पाजीराव भन्साळी (Bajirao Mastani Movie - Not a Review !)

Submitted by रसप on 26 April, 2016 - 03:15

बहुचर्चित, बहुपुरस्कृत 'बाजीराव मस्तानी' परवा कुठल्याश्या वाहिनीवर लागला होता.
'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे दोनपैकी एकच पाहायला जमणार होतं. प्रदर्शनाच्या एक आठवडाआधीच मी त्यावेळी 'दै. मी मराठी लाईव्ह'साठी लिहित असलेलं काम स्थगित करायचा निर्णय घेतला होता आणि तसं संबंधितांना कळवलंही होतं. पण मग त्यांनी मला एक शेवटचा चित्रपट 'कव्हर' करायला सांगितलं. मी 'दिलवाले' निवडला. कारण त्या काळात जितका रणवीर डोक्यात जात होता तितका शाहरुख जात नव्हता ! Eventually, 'मी मराठी लाईव्ह'ने मला 'राहू द्या' सांगितल्याने, 'दिलवाले'सुद्धा उगाच पाहिला गेला.
तर सांगायचा उद्देश हा की 'बाजीराव मस्तानी' तेव्हा टाळला नव्हता, त्यामुळे आत्ता जर फुकट पाहायला मिळणार होता तर का न पाहावा ? वेळ होता, पाहिला.
'दिलवाले' हा एक गरीब चित्रपट असेल, तर 'बाजीराव मस्तानी' दळभद्री म्हणावा, ह्या मताला मी आलो आणि शेवटचा अर्धा तास उरलेला असताना माझा संयम संपला. मी टीव्ही बंद केला.

bajirao.jpg

'बाजीराव मस्तानी'ची अनेक परीक्षणं येऊन गेली आहेत. आता इतक्या दिवसांनंतर मी परीक्षण लिहिणं तसं निरर्थकच. त्यामुळे काही टिपिकल लिहित नाही. थोडेसे, जसे आठवताहेत तसे मुद्दे मांडतो. हे लहान-मोठे किस्से समजा. जे मला जाणवलं ते सांगतो.

१. भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्यतेची साक्षात व्याख्या असते. हम दिल दे चुके सनम, देवदास आणि अगदी गुजारीशमध्येही त्याने दाखवलेली भव्यता लक्षात राहणारी होती. त्यातून 'बा.म.' ऐतिहासिक चित्रपट. मग तर मोठमोठे सेट्स, भव्यता, श्रीमंती वगैरे दाखवायला आयतंच निमित्त होतं. पण सावरिया आणि राम-लीला मधले पूर्णपणे खोटे समजून येणारे सुमार सेट्स आठवले. सेट्समधली कृत्रिमता, खोटेपणा ठळकपणे जाणवत होता. गड, किल्ले, महाल, खोल्या, झाडं, पाणी, नदी, पाऊस काही म्हणता काहीही थोडंसुद्धा खरं वाटत नाही, इतकं गंडलं आहे. अत्यंत वाईट प्रकारे केलेली प्रकाशयोजना ह्यासाठी जबाबदार आहे की अजून काही, मला माहित नाही. पण जो काही End result आहे, तो शुद्ध बकवास आहे.

२. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे वजनदार संवाद आले पाहिजेत. त्यांची तितकीच जबरदस्त फेकही आली पाहिजे. कसलं काय ! इथे तर सगळंच 'फेक' (Fake) ! 'बाजीराव ने मस्तानी से प्यार किया है, अय्याशी नही' हा सुमार डायलॉग संवादलेखनाची सर्वोच्च पातळी आहे. अत्यंत बाष्कळ, पोकळ, निरर्थक, सपक संवादांची तितकीच अभिनिवेशशून्य फेक 'अथ'पासून 'इति'पर्यंत ('इति' मी पाहिला नाही, पण बहुतांश पाहिला) आहे. 'पेशवीण पद म्हणजे आमराई' असे अनेक अत्यंत हास्यास्पद डायलॉग्स आपल्यावर आदळत राहतात. एका प्रसंगात काशीबाई उखाणा घेतात. त्यात 'कोहिनूर - हैं नूर' अशी यमकायमकी आहे. ह्यातला तांत्रिक दोष आज कुणालाही कळणार नाही आणि कळला तरी तो किरकोळच वाटेल. पण त्या काळात लोकांची काव्याची जाण इतकी भिकारडी नव्हती. असं सगळं ऐकता, पाहताना हसताही येत नाही. कीव येते लिहिणाऱ्याची.

३. त्याहून जास्त कीव येते गाणी लिहिणाऱ्याची. 'कडक तडक भडक झाली, चटक मटक वटक झाली, दुश्मन की देखो जो वाट लावली' (इथे 'झाली' आहे की 'साली'?) हे बाजीरावाचं शौर्यगान आहे. ह्यात वीररस असणं अपेक्षित होतं. ह्या निरर्थक आणि मवाली छाप शब्दांत कोणता रस आहे, माहित नाही. पण वीररसपूर्ण लिखाणाची ही जर सीमा असेल, तर त्या सीमेवरून गीतकाराने परत फिरूच नये. तसंच पुढे जात राहावं आणि आयुष्यात इतर सर्वांना क्षमा करावं.

४. बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी. ह्या तिन्ही मुख्य व्यक्तिरेखा समस्त चित्रपट युनिटमधील कुणाला तरी समजल्या असाव्यात का, अशी शंका येते.
बाजीराव हा एक हाडाचा योद्धा होता. महावीर होता तो. भारताच्याच काय, जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक बाजीराव होता. त्याचं मस्तानीसोबतचं प्रकरण हा एक वेगळा भाग आहे. पण त्यापायी तो वेडगळ झालेला दाखवायचं ? एक कर्तव्यदक्ष राजा (प्रधान) असलेला तो शेवटी शेवटी अगदी बिथरलेला दाखवला आहे. त्याची ती मनस्थिती सादर करतानाचा रणवीर सिंगचा अभिनय तर हास्यास्पदच वाटला. तो सतत दारूच्या नशेत बरळल्यासारखा बोलताना दिसतो. (की तसंच दाखवलंय, कळलं नाही.)
काशीबाई एक घरंदाज स्त्री होती की पोरगेलेशी, हाही मुद्दा बाजूला ठेवू. पण बाजीरावाच्या निजामाशी वाटाघाटी सफल ठरल्या, ही बातमी जेव्हा चिमाजी घेऊन येतो, तेव्हा ती ऐकून अत्यानंदाने ती टुण्णकन् उडी मारुन सासूबाईंच्या मांडीत जाऊन बसते, हे दृश्य पाहून तर माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. तसंच बाजीरावाचा शिरटोप वगैरे घालून 'हर हर महादेव' ओरडून त्याच्याभोवती नाचणं बागडणं म्हणजे थिल्लरपणा होता.
दुसरीकडे मस्तानी. दीपिकाच्या चेहऱ्यावर मस्तानी सादर करताना कायमस्वरूपी बारा वाजलेले आहेत. ती गोरी वगैरे न दिसता चक्क 'पांढरी' दिसते. रोगट वाटते. मस्तानी जर अशी हाडाडलेली, कुपोषित, निस्तेज होती तर आम्ही इतकी वर्षं तिचं भलतंच काही तरी वर्णन वाचत आलो आहोत. 'बाजीराव म्हणून रणवीर' आणि 'काशीबाई म्हणून प्रियांका' ह्यापेक्षा 'मस्तानी म्हणून दीपिका' हे कास्टिंग सपशेल फसलेलं आहे. दीपिका सुंदर आहे. पण तिच्या सौंदर्यात दैवीपणाची झाक नाही. मस्तानीसाठी तीच अत्यावश्यक होती.

५. भन्साळीचा अभ्यास (केला असल्यास) अगदीच अपुरा पडला आहे. ना त्याला पेशवे, मराठाकालीन, महाराष्ट्रीयन, मराठी संस्कृती समजली आहे ना व्यक्तिरेखा. महालांचे सेट्स मुघलांचेच वाटतात. कुठे तरी एक गणेश वंदना असणं अत्यंत गरजेचं होतं, इतकी साधी बाब लक्षात आलेली नाही. 'कट्यार' मध्ये 'सूर निरागस हो'नेच एक माहोल बनवला जातो. तो 'बा.म.' मध्ये बनतच नाही.
'बा.म.' ही कुठली शौर्यगाथा किंवा कुणा व्यक्तीवर आधारित चित्रपट (Not exactly Biopic) नाही. ही प्रेमकहाणी आहे आणि आपल्या कुवतीवर अचूक विश्वास ठेवत भन्साळीने ही कहाणी 'प्रेम कहाणी'च्या पुढे जाऊ दिलेली नाही. त्यामुळे अत्यंत फालतू युद्धदृश्यं माफ करून टाकावीत म्हणतो. मात्र प्रेमकहाणी तरी कुठे व्यवस्थित मांडली आहे ? कुठल्याही क्षणी बाजीराव आणि मस्तानी, राम आणि लीला बनून 'लहू मूंह लग गया..' करत तोंडात तोंडं घालतायत की काय अशी एक विचित्र अनामिक भीती सतत वाटत राहते, इतकं सगळं वरवरचं झालं आहे.

६. सरसकट सगळे लोक, अगदी मराठी नट-नट्याही 'राऊ' न म्हणता 'राव' म्हणतात ! निवेदक इरफान खान 'बाजीराव बल्लाड' असा अगदी सुस्पष्ट उच्चार करतो. तेव्हा मात्र 'च' आणि 'भ' चे पाढे मनातल्या मनात सुरु झाले. इतकं सगळं उथळ करायचं होतं, तर काही शतकं मागे जायची गरज काय होती ? आजच्याच काळातली एखादी कहाणी गुंफायची होती ना ! अभ्यास करायचाच नव्हता, मेहनत घ्यायचीच नव्हती तर एक प्लॉट ज्याचं इतर कुणी तरी कदाचित सोनं केलं असतं, तो वाया का घालवला ? असा एक वैफल्यग्रस्त प्रश्न मला पडला.

७. हिमेश रेशमियाची अभिनयाची हौस आणि भन्साळीची संगीत देण्याची हौस एकसारखीच वाटते आहे. सगळ्या गाण्यांच्या चाली एक तर एकसारख्याच किंवा इतर कुठल्या तरी गाण्यासारख्या किंवा थेट इस्माईल दरबारची नक्कल करणाऱ्या आहेत. 'अलबेला सजन आयो..' ची चाल मस्तच आहे. पण आयो' मधल्या 'आ' वरच्या जबरदस्त समेची अक्षरश: माती झाली आहे. वाद्यांचा इतका गोंगाट आहे की ती समेची जागा खरंच वाया जाते. इथे पुन्हा एकदा 'कट्यार'चा संदर्भ देतो. 'दिल की तपिश आज हैं आफताब..' मधल्या 'ता' (आफ'ता'ब) वर येणारी समेची जागाही अशीच दिलखेच आहे. पण सुरेख व अचूक प्रमाणातला वाद्यमेळ ही सम व्यवस्थित ठळक करतो. भन्साळी भसाभस वाद्यांचे आवाज ओततो आणि फक्त गोंगाट करतो.

एकंदरीत, अत्यंत रटाळ आणि सपशेल फसलेला चित्रपट म्हणूनच 'बाजीराव मस्तानी' ओळखला जाईल. मी 'दिलवाले' पाहिला ह्याचा तुलनात्मक का होईना मला आनंद होईल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता वाटतंय.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/bajirao-mastani-movie-not-review....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विसंगतीचे सर्व मुद्दे बरोबर आहेत.
रणवीर च्या बाकी बायांपेक्षा चांगल्या अभिनयासाठी त्याला सर्व गुन्हे माफ केले.
तडक भडक दुष्मन की वाट हे गाणे लिहीणार्‍याला खरोखर हत्तीच्या पायाखाली द्यावे असे वाटले.बाजीराव नाचला,कसा नाचला हे डिटेल मला माहित नाहीत पण बाजीराव "दुष्मन की देखो वाट लावली" आणि "अतरंगी अपनी ये जीत झाली" या शब्दात गाणे म्हणतो हे पाहून खरंच डोकं आपटावंसं वाटतं.

जियो र स प जियो !!!

काय फर्मास लेख लिहिला आहे तुम्ही, ह्या व अश्याच अनेक कारणांनी मी हा चित्रपट पाहिला नाही आणि सौ. ला बघु दिला नाही असे मी अभिमानाने सांगतो....लय म्हणजे लय च्यु....पणा होता. तरी बाजीराव मस्तानी चे बाळांतपण करतात असा ही एक सीन होता/आहे म्हणे ह्या चित्रपटात Angry बाजीरावांना बायकांची बाळांतपण करण्यापलीकडे पण अतिशय महत्वाची कामे होती, उगाच नाही अटकेपार झेंडे लावलेत मराठ्यांनी

वेल | 26 April, 2016 - 13:39 नवीन
टाळ्या. मिस करत होते तुझं ह्या चित्रपटावरचं परिक्षण, फेबु वर टाकलयस ना? शेअर करेन

>>
हो. टाकलाय.

रच्याकने, आपण फेबुवर कनेक्टेड आहोत का ? (सॉरी.. इथली नावं आणि तिथली नावं ह्यांचा काही मेळ लागत नाही. त्यामुळे मला खरंच माहित नाही. Sad )

>> बाजीराव मस्तानी चे बाळांतपण करतात असा ही एक सीन होता/आहे <<

आयला हो की ! ते राहिलंच बघा..

तो तर महान प्रसंग आहे..
'मस्तानी, लम्बी सांस लो..'फूsss'..' असा बाष्कळपणा असा काही रंगला आहे की वाटतं आता तो म्हणेल, 'डोण्ट वरी.. इट्स ओके ! ऑल इज वेल.. ऑल इज वेल..!!'

बघितला नाही आणि बघायची इछाही नाही. अगदी टीव्हीवरही नाही बघावासा वाटला.>>>>>>>+१

का अशी वाट लावतात चांगल्या गोष्टींची? ते "रिमिक्स" प्रकरण तसचं. जुन्या सुंदर गाण्यांची वाट लावलेली पाहून माझाही असाच संताप झाला होता. आहे हौस तर नवीन काही तयार करा ना. Angry Angry

हाईट म्हणजे एवढं करुन, वाट लावुन भन्साळीबाबाने डायरेक्शनसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.>>>>>>>>..जमाना बदल गया है! Sad

आमच्याकडे जे. ना. बघायचाच होता म्ह्णुन आम्हालाही बघावाच लागला. Sad आणि नंतर घरी आल्यावर भन्सालीना प्रेक्षकांना काय आवडत ते बरोब्बर कळल आहे अर्थात चित्रपट चांगला आहे विरुध्द वर दिलेला सगळा अचरटपणा + बाजीरावाच अडमधडम उठणं बसणं, काशीबाईंचा बालिशपणा, सगळ्यांच्याच तोंडची भाषा अशा अनेक न पटलेल्या मुद्द्यांवर वाद घालून पुढे ४ - ५ दिवस झालेली चिडचिड..... सगळं आठवलं ..........:(

मला आवडला पिक्चर! सुरुवातीला डीव्हिडीमध्ये तर अगदी पाच मिनिटं डिस्क्लेमर दाखवतात की इतिहासाशी संबंध नाही. तो वाचून चित्रपट बघितला तर मजा येते. प्रत्येक फ्रेम भव्यदिव्य, देखणी झाली आहे. मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाची आणि पेशवे घराण्याची झालेली वाताहात, मनस्ताप नेमका दाखवला आहे!

रसप, जरा वरातीमागून घोडं असलं तरी लिखाण आवडले.

मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाची आणि पेशवे घराण्याची झालेली वाताहात, मनस्ताप नेमका दाखवला आहे! >>>

पेशवे घराण्याची वाताहात ही राघोबादादांनी केलेली भाऊबंदकी आणि त्यांना फूस लावणार्‍यांनी केलेली फंदफितुरी यामुळे झाली असे वाचण्यात आले आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

पेशवे घराण्याची वाताहात ही राघोबादादांनी केलेली भाऊबंदकी आणि त्यांना फूस लावणार्‍यांनी केलेली फंदफितुरी यामुळे झाली असे वाचण्यात आले आहे >> अगदी, अगदी!! आणि अर्थातच पानिपत Sad

कितीही डिसक्लेमर्स वगैरे टाकले, मेंदुला समजावलं की बाबा रे, हा हिंदी सिनेमा आहे तरिही काही काही व्यक्तिरेखा जनमानसात एका प्रतिमेत बांधलेल्या असतात आणी त्याला फार छेडू नये.

उदाहरणार्थ (हल्ली उदाहरण द्यायची पण सोय नाही राहिली. मुळ मुद्दा बाजुलाच रहातो आणी 'भावना दुखावतात'.) कृष्णाला त्याच्या नटखट, पण कर्तव्यकठोर आणी मुकुट, पितांबर वगैरे वेषभुषेतच आपण स्विकारतो, उगाच कृष्ण आंघोळीला निघालाय म्हणून टॉवेल गुंडाळून उभा आहे आणी 'श्या, पाणी गरम नाहीये पुरेसं, आता उद्या सर्दी होणार' वगैरे म्हणताना दाखवला - अगदी प्रत्यक्ष आयुष्यात तो असं म्हणाला सुद्धा असेल - तरी प्रेक्षक म्हणून आपण ते स्विकारू शकत नाही. कृष्णाची व्यक्तिरेखा नितीश भारद्वाज ने ईतकी अमर केलीये, की उद्या प्रत्यक्ष कृष्ण जरी समोर आला तरी मी त्याला 'तु जरा नितीश भारद्वाज वाल्या कृष्णाच्या स्वरूपात ये' असच सांगीन.

फेरफटका Happy

बर्‍याच दिवसांनी प्रतिकूल मत वाचले या पिक्चर बद्दल. नाहीतर सुरूवातीला त्या नाचाचे ट्रेलर पाहून विरोधात गेलेले अनेक जण नंतर हळुहळू कन्वर्ट झाले होते बाकी चित्रपट आवडल्यामुळे.

बाजीरावांना बायकांची बाळांतपण करण्यापलीकडे पण अतिशय महत्वाची कामे होती, उगाच नाही अटकेपार झेंडे लावलेत मराठ्यांनी >>> यात खटकण्यासारखे काय आहे कळले नाही. कर्तबगार लोक असंख्य गोष्टी सहज करतात. त्या वेळेस दुसरे कोणी मदतीला नसेल तर "लढाई करणे माझे काम आहे, हे तुझे तू बघ" असे थोडेच म्हणणार आहे तो? प्रत्यक्षात केले की नाही माहीत नाही. तशी गरज पडलीही नसेल. पण जनतेत सामील होणारा माणूस गरज पडली तर कोणाला अशा वेळी मदत करायचा प्रयत्न करेल हे अगदी अविश्वसनीय वाटत नाही.

Pages