सैराट का बघावा? १० कारणे द्या !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2016 - 16:57

आता पर्यंत सैराटची बरीच परीक्षणे येऊन गेलीत, मी वेगळे काय लिहिणार..

पण ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांच्यासाठी सैराट का बघावा याची १० कारणे देऊ शकतो.

१) गेले काही दिवस जिकडे तिकडे सैराटचीच चर्चा वाचून मी या चित्रपटाला गेलो होतो. या चर्चांनी अगोदरच वाढलेल्या अपेक्षा देखील सैराट पुर्ण करतो.

२) ‘सैराट-एक लव्हस्टोरी’ शाहरूख, चोप्रा आणि करण जोहार मंडळींच्या तोंडात मारावी अशी जमलीय. प्रेम म्हणजे काही तरी लार्जर दॅन लाईफ भावना आहे अश्या आविर्भावात बनवलेल्या बॉलीवूडी चित्रपटांनी आपले गंडवलेले कन्सेप्ट क्लीअर करत ईतक्या सहजसुंदर आणि नैसर्गिकपणे यात सारे काही घडते की चित्रपटाच्या पहिल्या भागात असंख्य गुदगुल्या मनाला सतत होतच राहतात. या अवस्थेतून मध्यंतरापर्यंत तरी आपण बाहेर पडत नाही.

३) डोळ्यांची पारणे फिटावीत अशी द्रुश्ये एका मराठी चित्रपटात बघायला मिळतात आणि ती देखील आपल्याच मातीतील, गावखेड्यांतील, शेतातील दिसतात. मराठी चित्रपट गेल्या काही काळात तांत्रिकदृष्ट्या झेप घेऊ लागलेत असे म्हटले, तर ही भरारी आहे. हिंदीच्या तोडीस तोडच नाही तर त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. ते देखील मराठी चित्रपटाच्या बजेटमध्ये हे विशेष. हिंदी ब्लॉकबस्टरचे बजेट दिले तर हा माणूस पडद्याला आग लावेल.

३) तांत्रिक बाबींतले एक प्रेक्षक म्हणून जेवढे कळायला हवे तेवढेच मला समजते. पण ते पक्ष्यांचे थवे, शेतातील वाटा, खोल विहीरीतल्या पाण्यात ढुबुक आवाज होत पडणार्‍या उड्या, आकाशातून मनाचा ठाव घेत फिरणारा कॅमेरा, स्लो मोशनमध्ये केलेले गाण्यांचे अप्रतिम चित्रीकरण आणि अश्या कैक द्रुश्यांत हा चित्रपट थिएटरलाच बघायला आल्याचा निर्णय सार्थ वाटतो.

४) चित्रपटातील झिंगाट गाणी नाचायला लावतात तर पार्श्वसंगीत डोलायला लावते. येड लागलं गाणे तर अक्षरशा याड लावते. सैराटची गाणी चांगली आहेत यात प्रश्नच नाही. पण चित्रपट बघितल्यावर त्यातील भावना आणखी आत आत उतरत जातात. आता पुढचे काही दिवस तरी सतत रीपीट मोडवर लागणार्‍या येड लागलंची झिंग उतरणे कठीणच.

५) कुठेही मोठाले फिल्मी डायलॉग नाहीत. कुठल्या आणाभाका नाही. आपलेच प्रेम अमरप्रेम आहे असे दाखवायचा अट्टाहास नाही. बस्स आपण शाळा कॉलेजात असताना जसे प्रेम करतो, त्या प्रेमात जे घडते, तेच अतिशय सुंदर पद्धतीने दाखवले आहे. चिठ्ठीतून प्रेम व्यक्त करायचा प्रकार धमाल जमला आहे. मला सर्वात जास्त आवडलेला आणि स्वताशीच हसायला लावणारा प्रसंग म्हणजे जेव्हा आर्ची वर्गात बसल्याबसल्या परश्याकडे एकटक बघतच राहते आणि त्याची जी काही अवस्था होते..... बस्स आपले दिवस आठवतात!

६) दोघांनी अभिनय छान केला आहे. किंवा त्यांच्याकडून करवून घेतला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संवाद फार सहज आलेले आहेत. पण त्यातही आर्ची किंचित जास्त भाव खाऊन जाते. तिचा रांगडा स्वभाव तिच्या प्रेमातही उतरला आहे.
एका हॉटेलातील प्रसंगात पलीकडच्या टेबलावर बसलेला एक फुटकळ रोमिओ जेव्हा आर्चीकडे अधाश्यासारखा टक लावून बघत असतो, तेव्हा तिने त्याला जी प्रतिक्रिया दिली आहे ते बघून खुदकन हसायला येते. हे असले काही आर्चीच करू शकते असे आपल्याला वाटावे ईतके तिची व्यक्तीरेखा आपल्या डोक्यात भिनते.

७) दोघांची चित्रपटातील वये आणि त्यांचे त्या वयाचेच दिसणे हा या पिक्चरचा प्लस पॉईंट आहे. प्रेम करायची अक्कल नेमकी कोणत्या वयात येते याची कल्पना नाही पण ‘प्रेमासाठी कायपण’ ही भावना अठरा-एकोणीस वर्षाच्या मुलांमध्ये जितकी प्रबळ असते तशी ती मोठ्यांना झेपत नाही.

८) जातीयवाद प्रत्येकालाच कळतो. कोणाला एडमिशन फॉर्मवर कळतो, कोणाला नोकरीच्या अर्जावर कळतो. कोणाला प्रेमात पडल्यावर कळतो, कोणाला लग्नाच्या बाजारात उतरल्यावर कळतो. तर काहींना योग्य वेळ येता घरातूनच बाळकडू दिले जातात. हा जातीयवाद दैनंदिन जीवनाचा भाग असलेले कित्येक जीव आपल्या आसपास वावरत आहेत हे देखील आपल्याला वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून का होईना माहीत आहेच. त्यामुळे निव्वळ तो जाणून घेण्यास म्हणून सैराट बघायला जाऊ नका. बस्स मनाची पाटी कोरी करा आणि सैराट बघायला जा.

९) कारण हा चित्रपट आपल्याला स्वप्नासारखा दचकवतो. जसे स्वप्नात जे काही दिसते ते सारे खरेच आहे असे वाटते, तसेच या चित्रपटातील ओळखीच्या वाटणार्‍या भावविश्वात आपण रमतो. आणि मग स्वप्नातल्या सारखाच एक धक्का बसतो. तो देखील खरा खुरा वाटतो. स्वप्नातून जागे झाल्यावर ‘अरे हे स्वप्नच होते’ असे आपण म्हणतो तसेच लाईट लागल्यावर हायसे वाटते. हा पिक्चरच होता हे आपल्यालाच समजावतो. हे आपल्याशी घडणार नाही, आपल्या आसपास असले काही घडत नाही.. हा विचार तेवढा रेंगाळत राहतो.

१०) हा पिक्चर हसवतो, खिदळवतो, गुदगुल्या करतो, पार्श्वसंगीताच्या तालावर डोलायला लावतो, आता पुढे काय ची उत्कंठा ताणून धरतो.. पण कुठेही टेंशन देत नाही, कुठेही रडवत नाही... शेवटाला एक धक्का तेवढा देतो. पण रडवत नाही. बस्स घरी आपल्या सोबत न्यायला एक किडा डोक्यात देतो. त्याच्यासाठी तरी नक्कीच ‘सैराट’ बघा.

- समाप्त

कोणाला ११) वे कारण भेटले तर प्रतिसादात जोडा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सैराट चा जब्राट फॅन आहे पण एक गोष्ट खटकते....ती म्हणजे पाट्लाच्या घरात असलेला छ्त्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि मूर्ति... ते दाखवायची काही गरज मला तरी वाटत नाही....पाटील हे नाव पुरेसे होते वरची जात दाखवण्यासाठी....एक शिवभक्त म्हणून ही खंत मनात राहतेच

साडे अठ्ठावीस रुपये म्हणजे जर २८ रुपये ५० पैसे होतात तर >>>.>>>> तर बिपीनचंद्र मला सांगा की साडेपाचशे म्हणजे 550 रुपये की 500 रुपये 50 पैसे? आणि का?

कापोचे, ज्याचा मायबोलीवरील एक्कावन्न टक्के लोकांना संशय आहे असेच एखादे नाव गौप्यस्फोट केल्याच्या थाटात घेणार असाल तर राहू द्या Happy
किंवा ते ही राहू द्या, मला सांगा त्या दिवशी तुम्ही दुसर्या धाग्यावर ओरड करत होता की प्रतिसादांविना चांगले धागे मागे पडतात तर इथे या धाग्यावर सैराट सिनेमाबद्दल वा त्या अनुषंगाने जातीयव्यवस्था, असमानता, त्यामुळे प्रेमवीरांवर होणारा अन्याय, अत्याचार अश्या कित्येक बाबींवर आपले मत मांडू शकत असताना कोण कोणाचा आयडी, आणि कोण कोणाची गर्लफ्रेंड वा बायको या गॉसिपिंग मध्ये का रमला आहात..
त्या दिवशी तुम्ही एक धागा काढला होता की कोणत्या ब्रांडची बनियान घ्यावी.. आणि आज तुम्हाला कुठूनसा शोध लागला आहे की ऋन्मेष कुठल्या ब्रांडची चड्डीबनियान घालतो तर ते इतरांना सांगण्यात का धन्यता मानत आहात. याने काय असे विधायक घडणार आहे Happy
की तुमचाही मायबोलीवर येण्याचा हेतू माझ्यासारखाच चार घटका मनोरंजन शोधणे हाच आहे Happy

हम्म,

हा सिनेमा पहाण्या आधी महाराष्ट्र माझा वरील श्री नागराज मंजुळे यांची दोन भागातली मुलाखत जरुर पहावी. यु ट्युब वर आहे.

https://www.youtube.com/watch?v=k7KjnNqv17U भाग १

https://www.youtube.com/watch?v=npnSGiHWA_Y भाग २

जाती व्यवस्था व त्यावरील श्री नागराज मंजुळे यांचे भाष्य यापार्श्वभुमीवर हव तर सिनेमा पुन्हा एकदा पहावा.

सैराट झिंगाटच्या गाण्यापर्यत एटंरदटेन्मेंट एटंरटेन्मेंट एटंरटेन्मेंट असा आहे मग त्यापुढे मात्र तो स्लो होत जातो आणि वास्तव वास्तव वास्तव असा दिसतो. हातात शिक्षण नाही, कौशल्य नाही, नोकरीला शिफारस नाही अश्यांचे जीवन अंगावर काटा आणते. सुखावते ती फक्त माणुसकी जी या युगुलाला आधार देताना त्या स्त्री मध्ये दिसते.

जाती व्यवस्थेला भेदुन अजाणत्या वयातले झालेले प्रेम, प्रेमापोटी घरातुन निघुन जाणे आणि आधाराशिवाय अपरिचीत शहरात वास्तव्याच्या प्रयत्न करणे हे किती धोकादायक आहे हे रंगवताना मात्र चित्रपटाचे माध्यम किती प्रभावी आहे हे पुन्हा पुन्हा पटते.

बाकी अजय अतुल यांची मुलाखत पहाताना येड लागल गाण्याच्या मागे वाजणारी, स्विझर्लंड ला अर्ध्या मराठी सिनेमाचे पैसे खर्च करुन रेकॉर्ड झालेल्या सिंफनीचे अजय अतुल गोडवे गातात तशी प्रत्यक्षात वाजत नाही.

अजय अतुल यांची कल्पना भन्नाट होती, त्यांनी ती साकार करण्याचा मराठी नाही तर भारतीय सिनेमामधला हा पहिलाच प्रयोग होता पण बहुदा तंत्र न जमल्याने सिंफनी बाबत कोणतीच चांगली प्रतिक्रिया येताना दिसत नाही.

वास्तव किती दाहक असाव याचा परिचय फॅन्ड्रीतच नाही तर सैराट मध्ये सुध्दा उत्तरार्धात येतो.

एखादा दिग्दर्शक सुरवातीला उमेदवारी करतो, मग एका सिनेमाचा तो सह- दिग्दर्शक होतो असा प्रवास झाल्यानंतर त्याची प्रत्येक फ्रेम परिणामकारक बनवण्याचे तंत्र त्याला समजते असे मला वाटते.

असा प्रवास मंजुळे यांचा बहुदा न झाल्यामुळे कुठे तरी ड्बिंगच इफेक्टीव्ह नाही तर कुठे कॅमेरा नीट अँगल पकडत नाही असे वाटते. त्यातुन एकही प्रतिथयश कलाकार न घेण्याच्या हट्टाने प्रत्येक कलाकाराकडुन अ‍ॅक्टींग करुन घेण्याचे वेगळे प्रेशर त्यांना घ्यायला लागले असेल.

काही सिन्स नीट लॉजीक सांगत नाहीत तर काही इतके घाई- घाईने पुढे जातात की अर्चीचा बाप त्याच कॉलेजचा संचालक मंडळावर आहे हे समजायला सुध्दा उशीर लागतो. जितका लंगडा प्रभावीपणे झळकतो तितकाच तो सलीम की काय मुस्लीम मित्र झळकायला स्कोप होता परंतु तो इतका प्रभावी रंगत नाही.

हा सिनेमा पहिल्यावर बनगरवाडी हा अमोल पालेकर दिग्दर्शीत ३० वर्षे जुना सिनेमा पहावा. ग्रामीण बाजाच्या या सिनेमात त्यांनी योजलेले कलाकार सिनेमाच्या तंत्राला नवखे होते पण अभिनयाचे अंग पक्के असल्यामुळे किंवा अमोल पालेकरांचे दिग्दर्शन पक्के असल्यामुळे प्रत्येक फ्रेम अशी इफेक्टीव्ह झाल्याचे पटते.

नागराज मंजुळे यांना पुढचा सिनेमा जर २५ आठवडे चालवायचा असेल तर हे नक्कीच करावे लागेल.

नताशा आणि विठ्ठल,
ज्यांना डबिंग आणि दिग्दर्शनातल्या त्रुटी लक्षात आल्या त्यांना सिंफनीतली कमतरता समजली नसेल असे तुम्हाला वाटतेय का?
का?

कैतरीच तुमचं!

सिंफनी म्हणजे नक्की काय? शब्द ऐकलाय या आधीही, पण नेमका अर्थ माहीत नाही.
येड लागले गाणे तर ईतके खतरनाक ऐकायला आणि बघायलासुद्धा की लॅपटॉप उघडला की यूट्यूब लावले आणि हेडफोन उचलला यातच माझा विकेंड गेलाय.

अवो सातीताई, आमी अजाबात अभिजात न्हाई, कानाला ग्वाड लागलं यातच आनंद मान्तो. ते काय वाजिवलं तेला शिंफनी म्हंत्यात ते मला भौंची पोस्ट वाचुन कळ्ळं. त्याबद्दल त्यांचे आभार.

भौंचे एक भौ पण हायेत काय? त्ये समद्यांना नागनाथ च्या लिखित मुलाखतीची लिंका वाटत होते.

मयबोलीवर वाद का घालु नये आणी भांडु का नये याची तीन ते १० कारणे आपापल्या कुवतीनुसार लिहा. यात गाळलेल्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे द्या, जोड्या लावा, संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या असे कुठलेही पर्याय उत्तराकरता चालतील.:दिवा:

{{{ साडेपाचशे म्हणजे 550 रुपये की 500 रुपये 50 पैसे? आणि का? }}}

प्रश्न अपेक्षित असल्याने उत्तर लगेच देत आहे.

साडे पाच रुपये म्हणजे किती तर पाच (५) रुपये पन्नास (५०) पैसे. त्याला शे म्हणजे शंभर (१००) ने गुणले की साडेपाचशे रुपये म्हणजेच पाचशे पन्नास (५५०) रुपये होतात.

शंभर पर्यंतच्या सर्व संख्या या स्वतंत्र रीत्या उच्चारल्या / लिहिल्या जातात. शंभर नंतर पुढे गुणाकाराच्या काँबिनेशनचा वापर केला जातो. जसे की, एकशे एक रुपये म्हणजे एक शेकडा (शंभर) अधिक एक रुपया. जर तुम्हाला त्यात पन्नास पैसे दाखवायचे असतील तर त्याचे वर्णन खालीलप्रमाणे होईल.

१०१ रुपये ५० पैसे - एकशे दीड रुपये
१०२ रुपये ५० पैसे - एकशे अडीच रुपये
१०३ रुपये ५० पैसे - एकशे साडे तीन रुपये

त्याचप्रमाणे जर तुम्हाला ५०० रुपये ५० पैसे लिहायचे असतील तर ते तुम्ही पाचशे साडे रुपये असे लिहू शकता पण साडेपाचशे रुपये म्हणजे ५५० रुपयेच होणार.

अजून काही शंका?

सिंफनी वाजली नसेल अस नाही. त्याचा स्वतंत्र ट्रॅक कुठे मिळाला तर मस्तच असेल पण बॅक्ग्राउंड ला रेकॉर्डींग करताना काही तरी त्रुटी राहीली असावी. जस ए आर रहेमानच बॅक्ग्राउंड म्युझीक गाण संपल्यावर तरळत रहात असा इफेक्ट कुठेच जाणवाला नाही. सिनेमान डॉल्बीचा वापर झाल्याच जाणवल नाही. संगीताची वेगवेगळी कंपने ( फ्रिक्वेन्सीज ) जेव्हा डॉल्बीतुन खास करुन चित्रपट गृहात वाजतात तेव्हा लाइव्ह कॉन्सर्ट पेक्षा भारी इफेक्ट येतो.

वाह, बिपिनजी.
तुमच्या या अश्या मुद्देसूद आणि तर्कशुद्ध लिखाणामुळे मी तुमच्या फॅनक्लबात आहे पहिल्यापासून!

मी नागराज मंजुळे यांचा फॅन आहे. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आश्चर्यकारक आहेच. त्या मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे त्यांनी आपले जीवन लोकांपुढे नेताना निवडलेले माध्यम सिनेमा हे परिणामकारक आहे. त्यांचा हा सिनेमा बर्लीनला दाखवला गेला ही सुध्दा मोठी अचिव्हमेंट आहे.

सिनेमा का पहावा याची १० कारणे आहेत पण माझे लिखाण हे का पाहु नये या साठी बिलकुल नाही. हा सिनेमा नक्की पहावा.

मी काही महान परिक्षक नाही. असाच प्रतिसाद मी कट्यार वर सुध्दा दिलाय तो जाणकारांनी पहावा आणि माझ्या प्रतिसादाला कुठलही लेबल लाऊ नये.

धन्यवाद डॉ. साती मायबोलीकर,

बायदिवे माझा फॅनक्लब कुठे आहे म्हणे? मी अभिनय आणि दिग्दर्शन केलेली नाटके कुणी फारसे पाहतात असे मला वाटत नाही. तुम्हीदेखील लिखाणामुळे (जे मी फारसे करतच नाही) फॅनक्लबात असल्याचे म्हणताय म्हणजे हे अजुन एकदा सिद्ध झाले.

त्याचप्रमाणे जर तुम्हाला ५०० रुपये ५० पैसे लिहायचे असतील तर ते तुम्ही पाचशे साडे रुपये असे लिहू शकता
>>

पाचशे साडे रुपये >> नक्की? साडे रुपये हे कानाला खटकतेय.. वर्तमानातील अथवा ईतिहासातील एखादा दाखला जिथे असा अमुकतमुक शे साडे रुपये हा शब्दप्रयोग मराठीत केला गेलाय.

तसेच १०० रुपये ५० पैसे ला कसे बोलावे? एकशे साडे रुपये की साडे शंभर की दोन्ही चालेल?
तसेच निव्वळ ५० पैश्याला साडे रुपये म्हणावे की साडा रुपया? (ऐकायला मस्त वाटतेय, साडा हक सारखे Happy )

तुर्तास इतक्याच शंका Happy

{{{ नक्की? साडे रुपये हे कानाला खटकतेय.. वर्तमानातील अथवा ईतिहासातील एखादा दाखला जिथे असा अमुकतमुक शे साडे रुपये हा शब्दप्रयोग मराठीत केला गेलाय. }}}

खटकणारच. कारण तशी सवय नाही म्हणून. सूत्राप्रमाणे

तीन + अर्धा = साडे तीन
चार + अर्धा = साडे चार
.
.
.
असे थेट
नऊ + अर्धा = साडे नऊ

पण तरीही,
एक + अर्धा = दीड
दोन + अर्धा = अडीच

होतात. त्याचप्रमाणे नुसता अर्धा म्हणजेच शून्य अधिक अर्धा असेल तर साडे किंवा शून्य साडे किंवा साडा म्हणण्याऐवजी थेट अर्धा म्हणण्याचीच पद्धत आहे.

सवय नाही तर खटकणार हे कबूल.
पण कुठेतरी हे नमूद जरूर केले असेल ना?
म्हणून लिखित स्वरुपात ५०० रुपये ५० पैसे हे पाचशे साडे रुपये असे वाचले जातेय हे हवेय.

अर्थात इथे वाद घालायचा हेतू नसून शंका निरसन करून ज्ञान वाढवायचा हेतूच आहे, फक्त ते त्या आधी योग्य आहे की नाही हे पडताळायचे आहे. अन्यथा आपण आपल्या मनाने बनवलेला शब्द असेल तर काहीतरी चुकीचे पसरायचे.

जर आपल्या पुढच्या पोस्टला शंकानिरसन होत नसेल तर पुढील चर्चेस वेगळा धागा शोधूया .. इथे अवांतर खूप होतेय.

बिपिन, दोन पद्धती आहे असे हे अंक वाचण्याच्या:
तीन अधिक अर्धा = साडेतीन असे म्हणता येते.
तीन अधिक अर्धा = तीन पुर्णांक पाच असेही म्हणता येते.

पण, मी साडेतीन पोळ्या खाल्ल्यात हे योग्य आहे तेच मी तीन पुर्णाक पाच पोळ्या खाल्ल्यात हे चुकीचे वाक्य. कुठे पुर्णांक आणि कुठे साडे/दीड म्हणायचे हे वाक्यावर अवलंबून आहे.

{{{ म्हणून लिखित स्वरुपात ५०० रुपये ५० पैसे हे पाचशे साडे रुपये असे वाचले जातेय हे हवेय. }}}

जर लिखित स्वरुपात,

एक + अर्धा = साडेएक
दोन + अर्धा = साडेदोन

असे मिळत नसेल तर तुम्ही सांगताय ते तरी कसे मिळेल. तुमचं शंका निरसन होनार नाहीच तेव्हा वेगळा धागा काढा.

आर्ची- परशा- सैराट- अर्चना पाटील-प्रशांत काळे-सैराट- नागराज मंजुळे-आकाश ठोसर/ कोसर/ पिंकु राजगुरु- अजय अतुल-नितीन केणी-निलेश साने-झी परीवार

झाल झिंगझिंगाट

याडं लागलं

सैराट झालं जी...

लोकहो चला परत सुरुवात करा पहिल्यापासुन

आर्ची मुळे साधारण लुक्सच्या पोरींचा पण आत्मविश्वास वाढणार असे दिसतय.
आर्चीचे दाट केस आणि त्यावर माळलेले गजरे खुप छान दिसत होती आर्ची टिपिकल तेलगु

Pages