'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.
'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.
इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.
'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.
'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.
नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !
'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html
अहो राहू द्या. थेटरमध्ये
अहो राहू द्या. थेटरमध्ये बघणार आहात ना. मग विसरा ती सिडी.
ह्या आणी अशा बर्याच
ह्या आणी अशा बर्याच रिव्ह्यूच्या संदर्भात एक गोष्ट अधोरेखीत होते की असे परिक्षण वगैरे वाचून चित्रपट पहायचा की नाही हे ठरवणे निव्वळ गैर.
फार फार तर प्रोमोज वगैरे बघून ठरवायचे हवेतर, पण असल्या लो आय्कू रिव्ह्यूपासून लांबच रहायचे.
"पसरट"?? लांबी थोडी जास्त आहे
"पसरट"?? लांबी थोडी जास्त आहे पण ३ तासांत कधीच लक्ष विचलित झालं नाही.
मला फार आवडला.
याड लागलं............सैराटचं
याड लागलं............सैराटचं याडं लागलं!!
युट्युबवर वगैरे पायरेटेट बघू नका. मोठ्या स्क्रीनवर बघा. सिनेमॅटोग्राफी फार छान आहे. आणि त्याला जोड मिळाली आहे जबरी बॅकग्राउंड म्युझिक आणि अतिशय नैसर्गिक अभिनयाची. काही उदा देते. मला केवळ या दृश्यांसाठी परत परत पाहायला आवडेल. पण आमच्या शहरात एकच शो होता काल.
परश्या रानातून पळतो ते सगळे सीन्स - हिरवंगार रान आणि त्याची मनात अल्लड प्रेमाच्या गुदगुल्या होणारी expressions
सैराट झालं जी गाण्यात ते दोघे झेंडुच्या शेतात बसले आहेत तो सीन
जुनी दगडी विहीर आणि गडद पाणी - विहीरीची भव्यता, सौंदर्य काही सेकंदात डोळ्यात भरतं.
तो प्रोमो मधला सूर्याचा सीन तो तर अफलातून आहे
पक्षी उडण्याचे बरेच सीन आहेत - ते ते त्या त्या प्रसंगाला अनुसरून हळवे, सुंदर किंवा गोळीबारानंतर भयाण वाटतात.
हैदराबादला स्टेशनचा शॉट एका सेकंदात वास्तवात आणतो.
आणि हैदराबादची (पुण्यातल्या पर्वतीची) ती बकाल वस्ती वास्तव अंगावर आणते.
बाकी सगळं - संगीत, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन वगैरे वर बरंच बोलणं झालंय त्यामुळे रीपीट नको. पण सिनेमा मोजक्या १० त गेला.
रिव्ह्यू नीट वाचला. रसप
रिव्ह्यू नीट वाचला.
रसप यांना सुरूवातीच्या १ तासाच्या भागाविषयी तक्रार अाहे. त्यांच्या मते हा भाग टिपिकल मसाला (कमर्शियल) फिल्मसारखा आहे. यात काही नाविन्य नाही. पण नंतरच्या भागातल्या नागराज इम्पॅक्टला त्यांनी दाद दिली आहेच.
शिवाय अजय-अतुलच्या संगीताची त्यांनी तारीफच केली आहे.
कास्टिंग विषयी त्यांनी पूर्ण गुण दिले आहेत.
मलातरी हा रिव्ह्यू लोक म्हणतात तितका वाईट नाही वाटला.
आता पहिल्या भागाविषयीचे माझे मत. हा भाग इतका रंजक नसता केला तर प्रेक्षक इतका तन्मयतेने चित्रपट पाहत नसता बसला. त्यामुळे अचानक अंगावर येणारा शेवट तितका प्रभावी नसता झाला.
"पसरट"?? लांबी थोडी जास्त आहे
"पसरट"?? लांबी थोडी जास्त आहे पण ३ तासांत कधीच लक्ष विचलित झालं नाही. >>+१
पहिल्यांदा बघतांना काही भागात जसे की ते पळुन जातांना वा स्थिरस्थावर होतांना (to settle down ?) मला काही वेळेस ताण असह्य झाला, पण दुसर्यांदा बघतांनादेखील (घरी बघितला तरी- आमच्या गावात एकच शो होता ममंचा) कंटाळा आला नाही. फर्स्ट हाफ खूप आवडला होता, नंतर बघतांना सेकंड हाफपण आवडला. रुरल भागात्/गांवात कधी राहिले नाही तरी सैराट खूपच एंजॉय केला, अगदी ती भाषा, उच्चार, वागण्यातला वा मैत्रीतील मोकळेपणा भावला. आर्ची तर आवडलीच, पण सल्ल्या, बाळ्या आणि सर्वात परश्या जामच आवडला.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/sairat-nagraj-manjules-...
पसरट सैराट चार भाषात रिमेक होऊन दिसणार
पीव्हीआर सिनेमा कुर्ल्यात नट
पीव्हीआर सिनेमा कुर्ल्यात नट डायरेक्टर इ .चे स्केचेस आहेत. एक नागराज मंजुळेसारखे दिसले. म्हणून पाहिले तर तो स्टिव्हन स्पिलबर्ग निघाला. ( पीवीआर ला आज रसपचा फेवरॅट फोबिया बघुन आलो. एकदम फालतू मुव्ही . पैसे फुकट गेले. सैराट अजुनही आहे .. तात्पर्य : यांची परिक्षणे बेभरोश्याची असतात. )
अनिल मस्तच रे.... काय योगायोग
अनिल मस्तच रे.... काय योगायोग आहे
ससैराटने मराठी चित्रपट
ससैराटने मराठी चित्रपट क्षेत्रात इतिहास निर्माण केलाय. सर्वाधिक कमाई केलिय. रसप यांना हा चित्रपट तितकासा आवडला नाहिये. पण त्यांनी जेव्हढे धागे काढलेत त्यातही छप्परतोड प्रतिसाद ह्या धाग्यालाच मिळालेत.
सैराट कि जय हो.
चुकून इथे पोस्ट झली हिती
चुकून इथे पोस्ट झली हिती गल्ली चुकून , संपादीत !
इंडियन एक्स्प्रेस आयडिया
इंडियन एक्स्प्रेस आयडिया एक्स्चेंजमध्ये नागराज मंजुळेंना प्रश्न विचारला गेला :
सैराट फँड्रीपेक्षा आशय व शैलीच्या बाबत खूप भिन्न आहे.यात व्यावसायिकतेची गणितेही मांडलीत . यावर नागरजाचं उत्तर :
That was my intention. I wrote this story even before Fandry (2013), but I didn’t know how to tell the story. Then Fandry released and I saw how people reacted. They complained about how despite a song being used for its publicity, there were no songs in the movie itself. The Indian film industry is 100 years old and over time we have internalised the idea that films should have songs. So it becomes difficult to make films like Fandry and Court, which have no songs. I wish more people had watched Fandry. Fandry is a simple story of a boy’s struggle. There was not too much philosophy, nothing that would make you think too much. You can read more meaning into it, but that meaning is not an obstacle in enjoying the story. I wrote the script for Sairat after a lot of deliberation: I will tell my story, but I will tell it your way and then you will watch it.
मी मला हवी तीच गोष्ट सांगेन. पण तुमच्या पद्धतीने. आणि तुम्ही ती पहाल.
ह्म्म्म... खरे आहे. लोकांना
ह्म्म्म... खरे आहे. लोकांना जे पाहायला आवडते तेच ते पाहणार. तुम्ही काही वेगळे दिले तर ते नाकारणार. उडता पंजाब मध्ये स्टेज वर उभा राहून टॉमि सिंग स्वतः किती अध:पतीत झालाय हे सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला डोक्यावर घेऊन नाचणारे चाहते गाना गा नहीतो जा चा घोषा लावतात.
रसप हे त्यांना जसा सिनेमा
रसप हे त्यांना जसा सिनेमा आवडतो किव्वा आवडत नाही तस ते परीक्षण लिहितात . ती त्यांची मत आहेत. तुम्हाला नसेल आवडत त्याचं परीक्षण ( रिव्हू ) तर नका वाचू <<..( पीवीआर ला आज रसपचा फेवरॅट फोबिया बघुन आलो. एकदम फालतू मुव्ही . पैसे फुकट गेले. सैराट अजुनही आहे .. तात्पर्य : यांची परिक्षणे बेभरोश्याची असतात. )>> म्हणजे काय? . नका न वाचू . जबरदस्ती आहे का ? मी काही रसपना व्यक्तीशः ओळखत नाही ना कधी त्यांना बघितलाय . पण हे काय?. तुम्ही लिहा ना तुमच्या पद्धतीने परीक्षण
मी मला हवी तीच गोष्ट सांगेन.
मी मला हवी तीच गोष्ट सांगेन.
Pages