांनीही तिथं आत वाकून बघावं अन आपल्या इच्छावासना शमवून घ्याव्यात अशी तिची बांधणी . दिवसभरात उन्हे या चारही भागातून मनसोक्त फिरतात, इमारतीच्या दाटीवाटीमुळे वारा मात्र इथं फारसा नाही. इमारतीच्या दर्शनी भागातील तळमजल्यावर दुकानांची रांग अन त्यांच्या मधोमध दरवाजा नसलेली एक भली मोठी लाकडी चौकट आहे. कधीकाळी इथे दरवाजा असणार, कारण कडी अडकवण्याच्या खाणाखुणा तिथं खाली जमिनीत अन वर छतात दिसतात. खाली सगळीकडे शहाबादी फरशा अंथरलेल्या मात्र प्रत्येक फरशीचे तुकडे उडालेले अन त्या तुकड्यातून डोकावणारी मातकट जमीन यावरून माणसे येजा करत राहतात, लोक खाली बघत आत येत नाहीत तर त्यांच्या नजरा इतस्ततः खिळलेल्या असतात त्यामुळे ते खाली गटारगंगा वाहत असली तरी त्यातून खुशाल पुढे चालतच राहतात. इतरत्र आढळतात तसे जागोजागी पान खाऊन थुंकलेले जिने, रंग उडालेला बाह्य भाग अन दाटीवाटीने लावलेली वाहने, पाण्याचे गळके फुटके नळ, मोऱ्यात पडलेली शाम्पूची, गुटख्याची अन नको त्या गोष्टींची वेष्टने अशा कबाडखानी अंगणाच्या या इमारतीची खासियत तिथल्या उजव्या दिशेतील चाळवजा भागात होती. अख्ख्या कामाठीपुरयात बच्चूची वाडी आणि आशियान्याच्या चार पैकी या भागातील इमारतीत नाचगाणे चालते, ते पण असे की जिथे अंगाला हात लावून घेतला जात नाही.

तर या दर्शनी दरवाजातून आत आले की उजव्या हाताची जी चाळवजा बाजू आहे त्यातल्या चौथ्या मजल्यावर राहायची हिराबाई. ती मुळची बहादूरपूरची. जिल्हा मुरादाबाद, युपी तिचे मूळगाव होते. तिथंच जवळ असणाऱ्या एका वाडीवर ती आपल्या लहानशा परिवारात समाधानात गेलेलं...एकदा शेतात आई बरोबर कामावर गेली असताना गोफणीतून फेकेलेला दगड तिच्या डाव्या डोळ्याला लागल्याने तिचा डावा डोळा तेंव्हापासूनच निकामी झालेला होता. तिला आणखी दोन लहान बहिणी अन एक भाऊ होता जो वयाने सर्वात लहान होता. या चारही मुलांचे शिक्षण करणे तिच्या वडिलांना त्या कठीण काळात अशक्य होते. शिवाय त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची होती. लहानग्या हिराचा एक डोळा गेला आणि चौथीतच तिची शाळा तुटली. हिरा खरे तर अभ्यासात हुशार होती मात्र डोळा गमावल्याने तिला घरी बसण्याची वेळ आली. हिराचे वडील कृष्णभजन गायचे, गावोगावी जलशात जायचे एरव्ही कुणाच्याही शेतात रोजंदारीवर कामाला जायचे अन आई देखील पडेल ते काम करायची. हिराची शाळा सुटली अन गायन सुरु झाले. त्याचे कारण तसेच होते, हिरा अभिजात गोड गळ्याची, सुरेल आवाजाची देखणी मुलगी होती. शाळेत प्रार्थना वा राष्ट्रगीत गाताना तिला टेबलावर उभे केले जाई. हिराच्या वडिलांनी तिच्यातले हे गुण हेरून आपल्या बरोबर गायनाचे ठिकाणी तिला सोबत न्यायला सुरुवात केली. राधेची वा मीरेची पदे ती गाऊ लागली. तिचं गाणं सुरु झालं की समोरच्या माणसाची अक्षरशः ब्रम्हानंदी टाळी लागत असे !

एकदा हिराचे वडील तिला मुरादाबादमध्ये एका मोठ्या भजनसंध्येत घेऊन गेले, तिथे त्यांची गाठ पडली राघवशी. राघवने पहिल्याच भेटीत हिराच्या वडिलांवर आपली छाप उमटवली. त्याने त्यांचा पत्ता घेतला अन नंतर दोन चार वेळा त्यांच्या घरी देखील जाऊन आला. आपली सारी माहिती खोटी सांगून,नानाविध नाटके करून त्याने हिराला आपल्या गळास लावले. गरिबीने पिचलेल्या व वडिलांच्या असहायतेमुळे खचलेल्या हिराला त्याला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता. तिने होकार देताच राघवने काही दिवसातच हिराच्या घरासमोरच मांडव उभा करून त्याच्या सारखेच दोनपाच खोटे नातेवाईक गोळा करून त्यांची 'बारात' तिच्या दारी आणली अन तो लग्न करून तिला तिथून घेऊन गेला तो कायमचाच ! या दिवसापासून हिराच्या आयुष्यात कायमचा अंधार झाला. तिची एका डोळ्याची दृष्टी गेली तेंव्हा तिला सावरायला, हात दयायला तिचं सारं कुटुंब एक झालं होतं. आता तिच्या ताटात जे वाढून ठेवलं जाणार होतं त्यातून बाहेर काढायला तिचा कृष्णसखाही येणार नव्हता कारण हे घोर कलियुग आहे !

राघव हा एक अट्टल दलाल होता. गरीब, नडलेल्या, असहाय मुली जाळ्यात ओढून त्यांना मुंबईत आणून विकायचं त्याचं कामच होतं. त्याने हिराशी विवाह केला आधी आपल्या घरी घेऊन गेला, तिथं तिला मनसोक्त कुस्करून झाल्यावर त्याने तिला एके सकाळी आपण मुंबई बघायला जाणार आहोत असं सांगितलं. ज्या मुंबईबद्दल आपण ऐकलं आहे त्या शहराला आपण भेट दयायला जाणार या कल्पनेने ती हरखून गेली. तिला वाटले, 'आपला नवरा आपल्यावर किती मनापासून प्रेम करतो ! खरेच आपण धन्य आहोत !'...दोनेक दिवसात हिराला घेऊन राघव मुंबईला आला. मुंबईला येण्यापूर्वी हिराने आपल्या आईवडीलाना लिहिलेले पत्र त्याच्याकडे टपालपेटीत टाकण्यासाठी दिले. पण त्याने ते फाडून फेकून दिले अन तिला टपालपेटीत सांगितल्याचे खोटे सांगितले. ती बिचारी त्याच्या शब्दावर विश्वास टाकून त्याच्यासवे मुंबईस आली. राघव अन हिरा मुंबईत आले ते साल १९७७ च्या आसपासचे असावे. ऐन मध्यरात्री ते रेल्वेने मुंबईत उतरले. आल्याबरोबर राघवने तिला 'आपण पूर्वी इथं नोकरीस असल्याची' थाप ठोकत थेट कामाठीपुऱ्यातल्या गल्लीत आणले. ते तिथं आले तेंव्हा रात्र उतरणीला लागली होती, रस्ता उजाड झाला होता अन त्या अरुंद गल्ल्यात तिथल्या अभागी स्त्रियांच्या उमाळ्यांशिवाय काहीही नव्हते, नाही म्हणायला काही दारुडे इतस्तताः लोळत पडले होते अन त्यांच्या वळचणीला भटकी कुत्री अंगाची वळकटी करून बसली होती. सारया परिसरात वेदना आणि उन्माद यांचा एकत्रित हुंकार भरून राहिला होता, तिथले भगभगते पिवळे दिवे आणखी भयाण वाटत होते. आसपासची छोटी मोठी दुकाने, टपरयादेखील बंद झाल्या होत्या, जणू कुणालाच तिथल्या बायकांचे कन्हणे ऐकायचे नव्हते. त्या रात्री राघव तिला घेऊन थेट 'जमुनाबाईच्या बिल्डींग'मध्ये घेऊन आला.
बहुधा तो येणार याची जमुनाला खबर असावी कारण त्याने दोनेक वेळा दार वाजवताच स्वतः पुढे होऊन तिने दार उघडले. दार उघडून त्याला कोपरयातील खोलीकडे जाण्याचा इशारा केला. त्या सरशी पडत्या फळाची आज्ञा गोड मानून राघव सरासरा त्या खोलीकडे निघाला.

ती अरुंद भयाण गल्ली अन तिथल्या एकेमेकाच्या अंगचटीला आलेल्या कोंदट इमारती अन त्यातील त्या कोंबडयाच्या खुराडयासारख्या खोल्या बघून खरे तर हिरा भांबावून गेली होती, मात्र तिचा तिच्या नवरयावर पूर्ण विश्वास होता. त्या अरुंद खोलीत सामान टाकल्याबरोबर त्याला बिलगत तिने 'आपल्याला फार भीती वाटत असल्याचे' सांगितले. 'एक रात्रीचा प्रश्न आहे, उद्या आपण मित्राच्या खोलीवर राहायला जाणार आहोत तेंव्हा फार काळ इथं काढावा लागणार नाही' असं तिला सांगून प्रवासाने थकलेले ते दोन्ही जीव तिथेच झोपी गेले. भल्या पहाटे ती गाढ झोपी गेल्याची खात्री होताच राघव आपल्यासोबत आणलेली पिशवी घेऊन बाहेर आला अन त्याने हलकेच जमुनाबाईचे अर्धउघडे असलेले दार आत लोटून तिच्या खोलीत प्रवेश केला. तिच्याशी दबक्या आवाजात बोलत, हातावर हात देत ठरलेली रक्कम घेऊन त्याने तिथून पोबारा केला. राघव तिथून नुसताच निघून गेला असे नव्हे तर राघव हिराच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला मात्र तिच्या आधीच अंधकारलेल्या आयुष्यात नरकयातनांची काळरात्र कायमची टाकून गेला.......

दुसऱ्या दिवशी सकाळ होताच हिराला काय होतंय हेच लवकर उमजले नाही, ती जागी झाल्याची बातमी जमुनाच्या कानी गेल्यावर ती तिला बघायला त्या खोलीत आली अन हिराला पाहून तिने मोठ्याने बोंब ठोकली. हिरा एका डोळ्याने अंध आहे हे राघवने तिला सांगितले नव्हते. हिरा जरी नाकीडोळी छान असली तरी तिच्यातल्या व्यंगामुळे तिला कोणी गिऱ्हाईक हात लावणार नाही. फारतर 'एखाद दुसरा म्हातारा वा रोगी दरिद्री माणूस हात लावेल' असं पुटपुटत ती कपाळावर हात मारून घेऊ लागली. तिने हिराचा त्या दिवसापासून अनन्वित छळ सुरु केला. आजूबाजूचा परिसर अन त्या सारया बायका बघून भांबावून गेलेली हिरा धाय मोकलून रडत बसे. ना कोणाची ओळख न कुणी माथ्यावरून हात फिरवणारे ! कारण सगळेच दुःखी अन सगळेच वेदनेला सरावलेले ! दुःख कुणी कुणासाठी अन का करावे अशी तिथली अवस्था होती. आपल्या पतीने आपल्याला इथं आणून विकले याचा फार मोठा धक्का तिला बसला अन त्याही पेक्षा मोठा धक्का तिला त्या रात्री बसला. जमुनाने तिला रात्रीसाठी सजवण्याचा लाख प्रयत्न करून पाहिला. पुढच्या काही दिवसात उपाशी ठेवले, पाठीवर पोटावर चटके दिले, लाथाबुक्क्याने तुडवून काढले. खाणेपिणे बंद केले ! राघवचा राग देखील तिने हिरावरच काढला. गरीब असली तरी हिरा सुसंस्कृत घरातली होती, ती जमुनाचे असले घाणेरडे हुकुम कधीच ऐकणारी नव्हती. तिने जीव देण्याचा प्रयत्न करू नये म्हणून तिला पलंगाला बांधून ठेवण्यात आले होते. बघता बघता एक आठवडा असाच गेला. तिच्या कपड्यांची लक्तरे झाली होती, गोरयापान देहाची पार रया गेली होती. रडून रडून डोळे सुजले होते, हातावर पाठींवर मारहाणीचे व्रण पडले होते, ओठावर ठोसा बसल्याने ओठ रक्तबंबाळ होऊन फाटून सुजून गेले होते. त्या नंतरच्या दिवशी बहुधा नवरात्रीस सुरुवात झाली होती, बाहेरील आरतीचा आवाज ऐकल्यानंतर हीराला आपल्या गावाकडील कृष्णभजनांची आठवण झाली, आपले आईवडील आपली भावंडे आठवली अन तिच्या डोळ्याला धारा लागल्या. त्या दुःखावेगातूनच ती गाऊ लागली. माताराणीचे गाणे तिने इतक्या सुरेल आवाजात अन तन्मयतेने गायले की तिच्या आजूबाजूच्या खोलीतील मुली तिच्या भोवती येऊन उभ्या राहिल्या. तिचं गाणं ऐकून जमुनाबाई देखील तिथे आली. काही क्षण तिने मन लावून तिने गाणे ऐकले अन तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक आनंद ओसंडून वाहिला !

हिराचे गाणे ऐकून जमुनाबाईची चिंता मिटली होती. तिने तत्काळ एक निरोप पाठवून जुम्मनमियाला बोलावणे धाडले. तोपर्यंत हिराला दोरखंडातून मोकळे करून तिला खायला प्यायला दिले, मस्तपैकी कडक पाणी अंघोळीला दिले. अंघोळीला भरपूर गरम पाणी ही इथे एक चैनच मानली जाते. हिरा मात्र बुचकळ्यात पडली होती. काही वेळाने जुम्मनमिया तिथे आले. तो साधारण पन्नाशीचा माणूस असावा. डोक्यावर जाळीची टोपी अन रंगवलेले तांबूस केस, गौरवर्ण, भेदक घारे डोळे, स्थूल देह, मध्यम उंची अशा देहयाष्टीचा तो माणूस नवीन गायिकेला ऐकायला बेचैन झाला होता. आपल्याला जमुनाबाईने 'ताबडतोब निघून या, एक कमालीचा तोहफा आणला आहे' असं का सांगितलं असावं याची त्यांना फार उत्सुकता लागून राहिली होती. ते आल्याबरोबर जमुनाबाईने हीराला बोलावणे धाडले. घाबरत घाबरत हिरा त्यांच्या समोर आली. नाना शंका कुशंकांनी ती हैराण झाली होती. खरे तर तिच्यात उभे राहण्याचे सोडा, रडण्याचे देखील त्राण नव्हते. हिराला जुम्मन मियाच्या समोर बसवण्यात आले,तिचे सर्वांग थरथरत होते. जुम्मनमियाने तिच्याकडे डोळे भरून पहिले अन हलक्या आवाजात तिला म्हटले - "गाओ बेटी !"

त्यांच्या तोडून निघालेल्या त्या 'बेटी' या शब्दाने जणू तिचे काळीज चिरून टाकले, ती विद्ध होऊन गेली अन ओक्साबोक्शी रडत रडत जुम्मनमियाच्या कुशीत केंव्हा शिरली कुणालाच कळले नाही. तिला पाठीवर थोपटून जुम्मननी तिला गायला सांगितले.
"तुम अगर अच्छा गाओगी तो मै तुम्हारी मदद करुंगा, गाओ बेटी ! डरो नही !"
त्यांच्या या बोलण्याने जीवात जीव आलेली हिरा जरा सावरली अन तिने गायला सुरुवात केली. तिने सुरेल आलाप घेत मीरेचे भजन गायला सुरुवात केली -
"मैं बिरहिन बैठी जागूं; जगत सब सोवे री आली
दुल्हन बैठी रंगमहल में, मोतियन की लड़ पोवे....."
गाताना तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या अन तिचे गाणे ऐकून जुम्मनमियांच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू आले. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला,डोळे पुसले. 'आणखी काही वेगळे गायला येते का' याची चौकशी केली अन जमुनाबाईशी पुढील मसलत करण्यात ते दंग झाले. हिरा तिच्या खोलीत निघून आली. काय घडते आहे याचा तिला अंदाज आला नव्हता.

जमुनाबाईच्या इथून निघालेला जुम्मन थेट वाहिदाकडे आले. त्यांनी सारा किस्सा तिला बयान केला, ते ऐकताना तिचे डोळे विस्फारल्या सारखे वाटले. संध्याकाळ होण्याच्या आधी जुम्मन पुन्हा जमुनाकडे गेले व हिराला सोबत घेऊन तडक 'आशियाना'त आले ! हिरा अशा प्रकारे 'आशियाना'त दाखल झाली. हिराच्या सौंदर्याला वाहिदा भुलून बघत होती, तिच्या एका गमावलेल्या डोळ्याचे अस्तित्व तिच्या देखण्या चेहऱ्यात जास्त ठळक जाणवत होते. हिराला वाहिदाच्या समोर बसवण्यात आले अन पुन्हा गायला सांगितले गेले. तिने 'गिरधर के घर जाउं' हे आर्त भजन गायला सुरुवात केली अन सारे तिच्या गायनात दंग झाले. वाहिदाने त्या दिवसापासूनच तिला आपल्याकडेच ठेवून घेतले ते कायमचेच ! मात्र अर्थातच पूर्ण किंमत देऊन. जमुनाबाईने वाहिदाकडून हिराचा मोबदला वसूल करताना दोनपाच हजार जास्तीच वसूल केले होते. अशा रीतीने हिराची त्या बाजारात दुसऱ्यांदा विक्री झाली. एक अनमोल हिरा कवडीमोल भावाने पुन्हा विकला गेला !...मात्र एक झाले, हिराच्या एका अंध डोळ्याने तिच्या शरीराचे लचके तोडायचे वाचवले तर तिच्या गोड गळ्याने तिला पुन्हा इथेच अडकवले. पण पहिल्यापेक्षा तिची जरा बरी अवस्था इथे होती कारण वाहिदाच्या घरात फक्त नाचगाणे चाले तिथे वेश्याव्यवसाय नव्हता. त्यामुळे हिराची त्यातून सुटका तिच्या गोड गळ्यानेच झाली. हीराला वाहिदाने तिथेच तालीम सुरु केली, गुलाबभाई नावाचे या बदनाम गल्ल्यातले गायक तिला शिकवायला येऊ लागले. या गुलाबभाईनी तिच्या गायकीत फुलांचे सौदर्य भरले, अत्तरांचे गंध ओतले, शृंगाराचे कुंभ तिच्या गायकीत रिते केले, तिला खयाल शिकवले नानाविध चीजा शिकवल्या.

काही आठवडे गेले अन हिराचे पहिली पेशगी म्हणजे पहिले गाणे बजावणे सादर झाले. तिथे आलेले सगळे तिच्या गायकीवर फिदा झाले. वाहिदालाही पैसे वसूल होतील याची खात्री झाली. हिराला या काळात आपल्या गावाकडे पत्र पाठवावे असे वारंवार वाटू लागले, घरी आपली काळजी करत असतील असं वाटू लागले. तिने तिची सारी दर्दभरी कथा वाहीदाला ऐकवली व तिला परवानगी मागितली. तिथला पत्ता न देण्याच्या अटीवर हिराला पत्र पाठवायची परवानगी तिने दिली. हिरानेही घरी आपली काळजी करतील या हेतूने अन घरच्यांना आपल्या पायी त्रास नको म्हणून खोटे क्षेमकुशल कळवले. आता हिराला कामाठीपुरयात येऊन दीड महिना झाला होता अन एके सकाळी तिला उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली. वाहिदाने काय झाले असेल याचा अंदाज बांधत तिथल्या हकिमाला बोलावले. त्यानेही तेच निदान केले. हिरा गरोदर होती ! हिराच्या पोटात राघवचा गर्भ वाढत होता. वाहिदाने तिला पोट पाडायला सांगितले, धमकावून बघितले, सर्व उपाय करून बघितले मात्र हिरा बधली नाही. तिला वाटत होते की, 'आपण आपल्या माणसांपासून इतके दूर आहोत की कधी त्यांची पुन्हा भेट होणे संभव नाही...मग आपल्या रक्ताचे आपलेपण दाखवणारे, आपली काळजी करणारे कोणी तरी आपल्यापाशी भविष्यात असावे..' वाहिदाने तिला अटी घातल्या त्या तिला निमूटपणे मान्य कराव्या लागल्या. तिथून पोलिसांकडे जाणे सोपे होते मात्र पोलिस वापरून कोर्टात नेतात, तिथं चिल्लर पैसे दंड म्हणून भरले की सोडले जाते, पुन्हा रस्त्यावर नाहीतर सुधारगृह नावाच्या दुसऱ्या शोषणगृहात जावे लागते हे एव्हाना तिला कळले होते. सारे पर्याय बंद झाल्याने वाहिदा म्हणेन तसं वागण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. वाहिदाने अटी घातल्या होत्या की, 'मूल झाल्यावर आठवड्यात काम सुरु करायचे, मूल रडले तरी उठून जायचे नाही, दवाखाना वगैरे साठी बाहेर पडायचे नाही !'

यथावकाश हिराची प्रसूती झाली. तिने अत्यंत देखण्या मुलीला जन्म दिला होता. ती मुलगी तिचं विश्व बनून राहिली, तिलाच तिनं आपलं प्रेम मानलं, तिलाच आपलं ईश्वर मानलं म्हणून तिनं तिचे नाव ठेवले - 'ताजेश्वरी' ! .......ठरल्याप्रमाणे हिरा अकराव्यादिवशी मैफिलमध्ये गायला बसली. पण तिचे सारे लक्ष पोरीकडे असे. मुलीचे आर्त स्वर ऐकले की तिच्या पोटात कालवत असे. मग तिथल्याच कामवाल्या मौसीला तिने रात्री थांबवून घ्यायचे ठरवले. पोर तिच्या मांडीवर असे, ती रडली की दुधाची बाटली तोंडाला लावली जाई. तिचा आवाज शांत झाला की हिराबाई मन लावून गात असे.अगदी मुबारक बेगमचे 'हमरी अटरियापे' देखील ती मन लावून म्हणत असे -
"सांस में बुलाये बैठी, कहाँ गुम हुआ अंजाना
अरे अरे दिए रे जलाए रे जलाये, ना अटरिया पे आया परवाना
कौन सा तन हाय, बारमाये रे हमरी अटरिया पे, आजा रे सांवरिया...."
ती गात असताना समोर नाचणाऱ्या मुली देहभान हरपून जात, जुम्मनमिया तबल्यावर साथ देई तर साकीब हार्मोनियमवर असत. जुम्मनमिया सारी कमाई इथल्या एका बाईवर उधळून खुश असे तर साकिबचा इथल्या कुठल्याच बाईवर तिळमात्र विश्वास नव्हता. ढोलकी वाजवणारे सुजितदादा मात्र या सर्व लोकांपासून अलिप्त असत. आपण भले नि आपले काम भले अशी त्यांची वर्तणूक होती मात्र या सर्व लोकांचा हिरावर जीव होता अन लहानगी ताजेश्वरी या सर्वांची लाडकी होती. कधी कधी एखादे हौशी, कदरदान गिऱ्हाईक हिराबाईवर देखील दौलतजादा करून जात असे. हिरा ते पैसे आपल्या पोरीसाठी साठवे. काळ पुढे जात गेला अन ताजेश्वरी मोठी होऊ लागली. हिराने साठवलेल्या पैशातले काही पैसे घरी पाठवले तर वाहिदाचे तिच्या 'खरेदी'चे बरेच देणे तिने फेडले. तिने गावाकडे पाठवलेले पैसे तिच्या पाठच्या बहिणींच्या लग्नात कामाला आले. घरच्यांनी तिला लाख बोलावले तरी ती मानी स्त्री आपल्या घरी परत गेली नाही, मात्र आपला खुला हात तिने आकसता केला नाही...

इथे देखण्या स्त्रियांचे काय हाल होतात हे हिरा डोळ्याने बघत होती, अनुभवत होती म्हणून तिने ताजेश्वरी सहासात वर्षाची असताना तिला नाईलाजाने गाणं शिकवण्यास सुरुवात केली. तिची आईही तीच होती अन शाळाही तीच होती. वाहिदा वरवर गरीब वाटायची पण धोरणीही होती. जमीन अस्मान एक झाले तरी ती गिऱ्हाईकाला अंगचटीस येऊ देत नसे, त्यामुळे तिच्या अड्ड्यावर तशी माणसेच येत नसत. बघता बघता काळ पुढे निघून गेला हिराबाईचे केस हळूहळू पिकत गेले अन एका सकाळी ताजेश्वरी न्हाती धुती झाली तशी हिराच्या काळजात वीजा चमकल्या....ताजेश्वरी आईसारखीच समजूतदार होती, असल्या वस्तीत राहून देखील तिनं स्वतःचे शरीर जपले होते. आईच्या शब्दाबाहेर जायची तिची टाप नव्हती.

अन एके दिवशी आक्रीत झालं. बाजारात गेलेली वाहिदा अपघातात जागेवर मृत्यमुखी पडली. तिच्या घरातल्या सर्व लोकांवर आभाळ कोसळले. कारण वाहिदा हीच त्यांची ढाल होती. वाहिदाच्या पश्चात तिच्या अड्ड्याची मालकी तिच्या बहिणीकडे, शबनमकडे आली. तिच्यात अन वाहिदाच्या स्वभावात दोन धृवांचे अंतर होते. तिने घराचा ताबा घेतल्यापासून कस्टमरशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी तिथल्या पोरीबाळींना दम दयायला सुरुवात केली कारण तिला अधिकाधिक पैसे हवे होते. तिच्यासाठी हिराबाई ही 'काम की चीज' नव्हती. तिने राहिलेले पैसे टाकून हिराबाईला घर सोडण्यासाठी त्रागा सुरु केला होता. कमवलेले सर्व पैसे घरी पाठवून हिराबाई जाम फसली होती. शबनम दम खायला तयार नव्हती. तिने एक पर्याय समोर मांडला, "एक तर पोरीला धंद्याला लाव नाहीतर बाजारात उभी कर !"....या संकटकाळात शबनमने कामावरून काढलेले जुम्मनमिया पुन्हा तिच्या कामी आले. त्यांनी कोलकात्यात 'सोनागाछी'त त्यांच्या ओळखीच्या एका कोठ्यात गाणे बजावण्यासाठी ताजेश्वरीची सोय केली. तिथे त्याचा भाचा तबलाही वाजवायचा अन गायकीदेखील करायचा. मात्र तिथे राहण्यासाठी हिराबाईला परवानगी नव्हती अन एक डोळ्याने अंध असलेल्या चाळीशीच्या बाईला 'किंमत'देखील नव्हती. हिराबाई नाईलाजाने शबनमकडेच राहिली अन ताजेश्वरी कोलकत्याला गेली. जाताना मायलेकरे एकमेकाच्या गळ्यात जीव तोडून रडली. त्यांच्या दुःखात सामील व्हायला जगाकडे वेळ नव्हता, जग ज्यांना निव्वळ भोगवस्तू समजते त्यांचीही एक दर्दभरी दुनिया असते हेच मुळात जगाला ठाऊक करून घ्यायचे नसते.

ताजेश्वरी गेली अन हिराबाई खचून गेली, तिच्या गायकीतला जणू प्राण गेला. तिचे ख्याल चुकू लागले, तिचा ताल चकवा खाऊ लागला, श्वास अडकू लागला. चाळीशी पार झालेल्या हिराबाईला दवाखान्याची पायरी चढावी लागली. डॉक्टरांनी तिला तपासून मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. तिथं तिच्या सर्व तपासण्या झाल्या अन तिला घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. उपचारालाच नव्हे तर दोन वेळेचे अन्न घ्यायला आता हिराबाई महाग झाली होती तिथं दवाखाना कसा करणार हा प्रश्न आ वासून उभा होता. तिला समाधान एकच होते की ताजेश्वरी जिथे होती तिथेही देहविक्रय होत नव्हता. शिवाय जुम्मनमियाचा भाचा अजहर ताजेश्वरीसोबत लग्न लावून संसार थाटू इच्छित होता. ताजुने तसा संदेशा हिराबाईला पाठवला अन हिराबाईचा जीव खूप दिवसानंतर आनंदून गेला. तरीही एक अडचण होतीच, अजहरने तिथे काही पैसे उचल घेतले होते त्याची परतफेड करण्यासाठी काही रक्कम कमी पडत होती. त्या शिवाय तिथून निघता येत नव्हते. हा तिढा कसा सोडवायचा हे हिराबाईला सुचत नव्हते. तिने उसनवारी मागून बघितले, सावकाराची पायरी चढून बघितली. बॅंकेची दारे अशा लोकांसाठी कधीच उघडी नसतात कारण यांच्याजवळ स्वतःची ओळख नसते ना जामीन नसतो ना गहाण टाकायला काही ऐवज असतो ! शेवटी हिराबाईने काळजावर दगड ठेवून तो निर्णय घेतलाच. इतकी वर्षे देहाच्या बाजारात राहूनही जिने स्वतःचे पावित्र्य जपले होते तिने आपले शरीर कुणाच्याही आधीन केले. आपण असे न तसे लवकरच मरणार आहोत तर मग आपल्या लेकीच्या आयुष्याचे भले करून मेलो तर आपले जीवन कारणी लागेल हा एकच विचार तिने केला. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता काळ्याकभिन्न, आडदांड, राक्षसी, कुरूप, रोगीष्ट, दारुडया, नशेखोर, चरसी, वासनांध तरुणवृद्ध अशा कोणत्याही वखवखलेल्या गिधाडांच्या हाती तिने स्वतःला स्वाधीन केले. तिने तिचा आजार अंगावर काढला, दवापाणी तर चालूच केले नव्हते. तिची ही हकीकत कुणी तरी एनजीओ पर्यंत पोहोचवली. पण तोवर फार उशीर झाला होता. दोन महिने रात्रंदिवस एक करून हिराबाईने पैसा गोळा करून पोरीकडे पोहोच केला.मात्र हे पैसे कसे गोळा झाले याची तिला कानोकान खबर होऊ दिली नाही. पुढच्याच दिवशी तिची तब्येत खूप बिघडली तेंव्हा तिला केईएममध्ये दाखल केले गेले. बहुधा १९९८ चे ते वर्ष असावे. ती एक आठवडाभर दवाखान्यात होती, आता तिचे श्वास जड होऊ लागले होते. एव्हाना तिने ताजेश्वरीला तिच्याकडे बोलावणे धाडले होते. ती थेट इस्पितळातच आली, आईच्या गळ्यात पडून रडली. हिराबाईच्या डोळ्यातून मात्र आनंदाश्रू वाहत होते.पोरीचे लग्न बघता आले नाही मात्र या नरकातून तिची सुटका झाली याचा तिला आनंद होता. तिचा भावी जोडीदार सोबत पाहून तिचा जीव आणखी मोठा झाला....

त्या अंधारया रात्री आयुष्यभर संघर्ष करत जगलेल्या हिराबाईचे प्राण हलकेच निघून गेले. हॉस्पिटलमधील भिंती तेंव्हा गदगदून गेल्या होत्या, ती ज्या बिछान्यावर पडून होती तो तिचे कलेवर अंगावर घेऊन मूक रुदन करीत होता. तिचे कण्हणे ज्यांनी ऐकले होते त्या सर्व निर्जीव वस्तूंनी गहिरे उसासे टाकले होते. वारा सुन्न होऊन थबकला होता तर काळ्या आभाळातील कृष्णमेघ तिच्या आत्म्यासोबत दिक्कालाच्या पलीकडे निघून गेले. ताजेश्वरीचे काळीज विदीर्ण करून हिराबाई अनंताच्या प्रवासाला निघून गेली. ताजेश्वरीने आपल्या आईच्या चितेला अग्नी दिला तेंव्हा त्या स्मशानभूमीत चारच माणसे होती. ताजेश्वरीच्या दुःखात सामील जगाने का व्हावे असा प्रश्न मला जेंव्हा पडतो तेंव्हा मी जगाचा एक भाग असल्याची जाणीव अपराधी करून जाते. कामाठीपुरयातील हिराबाईच्या मोडक्या ट्रंकेतले सर्व जीर्ण साहित्य आपल्या बेगेत भरताना त्यात वीसेक राख्या आढळल्या तेंव्हा ताजेश्वरीचे श्वास अर्ध्यात राहिले, मग जुम्मनमियांनी तिला तिच्या आजोळची माहिती दिली. आपला संसार थाटण्याआधी आपण आपल्या आजीआजोबा हयात असले तर त्यांना भेटले पाहिजे हे तिने मनात पक्के केले. अन दुसऱ्याच दिवशी ती मुरादाबादकडे जाणाऱ्या रेल्वेत जोडीने बसली. ती गावाकडे गेली, तिला कळले की तिचे आजीआजोबा वारले होते मात्र हिराबाईचा भाऊ तिथंच होता. त्याने आता शेतीवाडी सुरु केली होती. ताजेश्वरीने आपल्या मामाला सर्व हकीकत सांगितली तेंव्हा त्याचे डोळे भरून आले. त्याला काय बोलावे ते सुचेनासे झाले. त्याने त्या राख्या उराशी कवटाळल्या, त्या दिवशी हिराबाईच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल.....

काही महिन्यातच ताजेश्वरीने अजहरशी लग्न केले. हे दांपत्य आता बनारसमधे राहते. त्यांचा संसार आता सुखाचा आहे. त्यांना दोन मुले अन एक मुलगी आहे. राम,रहीम आणि हिरा ही त्यांची नावं ! ताजेश्वरी गायनाचे तर अजहर तबल्याचे वर्ग घेतो. मुले चांगल्या शाळेत शिकायला आहेत. पण हिराबाईने अखेरच्या काळात पैसे कसे जमवले ते ताजेश्वरीला आजही कोणीही कळू दिले नाही. नाहीतर ती आयुष्यभर स्वतःला दोष देत बसली असती. हिराबाईच्या अखेरच्या काळात थोडीफार मदत केल्याने ताजेश्वरीने मला आधी तिच्या कोलकत्यातील घरी बोलवले होते तेंव्हा मोठया सुरेल आवाजात तिने "तुम आये तो आया मुझे याद गली में आज चाँद निकला जाने कितने दिनों के बाद गली में आज चाँद निकला..." हे गाणं गायलं होतं.

आता ताजेश्वरीचे पुन्हा निमंत्रण आहे. आता तिची मुलगी हिरा ही देखील गाणं गात्ये असं ती कौतुकाने सांगते. मला त्या हिराला मन लावून ऐकायचे आहे. मला वाटते या नवतरुण हिराच्या मुखातून ती सुरेल गळ्याची अभूतपूर्व स्वर्गीय गायिका हिराबाईच गाणं गात असणार, तिची अर्धी राहिलेली गायकी गाण्यासाठी अन आपल्या सर्व आप्तेष्ठाना भेटण्यासाठी तीच परतून आली असणार...

मी जेंव्हा या हिराच्या समोर असेन तेंव्हा तिला हिराबाईचे आवडते गाणे गायला सांगेन अन ती गात असेल तेंव्हा अर्थातच माझे डोळे ओलावले असतील, हिराबाईच्या दुर्दैवी आयुष्याच्या करुण गाथेने ते डबडबले असतील ...
"जमुना किनारे मेरो गाँव साँवरे आई जाइयो,
साँवरे आई जाइयो,साँवरे आई जाइयो |
जमुना किनारे मेरी ऊँची हवेली,
मैँ ब्रज की गोपीका अलबेली
राधा किशोरी मेरो नाम........"

आताही हे गाणं मी ऐकतोय अन आषाढातील तरल शाममेघात हिराबाईची मनस्वी तस्वीर हळूच तरळून जात्येय ...

- समीर गायकवाड.

(सूचना- मूळ घटनेतील व्यक्तींची नावे बदलली आहेत. यामागील लेखन हेतू या स्त्रियांचे दुःख वेदना समाजासमोर मांडणे हा असून, त्याबद्दल कुणाला आपत्ती वा हरकत असल्यास ते मला अन्फ्रेंड वा ब्लॉक करू शकतात, लेख शेअर करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही मात्र तो नावासहित शेअर केल्यास मला जास्त समाधान वाटेल. एनजीओसाठी काही योगदान दयावे वा सहभाग नोंदवावा असे वाटत असेल तर www.preranaantitrafficking.org येथे भेट दयावी )

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_28.html

hirabai.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्वस्थ करतं तुमचं लिखाण!
समाजाची संपूर्ण काळी, अंधारी बाजू दाखवत आहात.

नेहमी सारख......
निशब्द........

हे जग भयाण आहे. किमान हा लेख सुखांत आहे, इतर ज्या वळणावर संपतात ते असह्य असते.

हमरी अटरिया बेगम अख्तरचे म्हणुन प्रसिद्ध आहे. मुबारक बेगम यांच्या आवाजातले प्रसिद्ध असल्याचे ऐकले नाही. कदाचित टायपो असावा.

ह्या सत्यकथेचा शेवट जरा दिलासा देणारा आहे. एरवी तुमचे ह्या लेखमालेतले लेख वाचून पोटात ढवळून निघते.

मला भीतीच वाटते तुमचे लेख वाचायची. खूप खूप जड होऊन जातं सगळं.. अगदी आजूबाजूची हवाही. >> फार खरंय दाद.

तुमचे लेख वाचताना अजून खाली किती आहे हे सारखं बघितलं जातं. कारण काही चांगलं होतंय वाटताना कलाटणी मिळू नये असं मनोमन वाटत असतं.
ताजेश्वरीचं लग्न झालं आणि जेव्हा बघितलं खाली काहीच ओळी आहेत, तेव्हा फार बरं वाटलं.
आपलं जग भयानक आहे. हमरी अटारीया पे आणि सावरे ऐजय्यो डोक्यात रुंजी घालू लागल्यात.

मला भीतीच वाटते तुमचे लेख वाचायची. खूप खूप जड होऊन जातं सगळं.. अगदी आजूबाजूची हवाही >>> +१

सुखांत असला तरी त्या मागचे पीळ जाणवत राहतात.

जमुना किनारे मेरो गाँव साँवरे आई जाइयो >>>> काय आठवण गाण्याची! हल्लीच लाईव्ह ऐकलंय एका कार्यक्रमात.

तुमचं लिखाण एक अजब चीज आहे.....

आधी वाचायचंच नाही असे मनाशी ठरवतो. पण मग राहवतच नाही आणि वाचले जातेच. मग खूपवेळ - कधीकधी काही दिवस - मन खूप अस्वस्थ असते. नुसतं वाचून माझी ही अवस्था तर ते भोगलेल्यांची काय अवस्था झाली असेल ह्या कल्पनेनेच थरकाप उडतो.

कशाला म्हटलं हीराबाईने साँवरे आई जाइयो? माहीत नव्हतं का तिला की त्याचं 'यदायदाहि ....' फक्त एक वचन होतं? प्रत्यक्षात न उतरणारं? खूप आवडती चिज आहे ...अनेकदा ऐकतो. पण आता ऐकेन तेंव्हा डोळे कोरडे ठेवणे जमणार नाहीये.