सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 8

Submitted by Suyog Shilwant on 27 July, 2016 - 15:19

गुरु विश्वेश्वरांच्या बरोबर बोलायला दोन्ही त्रिनेत्री आणि चैतन्य त्यांच्या पुढ्यात उभे असतात. गुरु सर्वात पहिले सुयुध्दच्या आजोबांकडे पाहतात. अभिनव आजोबा एका बाजुला कोपऱ्यात उभे असतात. गुरुंनी चैतन्यला सांगुन मगाशीच सुयुध्द बरोबर आज्जी आणि कायाला बाहेर पाठवलेलं. चैतन्य, चिरंतर आणि अभिनव तिघेही गुरुंच्या बोलण्याची वाट पाहत असतात. गुरु विश्वेश्वर आसनावर बसुन एक नजर सर्वांना पाहतात अन बोलायला सुरुवात करतात.

" चैतन्य तुला मी जी कामगिरी सोपवली होती. ती तु अगदी योग्य रित्या पार पाडली आहेस."

चैतन्य मात्र त्रिनेत्रींना आणताना झालेल्या प्रकारामुळे स्वतःला दोषी समजत असतो. त्याने त्रिनेत्री परिवाराला आश्रमात तर आणलेले पण त्यांना सुरक्षित नव्हता ठेवु शकलेला. ऐन वेळी जेव्हा त्याला दानवाशी लढुन त्यांचे रक्षण करायचे होते तेव्हा दानवाने झाडावर फेकुन दिल्याने तो बेशुद्ध झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी गुरुंना स्पष्ट दिसत होती. त्या तिघांना पाहुन गुरु विश्वेश्वर म्हणाले.

" तुम्ही सर्वजण इथे आलात आणि माझ्या समोर उभे आहात. कारण तुमच्या नशिबात तसं लिहलं आहे. पुढे जे काही होणार आहे ते सर्वकाही विधिलिखित आहे. माझ्या गुरुंचा एक उपदेश मला आजही आठवतो. विधात्याने त्रिनेत्री परिवाराचं जे नशिब लिहलं आहे ते कोणीच बदलु शकत नाही. पण त्यात आपलं जे काही योगदान आहे ते आपण टाळुही शकत नाही. म्हणुन चैतन्य तु स्वतःला दोष देणं योग्य नाही."

न सांगताच गुरुंना चैतन्यच्या मनी असलेला भाव कळाला होता. खाली घातलेली मान वर करत त्याने गुरुंकडे हात जोडत पाहिले व म्हणाला.

" गुरु मला क्षमा करा. आपण सांगताय ते अगदी योग्य आहे. मला फक्त ह्या गोष्टीची खंत आहे कि मी त्रिनेत्रींना अगदी सुखरुप आणु शकलो नाही. काया वहिनींना माझ्यामुळे दुखापत झाली."

ह्यावर गुरुंनी चैतन्यकडे पाहीलं आणि अगदीच मर्मी हात न घालता विषय तिथेच थांबवण्याचे ठरविले.

" चैतन्य जे झालं ते आता भुतकाळात जमा झालं आहे. ते तु किंवा मी काही केल्या बदलु शकत नाही. आपण सर्व इथे सुयुध्द आणि पुढे येणारा त्याचा काळ ह्या बद्दल चर्चा करणे अपेक्षित आहे.' एवढ बोलत त्यांनी अभिनव कडे रोख केला.
'अभिनव तुम्ही सुयुध्दला तुमच्या घराण्याचा इतिहास सांगितलाच असावा. "

"होय गुरु पण त्याला सर्वच नाही सांगु शकलो. कारण त्याच वेळी दैत्यांनी घरावर हमला केला होता."

" हो मला माहित आहे. म्हणुनच मी चैतन्यला तिथे पाठवलं होतं. पुढे सुयुध्दला इथे आश्रमात राहुन सर्व विद्या शिकव्या लागणार आहेत. तो इथे सर्व विद्या प्राप्त करुनच तुमच्या घराण्याला आणि ह्या जगाला येणाऱ्या भयानक संकटापासुन वाचवु शकतो. हिच योग्य वेळ आहे त्याला सज्ज करण्याची."

अभिनव आजोबा आता खुप खुश झाले. ते गुरुंच्या समोर जाऊन त्यांच्या चरणाशी बसले. त्यांनी कित्तेक वर्षांपासुन ह्याच दिवसाची वाट पाहिली होती कि सुयुध्द सर्व विद्या शिकेल. गुरुंचे चरणस्पर्श करत ते म्हणाले.

" गुरु तुम्ही मला आजपर्यंत जे काही सांगत आलात मी अगदी तसंच केलं. मला माहीत आहे कि सुयुध्द लहान आहे. पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज तागायत धीर धरुन राहिलो. आज मला गर्व वाटतो कि सुयुध्द पण आमच्या सारखाच महादेवाच्या पिंडीचे रक्षण करेल. सिध्दी प्राप्त न करताही त्याच्याकडे काही शक्ती आली आहे. मला हे सगळं तेव्हा जाणवलं जेव्हा त्याने दानवाशी लढुन आम्हा सर्वांचं रक्षण केलं. त्याच्या पासुन पुन्हा एकदा आमची नाळ आमच्या खऱ्या उदेश्शाशी जोडली जाणार आहे. "

गुरु शांत चित्ताने सर्वकाही ऐकत होते. पण सुयुध्द इतक्या लवकर ही जबाबादारी उचलेल ह्याची अभिनवला कल्पना नव्हती. अभिनव कडे पाहत गुरु विश्वेश्वर म्हणाले.

" अभिनव ह्याचसाठी मी मागे म्हंटलं होतं कि त्याला आश्रमात घेऊन या. पण तु म्हणालास तो लहान आहे त्याला नाही जमणार एवढ्या लवकर हे सर्व करायला. मला ठाऊक होतं कि त्याच्यात असलेली शक्ती जागृत होत आहे. त्या शक्तीला समजण्याची आणि चालना देण्याची योग्य वेळ आता असावी म्हणुनच हा योग आता जुळुन आला. असो.."

एवढं बोलुन गुरु विश्वेश्वरांनी आपले डोळे बंद केले व बाहेर माजघरात बसलेल्या सुयुध्दला दिव्यदृष्टीने पाहु लागले. एक अदभुत दिव्य तेज त्याच्या देहातुन पडत होता. गुरु विश्वेश्वरांना सुयुध्दच्या शक्तीची अनुभुती आली. हे सर्वकाही त्यांच्यासाठी इतक्या वर्षांच्या स्वप्नपुर्ती सारख होतं. सुयुध्द हा दुसरा तिसरा कोणी नसुन सौशस्त्रपुरम च्या त्रिनेत्री घराण्यात महाशुर सुमन्यु त्रिनेत्री नंतर पाचव्या पिढीत जन्मलेला एक महाशौर्यवान योध्दा होता. गुरुंनी मनोमन महादेवाला आभार मानले. आपले डोळे उघडत त्यांनी आनंदाने अभिनवकडे पाहिले व म्हणाले.

" निश्चिंत हो अभिनव. तुमच्या घराण्यात पुन्हा एकदा महाप्रतापी महाशौर्यवान योध्दा जन्माला आला आहे. पुन्हा एकदा तुम्ही आपल्या गावी जाऊ शकाल आणि अखंड पणे पुन्हा एकदा महादेवाच्या पवित्र पिंडीचे रक्षण कराल. ती वेळ खुप जवळ आली आहे. पण त्या आधी सुयुध्दला सर्व कला अवगत कराव्या लागतील. मी त्याला सर्व विद्या शिकवीन."

हे ऐकुन चिरंतरला खुपच आनंद झाला कारण त्याला पुन्हा एकदा आपल्या खऱ्या गावी सौशस्त्रपुरम ला जायची खुप इच्छा होती. त्याला आपल्या मुलाचा खुप अभिमान वाटत होता. हर्षोल्लासित होऊन तो मधेच म्हणाला.

" गुरु मला खुप अभिमान वाटतोय कि सुयुध्द माझा मुलगा आहे. पुन्हा सौशस्त्रपुरम ला जाण्याच्या विचारानेच मी भरुन पावलोय. तुम्ही त्याला लवकर आपल्या विद्या शिकवाल अशी मी आशा करतो."

चिरंतरच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट व्यक्त करत होता कि त्याला काय वाटत आहे. त्याची छाती अभिमानाने फुललेली चेहऱ्यावर हास्य होते. गुरुंचे मत काही वेगळे नसावे कारण त्यांना सुध्दा सुयुध्दशी बोलायचे होते. गुरु विश्वेश्वर त्यांच्या जवळ बसलेल्या अभिनवला म्हणाले.

" अभिनव मी सुयुध्द मध्ये तो तेज पाहिला आहे जो एक महाशौर्यवान योध्दा मध्येच असतो. त्याला ह्या आश्रमात सर्व विद्या शिकायला फार वेळ लागणार नाही कारण सुमन्यु त्रिनेत्रींच्या शक्तीचा पुर्ण अंश मला त्यात दिसला आहे. भले त्याने जन्म सुयुध्द म्हणून घेतला असेल पण त्याची शक्ती महाशुर सुमन्यु त्रिनेत्री सारखीच आहे. आता लवकरात लवकर त्याचे प्रशिक्षण पुर्ण करुन तुम्ही त्याला सौशस्त्रपुरम ला महादेवाच्या पिंडीद्वारे सिध्दी प्राप्त करण्यास न्यायला हवे. आपल्याकडे फार वेळ नाही. येत्या महाशिवरात्रीला त्याने सिध्दी प्राप्त करायलाच हवी. नाही तर अनर्थ होईल."

गुरुंचे बोलणे ऐकून अभिनव आजोबांना एकच शंका होती जी त्यांना अशक्यशी वाटत होती. त्यांना कळेना कि गुरुंना हे सांगणे योग्य होईल कि नाही तरीही स्वतः च्या मनाचा निर्धार करत ते म्हणाले.

" गुरु आपण सर्वज्ञानी आहात. पण…. महाशिवरात्र तर पाच महिन्यांनंतर आहे. तो पर्यंत सुयुध्द पुर्ण प्रशिक्षण घेऊन सिध्दी प्राप्त करु शकेल का? "

ह्या प्रश्नाने गुरुंच्या चेहऱ्यावर एक हास्य आले. त्यांनी सुयुध्द मध्ये जे पाहिले होते. ते कदाचित अभिनवच्या दृष्टिहीन डोळ्यांना दिसत नव्हते. म्हणूनच अशी शंका त्याला आली. त्याच्या शंकेचं उत्तर देताना गुरु विश्वेश्वर म्हणाले.

" अभिनव तु सुयुध्द बद्दलची भविष्यवाणी विसरलास वाटतं. सुमन्यु त्रिनेत्री नंतरच्या पाचव्या पिढीत पुन: जन्म घेणारा महाशौर्यवान योध्दा म्हणजे सुयुध्द. फक्त तोच कालाशिष्ट राक्षसाचा संहार करु शकतो. जी शक्ती तुझ्या आजोबांकडे होती. तिच शक्ती सुयुध्द जवळ सुध्दा आहे. तो सर्व विद्या लवकर शिकेल कारण मागच्या जन्माच्या शक्तीचा अंश त्यात आहे. ह्या जन्मात त्याला फक्त त्याच्या आठवणींन वर फुंकर घालावी लागणार आहे. पण त्याची पुर्ण शक्ती त्याला सिध्दी प्राप्त करुनच जागृत करता येईल."

गुरुंचे बोलने ऐकुन अभिनव आजोबांना आता काही शंका उरल्या नव्हत्या. त्यांना पुर्ण खात्री पटली होती कि सुयुध्द त्याच्यावर आलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडेल.

चिरंतरही आता सुखावला होता. गुरु विश्वेश्वर आसनावरुन उठले आणि खाली बसलेल्या अभिनवला त्यांनी उठवले. त्याच्या खांद्याला पकडत ते म्हणाले.

" अभिनव तु आता निश्चिंत रहा. तुम्ही सर्वजण आता सुरक्षित आहात. सुयुध्द ह्या आश्रमात राहुन सर्व विद्या शिकेल. मी त्याला सिद्धी करुन शक्ती प्राप्त करण्याचा मार्ग सुचवेन. जोवर तो प्रशिक्षण घेत आहे तोवर तुमची राहण्याची व्यवस्था इथेच आश्रमातील विश्रामगृहात केली जाईल."

बाजुला उभ्या चैतन्यला गुरुंनी बघितले व म्हणाले.

" चैतन्य ह्या सर्वांची राहायची व्यवस्था विश्रामगृहात कर."

चैतन्य मान डोलवत बोलला.

" हो गुरुदेव."

पुढे त्याला आदेश देत ते म्हणाले.

" चैतन्य बाहेर जा आणि सुयुध्दला आत बोलावुन घेऊन ये."

चैतन्य जागचा हलतो आणि दाराकडे वळतो.

सकाळचे नऊ वाजत असतात. त्यांना आश्रमात येऊन तासभर उलटुन गेलेला. सुयुध्द आज्जी आणि काया असे तिघेही बाहेरच्या माजघरात एका बाजुला असलेल्या खुर्च्यांवर बसलेले. आत गुरु विश्वेश्वरां बरोबर आजोबा आणि त्याचे पप्पा बोलत होते. आईचा हात धरुन तो बाजुला बसुन तिच्याकडे एकटक पाहत होता. तिला पहिले सारखं पाहुन त्याला अतिशय आनंद झालेला.

पण कायाच्या मनात तर वेगळंच वादळ उठलेलं. तिला कळत नव्हतं कि ती आश्रमात कशी आली. जेव्हा तिला दानवाने खाली आपटलं त्यानंतरच तिला काहीच आठवत नव्हतं. कालच्या घटनेचा विचार करुन तिच्या चेहऱ्यावर भिती दाटुन आलेली. तरीही तिला ते सगळं जाणुन घ्यायच होतं म्हणुन ती आपल्या सासुला विचारते.

" आई... मी इथे कशी आली ? तुम्ही सर्वजण ठिक आहात ना..? "

सुनैना आज्जी जी बाजुला गप्प बसुन होती आपल्या सुनेकडे पाहते. तिच्या चेहऱ्यावर भिती पाहुन आज्जीला कळतं की तिला नक्की काय विचारायचं आहे. आज्जी म्हणते.

" आम्ही सर्व ठिक आहोत काया. मला फक्त तुझी काळजी होती. तुझ्या डोक्याला मार लागला होता. चिरंतरला दानवाने पकडून ठेवलं होतं पण त्याचवेळी आपल्या सुयुध्दने त्या दानवाला मारुन आपल्या सर्वांचे प्राण वाचवले. तुझ्या डोक्याची जखम सुध्दा सुयुध्दनेच बरी केली. तरीही तु शुध्दीवर आली नाहीस. म्हणुन तुला तसंच घेऊन आम्ही आश्रमात यायला निघालो. तेव्हा पासुन आश्रमात येई पर्यंत आम्ही सगळे जागे राहुन फक्त तुझीच चिंता करत होतो. पण आश्रमात आल्यावर गुरुंनी तुला परत बरं केलं. "

कायाने सुयुध्द कडे पाहिले तिला पाहुन तो हसला. त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत ती म्हणाली.

" तुला कसं जमलं रे.. बाळा..? "

सुयुध्द तिला पाहत म्हणाला.

" माहित नाही मम्मी…पण तुला जखमी पाहुन मला खुप राग आला होता. मी कसं सगळं करु शकलो मलाच माहित नाही पण त्यावेळी त्या दानवाला मारण्याचा विचार माझ्या डोक्यात होता आणि मी ते केलंही. माझ्यात कुठुन ती शक्ती आली कसा मी त्याचा खात्मा केला. मला काहीच माहित नाही. मला फक्त तुला आणि सर्वांना त्याच्या पासुन वाचवायचं होतं. "

कायाला हे ऐकुन आश्चर्य झालेलं तिला विश्वास बसत नव्हता कि तेरा वर्षाच्या सुयुध्दने हे सगळं केलेलं. त्याला जवळ घेत ती म्हणाली.

" सुयुध्द तुला काही झालं नाही ना बाळा… कुठे लागलं नाही ना तुला?

सुयुध्द उठुन गोल फिरला आणि म्हणाला.

" नाही मम्मी… मला काही नाही झालं. मी एकदम ठिक आहे बघ…"

त्याची आई त्याला बघत होती पण साधं खरचटलं सुध्दा नव्हत त्याला. आता मात्र तिला भिती ह्या गोष्टीची वाटत होती कि पुन्हा असं काही झालं तर काय होईल.…आणि ह्याच एका विचाराने तिच्या मनात गोंधळ माजवलेला. एवढ्यात आतुन चैतन्य बाहेर आला आणि सुयुध्दला बघुन म्हणाला.

"सुयुध्द तुला आत बोलावलं आहे. "

सुयुध्द जो उभा होता. चैतन्यचे बोलणे ऐकुन त्याच्या दिशेने चालु लागला. जाताना त्याने आपल्या मम्मीकडे पाहिले. चैतन्य सोबत तो खोलीच्या दिशेने गेला. खोलीत गुरु त्याची वाट पाहत होते. आत शिरताच सुयुध्दने गुरुंकडे पाहिले. ते आजोबांच्या बाजुला उभे होते. हात मागे धरुन ते दारात उभ्या सुयुध्दकडे पाहु लागले. चैतन्यने त्याला गुरुंच्या समोर उभे केले. तसे गुरु म्हणाले.

" ये सुयुध्द… इथे तुझ्या आजोबां सोबत उभा रहा."

सुयुध्दने आजोबांचा हात धरला. आजोबा म्हणाले.

" बाळा हे आपल्या त्रिनेत्री घराण्याचे गुरु आहेत. विश्वेश्वर घराण्याचे प्रत्येक गुरु कित्तेक पिढ्यांपासुन आपल्याला आणि आपल्या सारख्याच अजुन काही घराण्यांना विद्या शिकवत आले आहेत. ह्या जगाला दृष्ट शक्त्यांपासून सुरक्षित ठेवण्यात मदत करत आले आहेत. सुरुवातीपासुन त्यांच्या गुरुकुलाने आपल्या घराण्याला अनेक विद्यांचे प्रशिक्षण दिले आहे व शक्ती प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला आहे. आजपासुन तुला इथे राहुन विद्या ग्रहण करावी लागणार आहे."

सुयुध्द एकटक गुरुंकडे पाहत होता. त्याला कळत नव्हते कि गुरुंचा चेहरा त्याला इतका ओळखीचा का वाटत होता. तो तर आज पहिल्यांदाच त्यांना भेटला होता. त्याला येणारे विचार बाजुला सारत तो पुढे सरसावला आणि न कळतच गुरुंना नतमस्तक होऊन पाया पडला. गुरु त्याला आशिर्वाद देत म्हणाले.

" यशस्वी भव:"

सुयुध्द उठला अन परत आजोबां जवळ जाऊन उभा राहिला.

गुरु वळले अन परत आपल्या आसनावर जाऊन बसले. सर्वांकडे एक नजर टाकत ते म्हणाले.

" तुम्ही सर्वजण सुध्दा बसुन घ्या. प्रवासातुन आल्या पासुन तुम्ही विश्रांति घेतली नाही. मला आता फक्त सुयुध्दशी बोलायचे आहे. चैतन्य दार लावुन घे."

चैतन्य पटकन दार बंद करुन घेतो आणि सर्वजण खाली बसतात. गुरु थोडा वेळ सुयुध्दला निक्षुण पाहतात. सुयुध्द त्यांच्या समोरच बसलेला असतो. त्याला माहीत नसतं कि गुरु त्याच्याशी काय बोलणार आहेत पण तो मनातल्या मनात ठरवू लागतो कि गुरु जे काही बोलतील त्याकडे अगदी निट लक्ष द्यायचं.
दोन एक मिनिटं गेल्यानंतर गुरु बोलले.

" सुयुध्द तुला इथे का आणलं आहे ते माहित आहे का?"

" होय गुरुदेव. मला इथे आश्रमात अनेक विद्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आणलं आहे."

" तेवढंच नाही तर तुमच्या त्रिनेत्री घराण्याची ती परंपरा आहे. तुमच्या घराण्याच्या प्रत्येक वारसाला इथे प्रशिक्षण घ्यावे लागते. तुझ्यावर जे दायीत्व आहे त्याची तुला कल्पना आहे का? "

" नाही."
अगदी निरगसपणे त्याने ह्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं कारण त्याला खरंच त्याच्या वरच्या जबाबदारीची कल्पना नव्हती. अगदी स्पष्टपणे त्याने सत्य वदले होते. गुरु विश्वेश्वरांना त्याचा हा खरेपणा खुप आवडला ते प्रभावित झाले अन म्हणाले.

" मला हेच अपेक्षित होतं. तुला जे माहित नाही ते मी तुला सांगतो. तुझ्या आजोबांनी तुला हे सांगितले असेल कि तुमचं मुळ गाव सौशस्त्रपुरम आहे. त्या ठिकाणी तुमच्या कुळ दैवताचे म्हणजे शिवशंकराचे मंदिर आहे. त्या मंदिरात असलेल्या पिंडीच्या रक्षणाचे दायीत्व तुमचे आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून त्या गोष्टी पासून तुम्ही वंचित आहात. आता ही जबाबदारी तुझी आहे. "

गुरुंचे बोलणे ऐकुन सुयुध्द विचारात पडला. अखेर त्याला कळालं होतं कि त्याचे खरे दायीत्व काय आहे. आपल्या मनाशी दृढ निश्चय करत त्याच्यावरची जबाबदारी सांभाळायला तो तयार झाला. गुरु त्याच्याकडे पाहत त्याला म्हणाले.

" उठ सुयुध्द.. आणि इथे समोर उभा रहा."

सुयुध्द पटकन उठला आणि गुरुं समोर उभा राहिला. गुरुंनी त्याच्या निळ्या गडद डोळ्यात बघत त्याला विचारले.

" तु ही जबाबदारी घ्यायला तयार आहेस का?"

निसंकोच पणे तो उत्तरला.
" होय गुरुदेव."

गुरु त्याच्या डोळ्यात असलेल्या सत्याला स्पष्ट पाहु शकत होते. त्यांनी आपला हात पुढे करत मंत्र बोलायला सुरुवात केली.

" || ॐ नम: शिवाय || "

मंत्र बोलुन होताच त्यांच्या हातात एक लाल पिवळा सुती गंडा प्रगट झाला. गुरुंनी तो गंडा आपल्या मुठीत पकडून पुन्हा एकदा मंत्र म्हंटला व सुयुध्दला म्हणाले.

" तुझा उजवा हात पुढे कर."

सुयुध्दने आपला हात वर केला. गुरु त्याच्या मनगटाला तो गंडा बांधताना म्हंटले.

" विश्वेश्वरं व्यपदेश: मि | ब्रह्मतेजोबलं प्रदानमं प्रति सुयुध्द: ||"

गंडा बांधून झाल्यावर सुयुध्दने गुरु विश्वेश्वरांना हात जोडुन नमस्कार केला. गुरुंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवुन त्याला आशिर्वाद दिला व म्हंटले.

" यशस्वी भव: | सुयुध्द आज पासुन तु माझा शिष्य आहेस. तुला मी ज्या काही विद्या शिकवेन. त्याचा उपयोग तुला येत्या काही काळात करावा लागणार आहे. तुझ्याकडे असलेल्या शक्तींचा वापर यापुढे जपुन कर. त्याने इतर कोणाला त्रास होणार नाही याची काळजी तुला घ्यावी लागेल. कारण शक्तीसोबत तुझ्यावर मोठी जबाबदारी सुध्दा आहे. "

"हो गुरुदेव."

असं म्हणत सुयुध्द पुन्हा जाऊन आपल्या आजोबां जवळ जाऊन बसला. त्याने त्याच्या मनगटाला बांधलेला गंडा पाहिला. आज पहिल्यांदाच त्याला स्वतः च्या स्वभावात गंभिरता जाणवत होती. बाजुला बसलेल्या आजोबांचा हात घेऊन त्याने गंड्याला लावला. आजोबांना खुप आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं. जे दर्शवुन देत होतं कि आज त्याने त्यांची एक तरी ईच्छा पुर्ण केलेली. आजोबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली व म्हणाले.

" शब्बास बाळा. मला तुझ्याकडून हिच अपेक्षा होती."

सुयुध्दला बरं वाटलं त्याने पुन्हा वळुन गुरुंकडे पाहिलं. तो विचार करु लागला. मगाशी आश्रमात येताना त्याने काही जणांना प्रशिक्षण घेताना पाहिलेलं. त्याच्याही मनात हे सर्व शिकण्याची ईच्छा होती. आता गुरुंनी त्याला शिष्य केल्यामुळे तो सर्वकाही शिकण्यास उत्सुक देखिल होता. प्रशिक्षण घेण्याच्या विचाराने एक वेगळीच उर्जा त्याच्या शरिरात स्फुरत होती. तो विचारच करत असतो कि एवढ्यात गुरु विश्वेश्वर चैतन्यला म्हणाले.

" चैतन्य तु ह्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेचं बघ आणि सुयुध्दला आश्रमाच्या नियमांची माहिती दे. आजचा दिवस त्याला त्याच्या परिवारा सोबत विश्रामगृहात राहु दे. पण उद्या पासून त्याची राहण्याची व्यवस्था शिष्यांच्या वसतीगृहामधे कर."

" होय गुरुदेव " म्हणत चैतन्यने गुरुंना नमस्कार केला व दाराजवळ जाऊ लागला. दार उघडुन तो बाहेर गेला.

गुरुंनी सुयुध्दकडे पाहिले अन म्हणाले.

" सुयुध्द तुला पुढिल तीन महिन्यात फार परिश्रम घ्यायचे आहेत. उद्या पासुन तुला सर्व शिष्यांप्रमाणेच वागवले जाईल. तेव्हा आजचा दिवस तु आपल्या परिवारा सोबत आराम कर." गुरु विश्वेश्वरांनी आपला रोख आता सुयुध्दच्या आजोबांकडे वळवला व म्हणाले.
" अभिनव तुझा नातु आजपासून माझा शिष्य झाला आहे. निश्चिंत रहा. तुमच्या परिवाराला मी या आधी ही मार्गदर्शन केले आहे आणि या पुढे ही करत राहिन. तुम्ही सर्वजण चैतन्य सोबत जा. तो तुमची राहण्याची व्यवस्था विश्रामगृहात करेल."

हे ऐकताच सुयुध्द आणि बाकिचे जागेवरून उठले. आजोबांनी गुरुंना नमस्कार केला व म्हणाले.

" ठिक आहे. गुरुदेव. आम्ही जातो. "

गुरु विश्वेश्वर आशिर्वाद देत म्हणाले.
" शुभम भवतु."

ते सर्वजण गुरुंच्या खोलीतून बाहेर पडले व माजघरात आले. चैतन्य त्यांच्या बाहेर येण्याचीच वाट पाहत होता. त्यांना बाहेर येताना पाहुन तो म्हणाला.

" चला त्रिनेत्री तुमची राहण्याची पुर्ण व्यवस्था झाली आहे. आपण आता निघुयात. माझ्या मागे या."

एवढं बोलुन तो बाहेर जाण्यास निघाला. सुयुध्द आणि बाकिचे सर्वही त्याच्या मागे निघाले. काया चिरंतर सोबत तर आजोबा आज्जी व सुयुध्द एकत्र चालत घरा बाहेर आले. सुयुध्दने आजोबांना पायऱ्या उतरवत बाहेर आणले. बाहेर येताच ते डाव्याबाजुला वळले. सुयुध्दला त्या ठिकाणी काही अंतरावर एक घर दिसलं. ते चालत असलेली पायवाट त्याच घराकडे जात होती. आजुबाजुला छोटी मोठी झाडं पक्षांच्या किलकिलाटाने भरली होती. सकाळचे 10 वाजत आलेले गुरुंबरोबर बोलण्यात त्यांचा हा वेळ कसा गेला हे त्यांना बाहेर आल्याशिवाय जाणवलं नाही. घरापासुन थोड आधी एक पिंपळाचं झाड होतं ज्या खाली काही लाकडी खुर्च्या व दोन टेबलं होती. झाड बरंच मोठ असल्यामुळे त्याची सावली त्या दोन्ही टेबलांना पुरेशी मिळत होती. सुयुध्द चालत चालत त्या झाडाजवळच पोहचला आणि आजोबांना म्हणाला.

" बाबा आपण इथेच राहणार आहोत तेव्हा मी इथे प्रशिक्षण घेताना तुम्ही काय कराल? "

आजोबा म्हणाले.
" बाळा… मला हा आश्रम काही नविन नाही. हां…..मी आश्रमात बऱ्याच वर्षांनी आलोय पण मी सुध्दा इथेच प्रशिक्षण घेतलं आहे. तुझं प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर आपल्याला सौशस्त्रपुरमला ही जायचं आहे. पण ते सर्व आपण नंतर बोलू. आता तुला इथे आमच्या सोबत राहण्यासाठी एकच दिवस भेटला आहे. आज नंतर आम्ही तुला जास्त भेटू शकत नाही. कारण इथला तसा नियमच आहे. तेव्हा आराम केल्यानंतर आपण गप्पा मारू. ठिक आहे. "

आजोबांकडे पाहत सुयुध्द जरासा निराश झाला. ह्या आधी तो कधीच आपल्या परिवारापासुन वेगळा राहीला नव्हता. पण इथे राहुन त्याला परिवाराच्या रक्षणासाठी
सर्व विद्या शिकायच्या होत्या. काहिसं स्वतःला सावरत तो आजोबांना म्हणाला.

" ठिक आहे. बाबा."

एव्हाना ते घराजवळ पोहचले होते. चैतन्यने विश्रामगृहाचे दार उघडलं अन आत शिरला. बाकीचे ही त्याच्या मागे एक एक करुन आत गेले. सुयुध्दने घरात पाहिले तर एका बाजुला लाकडी खाटा होत्या ज्यावर गाद्या दिसल्या. अंथरूण पांघरुणाची सोय देखिल होती. आजुबाजुची सगळी जागा मोकळीच दिसली विश्रामगृह तसं आतुन मोठ होतं. समोरून एका खिडकी मधुन हवा आत येत होती. खिडकीच्या बाजुलाच एक लाकडी कपाट होतं. ज्यात त्यांच्यासाठी कपड्याची सोय केलेली. चैतन्यने इतर गोष्टी दाखवत त्यांना आराम करण्यास सांगितले. सुयुध्द जवळच्या एका खाटेवर बसला. तसा चैतन्य त्याला म्हणाला.

" सुयुध्द माझ्याबरोबर जरा बाहेर ये. तुला आश्रमाचे नियम सांगायचे आहेत. "

सुयुध्दने त्याच्याकडे पाहिलं व म्हटलं.

" ठिक आहे. चला. "

ते दोघे जण बाहेर निघुन पिंपळाच्या झाडाजवळ असलेल्या टेबलापाशी जाऊन बसले. तसं चैतन्यने लगेच विषयाला सुरुवात केली व म्हणाला.

" सुयुध्द आपल्या आश्रमाचे काही नियम आहेत आणि तुला ते अगदी काटेकोरपणे पाळावे लागतील. तु इथे शिष्य म्हणुन दाखल झाला आहेस आणि इथल्या नियमांचे पालन करणे तुझे कर्तव्य आहे. मी जे काही तुला सांगेन ते लक्ष देऊन ऐक आणि लक्षात ठेव. पहिला नियम आहे कि इथे पुर्ण शिक्षण झाल्याशिवाय तुला आश्रम सोडुन जाता येणार नाही. दुसरा नियम आहे कि गुरुंच्या परवानगी शिवाय कोणताही शिष्य आश्रमाच्या बाहेर जाऊ शकत नाही. तिसरा नियम आहे कि इथे शिक्षण घेत असताना प्रत्येक शिष्याला गणवेष घालने बंधनकारक आहे. चौथा नियम आहे कि शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा तक्रार असल्यास शिक्षकांना किंवा गुरुंना सुचित करावे. पाचवा आणि शेवटचा नियम आहे कि इथे शिकलेल्या प्रत्येक विद्येचा वापर इतर कुठेही खरी गरज असल्याशिवाय करु नये. हे आपल्या आश्रमाचे पाच महत्वाचे नियम आहेत. तुला कळले का ? "

असे म्हणत त्याने सुयुध्दकडे पाहिले. सुयुध्दने सर्व काही अगदी लक्षपुर्वक ऐकलेलं. चैतन्यकडे बघत तो म्हणाला.

" हो."

त्याचा होकार ऐकुन चैतन्य पुढे म्हणाला.

" आता आपल्या आश्रमाची माहिती मी तुला देतो. तुला डाव्या बाजुला जी दुमजली इमारत दिसतेय ते आपल्या आश्रमाचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यात तुला मायावी शक्ती, रुपांतर कला, पंचतत्व विद्या, आयुर्वेद, वेद शास्त्र, उपचारक शक्ती, वनस्पती शास्त्र, भुगोल शास्त्र हे सर्व शिकवले जाईल. इतर विषय बाहेर शिकवले जातील. जसे युध्दकला, योगशास्त्र, पशू शास्त्र, घोडेस्वारी वैगरे वैगरे. आपल्या आश्रमात एकुण आठ शिक्षक आहेत. जे वेगवेगळया विद्या शिकवतात. उद्या तुझी ओळख मी प्रत्येकांशी करुन देईन. ठिक आहे."

" हो " सुयुध्द त्या दुमजली इमारतीकडे बघत म्हणाला.

चैतन्यचे बोलणे अजुन संपले नव्हते. पुढे तो म्हणाला.

" आश्रमात शिष्यांच्या राहण्यासाठी वसतिगृह आहे. प्रशिक्षण केंद्राच्या बाजुला जी रांगेत घरं दिसत आहेत ना.. तेच वसतिगृह आहे. तुला उद्या पासून तिथेच रहावे लागेल. वसतिगृहाचे काही नियम आहेत. सकाळी चार वाजता सर्व शिष्य उठुन तयार राहिले पाहिजे. एक तास योग अभ्यास केल्यानंतर साडे पाच वाजता न्याहरी केली जाते. दुपारचे जेवण ठिक बारा वाजता सगळे एकत्र करतात. संध्याकाळी सात वाजता रात्रीचे जेवण केले जाते. आठ वाजेपर्यंत इथे झोपले पाहिजे तसा आपल्या आश्रमाचा नियम आहे. इथे कोणताही विज पुरवठा नसल्याने रात्रीचे जागरण केले जात नाही. थोड्यावेळात मी तुझा गणवेश आणून देतो. उद्या सकाळी चार वाजता आंघोळ करुन तयार रहा. पुढील एक महिना तुला खुप काही शिकायचे आहे. एक महिन्याच्या प्रशिक्षणा नंतर तुझी परीक्षा घेतली जाईल. तेव्हा लक्ष देऊन शिक. ठिक आहे."

" हो "

" चल मी आता निघतो. तुला जर कशाची गरज लागली तर मला सांग मी तिथे प्रशिक्षण केंद्रात असेन. आणि हो… दुपारचे जेवण 12 वाजता इथेच विश्रामगृहात पाठवले जाईल. तोवर तुम्ही सगळे आराम करा."
एवढ बोलून चैतन्य उठला आणि जाऊ लागला. त्याला थांबवत सुयुध्द बोलला.

" मला आता भुक लागली आहे. काही खायला भेटेल का? "

असे बोलुन त्याने चैतन्यकडे पाहिलं. कालपासुन दोन चार केळ्यां व्यतिरिक्त त्यानी काहीच खाल्ल नव्हतं. आता मात्र त्याला एकदम कडाडुन भुक लागलेली. चैतन्यही त्यांच्यासोबतच असल्यामुळे त्याला ह्या गोष्टीची पुर्ण कल्पना होती. थोडासा हसत तो सुयुध्दला म्हणाला.

" हो…भेटेल ना…मी लगेच जेवण पाठवुन देतो."

सुयुध्दला हे ऐकुन खुप बरं वाटलं. वळून तो धावतच विश्रामगृहाकडे गेला. चैतन्य त्याला बघत हसला आणि वसतिगृहाच्या दिशेने निघाला.

सुयुध्द विश्रामगृहात गेला. आत आज्जी आजोबा त्याचीच वाट पाहत होते. आत शिरताच तो उजव्या बाजुला खाटेवर बसलेल्या आज्जीकडे गेला. त्याला पाहताच आज्जीने त्याला बाजुला बसवले व म्हणाली.

" बाळा आलास. जा पहिले आंघोळ करुन घे."

सुयुध्द म्हणाला.

" आज्जी मला खुप भुक लागलेली तर मी चैतन्य काका ला विचारलं की काही खायला भेटेल का? तो म्हणाला जेवण पाठवतो. आपण सगळेच कालपासुन उपाशी आहोत ना."

" हो बाळा. म्हणूनच मी म्हंटलं जा आंघोळ करुन घे. काया हा बघ आला. त्याला पहिले आंघोळीला घेऊन जा."

काया आतल्या खोलीतुन बाहेर आली. अन सुयुध्दला घेऊन आत गेली. आतल्या खोलीत उजव्या बाजुला नानीघर होते. ज्याच्या आजुबाजुला पाण्याने भरलेली दोन लाकडी पिंपं ठेवलेली. डाव्या बाजुला एका कोपऱ्यात मातीची चुल होती. चुलीच्या बाजुला काही लाकडं तोडुन ठेवलेली. त्यांच्या बाजुला भिंतीवर एका लाकडी फळीवर काही भांडी ठेवलेली होती. मागच्या बाजुस निघायला एक दरवाजा सुध्दा होता. कायाने सुयुध्दला नानीघरात नेले. तसा सुयुध्द बोलला.

" अगं मम्मी मला कपडे आणि टावेल…नको का?"

काया म्हणाली.

" थांब आणून देते. तु पहिले दात घास. ते बघ तिथे कडुलिंबाची काडी ठेवलेय आणि अंगाला लावायला उटनं सुध्दा आहे. चल कर आंघोळ…"

एवढ बोलत काया बाहेर निघुन गेली. सुयुध्दने पाहिले कि आत एका बाजुला मोठं पितळेचं पात्र होते ज्यात गरम पाणी काढुन ठेवलं होतं. त्याने दात घासुन आंघोळ करायला सुरुवात केली. त्याच्या आईने थोड्यावेळात कपडे आणि टावेल आणून भिंतीवरच्या दोरीला ठेवले व म्हणाली.

" हे घे.. कपडे आणि टावेल इथे ठेवते. तु आंघोळ झाली कि बाहेर ये. तुझ्या नंतर सगळ्यांच्या आंघोळी व्हायच्या आहेत. "
एवढ बोलुन ती परत बाहेर गेली.

सुयुध्द आंघोळ करुन कपडे बदलुन बाहेर आला. अन खाटेवर जाऊन बसला. एक एक करुन सर्वांनी आपल्या आंघोळी करुन तयाऱ्या केल्या अन निवांत बसले. सुयुध्दला फारच भुक लागली होती कि तेवढ्यात दारात कोणीतरी उभे दिसले. चैतन्य दारात उभा होता. त्याच्या सोबत दोन जणं हातात मोठी पातेली घेऊन आलेले. चैतन्य म्हणाला.

" झाली का तयारी ? मी जेवण घेऊन आलोय. "
असं बोलत तो घरात शिरला. त्याच्या सोबत आलेले दोघे जण आत आले व त्यांनी हातातली पातेली खाली ठेवली.

चिरंतर म्हणाला.
" हो... तयारी झाली.. आम्ही तुझीच वाट पाहत होतो.

जेवण आले आहे हे पाहुन सुयुध्दला अजुनच भुक लागली. आज पर्यंत कधीच तो असा उपाशी राहिला नव्हता. तो पटकन खाली बसला. काया त्याला खाली बसलेले पाहुन समजली कि त्याला खुप भुक लागली आहे. तशी ती आत गेली आणि फळीवर ठेवलेली ताटं घेऊन बाहेर आली. चिरंतर आजोबा अन आज्जी तोवर सुयुध्दच्या बरोबर खाली बसलेले. तिने ताटं सर्वांसमोर ठेवली.

तसा चिरंतर म्हणाला.

" चैतन्य तु सुध्दा जेव आमच्या सोबत."

चैतन्य म्हणाला.
" नाही. तुम्ही जेवा. मी मगाशीच नाश्ता केला आहे."

चिरंतर त्याच्या आवाजाच्या दिशेने डोकं फिरवत म्हणाला.
" ठिक आहे पण आज रात्रीचे जेवण तुला आमच्या सोबत करावे लागेल. "

चैतन्य हसतच म्हणाला.
" हो…हो… ठिक आहे. तुम्ही जेवा मी निघतो."

जवळच उभ्या एका तरुण शिष्याकडून त्याने सुयुध्द साठी आणलेला आश्रमाचा गणवेश खाटेवर ठेवला आणि सुयुध्दला म्हणाला.

" सुयुध्द हा तुझा गणवेश. उद्या सकाळी चार वाजता घालुन तयार रहा. मी तुला घ्यायला येईन. "

मान डोलावत सुयुध्दने होकार दिला. तसा चैतन्य त्या दोन्ही शिष्यांसोबत बाहेर निघुन गेला.

कायाने पातेल्यावर झाकलेली ताटं उघडली. स्वादिष्ट जेवणाचा खमंग वास सुयुध्दला आला. कायाने डोकावुन आत पाहिले. मोठ्या पातेल्यांमधे डाळ, भात आणि तीन भाज्या वेगवेगळ्या छोट्या भांड्यात ठेवल्या होत्या. दुसऱ्या पातेल्या मधे ज्वारीच्या भाकऱ्या एका टोपलीत दिल्या होत्या आणि मिष्ठांन्न म्हणुन खिर दिली होती. सर्व गोष्टी बाहेर काढुन तिने ताटं वाढली. सुयुध्दला खुप भुक लागल्याने ताटात वाढताच जेवायला सुरुवात केली. यापुर्वी त्याने असे स्वादिष्ट अन्न कधीच खाल्ले नव्हते. तो अगदी पोट भरुन जेवला. खिर तर त्याने चट्टामट्टा करुन खाल्ली. सगळ्यांची जेवणं आटपली. गोड खिर खाल्याने त्याला जरा सुस्ती आलेली कालच्या जागरणाने त्याच्या पापण्याही जड वाटु लागल्या. तो थोडावेळ खाटेवर भिंतीला टेकून बसला. बसल्याजागी त्याला कधी झोप लागली काही कळालेच नाही.

सुयुध्दला जेव्हा जाग आली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. सुर्य मावळून सुध्दा काही प्रकाश अजुन आकाशात दिसत होता. डोळे चोळत त्याने आजुबाजुला पाहिले. पण बाजुच्या खाटा रिकाम्या होत्या. खिडकीतुन बाहेर पाहुन एक क्षण त्याला असे वाटले कि आपण दुसऱ्या दिवशी तर उठलो नाही ना. त्याने आपल्या मम्मीला हाक मारली.

" मम्मी….मम्मी……"

कोणीच उत्तर देत नाही हे बघुन तो खाटेवरुन खाली उतरला. आणि आतल्या खोलीत बघायला गेला. आतही कोणीच नव्हतं. मागे वळुन तो बाहेर निघताना विचार करु लागला. अचानक सगळे गेले कुठे ? बाहेर येऊन त्याने चहुबाजूने नजर फिरवली. सगळे जण पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या टेबलावर गप्पा मारत बसलेले. समोरच्या मैदानात काही मुलं कसला तरी खेळ खेळत होती. तो धावत झाडाखाली टेबलावर बसलेल्या त्याच्या आई वडिलांजवळ गेला.

आजचा दिवस त्याला आपल्या परिवारासोबत घालवायचा होता. उद्यापासुन तो आश्रमातील शिष्यांप्रमाणे वसतिगृहात रहायला जाणार होता. उद्यापासुन त्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात होणार होती.

क्रमशः

चॅप्टर तिसरा " आश्रमाची ओळख " समाप्त…

भाग नववा लवकरच……

________________________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुयोग - हा भाग कंटाळवाणा झाला. कथा पुढे सरकत नाही आहे. सुयुद्ध आणि आई मधला संवाद उगाच लांबला, नंतर त्याच्या आंघोळी बद्दल एवढं सगळं लिहायची गरज वाटली नाही. आहे त्यापेक्षा निम्म्यात हा भाग संपला असता. गेले तीन भाग वाचताना त्रीनेत्रीं चे डोळे नक्कि कशामुळे गेले ह्याचा उलगडा होईल असं वाटत होतं पण दानव आल्यामुळे अपूर्ण राहिलेले संभाषण काही पूर्ण होत नाही आहे.

वाचताना इतर खटकणार्‍या गोष्टी - सर्व कथा आणि संज्ञा मराठी (संस्कृत भाषेशी जवळ) असताना सुयुद्धचे "मम्मी" म्हणणे विचित्र वाटते. अपूर्ण व पूर्ण भूतकाळाची सरमिसळ करू नका - उदा - १. चैतन्य मात्र त्रिनेत्रींना आणताना झालेल्या प्रकारामुळे स्वतःला दोषी समजत असतो. २. गुरुंनी चैतन्यकडे पाहीलं आणि अगदीच मर्मी हात न घालता विषय तिथेच थांबवण्याचे ठरविले. पहिल्या वाक्यात "असतो" च्या ऐवजी 'होता' करा किंवा दुसर्‍या वाक्यात "पाहिलं" ऐवजी पाहतात आणि "ठरवतात" असं करा. कथा वाचताना वाक्य नं २ सारखी वाक्यरचना जास्त सोपी वाटते व कथा सांगताना वाक्य नं १ सारखी वाक्यरचना जास्त वापरली जाते.

टीका करायचा हेतू नाही पण कथेबद्दलचे मत विचारलेत म्हणून सांगावेसे वाटले.

पु. ले.शु.

pudhacha bhag mdhye kuthetri adkun bslay bhutek.... o lekhak mahoday pudhe yeu da na rao suyog trinetri na

धन्यवाद रविराज आणि अॅना. उद्या पर्यंत नविन भाग सादर असेल. असेच वाचत रहा. आपल्या प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद.

khup khup dhanywad suyog sir..... pudhchya part chi khup divs vat bghtoy.... yeu dya lvkr