अनेकदा असं घडतं कि आपल्याला एखादं गाणं खुप आवडत असतं पण ते पडद्यावर कुणी गायिलंय याचा पत्ता नसतो. त्याने आस्वादात फारसा फरकदेखिल पडत नाही. पण पडद्यावरचे चेहरे विस्मृतीत गेलेले असतात. गायकानेच ते गाणं अमर केलेलं असतं. रफीसाहेबांच्या गाण्यांच्या बाबतीत हे अनेकदा झालंय. भारतभूषण किंवा प्रदिपकुमार यांना रफीची "क्लासिक" म्हणता येतील अशी अनेक गाणी पडद्यावर गायला मिळाली. अभिनयाच्या बाबतीत या अभिनेत्यांची थट्टाच झाली. उलट रफीमुळे हे अभिनेते अमर झाले असे म्हणता येईल. त्याबाबतीत ही मंडळी भाग्यवानच म्हटली पाहिजेत. पण असे अनेक चेहरे आहेत जे जनसामान्यांच्या स्मृतीत राहीले नाहीत. त्यांनी वाईट अभिनय केला नव्हता. पण ते फार पुढे आले नाहीत. आज ३१ जुलै, रफीच्या पुण्यस्मरणाचा दिवस. या दिवशी अशाच काही गाण्यांबद्दल लिहावेसे वाटत आहे. अशी अप्रतिम गाणी आणि असे विसरले गेलेले अभिनेते असंख्य असतील त्यामुळे लेखाला जागेच्या आणि माझ्या आवडीनिवडीच्या मर्यादा आहेतच. पण आज रफीचे स्मरण करणे हाच एक उद्देश असल्याने हा लेखनप्रपंच.
बलदेव खोसा हे नाव कुणाला लगेच आठवणार नाही.कदाचित १९७४ सालचा "ठोकर" नावाचा चित्रपट देखिल लक्षात नसेल. पण त्यातील रफीचे बलदेव खोसा याने पडद्यावर गायिलेले "अपनी आखोंमें बसा कर कोई इकरार करुं" हे गाणे अजरामर झाले आहे. गाण्याचे शब्द ऐकले तर लक्षात येते कि प्रेयसीची आर्तपणे आळवणी करणारा प्रियकर तिच्याकडे कसलिही अपेक्षा न ठेवता तिच्यावर प्रेम करतो आहे, तिचे दु:ख स्वतः घेऊन तिला सर्व तर्हेचा आनंद देऊ इच्छित आहे. रफीच्या स्वरात डोकावलेली प्रियकराची आर्तता ही ते गाणं ऐकल्याशिवाय कळणार नाही. शेवटी "हाये मै किस तरहासे प्यार का इजहार करुं" असे तो शेवटी हताशपणे म्हणतो. कारण आपले प्रेम व्यक्त करायला त्याला शब्द पुरे पडत नाहीत. या गाण्याच्या बाबतीतला आणखि एक योगायोग म्हणजे या गाण्याचा संगीतकार श्यामजीघनश्यामजी याला देखिल हिन्दी चित्रपटात फारसे यश मिळु शकले नाही.
अभिनयाच्या बाबतीत ज्याच्याकडुन लोकांनी फारशी अपेक्षा ठेवली नव्हती असे काही अभिनेते होऊन गेले असे मला वाटते त्यात अनिल धवनचा नंबर लागेल. आज हे नाव विस्मृतीत गेले आहे. मात्र त्याने पडद्यावर गायिलेले "हवस" चित्रपटातील "तेरी गलियोंमें ना रख्खेंगे कदम आज के बाद" हे गाणे रफीचे क्लासिक म्हणुन मान्यता पावले. चित्रपटाबद्दल किंवा गाण्याच्या पार्श्वभूमीबद्दल काहीही माहित नसले तरी दुखावला गेलेला प्रियकर आता प्रेयसीशी संबंध तोडुन दूर निघुन जात आहे हे गाण्याच्या शब्दांवरुन तर कळतंच पण त्यासाठी रफीने जे आवाजाचं बेयरींग घेतलं आहे ते जबरदस्त वाटतं. प्रेयसी दुसर्याकडे गेली आहे हे कळल्यावर "गले हम गम को लगायेंगे सनम आजके बाद..." अशा ओळी रफीच्या आवाजात प्रियकराचे दु:ख जाणवुन देतात.
जगदीप हे नाव विस्मृतीत कधीही गेले नव्हते मात्र पुढे विनोदी अभिनेता म्हणुन प्रसिद्धीस आलेला या कलाकाराने नायक म्हणुनदेखिल काम केले आहे हे किती जणांना माहित असेल? १९६४ साली आलेल्या "पुनर्मिलन" चित्रपटात नायक असलेल्या जगदिपला रफीचे "पास बैठो तबियत बहल जायेगी मौत भी आ गयी हो तो टल जायेगी" हे नितांत सुंदर गाणे पडद्यावर गायला मिळाले. गाण्यात जगदीपला तर ओळखताच येत नाही. "धार काजल की तुम और तीखी करो माँग होठों की मीठी हसी से भरो जिंदगी झूमने पर मचल जायेगी" अशासारखे शब्द. त्यातुन अमितासारखी सौंदर्यवती समोर. बाकी प्रेमगीत गाताना रफीच्या स्वरातील मखमल अधिक बहरते हे नक्की.
काही चित्रपटांमध्ये काम केलेला आणि पुढे बुनियाद सारख्या दर्जेदार मालिकांमधुन प्रसिद्धीस आलेला अतिशय गुणी अभिनेता कंवलजीत याचा सुरुवातीचा चित्रपट "शंकरहुसेन" त्यातील खय्यामच्या संगीतामुळे गाजला. या चित्रपटातील एक एक गाणं म्हणजे रत्न आहे. त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहावे लागेल. हा चित्रपट किती जणांना माहित असेल कोण जाणे. त्यात कंवलजीतने काम केले होते हे देखिल कदाचित विसरले गेले असेल. कंवलजीत त्या चित्रपटातील गाण्यांसाठी आज आठवणार नाही. पण त्याला मिळालेले "कहीं एक मासूम नाजुकसी लडकी" हे गाणे रफीच्या क्लासिक गाण्यामध्ये नक्की स्थान पटकावेल याची खात्री वाटते. रफीची गाणी निवडताना हे गाणं विसरता येत नाहीच. ज्याला रफीच्या आवाजातला मुलायमपणा अनुभवायचा असेल त्याने हे गाणं ऐकावं.
१९५८ साली आलेल्या "आखरी दांव" मधील मदनमोहनचे "तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा" हे गाणे कधी विसरता येईल? असं ऐकलंय कि सज्जाद हुसेनच्या "ये हवा ये रात ये चांदनी" वर बेतलेल्या या गाण्यावर तिखट सज्जद हुसेनने "आजकल हमारे गानें तो क्या उनकी परछाईयांभी चलने लगी है" असा शेरा मारला होता. या गाण्यातला नुतनने केलेला अवघडलेल्या, संकोचलेल्या प्रेयसीचा अप्रतिम अभिनय नेहेमीच लक्षात राहीला. प्रियकराच्या लाघवी, आर्जवी स्वरात रफीने गायिलेले गाणे तर रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान पटकावुन बसले. मात्र ते पडद्यावर गाणारा शेखर मात्र विसरला गेला.
बासष्टच्या चीन युद्धावर चेतन आनंदने काढलेला "हकिकत" हा झपाटुन टाकणारा चित्रपट. भारताच्या ससेहोलपटीची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात अनेक दिग्गज अभिनेते होते. मात्र "मै ये सोचकर उसके दरसे उठा था" हे सीमेवरील सैनिकाच्या वैयक्तिक आयुष्यातले दु:ख अधोरेखित करणारे गाणे अभिनेता सुधीर याने पडद्यावर गायिले. रफीचे हे अजरामर गाणे म्हणुन आजदेखिल प्रसिद्ध आहे. मात्र ते पडद्यावर गाणारा सुधीर पुढे येऊ शकला नाही. हा गुणी अभिनेता शेवटी दुय्यम भूमिकांमध्ये दिसु लागला. रफीच्या अजरामर गाण्यांपैकि एक गाणे सुधीरने पडद्यावर गायले आहे हे किती जणांना ठावुक असेल? संथ लयीत सुरु झालेले हे गाणे "मगर उसने रोका, न उसने मनाया, न दामन ही पकडा, न मुझको बुलाया" असे हळुहळु वरच्या पट्टीत जाते. आणि "न आवाज ही दी, न वापस बुलाया" येथे ते सारे साठलेले दु:ख जणु बाहेर पडते. गाण्यातील उदासवाणं वातावरण रफीने आवाजाने आणखि गडद केलं आहे.
या यादीला अंत नाही. पण लेखाचा समारोप करताना त्यामानाने एक अलिकडचं उदाहरण द्यावंसं वाटतं. दिपक पराशर मिस्टर इंडिया म्हणुन निवडला गेला होता. मात्र चित्रपटांमध्ये फारशी चमक दाखवु शकला नाही. काही टिव्ही सिरियल्समध्ये आल्यावर पुढे हा अभिनेता दिसेनासा झाला. मात्र त्याच्यावर चित्रित झालेले उषाखन्नाच्या सेकंड इनिंगमधले "आप तो ऐसे ना थे" चित्रपटातील "तू इस तरहासे मेरी जिंदगी में शामिल है" गाणे आजही लोकांच्या तोंडी आहे. हे गाणे ऐकताना रफीच्या आवाजातला आनंदही अगदी जाणवतो.
विस्मृतीत गेलेले काही अभिनेते दर्जेदार अभिनय करणारेदेखिल होते पण त्यांचे नाव होऊ शकले नाही. काहीवेळा त्यांच्यासकट त्यांचे चित्रपट देखिल लोकांच्या स्मरणात राहिले नाहीत. मात्र गाणी ओठांवर रुळली. हा फक्त आणि फक्त रफीच्या आवाजाचा चमत्कार होता. आज रफी पैगंबरवासी होऊन जवळपास छत्तीस वर्षे उलटली आहेत. पण रफीच्या आवाजाचे माझे वेड मात्र तरुणच आहे. हिन्दी चित्रपटसंगीत आता नक्की कसं आहे हे देखिल मला सांगता येणार नाही इतका दुरान्वयानेदेखिल माझा त्याच्याशी संबंध उरलेला नाही. काहीवेळा काही सुरावटी आवडतात पण त्या तेवढ्यापुरताच. पुन्हा पुन्हा जुन्या जगातच रमायला आवडतं. मला काहींनी नवीन गाण्यांबद्दल माझे मत विचारले आणि मला ते गाणे माहित नाही म्हटल्यावर नाके मुरडली. "आऊटडेटेड" असे जरी ते लोक तोंडावर म्हणाले नाहीत तरी त्यांच्या चेहर्यावर माझ्यासाठी असलेला तो भाव स्पष्टपणे मला वाचता आला. आता त्याचं काही वाटत नाही. ज्यांना काळासोबत राहायचंय त्यांनी राहावं. इतर कुठेही पाहावं लागु नये इतकी रफीसाहेबांनी आमची कायमची सोय करुन ठेवली आहे.
अतुल ठाकुर
रफीची आठवण करण्यासाठी वेगळा
रफीची आठवण करण्यासाठी वेगळा विषय निवडलेला लेख आवडला!
एखाद्या मोठ्या लेखातला थोडासा
एखाद्या मोठ्या लेखातला थोडासा भाग वाचतोय असे वाटले. चांगला आहे लेख.. बट समथिंग मिसींग.
अर्थात रफीवर कितीही वाचले तरी कमीच!
मस्त लेख. ही गाणी बघताना
मस्त लेख.
ही गाणी बघताना खरंतर पडद्यावरच्या ठोकळ्यांकडे लक्षंच जायचं नाही ईतकी ताकद ह्या गाण्यांमध्ये असायची. पडद्यावर कोणीही का ठोकळा असेना गाण्याच्या दर्जाबाबत तडजोड नव्हती.
छान लेख! रफीची गाणी खूपच
छान लेख!
रफीची गाणी खूपच आवडतात.
तुम्ही लिहिलेल्यातली मात्र सगळीच ऐकलेली नाहीयेत.
छान. थोडं वेगळं काहीतरी. रफी
छान. थोडं वेगळं काहीतरी.
रफी हा कायमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे गाण्यांच्या यशाचं ८०+% श्रेय त्या आवाजाचं, ह्या तुमच्या मताशी सहमत आहे. देणगीत मिसळलेलं अंगचं हुनर, दोन्हीचा सुंदर मिलाफ.
तुम्ही उल्लेख केलेल्यातली जेमतेम दोन तीनच ऐकली आहेत, बाकी सगळी अनोळखी. आता ऐकावी लागतील.
सगळी अगदी या लेखात उल्लेख
सगळी अगदी या लेखात उल्लेख केलेली सगळीच गाणी मी ऐकलीत. कारण माझा नवरा जुन्या गाण्यांचाच फॅन आहे. सगळी जूनी, क्लासिकल गाणी मी नवर्यामुळे ऐकलीत. लेख त्रोटक आहे, पण खरच छान आहे. वेळे अभावी तुम्ही थोडक्यात लिहीले असेल.
छान लेख, आवडला.
छान लेख, आवडला.
आशुतोष +१ छान आहे लेख .
आशुतोष +१
छान आहे लेख . आवडला .
<<<रफीची आठवण करण्यासाठी
<<<रफीची आठवण करण्यासाठी वेगळा विषय निवडलेला लेख आवडला!>>>सहमत.
लेख दृष्टीस पडला आणि
लेख दृष्टीस पडला आणि आधाश्यासारखा वाचला.
रफी माझा वीक पॉईन्ट
आज रविवार आणि रफीची पुण्यतिथी पण वविमुळे रेडिओ दिवसभर ऐकता येणार नाही याची खंत वाटली.
वरचा लेख कधी संपूच नये असं वाटत होतं.
एक अतिशय वेगळा विषय. हिट नायक, हिट गायक. पण अप्रसिद्ध नायक आणि गाजलेली गाणी हा विषय छान वाटला... धन्यवाद.
रफिवर असे वेगवेगळे विषय घेऊन लिहा ना...
छान लेख! रफीची गाणी खूपच
छान लेख!
रफीची गाणी खूपच आवडतात.
तुम्ही लिहिलेल्यातली मात्र सगळीच ऐकलेली नाहीयेत. >>+१
छान लेख! रफीची गाणी आवडतात.
छान लेख!
रफीची गाणी आवडतात.
खूप सुंदर लेख. हि सर्व गाणी
खूप सुंदर लेख. हि सर्व गाणी आवडती आहेतच, पण या यादीत चाहूँगा मैं तुझे साँझ सवेरे, हे दोस्ती मधले गाणे हवे होते, असे वाटले.
मस्त लेख. यातली बरीचशी गाणी
मस्त लेख.
यातली बरीचशी गाणी अगदी लहानपणी छायागीत मध्ये बघितली आहेत.
दर वर्षी न चुकता ३१ जुलै ला
दर वर्षी न चुकता ३१ जुलै ला तुम्ही रफी साहेबांवर एक लेख टाकता.
रफी साहेबांविषयी तुमचे प्रेम, कृतज्ञता शब्दा शब्दा मधून जाणवते.
त्याच परंपरेतील अजून एक सुंदर लेख. अनेक गाणी नव्याने कळली.
रफी साहेबांवरील तुमच्या सर्वच लेखांसाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.
ठोकरमधलं गाणं तेवढं ऐकल्याचं
ठोकरमधलं गाणं तेवढं ऐकल्याचं आठवत नाहीए. बाकी सगळी गाणी आवडती (तू इस तरहसे , हे जरा कमी आवडतं).
शंकर हुसैनबद्दल म्हटलंय(स्वतंत्र लेख - लिहाच) ते खरंच आहे. पण त्या गाण्याचं चित्रीकरण भयानक आहे. कंवलजीत ओळखताही येत नाहीए. त्याला जितेंद्रच्या केसांचा विग लावल्यासारखा वाटतोय.
पहिल्या परिच्छेदातल्या भाग्यवान अभिनेत्यांत राजेंद्रकुमारही बसेल.
व्वा अतुल जी, काय सुरेख लेख
व्वा अतुल जी,
काय सुरेख लेख लिहिलाय तुम्ही.
वर दक्षे म्हणाली तसा रफी माझा ही विक पॉईंट.
रफी साहेबांना श्रद्धांजली देण्या साठी फार अनवट विषय निवडलात तुम्ही.
-प्रसन्न
आवडला लेख
आवडला लेख
सहिच लेख. आवडला.
सहिच लेख. आवडला.
रफीसाब ऑल टाइम फेवरीट
रफीसाब ऑल टाइम फेवरीट त्यामुळे सगळी गाणि 'ऐकली' आहेत.
'तू इस तरह से..' मनहर उधासच्या आवाजात देखिल आहे.
http://www.mohdrafi.com/meri-
http://www.mohdrafi.com/meri-awaaz-suno/32-songs-sung-by-great-rafisahab...
ही लिंक बघा, इथे बरीच गाणि आढळतील जी अनोळखी चेहर्यांवर चित्रित झाली आहे. (जेव्हा चित्रित झाली तेव्हा ते अनोळखी होते असं म्हणु हवं तर)
मस्त लेख, सगळीच्या सगळी गाणी
मस्त लेख, सगळीच्या सगळी गाणी माझी आवडती आणि कित्येक वेळा ऐकलेली. बलदेव खोसाचे आणि जगदीपचे फक्त ऐकलेले, बाकीचे चित्रपट पाहिलेत. आंखरी दाव खूप सुंदर होता.
सुंदर लेख. काही गाणी तर
सुंदर लेख. काही गाणी तर वाचतानाच लगेच् प्लेलिस्टमध्ये लावली.
जगदीपचंच "चली चली रे पतंग" हे माझं आवडतं आहे.
सीआयडीमध्ये "लेके पहला पहला प्यार" मध्ये रफीने प्लेबॅक कुण्या अनोळखीलाच दिला आहे (अर्थात पडद्यावर साक्षात देव आहेच!!)
लिस्टमध्ये "क्या हुआ तेरा वादा" (तो तारीक, तिचं नाव आठवेना) पण हवं होतं ना? या गाण्यात रफीने एक जबरदस्त अॅक्युजिंग टोन पकडलाय!
https://www.youtube.com/watch?v=FKwaGhSBpOY हे तर पाहूच नका!!! रफीच्या आवाजाचा इतका अपमान कुणी केला नसेल.
नंदीनीजी धन्यवाद, एक सुरेख
नंदीनीजी धन्यवाद, एक सुरेख गाणं मिळालं तुमच्यामुळे.
लेख सुंदर आहे. वेगळाच. वर
लेख सुंदर आहे. वेगळाच.
वर नंदिनीने दिलेली लिंक भयानक आहे. आणि त्याखालचे कमेंट्स अॅप्रोप्रिएट.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
असुफ, दक्षिणा,
दर वर्षी रफी पुण्यतिथीला वेगळ्या दृष्टीकोणातुन रफीचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. लेख आवडल्याबद्दल आभार
लिस्टमध्ये "क्या हुआ तेरा
लिस्टमध्ये "क्या हुआ तेरा वादा" (तो तारीक, तिचं नाव आठवेना) पण हवं होतं ना? या गाण्यात रफीने एक जबरदस्त अॅक्युजिंग टोन पकडलाय! >> ती कजल किरण.
तारीकला, नासीर हुसनचा पोरगा असल्याने व फक्त गिटार वाजवता येते म्हणुन २ चित्रपटात घेतले असावे. दोनचे आठवणीतले सिनेमे म्हणजे यादोंकी बारात व हम किसेसे कम नही. दोन्हीमधली गाणी अफलातुन.
ती कजल किरण < हिचं खरं नाव
ती कजल किरण < हिचं खरं नाव सुनीता (किंवा असंच काही) कुलकर्णी म्हणे. सध्या पंचमवर लिहिलेलं एक पुस्तक वाचतोय , त्यात उल्लेख आहे.