पानाची चंची ...

Submitted by अजातशत्रू on 26 July, 2016 - 21:33

हवेतर बटवा म्हणा..या चंचीचे पूर्वी अनेक रंग होते, आता काही थोडेच शिल्लक उरलेत...चंचीच्या आठवणी मात्र अजूनही अगदी रंगतदार आहेत...
दुपारच्या वेळी बांधाच्या कडेवर, आंब्याच्या डेरेदार सावलीत बसून माझे काका हळूच चंची उघडायचे. त्या सरशी त्यातली सामग्री एकेक करत बाहेर यायची.
घड्या घालून दुमडून ठेवलेली पानांची सुरळी आधी बाहेर येऊन त्यांच्या मांडीवर स्थिरावायची. मग ती पाने एकेक करून आधी उताणी व्हायची मग सवाशी व्हायची. ती फटाफट झटकली जायची. त्यावर शेजारी ठेवलेल्या पितळी तांब्यातले पाणी शिंपडले जायचे. जेमतेम बऱ्यापैकी ओली झाली की ती हिरवीगार पाने अगदी ताजी तरतरीत वाटायची. हवा खात ती त्यांच्या मातकटलेल्या धोतरावर आरामात पहुडलेली असत.

पानापाठोपाठ चुन्याची हिरवी प्लास्टिक डबी हातघाईला आल्यागत बाहेर यायची. अलगद उघडले जाणारया त्या झाकणाला उघडण्याची कोण घाई असायची ! आतील चुना किंचित सुकलेला असला की त्यालाही जलाभिषेक व्हायचा पण तो थेंबमात्रच असायचा. ते थेंबभर पाणी चुन्याचे रुपांतर लोण्यात करून जायचे. अगदी नजाकतीने उजव्या हाताच्या अंगठ्याने नखाकडच्या बाजूने चुना अलगद काढला जायचा. मग त्या चुन्याची हिरव्यागार पानावर मन लावून पट्टेदार आखणी व्हायची. लोक मात्र एकमेकाला फसवतात अन चुन्याचे नाव बदनाम करतात. अमक्याने तमक्याला चुना लावला असं गावभर सांगत फिरतात. चुन्याचा फसवाफसवीशी दुरान्वयानेही संबंध नाहीये, इतका पांढरा शुभ्र, लोण्यासारखा मऊ असणारा चुना नुसता खाल्ला तरी तोंड भाजते. मग लोणी साखर खात बसावे लागते. तर असा हा चुना लावून झाला की पानाच्या देठ खुडण्याचा कार्यक्रम सुरु होतो ! पानाच्या देहावरची एकही शीर न दुखावता, पानाचा इतर भाग फाटू न देता एका हळुवार हिसक्यात पानाचे देठ धडावेगळे व्हायचे. पानांची तक्रार नसायची कारण काकांच्या मांडीवर बसल्या बसल्या त्यांच्या तलम हिरव्या कायेवर चुन्याचे लेपन अगदी झोकात व्हायचे..

मग पुढे यायची काताची डबी. जास्त करून ही छोटेखानी डबी स्टीलचीच असायची. तिला वर एक मस्त आरसा लावलेला असायचा, सतत वापर असूनही ह्या डबीचे झाकण थोडे घट्टच! मग किंचित दातओठ चावून, नखे घुसवून तिचे झाकण उघडले जायचे. डबीत काताची बारीक पूड असली तर उत्तमच नाहीतर मग त्यातल्या त्यात मोठ्या अंगाचे दोन तीन तुकडे बाहेर काढले जायचे. त्या तुकड्यांच्या पोटात अंगठा आणि आणि तर्जनीची वाघनखे घुसत अन त्याची शकले होत. लालसर करड्या रंगाचे बारीक दोनचार तुकडे चुना लावलेल्या भागावर येऊन विराजमान होत असत. बाकीची 'कात'करी मंडळी पुन्हा डबीबंद !

आता बारी असे सुपारीच्या डबीची. ही डबी नानाविध आकाराची अन धातूंची. पितळी, स्टील, जर्मन, प्लास्टिक अशा रुपात ती असे. खाणारयाची क्षमता अन आवड यानुसार तिचा लहानमोठा देह ठरलेला. गडी 'पान'दार असेल तर चंचीही मोठी अन ह्या डब्यादेखील मोठ्या असत. तर ही सुपारीची डबी बाहेर आली की त्यातल्या सुपारया बाहेर काढल्या जात. सुपारी देखील अनेक तऱ्हेची.लाल ,भाजकी, चिकणी, गोल,चपटी असे बरेच प्रकार असत. दर वेळेस सगळ्या सुपारया बाहेर यायच्या, त्याना झटकले जायचे, त्यांची फुंकर मारून साफ सफाई व्हायची. मग त्यातल्याच एका सुबक सुपारीला निवडून बाजूला केले जायचे, अन बाकी साळकाया माळकायांची रवानगी पुन्हा डबीत व्हायची .
कात सुपारी ही अशी आजन्म कारावासात असायची, थोड्या वेळासाठी पेंरोलवर बाहेर येऊन बिचारी पुन्हा काळकोठडीत जायची. पण बिचारी कधी एका तुकड्याने तक्रार करत नसत !

हे सर्व सुरू असताना सर्वात वजनदार ऐवज त्या पानाच्या चंचीत अंगाला आळोखे पिळोखे देत पहुडलेला असायचा, तो म्हणजे अडकित्ता ! याचे नावच कसे भरभक्कम आहे ना !! पानावर चुना - काताची अणकुचीदार नक्षी काढून झाली की मांडीवर हात झटकवत अडकित्ता बाहेर काढला जायचा. हा कधी कधी खूपच वजनदार असायचा, इतका की रागाने कोणाला फेकून मारला तर डोक्याला मजबूत खोकच पडावी ! ह्या अडकित्त्याच्या धारेवरून हात फिरवून आधी तिला साफ केले जायचे. मग निवडलेल्या सुपारीची रवानगी अडकित्त्याच्या मधोमध ! कधी कधी समोरच्या माणसाशी काका बोलत बसले की ती सुपारी बिचारी अडकित्त्याच्या पात्यामध्ये ताटकळत बसून पाऊस पाण्याच्या गप्पा ऐकत बसायची. बोलता बोलता अचानकच तिच्यावर पाती दाबली जायची अन तिचे बारीक काप केले जायचे. शार्पनर मध्ये शिसपेन्सिलला खुर करताना पेन्सिलचे जसे गोलाकार काप वर येतात तसे अडकित्त्यातून सुपारीचे गोलाकार काप बाहेर यायचे. दोन हाताच्या मध्ये अडकित्ता पकडल्याने सुपारीचे ते 'कात्रण' अलगद तळहातात साठायचे. कधी कधी लहर फिरली की मग गोलाकार कापाऐवजी नुसते फटाफट तुकडे पाडून सुपारीला अडकित्त्याच्या फाट्यावर मारले जायचे. सुपारीची अशी मुक्तछंदीय कापणी केल्यावर त्या बुकण्याची रवानगी पानावर ! एखादी दुसरी लवंग त्यावर नैवेद्य ठेवावा तसे ठेवली जायची.

सगळा जामानिमा नीट जमल्यावर पानाची हळुवार घडी घातली जायची. त्याला दुमडले जायचे. पान तोंडात घालण्याआधी काका चूळ भरायचे. अगदी खळाळा आवाज करून ! मग ते पान गालाच्या या कोपरयातून ते त्या कोपरयात सावकाशपणे घोळवले जायचे.
काकानी चंची उघडली की त्यातल्या अस्त्रांचा वास बहुधा लांबपर्यंत जात असावा. कारण तिथे काही वेळातच आणखी काही कष्टकरी गोळा व्हायचे. मग पान बनविण्याचा हा विधी लांबत जायचा. या दरम्यानच्या गप्पांना कोणतेही क्षितीजबंधन नसे. 'वारी ते बारी' अन 'संकटाचा कैवारी ते चुलीम्होरची फुकारी' असा मोठा आकृतीबंध ह्या गप्पाष्टकात असायचा..

काका आधी तंबाखूही खायचे. किसान जर्दा ते गाय छाप तंबाखू असे वाण पुर्वी त्या चंचीत असत. तर्जनीने तंबाखू चोळून चोळून त्यांच्या तळहाताचा रंग बदलला होता. शेतातल्या एका गड्याला तंबाखूने जीव घालवावा लागला तेंव्हापासून त्यांच्या चंचीतून तंबाखू हद्दपार झालीय.

पुर्वी चंची कॉटनच्या मळकट कापडातली वा मांजरपाटाच्या तुकड्यातली असायची, आता ती भरजरी सुद्धा मिळते. पण काकांकडे मागच्या काही काळापर्यंत मांजरपाटाच्या तुकड्यातली अन नाडीने बांधलेली अशा रुपातलीच चंची होती. त्यांच्या कंबरेवर ती रुळत असे, त्यांच्या अनेक सुख दुःखाच्या आठवणीत त्यांच्या मनाचा भार हलका करत असे. कधी कधी तिच्यावर पडलेले अश्रू ती आनंदाने शोषुन घेई. काका कधीही कोठेही गेलेले असोत ही चंची त्यांच्या बरोबर असेच...
त्याना निवांत पान खात बसलेले पाहिले की इतर मंडळीदेखील पुढे होत अन चंची उघडण्याचा प्रेमळ लडिवाळ आग्रह पुन्हा पुन्हा होत जाई अन जादुई पोतडी उघडावी तशी ती चंची उघडली जाई अन त्या सर्व सुहृदात मायेच्या शब्दांचा सोनेरी मुलामा असलेल्या गप्पांना प्रारंभ होई ....

आता ती चंची घराच्या सांदाडीत पडून असते, तिच्यावर धुळीची पुटे चढलीत. काकांना दात राहिले नाहीत त्यामुळे पानही बंद झाले अन पानाबरोबरच्या पानगप्पाही अबोल झाल्या. लोकांना आता एकेमेकाकडे जायला वेळ नाही, गप्पा कोण कुणाबरोबर व कशासाठी मारेल बरे ? काका ओसरीवर बसून असतात, कधी काळी पानाच्या लालीने रंगेलेले त्यांचे लालबुंद ओठ आता जागोजागी चिरले आहेत, सुकले आहेत. वय वाढले की सवयी बदलाव्या लागतात, कधी इच्छेखातर तर कधी शरीराखातर.........

आता गावागावातही गुटख्याच्या पुड्या सरकारकृपेने पोहोचल्या आहेत त्यामुळे चंची अनेक घरातून हद्दपार झालीय अन बायाबापडयांच्या कमरेची ही पिढ्या न पिढ्याची साथीदार हळूहळू इतिहासात जाऊ पाहतेय. पानाच्या चंचीत जी बात होती ती नंतर आलेल्या कुठल्याच गोष्टीत नव्हती कारण त्यात मायेचा ओलावा असणाऱ्या गप्पा झडाव्यात इतकी ताकद नव्हती, त्यात आहे तो फक्त बाजारू फसवेपणा जो अनेकांचे प्राण घेऊन गेलाय. त्या चंचीची कमी येणारया पिढीला जाणवेल का नाही हे माहिती नाही पण उतरत्या सूर्याकडे आपले ओलेते डोळे लावून दिगंतात हरवून चाललेल्या गावाकडच्या पिकल्या पानांना मात्र याची फार रुखरुख लागून राहिली आहे हे खरे ....

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_0.html

chanchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast..... Happy

मस्त!

छान!!! जशी पानाची चंची, त्याचप्रमाणे घरी बायकांसाठी पानाचा डबा असायचा त्यातसुध्दा हे सर्व जिन्नस मांडून ठेवलेले असायचे. त्यांचे आकारसुध्दा पाहण्यासारखे असायचे.

आमच्या कडे होते असे पानाचे डबे. एक तांब्याचा षटकोनी, एक स्टेनलेस स्टीलचा एखाद्या ग्रंथासारखा आकार होता, दोन्ही बाजुनी ३/४ भाग ग्रथांच्या कव्हर सारखे उघडायचे आणि उर्वरीत १/४ भाग स्लाईड करुन उघडायचे.

छान. मी कधी असे पान खाणे वगैरे जवळून पाहीले नाही. पण लग्न समारंभात वगैरे तो पानाचा डबा, अडकित्ता पाहीला आहे.

मस्तं लेख! पानाची चन्चि प्रथमच पाहयली.
माझ्या आजीकडे पानदान होतं राजहंसच्या आकारातलं.

माझ्या आजोबांकडे पण हि चंची होती. बोलता बोलता त्यांना सुपारी कात्रयाची सवय होती. गड्यावर काम करत नाही म्हणून किंवा गायी म्हशी वर दूध देताना त्रास दिला तर सगळा राग ते त्या बिचाऱ्या सुपारीवर काढत. पण त्यांचा अडकित्ता म्हणजे जीव कि प्राण होता. लहान होतो मी, खेळणं म्हणून अडकित्ता घेऊन मागील दारी खेळत बसलो. आजोबा जसे सुपारी कातरतात तसा प्रयत्न मी करत होतो. अडकित्ता सापडत नाही म्हणून आमचा मोठा बाप्पा चिडला, माझ्या कडे अडकित्ता सापडल्यावर माझी पूजा बांधण्यात आली. नंतर मी अडकित्ता घेऊन सुपारी कातरतोय हे कळल्यावर आज्जीनी उत्तर पूजा घातली.