अस्तु - So be it : माणूसपणाच्या शोधाची कथा

Submitted by भास्कराचार्य on 17 July, 2016 - 04:18

'मुळी अधिक जाणिवेचे | अधिष्ठान आहे' अशा शब्दांत दासबोधात अंतरात्म्याची एक ओळख सांगितली आहे. माणसाचा सत्याचा शोध युगानुयुगे चालत आलेला आहे. पण हा सत्याचा शोध माणसाच्या माणूसपणाच्या जाणिवेतच रुतला आहे का? जाणिवेच्या पलीकडचं काही सत्य असतं की नाही? असे अनेक प्रश्न व त्यांचा उहापोह 'अस्तु - so be it' च्या निमित्ताने डोक्यात येतात. चित्रपटाच्या सुरवातीलाच 'सत्य हे जाणिवेतून येतं' (Truth stems from awareness) अशासारखं एक वाक्य आहे. हा ह्या चित्रपटाचा आत्मा म्हणायला हरकत नसावी. माणसाच्या 'असण्याची' जाणिव म्हणजे काय, ती नाहीशी झाली तर माणसाच्या असण्याचा अर्थ त्याच्या जिवलगांनी काय घ्यावा, असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन मी चित्रपटगृहाबाहेर पडलो.

डॉ. चक्रपाणि शास्त्री (मोहन आगाशे) ह्या संस्कृतपंडिताच्या आयुष्याची ही कथा असली, तरी त्या विशिष्ट घटनांमधून ती बाहेर डोकावून आपल्याला विचार करायला भाग पडते. एकीकडे ती आपल्याला अल्झायमर्सच्या दशा व अल्झायमर्स झालेल्यांच्या कुटुंबियांची विवंचना दाखवते, दुसरीकडे ती फ्लॅशबॅक तंत्राचा अत्यंत प्रभावी वापर करत एक बाप आणि त्याची मुलगी ह्यांच्यातल्या नात्याचा परीघ रेखाटते. नवीन पिढीला जुन्या पिढीची काळजी घेताना वाटणारी असमर्थता 'एलीफंट इन द रूम' म्हणून लक्षात घेते. ह्या चित्रपटाची पटकथा अनेक गुंतागुंतीच्या थरांनी आणि रूपकांनी नटलेली आहे. प्रचंड ताकदवान स्क्रिप्ट आहे ते. हे हत्तीचे रूपक तर वेगवेगळ्या प्रकारे समोर येते. रसभंगाच्या भयाने जास्त काही लिहीत नाही. पण आर्ट गॅलरीमधल्या चित्रांच्या भिंतीकडे पाहत राहावे, आणि नंतर लक्षात यावे, की प्रत्येक चित्र तर अर्थपूर्ण आहेच, पण त्या अक्ख्या भिंतीमधूनही एक मोठे चित्र आपल्याला खुणावते आहे, तसे काहीसे ह्या चित्रपटातल्या प्रसंगांचे होते. काहीकाही फ्रेममध्ये गणपतीची मूर्ती, चित्र आपल्याला कॅमेर्‍याच्या कोपर्‍यातून खुणावतात, ते कसब वाखाणण्याजोगे आहे. (त्याचेही रूपक पुढे स्पष्ट होते.) काही ठिकाणी हँडहेल्ड कॅमेर्‍याचा मुद्दाम केलेला वापर उठून दिसतो. पार्श्वसंगीत आणि गाण्यांबद्दल मायबोलीवरच आधी लिहीले गेले आहे, त्यामुळे जास्त लिहीत नाही. हत्तीच्या गाण्यात तर हत्तीच्याही डोळ्यांतले भाव अतिशय लोभसवाणे दिसतात, हे सांगायला हरकत नाही.

मोहन आगाश्यांना बर्‍याच काळाने त्यांच्याजोगी भूमिका मिळाली असावी. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव अशा नजाकतीने झरझर बदलतात की बस! आत्मभान हरपलेल्या माणसाच्या 'एम्प्टी शेल' असलेल्या मनामध्ये ते रंग क्षणिक उतरतात आणि लगेच निघूनही जातात, हे इतक्या सच्चेपणाने त्यांनी उतरवलंय! त्यांचा सायकिअ‍ॅट्रीमधला अनुभव सबटेक्स्च्युअली कामी आला असावा. अमृता सुभाषला नॅशनल अ‍ॅवॉर्ड आहे ह्या चित्रपटासाठी. तिचाही परफॉर्मन्स कमी डायलॉग असूनही वेगळाच आणि जोरदार आहे. तिचे आणि आगाश्यांचे प्रसंग साधे आणि तरीही पॉवरफुल आहेत. विशेषतः शेवटच्या प्रसंगात आगाशे तिला हाक मारतात, तेव्हा दोघांच्याही चेहर्‍यावर बदलत गेलेले भाव अगदी डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखे आहेत. मला इरावती हर्षेचे (इरा, डॉ. शास्त्र्यांची मुलगी) कामही खूप आवडले. तिने वेगळीच छाप ह्या चित्रपटावर सोडली आहे. तिचा रोल 'नॅरेटर'सारखा झाला आहे, आणि तिने (आणि एडीटरने) ही गोष्ट कंटाळवाणी न करता सांगण्याची महत्वाची जबाबदारी निभावली आहे. मिलींद सोमण, देविका दफ्तरदार, इला भाटे, आणि नचिकेत पूर्णपात्रे त्यांची कामे चोख करतात. मिलींदचे मराठी उच्चार काही ठिकाणी खटकले, एवढंच. पण त्याच्या भावना अस्खलित आहेत.

ह्या चित्रपटाच्या सर्वात जमेच्या बाजू म्हणजे कथा, पटकथा, आणि मोहन आगाशे. फक्त ह्या तिघांसाठी हा चित्रपट नक्कीच बघावा. वर म्हटल्याप्रमाणे बाकी बोनस आहेच!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय भास्कराचार्य !
मागे मर्यादित स्क्रीन्सवर रिलीज झाला होता तेव्हाच पाहिला होता. सुमित्रा भावे-सुनील सुखथनकरांचे चित्रपट पाहणे हा नेहेमीच एक सुंदर अनुभव असतो. तेव्हा लिहिलेली पोस्ट इथे डकवते. परत बघायचा आहे. कसे जमतेय ते बघूया...

अल्झायमर ह्या विकाराने ग्रस्त असलेल्या, एका वृद्ध आणि विद्वान संस्कृतच्या प्राध्यापकाभोवती गुंफलेली ही कथा आहे. भूत,वर्तमान आणि भविष्यकाळाला जोडणारी स्मरणसाखळीच निखळली तर त्या माणसाचं अस्तित्व अर्थहीन होऊन जातं. अर्थात त्याची स्मृती गेलेली असली तरी त्याच्या आजूबाजूंच्या माणसांचं, मुलाबाळांचं स्मरण, नात्यांचे पीळ, गंड सगळंच शाबूत असतं. आपल्या माणसाच्या मनाची दारं बंद झालेली आहेत हे सत्य पेलण्याचा संघर्ष आणि त्या सत्याला सामोरं जाण्याचा एक सुंदर दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे.

स्मरणशक्ती आणि कुटुंबवत्सलतेचं प्रतीक असलेल्या हत्तीमागे प्राध्यापकांनी एका अनामिक ओढीने भरकटत जाणे आणि हत्ती, माहुताची बायको ( अमृता सुभाष ) ह्यांच्याबरोबरचे सगळे प्रसंग हे अत्यंत symbolic आहेत. सगळ्यांचाच अभिनय उत्तम आहे पण प्राध्यापकांच्या भूमिकेतील डॉ. मोहन आगाशे ह्यांच्या अभिनयाबद्दल लिहिण्यासाठी शब्द नाहीत. अविस्मरणीय अनुभव ! ... त्यांचा अभिनय प्रत्यक्षच पाहावा आणि थक्क व्हावं !

जिज्ञासा,
पुण्यात संध्याकाळचेही अनेक शो आहेत.

ई-स्क्वेअर आणि कोथरुडच्या सिटीप्राईडला संध्याकाळी ५.३०चा शो आहे. किबे-लक्ष्मीला ६.३० वाजता. औंधच्या सिनेपोलिस वेस्टएण्डला ५.१५ वाजता. मगरपट्ट्याच्या सिनेपोलिसला ६.२५ वाजता. आयनॉक्स (बंडगार्डन) - ५.१५, आयनॉक्स (अमानोरा) - ५.३०.

सुरेख आढावा भारा! अनेक सुंदर पैलू उलगडून दाखवलेस.
अगो, तूसुद्धा छान लिहिलंयस.

आधी बघताना निसटलेल्या अनेक गोष्टी आता पुन्हा बघताना निरखता येतील. तसंही इतक्या सर्वांगसुंदर चित्रपटाला एकाच प्रयत्नात कव्हर करता येत नाही.

अतिशय सुंदर अनुभव आहे अस्तु बघणं. ज्यांना स्मृतीभ्रंश म्हणजे काय असतो याची पुसटशीदेखील जाणीव आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा म्हणजे ओव्हरव्हेल्मिंग एक्स्पिरियन्स होतो. मोहन आगाशे मोहन आगाशे वाटतच नाहीत Happy अक्षरशः जगले आहेत ते ती भूमिका. त्यांचे रिकामे डोळे पाहून अंगावर काटा येतो. त्यांचे आणि अमृताचे सगळे सीन्स हृदयस्पर्शी आहेत. अमृताचं आजवरचं बेस्ट काम. संस्कृतचे प्रकांड पंडित असूनही त्यांनाही सामान्य मनुष्याचे विकार आहेत- हे ज्या पद्धतीनं दाखवलंय ते अफाट आहे. कथेत कितीतरी ताणे-बाणे आहेत. कोणताही माणसाचं साधं आयुष्यदेखील किती गुंतागुंतीचं असतं ना? कामाच्या ठिकाणी, घरी, नात्यांमध्ये कधी ना कधीतरी कोणी ना कोणीतरी दुखावलं गेलेलं असतंच. नात्यांना काही ना काही पीळ पडलेले असतातच. तोच पीळ एक दिवस संपूर्ण सुटूनच गेला तर काय उरेल आयुष्यात? स्मृतीच नसेल तर माणूस म्हणून काय उरतं आपल्याकडे? स्मृतीशिवाय, आपल्या बुद्धीशिवाय आपण कोण आहोत? याची उत्तरं शोधायला भाग पाडतो हा सिनेमा.

अस्तु आधी रीलीज झाला होता तेव्हा पाहिला होता. पण त्याचा इम्पॅक्ट आजही मनावर आहे. सर्वांनी हा चित्रपट एक अनुभव म्हणून तरी अवश्य पहाच.

अवांतर- फेसबुकवर हा सिनेमा 'जातीयवादी' आहे अशी टीका काही ब्लॉगर्स आणि तथाकथित फिल्म क्रिटिक्सनी केली आहे. दु:ख झालं खरोखर Sad अशी झापडं बांधून आणि असे बेफाट आरोप करून हे लोक नक्की काय मिळवतात? आपण स्वतःच स्वतःचं आणि पर्यायाने अनेकांचं नुकसान करत आहोत याचं भानही त्यांना नाहीये? मी तर चाटच पडले वाचून. निर्माते-दिग्दर्शक-लेखक यांना काय वाटत असेल आणि ते कसं काय ते सहन करत असतील काय माहित!

रसग्रहण छान झाल्याचं मनापासून सांगणार्‍या सर्वांना धन्यवाद. Happy ज्यांना पाहायचा आहे त्यांनी खरंच थोडे कष्ट लागले तरी पाहा. आपल्या थोड्या जास्त कष्टांमुळे असे सिनेमे मेनस्ट्रीम व्हायला मदत होईल.

पूनम, मी अश्या टीकेबद्दल काही पाहिलेले नाही, पण दु:खदायक नक्कीच आहे. Sad

पूनम,
परवा एक 'समीक्षा' वाचली 'अस्तु'ची. त्यात 'अस्तु'मध्ये बेसुमार 'प्रॉडक्ट प्लेसमेंट' केल्याबद्दल तक्रार होती. Proud
त्या समीक्षेनुसार चितळे बंधूंची तीन मिनिटांची जाहिरात या चित्रपटात आहे. Lol

खरोखर प्रॉडक्ट प्लेसमेंट असते, तर निदान आर्थिक बाबतींत थोडी मदत झाली असती.

अस्तु जातेयवादी ? सिरियसली ??
उगाच करायची म्हणून टिका>>>> हल्ली "सैराट" वरुन नविन टिका होतेय," सैराटमुळे बलात्कार वाढलेत, मुल बिघडलीत. वै वै."

दोन वर्षांपूर्वी डॉ. मोहन आगाशे स्वतः हा सिनेमा घेऊन जर्मनीत आले होते, तेव्हा बघायचा योग आला होता. डॉक्टरांनी सिनेमा पाहिल्यानंतर सर्व प्रेक्षकांबरोबर चर्चा केली आणि त्या चर्चेत त्यांनी बरीचशी रूपके(?) उलगडून सांगितली होती. तो सगळाच अनुभव अविस्मरणीय होता. नितांत सुंदर सिनेमा!

Pages