तुझ्या घरात पाऊल टाकतानाच माहिती होतं,
हा काही आपला कायमचा मुक्काम नव्हे..
पण माझ्या विदग्ध आत्म्याला विसावा देऊ शकणारी,
हीच ती जागा...
आणि मग एकेक दिवस करत मुक्काम वाढतच गेला,
तुझं घर आपलंच समजू लागले मी..
कधी निघून जावं म्हटलं तर तू ही थांबवलस मला..
आणि मलाही नाही ओलांडता आला तुझा लोभसवाणा आपलेपणा..
मग सजवत गेले तुझं घर, आपलंच समजून..
कानेकोपरे धुंडाळले.. भूतकाळ चाचपला..
नवे रंग आणले, नवे गंध आणले, नवे सूर आणले..
बोलक्या झाल्या भिंती, हळुवार झाली हवा..
इतकंच काय पण,
तुझ्या अंगणभर मोगरासुद्धा बहरला,
आपल्या निरंतर गप्पांसोबत...
पण आता तुझ्या आपलेपणावर हक्क सांगू येतायेत माझी दुःखं..
तुझ्या घराच्या अवकाशात जमू लागलंय माझ्या अपेक्षांचं मळभ..
वेदनांनाही हवी झालीये तुझ्या घरात त्यांची जागा..
संकेत मिळालाय.. आता निघायला हवं..
माझ्यातल्या अनावर वादळाने आपलं अंगण उद्ध्वस्त होण्यापूर्वी..
तुझ्या चंद्रमौळी घरात माझ्या वेदनेचे सूर घुमण्यापूर्वी..
तुझ्या ओल्या आवाजात नको घालू शपथ आपल्या मोगर्याची..
आता माझी निघायची वेळ झाली...
-------------------------------------------
merakuchhsaman.blogspot.in
अगदी आत्मीय शब्द भासले .
अगदी आत्मीय शब्द भासले . आवडले मुक्तक .