पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग | चौथा भाग
स्कॉर्पियो नर्मदेच्या पात्रातून बाहेर आली, मुख्य रस्त्यावर लागली. आता छान दिवस होता. सगळं लख्ख दिसत होतं. रात्रीचाच रस्ता तो, तेच ट्रक्स, तीच रहदारी. आता सुसह्य वाटत होती. वाटणारच.
बैठक व्यवस्था बदलली होती. ड्रायवरच्या म्हणजे निरंजनशेठच्या मागे मी, माझ्या बाजूला सदाशेठ, त्याच्या बाजूला पंढरीनाथ, पुढच्या सीटवर रेडकर आणि मागे ताणून देण्याच्याच मूडमधला लोखंडे. गाडी वेगवेगळी वळणे घेत होती. आणि गाडीतल्या गप्पाही. ह्या गप्पा अतिशय मौल्यवान. इथे सांगायला बसलो तर अजुन दहा भाग निघतील. (पण नको, आता तो विषय नाही). गप्पांमध्ये मी सामिल नव्हतो. मी शांतपणे ऐकत होतो. रेडकर निरंजनशेठला रस्ता कोणता घ्यावा ह्याबद्दल काहीतरी सुचवत होता. निरंजनशेठ त्याला नकार देत होता. हळुहळु ते संभाषण माझ्या लक्षात यायला लागले. निरंजनशेठ ला रेडकर दमणला जायचे म्हणत होता. म्हणजे आता इथून सरळ दमण. माझे धाबे दमणले सॉरी दणाणले.
कारण थोड्याच वेळापूर्वी मला प्रिंटरचा फोन येऊन गेला. मी जी स्पेशल प्रिंटींग करतो त्यात प्रत्येक स्टेपला मला हजर राहणे गरजेचे असते. कारण फायनल आउटपुट काय असायला हवे हे डिझायनर म्हणुन मलाच माहित असते. हे नेहमीची ऑफसेट प्रिंटींग नाही. ज्या नाशिकच्या प्रिंटरसोबत काम करत आहे त्याच्यासोबत पहिल्यांदाच करत होतो. त्यामुळे तो काय घोळ घालेल याची धास्ती होती. त्यासाठीच मी दोन वाजे पर्यंत नाशिक गाठायचं रेडकरला सांगितलं होते. जेणेकरुन सगळे सोपस्कार आटोपून आपलं पार्सल सातच्या आत ट्रान्सपोर्ट ला पडेल. इथे रेडकर दमणच्या दमवणार्या कल्पना काढत होता. ह्याचे कारण होते. कारण होते फक्त व्यवसाय.
रेडकर डिलर लोकांना वेगवेगळी आमिषे दाखवतो. मार्जिन, स्किम्स हे तर सगळेच करतात. हाही करतो. पण ह्यापेक्षा पुढचं म्हणजे डिलर्स ना दोन दिवस टूरला घेउन जाणे, पार्ट्या करणे, मुली पुरवणे. वैगरे. निरंजनशेठसोबत रेडकरची काहीतरी समस्या झाली होती ज्याचे निराकरण त्याला दमणला नेऊन करायचे होते. त्यासाठी निरंजनशेठला दमणची भुरळ तो घालत होता. निरंजनशेठही हलक्यातला माणूस नव्हता. तो त्याची बाजू धरून बसला होता. तो सतत नाहीच म्हणत होता. हे सगळं चाललेलंच होतं पण गाडी नेमक्या कोणत्या रस्त्यावर आहे ते कळत नव्हतं. थोड्यावेळाने कळलं आम्ही सापुतार्याला चाललोय. इकडे इतकं विचित्र संभाषण चालू होतं की नक्की कुठे जायचं हेच कळत नव्हतं. सापुतार्याला का जायचं? दमणला जायचं नाही मग आल्या मार्गाने का नाही जायचं?
शेवटी निरंजनशेठ मानायलाच तयार नाही म्हटल्यावर रेडकरने पिच्छा सोडला. पण अधून मधून एखादी पिन मारायला विसरत नव्हता. बराच काळ पुढे गेल्यावर आम्हाला रस्त्याच्या कडेने ओळीत असलेली खूप दुकाने-झोपड्या-टपर्या दिसल्या. रेडकरने निरंजनशेठला गाडी थांबवायला सांगितली. मला वाटले चला, चहा-नाश्त्याची सोय झाली. सगळे उतरलो. रेडकर आणि सदाशेठ दोघंच पुढे जाऊन प्रत्येक झोपडीवजा दुकानांकडे पाहत होते. जणू काही शोधत आहेत. ते 'काहीतरी' नाही 'कुणाला तरी' शोधत आहेत हे त्यांच्या देहबोलीवरुन मी ताडले. मी जरा जवळ जाऊन काय चाललंय ते बघण्याचा प्रयत्न केला. एका दुकानवाल्याने मला, "साहब, क्या चाहिये, पेशाबके लिये पिछे जगह है" असे म्हटलं. त्याची नजर त्याला नक्की तेच ऑफर करायचे आहे असं काही दर्शवत नव्हती. मी अजून वेग वाढवून त्या दोघांपर्यंत पोचलो. तर, 'इकडेच होती ती, आता दिसत नाही आहे, ह्याच साइडला बघितली होती तिला.' असं काहीसं संभाषण कानावर आले. मी रेडकरला विचारलं, काय? त्याने मानेनेच काही नाही असे केले. पण त्याची नजर शोधत होती. इकडे लोखंडेने, "नाशता नै क्या" असे एका दुकानदाराला विचारले तेव्हा तो, "नही, नाशता वाश्ता कुछ नही, बस चाय मिलेगी." लोखंडेने म्हटलं, "अरे इतनी दुकाने क्या सब चाय बेचती क्या? इतना चाय कौन पिता है यहां हायवे पे?" त्यावर तो कंटाळल्यागत बोलला, "ट्रकवाले आते है, उनको चाय लगती है." तिकडे ते शंभर दुकानदार आम्हा पाच फॉर्मल कपडे, स्कॉर्पियो असलेल्या लोकांकडे बघत होते. आम्ही कुठेच काही न घेता, विचारता फक्त काहीतरी शोधत इकडून तिकडे करत होतो. त्यांना नक्की आम्ही सरकारी खात्यातले वाटत असणार हे आमच्या कडे बघून मला वाटले. रेडकरच्याही ते लक्षात आलं बहुतेक. त्याने सगळ्यांना गाडीत परत बसण्याची सूचना केली. मला 'शष्प' काहीही बोध झाला नाही.
गाडीत बसुन पुढे निघाल्यावर रेडकर बोलला, "आपल्याला ते सरकारी अधिकारी समजलेत बहुतेक. मागच्या वेळेला आम्ही इथेच तिला पाहिलं होतं, आता दिसली नाही. खासंच होते ती." लोखंडेने विचारले, "काय चाललंय इथे?", "अहो दारू विकतात हे लोक, देशी दारु, मागच्या जंगलात कुठेतरी भट्टी लावतात, इकडे आउटलेट आहे. सगळे ट्रकवाले इथे थांबतात प्यायला.", "दुसराही धंदा आहे, पण तो फार गुप्त आहे. सहसा ओपनली कोणाला सांगत नाहीत. नाहीतर इथे बायकांचं काय काम हायवेवर तसं?"
मला एका झोपडीतून १६-१७ वर्षांची एक मुलगी कडेवर हंडा घेऊन बाहेर येतांना दिसली. अंगणात दोन-तीन छोटी मुलं बसलेली होती. टिपिकल झोपडीपट्टी दृश्य. वातावरण बघुन रेडकरच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा की नको ह्याबद्दल नक्की खात्री होत नव्हती. जे मंदिरात केलं ते इथेही, निरिक्षकाची भूमिका घेतली. जजमेंटल व्हायचे नाही असे ठरवले.
पुढे निघालो. नाश्त्याची तर काय बोंब झाली. तुम्हाला आठवत असेल मी सायंकाळी सात ला जेवलो होतो, त्यानंतर रात्री बाराला दोन तीन घास. रात्रभर जागरण. झोप नाहीच. आताही नव्हती. अवस्था जाणवण्यापलिकडे गेलेली. भूक लागलेली पण शरिर आंबून आलेलं, झोप येतेय पण मी गाडीत झोपत नसतो. फक्त पाणी पिऊन होतो. आता नाश्त्याला काय मिळणार ह्यावर अवलंबून होते. तेलकट वडे, कचोरी तर अजिबात नको. पोहे, इडली इकडे गुजरातच्या आतल्या भागात कुठे मिळणार? जाउ दे. गप्पांनी पोट भरुया.
"ओ निरंजनशेठ, तुम्हाला माहिती आहे का आपले साहेब जन्मतारखेवरुन हुबेहुब भविष्य सांगतात बरंका..!". इति पंढरीनाथ. रोख माझ्याकडे अर्थात.
"काल साहेबांनी माझं सांगितलं, बायको, मुलांच सगळ्यांचं एकदम अचूक सांगितलं. तुम्ही तुमची जन्मतारिख सांगा, तुमचंही सांगतील एकदम परफेक्ट."
"हो का, बरं बरं, आधी बाकीच्यांचं सांगु द्या, मग माझं बघू", निरंजनशेठ.
'ओ नाही हो, हे साहेब लै डेंजर आहेत बरं, काल आम्ही बघितलं बरं का, सगळ्यांची अशी साट साट पोल खोलत होते. आम्ही काल पाच-सहा जण होतो, सगळ्यांचे एकदम परफेक्ट सांगितलं बरंका, तुम्ही घ्या विचारुन, बघू तर तुमचं जमतंय काय त्यांना..'
निरंजनशेठ काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी कशी बशी गाडी सदाशेठवर ढकलली. आता घ्या, ह्या माणसाचा इण्ट्रोवर्ट स्वभाव बघता मी जे बोलेन ते ह्याला कितपत मान्य होइल, किंवा झालं तरी तो स्वतः मान्य करेल उघडपणे हे सांगणं अवघड होते. मला असे लोक समोर आले की जरा अस्वस्थ वाटतं, कुठेतरी तारा जुळत नाहीत. तुम्ही दक्षिण म्हणता ते पुर्व समजतात, तुम्ही या म्हणता ते जा समजतात, कुठेतरी काहीतरी मिसिंग असतंच. आपल्याला हे जाणवतंच. अगदी त्या व्यक्तीशी पहिलं वाक्य काय बोलावं इथून विचारात पडतो आपण. तोच व्यक्ती इतरांशी दिलखुलास वागत असतो. आपल्याशी बोलायला लागला की चायनिज, हिब्रू, कुठली वेगळीच भाषा बोलत असल्यासारखे होते. त्याच्या देहबोलीतून काही कळत नाही. एक रिजिड केस होउन जाते. अशा माणसांचे अंतरंग उघडपणे मांडणे अनेक बाबतीत धोकादायक असू शकते. पहिल्याछुट मला माझ्या कथनावर माझाच विश्वास राहत नाही. मी जे काही बोलतो त्यातून समोरच्याला काय क्लिक होतंय ते टिपतो.
"सदाशेठ, तुम्ही धंद्यात एक नंबर आहात, पैसा हाताशी खेळतो सहज, निर्णय घ्यायला खुप घाई करता, चंचलतेने निर्णय घेता मग जरा बिघडतं काम"
पहिला तीर गेला. काहीच प्रतिक्रिया नाही. नुसतं, हुम्म्म... अजून...?
"तुमच्या आयुष्यात दोन हजार बारा साली काहीतरी अशी गोष्ट झालीये ज्याने तुमचं आयुष्य खूप बदललंय....."
आता दोघे जण चमकले. रेडकर आणि सदाशेठ. सदाशेठ आतून हलला खरा पण तो काही बोलत नव्हता. मी संधी साधून त्याला पकडलेच. "काय हो काही झालंय काय चांगलं..? म्हणजे तुम्ही सांगाल तसं पुढे अजुन बोलतो. नाही तर राहिलं"
तो काही बोलायला तयार नव्हताच. शेवटी रेडकरने प्रसंग हाताळला, "हो झालंय ना, चांगलंच झालंय, ती आल्यापासून खूप फरक पडलाय, तीच्यामुळेच सगळं निट झालंय, प्रगती झाली, २०१२ च्या दरम्यानच आली ना ती...! तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे. तुम्ही अजुन सांगा सदाशेठचं काय भविष्य...."
आता ही 'ती' कोण? दोघांनीही नीट सांगितले नाही. त्यांची मुलगी नाही, कारण कुटुंबाची भेट झालीये, त्यांना एवढी लहान मुलगी नाही. तशी उघड सांगायला काय भीती होती? गाडी नाही. अशी कोणती गोष्ट असावी जी शेअर करायला आवडत नाही? विवाहबाह्य संबंध...? शक्यता नाकारता येणार नाहीच.
आता सदाशेठ मात्र नीट बोलु लागला, विचारलेल्या प्रश्नांना, सांगितलेल्या गोष्टींना व्यवस्थित रिस्पॉन्स देऊ लागला. त्याला माझं भविष्यकथन, त्याच्या अडचणी, त्यावरचे उपाय सगळं पटत होतं. पंढरीनाथ, रेडकर, आणि आता सदाशेठ परत निरंजनशेठ वर बाण मारते झाले. "ओ निरंजनशेठ, सांगा जन्मतारिख..."
निरंजनशेठने जन्मतारिख सांगितली, मला अनेक गोष्टी दिसल्या. दिसतात. आहे ते आहे. काय कसं वैगरे वैज्ञानिक प्रश्न सध्या बाजुला ठेवू. मी निरंजनशेठला विचारलं, "शेठ, तुमची इच्छा आहे काय मी इथे सगळ्यांना खरं खरं काय ते सांगू अशी..?" निरंजनशेठ हडबडला. "नको साहेब, नका सांगू. इथे जमलेले आपण जरी एकमेकांना ओळखत असलो तरी पर्सनल गोष्टी नकोच सगळ्यांसमोर." मी म्हटलं, "हे बघा, मलाच हे पटत नाही. मी असं कोणालाही चारचौघात काही सांगत नसतो, हे जुजबी आपलं फक्त. डीप असेल तर एकट्यात." शेठने नकार दिल्यावर मात्र इतरांना उत आला. नाही "तुम्ही सांगा हो, ते आपलेच मित्र आहेत, त्यांचं सगळं आम्हाला माहित आहे, त्यापेक्षा वेगळं काय सांगणर तुम्ही..." मी बधलो नाहीच.
शेवटी निरंजनशेठ खरंच रागावण्याचा मूडमधे जातोय हे बघून रेडकरने जरा हवा मोकळी केली. आणि हळू हळू निरंजनशेठ बद्दल एक एक गोष्ट सांगायला लागला. निरंजनशेठ चा एकुलता एक मुलगा अकरावीत आहे, प्रतिष्ठित महागड्या शाळेत जातो. निरंजनशेठ ला 'दुसरा' मुलगा आहे तो सरकारी शाळेत जातो. ही दुसरी बायको, बायको नाहीच. प्रेमप्रकरण. टोटल फिल्मी. शाळेतलं हळवं प्रेम, शाळेत हरवलं, अनेक वर्षांनी सापडलं. परत जुळलं. पण शेठचं तर लग्न होऊन मुलगाही झालेला. शेठ ने घरच्यांपासून लपवून तिला ठेवलीये. पैसा वैगरे पुरवतोय. ही दुसरी बायको, जणू स्वर्गातली अप्सरा, दिसायला खुप सुंदर. पण जगाला दाखवू शकत नाही. आपलं प्रेम खुल्यापणाने व्यक्त करु शकत नाही. ती रखेल नाही. प्रेयसी.
तुम्हाला वाटेल काय बाजीराव-मस्तानीची ष्टुरी लावलीये. पण त्या दोघांच्या संभाषणातल्या इतर डिटेल्समधून ही ष्टुरी नाही हे कळत होतं. असो. पण मला ह्या शेठ बद्दल जे जाणवलं होतं ते हे नव्हतं. हे प्रकरण त्याच्या एकूण स्वभावातला एक छोटासा भाग होता, अपरिहार्य होता. तो माणूस खर्या अर्थाने हलकट होता. महास्वार्थी, कुणालाही हातोहात फसवणारा भयंकर नीच होता. मित्र, आई-बाप, बायको, मुलगा ह्या कोणाचाच तो नव्हता. सगळ्यांना आपल्या स्वार्थासाठी वापर करुन घेणारा. हे सगळं माझ्या ओठावर होतं. मी कसा बोलणार. नाही बोललो ते बरेच झाले. म्हणूनच मी बोलत नव्हतो.
रेडकरच्या तोंडून बाजीराव मस्तानीची कहानी बराच काळ चालु होती. मला कंटाळा येत होता. सकाळचे साडेदहा वाजत आले होते. मला थोडी झोप यायला लागलेली. तेवढ्यात कसल्यातरी घुश्श्यात निरंजनशेठने गाडी थांबवली आणि उतरला. म्हणाला मी नाही चालवणार आता. दुसर्या कुणी घ्या. रेड्करने माझ्याकडे पाहिले, मी अर्धवट डोळ्याने त्याच्याकडे पाहून लोखंडेला पुकारले. लोखंडे लगबगीने पुढे आला आणि सारथी झाला. त्या क्षणी आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे हे त्यास माहित नव्हते. मलाही नव्हते. आम्ही पुढे निघालो. सापुतारा जाणारा रस्ता शोधत होतो. वेगवेगळे रस्ते, इकडून तिकडे. छान शेती, हिरवीगार राने, मध्येच जंगल. कधी काय कधी काय. कुठे तरी एका रस्त्याच्या तिठ्यावर दोन-चार दुकानं दिसली. अकरा वाजून गेलेले. आम्ही थांबलो. पाण्याच्या बाटल्या, केळी, भजी घेतली, अजूनही कायतरी होते आता आठवत नाही. कारण भूक इतकी लागलेली, तिथे दुसरा पर्याय नव्हताच. सदाशेठने भकाभक भजी खाल्ली दाबून. मी केळीच खात होतो. दोन-चार भजी मीही टाकली तोंडात.
अर्ध्यातासाने सदाशेठला उलटी झाली. अर्थात गाडी थांबवली होती आधीच. रिकाम्या पोटी, रात्रीच्या दारु व जागरणावर ते भजे तेलासकट भारी पडले होते. त्यांना पाणी देऊन विश्रांती घेउन पुढे निघालो.
अनेक किलोमिटर लांबीचे घाट लागत होते. सुमारे दोन तास आम्ही फक्त घाटातुन गोल गोल फिरत होतो. विचित्र रस्ते. होते चांगले पण एकही सरळ नाही. अगदी ९० अंशात वळून थेट चढण, त्यात वरुन मालवाहू ट्रक्स येतायत. दोन तासापैकी दिड तास प्रत्येक मिनिट फक्त हेच दृश्य. दुसरे काहीही नाही. कित्येकदा तर असे वाटले की आम्ही चकव्यात अडकलोय. फिरुन फिरुन तिथेच येतोय जणू. पण गुगल पुढे गेल्याचं दाखवत होतं म्हणून बरं, जंगलातल्या रस्त्यावर मार्ग दाखवायला कोण मिळतंय. लोखंडेची चांगलीच ताणल्या गेली. कारण त्याच्या बॅकसीटवर असून मला इतकं गरगरायला लागले की बास. तो तर चालवत होता. तो नक्कीच रात्री ड्रायविंग केलं असतं तर परवडलं असतं असं मनाला बजावून सांगत असणार. आणि मी स्वतःला शाबासकी देत होतो. अर्थात फॉर द सेम रिझन.
पुढे पठार लागला थोडा. तिथे एका गावात निट रस्ता विचारुन आम्ही सापुतार्याच्या मार्गास लागलो. एक खूप विचित्र वाटलेली गोष्ट म्हणजे, एवढे प्रसिद्ध पर्यटन स्थळ. पण आम्हाला आतापर्यंत कुठल्याही दिशादर्शक फलकावर सापुतारा अमुक किमी हे दिसले नाही. कमीत कमी दोनशे किमी आम्ही सापुतार्याच्याच दिशेन जात असू. 'सापुतारा अमुक किमी' ही पाटी आम्हाला पहिल्यांदा एका गावात दिसली. ते अमुक किमी होते : नऊ.
ते नऊ कीमी रस्ता सुरेखच होता. आता पाटी नसती लावली तरी कळले असते सापुतारा जवळ आलाय म्हणून. तर इथे प्रत्येक किलोमिटरला चार पाट्या! मी जरा सुखावलो. म्हटलं चला यांचा काहीतरी बेत दिसतोय, सापुतार्याला एखादे होटल रूम घेऊन फ्रेश होऊन काहीतरी भोजन करण्याचा. साडेबारा वाजत होते. तिथून नाशिक दोन तास. तीन किंवा चार फारतर वाजतील. प्रिंटरशी फोन झालेला. प्रोसेस कशी असावी व काय रिझल्ट हवा ह्याचे एक प्रिंटेड सॅम्पल त्याच्याकडे देऊन ठेवले होते, त्याचा रेफरंस घेऊन तो ते नीट करणार होता. तसा हा प्रिंटर काही गावगल्लीछाप नव्हता. मर्सिडीजमधून फिरणारा. मुंबईचे क्लायंट्स असलेला. त्याने मला निर्धास्त राहायला सांगितले. मी निश्चिंत झालो. आता जेवण, आणि थेट घरी हे दोनच बेत होते.
पण सरळ जाईल तो रस्ता कसला. फसणार नाही तो बेत कसला. चोविस तासातली सगळी धमाल आता सुरु होणार होती. ती तेव्हाच सुरु झाली जेव्हा आम्ही सापुतार्यात एका क्षणासाठीही थांबलो नाही. गाडी ६०-७० च्या स्पीड ने निर्विकार सापुतार्याबाहेर पडली...! मला टेन्शन येण्याचे एक कारण असे होते की... दमण ची ऑफर अजून क्लोज झाली नव्हती.
-----------------------------------------------------------------------------------------------
क्रमशः
(पुर्वप्रकाशित. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. लेखकः संदीप डांगे.)
श्वास रोखून वाचतोय. गूढ तरीपण
श्वास रोखून वाचतोय. गूढ तरीपण खुसखुशीत शैलीत भारी लिहिलंय तुम्ही. लगे रहो.
भारी चाल्लीये कथा. एका दमात
भारी चाल्लीये कथा. एका दमात पाचही भाग वाचले. मस्त. आता लगेच पुढचे भागही टाका.
नाना, है शाब्बास! सगळे भाग
नाना, है शाब्बास!
सगळे भाग टाकून मोकळे झालात.
आता माबोची अंदरकी बात सांगतो.
इथे रॅगिंग होत नाही,
.
पण
.
पण
.
पण
.
.
पण
.
.
पण
.
.
.
.
कथा पूर्ण केली नाही, तर इथे डायरेक्ट फाशी देतात बर्का
मस्त चालू आहे. सगळे भाग वाचून
मस्त चालू आहे. सगळे भाग वाचून काढले.
झकासच
झकासच
अमेय, खात्री होती तुझ्या
अमेय, खात्री होती तुझ्या झोपेची वेळ आज पुढे जाणार.
हटके लिखाण . भारी जमलीयत एकेक
हटके लिखाण . भारी जमलीयत एकेक कॅरेक्टर्स, आपणही कुठे ना कुठेतरी पाहिलीयत असे वाटत राहिले.
अमितव ओ द्या की पुढचा
अमितव
ओ द्या की पुढचा भाग
Wirhdrawal symptoms व्हायलेत
लई दिसांनी कायतरी वाचाय गावलंय
भारी आहे हे..पुढचे भाग टाका
भारी आहे हे..पुढचे भाग टाका हो पटापट..
सर्वांना धन्यवाद! शेवटचा भाग
सर्वांना धन्यवाद!
शेवटचा भाग लिहायचा बाकी आहे. लवकरच टाकतो.
आणि हो... ही कथा पूर्ण होइलच. अन्यथा आधीच्या भागांना काहीच अर्थ राहणार नाही.
छान चाललिये कथा.
छान चाललिये कथा.
चला फटाफट पाचही भाग आले. मस्त
चला फटाफट पाचही भाग आले. मस्त उत्कंठा ताणलीये. आता शेवटचा भाग लवकर येऊ द्या.
मस्त चाललीये कथा...
मस्त चाललीये कथा...
मस्त चालली आहे. सगळी पात्र
मस्त चालली आहे. सगळी पात्र मस्त उतरली आहेत. रोज एक भाग टाकाल काय?
मस्त चालु आहे कथा. खुसखुशीत
मस्त चालु आहे कथा. खुसखुशीत लिखाण.
कंट्रोल उदय कंट्रोल>>>>>>>>>
भारीच.,..खुपच उत्सुकता
भारीच.,..खुपच उत्सुकता वाढलीये आता.
संदिप भौ राम राम आजच माझा आय
संदिप भौ राम राम
आजच माझा आय डी इथे कार्यान्वयित (अॅक्टिव) झालाय.
नमस्कार होबासराव. वेल्कम टू
नमस्कार होबासराव. वेल्कम टू मायबोली.