श्रावणस्वप्न!

Submitted by झुलेलाल on 2 August, 2016 - 12:33

बसमधून उतरून रेल्वे स्टेशनातल्या फलाटावर पोहोचण्यासाठी रस्ता क्रॉस करायची वाट पाहात असतानाच अचानक पावसाची एक सर अंगावरनं सरसरत पुढे सरकली, आणि 'श्रावणा'च्या जाणीवेनं मन क्षणभरासाठी सुखावून गेलं... उद्या श्रावणाचा पहिला दिवस... तसेही, श्रावणाची छटा मुंबईवर आजूबाजूला उमटत नाही. श्रावणाचा पहिला दिवस काही फारसं वेगळं रूप घेऊन येतो, असं इथल्या सिमेंटच्या जंगलात आजवर कधी जाणवलेलंच नाही. नेहमीचाच दिवस, कामाची गडबड, ट्रेनची गर्दी, बसच्या रांगा आणि डबे-पिशव्या सावरत गाडी पकडण्यासाठीची धावपळ... बारा महिन्यांच्या या कसरतींनी श्रावणाच्या या सरीचं अवघं अप्रूप खरं म्हणजे कधीचंच धुवून टाकलेलं. पण आजच्या या अवचित सरीनं मात्र मन कधीकाळच्या "श्रावणभरल्या' आठवणींनी भिजून गेलं, आणि ओथंबतच ते कोकणातल्या हिरव्याकंच गावात पोहोचलं...
धावातधावत गाडी पकडल्यानंतर गर्दीभरल्या गाडीत स्वतःला कसंबसं कोंबून टाकलं, आणि पावसाच्या सरीनं भिजलेल्या कपाळावर साचलेले घामाचे तेवढे थेंब रुमालाच्या टोकानं टिपत त्या आठवणींचा चित्रपट उलगडू लागलो...
गावाकडच्या श्रावणी सोमवारला तेव्हा दिसणारी सोनेरी उन्हापावसाची लोभस किनार आठवत मी लहानपणीच्या त्या दिवसांत पोहोचलो, आणि पहाटस्वप्नासारखा "तो' श्रावण मनात झिम्मा खेळायलापण लागला... कुठूनतरी रानातल्या गुराख्याच्या वेळूचे गिरक्‍या घेणारे स्वर कानात घुमायला लागले आणि मधूनच मोरा-राव्यांच्या कलकलाटाची साथ डोक्‍यात झिरपायला लागली... पावसाच्या शिडकाव्यासोबत पत्र्याच्या छपरावर वाजणाऱ्या ताशाच्या तडतडाटाचे आवाजही स्पष्ट झाले आणि एका उत्कट 'सणा'चा साज मनावर आपोआपच चढायला लागला...
त्या वेळी वर्षभरातल्या शनिवारची सकाळची शाळा श्रावणानं मात्र हवीहवीशी करून टाकली होती. 'संपत शनिवार'च्या प्रतीक्षेत वेळी शुक्रवारची रात्र पहाटेची वाट पाहातच संपायची आणि पहाटेच्या मंद उजेडात पसरलेला पाणचुलीचा खमंग धूर एका वेगळ्याच आनंदाचा भागीदार करून घ्यायचा. शेजारच्या काकूंकडे अभ्यंगस्नान करून नंतरचे वाटीभर दूध-गूळपोहे रिचवत दक्षिणेपोटी मिळालेली पावली खिशात मिरवताना, आपल्या कमाईचा आनंद मी शाळाभेर उधळायचो, आणि शेजारच्या वाडीतल्या गण्या संध्याकाळच्या चण्या-फुटाण्यासाठी दिवसभर मागेमागे करताना माझा जणू रक्षणकर्ता होत इतरांवर डाफरायचा... श्रावणाच्या त्या दिवसांतच बहुधा ऑगस्टही उजाडलेला असायचा... पंधरा ऑगस्टच्या प्रभातफेरीची आणि झेंडावंदनाची तयारी आणि प्रत्येक दिवसाच्या व्रतवैकल्यामुळे घरात साजरा होणारा श्रावणसण सगळ्या घरावरच उत्साहाचा गालीचा पसरायचा. सोमवारी गावाबाहेरच्या डोंगरशिखरावरच्या महादेवाच्या दर्शनाला गावातल्या लहानथोरांची रीघ लागायची आणि तो हिरवाकंच डोंगर लहानथोरांच्या कोऱ्याकोऱ्या कपड्यांच्या रंगीवेरंगी ठिपक्‍यांनी सजून, नटून गेलेला गावातून दिसायचा... संध्याकाळी दिवेलागणीच्या आधीच घराघरात शिजलेल्या जेवणाला त्या दिवशी फक्त 'प्रसादा'चीच चव असायची. शिखरावरच्या महादेवाच्या 'पुजारीपणाचा' मान सोमवारीच दिमाखानं मिरवणाऱ्या लिंगायत किंवा गोसावी गुरवाची त्या संध्याकाळी घराघरात प्रतीक्षा व्हायची, आणि त्याच्या टोपलीत प्रसादाचं पान पडलं, की मगच घराघरातल्या पंगती व्हायच्या...
मंगळवारचा दिवस म्हणजे अवघ्या गावाचा सण... उत्साहाचं भरतं घेऊन उजाडणारा मंगळवार त्या दिवशी मावळायचाच नाही... एखाद्या घराच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून गृहप्रवेश केलेल्या नवागत विवाहितेला गावातल्या अवघ्या महिलावर्गाची ओळख घडविणारा आणि त्यांच्यात समावून घेणारा हा मंगळवार, संध्याकाळी खऱ्या अर्थानं सळसळून जायचा... एखाद्या घरातल्या मंगळागौरीच्या पूजेची धांदल सगळ्या गावातल्या घराघरात सुरू व्हायची आणि रात्र सुरू होताच माजघरातल्या फुगड्या उखाण्यांच्या आवाजानं आख्खं गाव जागं राहायचं. घराबाहेरच्या पत्र्याच्या मांडवाखाली पेट्रोमॅक्‍सच्या बत्तीच्या झगमगाटात पुरुषांचं पत्ते कुटणं सुरू व्हायचं आणि फराळाच्या रिकाम्या होणाऱ्या ताटांसोबत रात्र सरकत राहायची... अंधारालाही मग जाग यायची. झोपलेला अंधार लपेटून सुस्तावलेले गावातले रस्तेही मध्यरात्रीनंतरची लहानमोठ्यांची वर्दळ न्याहाळत ताजेतवाने व्हायचे, आणि बुधवारचा दिवऽसभर पेंगुळल्यासारखे सुस्त पडून राहायचे. मंगळागौरीच्या जागरणानं त्या दिवशी गावातल्या घराघरातले डोळेही पेंगत राहायचे...
. नागपंचमीला नागाच्या मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी घराघरातल्या तमाम बालकसृष्टीची नुसती चढाओढ व्हायची, वर्षभरातल्या एखाद्या दिवशी नुसत्या चाहुलीनंदेखील अवघ्या गावाला अस्वस्थ करणारा हा पाहुणा त्या दिवशी पूजेचा मान मिरवत देवघराजवळची जागा पटकावायचा... संध्याकाळी घरामागच्या परसदारातल्या अळूच्या बनात मग त्याचं समारंभपूर्वक प्रस्थान व्हायचं...
... त्या दिवसांत अवघ्या गावाला पावसाच्या नव्यानव्या लहरींची ओळख व्हायची... गावाबाहेरच्या रानालगतच्या शेतातली भाताची पिकं पावसानंतरच्या सोनेरी उन्हांसारखीच चमकदार छटा पांघरून वाऱ्याबरोबर लाटांसारखी झुलायची, आणि शेताच्या बांधावरच्या तिळाच्या पिवळ्या फुलांची रांग त्या झुल्याला गडद झालर लावून तो सजवायची. घराबाहेरच्या झेंडूंना आणि मखमलीच्या फुलांना पिवळा-सोनेरी बहर आलेला असायचा, आणि गावाबाहेरच्या शेतांमधल्या दूधभरल्या पोटरीतल्या भाताच्या दाण्यांचा खमंग वास घेऊन गावात गिरक्‍या मारणाऱ्या वाऱ्यानं अवघा गाव दरवळून, परमळून जायचा. झोडपून काढणाऱ्या पहिल्या पावसात संतापल्यासारख्या तांबड्यालाल रूपानं फणफणत वाहणाऱ्या झऱ्या-पऱ्ह्यांचे प्रवाह निळाईनं भरलेलं निळं रूप धारण करून शांतपणे वाहायचे, आणि गावाबाहेरच्या डोंगरावरच्या हिरव्याशार गवतांचे गालिचे गायीगुरांना तृप्त करून सोडायचे... रात्रीच्या चांदण्यात गाईगुरांना घेऊन गावाबाहेरच्या कुरणात "पसारा' घालण्याचा तरुणाईचा एक उद्योग तेव्हा भलतीच मजा आणायचा... आपल्या कुरणात रात्री भलताच कुणीतरी गायीगुरं घालतो, हे माहीत असूनसुद्धा कुणी कधी कुणाशी भांडायचा नाही...
श्रावणाआधीच्या दोन महिन्यांत धुवून चकचकीत झालेलं गाव, गावाबाहेरचे डोंगर, झाडंझुडपं आणि पक्षी-प्राणी श्रावणाच्या दिवसांत जणू नवी चमक घेऊन वावरायचे... गावाबाहेरच्या देवराईतल्या मोरांच्या आवाजातली एका नव्या आनंदाची, उत्साहाची झालर सहजपणे अनुभवायला मिळायची... पावसाच्या पहिल्या शिडकाव्यातच तरारलेले असंख्य कोंब एव्हाना वेलींच्या रूपानं झाडाझुडपांना विळखा घालत फुलाफळांनी लगडलेले असायचे, आणि काकड्या-पडवळांच्या मांडवांनी घराघरांची अंगणं सजून जायची. घराघरातल्या मुलामाणसांच्या बरोबरीनं, गावातला आणि गावाबाहेरचादेखील हिरवाकंच निसर्गदेखील श्रावणाचा प्रत्येक दिवस, "साजरा' करायचा...
------------- ----------------
गेले महिनाभर मुंबईत पावसाच्या सरी कोसळतायत... एका पावसाळ्यानं मुंबईच्या काळजात भरवलेली धडकी अजूनही धडधडतेय. पावसाची एखादी सर जरा जास्त वेळ विसावली, की पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या होतात, आणि कधी एकदा ती सर थांबते, अशी अस्वस्थ, मनाला न पटणारी स्थिती मनात घर करते. गावाकडच्या लहानपणीच्या त्या पावसाच्या आठवणी अजूनही मनात सतत बसरत असताना, इथे मात्र, पाऊस थांबावा, असा विचित्र विचार मनाला पोखरत राहातो...
------ --------
...लहानपणी आईचं बोट धरून मी पहिल्यांदा आमच्या कोकणातल्या त्या नव्या गावात एस्टीतून उतरलो, तेव्हा असाच धुवांधार पाऊस कोसळत होता... देशावरच्या आमच्या गावातल्या पावसापेक्षा हे रूप खूपच वेगळं असल्यानं मी घाबरून गेलो होतो. हाताच्या पंज्यांनी डोक्‍यावर "छत्री' करून मी धावतच एस्टी स्टॅंडच्या बाजूला पत्र्याच्या शेडखाली उभा राहून हा नवखा पाऊस थांबायची वाट पाहात होतो, पण त्यानं आमच्या कंटाळल्या मनाला दादच दिली नाही, म्हणून तसाच चालत निघालो... तेवढ्या भिजण्यातच त्या पावसाशी माझी मैत्री झाली आणि नव्या घरात, सगळ स्थिरस्थावर होईपर्यंतच्या दिवसांत खिडकीच्या गजाबाहेर हात काढून तळव्यांवर पागोळ्यांच्या धारा झेलायच्या खेळानं मला वेड लावलं... दिवसदिवस चालणाऱ्या या खेळात, खेळकरपणे तळव्यांना गुदगुल्या करणाऱ्या पाऊसधारांनी मला इतकं आपलं केले, आणि तो पाऊस इतका 'ओळखीचा' झाला, की घराबाहेर पडताना आकाशाकडे नुसतं बघूनच पावसाचा वेध घ्यायची खास कोकणी नजरदेखील मला सहज मिळून गेली...
त्या वेळी, पहिला पाऊस सुरू झाला की तो थांबेपर्यंतचा काळ, म्हणजे 'पावसाळा' असायचा. कधी रिपरिप, कधी ठोंब, आणि कधी सरी अशा नव्यानव्या मुखड्यांना कोसळणाऱ्या त्या पावसात कधीतरी आपली 'उघडीप' दिसली, तरी हवेत तरंगणारे भुरुभुरू कण अंगाशी लगट करीतच राहायचे. श्रावणात मात्र हा पाऊस जरासा खोडकर व्हायचा, आणि गावाबाहेरच्या माळावर उभं राहिल्यावर लांबवरनं येतानाच दिसायचा... अशी सळसळती सर धावतच अंगावर यायची आणि छत्री उघडूउघडू म्हणेपर्यंत अंगावरून सरसरत पुढेदेखील सरकायची... अंगावरच्या थेंबांचा ओलावा नंतरच्या उन्हात चमकत राहायचा... ओली माती आणि त्यावरची मोहोरलेली, फुलरंगांनी बहरलेली रोपटी, पुन्हा तरारून उठायची, आणि सहज चाळा म्हणून, एखाद्या काटकुळ्या काठीनं जमिनीत बोटभर उकरल्यानंतर एखादा लपलेला झरा हा हा म्हणता वर येऊन वाहायलादेखील लागायचा... सगळीकडे फक्त पावसाळ्याच्या, पावसाच्या जादूभरल्या करणीनं भारल्यासारखं वातावरण असायचं...
----- -------
.... आज बऱ्याच दिवसांनी, कोकणातल्या त्या गावातल्या श्रावणाच्या आठवणी, त्या मातीत लपलेल्या झऱ्यासारख्या वर आल्या आणि खळाळून वाहायला लागल्या...
....आता अवघा श्रावण मोहरलेलाच राहणार!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंतर, पाऊस आला कि कधी जातोय असा शहरांमधील कंटाळा आणि याउलट तुम्ही जेव्हा कोकणातील नवीन गावात येताच केलेले वर्णन खूप आवडले.