प्राचिन कथा आणि शोषणाचे स्पष्टीकरण

Submitted by अतुल ठाकुर on 7 March, 2016 - 08:29

1970_13.jpg

मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाने अलिकडेच आयोजित केलेल्या दोन दिवसाच्या सेमिनारमध्ये कथा, त्यांच्या निरनिराळ्या आवृत्त्या, त्यात कालानुरुप होत गेलेले बदल (Transmission of stories: Versions and Variations) हा विषय होता. सुरुवातीपासुनच ज्या विद्वानांनी पेपर्स वाचले त्यांचा दृष्टीकोण लक्षात येऊ लागला होता. मात्र मला संस्कृत संशोधन परंपरेचा अनुभव नसल्याने मी ऐकत राहिलो. खुप काही ओळखीचे वाटत होते. सेमिनारचा समारोप करताना डांगे मॅडमचे भाषण झाले आणि त्यात समस्यापूर्ती झाली. आम्ही समाजशास्त्रात शिकलेल्या "स्ट्रक्चरल फंक्शनलिझम" चा उहापोह आपल्या भाषणात डांगे मॅडमनी केला. समाजशास्त्रातील हा एक अतिशय महत्त्वाचा सिद्धान्त. सुरुवातीपासुन शेवटपर्यंत कुठेनाकुठेतरी याचा उल्लेख होत गेलेला. डांगे मॅडमनी आपल्या भाषणात या सिद्धान्ताशी संबंधित विद्वानांचाही उल्लेख केला होता. त्यात मॅलिनोवस्कि, इमाईल डुरकाईम, हर्बर्ट स्पेन्सर, लेवी स्ट्राऊस हे सारे होते. समाजाला एखाद्या शरीराप्रमाणे मानुन त्यावर भाष्य करणारा हा सिद्धान्त म्हणतो कि शरीराचे अवयव ज्याप्रमाणे एकमेकांशी सुसंवाद साधुन वागत असतात त्याचप्रमाणे समाजातील निरनिराळ्या संस्था काम करतात आणि समाजात शिस्त आणि सुसंवाद राखण्यासाठी या संस्थांचा उदय, अस्त होतो. तद्वतच शरीरातील निरनिराळ्या संस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था एकमेकांना पूरक अशी कार्ये करत असतात त्याचप्रमाणे समाजातील संस्थादेखिल एकमेकांशी पूरक असतात आणि त्यामुळे समाजात स्ठैर्य राहते. स्ट्रक्चरल फंक्शनलिझमचं हे अगदी ढोबळ स्पष्टीकरण आहे. मात्र त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले.

समाजशास्त्रातील या अतिशय महत्वाच्या सिद्धान्तावर प्रचंड टिकाही झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे, काय असतं याचं उत्तर देऊन हा सिद्धान्त थांबतो. फार तर हे कशामुळे आहे येथपर्यंत याची धाव असते. समाजशास्त्राचे जे अभ्यासक समाजातील शोषण लक्षात घेऊन त्यावर भाष्य करु इच्छितात, त्यात बदल घडवु इच्छितात त्यांच्यासाठि हा सिद्धान्त मदत करीत नाही. त्यामुळे या सिद्धान्ताची भलावण करणार्‍यांवर आरोप असा केला जातो कि समाजातील शोषण करणार्‍या संस्था, समजुती, परंपरा "जैसे थे" ठेवण्यात ही माणसे हातभार लावतात. "स्टेटस को" राखणार्‍या या सिद्धान्तावर त्यामुळे समाजशास्त्रात टिका झाली तर नवल नाही. मात्र संस्कृत जगतात हा सिद्धान्त जर सर्रास वापरला जात असेल तर त्याचे धागेदोरे फार लांबवर जाऊ शकतात. मुळातच टेक्स्चुअल अ‍ॅनालिसिस करताना सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणं अपेक्षित आहे का? हा प्रश्न मला पडला. तेथिल विद्वानांना हा प्रश्न विचारल्यावर मला तीन तर्‍हेची उत्तरे मिळाली. एक म्हणजे दोन्ही करता येतं, फक्त अ‍ॅनालिसिस किंवा भाष्य देखिल, कसंही हे पहिलं उत्तर. दुसरं उत्तर भाष्य करणं अपेक्षित आहे. आणि तिसरं उत्तर भाष्य करु शकता. या उत्तरांमुळे माझा गोंधळ वाढला. आणि डांगे बाईंच्या भाषणात या प्रश्नाचे उत्तर नव्हते. माझे असे मत झाले कि डांगे बाईंना कदाचित त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणे अपेक्षित नसावे. किंवा संस्कृत स्कॉलर्सच्या कक्षेत ते येत नसावं. मला मात्र याचं स्पष्ट उत्तर एकदा संस्कृत विद्वानांकडुन मिळवण्याची इच्छा आहे. कारण त्यामुळे पुढची वाट स्पष्ट होईल.

आणखि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यांचे मत प्राचिन भारतात तंत्रज्ञान, विज्ञान परिपूर्ण झाले होते असे आहे, तो भारताचा सुवर्णकाळ होता असे आहे किंवा आजच्यापेक्षा कितीतरी पुढारलेले असे पूर्वीचे जग होते असे आहे त्यांच्यासाठी "स्ट्रक्चरल फंक्शनलिझम" हा सर्वात सोयिस्कर सिद्धान्त आहे असे मला वाटते. या मुळे जे काही पूर्वी होते ते सारे समाजधारणेसाठी योग्यच होते. त्यात अन्याय्य अशी व्यवस्था नव्हतीच हे आपोआपच सिद्ध होते. दुसरे म्हणजे याही पुढे जाऊन त्याला विज्ञानाचे नियम लावुन काही जण अनेक चालिरितींना वैज्ञानिक आधार देखिल शोधतात. या सार्‍या बाबींमध्ये "पॉवर" ही समाजात कशी काम करत असते. शोषण हे कशा तर्‍हेने होत असते, एखाद्या गटाला नेस्तनाबुत कसे केले जाते, त्याला आपले विचार स्विकारायला भाग कसे पाडले जाते आणि ते ही इतक्या सूक्ष्मपणे कि जणु त्या गटाला आपले होणारे शोषण देखिल नैसर्गिकच वाटावे या सर्व गोष्टी विसरल्या जातात. यालाच ग्रामशीने "हेजेमनी" म्हटले आहे. मात्र मुळात संस्कृत संशोधनात हे सारे मांडणे अपेक्षित आहे काय याबद्दल मला फारशी माहिती नाही त्यामुळे यावर मला काहीही भाष्य करता येत नाही. सेमिनारमध्ये जे पेपर वाचले गेले त्यात डॉ. चिन्मयी देवधरांचा पेपर या दृष्टीने मला महत्त्वाचा वाटला. वेदातील इंद्र या देवतेच्या संदर्भात कालानुरुप घडत गेलेल्या बदलांना त्यांनी आढावा घेतला होता. युद्धाशी संबंधीत, अतिशय शूर असे वर्णन वेदात असलेल्या या देवतेबद्दल पुढे कामी, कुणीही तप केल्यावर आपली गादी जाईल म्हणुन घाबरणारा अशा तर्‍हेच्या कथा प्रसुत झाल्या. याबद्दल त्यांनी सामाजिक अंगाने मत मांडले होते.

समाजात आर्यांना स्थैर्य आले नव्हते. युद्धे सुरु होती. स्थानिक लोकांना पराभूत करावे लागत होते. भूमी संपादन करावी लागत होती. तोपर्यंत युद्धाचे प्रतिक अशा अतिशय शूर अशा इंद्राची आवश्यकता होती. पुढे शत्रु पराभुत झाला. जमिनी मिळाल्या. शेती सुरु झाली, स्थलांतरण थांबले. जिवनाला स्थैर्य आले. यानंतर युद्धाची फारशी अशी आवश्यकता उरली नाही. त्यामुळे युद्धसंबंधी असलेला महत्त्वाचा प्रमुख देव इंद्र मागे पडला. त्याचे महत्त्व पूर्वीसारखे उरले नाही. हा विचार मला मोलाचा वाटला. यादृष्टीने मला प्रा.शकुंतला गावडे यांचाही पेपर महत्त्वाचा वाटला. फेमिनिस्ट सकट निरनिराळ्या दृष्टीकोणातुन रामायणातील शूर्पणखेच्या कथेचा मागोवा घेताना त्यांनी प्राचिन भारतातील पुरुषसत्ताक पद्धती हा शब्द न वापरता बरेच काही त्या अंगाने सूचित केले. मात्र मर्यादा पुरुषोत्तम रामाने एखाद्या स्त्रीला मुळात कुरुप समजणं, तिला स्पष्टपणे नकार देऊन मोकळं होण्यापेक्षा आधी रघुकुलातील सूर्यवंशी, महाप्रतापि अशा दोघा भावांनी तिची थट्टा करुन त्याचा आनंद घेणं, त्यानंतर थट्टा अंगाशी आल्यावर तिचे नाक, कान कापुन तिला कुरुप करणं यावर शकुंतला गावडे यांनी सूचना केली असली तरी स्पष्ट भाष्य नव्हते. वाल्मिकी रामायण काय किंवा नंतर आलेल्या अध्यात्म रामायण किंवा भावार्थ रामायण काय, या सार्‍यांमध्ये मर्यादापुरुषोत्तम रामाने केलेली थट्टा सगळीकडे सारखिच आहे. शिक्षाही सारखिच आहे. फक्त पुढे त्यात नाक, कानासकट शूर्पणखेचे स्तनसुद्धा कापल्याच्या वाढीव शिक्षेचे उल्लेख आहेत. स्वच्छंदी स्त्री पाहिल्यास अवयव विच्छेदनाची शिक्षा द्यावी असा उल्लेख असलेली एखादी स्मृती तपासायला हवी असे वाटते कारण शिक्षेची पद्धत अगदी सगळीकडे सारखिच आहे. बाकी शूर्पणखेला जीवनदान मिळाले, ती फक्त नाक कानावर सुटली असा सूर लावणारे धन्यच म्हणायला हवेत. स्त्रीसाठी अवयव विच्छेदन करुन जगत राहण्याची शिक्षा कदाचित मृत्युपेक्षाही भयंकर असेल. 'ढोल गवाँर सूद्र पसु नारी। सकल ताड़ना के अधिकारी' म्हणणार्‍या तुलसीदासांकडुन या कथेच्या बाबतीत फार वेगळी अपेक्षा ठेवता येत नाही.

रामायणातील शबरीवर पेपर सादर करणार्‍या विद्वानांनी "पॉवर" विषय सूचित तर केला पण स्पष्ट भाष्य करण्याचे टाळले. त्यावरुन बहुधा संस्कृत संशोधन परंपरेमध्ये याची आवश्यकता किंवा अपेक्षा नसावी असे मला वाटले. वास्तविक मातंग समाजातील शबरीला क्षत्रिय कुळातील राम जवळ करतो ही घटना उल्लेखनीयच आहे. त्यातही या कथेला "पोल्युशन आणि प्युरीटी" चा ही पदर आहे कारण तिने आणलेली बोरे, आधी चाखुन पाहिली होती असा काही कथांमध्ये उल्लेख आहे. रामाला भगवंताचा अवतार मानले तर "देवासमोर कुठलेही भेदभाव नाहीत. देवाला सर्व सारखेच" ही भक्तीमार्गाची भूमिका समोर येते. मात्र जिला रामाने स्विकारले त्या शबरीला नंतर सर्व समाज स्विकारेल का या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर देता येत नाही. कारण देवासमोर सर्व सारखेच असले तरी व्यवहारात ही समानता येते काय हा प्रश्न तसाच शिल्लक राहतो. मात्र स्ट्रक्चरल फंक्शनालिझम समोर ठेवला तर बहुतेक पेपर्स त्याच अंगाने जाणारे होते असे माझे मत आहे. काही पेपर्स माहिती म्हणुन सुरेख होते मात्र सेमिनारच्या विषयाशी फटकुन होते असे म्हणावे लागेल. तर काही पेपर्समध्ये कथावाचनाची लांबण जास्त होती असे वाटले. या सर्व पेपर्समध्ये कथेच्या लेखकाची सामाजिक, राजकिय भूमिका ओळखुन त्या अंगाने त्याने कथेत केलेला बदल कुणी फारसा मांडला नाही हे मात्र जाणवले. प्राचीन लेखकांबद्दल कदाचित हे अवघड असेल पण अलिकडल्या लेखकांच्या बाबतीत हे करता आले असते असे माझे मत आहे. ययातीच्या कथेत तर हे फारच जाणवले. हा पेपर सादर करणार्‍या बाईंनी वि.स. खांडेकरांच्या ज्ञानपीठ विजेत्या "ययाती" कादंबरीचा आधार घेतला होता मात्र भाऊसाहेबांनी आपल्या कुठल्या राककिय आणि सामाजिक तत्त्वज्ञानावर या कादंबरीची उभारणी केली होती आणि त्यामुळे या कथेत त्यांनी कसे व का बदल केले याचा धांडोळा घेतला नाही. गुरुवर्य नरहर कुरुंदकरांनी यावर अतिशय मूलभूत व सविस्तर विवेचन आपल्या लेखात केले आहे.

आपल्या 'ययाती" या लेखात कुरुंदकरांनी भाऊसाहेब खांडेकरांचे मन हे समाजवादाने प्रभावित झालेल्या एका गांधीवाद्याचे मन आहे या कळीच्या मुद्द्यावर बोट ठेऊन ययातीबद्दल विवेचन केले आहे. ययाती ही कादंबरी खांडेकरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी आहे असे ते म्हणतात. त्याच कचाचे पात्र हे गांधीवादाने प्रभावित असलेले समाजवादी विचारसरणीचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. मला कथेवर घडणारे संस्करण आणि कालानुरुप निरनिराळ्या लेखकांनी कथेमध्ये केलेल्या बदलाचे कारण शोधण्याचा हा मार्ग अतिशय महत्त्वाचा वाटतो. हा मार्ग चोखाळण्याचा कुणी फारसा प्रयत्न केलेला दिसला नाही.

एका संस्कृत सेमिनारमुळे असे अनेक प्रश्न मनात उमटले ज्यांचा उहापोह वर केला आहे. मात्र हे प्रश्न एका संस्कृतचा अभ्यास करणार्‍या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याचे आहेत हे जर लक्षात घेतले तर संस्कृतच्या विद्वानांना माझ्या मांडणीतील त्रुटी जाणवतील आणि त्या ते दूर करु शकतील असा मला विश्वास वाटतो. कारण एक विद्यार्थी म्हणुन मनात आलेल्या गोष्टी मी जरी वर मांडल्या असल्या तरी संस्कृतचे प्राथमिक ज्ञानही मला नाही याची मला नम्र जाणीव आहे आणि त्यामुळे मी केलेल्या धारिष्ट्याबद्दल ही ऋषितुल्य मंडळी मला क्षमा करतील अशी आशा आहे. मला पडलेले प्रश्न हे प्रामाणिक आहेत त्यामुळे त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे. अशी उत्तरे मिळवतच माझा संस्कृतचा प्रवास सुरु राहणार आहे असे मला वाटते. लेख संपवताना माझी वर्गमैत्रिण कोमल हिने केलेल्या किर्तनाचा उल्लेख आवर्जुन करावासा वाटतो. अतिशय आखिव, रेखिव, नेटका, बंदिस्त आणि देखणा नाट्यप्रयोग पाहावा असा हा अनुभव होता. तिचा आवाज, तिने केलेला पेहराव, तिचे दिसणे, गाणे सारेच विलोभनीय. पेटीवर दुसरी मैत्रिण अदिती होती आणि तबल्याच्या साथीला आणि एक सहकारी. कार्यक्रम सुरेख रंगला. कसलाही फापटपसारा नसलेला हा किर्तनाचा कार्यक्रम मला एखाद्या अतिशय रेखिव नेटकेपणाने सादर केलेल्या पेपरप्रमाणे वाटला आणि काही पेपर्स हे किर्तन केल्याप्रमाणे पाल्हाळीक वाटले. या संपुर्ण सेमिनारसाठी संस्कृत विभागात निरनिराळे कार्यक्रम ठेवणार्‍या विभागप्रमुख डॉ. माधवी नरसाळे यांचे मला येथे खुप खुप आभार मानावेसे वाटतात. मोडी लिपिच्या तज्ञांपासुन ते शबरीवर बोलणार्‍या विद्वानांपर्यंत अनेकांना त्या विद्यार्थ्यांसमोर आणतात. माझ्यासारख्या सतत झोळी घेऊन हिंडणार्‍याला काय घेऊ आणि काय नको असं होऊन जातं.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरा, तो संवाद असा होता.

फक्त संस्कृत भाषेतील लिखाणावरून शोधनिबंध सादर करण्याने ते एकसुरी होतील का ?

संपादन
साती | 9 March, 2016 - 00:55
संस्कृत विभागातल्या सेमिनारमध्ये कुठल्या भाषेतले शोधनिबंध मुख्यत्वे अपेक्षित असतात?

प्रश्न गैर लागू आहे असं त्यातून म्हणायच होतं. असो.

<<ला कथेवर घडणारे संस्करण आणि कालानुरुप निरनिराळ्या लेखकांनी कथेमध्ये केलेल्या बदलाचे कारण शोधण्याचा हा मार्ग अतिशय महत्त्वाचा वाटतो. हा मार्ग चोखाळण्याचा कुणी फारसा प्रयत्न केलेला दिसला नाही.>> अतिशय कळीचे वाक्य आणि वरील सेमिनारचे (आणि बर्‍याचशा संस्कृत 'अ‍ॅकेडेमिक्स'चे अचूक रोगनिदान Happy
मुदलात भाषा अभ्यासताना ती एका समाजाचे 'प्रॉडक्ट' आहे व समाजाच्या सर्वांगीण (सतत बदलत्या आणि प्रवाही) इतिहासाबरोबर तिचे स्वरूप, सामाजिक स्थान, त्या भाषेने इंगित केलेले सामाजिक आणि इतर सगळे अन्वयार्थ, तिचा विविध समाजघटकांनी करून घेतलेला वापर आणि तिच्या वापराने, प्रभावाने समाजावर झालेला परिणाम या व अशा अनेक गोष्टी लक्षात न घेता भाषा, त्यातील साहित्य एका प्राथमिक मर्यादेपलिकडे अभ्यासता येते असे मला वाटत नाही.
फक्त स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझमने हे विश्लेषण करता येते हेही मला मान्य नाही. भाषा, समाज, इतिहास, मिथके विश्लेषणाच्या अनेको कार्यपद्धती आहेत त्यातील ती एक आहे. कुठलीच एक कार्यपद्धती 'अंतिम' नसते. विश्लेषण का करायचे, त्याचे उद्दिष्ट काय, त्या अभ्यासाच्या समकालीन काय कार्यपद्धती- विचारपद्धती प्रभावशाली आहेत अशा आणि इतर अनेक बाबींचा या कार्यपद्धती निवडीवर प्रभाव पडतो. बरेच वेळा साकल्याने अभ्यास करायचा तर विविध कार्यपद्धती-विचारपद्धतींचे निकष एकत्रित लावून बघण्याची गरज असते.

आपल्याकडे दुर्दैवाने संस्कृत किंवा इतर कुठल्याही प्राचीन भाषेच्या अभ्यासात हे फार कमी होतं. असे अभ्यास करण्यासाठी भाषेबरोबरच इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, अशाही सामाजिक शास्त्रांमधील किमान बेसिक प्रशिक्षण गरजेचे असते पण भाषा शिकवत असताना त्याची जाणीव क्वचितच विद्यार्थ्यांना करून दिली जाते. प्राचीन इतिहास - सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक - अगदी पक्का शिकल्याशिवाय तुम्हाला त्या भाषिक अंगांचा, मजकुराचा संदर्भ कसा कळणार? खूप साधी गोष्ट आहे पण बहुतेकदा संस्कृतच्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक काळ-वेळ-प्रदेश यांच्या खाचाखोचा कळलेल्याच नसतात असं बघितलंय. पाचपाचशे वर्षांच्या आणि दूरदूरच्या कालखंडाला/प्रदेशांना सुद्धा एकत्र जोखलं जातं.... हे ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय भान अभ्यासक्रम रचनेमुळे आणि भक्कम समाजशास्त्रीय परंपरा भाषाशास्त्राला कायमच दिल्यामुळे परदेशी, पाश्चात्य विद्वानांमधे मात्र असतेच असते आणि तिथेच आपले अभ्यासक्रम आणि अनेक विद्वान कमी पडतात. आपल्याकडे संस्कृत स्कॉलर्सची कमी नाही. आंतरराष्ट्रीय ख्यातीची विद्वान मंडळी आहेत पण आता ही सम्ख्या कमीकमीच होत चालली आहे. आणि शेल्डन पोलॉक सारखी मंडळी तर खूपच विरळा आहेत.

शिवाय तुम्ही देवधरांनी सांगितलेल्या इंद्राच्या कथेबद्दल लिहिलं आहे, पण हे त्यांचे स्वतःचे ओरिजिनल संशोधन आहे असे वाटत नाहीये. वीसेक वर्षांपूर्वीच एमेला आम्हाला आमच्या शिक्षकांनी देवतांचे बदलते स्वरूप समजावताना इंद्राबद्दल हे विशद करून सांगितले होते... मूळ या विश्लेषणाचा जनक माहित नाही पण बहुदा वैदिक स्कॉलर्सची मांदियाळी बघता विदेशी असायची मोठी शक्यता आहे.

तुमचा कम्पायलेशनचा मुद्दा मान्य आहे कारण आपल्याकडील बहुतांशी विद्यार्थी त्यालाच संशोधन समजतात. स्वतंत्रपणे विचार करणे, मांडणे याचा अभावच असतो आपल्या मानसिकतेत. वर्गात तरी किती जण शिक्षकांना स्वतंत्र प्रश्न विचारतात?
इथे हीरा यांनी आपल्या पूर्वसूरींच्या विरोधात गेले तर प्रश्न विचारले जातात, कालवा होतो इ. लिहिले आहे. झाला म्हणून बिघडले कुठे? जर ससंदर्भ पक्केपणे मुद्दा मांडता आला तर घाबरायचे कशाला? आणि टीका झाली तर ठीके ना... त्यातलं ग्राह्य ते नेहेमी स्वीकारावे. त्याशिवाय स्वतःच्या युक्तीवादातले कच्चे दुवे कसे कळतील? याला घाबरणार असाल तर संशोधनाच्या मार्गावर जाण्यात अर्थ नाही. ज्येष्ठांचे युक्तीवाद खोडून काढणे म्हणजे त्यांना दुखवणे नव्हे. वैयक्तिक टीका आणि अ‍ॅकेडेमिक, मुद्द्यांवरची टीका यात फरक आहे. दुर्दैवाने आपल्याकडले सगळेच, अगदी बरेचसे ज्येष्ठ सुद्धा अ‍ॅकेडेमिक टीका वैयक्तिक पातळीवर घेतात. पण म्हणून आपण 'चातुर्याने' कम्पायलेशनला शोधनिबंध असे नाव द्यायचा खोटेपणा करणार असू तर तो अजिबातच क्षम्य नाही..

अतुल, तुमच्या इंटरेस्ट साठी Querying the Medieval: Text and History of Practices in South Asia (Eds.) Ronald Inden, Daud Ali & Jonathan Walters या पुस्तकाची Ronald Inden यांनी लिहिलेली इन्ट्रोडक्शन From Philogical to Dialogical Texts आवर्जून वाचा..

रच्याकने, हे लोक अजून स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम मधेच अडकलेत होय? पोस्ट-स्ट्रक्चरॅलिझम, फूको, डेरिडा हे सुद्धा येऊन जुनेपुराणे प्राचीन होऊन गेले की आता Uhoh

मी तरुण अननुभवी निबंधकर्त्यांची बाजू घेत नाहीय. पाचपंधरा पुस्तके वाचून झटपट निबंध कसे लिहिले जातात आणि फारसा विरोध होऊ नये या साठी कॉन्ट्रोवर्शिअल मुद्दे टाळण्याकडे कसा कल असतो हे दाखवले फक्त. डिफेन्स चांगला करता आला नाही तर निबंध नाकारला जाण्याची भीती असते. पी एच डीचे गाइड्सही झटपट पी एच डी मिळवून देण्याच्या मागे असतात आणि आपल्या हाताखाली किती जणांना पी एच डी मिळाली हा प्रतिष्ठेचा विषय असतो. एकदा पी एच डी मिळाली की अशा सेमिनार्समधून मांडले गेलेले निबंध फारशी खोली न गाठता मांडले तरी चालतात. या सेमिनारमध्ये प्रत्येकाला अर्धा तास वेळ होता. कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या मांडायच्या आणि बदल कसकसे होत गेले हे दाखवायचे इतकाच आवाका होता. भाषाशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय विवेचनास फारसा वाव नव्हता. दुसर्‍या ठिकाणच्या एका निबंधवाचनात एका तपोवृद्ध आणि आदरणीय संशोधक साहित्यिकांशी थोडीशी मतभिन्नता दाखवल्यावर समोर बसलेल्या तज्ज्ञांनी एकच गलका केला आणि तो मुद्दा टाळलेला बरा असे सुचवले. मग असा वादग्रस्त ठरू शकणारा मुद्दा टाळायचे सर्वानुमते ठरले. एव्हढेच नव्हे तर इतक्या खोल पाण्यात जाऊ नका असेही सुचवण्यात आले.
तथ्येच मांडायची,पण फारसा विरोध होणार नाही अशी; हा एक शॉर्ट्कट आहे. तरुण अननुभवी निबंधकर्त्यासाठी ते चतुरपणाचे आणि शहाणपणाचे ठरते.

अर्धा तास म्हणजे लय वेळ होता की. अगदी मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सेमिनार्समधेही २० मि. च्या वरती वेळ नसतो सहसा. विवेचनासाठी रग्गड असतो तो वेळ कारण ते विवेचन सुरुवातीच्या तपशीलांबरोबरच यायला लागतं..

बाकी ज्येष्ठ विद्वानांबद्दल आणि पाडलेल्या पीयचड्यांबद्दल म्या पामर काय बोलू? पण सेमिनारमधे शोधनिबंध नाकारला वगैरे जात नसतो, तो थिसिस नव्हे. जर गलका झाला आणि मी पेपर वाचत असते तर मी नम्रपणे एवढेच म्हणले असते की मी तो मुद्दा टाळणार नाही कारण माझ्या पेपरचा तो एक भाग आहे. त्यावर मुद्देसूद वाद घालायला मी कितीही तयार आहे.

आपण संशोधनात स्वतंत्र वाट चोखाळायची का अशा लोकांची री ओढायची आणि सोयिस्कररीत्या त्यांच्या सिस्टीमचा भाग व्हायचं हा सर्वस्वी वैयक्तिक चॉईस आहे, पण खरंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं काही करायचं असेल, स्वतःची बौद्धिक भूक भागवायची असेल तर पहिल्या मार्गाला पर्याय नाही.

आपण संशोधनात स्वतंत्र वाट चोखाळायची का अशा लोकांची री ओढायची आणि सोयिस्कररीत्या त्यांच्या सिस्टीमचा भाग व्हायचं हा सर्वस्वी वैयक्तिक चॉईस आहे, पण खरंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं काही करायचं असेल, स्वतःची बौद्धिक भूक भागवायची असेल तर पहिल्या मार्गाला पर्याय नाही.

हा मास्टरस्ट्रोक आहे वरदा. तुमच्या प्रतिसादामुळे धागा श्रीमंत होत असतो असे मला नेहेमी वाटते. खुप खुप आभार.

हीरा, प्रतिसादाबद्दल आभार.

Pages