भारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती

Submitted by पराग१२२६३ on 30 May, 2016 - 08:15

"जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की' या भारतीय नौदलाच्या गीतामध्ये एका ओळी असेही म्हटले गेले आहे की, ‘रक्षा करेंगे सागर तट की, ताकद बढ़ायेंगे भारत की’. या ओळीलाच अनुकूल राहत भारतीय नौदलाने आज विविध प्रदेशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे.

INS Delhi.jpg

अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यातली ३ जहाजे - भा.नौ.पो. दिल्ली, तर्कष आणि दीपक मुंबईहून पर्शियाच्या आखाताकडे धाडली होती. मेच्या पहिल्या आठवड्यात महिन्याभराच्या तैनातीसाठी या जहाजांनी मुंबईतील आपला तळ सोडला होता. जगातील सर्वाधिक तणावग्रस्त आणि सामरिकदृष्ट्याही अतिशय संवेदनशील असलेल्या पर्शियाच्या आखातात भारताचे हितसंबंध मोठ्या प्रमाणात गुंतलेले आहेत. म्हणूनच त्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी भारताला आपल्या युद्धनौका आणि हवाईदलाच्या विमानांनाही त्या प्रदेशांतील विविध तळांना नियमित भेटीसाठी पाठविणे आवश्यक वाटत आहे. म्हणूनच या मोहिमेतही नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग करण्यात येत आहे. यंदाच्या मोहिमेचे नेतृत्व नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रियर ॲडमिरल रवनीत सिंग, नौसेना मेडल, यांनी केले होते.

महिन्याभराच्या पहिल्या टप्प्यात भारतीय नौदलाच्या जहाजांचे हे पथक ७ ते १० मे दरम्यान दुबईच्या तळावर विसावले होते. यूएईबरोबरच संपूर्ण आखाती प्रदेशाशी भारताचे प्राचीन काळापासून संबंध आहेत. सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाण हे या संबंधांचे मुख्य आधारस्तंभ राहिलेले आहेत. आजही भारत आणि यूएई यांचे आर्थिक संबंध अतिशय भक्कम आहेत. त्यामुळे भारताला संयुक्त अरब अमिरातीशी लष्करी क्षेत्रातही संबंध स्थापन करणे आवश्यक वाटत आहे. भारतीय युद्धनौकांच्या ताज्या भेटीने भारत-यूएई संबंधांना विशेष गती देण्याचा प्रयत्न झालेला आहे.

pic.jpg

यूएईतील दौरा मुक्काम आटपून या ३ भारतीय युद्धनौका पुढच्या प्रवासाला निघाल्या आणि मजल-दरमजल करत १२ मेला ४ दिवसांच्या मुक्कामासाठी कुवेतला पोहोचल्या. १५ मेपर्यंत तेथे थांबून या युद्धनौका आणि त्यावरील अधिकाऱ्यांनी कुवेतच्या नौदलाशी विचारविनिमय आणि युद्दसरावही केले. हा मुक्काम १५ मेला हलवून दिल्ली, तर्कष आणि दीपक बहरिनकडे निघाल्या.

मनामात बहरिनच्या नौदलाबरोबरचे संवाद, चर्चा, युद्धसराव संपल्यावर दिल्ली, तर्कष आणि दीपक आपल्या तैनातीतील शेवटच्या मुक्कामाला मस्कतच्या दिशेने निघाल्या. भारताचे ओमानशी प्राचीन काळापासून अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे आजही दोन्ही देशांच्या राजकीय नेतृत्वाबरोबरच नौदल आणि हवाईदलांमध्ये सातत्याने सहकार्य होत असते. या तैनातीत २१ ते २४ मेदरम्यान या भारतीय नौदलाच्या युद्धनौका/जहाजे मस्कतमध्ये होत्या. या संपूर्ण तैनातीत या ठिकाणच्या मुक्कामाला विस्तृत स्थान होते. भारताच्या राष्ट्रहितांच्या संरक्षणाच्या दृष्टीने या ठिकाणी भारतीय युद्धनौकांच्या मुक्कामाचे महत्त्व आणखीनच वाढत असते.

आवडीमुळे भारतीय युद्धनौकांच्या या प्रवासाच्या बातम्यांकडे लक्ष ठेऊन असतानाच एक बातमी आली. २४ मेला भारतीय युद्धनौका आपल्या मुंबईच्या तळावर यायला निघाल्या. मुंबईजवळ आपल्या सागरी हद्दीत प्रवेश केल्यावर विनाशिका भा.नौ.पो. (म्हणजेच आय एन एस) दिल्ली आणि भा.नौ.पो. दीपक पुढे निघून गेल्या. पण भा.नौ.पो. तर्कषने थोडे मागे आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात थांबून आसपासच्या परिसराचा आढावा घेण्यास सुरुवात केली, तेव्हा दोन पाकिस्तानी युद्धनौका भारतीय युद्धनौकांचा पाठलाग करत असल्याचे तर्कषला दिसले आणि तर्कष आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात आल्यावर त्या पाकिस्तानी युद्धनौकांनी मार्ग बदलून पळ काढला.

भारतीय नौदलाच्या या तैनातीच्या काळात प्रत्येक बंदरावर भारतीय युद्धनौकांचे आणि त्यांच्यावरील अधिकारी-नौसैनिकांचे संबंधित देशांच्या नौदलांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. यातून हिंदी महासागरावर आपले प्रभुत्व निर्माण करून शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय नौदलाने केलेला आहे. त्याबरोबर भारताच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टपूर्तीतही मोलाचे योगदान नौदल अशा तैनातीद्वारे देत आहे. हाच प्रदेश लक्षावधी भारतीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे, हे विशेष उल्लेखनीय.

या तैनातीच्यावेळी भारतीय नौदलाने यूएई, कुवेत, बहरिन आणि ओमानच्या नौदलांबरोबर सागरी सुरक्षा, सागरी दहशतवाद, चाचेगिरी या मुद्द्यांवर विचारविनिमय केला. त्याचबरोबर त्या-त्या देशांच्या नौसैनिकांबरोबर समन्वय आणि परस्पर विश्वास वाढविण्याच्या हेतूने क्रीडास्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.

नेहमी मुंबईच्या गल्लीबोळातल्या बातम्या आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम घडवणाऱ्या असल्याच्या स्वरुपात सादर करणाऱ्या आमच्या मराठी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांना भारतीय नौदलाच्या या महत्त्वाच्या तैनातीची दखल घ्यावीशी वाटली नाही. कारण त्यांचा दृष्टिकोनच असा झाला आहे की, बातमी म्हणजे गल्लीबोळातले पॉलिटिक्स, क्राईम, क्रिकेट, सिनेमा आणि असाच उथळपणा. त्यांच्या मते, सामान्य माणसाला नौदलाच्या अशा तैनातीत काही देणेघेणे नसते. मग अशा बातम्या काय महत्त्वाच्या? त्या कशासाठी म्हणून द्यायच्या? एरवी छोट्या-छोट्या गोष्टींचा इश्यू करून त्यावर एकाच तालासूरात दिवसभर खुर्च्या धरून बडबडण्यात तोंडातून वाफ काढायला त्यांच्याकडे प्रचंड वेळ असतो, पण भारतीय लष्कराच्या अशा कार्याकडे पाहण्यासाठी फूरसत नसते. कारण त्याचे महत्त्व त्यांनाच कळालेले नसते. तेवढी त्यांची क्षमताही नसते. आणि एरवी हेच सारे जगात आमच्याइतके सर्वज्ञानी कुणीही नाही अशा आर्विभावात समाजात वावरत असतात. म्हणूनच भारताच्या आखाती देशांच्या संबंधांना आणि हिंदी महासागरातील सुरक्षेला बळ देत महिन्याभराने मुंबईत भारतीय युद्धनौका परतल्या तरीही ती घटना त्याच्या दृष्टीने दखलपात्र ठरलेली नाही.
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपुर्ण, लेख आवडला.
धन्यवाद ह्या (ही) लेखा करता +१

या संदर्भातली ' टाइम्स ऑफ ओमान' मधली २३ मे ची बातमी खालच्या लिंक वरः-

http://timesofoman.com/article/84410/Oman/Government/Indian-Navy-offers-...

शेवटचा परिच्छेद म्हणजे मिडियाला दिलेली चपराक आहे... कुठे तरी बारिकशी बातमी येऊनही गेली असेल पण ज्या प्रमाणात यायला पाहिजे तितकी नक्कीच आलेली नाही.. आणि ओमान सारख्या देशातील मिडिया ह्या गोष्टींची दखल घेते पण आपला मिडिया नाही..

कारण त्यांचा दृष्टिकोनच .................. तरीही ती घटना त्याच्या दृष्टीने दखलपात्र ठरलेली नाही.

१०० टक्के सहमत.

छान माहिती पराग . मीडियाच्या उदासिनतेबाबत सहमत.

योगायोग म्हणजे हा लेख वाचण्यापुर्वी मी आमच्या शेजारच्या काकांबरोबर जे माझगाव गोदीत पाणबुडी प्रकल्पामध्ये सद्या कार्यरत आहेत त्यांच्या बरोबर नौदलात आता होत असलेल्या सुधारणे विषयी चर्चा करत होतो.

उत्तम विवेचन! आपण करीत असलेले कार्य अन लेखन उत्तम आहे ह्याने लोकांना एरवी कमी माहीती असलेल्या क्षेत्रांबद्दल नवी माहीती मिळेल

रेड फ्लॅग युद्धसराव असोत की अशा प्रकारची तैनाती जगभरातील प्रसारमाध्यमांचे भारतीय लष्कराच्या या हालचालींकडे लक्ष असते. आपल्याकडेही इंग्लिश/हिंदी वृत्तपत्रांनी याच्या बातम्या दिल्या. पण नेहमीप्रमाणे मराठीबाणा जपणाऱ्यांचे तिकडे लक्षही गेले नाही.

वा पराग...... पुन्हा एकदा अतिशय हटके विषयावरील उत्तम लेख....

शेवटचा परिच्छेद म्हणजे मिडियाला दिलेली चपराक आहे... कुठे तरी बारिकशी बातमी येऊनही गेली असेल पण ज्या प्रमाणात यायला पाहिजे तितकी नक्कीच आलेली नाही.. आणि ओमान सारख्या देशातील मिडिया ह्या गोष्टींची दखल घेते पण आपला मिडिया नाही.. >>>>>>>> +१११११११११

.

सर्वांनाच धन्यवाद या प्रतिक्रियांसाठी. असे विषय सतत लोकांच्यासमोर येत राहणे आवश्यक आहेच - देशासाठी आणि समाजासाठीही.