वादा करो जानम ना छोडोगे ये दामन...

Submitted by अतुल ठाकुर on 19 March, 2016 - 20:10

hqdefault_2.jpg

मेहमूदचा "सबसे बडा रुपैय्या" चित्रपट पाहिल्याचं आठवत नाहीय. काही तुटक गोष्टी आठवतात. मात्र लख्खपणे आठवते ते "वादा करो जानम" हे गाणे. किशोर कुमारची वेगवेगळ्या नायकांना फिट्ट बसेल असा आवाज लावण्याची पद्धत होतीच. हे सर्व आवाज त्या गायकांना चपखल बसत जरी असले तरी काही नायकांसाठी त्याने लावलेले आवाज वेगळेच उठुन दिसतात. उदाहरण सांगायचं झालं तर संजीवकुमारसाठी "आंधी" मध्ये "पत्थर कि हवेली को" म्हणताना त्याचा लागलेला आवाज. असाच एक वेगळा सूर विनोद मेहरासाठी किशोरदाचा लागत असे असे मला नेहेमी वाटते. हे खास करुन "घर" मध्ये "आपकि आंखोंमें कुछ मेहेके हुएसे राज है" ऐक्ताना जाणवतं. "वादा करो जानम" मध्ये हीच किमया किशोरदांनी साधली आहे. खरं सांगायचं तर विनोद मेहरा हा अतिशय गुणी अभिनेता असुनसुद्धा दुर्दैवाने पहिल्या फळीतला नायक कधीही बनु शकला नाही. मात्र त्याला काही गाणी फार सुरेख मिळाली. अगदी सुरुवातीच्या "गीत गाता हू मै" या "लाल पत्थर" मध्येही कोवळ्या विनोद मेहरासाठी किशोरदांचा आवाज होता. आणि "वादा करो जानम" साठी देखिल तोच आवाज आहे.

बासू मनोहारी ही जोडी आरडी बर्मनला असिस्ट करणारी. पंचमदाची छाप या गाण्यावर जाणवते. पैकि बासु हा व्हायोलिनमध्ये तर तरबेज तर मनोहारी हा सेक्सोफोन्मध्ये. या जोडीने दोन तीनच हिन्दी चित्रपट दिले त्यापैकी "वादा करो जानम" हे एक अतिशय संस्मरणिय गाणे आणि दुसरे म्हणजे "आ हमसफर प्यार कि सेज पर" हे पुन्हा लता किशोरचेच गाणे. त्यावर वेगळ्याने लिहावे लागेल. "वादा करो जानम" मध्ये गॉगल लावलेला हँडसम विनोद मेहरा झटकन गॉगल काढुन "वादा करो जानम" अशी सुरुवात करतो आणि प्रेक्षक गाण्यात गुंतत जातात. त्यातच लाजरेपणाने हसत, लटका विरोध दाखवत मौशुमी चटर्जीने गाण्याच्या सौंदर्यात आणखि भर घातली आहे. बाकि आपल्याकडे अनेक सौंदर्यवती आणि गुणी अभिनेत्रींची कारकिर्द फार ताकदीच्या अभिनेत्रींशी समांतर धावली त्यामुळे त्यांचे वेगळे असे स्थान निर्माण होऊ शकले नाही. त्यात मला मौशुमीचा समावेश करावासा वाटतो. आजुबाजुला नुतनसारख्या अभिनेत्री खुप आधिपासुन होत्या आणि त्या शेवटपर्यंत निवृत्त अशा झाल्याच नाहीत. प्रेक्षक शेवटपर्यंत त्यांच्यावर भरभरुन प्रेम करत राहीले. बहुधा यामुळेही असेल पण हिन्दीमध्ये ठळकपणे लक्षात राहील अशी भूमिका तिच्या वाट्याला आली नाही. दाताच्या त्या विशिष्ट ठेवणीमुळे गोड हसणार्‍या मौशुमीचे ते हसु यात वारंवार दिसतं. मौशुमी काय किंवा विनोद मेहरा काय, यांनी वाईट काम केलं आहे असा चित्रपट मला तरी आठवत नाही. पण दोघेही स्वतःचं असं स्थान निर्माण करु शकले नाहीत. समदु:खी असतील म्हणुनही असेल कदाचित पण दोघा नायक नायिकांची केमिस्ट्री पडद्यावर जाणवते. एकमेकांच्या प्रेमात विरघळुन गेलेले प्रियकर आणि प्रेयसी दोघांनी सुरेख उभे केले आहेत.

एक दुसरी केमिस्ट्री पडद्यामागे जाणवते ती गायक गायिकांची. लता आणि किशोरच्या गाण्यात गाण्यातील भावभावना आवाजातुन ओतप्रोत भरलेल्या जाणवतात. दुनिया काहिही म्हणाली तरी मला वचन दे कि हाती धरलेला हात कधीही सुटणार नाही. जग कितीही बदललं तरी आपण बदलायचं नाही अशा तर्‍हेच्या आणाभाका पडद्यावर घेणार्‍या युगुलाची भावना दोघांच्याही आवाजातुन ओसंडुन वाहते. पैकी यात प्रेमात पडलेल्या युवतीचे समर्पण हे लताच्या आवाजात जाणवते तर सांभाळुन घेणारा प्रियकराचा खास आश्वासक स्वर किशोरने लावलेला दिसतो. मला नेहेमी असं वाटतं अशा तर्‍हेने मुळातच या स्तरावर गाणं पोचवल्यावर पडद्यावर नायक नायिकांना फारशी मेहनत करावी लागतच नसेल. किंवा उत्तम अभिनय त्यांच्याकडुन आपोआपच होत असेल. काही जण मुळातल्या सुंदर गाण्याला चार चांद लावत असतात. तर काही ते साफ पाडुन टाकतात. येथे एकंदरीत रसायन नीट जमुन आले आहे. उत्तम अभिनेते, त्यांचे पडद्यावरील देखणे दर्शन, गोड चाल, गायक गायिकेने नायक नायिके आधीच फार उंचीवर पोचवलेले गीत, आणि मनाला सुखावणारा निसर्ग यामुळे हे गाणे श्रवणिय आणि प्रेक्षणिय देखिल झाले आहे.

अतुल ठाकुर

हे गाणे युट्युबवर येथे ऐकता येईल
https://www.youtube.com/watch?v=eoD-uSN28F4

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, वाह, वाह !!! अप्रतिम !!!
विनोद आणि मौसमी हे अगदी आवडते कलाकार आहेतच.
तसे हे गीत आधी ऐकले / पाहिले होते, पण तुमच्या या विवेचनानंतर त्यातली खुमारी अजुन जास्त जाणवली.

अशाच प्रकारचे एक गीत "आनंद आश्रम" चित्रपटाच्या बंगाली आवृत्तीत आहे,
त्यामधे राकेश रोशन, मौसमी आणि संगीतकार/गायक आहेत श्यामल मित्रा.
हे पण अवश्य पहा. शब्द कळाले नाहीत तरी भाव कळतील.

https://www.youtube.com/watch?v=puZ20H1wcOk

वा, सुंदर लिहिलेय. गाणे आधी खास आवडीचे नव्हते आता मात्र आवडायला लागलेय.

रच्याकने, द जॅपनीज वाईफ मधे, मौशुमीचा लाजबाब अभिनय बघायला मिळेल. पिकू मधले तिचे महत्वाचे सीन्स कापले आहेत, त्यामूळे तिथे तिचा प्रभाव पडत नाही.

उदाहरण सांगायचं झालं तर संजीवकुमारसाठी "आंधी" मध्ये "पत्थर कि हवेली को" हा किशोरदांचा आवाज आहे ? माझा तर समज होता की हा आवाज भुपेंद्र यांचा आहे.

मस्त लिहीलंय हे. Happy वादा करो म्हणल्यावर मला आधी वाटले किशोरचेच खालील गाणे वाटले. काय आवाज आहे त्या पण गाण्यात.

वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ
जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ
छुओ नहीं देखो ज़रा पीछे रखो हाथ
जवाँ तुम हो जवाँ मैं भी हूँ

सबसे बडा रुपॅय्या मधली सगळीच गाणी साधी सोपी आणी सुन्दर होती अस आठवतय. कुणाला आठवताहेत का ? मला वाटत नदिया किनारे एक बन्गलो ग पोरी .... त्यातलच आहे

तीनच गाणी होती त्या चित्रपटात. नदिया किनारे आणी वादा करो आणी

मेहेमुदने गायलेले

ना बीवी है ना बच्चा
ना बाप बडा ना भैय्या
द होल थिंग इस दॅट
की भैया सबसे बडा रुपय्या. Happy