दोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ...

Submitted by अजातशत्रू on 9 July, 2016 - 09:24

दोन मित्रांचे लग्न एकाच स्त्रीशी आलटून पालटून झाले तर ? हे सामंजस्याने घडू शकते का ?
खऱ्या मैत्रीत स्त्री संबंध कधीच दुरावा आणू शकत नाहीत याचा प्रत्यय देणारी वेधक मित्र- प्रेमाची शायरीने सजलेली सत्यगाथा..
दोन जिवलग मित्र. दोघेही अप्रतिम प्रतिभावंत शायर.
त्यापैकी वयाने मोठा असणारा असगर आणि कमी वयाचा जिगर.
जिगरची आई १० व्या वर्षी वारलेली तर वडील १५ व्या वर्षी निवर्तलेले. शिवाय त्याचा निकाह जिच्यासोबत झाला होता ती देखील लवकर वारली.
वाहिदन असं त्या अभागी स्त्रीचं नाव होतं.
या नंतर तो आग्र्याच्या एका वेश्येच्या प्रेमात पडला होता, शिराज तिचं नाव.
या दोघा शायर मित्रांचा पोटापाण्याचा व्यवसाय एकच होता, तो म्हणजे चष्मे विकणे ! शायरीच्या निमित्ताने दोघांचे घरी येणे जाणे वाढले. जिगरने मनातल्या मनात असगरला पुढे आपला गुरु मानले. असगरची पत्नी अत्यंत देखणी आणि मनमिळावू स्त्री होती. तिच्या धाकटया बहिणीवर, नसीमवर जिगरचा जीव जडतो. तेंव्हा आपल्या गुरुमित्राकडून त्याने तिला गळ घातली. असगरदेखील नेमका हाच विचार करत होता, इतका चांगली शायरी करणारा आपला मित्र असाच वाया जावा हे त्याला सहन होत नसते. त्याची इच्छा असते की आपली मेव्हणी नसीम हिच्याशी जिगरचा निकाह व्हावा. आपल्या शायर मित्रासाठी असगरने आपल्या पत्नीकडे शब्द टाकला आणि तिने नसीमला यावर तिचे मत विचारले. कोणतेही आढेवेढे न घेता ती तयार झाली कारण जिगरची अलौकिक प्रतिभेने रसरसलेली शायरी !

दोघांचा निकाह होतो, जिगरच्या शायरीला आता जास्त बहार येते अन मदमस्त प्रेमाचे रंग चढतात. पण नेमका इथंच घात होतो, त्याची शायरी देशभरात प्रसिद्धीच्या शिखरावर स्वार होते आणि त्याला दारूचा छंद जडतो, छंदाची आवड होते अन आवडीचे व्यसन होते. दारूपासून सुरु झालेली व्यसनाची कथा सिगारेट आणि पत्त्यांच्या अड्ड्यावर येऊन पोहोचते.. तो इतका व्यसनाधीन होतो की त्याचे मित्र, त्याचा परिवार यापासून दुरावतो. मदिरा आणि शायरीच्या पलीकडचे जग त्याच्या गणतीतही नसते. ज्या पत्नीला असगरकडे मन्नत मागून आपल्या घरात आणलेले असते तिलाही तो सांभाळू शकत नाही. नसीम माहेरी परतण्याऐवजी ज्या बहिणीने आपले लग्न लावून दिले तिच्याकडे जाते. आपल्या बहिणीची दुरावस्था पाहून तिचा जीव कासावीस होतो. तिला ती आपल्या घरी ठेवून घेते.

काळ पुढे जाऊ लागतो तसा असगरचा जीव कावराबावरा होऊ लागतो. त्याची पत्नीदेखील अस्वस्थ होते. घरात ठेवलेल्या तरुण मेव्हणीबद्दल, आपल्या मित्राच्या पत्नीबद्दल समाजाला काय सांगायचे हा प्रश्न त्याला सतावत असतो तर आपल्या बहिणीला असे किती दिवस घरी ठेवून घ्यायचे याचे उत्तर त्याच्या पत्नीला सापडत नसते. एके दिवशी ती मनाचा हिय्या करते आणि आपल्या पतीजवळ मनातली गोष्ट बोलून दाखवते. तिची सूचना ऐकून तो नखशिखांत हादरतो. तिने सांगितलेले असते की, "साली बरोबर जीजाने आता निकाह लावला पाहिजे नाहीतर तिच्या वाटयाला बदनामी येईल, तिला घर सोडावे लागेल, तिचे भवितव्य अंधारात लोटले जाईल, इतर कोणीही व्यक्ती तिला इतक्या काळाच्या अंतराने स्वीकारणार नाही. ती जरी माझी लहान बहिण असली तरी ती माझी सवत झालेली मला चालेल. कारण या एका पर्यायातच तिचे भले आहे".
तिच्या बोलण्यातले तथ्य त्याला जाणवते पण आपल्या जिवलग मित्राच्या एके काळच्या पत्नीबरोबर निकाह कसा लावायचा ? भले ती आपली धाकटी मेव्हणी असली म्हणून काय झाले ? असा विचार त्याच्या डोक्यात रुंजी घालू लागतो. आपण आपल्या मित्राशी प्रतारणा केल्यासारखं होईल या भावनेने तो नकार देतो. पण ती त्याला पुन्हा समजावून सांगते, 'अहो असे पत्थरदिल होऊ नका, तिच्यावर रहम करा. ती आपल्याकडे जणू बेवा होऊनच राहिली आहे.खरे तर तिच्या पतीने तिला सोडून दिले आहे. आपण तिच्याशी काही तरी नाते जोडल्याशिवाय आणखी किती काळ असं घरात ठेवू शकणार ?"

त्याच्या मनातलं द्वंद्व आता विशाल रूप धारण करतं. अखेर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तो मधला मार्ग काढतो. तो आपल्या मेव्हणीशी, आपल्या प्रिय मित्राच्या पत्नीशी निकाह लावतो पण तिला पत्नीचा दर्जा देत नाही. काही दिवसांनी या दुःखद घटनेची बातमी त्याचं मित्राच्या कानी पडते आणि त्याचे मन पश्चात्तापाच्या अग्नीत दग्ध होऊन जाते. आपण एकाच वेळी आपल्या पत्नीला, गुरु समान मित्राला आणि प्रेमळ वाहिनीला विनाकारण मोठे दुःख दिल्याची डाचणी त्याच्या मनाला लागून राहते. तो सुधारण्याचा प्रयत्न करू लागतो, त्याच्या मनात आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणी दाटून येऊ लागतात, तिच्या भेटीची ओढ लागून राहते, मनात विरहाचा अग्निकुंड धगधगू लागतो. पण आपल्या मित्राकडे जाऊन कोणत्या तोंडाने मनातली गोष्ट सांगायची याचे उत्तर त्याच्याकडे नसते. पण त्याची दारू सोडायची इच्छा असगरने ओळखलेली असते. त्यासाठी सय्यद काझी अब्दुलगनी या साधूशी जिगरची गाठ असगरने घालून देतो.. जिगर मनातल्या मनात नसीमसाठी झुरत राहतो आणि त्याच्या शायरीला इथे जी धार चढली त्यातून ती आणखीनच तावून सलाखून निघाली.

इकडे संसाराच्या अजब कात्रीत सापडलेल्या असगरची लेखणीही ओजस्वी होऊन जाते. आपल्या पत्नीच्या विरहात होरपळणारया जिगरचे दारू सोडण्याचे जिकीरीचे प्रयत्न आता यशस्वी होताना दिसू लागतात. ही शुभवार्ता असगरच्या कानी जाते आणि तो थोडा सुखावतोही आणि थोडा दुखावतोही. याच काळात असगर आजारी पडतो, त्याच्या लक्षात येते की आता आपला सफर संपत आला आहे, त्या सरशी तो मृत्युपत्र तयार करवून घेतो आणि त्यात लिहितो की, 'आपल्या मृत्यूनंतर आपली दुसरी पत्नी नसीम हिचा निकाह जिगरशीलावण्यात यावा.' काळ पुढे जातो आणि अंथरुणाला खिळलेला असगर एके दिवशी या जगाला अलविदा करतो. हसत हसत तो रुखसत होतो.

आपला मित्र गेल्याचे जिगरला अपार दुःख होते, ऊर भरून येतो. आपल्यामुळे त्याची भावनिक ओढाताण झाल्याची कबुली तो त्याच्या मजारवर जाऊन देतो. पश्चात्तापाची भरपाई करण्यासाठी तो पुन्हा आपल्या दिवंगत मित्राच्या पत्नीकडे येतो आणि आपल्या मनात इतक्या वर्षापासून बंदिस्त असलेले विचार बोलून दाखवतो. ती त्याचींच वाट पहात असते. ती आपल्या पतीने मृत्यूपत्रात लिहून ठेवलेली अंतिम इच्छा त्याला सांगते. त्याचे डोळे वाहू लागतात. त्याच्या एका डोळ्यात मित्रप्रेमाचे विरहाश्रु असतात तर एका डोळ्यात पत्नीच्या पुनर्मिलनाचे आनंदाश्रू असतात. नसीमची संमती मिळताच जिगर तिच्याशी म्हणजे आपल्याच पूर्वीच्या पत्नीशी दुसऱ्यांदा निकाह लावतो , एव्हाना त्याने दारू,सिगारेट, पत्ते सारी व्यसने पूर्णतः सोडलेली असतात. इतकेच नव्हे तर लग्नानंतर तो नसीमसोबत हजच्या पवित्र यात्रेस जावून येतो. या दरम्यान आपल्या देशाची फाळणी झाली आणि अनेक मुस्लिम बांधवांसोबत आपल्या देशातले दर्दी शायर पाकिस्तानात गेले. जिगर मात्र इथेच राहिला. कारण, 'आपल्या मित्राची, असगरची कबर सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही' असं यावर त्याचं स्पष्टीकरण होतं. जिगर आणि नसीम यांचा पुढचा संसार सुखाचा झाला हे वेगळे लिहायला नको...

या दोन मित्रांमधील सामंजस्य आणि विश्वास इतका गाढा होता की एकाच स्त्रीशी दोघांनीही लग्न करूनही त्यांचे एकमेकावरचे मित्रप्रेम अबाधित राहिले ! सहसा स्त्री मुळे पुरुष भांडतात, अन एकच स्त्री दोघांशी विवाहबद्ध झाली तर मग सारंच मुसळ केरात जातं हा आजवरचा अनुभव इथं धुळीस मिळतो.
जिगरने लिहिलेला एक सुप्रसिद्ध शेर मी इथे देतोय जो तुम्ही हिंदी सिनेमांत असंख्य वेळा ऐकलेला असेल -
"ये इश्क नही आसाँ इतना ही समझ लीजे
इक आग का दरिया है और डूबके जाना है
आदमी आदमीसे मिलता है
दिल मगर कम किसीसे मिलता है
मेरा कमाले-शेर बस इतना है
वो मुझ पे छा गये, मैं जमाने पे छा गया
हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं
हमसे जमाना खुद है, जमाने से हम नही..."

या जिंदादिल शायराचे पूर्ण नाव होते जिगर मुरादाबादी आणि त्याच्या गुरु समान शायर मित्राचे नाव होते असगर गोंडवी. जिगरचे मूळ नाव अली सिकंदर. त्याचे शिक्षण काहीही नाही केवळ अक्षरओळख ! जिगर मुरादाबादींचे नाव माहित नसलेला शायरीचा रसिक दुर्मिळच म्हणावा लागेल. तर असगर गोंडवीची नजाकतदार शायरी माहिती नाही असा शायरीचा अभ्यासक दिसून येत नाही. जिगर मुरादाबादी हे केवळ शराब, शौक, शबाब यांचीच शायरी करत होते असे नव्हे. खाली दिलेला प्रसंग त्यांच्याविषयी बरंच काही सांगून जातो.

इंग्रजांची राजवट देशात सुरु होती तेंव्हाची ही गोष्ट आहे. लखनौच्या कौसर बागेतील मैफिल पहाटेकडे झुकू लागली होती. मुशायर्‍याचे (कविसंमेलन) सूत्रसंचालन करणारे कवी हाफीज जालंधरी यांनी जिगरसाहेबांचे नाव पुकारले. आता नक्कीच एक प्रेमाची किंवा मद्यावरची गझल ऐकायला मिळणार, असे समजून रसिक कान टवकारून बसले होते. इंग्रज सरकारच्या प्रचाराकरिता मुशायरा होता. साहजिकच मुशायर्‍याचा सर्व खर्च उचलणारे इंग्रज गव्हर्नर खूश होते. आतापर्यंत सर्व कवींनी आपला प्रचार मस्त केला. आता हे बुजुर्ग, ज्येष्ठ कवी तो कसा करतात, ते पाहू म्हणून गव्हर्नरसाहेबही सावरून बसले. जिगरसाहेबांनी सुरुवात केली -
'बंगाल की मैं शामो-सहर देख रहा हुं
हरचंद के हूँ दूर, मगर देख रहा हूँ'
वर्ष होते १९४२-४३. बंगालचा भयंकर दुष्काळ इंग्रज सरकारला लाजिरवाणा होता आणि नेमके वर्मावर बोट ठेवल्याने गव्हर्नरसाहेब नाराज झाले. जिगर मात्र नेहमीच्या मस्तीत गात होते. -

'इफ्लास की मारी हुई मखलूक सरे-राह
बे-गोर-ओ-कफन खाक बसर देख रहा हूँ'
(दारिद्रय़ाने पिडलेली जनता, अंत्यविधीविना रस्त्यावर पडलेली प्रेते मला दिसत आहेत.)
आता मात्र थेटच वार झाल्याने गव्हर्नर चिडले आणि मैफलीतून उठून गेले. मुशायरा जिगरसाहेबांच्या गझलांनी रंगत गेला. मुळातच त्यांचा आवाज चढा असला तरी गोड होता, त्यात त्या गझलेतील व्याकुळता सर्वांना भावली. प्रेम, मद्य विषय सोडून जिगर यांनी स्वातंत्र्याचे गाणे गायला केलेली ही सुरुवात होती. म्हणजेच तरक्कीपसंदवर (सुधारणावादी काव्य) टीका करणार्‍या जिगरसाहेबांनी याही रंगात मी लिहू शकतो, हे दाखवून दिले होते.

जीवन भरकटले तरी उत्कृष्ट गझला लिहून त्यांनी स्वत:चे एक स्थान निर्माण केले. त्यांचे कित्येक शेर आज म्हणी झाल्या आहेत. हे सर्व शेर आपण अनेकदा ऐकले. विशेष करून नासिर हुसेन यांच्या चित्रपटात. कारण त्यांच्या सिनेमाच्या सुरुवातीसच जिगरनी लिहिलेला शेर प्रॉडक्शन लोगो सोबत ऐकू येतो. पुण्याच्या उर्दू साहित्य परिषदेनेही जिगर यांचा एक शेर लोगो म्हणून वापरला आहे. तो शेर असा आहे. -
'उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने
मेरा पैगाम मुहब्बत है जहांतक पहुँचे..'

वास्तविक जिगर हे काही मुस्तनद कवी नव्हते. (मुस्तनद म्हणजे प्रमाणित.) जसे जाैक, दाग, मोमीन, सीमाब होते; पण तरीही जिगर यांचे शेर लोकांच्या ओठाओठांवर आजही आहेत. जिवंतपणी एवढी लोकप्रियता गालिब यांच्यानंतर जिगरशिवाय कुणालाही मिळालेली नाही. जिगर यांची आणखी एक गझल लोकगीतासारखी झाली आहे. त्यात त्यांनी ‘जमाना’ हे एकच यमक (काफिया) चार वेळा वापरले आहे. तरीसुद्धा कुठेही काहीही खटकत नाही, ही जिगर यांची कमाल होती.
'इक लफ्जे-मुहब्बत का अदना ये फसाना है
सिमटे तो दिले-आशिक, फैले तो जमाना है'
(प्रेम नावाच्या छोट्या शब्दाची ही कहाणी आहे. तो आकुंचन पावला तर प्रेमिकाचे हृदय होते. प्रसरण पावला तर विश्‍व व्यापून टाकतो.)

'हम इश्क के मारों का इतना ही फसाना है
रोने को नहीं कोई हसने को जमाना है'
(आम्हा प्रेम करणार्‍यांचे एवढेच दु:ख आहे. हसायला सारे जग आहे, पण आमच्यासोबत रडायला कोणी नाही.)

'क्या हुस्न ने समझा है? क्या इश्क ने जाना है?
हम खाक-नशीनों की ठोकर में जमाना है'
(सौंदर्य स्वत:ला काय समजते? प्रेमाने काय जाणले आहे? अरे, आम्हा धुळीला मिळालेल्या माणसांच्या पायापाशी जग आहे.) नासिर हुसेन यांनी सिनेमासाठी वापरलेला हाच तो शेर ! आजही हा लाखोंच्या दिलाची धडकन बनून राहिला आहे.

'वो हुस्न-जमाल उनका, ये इश्को शबाब अपना
जीने की तमन्ना है, मरने का जमाना है'
(तिच्या सौंदर्याची जादू आणि आमचे हे प्रेम, तारुण्य. काय सांगू जगण्याची खूप इच्छा आहे; पण प्रेमात मरण्याची वेळ आहे.)
जिगर प्रेमपुजारी होते, याचा प्रत्यय त्यांच्या शायरीत सतत येत राहतो.
'लेके खत उनका किया बहुत जब्त लेकिन
थरथराते हुए हाथोंने भरम खोल दिया'
(तिचे पत्र मी घेऊन खूपच स्वत:ला सांभाळले; पण माझ्या थरथरणार्‍या हातांनी माझे रहस्य उलगडलेच गेले. आमचे प्रेम आहे हे सार्‍या जगाला कळलेच.)

असे सुंदर शेर लिहिताना जिगर यांनी एक महत्त्वाची कामगिरी केली. पूर्वी कवितेत प्रेयसी म्हटली की कठोर हृदयाची असे. जिगर यांनी तिलाही भावना असतात, हे शेरो-शायरीत आणले. याचे मस्त उदाहरण म्हणजे हा शेर -
'इधर से भी है सिवा कुछ उधर की मजबुरी
कि हमने आह तो की, उनसे आह भी न हुई'
(आमच्यापेक्षा तिची जास्त मजबुरी आहे. आम्ही उच्छवास तरी सोडला, तिला तर तोही सोडता आला नाही.)

लखनौला जिगर कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारया जिगरना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. आता उत्तर प्रदेशात ‘जिगरगंज’ नावाचा भाग आहे, तिथेच जिगरसाहेब वारले. अलिगढला लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालय आणि पंडित नेहरू मैदानाजवळ जिगर यांच्या नावानेही एक महाविद्यालय आहे, हे केवढे मोठेपण! जणू दोन पंतप्रधानांच्या पंक्तीत जाऊन हा शायर बसला आहे. त्यांनी म्हटले होते -
'अपना जमाना आप बनाते है अहले-दिल
हम वो नहीं के जिनको जमाना बना गया...'
- ते खरेच आहे. जिगर यांचे पूर्वज मौलवी मुहमंद समीअ होते. जे बादशहा शाहजहाँ यांना शिकवीत. जिगर यांचे पणजोबा हाफीज मुहंमद ‘नूर’, आजोबा मौलवी हाफीज अमजद अली, चुलते अली ‘जफर’ व वडील मौलवी अली ‘नजर’ हेसुद्धा कवी होते. जिगर प्रथम 'दाग' देहलवी यांचे नंतर तसलीम यांचे शिष्य होते. पण असगर गोंडवी यांच्या सान्निध्यात गेल्यावर असगर यांनी जिगर यांच्या काही गझला दुरुस्त केल्या होत्या. त्या जिगरना भावल्या होत्या.

'जब मिली आँख होश खो बैठे
कितने हाजिरजबाब है हम लोग
शाम से आ गये जो पीनेपर
सुबहतक आफताब है हम लोग'
(जेव्हा तिच्या नजरेला नजर भिडली आमची शुद्धच हरपली. किती हजरजबाबी आहोत ना आम्ही! संध्याकाळी जर आम्ही मद्यपानाला बसलो तर मग काही विचारू नका. सकाळपर्यंत आम्हीच सूर्य असतो.)

अशी मद्यपानाची स्तुती करणार्‍या जिगरनी १९४२ नंतर मात्र कायमची दारू सोडली. मुशायर्‍यात मद्यपान करून येणारे, गझल म्हणणार्‍या कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर तर प्रश्नच नव्हता. ते अधिक प्रिय झाले. १९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल’ या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार देऊन राजमान्यताही दिली. जिगर यांच्या काळातील अनेक शायरांना आता आपण पाहू शकणार नाही. अपवाद जिगर व मजाज लखनवी यांचा. कारण ते दोघे ‘प्यासा’ चित्रपटात थोड्या वेळासाठी दिसतात. ‘जाने वो कैसे लोग थे जिनको प्यार से प्यार मिला’ या गीताच्या आधी
'काम आखिर जज्बा-ए-दिल इख्तियारा ही गया
दिल कुछ इस सूरत से तडपा के उनको प्यार आ ही गया...'
हा शेर म्हणणारे जिगर आहेत. त्यांच्या बाजूला शिडशिडीत तरुण दिसतो, ते मजाज लखनवी. म्हणजे गीतकार जावेद अख्तर यांचे मामा. जिगर यांचे अवगुण लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांचे काव्यगुण आणि त्यातही त्यांची मानवता लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम जिगरसाहेबांनीच केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. ते नेहमी म्हणायचेच -
'मै वोह साफ ही न कह दूँ जो फर्क मुझमेंतुझमें
तेरा दर्द दर्दे-तन्हा, मेरा गम गमे जमाना..'
(मित्रा, तुझ्या-माझ्यात काय फरक आहे तो मी साफसाफ सांगतो. तुझे दु:ख तुझ्या एकट्याचे आहे. माझी व्यथा ही जगाची व्यथा आहे.)

चांगला कवी व्हायचे असेल तर आधी चांगले माणूस असावे लागते, यावर त्यांचा विश्‍वास होता. त्यांचा एक किस्सा सांगितलाच पाहिजे. एका ओळखीच्या गृहस्थांसोबत एकदा ते टांग्यातून चालले होते. त्या गृहस्थांनी जिगर यांचा खिसा कापला. ते कळूनही जिगर काहीच बोलले नाहीत. जेव्हा जिगर यांना त्याबाबत एका मित्राने विचारले, तेव्हा ते म्हणाले, ‘काय आहे, ते गृहस्थ सद्गृहस्थ आहेत. त्यांच्यावर अशी काही वेळ आली असेल की त्यांना चोरी करावी लागली असावी. आता मी काही बोललो असतो तर त्यांना किती लाज वाटली असती म्हणून मी गप्प बसलो.’ जिगर मुरादाबादींचे कोणते गुण लक्षात ठेवायचे असा प्रश्न या माणसाची माहिती घेतल्यावर पडतो.

ही झाली जिगर मुरादाबादी यांची कथा. असगर गोंडवींची कथा देखील अशीच सुरस आहे.
उर्दू गझलचा इतिहास जिगर मुरादाबादी या सुवर्णपानाशिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही आणि जिगर मुरादाबादी हे सुवर्णपान असगर गोंडवी नावाशिवाय लिहिलेच जाऊ शकत नाही. मैत्री, चाहत, त्याग काय असतो, याचे निखळ उदाहरण असगर गोंडवी !
मिर्झा गालिब यांच्या तत्त्वज्ञानाने भरलेल्या शायरीने एक उंची गाठली होती. मिर्झा 'दाग' यांनी तिला ‘आम आदमी’ची भाषा देत प्रेमरंगात न्हाऊ-माखू घातलं; पण ही ‘आम आदमी’ची डूब हळूहळू रसातळात जाऊ लागली. ‘इश्क’मध्ये विषयवासना जोर धरू लागली. गझलवर खानदानी माणसं टीका करीत होती. तेव्हा गझलेच्या क्षितिजावर दोन तारे उदयाला आले, ते म्हणजे जिगर आणि असगर. डुबत चाललेल्या गझलेला दोघांनी केवळ वाचविले नाही, तर पुन्हा तिला तिचे वैभव प्राप्त करून दिले.

असगर (म्हणजे धाकटा) यांचे पूर्वज गोरखपूरमधले. असगर यांचे वडील वकील म्हणून गोण्डा येथे आले आणि तिथेच राहिले. १ मार्च १८८४ ला असगर यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण फार झाले नसले तरी फार्सी-अरबीचे ज्ञान चांगले होते. ते चष्म्याचा व्यापार करीत असल्यामुळेच की काय, पण त्यांच्या काव्यात ‘नजर’ फार डोकावते. उदाहरणार्थ..
'समा गये मेरी नजरों में, छा गये दिलपर
खयाल करता हूॅँ उनको कि देखता हूॅँ मैं?'
(माझ्या डोळ्यांमध्ये तीच सामावली आहे. माझ्या हृदयावर तिचाच प्रभाव. मला कळत नाही मी तिचा विचार करीत आहे की तिला पाहत आहे. काय ही जादू! काय हे अद्वैतपण!)

'तुम बाखबर हो चाहनेवालों के हालसे
सबकी नजर का राज तुम्हारी नजर में है'
(तुझ्यावर जे प्रेम करतात त्यांची काय हालहवाल आहे, यापासून तू अनभिज्ञच आहेस. सर्वांच्या नजरेचे रहस्य तुझ्या एका नजरेत आहे बरं)

'हम एक बार जलव-ए-जानाना देखते
फिर काबा देखते, न सनमखाना देखते'
(आम्ही एकदाच तिला पाहतो, तिचे विभ्रम पाहतो. मग मंदिर असो की मशीद काहीही पाहत नाही.)

'आये थे सभी तरह के जलवे मेरे आगे
मैंने मगर ए दीद-ए-हैरॉँ नहीं देखा'
(माझ्यासमोर किती सुंदर-सुंदर गोष्टी गेल्या म्हणून सांगू! पण मला पाहिल्यानंतर आश्‍चर्यचकित होऊन विस्फारलेले डोळे ते काही अजून पाहिले नाहीत.)

'उठ्ठे अजब अंदाजसे वोह जोशे-गजबमें
चढता हुआ इक हुस्नका दरिया नजर आया'
(अहाहा! ती माझ्या बाहुपाशातून अशी काही निघाली, की जणू सौंदर्याचा एक सळसळता समुद्र उचंबळून आला.)

'क्या दर्दे-हिज्र और यह क्या लज्जते-विसाल?
उससे भी कुछ बुलंद मिली है नजर मुझे'
(कसले विरहाचे दु:ख आणि कसली मीलनाची लज्जत? त्याच्याहीपेक्षा उंच अशी एक दृष्टी मला मिळाली आहे.) (पुढेही काही शेर दिले आहेत; त्यातही ‘बघणे’ आलेच आहे बघा.)
चष्म्याचा व्यापार सोडल्यानंतर असगर यांनी ‘हिंदुस्तानी’ या त्रैमासिकात काम केले. एवढीच त्यांची खरी माहिती मिळते. पुढची सगळी माहिती जिगर मुरादाबादी यांच्यासोबतच मिळते. असगर यांचे अगदी प्रमाणित शिष्यत्व पत्करले नसले तरी जिगर त्यांचे शिष्य मानले जात होते. असगर यांचे दुसरे एक शिष्य होते- तिलोकचंद मेहरूम. म्हणूनच जिगर व मेहरूम यांच्या लेखनात साम्य आढळते.
मेहरूम एके ठिकाणी म्हणतात -
'अब हिज्र का शिकवा, ना तगाफुल, ना गिला याद
आई जो तेरी याद तो कुछ भी न रहा याद..'
(आता विरहाची काय कसलीच तक्रार नाही. तुझी आठवण आल्यावर कुठे काय लक्षात राहते बरे!)

तर जिगर त्याच यमकांना घेऊन म्हणतात -
'दुनिया के सितम याद, ना अपनीही वफा याद
अब मुझको नही कुछ भी मुहबत के सिवा याद..'
(जगाचे अत्याचार असो की आपल्या चांगल्याचुंगल्या गोष्टी. आता मला प्रेमाशिवाय काहीही आठवत नाही.)

मुळात असगर गोंडवी हे सूफी शायर. त्यामुळे त्यांच्या शायरीत कामुकता नव्हतीच. त्यांचे वागणेही तसेच होते. पण पत्नीच्या हट्टापायी व नसीमचे कुणाशी तरी लग्न झाले आणि त्याच दरम्यान जिगर सुधारला तर काय होईल ? शिवाय नसीमच्या दुसऱ्या नवर्‍याने तिला जिगरकडे सुपूर्द केले नाही तर जिगरची काय अवस्था होईल, हे लक्षात घेऊन त्यांनी दुसरे लग्न केले. ही मैत्री, ही चाहत आणि हा त्याग असगर यांचाच!

असगरच्या वागण्या-बोलण्यात आणि शायरीतही ढोंगीपणाला थारा नव्हता.
'जहान है कि नही? जिस्मोजान है की नही?
वोह देखता है मुझे, उसको देखता हूँ मैं'
(ती समोर आल्यानंतर आम्ही एकमेकांना पाहत राहिलो. जणू काही ‘बघणे’ हीच एकमेव गोष्ट शिल्लक होती. विश्‍व, जीव, देह सर्व काही तिथे नव्हतेच.)

'अब तो यह तमन्ना है किसीको भी न देखूँ
सूरत जो दिखा दी है तो ले जाओ नजर भी'
(आता हीच इच्छा की कुणालाच पाहू नये. तू तुझा चेहरा दाखविलास. आता माझी नजरही घेऊन जा बरे)
- असे सुंदर शेर लिहिणारे असगर गोंडवी -

'यह इश्कने देखा है, यह अक्ल से पिन्हाँ है
कतरे में समंदर है, र्जरेमें बयाबाँ है'
(बुद्धीपासून जे लपून राहिले ते फक्त प्रेमानेच पाहिले आहे. एका थेंबात समुद्र आहे. एका कणात वाळवंट सामावलेले आहे. प्रेमात पडल्यावरच हे कळते.)

'चला जाता हूॅँ हॅँसता खेलता मौजे-हवादिससे
अगर आसानियाँ हो जिंदगी दुश्‍वार हो जाये'
(संकटांच्या लाटांवर मी आरूढ होऊन खेळत असतो. जर सगळेच सहजप्राप्त झाले तर जगण्याची मजा काय? उलट सगळे सुरक्षित, सोपे असेल तर जीवन कठीण होईल.)
असे आध्यात्मिक उंची गाठणारे शेर त्यांनी लिहिले. त्यांच्या निशाते-रुह (आत्मानंद) व सरोदे-जिंदगी (जीवनाचे गाणे) या दोन संग्रहांमध्ये फक्त १११ गझला आहेत. कमी लिहिले तरी असगर यांचे नाव उर्दू साहित्यात अमर झाले. समीक्षक त्यांच्याबद्दल असे म्हणतात की, 'त्यांनी लिहिले नसते तरी केवळ जिगरसारखा शायर सांभाळला, या एवढय़ा एका गोष्टीकरता त्यांचे नाव झाले असते. पण स्वच्छ हृदय आणि मैत्री जपणारा माणूस म्हणून ते महानच होते.'

जिगर मुरादाबादींचा जन्म ६ एप्रिल १८९० चा म्हणजेच असगरपेक्षा जिगर सहा वर्षांनी लहान होते. असगर वारलेही लवकर. जिगर यांचा मृत्यू ९ सप्टेंबर १९६० चा आणि २४ वर्षं आधीच म्हणजे १९३६ मध्ये असगर ही दुनिया सोडून गेले. असगर यांनी म्हटले होते -
खुदा जाने कहॉँ है ‘असगर’ दीवाना बरसोंसे
की उसको ढुंढत़ा है काबा-ओ-बुतखाना बरसोंसे
(देव जाणे तो असगर नावाचा एक प्रेमवेडा माणूस कुठे आहे. त्याला मंदिर आणि मशीद सारेच वर्षानुवर्षे शोधत आहेत.)

जिगर यांनी म्हटलेच होते -
बदन से जान भी हो जाएगी रुखसत जिगर लेकिन
न जाएगा खयाले-हजरते असगर मेरे दिल से
(देहापासून जीव एकवेळ जाईल; परंतु माझ्या हृदयातून हजरत असगर साहेबांचा विचारसुद्धा जाणार नाही.)

'मित्राची कबर सोडून मी कसा निघून जाऊ?’ असं म्हणत बिरादरीला सोडून मित्रासाठी जगणाऱ्या आणि मित्राखातर कौटुंबिक आयुष्य पणाला लावणारया या प्रतिभावंत शायरांचे आयुष्य आजही सच्च्या मैत्रीसाठी प्रेरणादायी आहे. यांच्या अलौकिक मैत्रीला अन अप्रतिम शायरीला त्रिवार सलाम ...

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post.html

( संदर्भ - जिगर मुरादाबादी आणि असगर गोंडवी यांच्या शायरीसंदर्भातले लेखन - 'तो जमाने पे छा गया ' व ‘जिगर’बाज असगर' - लेखक श्री. प्रदीप निफाडकर )

Jigar Muradabadi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर ओळख करुन दिली आहे तुम्ही..
वाचता वाचता त्यात हरवून जायला होत..
बॉलीवूड च्या कृपेने काही शेर यातले कानी आले अन मनी बसले..
बरेच उर्दू शब्द नव्याने कळले ..
धन्यवाद..

अतिशय सुरेख लेख आहे. जिगर मुरादाबादी हे नाव चित्रपटांमुळे परिचित आहे पण त्यामागची कथा माहीत नव्हती. दोन मित्रांची मैत्री खूप हृदयस्पर्शी आहे, त्याचवेळी दारू माणसांचे किती अध:पतन करते हे वाचून विषnn व्हायला होते.

अतिशय सुरेख लेख आहे. जिगर मुरादाबादी हे नाव चित्रपटांमुळे परिचित आहे पण त्यामागची कथा माहीत नव्हती>>+1

भारी.. यातल काहीच माहित नव्हत..>>> +११११

दोघेही (जिगर, असगर) असामान्य प्रतिभा घेऊनच जन्माला आलेले दिसतात.. कसले एकेक शेर लिहिले आहेत...

खूपच सुंदर लेख... अनेकानेक धन्यवाद ...

पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख, समीर, संकलन मस्त झालंय..
शायर लोक किती मनस्वी आणि आपल्याच विश्वात गुंग असतात हे पुरतं कळलं.

जिगर मोरादाबादी खास आवडून गेले. Happy

आहा हा! मस्तच लेख.
यातले शेर माहित होते अनेक पण त्यामागे एवढे काही असेल हे माहित नव्हते अजिबात. सुरेखच लिहिलय.

'अब तो यह तमन्ना है किसीको भी न देखूँ
सूरत जो दिखा दी है तो ले जाओ नजर भी'........ क्या कहने

छान

@अजातशत्रू, छानच लिहीलंय. नक्कीच अभ्यास करून लिहीलंय.
धन्यवाद हरिहर, एक सुंदर धागा वर काढलाय आपण.

सुंदर लेख वाचायचा राहून गेला होता. या शायरांच्या शायरीशी ओळख होती पण त्यांच्या मैत्रीबद्दल काहीच माहित नव्हते.
लेख वर काढल्याबद्दल हरिहर यांना धन्यवाद.>> +१