'तू प्यार का सागर है...'च्या गीत रसग्रहणच्या निमित्ताने मी तुम्हाला नेतोय थेट ६१ वर्षे मागे ...
येणार का माझ्या बरोबर या अर्थपूर्ण गाण्याची कथा ऐकायला ?
चला तर मग .....
कृष्णधवल हिंदी सिनेमांच्या सुवर्ण इतिहासातले रुपेरी नाव म्हणजे 'सीमा'. माझा जेंव्हा जन्मही झाला नव्हता, तेंव्हाचा हा सिनेमा..१९५५चा हा सिनेमा मी आवर्जून डीव्हीडी आणून घरी पाहिला, कारण यातील 'तु प्यार का सागर है' हे अजरामर गाणे. हे गाणे मी यु ट्यूब वर बरयाच वेळा पाहीले, ऐकले अन दरवेळेस अनामिक शांतता मनाला मिळत गेली. बालपणी फाटक्या कपड्यात शेजारयांच्या घरी जाऊन हा सिनेमा एका रविवारच्या सांजेस दूरदर्शनवर पाहिल्याचे आठवत होते. पण सिनेमा कथानकासह आठवत नव्हता.... आज पाहू, उद्या पाहू करत करत बराच काळ निघून गेला अन मागच्या आठवड्यात जावेद अख्तर यांच्या तोंडून 'सीमा' बद्दल काही फिल्मी किस्से ऐकले आणि जिज्ञासा अधिक चाळवली. परवाच्या रविवारी अगदी आवर्जून 'सीमा' पाहिला.
बलराज साहनी आणि नुतन यांचा नितांत सहजसुंदर अभिनय. जोडीला मनाचा ठाव घेणारी, काळजाच्या कप्प्यात घर करून राहणारी पण साधी सरळ कथा. हे या सिनेमाचे वैशिष्ट्य. अत्यंत उमदे कथानक ; पवित्र आणि मुक प्रेमाची मर्मस्पर्शी कथा आहे. एका पेक्षा एक कर्णमधुर गाणी म्हणजे दुधात साखर. मनात सदा रुणझुणणारे अन मध्येच नकळत डोळे ओले करून जाणारे शांत पण नादबद्ध संगीत हा या सिनेमाचा प्लस पॉइंट . या सर्वावर कडी म्हणजे आत्म्यालादेखील तल्लीन व्हायला लावणारा मन्ना डे चा धीरगंभीर आवाज. एखादा ध्यानस्थ ऋषी अनामिक एकांत स्थळी जपमाळ ओढत बसलेला आहे अन त्याच्या अंतर्धान पावलेल्या अवस्थेतही एक गूढ हुंकार त्याच्या मुखातून निघत असल्याचा भास मन्ना डेना ऐकताना होतो. त्यांच्या 'तू प्यार का सागर है ...' मध्ये इतकी ताकद आहे की पहिल्यांदा ऐकणारा देखील दंग होऊन जातो !
शैलेन्द्रने लिहिलेले तु प्यार का सागर है हे गाणे प्रेमगीत नसून भजन आहे असे काही समीक्षक सांगतात. मला तर ती विराणी वाटते. एका अनामिक ओढीने आतुर झालेल्या संयमित मनाच्या माणसाने आपल्या प्रतिभेला पंख लावून प्रेमाच्या दुनियेत फिरताना त्याला जाणवलेले दुःख प्रत्येक शब्दात आपली व्यथा सांगून जाते.
चित्रपटाचे नावच 'सीमा' आहे. सीमा म्हणजे मर्यादा. जगण्याच्या आणि प्रेमाच्या सीमा पण त्या समाजाच्या अन मनाच्या कंगोरयातून या सिनेमात व्यक्त झाल्यात. साठच्या दशकातील या सिनेमात तत्कालीन आदर्शवादाला अभिप्रेत अशी राजहंसी देखणी पटकथा आहे. आशय सांगायचा झाला तर गुरु आणि शिष्या यांच्या प्रेमाच्या रंगाला सामाजिक बंधनाची मर्यादा येते. अत्यंत अबोल, अगतिक आणि पवित्र असे हे प्रेम दोन मनांच्या आंतरिक मर्यादेत राहून सर्व सामाजिक बंधने स्वीकारून मनाच्या कोशातच राहते....
गौरी ही अनाथ मुलगी काशिनाथ काकाच्या घरी काकूसोबत राहते. धुणी-भांडी करून काका-काकूचे घर चालवते. पण काकू तिला खुप त्रास देते. तिच्यावर डोळा ठेवणारा मवाली, ती वश होत नाही म्हणून तिच्यावर हाराच्या चोरीचा आळ आणवतो. पोलीस तिची रवानगी महिला सुधारगृहात करतात. गौरीला अन्यायाची चीड असते. ती सुधार गृहात देखील स्वतःला अबला आणि दयनीय, लाचार अवस्थेत पाहू शकत नाही. तिला कोणाचेही ऋण अन कोणाचेही अत्त्याचार सहन होत नाहीत. सुधारगृहाच्या चालकाला गौरी गुन्हेगार नसल्याची खात्री पटते. गौरी निरपराध असल्याचे सिध्द झाल्यावर ते तिला आपल्या सहाय्यकाशी विवाह करण्याचा सल्ला देतात. ती सुधारगृहातून पळून जाते अन खरया गुन्हेगाराला बांकेलालला शासन करते. त्या नंतर तिचे मन पुन्हा सुधारगृहाकडे ओढ घेते. पण यावेळेस प्रेम तिच्या मनात जागृत झालेलं असते. माणसाची अचूक पारख करणार्या सुधारगृहाच्या चालकातच तिला आपला जीवनसाथी दिसतो.
चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य असे आहे की नाजूक शरीर प्रकृतीचे हृदयविकारग्रस्त अशोक (बलराज साहनी ) आपल्या हातातली आधाराची काठी टाकून देतात अन त्याचा आधार होते गौरी (नूतन ). अनेक रूपके वापरून या सिनेमात स्त्रीच्या सामाजिक जाणीवा अन तिच्यावर समाजाने टाकलेली बंधने यावर मार्मिक भाष्य समोर येत राहते . एखाद्या तरल कवितेसारखा सिनेमा नजरेतून काळजात येउन विरघळून जातो. अमेय चक्रवर्तीचे दिग्दर्शन आहे, एकापेक्षा एक संथ फ्रेम त्यांनी सिनेमात वापरल्या आहेत पण सिनेमाला गती आहे.
सिनेमात मोहम्मद रफीजींच्या आवाजातली दोन गाणी आहेत 'कहाँ जा रहा है तू ऐ जाने वाले' आणि 'हमें भी दे दो सहारा कि बेसहारे हैं' पण शंकर-जयकिशननी 'तू प्यार का सागर...' मन्ना डे ना गायला लावले. त्यांनी असे का केले असेल याचे उत्तर मन्ना डेंच्या गायकीत आहे. त्यांच्या आवाजातली सांस्कृतिक छटा, वैराग्य, विरानीने भरलेली आर्त साद आहे. एखाद्या ऋषिच्या चेतने सारखे आर्यतत्व त्यात आहे . कथा आणि पात्र या दोहोना न्याय देण्याची परिपूर्ण क्षमता त्यांच्या आवाजातच आहे. हे गाणे प्रणयगीतही आहे अन प्रार्थनाही आहे. बलराज साहनी हे गाणे नूतन साठी म्हणतात पण गाण्याच्या फ्रेममध्ये नूतन पार्श्वसंगीतात तरळून जाते. पण गीतांच्या पंक्तीत तिला स्थान नाही. परमात्मा जो दिसत नाही ज्याच्या भेटीची आपण मनीषा बाळगतो त्याची आर्त आर्जवे या गाण्यात आहेत. भिंतीआड लपलेल्या नूतनसाठीच बलराज हे गाणं गातात मात्र त्यांना माहिती नाहीये की ती लपून बसलीये अन काही वेळातच पळून जाणार आहे ! एका नायकाने शेवटपर्यंत अव्यक्त केलेलं प्रेम एका विराणीच्या रुपात ऐकताना मन भरून येतं. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही की मोठा वाद्यवृंदाचा आवाज नाही. म्हणूनच हे गाणे हिंदी सिनेमातील एक सर्वोत्कृष्ठ पवित्र आणि अविस्मरणीय गाण्यांपैकी एक आहे.
गाण्याच्या सुरुवातीला सुन्न शांतता आहे. हळू हळू एकल वाद्य चढत्या आवाजात वाजत राहतात, मागून हळुवार घुमत जाणारा समुद्राच्या तळाची खोली असणारा मन्ना डें चा आवाज कानावर येत राहतो…. मनातली मलीनता, सर्व तर्क वितर्क, स्वार्थ आणि पाप पुण्य याच्या सर्व वेदनाना हात घालत करुण स्वरात गाणे हळू पुढे सरकत राहते. समोर पडद्यावर बलराज साहनी एका खुर्चीत बसलेले. त्यांच्या पायाशी त्यांची लाडकी छकुली आणि त्यांच्या आजूबाजूला सुधारगृहातल्या लहान मुली आणि महिला इतकेच दृश्य. पण गाण्यातला अर्थ ह्या दृश्याच्या संथतेला पोषक असल्याने कोठेही खटकत नाही....तू प्यार का सागर हैं या ओळीतला दर्द आपल्याला भिडतो. तू प्रेमाचा समुद्र असलीस तरी मी तुझ्या एका थेंबासाठी तहानलेला आहे. तरीही तुझ्या दारातून मी माघारी फिरणार आहे. तुझ्या मार्गातून मी पाय काढता घेणार आहे, (तेंव्हा तू जास्त चिंतित होऊ नकोस) पण मी तुझी तक्रार करणार नाही.
तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है
तेरी एक बूँद के प्यासे हम,
तेरी एक बूँद के प्यासे हम,
लौटा जो दिया तूने, लौटा जो दिया तूने,
चले जाएँगे जहाँ से हम, चले जाएँगे जहाँ से हम
तू प्यार का सागर है...हम। तू प्यार का सागर है।
या गाण्यातला कोरस शेवटपर्यंत कानाला सुखावह आहे. ....
या गाण्यातील प्रत्येक शब्द म्हणजे नवागत माणसासाठी धडे आहेत, शब्दांचे उच्चार कसे असावेत अन हुंकाराचे कोरस कसे असावे हे या कडव्यात जास्त अधोरेखित होते. घायाळ मनाचे वेडे प्रेमपाखरू आता इथे एक क्षणासाठी थांबायला तयार नाहीये, त्याला स्वतःचाच उबग आलाय. त्याला आता पैलतीराकडे उडून जायचेच ! त्याचा प्रवास अवघड आहे कारण त्याचे पंख नाजूक अन त्याची नजर धूसर झालीय पण पैलतीराकडे हे पाखरू नक्की जाईल कारण त्याची इथे थांबण्याची (जगण्याची) उम्मीद पूर्ण नाहीशी झालीय. किती अर्थपूर्ण ओळी आहेत या ! करुणरसाने ओथंबलेल्या या ओळी मन्नाडेनी आपल्या ओठी अशा काही घोळवल्यात की त्यासम दुजा न कोणी हे तत्काळ पटावे !
घायल मन का पागल पंछी,
उड़ने को बेकरार, उड़ने को बेकरार,
पंख हैं कोमल, आँख है धुँधली,
जाना है सागर पार
अब तू हि इसे समझा, राह भूले थे कहां से हम
तू प्यार का सागर है ...
या कडव्यातली 'जाना है... पार' ही ओळ मन्नाडेनी अशी काही आर्त सूर चढवून म्हटली आहे की मन तृप्त आणि अधीर होऊन जाते. हे गाणे जे यु ट्यूबवर पाहतात त्यांना देखील कळून चुकते की हे एक दर्दभरं आर्जव आहे ज्यात गीतकाराने विरहाच्या वेदना शब्दातून जिवंत केल्या आहेत. पण चित्रपट पाहताना संवेदनशील प्रेक्षकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा कधी वाहू लागतात त्यालाच कळत नाही.
एकीकडे आयुष्य तसेच बोजड, नीरस होऊन राहिलं आहे अन दुसरीकडे लोभसवाणा वाटणारा अन कवेत घ्यायला तयार असणारा मृत्यू हात पुढे करून उभा आहे. मला कोडं पडलंय की आता नेमकं कुठं जावं ? पण हे न कळण्यामागचे खरे कारण हे आहे की जन्ममृत्युच्या नेमक्या सीमा कुठे आणि कशा आहेत हेच कुणाला माहिती नाहीये ! हे कोडंच मला जीवघेणं वाटतेय ! (हे प्रिये )माझी तुला विनंती आहे की तू माझ्या कानात गुंजारव करून सांगावंस की मी कुठल्या दिशेने यावं ! गाण्याच्या शेवटच्या ओळीत सारं सूत्र बदलून टाकले आहे. आधी तो तिच्यापासून दूर जाण्याची भाषा सर्व ओळीत करतो पण शेवटच्या ओळीत तो गृहीत धरतो की ती ज्या दिशेला आहे त्याच दिशेला तिनेच बोलवावे ! "जाएँ कौन दिशा"च्या ऐवजी तो तिला विचारतो "आएँ कौन दिशा .." यात त्याचा तिच्यावरचा आत्मीय विश्वासच प्रकट होतो.
इधर झूमके गाए जिंदगी,
उधर है मौत खड़ी, उधर है मौत खड़ी
कोई क्या जाने कहाँ है सीमा,
उलझन आन पड़ीऽऽऽ
उलझन आन पड़ी
कानों में जरा कह दे,
कानों में जरा कह दे,
कि आएँ कौन दिशा से हम,
कि आएँ कौन दिशा से हम
तू प्यार का सागर है
तेरी एक बूँद के प्यासे हम
तेरी एक बूँद के प्यासे हम।
तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है)
संपूर्ण गाण्यात बलराज साहनींच्या मांडीवर आपला डावा हात ठेवून स्वतःला सुरक्षित अन प्रेमाच्या सावलीत असल्याचा अनुभव घेणारी भावूक चेहऱ्याची चिमुरडी अन हळुवारपणे तिच्या केसांतून हलकेच आईच्या मायेने हात फिरवणारे बलराज साहनी पाहिले की गलबलून येतं !........
गाणं संपतं आणि त्या खोलीत एक अजब अशी शान्तता रेंगाळत राहते जी ऐकणारयाला आणि पाहणारयाला जाणवते. बलराज साहनी ज्या पद्धतीने रेलून खुर्चीत बसलेले असतात त्या पद्धतीने आपल्याला गाणे संपल्यानंतर मनावरचे ओझे उतरल्यागत हलके वाटू लागते….
गाण्याची आणखीन एक कथा म्हणजे बलराज साहनींच्या तारखा संपल्या होत्या अन त्यांना विमानाने कोलकत्यास जायचे होते. शुटींग होते अंधेरीला. दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांना विनंती केली आणि तीन तुकड्यात विदाआउट रीशूट करता काही तासात गाणं चित्रित केलं गेलं ...थकलेला अशोक संपूर्ण गाणं खुर्चीत बसून गातोय आणि कोरससाठी बसलेली मुले तशीच त्या क्रमात काही तास बसून राहिली अन गाणं पूर्ण झालं ...एक माणूस खुर्चीत बसून गातो असं अजब चित्रीकरण करून देखील हे गाणं कुठंही ऑड वाटत नाही कारण या गाण्याचे आर्त भावमग्न बोल ! ....गाणं पूर्ण होताच अत्यंत घाईने बलराज तिथून निघून गेले अर्थातच त्यांची फ्लाईट मिस होता होता वाचली ...गाण्याच्या दृश्यात अशोकच्या डाव्या बाजूला हार्मोनियम वाजवत बसलेली मुलगी म्हणजे आपली मराठी मुलगी शुभा खोटे आहे ...ती या सिनेमाच्या वेळेस मोजून 'सोळाव्या'त प्रवेश करती झाली होती ...तिचं सिनेमातलं नाव पुतळी ! ती अशोकची मदतनीस असते ....दुर्गाबाईंची ही पुतणी कायम उपेक्षित राहिली ...तिचं talent कुणी जाणलंच नाही ..सिनेमा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी अन समीक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले. 'सीमा'साठी नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर मिळाले होते तर अमेय चक्रवर्तींना सर्वोत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर मिळाले होते...
किती अर्थपूर्ण शब्द आणि किती गेयता आहे या गाण्यात ! शैलेन्द्र, शंकर जयकिशन आणी मन्नाडे यांचे हे गाणे या आशयघन शब्दरचनेमुळेच हिंदी चित्रपट गीतातील अजरामर गाणे ठरले आहे. आपली पवित्र प्रेम भावना आणि प्रार्थना यांचा सुरेख मेळ घालणारे ६० वर्षापूर्वीचे हे आर्त गाणे एकदा जरी ऐकले तरी मनाच्या पटलावर कोरले जाते ते कायमचेच यातच सर्व येते. कधी मनावर निराशेचे मळभ दाटून आले किंवा आपण कुणाकडून फार अपेक्षा केल्या अन समोरच्या व्यक्तीने त्या पूर्ण केल्या नाहीत तर हे करुणगीत ऐकले की मणामणाच्या शृंखलांचे दडपण कमी होते. मन ताजे तरतरीत होते अन आणखी धक्के, धोके पचवायची ताकद मनात अन मनगटात येते..........
माझा जन्म देखील या सिनेमाच्या काळात झाला नव्हता पण मी आवर्जून असे सिनेमे अन अशी गाणी पाहतो कारण काही रत्ने, हिरे, माणके भूतकाळाच्या ढिगाऱ्याखाली दडून पडलेली असतात पण त्यांच्या साह्याने आपला वर्तमान अन भविष्य सुकर होते हे नक्की ! तर पाहणार ना हे गीत ? पाहणार ना हा सिनेमा ? आपल्या वाडवडिलांनी देखील हा सिनेमा पाहिला असेल, अन सिनेमा पाहताना त्यातल्या बलराज साहनीच्याजागी स्वतःला पाहिले असेल अन नूतनच्या जागी त्यांची जी कोणी मनोनीत प्रियतमा होती तिला पहिले असेल. न जाणो त्यांनी देखील हे गाणं पाहताना डोळ्यावरचा चष्मा पुसण्याच्या निमित्ताने आपल्या डोळ्याच्या ओल्या झालेल्या कडा हलकेच पुसून घेतल्या असतील .....
- समीरबापू गायकवाड.
सुंदर लेख. हे गाणं पण खूप
सुंदर लेख.
हे गाणं पण खूप सुंदर आहे.
सुंदर लेख!
सुंदर लेख!
सुंदर गाण्याविषयी तितकाच
सुंदर गाण्याविषयी तितकाच सुरेख लेख.
सीमा- बलराज साहनी आणि नूतन केवळ अप्रतिम.
शुभा खोटे यांचीही भूमिका खूप छान होती.
छायागीतात नेहमी हे गीत
छायागीतात नेहमी हे गीत पाहायचो. बलराज सहानी अफाट अभिनेता, मन्ना डे चा आवाज ह्या विशिष्ट गीतासाठी परफेक्ट! (किशोसॉफी नावाचा एक लेख लिहायचे मनात आहे, बघू कधी जमते ते, उगाच आपली जाहिरात, पण काही गीतांसाठी रफी नाहीच शोभत).
पूर्वीच्या चित्रपटांत जीवनमूल्ये अधिक सशक्ततेने भेटत. हे गीत प्रेयसीला उद्देशून असू शकते हा अॅन्गल ह्या लेखामुळेच प्रथम मनात आला, अजून पचलेला मात्र नाही.
मस्त लिहिलय. माझा आवडता
मस्त लिहिलय. माझा आवडता सिनेमा असल्यामूळे अधिकच आवडले.
सुंदर गाण्याविषयी तितकाच
सुंदर गाण्याविषयी तितकाच सुरेख लेख>>>> +१
अप्रतीम गीत आणि लेख! मन्ना
अप्रतीम गीत आणि लेख!
मन्ना डे चा आवाज ह्या विशिष्ट गीतासाठी परफेक्ट! (किशोसॉफी नावाचा एक लेख लिहायचे मनात आहे, बघू कधी जमते ते, उगाच आपली जाहिरात, पण काही गीतांसाठी रफी नाहीच शोभत). >>>>+११११
रफीच्या गुणांचा पूर्ण आदर आहे, पण या गाण्यात एक जी शांतता, वैराग्याची छटा आहे ती रफीच्या आवाजात नसती आली. या गाण्याला मन्ना डे चा आवाज सर्वथा योग्य आहे.
याच चित्रपटातील कहा जा रहा है हे गीत रफीने गायले आहे, ते मन्नाजींनी गायलं असतं तर अजून उंचावर गेलं असतं हे माझे वैयक्तिक मत.
छान लेख, गाणं तर आवडते होतेच
छान लेख, गाणं तर आवडते होतेच !
श्रवणीय गाणे आहे. सुरेख लेख
श्रवणीय गाणे आहे. सुरेख लेख आहे.
<<<<पूर्वीच्या चित्रपटांत जीवनमूल्ये अधिक सशक्ततेने भेटत. हे गीत प्रेयसीला उद्देशून असू शकते हा अॅन्गल ह्या लेखामुळेच प्रथम मनात आला>>>>++१
Chanach ahe lekha
Chanach ahe lekha
खुपच सुंदर लिखाण.
खुपच सुंदर लिखाण.
मस्त! मला फार आवडला होता हा
मस्त!
मला फार आवडला होता हा सिनेमा. नूतन कसली गोड दिसते यात. काही गोष्टी अगदी लक्शात रहाणार्या आहेत यात. ती चोरी चा आळ आणनार्याविरूद्ध बदला घ्यायला म्हणून जाते आणि त्याला बदडून परत पण येते. खूप कप-बशा एका वेळी सांभाळणारी आणि सायकल दामटोन हाकणारी शुभा खोटे पण आहे ना यात? नूतन (लता मंगेशकर) चं `मनमोहना' गाणं केवळ अप्रतिम! `सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी' पण छान. मनमोहना गाणं सुरू व्हायच्या आधी नूतन च्या आवाजातलं `मनमोहना' आहे. काय मस्त आवाज होता तिचा. नूतन साठी लक्षात राहिला हा सिनेमा.
मनमोहना गाणं आवडीचं आहेच पण
मनमोहना गाणं आवडीचं आहेच पण एक अनाथ, घरी धुणीभांडी करणारी गरीब मुलगी एखाद्या कसलेल्या गायिकेसारखी सतार छेडून, तानापलटे घेऊन हे शास्त्रीय संगीत गाईल हे पचनी पडणं जरा अवघड वाटतं! या शास्त्रीय रचनेऐवजी एखादं जरा साधं गीत नुसतं गाऊन दाखवलं असतं तर तिच्या भूमिकेला जास्त अनुकूल झालं असतं.
सुंदर लेख
सुंदर लेख