हल्ली कामासाठी बऱ्याचदा माझं ‘फँटम फिल्म्स’च्या अंधेरीमधल्या ऑफिसमध्ये जाणं होतं. ‘फँटम फिल्म्स’ म्हणजे अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहेल आणि मधु मंतेना या चौघांनी मिळून सुरू केलेलं, प्रॉडक्शन हाऊस. तर ‘फँटम’चा स्वतःचा असा एक स्क्रिप्ट डेव्हलपमेंट विभाग आहे, जिथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या लेखकांनी पाठवलेल्या चित्रपट संहिता वाचणे, नवीन कथानक डेव्हलप करणे अशी कामे चालतात. तिथे एक छोट्या चणीची सुंदर मुलगी नेहमी, तिच्या लॅपटॉपवर काही तरी वाचत असताना दिसायची. जेव्हा वाचत नसायची, तेव्हा ऑफिसमध्ये उत्साहीपणे भिरभिरत असायची. तिला कुठे तरी पाहिलं आहे, असं सतत वाटायचं. पण नेमकं आठवत नव्हतं. एकदा मी असाच ऑफिसमध्ये आलो असताना जिच्यासोबत माझी मीटिंग ठरलेली होती, ती सोनम नेमकी ऑफिसमध्ये नव्हती. मला सोनमचा मेसेज आला की, मी ऑफिसमध्ये नाहीये, माझी कलिग तुला भेटेल आणि नेमकी ती सुंदर मुलगीच समोर उभी राहिली. तिने हसतमुखाने हस्तांदोलन केलं, ‘हाय, मी श्वेता बसू प्रसाद. तू अमोलच ना?’ श्वेता बसू प्रसाद नाव ऐकताच मला धक्का बसला, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. इनमीन दोन वर्षांपूर्वी एका आयुष्य भोवंडून टाकणाऱ्या प्रकरणात अडकलेली अभिनेत्री हीच श्वेता बसू प्रसाद आहे, हा धक्का ओसरायला थोडा वेळ लागला. श्वेता बसू प्रसादचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट म्हणजे विशाल भारद्वाजचा ‘मकडी’. अकरा वर्षांच्या श्वेताने चुन्नी आणि मुन्नी या जुळ्या बहिणींच्या रोलमध्ये धमाल उडवून दिली होती. नंतर आलेल्या नागेश कुकनूरच्या ‘इक़्बाल’मध्ये श्रेयस तळपदेच्या बहिणीच्या भूमिकेत तर ती एकदम ‘छा’ गयी. नेक्स्ट बिग थिंग वगैरे विशेषणांचा तिच्यावर पाऊस पडला. पण घवघवीत यश तिच्या नशिबात फार वेळ नव्हतं. अनेक यशस्वी बालकलाकारांचं जे होतं तेच तिचं झालं. अपेक्षांचं ओझं तिला पेलवलं नाही. मोठी झाल्यावर तिने काही अयशस्वी हिंदी चित्रपट केले. "कहानी घर घर की" ’सारख्या गाजलेल्या मालिकेत काम केलं. पण अपेक्षेप्रमाणे आपली प्रगती होत नाहीये, हे लक्षात येताच अनेक अभिनेत्रींप्रमाणे तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा रस्ता धरला. एक गुणवान, पण अयशस्वी ठरलेली अाणखी एक यशस्वी बालकलाकार एवढीच श्वेताची ओळख राहणार, असं वाटत असतानाच एक दिवस असा आला की, आता सगळंच संपलंय की काय, असा प्रश्न पडला. हैदराबाद पोलिसांनी एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यामध्ये ‘श्वेता वेश्या व्यवसाय करताना रंगेहाथ पकडली गेली’ अशा बातम्या एका दिवशी सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांत झळकल्या. तिच्यासोबत तिचा ‘एजंट’ आणि ‘क्लायंट’ पण पकडले गेले, असेही बातमीमध्ये नमूद करण्यात आले होते. अशा केसमध्ये संबंधित संशयितांचे (विशेषतः स्त्रीचे) नाव गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी घोषित करू नये, असा एक संकेत आहे. पण हा संकेत हैदराबाद पोलिसांनी पायदळी तुडवला. पण त्याहून संतापदायक हे होतं की त्या पुरुष ‘क्लायंट’चं नाव मात्र कधीच जगाला कळलं नाही. हा भेदभाव का? श्वेता एक स्त्री होती म्हणून की, आपल्या सेलिब्रिटी असण्याची किंमत तिला चुकवावी लागत होती? पोलिसांनी श्वेताला कोर्टासमोर उभे केले. कोर्टाने तिला दोन महिन्यांसाठी महिला सुधारगृहात पाठवले. नंतर लगेच श्वेताचे आपण वेश्या व्यवसायात कोणत्या मजबुरीने स्वीकारला, याचं स्पष्टीकरण देणारे कबुलीजबाबटाइप निवेदन माध्यमातून फिरू लागले. श्वेता जेव्हा मुंबईला परत आली तेव्हा तिला या ‘तथाकथित’ कबुलीजबाबाबद्दल कळलं तेव्हा तिला जोरदार धक्का बसला. कारण तिने असे कुठलेही निवेदन प्रसृत केले नव्हते. तिचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला होता. श्वेता सुधारगृहात असताना कुठल्याही प्रकारे माध्यमांशी संपर्क करण्याचा प्रश्नच नव्हता. मग हे निवेदन प्रसारमाध्यमांना कुणी दिले? हैदराबाद पोलिसांनी कानावर हात ठेवले. माध्यमांनी कुठल्याही प्रकारे शहानिशा न करता हे निवेदन सरळ छापून टाकले. स्त्रीचे नाव छापू नये, असा संकेत असताना श्वेता वेश्याव्यवसायात गुंतली असल्याचा आरोप केला गेला. माध्यमांचे म्हणून जे काही संकेत असतात, ते सर्व माध्यमांनी वारंवार पायदळी तुडवले. यथावकाश कोर्टात केस उभी राहिली.
आपण हैदराबादला एका पुरस्कार सोहळ्यासाठी आलो होतो, हे श्वेता आणि तिच्या वकिलांनी कोर्टात सिद्ध केले. पुरस्कार सोहळ्याचं आमंत्रण, बुक केलेली तिकिटे वगैरे कोर्टात दिली. अपेक्षेप्रमाणेच कोर्टाने श्वेताची सर्व आरोपांमधून मुक्तता केली. अजून एक केस संपली. मीडिया टीआरपीसाठी दुसऱ्या केसच्या मागे धावण्यात गुंतून गेला. पण श्वेताचं काय? तिचं तर जग उद्ध्वस्त झालं होतं. समाजाने तिच्यावर ‘वेश्या’ असा ठप्पा मारून टाकला होता. तिला अभिनेत्री म्हणून काम मिळणं यापुढे शक्य नव्हतं. दुसरं कुणी अशा प्रसंगी खचून गेलं असतं. झालेल्या बदनामीमुळे आपल्या कोशात निघून गेलं असतं. पण श्वेताने ठामपणे असं करण्याचं नाकारलं. तिने लढा द्यायचा ठरवलं. सर्वप्रथम माध्यमांना ‘उघडं’ पाडण्यासाठी तिने एक निवेदन प्रसृत केलं. त्यामध्ये तिने या अनावश्यक व बदनाम करणाऱ्या ‘मीडिया ट्रायल’चा समाचार घेतला. हे निवेदन इंटरनेटवर शोधलंत तर सहज मिळेल. बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी तिने जोरदार प्रयत्न सुरू केले. पण सगळीकडे पदरी निराशाच पडत होती. या प्रसंगी तिच्या मदतीला धावून आले, ते अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने हे दिग्दर्शक. त्यांनी तिला ‘फँटम फिल्म्स’च्या स्क्रिप्ट डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची ऑफर दिली. जवळपास विजनवासात गेलेल्या श्वेताने ही संधी घेताना मागचा-पुढचा कसलाही विचार केला नाही. ‘शो मस्ट गो ऑन’ हे सूत्र बालपणापासून शो बिझनेसमध्ये असलेल्या श्वेताला कुणी सांगायची गरज नव्हतीच. श्वेताचं वाचन लहानपणापासूनच खूप चांगलं होतं. त्याचा फायदा तिला तिच्या नवीन जॉब प्रोफाइलमध्ये होतो आहे. श्वेता सध्या खूप आनंदी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, तिला आता पुन्हा अभिनयाच्या ऑफर्स पण मिळू लागल्या आहेत.
पण श्वेतासोबत जे काही घडलं त्यामुळे काही प्रश्न पडतात. न्यायालयांनी निकाल देण्यापूर्वीच जी मीडिया ट्रायल होते, तिचे कायदेकानून काय आहेत? माध्यमांनी न्यायाधीशाची भूमिका बजावावी काय? मीडिया ट्रायलमुळे एखादे निरपराध आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर त्याची जबाबदारी कुणाची? श्वेताला देवदूतासारखे अनुराग आणि विक्रमादित्य भेटले. प्रत्येकाला तसेच कुणी भेटेल, हे शक्य नाही. वाईट परिस्थितीतून स्वतःला सावरून पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या श्वेताचं कौतुक करावं तितकं कमीच. फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा उड्डाण घेतो, अशी एक दंतकथा आहे. ही दंतकथा श्वेता प्रत्यक्ष जगली आहे...
श्वेता नावाचं फिनिक्स
Submitted by बावरा मन on 22 May, 2016 - 00:18
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाईट परिस्थितीतून स्वतःला
वाईट परिस्थितीतून स्वतःला सावरून पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या श्वेताचं कौतुक करावं तितकं कमीच.>>> +१
न्यायालयांनी निकाल देण्यापूर्वीच जी मीडिया ट्रायल होते, तिचे कायदेकानून काय आहेत? माध्यमांनी न्यायाधीशाची भूमिका बजावावी काय? मीडिया ट्रायलमुळे एखादे निरपराध आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर त्याची जबाबदारी कुणाची?>>> +१ कळीचे प्रश्न !
मकडी आणि इक्बाल दोन्हीही सिनेमातली तिची भूमिका फार आवडली होती. मध्यंतरी आलेल्या वादळातून फिनिक्स भरारी घेऊन पुन्हा तिचे आयुष्य मार्गी लागू दे हीच सदिच्छा !
छान आहे लेख ..आवडला..
छान आहे लेख ..आवडला..
लेख छान. आवडला. श्वेताचे
लेख छान. आवडला.
श्वेताचे अभिनंदन!
खरंच आपण अहदी इतकुअह्या बदनामीला घाबरतो पण ही मुलगी धीराने सगळ्याला सामोरी गेली आणि नविन आयुष्य सुरूही केले.
असे फायटींग स्पिरीट पाहिजे. खरं 'एक फिनिक्स' या शीर्षकाची यथार्थता पटली आहे.
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/entertainment/entertainment-others/shwe...
श्वेता इज रियल फाइटर!! बी
श्वेता इज रियल फाइटर!! बी लाइक श्वेता!!
I salute Shweta ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्वेताच्या फायटिंग स्पिरिटला
श्वेताच्या फायटिंग स्पिरिटला सलाम ! तिला नव्या क्षेत्रात संधी देणार्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांचे अभिनंदन!
भारतात प्रॉस्टिट्युशन लिगल आहे ना? म्हणजे दोन व्यक्तींमधे सरळ व्यवहार ओके पण ब्रॉथेल्स, पिंप वगैरे वर बंदी , त्यावर इतरांना फुकटात कमिशन खाणे इलिगल असे काहीतरी? मग असे असताना सगळे लगेच ओवरड्राइवमधे का जातात? लैंगिक शोषण होऊ नये म्हणून कायदे असताना मॉरल पोलिसिंग करत सनसनाटी मजकूर छापणे चालते ते अतिशय क्लेशकारक! हे ही एक प्रकारे पिडित व्यक्तीचे शोषणच. संकेत पायदळी तुडवणार्या घटकांवर कारवाई होते का? म्हणजे संकेत असणे आणि कायदा असणे यात फरक आहे ना? संकेत पाळले जाणार नसतील तर कायदा तरी करावा.
श्वेताबद्दल पकडली गेली ते
श्वेताबद्दल पकडली गेली ते वाचले होते व फार वाईट वाटले होते. वेश्याव्यवसाय करते म्हणून नाही तर एखादा एशियाड गोल्ड मेडलिस्ट वडापाव विकतो अशा पद्धतीच्या बातम्या वाचल्यावर जसे वाईट वाटते तसे. पकडण्यापुढील घटना इथे वाचून आश्चर्य पण शेवटी समाधान वाटले. क्वीन सारखे सिनेमे काढणे एक भाग पण व्यवहारातही स्त्रीला जीवन घडवण्याची संधी देणे खरी माणुसकी. नीड मोअर ऑफ विक्रम्स अँड अनुराग्ज.
साती, सिमी +१ मला खुप बरं
साती, सिमी +१![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला खुप बरं वाटलं हे वाचून. फेसबूक वर लिंक शेअर करतेय आणि घरीही वाचायला देईन.
या असल्या लेखांची सध्या समाजाला खुप गरज आहे. पण अनफॉर्च्युनेटली हे असले लेख कधीही व्हायरल होणार नाहीत
श्वेताचं खरंच कौतुक आहे. छान
श्वेताचं खरंच कौतुक आहे. छान लेख.
हा लेख मी आज सकाळी फेबूवर
हा लेख मी आज सकाळी फेबूवर दिव्य मराठी मध्ये वाचला... छान वाटलं तिचं आयुष्य ती पुन्हा उभं करतेय. या स्पिरीटने ती अजून पुढे जाईल आणि यशस्वी होईल हे नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्वेताचं खरंच खूप कौतुक! ह्या
श्वेताचं खरंच खूप कौतुक!
ह्या लेखाबद्दल अनेकानेक धन्यवाद
श्वेताचं खरंच खूप कौतुक! ह्या
श्वेताचं खरंच खूप कौतुक!
ह्या लेखाबद्दल अनेकानेक धन्यवाद >>>> +११११
श्वेताचं खरंच खूप कौतुक! ह्या
श्वेताचं खरंच खूप कौतुक!
ह्या लेखाबद्दल अनेकानेक धन्यवाद +१
आणि तिला खूप खूप शुभेच्छा. खूप गुणी अभिनेत्री आहे ती !!
बावरा मन, तुम्हाला संपर्कातून
बावरा मन,
तुम्हाला संपर्कातून एक ईमेल केलं आहे. कृपया वाचून उत्तर द्यावे ही विनंती.
लेख वाचला होता पेपर मधे..
लेख वाचला होता पेपर मधे.. मस्तच _/\_
@ललिता-प्रीति - उत्तर दिले
@ललिता-प्रीति - उत्तर दिले आहे. सर्वान्चे आभार
हा लेख काल संध्याकाळी दिव्य
हा लेख काल संध्याकाळी दिव्य मराठी वर वाचला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्वेता ला खुप खुप शुभेच्छ्गा..ती नक्कीच यशस्वी होईल. लिंक शेअर करणार.