पाच दिवसांच्या कॉर्नवॉलच्या कंडक्टेड टूरमध्ये आमच्या टूरगाईड स्टीवनं आम्हाला खूप सुरेख सुरेख ठिकाणं दाखवली. त्यातलंच हे एक झळाळतं रत्नं - मिनॅक थिएटर!
कॉर्नवॉल म्हणजे इंग्लंडचा नैऋत्येकडचा समुद्रात घुसलेला भाग. पूर्ण कॉर्नवॉलच अतिशय सुरेख आहे. कथील आणि तांब्याच्या खाणी, डिव्हॉन प्रांतातली मूर्स ( शेरलॉक होम्सच्या द हाउंड ऑफ बास्करविल्सच्या गोष्टीत या खाणी आणि मूर्स यांचा उल्लेख आणि उपयोग केला आहे), अतिशय सुंदर सुंदर समुद्र किनारे आणि किनार्याच्या शेजारचे उंच हिरवेगार कडे, टूमदार खेडी, अनेक दंतकथा आणि भूतखेत-पर्याराक्षसांची रेलचेल असलेल्या लोककथांचं माहेरघर आणि चविष्ट कॉर्निश पॅस्टी ही इथली वैशिष्ट्य! किंग आर्थर, जादुगार मर्लिन, किंग आर्थरची ती सुप्रसिद्ध तलवार एक्सकॅलिबर, कॅमेलॉटचे सरदार आणि किंग आर्थरचं राउंड टेबल इथल्या सगळ्या लोककथांतून डोकावतात.
अशा या कॉर्नवॉलच्या पोर्थकुर्नो नावाच्या गावातल्या समुद्रकिनार्याशेजारच्या उंच कड्यावरून रोवेना केड या स्त्रीनं एक उत्तुंग स्वप्नं पाहिलं. नुसतं पाहिलंच नव्हे तर स्वतः कष्ट करून ते प्रत्यक्षातही आणलं आणि एक अद्भुत साकार केलं. मिनॅक थिएटर हे एक अप्रतिम सुंदर आणि अनोखी पार्श्वभूमी लाभलेलं ओपन एअर थिएटर आहे. रोवेनाच्या कल्पनाशक्तीतून, कष्टातून आणि ध्यासातून तयार झालेलं हे एक सुंदर लेणंच आहे. रोवेनाच्या कल्पनाशक्तीला आणि चिकाटीला दिलेला हा माझ्या कुवतीनुसारचा एक सलाम!
पहिलं महायुद्ध संपल्यावर रोवेना या गावात आईसह रहायला आली. त्यावेळी तब्बल १०० पौंड मोजून तिनं मिनॅक पॉइंट या जागेवर घर बांधलं आणि मग ती इथलीच झाली. १९२० च्या दशकांत गावातल्या हौशी मंडळींनी रोवेनाच्या घराच्या बागेमध्ये काही नाटकं सादर केली. रोवेना स्वतः त्या नाटकांसाठी ड्रेस डिझाईन करून शिवतही असे. १९२९ साली गावातल्या हौशी कलाकारांच्या गृपनं शेक्सपीअरचं 'मिड समर नाईट्स ड्रीम' हे नाटक बसवलं आणि ते फारच नावाजलं गेलं. या नाटकात प्रकाशासाठी गाड्यांचे हेडलाईटस वापरले गेले आणि त्याकरता विजेचा पुरवठा अर्थात रोविनाच्या घरूनच केला गेला होता. पुन्हा १९३० मध्येही या नाटकाचा खेळ केला गेला. मग गावातल्या मंडळींनी 'द टेम्पेस्ट' नाटक बसवायचं ठरवलं. पण या नाटकासाठी जरा ड्रामॅटिक आणि व्यवस्थित रंगमंच असण्याची गरज होती आणि तो तर उपलब्ध नव्हता. आता काय?
यावर उपाय म्हणून रोवेनानं काय करावं? तर तिनं तिच्या घराखालच्या कड्यामध्ये मिनॅक रॉक नावाच्या भल्यामोठ्या खडकावर एक रंगमंच बांधण्याचं ठरवलं. सहा महिन्यात एक स्टेज तिनं बांधून काढलं. काम सोपं नव्हतं. एका उभ्या दगडी उंच कातळकड्यावर काम करायचं होतं. मोठमोठे खडक आणि माती हटवायची होती. पण अशा परिस्थितीतही ते खडक आणि माती हटवून, ग्रॅनॅइटचा तो दगडी कडा हातानं कापून तिनं उतरत्या पायर्या आणि त्यांवर काही कामचलाऊ दगडी आसनं बनवली. बरोबर होता तिचा माळी बिली रॉविंग्ज आणि इतर काही.
प्रचि १ : रोवेना केड. थिएटर बांधताना.
( जालावरून साभार)
प्रचि २ : बिली रॉविंग्ज. बांधकाम करताना.
( जालावरून साभार)
१९३२ मध्ये या नव्यानं बांधलेल्या रंगमंचावर 'द टेम्पेस्ट'चा प्रयोग झाला आणि तो भारीच लोकप्रिय झाला.
प्रचि ३ : १९३२ साली बांधून झालेलं मिनॅक थिएटर.
( जालावरून साभार)
प्रचि ४ : 'द टेम्पेस्ट', १९३२.
( जालावरून साभार)
मग काय! या छोट्या प्रमाणावर सुरू झालेल्या कामाचं स्वरूप रोवेनानं वाढवत नेलं. ती स्वतः अगदी बारीक अंगकाठीची पण भारी काटक होती. बांधकामाचं साहित्य होतं पार खाली समुद्र किनारी - वाळू. आणि बाकी होती दुर्दम्य इच्छाशक्ती. केवळ इतरांवर न विसंबता ती स्वतः वाळू वाहून आणत असे. बांधकामाची पूर्वपिठीका नसतानाही तिचा माळी आणि इतरांकडून शिकून काँक्रिट वापरून तिनं आसनं, पायर्या, पायर्यांच्या बाजूचे खांब बनवले. काँक्रिट पूर्णपणे वाळण्याआधीच त्यावर तिनं स्क्रूड्रायव्हरनं ठिकठिकाणी काही नक्षीकामही केलं आहे. पूर्ण थिएटर असं काँक्रिटमध्ये बांधलेलं आहे. एकदा तर त्या किनार्यावर एक स्पॅनिश जहाज मोडून पडलं. त्यावेळी तिनं त्यातील एक डझन १५ फुटी लाकडी खांब स्वतः वर उचलून आणले आणि त्यापासून ड्रेसिंग रूम बनवली.
हे काम सुरू केलं त्यावेळी रोवेना ३८ वर्षांची होती. १९३२ ते १९३९ अशा सात वर्षांच्या काळात दर हिवाळ्यात बांधकाम करत या थिएटरमध्ये रोवेना भर टाकत गेली आणि ते वाढवत राहिली. मग दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्यात या थिएटरची बरीच पडझड झाली. पण तरीही नाऊमेद न होता पुन्हा एकदा नव्या जोमानं रोवेना आणि बिली या जोडगोळीनं काम सुरू केलं. दुसर्या महायुद्धाच्या काळातच १९४४ मध्ये या ठिकाणी '"Love Story" नावाच्या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. पडझडीनंतर चार वर्षं सतत काम करत करत रोवेनानं थिएटरला पुन्हा एकदा सुंदर स्वरूप प्राप्त करून दिलं आणि १९४९ साली पुन्हा एकदा नव्या दमानं हे थिएटर नाटकांच्या खेळासाठी कात टाकून तयार झालं.
नंतरच्या काळात जसजशी या थिएटरची किर्ती वाढू लागली तसतशी प्रेक्षकांची संख्याही आणि त्यानुसार थिएटरमधली आसनसंख्या आणि इतर सोईदेखिल. रोवेनानं आसनं, पायर्या, कमानी, आजूबाजूच्या भिंती, खांब आणि ड्रेसिंग रूम्स वाढवत नेल्या. तब्बल ८९ वर्षांची (२६ मार्च १९८३) होऊन मृत्यु पावेपर्यंत रोवेना या कामात मग्न होती. तिचा साथीदार माळी - बिली रॉलिंग १९६६ मध्ये वारल्यावर चार्ल्स आन्गोव नं तिला या कामात मदत केली. बिलीच्या स्मरणार्थ रोवेनानं एक पूर्ण ग्रॅनॅइटची एक खुर्ची बनवली. आख्या ऑडिटोरियम मध्ये ही एकच एक खुर्ची केवळ ग्रॅनॅईटची आहे. बाकीची सगळी आसनं काँक्रिटमध्ये बांधलेली. किती योग्य स्मारक!
आणि हो, रोवेनानं हे सगळं तिनं स्वतःकडच्या अतिशय तुटपुंज्या पैशांनी बांधलं बरं का. १९५० मध्ये तिनं लंडन ड्रामा स्कूल आणि नॅशनल ट्रस्टला मदतीसाठी विनंती केली होती पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. एका संस्थेकडून तीनेक वर्षं काही रक्कम मदत म्हणून मिळाली इतकंच. बाकी सगळा खर्च तिनं स्वतःच्या खिशातूनच केला. पुढे १९७६ साली एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून रोवेनानं हे थिएटर त्या ट्रस्टच्या हवाली केलं. या ट्रस्टनं नाटकाचे खेळ वाढवले, व्हिजिटर सेंटर बनवलं ज्यामुळे पर्यटकही येथे येऊ लागले आणि त्यातूनही थिएटरला उत्पन्न मिळू लागलं. आता इथे इस्टर ते सप्टेंबर या काळात जवळजवळ वीसेक प्रयोग होतात. इंग्लंड आणि अमेरीकेतील नाटक कंपन्या खास इथे येऊन आपले प्रयोग सादर करतात. आता इथे प्रयोगासाठी २-३ वर्षांची वेटिंग लिस्ट आहे. आज तब्बल ७०० प्रेक्षक बसू शकतील इतकी आसनव्यवस्था इथे आहे. व्हिजिटर सेंटर वर्षभर पर्यटकांसाठी खुलं असतं. ऑगस्ट २००७ साली या थिएटरचा अमृतमहोत्सव 'द टेम्पेस्ट' हे नाटक सादर करून केला गेला.
आजही हे थिएटर बांधून पूर्ण झालं नाहीये. सतत काहीतरी बदल आणि सुधारणा सुरू असतात. शिवाय सतत देखभाल आणि दुरुस्ती देखिल असतेच. कड्याच्या टोकावर बांधलं असल्यानं कामगारांना दोर्यानं बांधून कड्यावर उतरून बाहेरून काही दुरुस्ती असेल तर करावी लागते. मरण्यापूर्वी रोविनानं हे थिएटर पाऊस पडत असेल अशा वेळी कसं आच्छादित करता येईल याबद्दलचे काही आराखडे काढून ठेवले होते. पुढे मागे हे देखिल अंतर्भूत केले जातीलही कदाचित.
व्हिलबॅरोमध्ये बसलेली अगदी म्हातारी रोवेना. हा फोटो खूप काही सांगून जातो.
प्रचि ५ :
( जालावरून साभार)
रोवेनानं आयुष्यभर जपलेलं आणि फुलवलेलं हे स्वप्नं आजही प्रेक्षक आणि पर्यटकांना आनंद देत आहे.
प्रचि ६ :
प्रचि ७ :
प्रचि ८ :
प्रचि ९ :
प्रचि १० :
यावरून कल्पना यावी की मागे बॅकड्रॉप म्हणून किती अप्रतिम दृश्य आहे
प्रचि ११ :
(जालावरून साभार)
प्रचि १२ :
स्टेज
प्रचि १३ :
ही आसनं. यावर त्या त्या वर्षी झालेल्या नाटकांची नावं आहेत. यातली काही रोविनानंही कोरली असणार.
प्रचि १४ :
प्रचि १५ :
हे रोविनानं कोरलेले खांब
प्रचि १६ :
कमानी
प्रचि १७ :
गॅलर्या
प्रचि १८ :
प्रचि १९ :
वरून दिसणारा बीच
प्रचि २० :
प्रचि २१ :
आणि खालचा सरळसोट कडा. (थोडा हातही आलाय फोटोत त्याबद्दल क्षमस्व.)
प्रचि २२ :
व्हिजिटर सेंटर आणि रेस्टॉरंट
प्रचि २३ :
रेस्टोरंटमधून दिसणारे दृश्य
प्रचि २४ :
किनार्यापासूनची थिएटरची उंची पाहिली की कल्पना येईल रोवेनाच्या काटकपणाची आणि कष्टाची. यात सगळ्यात वर उजवीकडे दिसतंय ते व्हिजिटर सेंटर आणि रेस्टॉरंट.
प्रचि २५ :
( जालावरून साभार)
सुंदर सुंदर फुलं
प्रचि २६ :
प्रचि २७ :
प्रचि २८ :
प्रचि २९ :
प्रचि ३० :
प्रचि ३१ :
प्रचि ३२ :
प्रचि ३३ :
प्रचि ३४ :
कॉर्नवॉल भाग - स्वर्गासारखी
कॉर्नवॉल भाग - स्वर्गासारखी ठिकाण
आम्ही नुकतेच कॉर्नवॉल ची सहल आटोपली. मिनॅक थिएटर पासून जवळच अजून एक रौद्रभीषण पण अती सुंदर ठिकाण आहे लँड्स एण्ड. प्र.चि. टाकीनच लवकर.
आणि अजून एक अती सुंदर ठिकाण आहे. सेंट मायकेल्स माऊंट. एक छोटेसे बेट. पण "मस्ट व्हिजीट" प्रकारात आहे
http://www.stmichaelsmount.co.uk/
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
@दिनेश.
शेवटचा फोटो प्रोटिआ फुलाचा आहे ना ? >>> हो ना? मलाही शंका आली होती ते प्रोटियाचं असल्याची. फक्त या एकाच ठिकाणी मी हे फूल पाहिलं. बाकी कुठे इंग्लंडात असतील तर कल्पना नाही.
@उदय८२
दिल धडकने दो
यातील एका सीन चे शुटींग इथे पायर्यांवर झालेले का? >>> टर्कीत झालंय ना शुटिंग? अर्थात सिनेमा आठवत नाहीये त्यामुळे सांगता येणं कठीण आहे.
@prafullashimpi
आम्ही नुकतेच कॉर्नवॉल ची सहल आटोपली. मिनॅक थिएटर पासून जवळच अजून एक रौद्रभीषण पण अती सुंदर ठिकाण आहे लँड्स एण्ड. प्र.चि. टाकीनच लवकर.
आणि अजून एक अती सुंदर ठिकाण आहे. सेंट मायकेल्स माऊंट. एक छोटेसे बेट. पण "मस्ट व्हिजीट" प्रकारात आहे
>>>>> अरे वा! टाका ना प्रचि.
हो, लँडस एण्डला देखिल आम्ही भेट दिली. सेंट मायकेल्स माउंट दुरूनच पाहिलं.
@ मेधा
आता ट्रिप मधल्या बाकी जागांचं वर्णन येऊ द्या >>>>> हम्म्म ..... काही छान छान जागा आणि त्याबद्दलची माहिती देते वेगळ्या लेखात.
Pages