उपवस्त्र
उमा भल्या पहाटेच उठत असे. पारोशाने करायची सगळी कामं उरकून आंघोळ करून पुढल्या दारी सडा, रांगोळी आणि मग सासऱ्यांसाठी देवपूजेची फुलं गोळा करायची असा नित्यक्रम होता. त्यांची पूजा आटपेस्तोवर एकीकडे चहाचं आधण आणि दुसरीकडे न्याहारीची तयारी !
दापोली जवळच्या आसुद बागेतलं वैशंपायनांचं घर आठ खोल्यांचं माडी असलेलं कौलारू, जुन्या पद्धतीचं तरी अगदी व्यवस्थित निगा ठेवलेलं होतं. मागे लांब पसरलेली वाडी नारळ ,पोफळी, सुपारी, आंबा आणि दोन विहिरींनी समृद्ध होती. पुढलं अंगण ओलांडताच बारा महिने दुथडी भरून वाहणारी नदी ! दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा बघितलं नि ती प्रेमातच पडली. पुण्याहून ट्रिपला आली होती. ह्यांचा ट्रान्स्पोर्ट चा व्यवसाय होता. तिथेच श्रीधर ची भेट झाली. त्यादिवशी ड्रायव्हर नसल्याने श्रीधर स्वतःच गाडीवर होता आणि मग पुढचे तीन दिवस येतंच राह्यला. पुढची चक्र वेगाने फिरली दोन महिन्यात उमा लग्न होऊन आसुद ला आली आणि सगळा डोलारा खांदयावर घेतला. सासरे मधुभाऊ हे गावातलं प्रतिष्ठित नाव होतं. सासूबाई सहा महिन्यांपूर्वीच कसल्याशा आजाराने गेल्या होत्या. तेव्हापासून हे दोघेच घरात. त्यामुळे घरीच राहून सगळं सांभाळायचं अशी अटच होती मधुभाऊंची. पुण्यातलं सोन्यासारखं करिअर आणि लाईफस्टाईल सोडून तिने स्वखुशीने श्रीधरसाठी एका कर्मठ घरात प्रवेश केला होता.
नाही म्हणायला गडी माणसं भरपूर होती पण रोजचा स्वयंपाक, सोवळं ओवळं तिनेच बघायला हवं असा मधुभाऊंचा कटाक्ष होता. श्रीधरलाही तिने चांगलाच लाडावून ठेवला. सासरे कर्मठ असले तरी मायाळू होते. तिचा उरक बघून घरचे आणि वाडीचे सगळे व्यवहार त्यांनी तिच्या सुपूर्त केलेले. उमाही सगळं आवडीने सांभाळत होती.
लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात श्रीधर तिच्याभोवती सतत रुंजी घालत असे. एवढी सुंदर, शिकलेली, समंजस बायको मिळाल्याने गाडी एकदम खुशीत होती. समुद्रावर हातात हात घेऊन तासनतास बसून राहणं, मुद्दाम अंधार पडेस्तोवर तिथेच थांबायला लावून मग कमरे भोवती पडलेला अवखळ विळखा, लाल लाल सामसूम रस्त्यांवर झालेल्या झटापटी, नारळाच्या - आंब्याच्या झाडांना तिच्यासाठी बांधलेले झोके, स्वयंपाकघरात - परसात तिचं आवरेपर्यंत सतत त्याचा तिथेच असलेला वावर... सगळं अगदी तिला सुखवणारं होतं. मधुभाऊ ह्या दोघात फार लक्ष घालायचे नाहीत. एकूण पोरीने घराचं नंदनवन केलंय ह्याचा त्यांना आनंद होता आणि तिच्या त्यागाची चाडही होती.
परिणामस्वरूप वर्षभरातच उमाला गोड चाहूल लागली. डोहाळे कडक होते काही पोटात ठरेना. श्रीधर ह्या बातमीने काही खुश नव्हता त्याचा तिच्यातला इंटरेस्ट कमी होत गेला. तो घराबाहेर राह्यला लागला. उमासाठी हे रूप नवीनच होतं.
अचानक वाडीत दगडाला ठेच लागून पडल्याचं निमित्त होऊन होत्याचं नव्हतं झालं. ती हळूहळू सावरली पण आजारी, निस्तेज झाली होती. श्रीधर तिला टाळत होता. विनाकारण चिडचिड करत होता. अधिकाधिक वेळ घराबाहेर राहायचा. तिचा सगळा वेळ स्वयंपाकघर आणि मधुभाऊंसोबत देवघरात जाऊ लागला. संध्याकाळ झाली की दोघे पुढच्या दारी तुळशीपाशी बसून रामरक्षा म्हणत.
श्रीधर कर्तव्यात कमी पडत नव्हता पण त्याचं लक्ष नक्कीच नव्हतं. शंका खरी ठरली , तो बाहेर गुंतला होता पण वेळप्रसंगी उमाकडूनही सुखाची अपेक्षा करत होता. मधूभाऊंनी चांगलंच फैलावर घेतलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने कबूल केलं. उमाची माफी मागितली. तुझं ह्या घरातलं स्थान अबाधित राहील म्हणाला पण मनात जागा देऊ शकणार नाही. उमा पार कोसळली. निश्चय करूनही त्याला अडवू शकायची नाही. त्याच्या सहवासाची , प्रेमाची ती भुकेली होती. तो समोर आला की आत्मसन्मान गळून पडायचा आणि शारिरीक गरजा उफाळून यायच्या. सगळं ओसरल्यावर बेभान होऊन रडायची आणि हतबल व्हायची.
एक दिवस पूजा करताना मधुभाऊ तिला समजावून सांगत होते, " उमा, देवाला महावस्त्र आणि उपवस्त्र दोन्ही लागतात बरं का ! उपवस्त्राशिवाय काम होत नाही पण तरीही त्याला महावस्त्रा इतकं महत्व नाहीच !" उमाला साक्षात्कार झाला चार लोकात महावस्त्र आणि घरात उपवस्त्र होऊन राहिल्याचा ! तिने कसल्याशा निश्चयाने महावस्त्र सोडून उपवस्त्र हातात घेतलं तेवढंच देवीला वाह्यलं आणि उठून जायला लागली. मधुभाऊ आश्चर्याने आळीपाळीने तिच्याकडे आणि देवीच्या उपवस्त्रातल्या मूर्तीकडे पाहात राहिले...
श्वेताक्षरा
छान आहे कथा .... नेहमीचच
छान आहे कथा .... नेहमीचच स्त्रीजन्म तुझी कहाणी
धन्यवाद preetiiii
धन्यवाद preetiiii
छान
छान
छान आहे कथा .... नेहमीचच
छान आहे कथा .... नेहमीचच स्त्रीजन्म तुझी कहाणी
छान!
छान!
मस्त
मस्त
मस्त च ....
मस्त च ....
छान लिहिलेय कथा.
छान लिहिलेय कथा.
मस्तच....
मस्तच....
छान लिहिलंय.. पण आणखीन खुलवता
छान लिहिलंय..
पण आणखीन खुलवता आली असती.
Thank you so much everyone !
Thank you so much everyone !