'लौकिक आणि अलौकिक' - डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचा कार्यक्रम

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

​लोकसाहित्य व संस्कृती, संतसाहित्य आणि दैवतविज्ञान अशा विषयांमध्ये संशोधन करणारे व्यासंगी अभ्यासक व साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मूलगामी संशोधनाचा आणि लालित्यपूर्ण लेखनाचा आनंद घेण्याच्या हेतूने त्यांच्या जन्मदिनी, गुरुवार, दि. २१ जुलै रोजी अरभाट फिल्म्स्‌ आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे, यांनी ’लौकिक ​आणि​ अलौकिक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात संध्या. ७ वाजता होणार्‍या डॉ. ढेरे यांच्या निवडक साहित्याच्या अभिवाचनाच्या या कार्यक्रमात ज्योती सुभाष, माधुरी पुरंदरे, ओम भूतकर, हर्षद राजपाठक आणि कल्याणी देशपांडे सहभागी होणार आहेत. चित्रपट-दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. संहिता-संकलन चिन्मय दामले यांचे आहे, तर दृश्य-संरचना सुनीत वडके यांची आहे.

laoukik ani aloukik.jpg

लोकपरंपरा, धर्म, तत्त्वज्ञान, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा अनेक विषयांना कवेत घेणारे, पण जनसामान्यांना सहज समजेल असे विपुल लेखन डॉ. ढेरे यांनी केले. आपल्या रोजच्या धर्मजीवनाशी आणि लोकपरंपरांशी निगडित असे डॉ. ढेर्‍यांचं लेखन वाचकांना निखळ आनंद देणारे आणि समृद्ध करणारे आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या झळाळत्या शोधवाटांवरून चालण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे रसिक-वाचकांना मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपट-नाट्यक्षेत्रातल्या नामवंतांनी एकत्र येऊन डॉ. ढेरे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या विविधस्पर्शी संशोधनाचा व साहित्याचा आस्वाद घेणारा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणार्‍यांस प्राधान्य असेल. काही जागा राखीव आहेत.

प्रकार: 

असे सुंदर कार्यक्रम फक्त पुण्यापुरते मर्यादित ठेवल्याबद्दल निषेध! Happy

या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग (निदान ऑडिओ) मायबोलीवर उपलब्ध करून देता येईल का? माझ्यासारख्या पुण्याबाहेरच्या लोकांना निदान दुधाची तहान ताकावर भागवता येईल.

या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग (निदान ऑडिओ) मायबोलीवर उपलब्ध करून देता येईल का? माझ्यासारख्या पुण्याबाहेरच्या लोकांना निदान दुधाची तहान ताकावर भागवता येईल. >> +१००
येणं शक्य नाही पण ऑडीओ नक्की शेअर कर. आवडेलच. Happy

अप्रतिम आणि नेटका कार्यक्रम!
डॉ.ढेर्‍यांच्या अफाट लेखनातून मोजकेच भाग निवडणे हे अत्यंत कठिण काम. त्यात पुन्हा कार्यक्र्म रंजकही व्ह्यायला हवा. पण संयोजकांनी अत्यंत योग्य असेच उतारे वापरले. त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी, संशोधनामागील विचार आणि प्रेरणा, महत्वाचे संशोधन टप्पे आणि संशोधन हेच जीवन या संपूर्ण समर्पित अवस्थेपर्यंतचा त्यांचा प्रवास केवळ दोन-अडीच तासांच्या कार्यक्रमात दाखवणे, लाजवाब!
अर्थात या सगळ्याचे श्रेय जाते ते डॉ. ढेर्‍यांच्या ठाम आणि सुस्पष्ट मांडणीला, उपासकांचा अभ्यास केल्याशिवाय उपास्याचे गूढ उलगडणार नाही या त्यांच्या सिद्धांताला आणि केवळ निष्कर्षाच्या पलीकडे पोचलेल्या आणि अलौकिकाचा स्पर्श झालेल्या साक्षात्कारांना. आणि हे सगळे ओघवत्या, सौष्ठवपूर्ण आणि तरीही तर्ककर्कश व जडजंबाल न झालेल्या मराठीत.
या अनुभवासाठी संयोजकांचे अनेक आभार.

या अनुभवासाठी संयोजकांचे अनेक आभार. +१

अफाट व्यक्तिमत्वाच्या अचाट व्यासंगाला अवघ्या २-३ तासांच्या बांधेसूद आणि नेटक्या कार्यक्रमात उतरवणे हे अत्यंत अवघड असे काम केल्याबद्दल संयोजकांचे आणि आपल्या निव्वळ शब्दोच्चारांमधून एक अनन्यसाधारण अनुभव दिल्याबद्दल ज्योति सुभाष, माधुरी पुरंदरे ओम भुतकर हर्षद राजपाठक ह्या अभिवाचकांचे आणि खरेतर सर्वच संबंधितांचे अनेकानेक आभार...
चिनूक्साचे आपलाच असल्या कारणाने आभार नाहीत पण ह्या कार्यक्रमाचे संहिता संकलन इतक्या कमी वेळात केल्याबद्दल खूप कौतुक आणि आदर... ज्याच्या मनात संशोधक ढेरे पहिल्यापासूनच आहेत त्यालाच हे शक्य होय.

काल रात्री घरी गेल्यावर उशीर झाला तरी ढेर्‍यांची पुस्तके बाहेर आलीच ! आता काही दिवस त्यांची पुस्तके न वाचलेली पुस्तके वाचणे याला प्राधन्यक्रम!

आगाऊ - तू पण आला होतास? आवडलं असतं भेटायला.. Happy अर्थात मी फार आधी येऊ शकलो नव्हतो. कटोकट ७ वाजताच पोहोचू शकलो.
मला अत्यंत आनंद आहे की हा कार्यक्रम मी चुकवला नाही. मी अजूनही डुंबतोय त्यातच....

आगाऊ आणि हर्षदला अनुमोदन.
अतिशय सुंदर कार्यक्रम ऐकल्या-पाहिल्याचे समाधान मिळाले.

असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आम्ही संयोजकांचे मनःपुर्वक आभार मानून आलो.

कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही याची परत एकदा हळहळ व्यक्त करावीशी वाटते आहे. ध्वनिमुद्रण उपलब्ध झाल्यास खूप आवडेल.
सध्याच्या जमान्यात सगळं अति सोपं करून लिहिण्या बोलण्याच्या कालखंडात ढेर्‍यांच्या औपचारिक तरीही अतिशय लालित्यपूर्ण शैलीदार भाषेविषयी लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेले बघून बरं वाटलं.

ढेर्‍यांच्या औपचारिक तरीही अतिशय लालित्यपूर्ण शैलीदार भाषेविषयी लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेले बघून बरं वाटलं. >>>
काल ती भाषा दिग्गजांच्या तोंडून ऐकल्यापासून फार्फार श्रीमंत वाटतंय. बरेच दिवसात अशी भाषा ऐकली नव्ह्ती.

'लौकिक आणि अलौकिक' हा कार्यक्रम येत्या रविवारी, म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी, रिंगण या उपक्रमात सादर केला जाणार आहे.

स्थळ - सुदर्शन रंगमंच
वेळ - संध्याकाळी ७ वाजता.
तिकीटविक्री कार्यक्रमाआधी एक तास.

Ringan.jpg

नव्या वर्षाची सुरुवात डॉ. ढेरे यांच्या शब्दांनी व्हावी, या हेतूनं 'लौकिक आणि अलौकिक' हा कार्यक्रम नववर्षदिनी, म्हणजे १ जानेवारी, २०१७ रोजी, रात्री ९.३० वा., भरत नाट्यमंदिर, पुणे, इथे आयोजित केला आहे.

IMG-20161226-WA0004.jpg

ज्योती सुभाष, जितेंद्र जोशी, हर्षद राजपाठक, कल्याणी देशपांडे आणि माधुरी पुरंदरे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.