सडमाडं

Submitted by जव्हेरगंज on 24 March, 2016 - 08:49

कळी, भात, वांग्याची आमटी, आन चपाती पत्रावळीवर आल्यावर बब्यानं जेवायला सुरु केलं. आण्या मात्र कोशिंबीरीची वाट बघत खाऊ का गिळू अवस्थेत ताटकळला होता. रामाला हाकावर हाका मारुन कोशिंबीर त्यानं त्याच्या पंगतीत फिरवायची व्यवस्था केली. चार पळ्या कोशिंबीर त्याच्या पत्रावळीत पडली तवा त्याच्या जिवात जीव आला. तरी अजून पापड्या यायच्या बाकी होत्या. मग गर्दीत हरवलेल्या पापडीवाल्याच्या शोधात त्यांच्यावर बारीक नजर ठेवतच आण्यानं जेवन झोडायला सुरुवात केली.

वाढपी दुरडी घेऊन फिरत होते. दुरडीत भात का कळी हे खाली बसून कळत नव्हतं. बब्या वाढप्याला बोलवायचा आणी त्याचा दुरडीत जे आसल ते घ्यायचा. शेवटाशेवटाला त्याच्या पत्रावळीत नुसतीच कळी पडत राहिली. पण हिकडं आण्यानं पत्रावळीत भाताचा डोंगरच ऊभा केला. कुणीतरी त्याच्यापाशी वांग्याच्या आमटीची बादलीच आणून ठिवली. मग मात्र आण्यानं नुसती तर्री तर्री काढून भाताच्या डोंगरावर ओतली. मांडी घालून नडगीला रग लागल्यानं एक पाय बाजूला घेत मग तो जेवणावर तुटूनच पडला. शेवटाशेवटाला तर त्याला पँटचा हुकपण ढिला करावा लागला.
पहिली उठून दुसरी पंगत बसली तरी कोपऱ्यात बब्या न आण्या हाणतच होते.शेवटी टोपीवाल्या जेष्ठांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्यावर जरा लाजूनच उठले.

पाणी प्यायला 'ही' गर्दी. टिपाडं पाण्यानं भरलेली, पण गिलांसावर कब्जा झालेला. मग शेवटी हौदातच हात धुवून त्यांनी गलासाला रांग लावली. कसाबसा एक गलास मिळवून टिपाडातून भरुन घेतला. ऊन्हाचं तापलेलं पाणी ते, त्यात तर्रीनं घशाचा केलेला जळफळाट. पाणी काय नरड्याखाली उतरना. चार घोट पाणी पिऊन दोघंबी शेवटी मंडपाबाहेर आली. रुपारुपायाच्या मोठ्या जम्बो पेप्श्या घेऊन झाडाखाली चोखत बसली. पोटात भडकलेली आग तवा कुठं निवायला लागली.

मंडपात आहेरांची पुकारणी चालू होती. नवरानवरी पायापडणीचे पैशे गोळा करत समद्या मांडवभर फिरत होते. कानपिळकी अजून बाकी होती. पंगती उठून आजून बसतच होत्या. सुर्य डोक्यावर आग ओकत होता. त्यात आचाऱ्याच्या भट्टीचा धूर मंडपात शिरत होता. उकडलेल्या अंड्यासारखी माणसं शिजत होती. वारा नावाची गोष्ट तिथं वाहतच नव्हती.

"वराड काय लवकर निघत न्हाय लगा " मंडपातली एकंदरीत दशा बघून आण्या पुटपुटला.
"हू..." बब्यानं पेप्शी चोखत हुंकार भरला.
"चल जरा फिरुन युव माळावरनं, हितं मव्हळं लय मिळत्याती, काढू येकांद "
मव्हळाचं नाव काढताच बब्यांच डोळं चमकलं. मग दोघंबी निघाले माळावर. वाटत बब्यानं माणिकचंदची पुडी फोडली. ती दोघांनी अर्धी अर्धी वाटून घेतली. पिचकाऱ्या मारत मग दोघं कुसळं तुडवत निघाले. बोरीची बाभळीची वाळलेली झाडं त्यांना वाटत भेटत गेली. ऊन्हाच्या झळयांनी त्यांचे डोळे दिपून गेले. दूर कुठेतरी हिरवळ दिसली. तिकडं जाताना वाटत एक डबकं लागलं. मग कापडं काढून बब्यानं पहिला सूर मारला. पाठोपाठ आण्याही पाण्यात उतरला. डोळे लाल होईपर्यंत दोघे पोहत राहिले. मग कापडं घालून पुन्हा पुढे चालू लागले.

भटकत भटकत त्यांना एके ठिकाणी रेल्वेचा रुळ दिसला.
"यील कारं रील्वी ?" रुळ डोळ्याखालनं घालत बब्यानं शंका काढली.
" काय म्हायीत !" ताटकळून गेलेला आण्या एका झाडाखाली बसत म्हणाला.
मग बब्यानं तंबाखूची पुडी फोडली. मळली. खाल्ली. आण्या झाडाखाली झोपून घोरायला लागला. बब्या काड्या करत रेल्वेची वाट बघत राहिला. पण रेल्वे आली नाही. आण्याची झोप पुरी झाली तरी रेल्वे आली नाही. शेवटी कटाळून दोघे निघाले तवा अचानक भकभकभकभक करत रेल्वे आली. रेल्वे कसली मोठ्ठी मालगाडी होती ती. डोळ्यांचे पारणे फिटोस्तोर त्यांनी तिला बघितली. तो धूर, तो नाद, ती लय, ते डब्बे बघून दोघेही भारावून गेले. एवढ्या लांबच्या लग्नाला आल्याचं सार्थक झालं. किमान एकतरी अचाट, अतर्क्य किस्सा त्यांच्याजवळ होता. जो सगळ्यांना रसरशीत वर्णन करुन सांगायचा होता.

सुर्य कलल्यावर दोघंही घाईघाईने मंडपाकडे निघाले. फुफाट्यात, धोंड्यात, रुईच्या काट्यात, वाट काढत चालतच राहिले. परत आले तेव्हा मंडपात सगळीकडं सामसूम होती. रुकवताचं सामान टेंपोत भरलं जात होतं. रडारडीचा कार्यक्रम कधीच होऊन गेलेला. नवरानवरी ट्रॅक्समध्ये बसून देवाला निघून गेलेली.
वऱ्हाडाचा ट्रॅक्टरही निघायच्या तयारीत होता. पुढची म्हाताऱ्यांची टायली टाळून दोघांनी मागच्या पोराठोरांच्या टायलीत उड्या घेतल्या.
तरी एक म्हातारं करवादलंच " कुटं हुतारं इतक्या उशीर ?"
" हितंच हुतू की आण्णा, जरा पडलू हुतू झाडाखाली " बब्यानं वेळ मारुन नेली.

ट्रॅक्टर निघाला. मागच्या टायल्या धडाडा. आता हायवेला लागोस्तोर कंबरटंच मोडणार. फळक्यावर टेकून बब्या ऊभाच होता. कसनुसं तोंड करुन सोबतीला आण्यापण.
छकूबायनं कसलीशी पिशवी उघडली. आन आण्याला दुपारी खायच्या राहिलेल्या पापड्यांची आठवण झाली. बायाबायांत पिशवी फिरत राहिली. चवदार पापड्यांचा फडशा उडाला. पिशवी रिकामी झाली. मग टायलीबाहेर गेली. डोळे पेंगुळले. ट्रॅक्टर हायवेला लागला. काळोखात रस्त्यावर धावू लागला.

फळक्यावर बसून कटाळल्यावर समदी पोरं एक एक करत खाली बसली. दाटीवाटीनं जागा करुन पेंगायला लागली.
आज बब्याच्या डोळ्यापुढून रेल्वे काय हटायला तयार नव्हती आन आण्याच्या डोळ्यापुढून पापड्या.

तेवढ्यात कुणीतरी बारकी पोरगी फिस्कारली, " कानपिळकीला काय मज्जा आली ना !"
"आगं ती कानंच सोडत नव्हतं, " दुसरीपण कोणी खिदाळली.
" फुटू, फुटू काढायचा हुता गं त्यला" कुण्या थोराड बाईनंपण माहिती पुरवली.
" आगं न्हाय, त्या रामाभावनंच सांगितलं हुतं त्यला, जोरात कान पिळायचा म्हणून." पुन्हा पहिली बारकी फिस्कारली.
बायकापोरांच्या गप्पा रंगल्या. हासण्याखिदळण्यानं टायली दणाणली. बब्या न आण्या कान टवकारुन ऐकू लागले. मांडवातली भलतीच मजा आपण गमावून बसल्याची रुखरुख त्यांच्या डोळ्यात आज कुणालापण दिसली असती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईशप्पत. कसल भारी वर्णन आहे. गाव, लग्न, वरात, ट्यायलि, डोह, रेल्वे सगळ डोळ्यासमोर उभ राहिल.

खूप छान.

मोहोळ( म्हणजे मधमाशांचं पोळं ) असेल.
गोष्ट मस्त! वि. वा. शिरवाडकरांचा, शांता शेळक्यांनी संपादित केलेला एक कथासंग्रह आहे. त्यात एका इनामदाराकडच्या लग्नात जेवायला आलेल्या गरीब लोकांची कथा आहे. त्या कथेची आठवण झाली. त्या सर्वच कथा अतिशय सुंदर आहेत.

जाई., विद्या, टीना, मयुरी , preetiiii , अनघा, सस्मित, मानव, सकुरा, वावे, विठ्ठल, बबन .

खूप धन्यवाद !

लेखनशैली नेहमीप्रमाणेच सुंदर.
कथेच्या शीर्षकाचा अर्थ नाही लागला. आधी निवडूंग आणि आता सडमाडं दोन्ही Happy

कथेच्या शीर्षकाचा अर्थ नाही लागला. +१>>>>>

आधीचे शीर्षक= निवडुंग= हे बाहेरून काटेरी पण आतून ओलावा या अर्थाने वापरले होते. उन्हातला मांडव काटेरी पण आतल्या दंडामस्तीत ओलावा. Happy

सडमाडं = बाजरीची वाळलेली वैरण. ही गुरांना सकस हिरवा चारा उपलब्ध नसताना खायला घालतात. म्हणजे दुय्यम दर्जाजे खाद्य. कथेतले दोन्ही नायक हे असेच वाया चाललेले सडमाडं आहेत अशा अर्थानं वापरलयं.

सर्वांचा खूप आभारी आभारी आहे.