ओळख (जुन्या मायबोलीवरून)

Submitted by दाद on 22 July, 2016 - 02:28

श्रांत, क्लांत होऊन पडलेल्या आईंच्या हातावरून मिताने हात फ़िरवला. थोंडं कण्हून त्या परत झोपी गेल्या. ऍनेस्थेशियाची गुंगी पूर्ण उतरायला अजून आठेक तास तरी लागतिल. थकून बाजूच्याच आराम खुर्चीवर झोपी गेलेला रवी, किती आईसारखा दिसतो! तिने उठून एक ब्लॅंकेट त्याच्या अंगावर हलकेच घातलं. एकदम दचकून "काय झालं? कशी आहे धाकटी.... आपलं.... आई?" म्हणून धडपडत उठून बसता झाला.

"अरे, अरे... काही नाही. झोपल्यात शांतपणे. तू ही पड अजून जरा वेळ. मी जागी आहे... लागलं तर उठवेन हं मी तुला" आपण किती मृदू, किती हळवे झालोय ते तिचं तिलाच जाणवलं. भाबड्या चेहर्‍याने तिच्याकडे बघणार्‍या रवीच्या डोक्यावरून तिने हात फिरवला आणि थोपटल्यासारखं केलं.

"मितू, तूला काय वाटतं?" कूस बदलून झोपी गेला असं वाटतानाच रवीने डोकं वर उचलून तिला विचारलं.

"मला काय वाटणार? तूला वाटतंय तेच रे." उठून ग्लासात त्याच्यासाठी पाणी ओतत ती म्हणाली "थोडी भिती, anxiety . रवी, तू स्वत: ब्रेन सर्जन आहेस. असं हात पाय गाळून कसं चालेल?"

"मी... मी तिला अजून पुरतं ओळखतंही नाही गं. संपूर्ण आयुष्य असंच गेलं.... तिला deny करता करताच. आत्ता जरा संधी मिळतेय तर.... हे. sh&* I hate this. I was never so helpless.... ever in my life "

"रवी, don't do this to yourself . त्रागा करून काही उपयोग आहे का? ह्यातून बाहेर पडल्यावर अजून खूप काही करायचंय. हे घे, पाणी पी आणि स्वस्थं डोळे मिटून पड. don't worry , राजा. जे होतं ना, ते चांगल्यासाठी यावर विश्वास ठेव."

आज्ञाधारक मुलासारखा रवीने ग्लास रिकामा करून मितापुढे धरला. ग्लास घेणार्‍या मिताचा दुसरा हात रवीने ज्या पद्धत्तीने धरला त्यावरून हा चाळीस वर्षाचा आपला नवरा याक्षणी आपल्या पाच वर्षाच्या गुल्ल्याइतकाच घाबरलाय हे जाणवून ती मनातून हलली. पण गुल्ल्यासमोर ठेवते तसंच आश्वासक हसू चेहर्‍यावर आणून तिने मान हलवली. आणि अगदी गुल्ल्यासारखाच रवी झोपीही गेला.

हातातलं सायकॉलॉजीवरचं पुस्तक तिने परत उघडलं. पण एका पानातच तिची नजर पुन्हा आईंच्या चेहर्‍यावर खिळली. तिच्या नकळत एक नि:श्वास निघून गेला....
जगाचाच काय पण आपल्याही अस्तित्वाचा पत्ता नसतानाही काही चेहरे दु:खी का वाटतात? की, माणसाबद्दल जरा अजून कळल्यावर आपण त्यांना वाचतोही वेगळ्या angle ने की काय? must be .

गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या गोष्टी इतक्या वेगाने घडल्या की सांगोपांग असा विचार करून कृती करण्याइतका वेळच मिळाला नाही. तिचा आणि रवीचा, एकमेकांवरचा विश्वास, आपापल्या संस्कारांवरचा विश्वास, आणि ज्याला गट्फ़ीलिंग म्हणतात ते... ह्यावर जमवलेली कसरत होती and so far so good .....

अगदी पहिल्यांदा भेटली ती आईंना ते आठवलं तिला. तिच्या लग्नात... म्हणजे डमी लग्नात...
मिता आणि रवी लंडनमध्ये भेटले. रवी, ब्रेन सर्जन आणि मिता आधी डॉक्टर आणि शिवाय क्लिनिकल सायकॉलोजिस्ट. मनं जुळली, मतंही जुळली आणि लग्नं करायचं ठरवलं. लगेच भारतात जाऊ शकणार नाही म्हटल्यावर दोघांनी आपापल्या घरी कळवून रजिस्टर लग्न करूनसुद्धा टाकलं. पण दोन्ही घरातून शास्त्रोक्त लग्नविधी करण्यासाठी धोशा लावला होता. तब्बल ७ महिन्यांनी जेमतेम तीन आठवड्यांच्या सुट्टीवर दोघे "लग्नासाठी" म्हणून भारतात गेले. मिताच्या घरी मुंबईत सगळ्यांना हे डमी लग्नं प्रकरण माहीत होतं. रवीच्या घरातल्या, त्याचे बाबा, आई आणि काकूंनाच माहीत होतं.

रवीचं कागलकर घराणं म्हणजे तालुक्यापर्यंतच्या गावांमधले ते जहागिरदार. शेतीवाडी, दुकानं, साखर कारखाना, आणि पेट्रोलपंपापासून गास सिलिंडर पर्यंत कसया कसल्या वेगवेगळ्या एजंसीज... असलं भलतंच "गरीब" प्रकरण होतं. त्यातल्या ९० टक्के गोष्टी रवीला माहित नव्हत्या, पसंत नव्हत्या,... or he simply didn't care . घरच्या कारभारांबाबत तो वैतागून का होईना शिव्या घालण्यापुरता का होईना पण बोलायचा.... पण घरातल्या माणसांपैकी एक त्याची आज्जी सोडल्यास अगदी स्वत्:च्या आईबद्दलही बोलणं नको असायचं त्याला. अगदी सुरुवातिच्या काळात शिताफीने विषय टाळायचा पण नंतर कधीतरी त्याने मिताकडे कबूल केलं की घरातल्यांबद्दल त्याला बोलणं नको वाटतं. थोडा तडकायचाच. मग उगीच कशाला म्हणून मिताही फार खोलात जात नसे.

रवी त्याच्या काकींकडे वाढला. त्यानंतर हॉस्टेलवर ठेवलं त्याला शिक्षणासाठी, अगदी दहा वर्षांचा असल्यापासून. कशी ओढ असणार घरची? थोडा मोठा झाल्यावर तर आपणहून बाहेर राहू लागला. आज्जी गेली तेव्हा तिच्या इच्छेनुसार तिच्या दहनासाठी गावी गेला तेच काय ते, तेव्हाही फार मोठा नव्हताच. त्याननंतर पूर्ण आयुष्य शहरात हॉस्पिटल मध्ये, आणि मग परदेशी उच्चशिक्षणासाठी. नाही म्हणायला वडिलांना, काकींना महिन्यातून एक फोन करायचा पण एक "कर्मकांड" केल्यासारखं. थोडा धाक म्हणूनही असेल. त्यांचं फोनवर पैशाबद्दल अपडेट देणं सुरून झालं की, बोलणं आवरतं घेऊन संपवायचाही.

उलट तिच्या घरच्यांबद्दल खूप आस्था होती त्याला. आपल्या सासू-सासर्‍यांशी, मेव्हण्याशी खूप मनापासून, समरसून बोलायचा, रवी.

थोडी स्वत्:ची मुळं नाकरून, तोडून दुसरीकडे रुजू पहाणारा रवी.... तिचं मनस्वी प्रेम होतं त्याच्यावर, वाईटही वाटायचं तिला. पण हे ही ठाऊक होतं की, हळू हळू तो त्यातून बाहेर पडेल... मनाचे हे व्यापार तिला पूर्ण माहित होते.
मिताला लग्नाचा गोंधळ आठवला.....
स्टेशनवर उतरल्यावर तिचे आई वडील वगैरे सगळे त्यांच्या मूळ वाड्यावर गेले. आजूबाजूच्या झाडांपासूनही जरा फटकून की, झाडं वाड्यापासून? माहीत नाही पण हा प्रचंड वाडा बघितल्याक्षणी तिच्या अंगावर आल्यासारखा वाटला.
जवळ जवळ दीड पुरुष उंच जोतं, दोन माणसांच्या कवेत मावणार नाहीत असे सुरुदार खांब... असला मोठ्ठा डोलारा घेऊन उभा असलेला वाडा मायाळू पण नव्वदीतही काडकन सुपारी फोडु शकणार्‍या आजोबांसारखा न वाटता रखरखीत दाढी, मिशा, जटांचं जंजाळ बाळगणार्‍या एखाद्या कोपिष्ट अडभंगासारखा दिसत होता. त्यातल्या त्यात तिला आवडलेली जागा म्हणजे परसदारची विहीर आणि तिच्याशी लडिवाळ करणारी छोटी बाग. ती म्हणे रवीच्या आज्जीने जोपासलेली. त्यात काम करणार्‍या छोट्या संताजीशी गट्टीच जमली. एरवी गावात शेतावरच्या घरात राबणारा गडी फक्त या बागेच्या देखभालीसाठी भल्या पहाटे इथे यायचा. लिहिता वाचता येणारा, थोडंफार तालुक्यापर्यंत का होईना "जग" फिरून आलेला हा छोटा शिलेदार तिला खूप आवडला.

अंगभर दागिने घातलेल्या, उंच्-निंच, उग्र चेहर्‍याच्या मोठ्ठ्या काकू तिला वाड्यासारख्याच शुष्क वाटल्या. त्यांच्या 'हो'त 'हो' मिळवणारे हे मिशाळ तगडे गृहस्थ म्हणजे रवीचे बाबा हे तिला सांगितल्यावर कळलं. दोघांनी ज्या पद्धतीने तिला, तिच्या घरच्यांना "बघितलं" त्यावरून आपल्याला या घरात आठवड्यापेक्षा जास्तं रहायचं नाहीये हे आठवून तिला बरंच वाटलं. उलट रवीने थोडा एकांत मिळताच जेव्हा "बघ, मी सांगितलं होतं ना..... कसली माणसं आहेत इथे..." वगैरे चालू केलं तेव्हा तिनेच त्याची समजूत काढली. "अरे, लग्नं enjoy करूया रे... माझ्या आई-पपांबद्दल काळजी करू नकोस. त्यांनी जग बघितलय, तुला ओळखतात राजा ते.... उलट तुझी माझ्याशी गाठ आहे म्हणून पपा तुझ्याच काळजीत आहेत ते बघ आधी काय ते...."

प्रवासाच्या दगदगीने थकल्याने आई-पपा दोघेही थोडे आजारल्यासारखे झाले होते त्यामुळे त्यादिवशी वाड्यातच राहिले. रवी वाड्यावरच रहाणार होता कारण जानवसघर म्हणून शेतावरचं घर तयार केलं होतं म्हणे. रवीला सोबत घेऊन गावात बाहेर पडणं शक्यच न्व्हतं. लग्नं चार दिवसांनी होतं त्यामुळे तसं नात्यातलंही कुणी आलं नव्हतं अजून. मग धमणीतून संताजीच्या भाचीला बरोबर घेऊन जाताना तिला त्याच्याकडून घरातल्या, गावातल्या अनेक गोष्टी कळल्या.

संताजीचे वडील, बुधाजी... म्हणजे रवीच्या आईबरोबर तिच्या माहेराहून आलेला गडी. इकडेच राहिला. स्वत्:च्या लेकीपेक्षा धाकट्या काकींवर त्याचा "लई" जीव.

शिकलेला असा रवी एकच त्यांच्या कुटुंबात. वाड्यात घरातले असे, मोठ्या काकी, रवीचे बाबा रहातात. रवीच्या आई शेतावरल्या घरात रहातात, शेतीचा रामरगाडा बघायला. मोठे काका काही वर्षांपासून परागंदा आहेत, संन्यास घेतलाय म्हणे... पण कुणी त्यांना त्यानंतर पाहिल्याचं सांगत नाहीत.
धाकट्या काकी म्हणजे रवीच्या आईच्या बाळंतपणातल्या आजारामुळे, रवीचं संगोपन मोठ्या काकूंनीच केलय. त्या स्वत: बड्या घरच्या आहेत, शेती सोडल्यास सगळा कारभार त्याच, रवीच्या बाबांना हाताशी धरून बघतात.
थोडं बरं वाटायला लागल्यावर धाकट्या काकी घरातलं बघायला लागल्या. पण मग शेतीचं बघायला शेतावरच येऊन राहिल्या. वगैरे वगैरे....

गावात वाड्याचा दरारा होता हे त्याने सांगायलाच नको होतं. धमणी बघून माणसं लवून बाजूला होत होती. गाव संपून शेतीचा भाग सुरू झाल्यावर मिताला कुठे बघू अन कुठे नाही असं झालं. तिचे प्रश्न, औत्सुक्य बघून हरकलेला संताजी जमेल तशी माहिती पुरवत होता. सुरुवातीला संकोचून स्वत:च्याच पैजणांशी खेळणारी कोशीही किलबिलायला लागली होती. म्हणता म्हणता गाडीने डांबरी रस्ता सोडला आणि शेताडीचा धुळीचा रस्ता धरला.
***********************************************************************
दारावर टकटक करून Dr Schofield आत आले आणि मिताची तंद्री भंगली... भूतकाळातून बाहेर आली ती.
डॉक्टर जॉन कमरेवर दोन्ही हात ठेवून आपल्या त्या फेमस पोजमध्ये आळीपाळीने झोपलेल्या रवीकडे आणि त्याच्या आईकडे पहात राहिले.
" its amazing how much of a mother resides in a son and vice versa. they look so alike... " एव्हाना रवी उठून उभा राहिला होता.
" How are you John? " रवीने हात पुढे करत म्हटले.
" How are YOU my boy? " त्याचा हात हातात घेत त्याला आपल्या जवळ ओढून घेत त्या वृद्ध सर्जनने रवीच्या पाठीवर थोपटलं.
बेडला अडकवलेला तक्ता हातात घेऊन त्यांनी एक नजर फिरवली.
" she is strong. look... she has responded to our treatment and to me, she is doing well. Now you tell me what do you feel, son? " जॉननी तक्त्यावरून नजर काढून रवीकडे बघत त्याला विचारलं.

" she will pull through, John, I am sure. I am worried, what part of her memory remains with her.... " नर्व्हस, जवळ जवळ हलणार्‍या स्वरात रवी म्हणाला.

" I assure you ravee, she will be happy with what remains with her..... " जॉनच्या स्वरात आत्मविश्वास होता असं वाटेपर्यंत, रवीपेक्षाही हललेल्या स्वरात म्हणाले, " ... it is us who have to struggle with what she has lost, my lad... it is us... ".

रवीच्या एका विनंतीवर हातातली सगळी ऑपरेशन्स री-शेड्यूल करून रवीच्या ह्या गुरूने मुंबईत येऊन, आईंच्या ब्रेन ट्युमरवर ऑपरेशन केलं होतं. आपल्या स्रिझोफेनियाने आजारी पत्नीच्या विस्मृतीची आठवण होऊन हलले होते ते. रवीवर जीव होता त्यांचा म्हणून पोस्ट ऑपरेटीव्ह चेक्-अप कुण्या शिकाऊ डॉक्टरवर न सोडता स्वत: येत होते.

मीताकडे वळून म्हणाले, " and how are you my darling? take care of him for me, will you? he is too upset "
मिताने नुसतीच मान हलवली. जॉन जेव्हा जेव्हा भेटायचे, तेव्हा तेव्हा तिच्या मेंदूल एकतरी "सखोल" खाद्य देऊन जायचे. तेच आताही केलंन. त्यांचं " ... it is us who have to struggle with what she has lost " तिच्या डोक्यात घोळत राहिलं.
आईला लावलेल्या ड्रिपचा वेग, तिच्या अंगावरचं पाघरूण, तिच्या बेडची तिरकी पोझिशन सगळं बघून रवीने येऊन मीताच्या कपाळावर ओठ टेकवले. नुसतेच डोळे मिटून ती आश्वासक हसली. रवी ने परत एकदा त्याच्या खुर्चीत दडी मारली आणि मंद स्वरात घोरूही लागला.

मिताने पुस्तकात डोळे घातले खरे.. पण तिला त्या शेतावरच्या घराच्या दारात उभ्या राहिलेल्या आई दिसू लागल्या.....
शेतातल्या कुणा गड्याने धमणी बघून आधीच घराच्या दिशेने हाळी घातली असावी. कारण धमणी दाराशी जाऊन उभी राहीपर्यंत, कुणबिणीला घेऊन रवीच्या आई दारात उभ्याच होत्या.

मिताला आठवलं. किती थक्क होऊन ती पहात राहिली. रवी किती आईसारखा होता दिसायला. आणि आई किती तरूण होत्या! एखादी खूप लहान मावशी किंवा खूप मोठ्ठी बहीण असावी तश्श्या. 'आई, नमस्कार करते" म्हणुन ती वाकली तर "धाकट्या काकी म्हटलस तरी चालेल गं" असं म्हणून त्यांनी तिला हाताला धरून सारं घर दाखवलं.

घर अगदी साधं चार खोल्यांचं होतं. मागे परसूच्या पडवीत चौखणी झोपाळा पाहून मीता हरकलीच. तिथेच संध्याकाळचा चहा झाला. संध्याकाळी जरा उन्हं उतरल्यावर त्या तिला शेतावरही घेऊन गेल्या. कानात मोत्यांची कुडी, गळ्यात मंगळसूत्रं, आणि मोहनमाळ, हातात पाटल्या, हिरवा चुडा आणि गोठ, डोक्यावरून पदर घेतलेल्या त्या घरंदाज शालीनतेच्या मूर्तीच्या मागे दोन पावलांचं अंतर ठेवून ती चालू लागली. त्यांनीच थांबून तिला आपल्या बरोबर चालायला लावलं. मध्येच कधीतरी थबकून तिने म्हटलं "आई! आईच म्हणते तुम्हाला, चालेल?"
"मला चालेल तर काय?" असं म्हणून त्या हसल्या छानसं.

संध्याकाळी तिच्या आग्रहावरून झोपाळ्यावरंच जेवणं झाली. त्या एक वीणकामाचं काहीतरी घेऊन बसल्या आणि नुसतंत एकदा टाचेने आणि एकदा बोटांनी झोपाळ्याला झोक देत तीही झोपाळ्याच्या एका कोपर्‍यात बसली. इतक्यात बुधाजी आल्याचं कुणबीण सांगत आली. "इथेच बोलावलय म्हणून सांग...."
रातकिड्यांच्या किरकिरीच्याही वर कोल्हापूरी चपलांचा कर्र कर्र आवाज आणि त्याच्याच तालात काठीची ठक ठक करीत बुधाजी मागच्या अंगणात आला. हातातलं गाठोडं त्याने आईंच्या पायाशी ठेवलं.
"अरे, तूच दे तिला" आई म्हणाल्या.
"न्हाई जी. आमची ही असती तर वोटी भरली असती. तुमीच भरा वो."

आईंनी गाठोडं सोडलं. तर सगळं ओटीचं सामान होतं. असोल्या नारळापासून हळद्-कुंकवाच्या पुडी पर्यंत. आईंचे डोळे भरून आले. सुंदर निळ्याजर्दं रंगाच्या, बुट्ट्यांची पैठणीने त्यांनी तिची ओटी भरली. मिता त्यांच्यासमोर वाकली.
"किती किती केलंस बुधाजी! पोरी नमस्कार कर, त्याला. तुझ्या नवर्‍याच्या आजोळचा आहेर आणलाय त्याने...." असं म्हणताना त्यांना हुंदका फुटला.

"गप पोरी गप. इक्तं डोंगराएवडं वोडून काडलंस आविक्श्य... आता सुकाच्या परसंगाला पानी गाळायचं न्हाई अजाबात."
मीताने बुधाजीला वाकून नमस्कार केला. "अष्टपुत्रा सोभाग्येवती हो...." असा घसघशीत आशिर्वादही मिळाला.
आणि "या माऊलीचं काई बगा आता पोरांनो....." असं म्हणून पापण्यांचे सुद्धा केस पांढरे झालेले आपले मिचमिचे डोळे पुसत तो डोंगराएव्हढा म्हातारा रडू लागला.

"बुधाजी... काहीतरी बोलू नकोस. इथेच थांब." आई थोड्या करड्या स्वरात म्हणाल्या. "नाही ते बोलून, कधी केलं नाही ते करायला लावू नकोस मला. घरी जा आणि उद्याच्याला वाड्यावर जा. संतालाही पाठव लवकर. आणि मी पाठवलेली औषधं घे वेळेवारी. कोशे, आज्जाला नीट वस्तीवर घेऊन जा बाळे" बुधाजी मान हलवत हळू हळू गेला.

"त्याचं काही मनावर घेऊ नकोस. इथे असलं काही बाही बोलणारे खूप भेटतील. आपण लक्ष द्यायचं नाही.... " एका क्षणात मिताला, आपल्याला ह्यात गुंतायचं नाहीये याची जाणीव झाली.

"ये, बस झोपाळ्यावर. माझाही इथेच सगळा वेळ जातो. इथून वाडीवर लक्ष ठेवता येतं, उजेड दिवसभर त्यामुळे वाचन, विणणं सगळं झोपाळ्यावरच चालतं. तुलाही आवडला नं?"

त्यानंतर गप्पा झाल्या. डॉक्टर आहेस म्हणे?, भाऊ अन तू दोघंच म्हणे? तीनच आठवड्यांनी परत जाणार म्हणे? .....

या "म्हणे म्हणे" नं ती चक्रावली. त्यांना बरंच काही माहीत नाही असं दिसलं. हो ला हो आणि नाहीला नाही असं फार वेळ बोलणं तिला असह्य झालं. तिने आपणहून मग आपल्या बद्दल, घरच्यांबद्दल सांगितलं. त्यातही रवीचा उल्लेख आला की त्या अगदी कान देऊन ऐकतात म्हटल्यावर तिने त्याच्या कामाबद्दलही बरंच सांगितलं. रवीला त्याच्या क्षेत्रात किती मान आहे, कुठून कुठून त्याला ऑपरेशन्ससाठी बोलावतात, काही ऑपरेशन्स तो मदत म्हणून मोफत करतो वगैरे वगैरे....

"सुखी रहा... बाबांनो.... सुखी रहा... आलेच हं" असं पुटपुटत, डोळे पुसत त्या उठल्या आणि येताना एक छोटी डबी घेऊन आल्या.
"वाड्यात उद्या तुझं मंगळसूत्रं तुला बघायला मिळेलंच. पण मी हे मुद्दाम तुझ्यासाठी करून घेतलं. दररोज घालायला, सुटसुटीत गं.." मग गडबडीने म्हणाल्या "म्हणजे तिकडे घालत असाल तरच हं".

सुंदर सोन्याच्या चेनला दोन बाजूला दोन्-दोन पोवळी आणि गोठलेला एकेकच काळा मणी, आणि मध्ये अगदी छोटुकली एक सोन्याची वाटी. इतकं गोड मंगळसूत्रं तिने बघितलच नव्हतं.
"खूप छान आहे. आई, आम्ही लग्नं केल्या दिवसापासून मी एक छोटं मंगळसूत्र घालतेय, तिकडे सुद्धा. इथे गावात येताना काढून रवीकडे दिलय. आता, हे घालेन, मला खूप आवडलं".
तिच्या चेहर्‍याकडे समाधानाने बघता बघता त्या एकदम म्हणाल्या, "तू खूप गोड हसतेस. तुला सांगितलंय का कुणी, की हसताना तुझे डोळेही हसतात म्हणून?"
मिता परत एकदा थक्क झाली. रवी तिला पहिल्या भेटीत हेच म्हणाला होता.

लग्नाच्या दिवशी ती हट्टाने बुधाजीने दिलेली पैठणी नेसून सिमांतपूजनाला बसली, आईने दिलेल्या मुहुर्तमण्याबरोबर तिने हे मंगळसूत्रही घातलं. एक मोठ्या काकी सोडल्यास कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण त्यांनी विचारल्यावर, "रवीच्या आईंनी दिलंय. छानंय नाही? मला खूप आवडलं" असं म्हणून तिने ते सारखं केल्याचं बघून, आईंनी एका बाजूला मान फिरवून हळुच डोळे पुसल्याचं ती सोडल्यास कुणीच बघितलं नाही.

नंतरचे दिवस एकदम गडबडीत गेले. रवीबरोबर नव्या नवरीचं सोंग वठवताना दोघेही पुन्हा एकदा खर्‍यानेच नव्या वधू-वरांसारखे मोहरून आले.
निघायच्या दोन दिवस आधी आईंच्या शेतावरच्या घरी मीताच्या आग्रहावरून ते दोघे आणि तिचे आई-वडील सगळे जेवायला गेले. संपूर्ण स्वयंपाक आईंनी स्वत:च्या देखरेखीखाली करवून घेतला होता.
आई मिताच्या आईची ओटी भरून म्हणाल्या, "ह्या घरी या, येत रहा असं म्हणून मी तुम्हाला अवघड करणार नाही. तुम्ही समजदार माणसं आहात. तुमची लेक आमच्या मुलाला संभाळणार आहे आणि आमचा मुलगा तुमच्या लेकीला. तेव्हा आजपासून आपली सुखं दु:खं एकाच जातीची झाली. आता मागायचं ते या दोघांसाठी, पुढच्या पिढींसाठी."
निघताना मितालाच खूप अवघड झालं होतं.

पण परत आल्यावर आधी वेद आणि दोनच वर्षांत वाणी... या गोंधळात ती पूर्ण बुडून गेली.
भानावर आणलं ते संताजीच्या फोनने......
*************************************************
"वैनी, रवी भाऊ हायेत काय? त्ये एक जरा.... आपलं.... त्ये.... ह्ये...."
एकतर असा संताजीचा फोन ऐकून मिता धसकलीच होती. आवाजात धीर आणून समजूत घालत ती म्हणाली "संताजी, अरे, रवी ना... तो इथे नाहीये. कामासाठी जर्मनीत आहे सध्या.... काय झालं ते मला सांग बघू नीट. नाहीतर असं कर, मीच फोन करते. वाड्यावर करू?"
"नगं. नगं जी. वाड्यावर कळुसुदिक देऊ नगा, पाया पडतो तुमच्या. धाकल्या काकी आन्नं शिवनार न्हाईत कळलं तर."
" अरे नाही कळवत, काळजी करू नकोस, हो. बर, मग कुठून बोलतोयस?"
"हे... काय आपल्या घरूनच. श्येतावरच्या घरात फोन घेतलाय आता...."

मिताने नंबर लिहून घेतला आणि फोन केला. आईंना वरचेवर चक्कर येते, खूप डोकंही दुखतं वगैरे ऐकल्यावर, आईंवर उपचार करणार्‍या तिथल्या स्थानिक डॉक्टरांशी ती फोनवर बोलली. चाचरत का होईना पण त्यांच्यातल्या डॉक्टरने तिला सांगण्याचं काम केलंच.
"वहिनी, माझं नाव घेऊ नका कुठे. पण मला ट्यूमरची शंका येतेय हे मी दोन महिन्यांपूर्वीच वाड्यावर कळवलं. पुढच्या टेस्ट्स करायला हव्यात आणि ट्रिटमेन्ट लगोलग सुरू व्हायला हवी हो. पण इथे माणसं नाहीत जनावरं रहातात. त्यांच्याकडून तंबी मिळालीये मला, कुठे बोलाल तर म्हणून. तुम्ही आणि रवीभाऊंनी काही हालचाल केली तर एक भला जीव हकनाक जायचा, तो वाचेल हो...."

डॉक्टरांना, संताजीला काही सुचना देऊन तिने भराभर सूत्रं हलवली. मुलांना घेऊन ती तिसर्‍या दिवशी मुंबईत होती. रवीला कळवत होतीच, पण एक अपडेट म्हणून. मुलांना आईकडे ठेवून तिने आपल्या, वडिलांच्या ओळखीने ब्रीच कॅंडीत एक बेड मिळवला. आईंना मुंबईत आणतेय हा शेवटचा अपडेट रवीला देऊन ती गावी पोचली सुद्धा.
त्यातही तिला रवीच्या रिस्पॉन्सची गंमत वाटत राहिली. तिच्या ह्या उपद्व्यापाबद्दल एक अक्षरानेही त्याने विरोध सोडाच पण आश्चर्यही दर्शवलं नाही. उलट जमेल त्या फ़्लाईटने मुंबईत पोचतो असं कळवलंन. तरीही कुठेतरी, फक्त आपल्याला मदत म्हणून तो येतोय. त्यात, ही सगळी धावपळ त्याच्या आईसाठी चाललीये... ह्याचा काहीही संबंध नसल्या सारखा त्याचा रिस्पॉन्स.. तो एक काटा मिताला टोचत राहिला.

वाड्यावर एक फेरी मरून आईंना मुंबईला घेऊन जातेय इतकच तिने बोलून दाखवलं. प्रतिक्रियेसाठी तिने बाबांच्या चेहर्‍याकडे बघितलं. त्यांनी जेव्हा मोठ्या काकींकडे बघितलं तेव्हा..... घृणा घृणा दाटून आली तिच्या मनात. कुणाचीही परवानगी घेण्याचा प्रश्न असा निकालात निघाला. सोळा सतरा वर्षांची कोशी आईंची निगुतीने काळजी घेत होती. बुधाजी तर एका मिनिटासाठीही आईंना नजरेआड होऊ देत नव्हता.

बरोबर बुधाजी आणि कोशीला घेऊन ती आईंबरोबर अ‍ॅम्ब्यूलन्समधून निघालीही. बाहीने डोळे पुसणारा संताजी, जमलेली सगळी गडी माणसं आणि गावकर्‍यांकडे बघून तिला जाणवलं की एक मोठा ठेवा घेऊन चाललोय, बरोबर. दुसर्‍यांदा तिने उठून आईंना लावलेल्या सलाईनचा ड्रिप चेक केला, आणि त्यांच्या अंगावरचं पांघरूण नीट करून समोरच्या बेडवर टेकली... इतका वेळ गप्प गप्प राहिलेला बुधाजी धुमसून रडू लागला.

"अरे, अरे बुधाजी.... असं काय करतोस? मी आहे ना? तुमचा रवीभाऊही येतोय उद्याच. आईंची काळजी करू नको. असा धीर सोडून कसं चालेल, बाबा?" चालत्या अ‍ॅम्ब्यूलन्समध्ये तोल संभाळत त्याच्याजवळ जात ती म्हणाली.

"लई भोगलं पोरीन, लई भोगलं.... जुईसारकी माजी पोर राकिसांच्या घरात र्‍हायली, बाये.... काय सांगू तुला.... माज्या सोताच्या खांद्यावर बसून आनली कवळी नोवरी आनि.... ह्ये काय इपरीत... तुझ्यापून काई लपून ठ्येवाचं न्हाई आता. जिनं आण घातली तिच्या जीवावर उठत्ये आण.... म्हनलं तर... तोडतो मी... माज्या पोटच्या पोरीच्या डुईवर हात ठिवून घ्येतली आण तोडतो आता. "

आई बेशुद्धच होत्या. आता बुधाजीला थांबवणारं कुणीही नव्हतं.... अनेक वर्षांची जीवाची तगमग त्या म्हातार्‍याच्या थरथरत्या मिश्या-कल्ल्यांतून भडाडा बाहेर पडु लागली.

आईंचं लग्नं फार लहान वयात झालं. फक्तं पंधरा वर्षांच्या होत्या त्या तेव्हा, तिसरेपणावर दिलेल्या. बड्या घरातून अजून असलं काही होत असेल असं मिताला वाटलंच नाही. रवीच्या वडिलांच्या पहिल्या दोन बायका अशा ना तशा कारणाने गेल्या. त्यांच्यात आणि आईंमध्ये १९-२० वर्षांचं अंतर हे ऐकून मिताला काय बोलाव ते कळेना.
लग्नानंतर त्यांना लगेचच दिवस राहिले आणि २-४ महिन्यांतच त्यांचा गर्भपात झाला. हे असं दोनदा लागोपाठ थोड्याच महिन्यांच्या अंतराने. बुधाजीच्या मते ह्यात वाड्यावरल्या कुणाचातरी हात होता.

रवी त्यांना अठराव्या वर्षी झाला. पण आधीच्या प्रकारांनी त्या इतक्या आजारल्या होत्या की रवीचं करण्याची ताकदंच उरली नव्हती.
रवीचं संगोपन एव्हढ्या मोठ्या घरात, मोठ्या काकूंच्या देखरेखीखाली होत राहिलं. आजारपणातून उठायला त्यांना जवळ जवळ वर्षं लागलं. तोपर्यंत रवी त्यांना आई म्हणूनसुद्धा ओळखेनासा झाला होता. मोठ्या आई म्हणजे रवीच्या आज्जी त्यांना धीर देत होत्या. हळु हळू रवी आपल्या आईकडे ओढला जाईल असं बघत होत्या. पण मोठ्या काकींच्या धसमुसळ्या, आकांडतांडवी आणि मनमानी स्वभावामुळे यात रवीची ओढाताण होतेय असं लक्षात यायला लागलं. आई जमेल तसं, जमेल तितकं रवीच्या जवळ जायचा प्रयत्न करीत पण त्यांच्या असंही लक्षात आलं की मोठ्या काकींना रवीच्या बाबांचाही पाठिंबा आहे.

त्याच दरम्यान काहीतरी कारण होऊन मोठे काका घर सोडून गेले. त्या धक्क्याने मोठ्या आईंनी अंथरूण धरलं. आता घरचा सगळा कारभार मोठ्या काकी बघू लागल्या, हाताशी रवीच्या बाबांना घेऊन. सासूबाईंचं करण्यात आणि आपली प्रकृती ताळ्यावर आणण्यात गढलेल्या सरळ मनाच्या आईंना एक आघात मात्रं सहन झाला नाही.

एके रात्री मोठ्या आईंना ढास लागली. त्यांना खडीसाखर देण्यासाठी त्या कोठीच्या खोलीत कंदिल घेऊन गेल्या. तिथे चाललेला मोठ्या काकी आणि रवीचे बाबा यांच्यातला प्रकार बघून त्या उभ्या जागी कोसळल्या. खोटं नाटं पिकवून त्यांच्याच अब्रूवर घाला घालण्याचा निर्लज्ज धाक घातला त्या दोघांनी त्यांना. हे सगळं उघड्या डोळ्यांनी सहन करीत त्याच घरात रहाणं शक्यच नव्हतं.

दुसर्‍याच दिवशी रवीला घेऊन माहेरी जायला निघाल्या. "तू कुठेही तोंड घेऊन जा. रवीला नेता येणार नाही....." हे ऐकल्यावर त्यांच्या जीवाची तगमग झाली. त्यांचं माहेर तसं सामधाम परिस्थितीतच होतं. ह्या तालेवार घराच्या नुसत्या फुंकरीनेही कोलमडलं असतं. मोठ्या आईं त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि रवीला घेऊन दोघीही शेतावरच्या घरात रहायला गेल्या. गावात काही दिवस चर्चा झाली पण उघड बोलण्याची टाप नव्हती कुणाचीच.

वाड्यावरच्यांनी आईंच्या माहेरी काय कळवलं कोण जाणे पण एक दिवस 'तू आम्हाला मेलीस आणि आम्ही तुला' असं सांगणारं पत्रं घेऊन मुराळी आला माहेरचा, तेव्हा तर आईंना रडूसुद्धा फुटलं नाही. बधीर झालेल्या ह्या अर्धवट वयाच्या सूनेला मोठ्या आईंनी आपल्या मुलीसारखं संभाळलं.
हळू हळू शेतावर काम करायला गडी मिळेनात... घरातलं काम करणारी गोदाक्का एक दिवस येऊन शेवटचा नमस्कार करून रडत गेली. त्यांनी कितीही केलं तरी, रवीची शाळा, त्याच्याबरोबर खेळायला दोस्तं, त्याच्यासाठी खेळणी, दूध.... सगळ्यातच "अडचण" येऊ लागली.
शिक्षण नाही, माहेरचा हातभार नाही, पैशाचं पाठबळ नाही अशा अवस्थेत आईंनी घरातलं गहाणवट ठेवत, विकत, दीड्-दोन वर्षं झगडा दिला. पण शेवटी घरातल्याच महासत्तेपुढे त्यांना वाकावं लागलं. एक दिवस मोठ्या दिमाखाने येऊन मोठ्या काकी रवीला घेऊन गेल्या. आता लळा लागलेला पोटचा गोळा तोडून देताना आईंची काय अवस्था झाली ते सांगताना बुधाजीला शब्दं सापडेनात. नुसताच असहाय्य मान हलवत तो रडत राहिला. मिताच्याही डोळ्यांना धारा लागल्या.

त्यानंतर रवीला पद्धतशीरपणे त्यांच्यापासून तोडण्याचे प्रयत्नं सुरू झाले. त्यांच्याबद्दल नाही नाही ते सांगून त्या मुलाला इतका फितवला की 'आई' या शब्दाची फारकत घेतली त्याने. दहाव्या वर्षापासून 'चांगल्या' शाळेत म्हणून शहरात बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवला. सुट्टीवर आला तरी वाड्यावरच काय तो वावर. शेतावरच्या प्रचंड विहिरीत पोहायला म्हणुन यायचा पण आईची सावलीही अंगावर पडणार नाही याची आधी घरचे काळजी घ्यायचे आणि नंतर तोच घेऊ लागला.

पण आईंनी शेतात मन गुंतवलं. देवावर विश्वास ठेवून त्यांनी सगळं आयुष्य वेचलं. शेताचं उत्पन्न वाड्याच्या इतर धंद्यांच्या मानाने इतकं क्षुल्लक होतं की, सुरुवातीपासूनच तिकडे दुर्लक्ष केलं वाड्याने. जमेल तसा शेताचा कारभार आईंनी, वाढवला, संभाळला. गावात वाड्याच्या पाठीमागे त्यांना लोक फार मानत. शेतावरचे गडी त्यांच्या जीवाला जीव देणारे होते. मोठ्या काकूंनी रवीचं तसं सगळं रितसर केलं. फार माया लावली असं नाही. जात्याच हुशार रवी मिळालेल्या सगळ्या संधींचं सोनं करत गेला. हे पाहून आपल्या मुलाच्या कल्याणासाठी आईंनी त्याच्यापासूनची फारकत शिरोधार्य मानली.
बेशुद्धीत असलेल्या आईंच्या बाजूल बसून त्यांच्या हातावरून हात फ़िरवीत मिता सारं ऐकत राहिली.

आईंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिला ज ss रा विचार करायला फुरसत मिळली. रवी संध्याकाळपर्यंत पोचतच होता. आपल्याला कळलय ह्यातलं त्याला काय, कधी अन कसं सांगायचं ह्याचा नीट विचार करणं आवश्यक होतं. बुधाजीला आपल्या आईकडेच जबरदस्तीने ठेवून दिलं होतं तिने. हाताशी असावी म्हणून कोशी मात्रं होती तिच्याबरोबर.

दुपारच्या सुमारास डॉक्टर बघून तपासून गेले होते. पुढच्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी म्हणून मिता त्यांच्याबरोबर गेली होती. एव्हाना आई बेशुद्धीतून बाहेर आल्या होत्या. अजाण कोशीने आईंनी विचारल्यावर सारं काही सांगितलं. बुधाजीने काही काही लपवून ठेवलेलं नाही आणि मिताला सगळं कळलय हे समजल्यावर आई रडू लागल्या. घाबरलेल्या कोशीने नर्सला बोलावलं आणि नर्सने मिताला.

मिता धावतच त्यांच्या खोलीत शिरली. आधीच आजारी असलेल्या आई अगदीच पांढर्‍या फट्टक पडल्या होत्या. मिता जवळ येताच त्यांनी तिचा हात धरला.
"माझी शपथ आहे पोरी, रवीला... त्याला यातलं काही सांगू नकोस. त्याला आई म्हणून मोठ्या वहिनीच माहीत आहे, त्यांचा अपमान होईल असं काही त्याला कळता कामा नये. आई-वडील हे आपलं मानाचं स्थान असतं, मुली. त्याला अमंगळ धक्का लागण्यासारखं दु:ख दुसरं नाही. सगळं असून अनाथ होईल माझा पोर. ... तुझ्या पाया पडते... मुली.. रवीला नको सांगू ह्यातलं काहीही.."

म्हणून त्या उठू गेल्या आणि दोघींच्या दुर्दैवाने रवी खोलीत आला.
"काय चाललय? मला काय कळू द्यायचं नाहीये?......" रवीचं हे रूप मिताला एकदम नवीन होतं.

पुढे घडलं त्याला कुणाचाच इलाज नव्हता. एका बाजूला आईंना संभाळत मिताने हळू हळू रवीला सगळं सागितलं.
आईंच्या चेहर्‍याकडे एकटक पहात रवीने फक्त एव्हढच विचारलं, "हे खरय?.... सगळं खरय?...."

मिताकडे असहाय्यपणे बघत मान खाली घालत आईंनी मान हलवली.

"माझ्याकडे बघून बोला, धाकट्या काकी....." नकळत आवाज चढला होता रवीचा.... मिताने आईंचा धरलेला हात दाबला. तिच्या स्पर्शाचा आधार घेऊनच आईंची मान वर झाली. रवीच्या डोळ्यात त्या बघत राहिल्या.... आपलं हरवलेलं की सापडलेलं आईपण?
त्यांच्या पाण्यानं भरलेल्या नजरेत रवीला आपल्या असलेल्या, नसलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.

आपल्या मिठीत कोसळलेल्या आईंना सावरणार्‍या मिताला रवीला थांबवताही आलं नाही. साताठ तास परत परत त्याच्या मोबाईलला फोन करून, व्हॉइस मेसेजेस ठेवून, आणि टेक्स्ट मेसेजेस पाठवून ती थकली. आई तर बोलण्याच्या पलिकडे पोचल्या होत्या. पहाटे कधीतरी तिला टेक्स्ट मेसेज मिळाला रवीचा.
" tell mother I m ok sorry for all the mess mitu luv u ".

हरकलेल्या मिताने ग्लानीतल्या आईंना मुद्दाम उठवून मेसेज जसाच्या तसा सांगितला.
"आई... आई म्हणाला ना गं तो? परत सांग, खरच सांग. आईच म्हणाला ना?"
"होय आई होय. 'आई' म्हणाला तुमचा रवी तुम्हाला... आई म्हणाला", मिताला आपल्याला झालेल्या आनंदाचा जिथे पार लागेना तिथे आईंच्या आनंदाचा कसा लागला असता?

कुणाला कोण सापडलं होतं? मुलाला आई, आईला मुलगा की... मिताला रवीमधला missing piece ?

तो संपूर्ण दिवस आईंचा समाधानात, स्वस्थतेत गेला. मधूनच रवीची चौकशी करत होत्या आणि मिताही त्यांना पटतील, बरं वाटेल अशी कारणं देत राहिली. त्या टेक्स्ट मेसेज नंतर रवीचा पत्ता नव्हता.

दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता रवी दारात उभा राहिला. 'सगळं ठीकय'चा मेसेज पाठवणारा हाच का तो? आईच काय पण मिताही त्याचा अवतार बघून थक्क झाली. केस पिंजारलेले, डोळे तांबारलेले, दोन दिवसांची दाढी वाढलेली.... कसल्यातरी, कोणत्यातरी अनाकलनीय झुंजात लढून आल्यासारखा दिसत होता, रवी.

"कशा... कशी आहेस?", रवीने आईंकडे बघून विचारलं आणि उत्तराची वाटही न बघता मिताकडे वळून तिलाही विचारलं ' how is she?'
रवीने त्यांच्या बेडला लावलेला तक्ता हातात घेतला. त्यानंतर झालेला संवाद हा दोन डोक्टरांमधला होता. आई आळीपाळीने रवीकडे आणि मिताकडे पहात होत्या.
'will she sustain the operation? what do you say? mitU, I want to take her to london or at least get john to come here. I have already talked to him and he has confirmed... he can schedule her as soon as we reach there or... or if required he can perform operation here. I talked to Dr. Sinha, you know the dean here.......'

आईंच्या डोक्याशी येऊन त्याने ड्रिपचा स्पीड बघितला.
'... she is stable for now, I have to complete one more thing. I am going to pay one last visit to those scoundrels.... भडव्यांना दाखवतो अस्सल कागलकर रक्त म्हणजे काय ते... नागडं करून चव्हाट्यावर...'

'रवीssss....,' सगळं बळ एकवटून आई ओरडल्या. 'काय ते मराठीत, मला कळेल असं बोल.'

रवी त्यांच्या कॉटच्या जवळ गेला आणि एक एक शब्द दात ओठ खात, त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाला, 'मी, माझा बाप म्हणवणार्‍या त्या नराधमाला आणि त्या बाजारबसवी...'

'तोंड आवर रवीss', आई ओरडल्या. धसकून मिता थिजलीच. हे काय करतोय रवी? त्याच्या आतला 'मुलगा' डोक्टर रवीची सगळी कवचं भेदून बाहेर पडला होता. गलिच्छ शिव्या ओकणारा हा आपला रवी नसून कुणीतरी वेगळाच माणूस आहे असं मिताला क्षणभर वाटून गेलं. आईंच्या बेडचे बाजूचे काठ हातात घट्ट धरून रवी त्यांच्या डोळ्यात बघत होता.

'का आवरू? का? का ते सांग मला आधी. नाही आवरणार. मनमानी केली. हलकट साले', रवीचा तोल सुटला होता. आपण स्वतंत्र खोलीत असलो तरीही, हॉस्पिटलमध्ये आहोत आणि आपल्या मरणाच्या दारातल्या आईशी बोलतोय हे तो जवळ जवळ विसरल्यासारखा दिसत होता.
'तुला आई बनू दिलं नाही, मला आई मिळू दिली नाही माद&*^&, साले. तुझ्या-माझ्या आयुष्याची अशी वाट लावायचा काय अधिकार त्यांना? कोण जाब विचारणार त्यांना? कोण?'

'तू?', अतिशय शांत, थंड आवाजात आईंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं सुचलं नाही, रवीला.
'अगदी खरं सांग रवी, तुला आई नव्हतीच का रे? आईसारखीच माया त्यांच्यापरीने काकींनी लावली नाही का?'
रवी संतापून येरझारा घालत होता.
'... तुझं सगळं केलय त्यांनी रितीने, त्यांना जमेल, कळेल, झेपेल तसं. हे सगळं तुला कळलं नसतं तर...., तर तुझ्यासाठी तुझी आई कोण होती? काकीच, ना? तुझ्यासाठी तुझे वडीलही तेच. त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा देण्याची जबाबदारी तुझी नाही, माझीही नाही. त्याचं मोजमाप करणारा 'तो', वर बसलाय तिथे. ते ओझं उगीच आपल्या डोक्यावर घेऊ नकोस.'

'... तुला तिथे जाऊन हवा तो तमाशा करण्यापासून मी हात धरून तर थांबवू शकत नाही?'
रवी थांबला आणि कॉटचे कठडे धरून उभा राहिला.
'... कुणाला सुख आहे यातून? सांडून गेलेल्या अत्तराला परत कुपीत भरण्याचा अट्टाहास आहे तुझा. तुझ्या अशा वागण्याने काय मिळवणार आहेस? माझं न मिळालेलं आईपण, तुझं न मिळालेलं बालपण? यातलं काहीही परत मिळणार नाहीये, हे आधी समजून घे, व्यवस्थीत. हा तुझ्या माझ्या दैवाचा भाग आहे' आईंना श्वास लागत होता बोलताना. मिताने त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. तिला हातानेच थांबवून त्या म्हणाल्या, 'रवी, आई-मुलगा म्हणून आपल्यातलं पहिलं बोलणं असं व्हावं.... हा सुद्धा दैवाचाच भाग आहे, रे.'

'....घडून गेलं त्याला इलाज नाही आता, कुणाचाच. ते चक्र नाही मागे फिरवता येणार. पण आता घडेल ते तर तुझ्या हातात आहे? सोडून दे त्यांना त्यांच्या दैवावर. तुझ्या बाजूने माफ करून टाक आणि मोकळा हो ह्यातून. मी कधीच केलंय. अजून एक सांगत्ये ते नीट ऐक. तुला आत्ता वाटतय की असलं काहीतरी विपरीत करून तुला बरं वाटेल पण.... तुझी तुलाच लाज वाटेल नंतर..... मी तुला ओळख.... ओळखते'

आईंनी आतून फुटणारा आवेग संभाळत त्याच्या हातावर हात ठेवला, 'ऐकतोयस ना, रवी?'

संथ होत जाणार्‍या वादळासारखा, त्याच आक्रसलेला चेहरा शांत होत गेला, डोळे निवले, ताठरलेले खांदे, हात सैलावले, आईंच्या स्पर्शाने.
'तुझं... तुझं ऐकेन. आणि अजून एक - आई, तू मला हाथ धरूनच काय पण नुसत्या शब्दानेही अडवू शकतेस', एव्हढं बोलून डोळ्यातलं पाणी न आवरता किंवा लपवताही तो खिडकीतून बाहेर पहात उभा राहिला.

काही काही नाती इतक्या वर्षांचा भिन्न वाटांवरचा प्रवास, भोगलेल्या, न भोगलेल्याचे चटके, सगळं सगळं ओलांडून कशी पल्याड उभी रहातात, एकमेकांसाठी, एकमेकांना संभाळत ते पाहून मिता थक्क झाली.

तेव्हापासून दररोज रवी वेद आणि वाणीला बरोबर घेऊन येऊ लागला. वाणी दिसायला अगदी रवीच्या वळणावर गेली होती. जावळ नव्हतंच तिला. तस्संच तुळतुळीत डोकं, मोठ्ठे मोठ्ठे डोळे, नाकाचा नुसताच शेंडा आणि अखंड बडबड.
आज्जीच्या पलंगावर बसून 'इथे इथे नाच रे मोरा...' करण्यात रमलीही. त्यानंतर आई औषधांना छान response देत गेल्या. ऑपरेशन अटळ होतं पण ते पेलण्याची शरिराची आणि मनाची तयारी व्हायला वेळ लागला नाही.

*******************************************************************************
आईंचा जरा जोरात कण्हण्याचा आवाज ऐकून मिता भानावर आली, सजग झाली. हलकेच हाक मारून तिने रवीला उठवलं आणि जॉनला पेज केलं. काही मिनिटांतच जॉन हजर झाले. चट्-चट आईंच्या व्हायटल साईन्स बघितल्या. आईंनी एव्हाना पूर्णपणे डोळे उघडले होते. रवी मिताचा हात घट्ट धरून नुसताच भेदरून उभा होता.

आपल्या मृदू, हलक्या स्वरात जॉननी आईंना हाका मारल्या अन मग समजून घेऊन रवीला पुढे केला. एका हातात जॉनचा हात घट्ट धरत रवीने आई ला हाक मारली, 'आई, आई... कसं वाटतय तुला?'
आईंनी सैरभैर होऊन खोलीभर नजर फिरवली. उभ्या असलेल्या मिता, नर्सेस, डॉ. जोन आणि मग रवीवर स्थिर केली.

त्यांच्या हातावर हात ठेवत त्याने परत हाक मारली, 'आई, मला ओळखलस? मी.... रवी, तुझा... रवी'
रवीचा हलणारा, रुद्ध होत चाललेला स्वर ऐकून खोलीतल्या प्रत्येकाचे डोळे भरले.
आईंच्या डोळ्यात ओळख दिसेना. त्या परत खोलीभर भिरभिरल्या. मिता पुढे झाली पण हाक मारण्याआधीच तिला त्यांची अनोळखी नजर भेटली.

एक खोल नि:श्वास टाकून रवी वळला आणि खोलीबाहेर पडला. जॉननी नर्सेसना सुचना दिल्या आणि त्याला भेटण्यासाठी ते त्वरेने बाहेर आले. त्यांना बघताच रवी लहान मुलासारखा त्यांच्या मिठीत कोसळून रडू लागला. 'I am orphan once again, john, ...orphan once again....' .
इथे खोलीत आईंबरोबर थांबलेल्या मिताला नुसतेच त्याचे घुसमटलेले हुंदके ऐकू येत होते... तिच्याही डोळ्यांना धारा लागल्या आणि आई या सगळ्या प्रकाराकडे प्रश्नांकित नजरेने बघत होत्या.

जॉन त्याला समजावत होते '.. sometimes brain revives memory connections later. its rare but can happen .. '.
रवी स्वत्: ब्रेन सर्जन होता. ह्या आशेचं स्टॅटिस्टिक्स त्याला पूर्णत: ठाऊक होतं. अत्यंत निराश होऊन तो खोलीबाहेरच्या कोचावर बसून राहिला. त्याच्याशी बोलायला आलेल्या मितालाही 'हं, हू...' यापलिकडे उत्तरं दिली नाहीत, त्याने. मिताला परत खोलीत, आईंकडे जाणं भाग होतं.

थोड्या वेळाने बुधाजी, कोशी आणि नातवंडांना घेऊन मिताचे आई-पप्पा आले. आईंचा जरा डोळा लागला होता. आई-पप्पांशी आणि रवीशी बोलत मिताही बाहेरच थांबली. खोलीकडे बोट दाखवत 'आज्जीss आज्जीss' चा धोशा लावलेल्या वाणीला कडेवर घेऊन बुधाजी आत शिरला. त्याच्या खांद्यावरच्या वाणीला बघून मात्र आईंनी जोरात हाक मारली....
"रवीss.... ये बाळा..... आईकडे ये ssss ."
झेप घेऊन वाणी आज्जीच्या बाजूला जाऊन बसलीही.

"ही बाबा नाही... ही वाणी आहे" असं आज्जीला समजावून देऊन तिने त्यांचा सलाईनची सुई टोचलेला पालथा हात उलथा केलाही.

रवी आईंची हाक ऐकून धावत आत आला आणि दारातच चित्र होऊन थांबला....
आपल्याकडे चकित होऊन पहाणार्‍या आज्जीच्या हातावर वाणीचं 'इथे इथे नाच रे मोरा.... ' सुरू झालं होतं. तिच्या जोरदार 'भुर्र sss उडून जा....' ला तिचा तोल जाऊन ती पडणार असं वाटत असतानाच आई त्याच्याकडे बघून म्हणाल्या, 'रवी, अरे, आवर रे हिला... मला नाही झेपत, पडेल रे पोर, मिता कुठंय?'
आईंचा आवाज ऐकून सगळेच आत आले. मिता सादळलेल्या पापण्या पुन्हा पुन्हा फडफडवीत पहात राहिली....

रवी वाणीला उचलून घेऊन नाचत सुटला होता खोलीभर, तिच्याबरोबर "भुर्र sss ..." करीत......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आह..... अगदी... हुश्श झालं शेवट वाचुन... आमच्याही पापण्या सादळल्याना...
दाद.. तुम्ही छान लिहिताच.. अजुन काही बोलायाची गरजच नाही....

खुपच सुंदर... Happy

दाद, तुमच्या लिखाणाला अप्रतिम म्हणणे म्हणजे पिवळा पीतांबर.....

काय जिवंत वर्णन केले आहे? निशब्द.....

माझ्याकडुन एक मानाचा मुजरा स्विकारा.

<दाद, तुमच्या लिखाणाला अप्रतिम म्हणणे म्हणजे पिवळा पीतांबर.....

काय जिवंत वर्णन केले आहे? निशब्द.....

माझ्याकडुन मानाचा मुजरा स्विकारा.>++++१००
--------/\----------

Pages