वाचताना कधी कधी काही वाक्य विशेष लक्षात राहतात. मनात दीर्घकाळ रेंगाळून राहतात. " कधी कधी प्रवास पूर्ण करण्याच्या आनंदापेक्षाही तो प्रवास केल्याच्या अनुभव अधिक आनंद देऊन जातो " हे असच लक्षात राहिलेलं वाक्य. ऊमेश कुलकर्णी दिग्दर्शित हायवेचा प्रवास आपल्याला याच वाक्याची अनुभूती देऊन जातो.
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे हा सतत गजबजलेला रस्ता. रोज हजारो माणस या रस्त्यावरुन ये जा करतात . या प्रत्येकाचीच वेगळ्या कारणांसाठी धडपड चाललेली. या वेगवान मार्गाचा , त्यावर अखंड धावत असण्यार्या माणसांचा , त्यांच्या सुख दुखाचा, या धावपळीत काही निसटून गेलेल्या तर काही गवसलेल्या धाग्यांचा हा हायवे साक्षीदार. ह्या सतत चाललेल्या गतीचा वेध घेतलाय हायवे ह्या चित्रपटातून.
काहीएक कामानिमित्त ही माणस ह्या हायवेवरुन प्रवास करत आहेत. ह्या प्रत्येकाला एक अशी कहाणी आहे. ती कहाणी सोबत घेऊन त्यांचा प्रवास चाललेला आहे. केव्हा, कधी , कुठे पोचणार याचेही निश्चित अंदाज त्यांच्यापाशी आहेत. आपआपल्या स्वभावाचे, दैवाचे , नशिबाचे , रोजच्या जगण्यातल्या सामोर्या जावे लागणारे असे कंगोरे सोबत घेऊन हा प्रवास सुरु आहे. हे कंगोरे कधी टोचणारे आहेत तर कधी गंमतीशीर आहेत. प्रवासात येण्यार्या अडचणी, अनपेक्षितपणे उद्भवणारे पेच, कटकटी या सर्वाना सोबत घेऊन हा प्रवास सुरु आहे.
या अव्याहतपणे चाललेल्या गतीला ,प्रवासाच्या अंतिम टप्प्यात पोचण्यास उत्सुक असलेल्या या माणसांच्या अंदाजाला काही अपरिहार्य कारणाने खीळ बसते आणि यावर मानवी स्वभावानुसार नाविलाज को क्या इलाज अशी प्रतिक्रियाही ऊमटून जाते . सतत धावत असलेल्या या माणसांच्या वाटेला नकोसा हा थांबा आलेला आहे. हा थांब्याभोवती रेंगाळताना नकळत ही माणस स्व मध्ये डोकावून जातात. हे अस डोकावून पाहण त्यांच्या गतीला , स्वभावाला , रोजच्या जगण्याला नवा आयाम देऊन जाणार जातं.
विहीर , देऊळ अश्या आशयगर्भ चित्रपटाची निर्मिती करण्यार्या कुलकर्णी जोडगोळीने यावेळीही एक नवा आशयगर्भ प्रयोग समोर आणलेला आहे. ह्या प्रयोगात त्यांना साथ दिलीय ती रेणुका शहाणे , हुमा कुरेशी, गिरीश कुलकर्णी , नागराज मंजुळे इत्यादी कलाकारांनी . किंबहुना ते चित्रपटाच एक बलस्थान आहे. गतिशील अश्या चित्रपटाच्या मांडणीत संगीतकार अमित त्रिवेदी, गीतकार वैभव जोशीं यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेय . चित्रपटाचा पहिला भाग हा सर्व पात्रांची, व्यक्तीरेखांची ओळख करुन देतो. खुप सार्य़ा व्यक्तीरेखा असल्याने हा भाग कंटाळवाणा होण्याची शक्यता होती. मात्र दिग्दर्शका्ने हा भाग रंजक होईल अशी काळजी घेत प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकापर्यत नीट पोचेल याची दक्षता घेतली आहे. आशयगर्भ च,त्रपट आहे म्हणजे काही बोजड संवाद, कंटाळवाण्या पद्ध्तीने फ़िरलेला कॅमेरा अशी आपली समजूत असते. या समजुतीला इथे तडा जातो. काही काही ठिकाणाचे हलके फ़ुलके विनोद चित्रपटात रंगत आणतात. वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणाची माणस , त्यांच्या लकबी , त्यांच बोलण कुठेही अंगावर न येता चित्रपटात सहज सामावून जातात.
मध्यंतरानंतर चित्रपटाला खर्या अर्थाने सुरुवात होते. ही सुरुवात घाईघाईत न करता तिला पुरेसा वेळ दिला गेलाय. काही ठिकाणी चित्रपट संथ वाटू शकतो पण अश्या अश्या छोट्या गोष्टीनींच पटकथेच सशक्तपण लक्षात येतं. पहिल्या भागात झालेल्या वातावरण निर्मितीचा कळसाध्याय दुसर्या भागात अनुभवायला मिळतो. हे अनुभवण केवळ त्या त्या पात्रापुरत मर्यादित न राहता आपल्यालाही अंतरंगात डोकावयाला भाग पाडत.
चित्रपटात नव्या जुन्या अश्या कलाकारांची सरमिसळ आहे. मात्र हे नवं जुनेपण कुठेही चित्रपटाच्या आशयाला बाधा आणत नाही. वैयक्तिकरित्या मला गिरिश कुलकर्णीची एन आर आय आणि रेणुका शहाणेची भुमिका आवडली. टिस्का चोप्राच्या व्यक्तीरेखेचे पदर अजून ऊलगडायला हवे होते अस वाटून गेलं. हुमा कुरेशीने तिला दिलेली भूमिका समर्थरीत्या निभावलेली आहे. मुक्ता बर्वेच काम नेहमीसारखच वाखाणण्यासारख. फ़ारसे संवाद नसूनही शशांक शेंडे आपली छाप सोडून जातात. मयूर खांडगेचा ड्रायव्हरही मस्त.
मात्र या चित्रपटात खरी कमाल केलीये ती कॅमेराने. शहरातल्या गर्दीचा कोलाहल ते शांत नीरव रात्रीचा घाट या रेंजमध्ये कॅमेरा फ़िरतो. हे दोन्ही ठिकाणं कॅमेरात अचूक पकडली गेलीत. यामुळेच अंधार्या शांत पार्श्वभूमीवरच रेणुकाच घन तमी शुक्र राज्य करी अधिक प्रभाव पडून जात. शेवटचा धुक्याचा प्रसंगही ऊल्लेखनीय . या दोन्ही प्रसंगासाठी दिग्दर्शकाला फुल मार्क्स !
वर म्हटल्याप्रमाणे अंतिम प्रवासाच्या ठिकाणी पोचणं , तो प्रवास पूर्ण करण इथे अपेक्षित नाही. किंबहुना या अपेक्षेने हा चित्रपट पाहिल्यास निराशाच पदरी पडेल. हे झाल की ते होईल ह्या ठोकताळ्यातल्या हा चित्रपट नाही. नेहमीच्या सो कॉल्ड रुक्ष मार्गातल्या काही गाळलेल्या जागा शोधणारा हा हायवेचा प्रवास आहे. ह्या गाळलेल्या जागा भरताना , ते होणार्या जाणिवांचा हा लसावि आहे. चित्रपटातल्या काही काही गोष्टी त्या वेळेला पटत नाहीत मात्र नीट वेळ दिल्यास त्या पटत जातात. म्हणूनच लगेगच जजमेंटल न होता ह्या प्रवासाला नीट वेळ द्यायला हवाय. न जाणॊ आपल्या स्वतच्या सेल्फ़ीची ती एक सुरुवात असेल. मराठी चित्रपटसृष्टीत असे प्रयोग वारंवार व्ह्यायला हवेत.
या चित्रपटाच्या प्रीमियरला ऊपस्थित राहायची संधी दिल्याबद्द्ल मायबोली प्रशासन आणि माध्यम प्रायोजक यांचे आभार ..
छान लिहिलयेस
छान लिहिलयेस
मस्त अगदी मनातले... लेखन शैली
मस्त अगदी मनातले... लेखन शैली कडक
मस्त अगदी मनातले... लेखन शैली
मस्त अगदी मनातले... लेखन शैली कडक