शब्दपुष्पांजली - विषय पहिला: कुणा एकाची भ्रमणगाथा/ यशोदा

Submitted by जिज्ञासा on 26 February, 2016 - 23:56

गोनीदांची पुस्तके वाचणे हा नेहमीच आनंददायी अनुभव असतो. अफाट शब्दकळा, चित्रदर्शी भाषा आणि पुनःपुन्हा वाचले तरी काहीतरी नवीन सापडेल अशी साहित्यिक समृद्धी. ह्या साऱ्याबरोबर गोनीदांच्या लेखनाचं खास वैशिष्ठ्य म्हणजे त्यातील अनुभवांचा अस्सलपणा. आता शाळा कॉलेजचं तोंडही न पाहता आयुष्याच्या शाळेत धडे गिरवलेल्या व्यक्तीच्या लेखनात हा अस्सलपणा न येता तरच नवल.

शाळेत असताना माचीवरला बुधा, पवनेकाठचा धोंडी, शितू, जैत रे जैत, दास डोंगरी राहतो, पडघवली ह्या कादंबऱ्यांमधून गोनीदांच्या लेखनाचा परिचय झाला होता. पण ह्या सर्व कादंबऱ्यांच्या बाजापेक्षा निराळ्या बाजाचे गोनीदांचे पुस्तक एके दिवशी माझ्या हाती लागले - कुणा एकाची भ्रमणगाथा. ह्या पुस्तकाची मी पहिल्यांदा वाचलेली प्रत होती माझ्या आईची - तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांत सेकंडहँड विकत घेतलेली. त्या बांधणी खिळखिळी झालेल्या पुस्तकाने मला आजवर बांधून ठेवले आहे! अर्थात माझ्या आवडत्या दहात याचा समावेश आहेच.

कुणा एकाची भ्रमणगाथा मराठीतले एक अभिजात पुस्तक आहे. वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडून पळालेल्या कुणा एकाची, जो जगाच्या रगाड्यात धक्के खात, बरे वाईट अनुभव घेत आता नर्मदा परिक्रमेला निघाला आहे - त्याची कहाणी. त्याच्या परिक्रमेत त्याला भेटणाऱ्या माणसांची कहाणी. त्या कुणा एकाशी जुळणारी स्वतः गोनीदांच्या आयुष्याची गोष्ट आहे हे मला फार उशिरा कळलं.

ह्या पुस्तकाची जादू अशी की पुस्तक वाचताना आपण केवळ वाचक रहात नाही तर त्या कुणा एकाचे सोबती बनून जातो. कारण ह्या पुस्तकाची मांडणी फार मजेदार आणि हटके आहे - स्वतःशीच बोलल्यासारखी. निवेदनात्मक शैली वापरणं काही नवीन नाही पण हे प्रथमपुरुषी असलं तरी हे खरंतर निवेदन नाही. हा कुणी एक जणू स्वतःशीच बोलतो आहे. कुणी ऐकायला आहे/नाही ह्याची फिकीर न करता. बरेचदा ते स्वगत आहे आणि कधी कधी स्वसंवाद.

गोनीदांच्या चित्रदर्शी वर्णनशैलीमुळे वाचता वाचता तुम्ही त्या प्रसंगी तिथे जाऊन पोहोचता. मग नर्मदेवर येऊन पुर्र पुर्र करीत पाणी पिणारं सरस्वतीचं वाहन आपणही तिथेच वाळवंटात झोपून हातभर अंतरावरून धडधडत्या हृदयाने पाहू लागतो. नाशिकला ब्राह्मणांच्या पंगतीच्या पंगती ताटभर सुग्रास अन्न जेवून उठत असताना भुकेल्या पोटी बाहेर फेकल्या जाणाऱ्या अन्नाकडे आणि पत्रावळीच्या ढिगाकडे आपणही त्याच नजरेने पाहू लागतो - इतके अगतिक, असहाय्य आणि पोटात आगीचा डोंब उठल्यासारखे वाटायला लागणे - केवळ कागदावरच्या ओळी वाचून - ही केवळ उत्तम साहित्याची अनुभूती!

निसर्गाचे वर्णन तर गोनीदांचा हातखंडा. मात्र कुणा एकाची मध्ये निसर्ग मधून मधूनच डोकावतो. वैशाखाचा फुफाटा आणि सतत सोबतीला असणारी रेवामैया ह्यांच्या वर्णनांतून. एरवी कुणा एकाला भेटणाऱ्या मनुष्याप्राण्याशी आपली गाठ अधिक पडते. माणसांच्या ना ना तऱ्हा - मनुष्य स्वभावाचे अजब नमुने -भली, बुरी, रागीट, प्रेमळ, स्वार्थी, उदार हरप्रकारची माणसं - जणू छोटं विश्वरूपदर्शनच. ह्या बरोबरीने बोली भाषांचे विविध नमुने, विशेषतः नर्मदेकाठची बोली हिंदी ("कूणं गांव? परिकम्मावासी हो?" )कादंबरीचा काळ साधारणतः १९४०-५० चं दशक असावा. त्या काळाचं समर्थ चित्रण पुस्तकात आहे - त्या काळची मुंबई, त्या काळचं नाशिक, नर्मदातीरावरची वस्ती, साधुजनांच्या मठ्या. ह्या पुस्तकाचा पसारा अफाट आहे म्हणूनच आजवर अनेक पारायणं करूनसुद्धा हे पुस्तक दरवेळी मला नवीन काहीतरी शिकवतं.

गोनीदांनी हे पुस्तक वेदनेला अर्पण केले आहे - ती युगा अठ्ठावीसांची वेदना. पहिल्या एका पानावर गोनीदांनी लिहिले आहे – “कुंतीने देवाकडे विपत्ती मागितली. देव म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानाने विश्व भावसमृध्द झालं आहे.” कुणा एकाची मध्ये अर्पणपत्रिकेतल्या वेदनेची असंख्य रूपं आहेत. पहिल्यांदा वाचताना काही प्रसंग तर अक्षरशः अंगावर आले होते. आयुष्याच्या विदृपतेचं अत्यंत poignant (मराठी शब्द?) दर्शन ह्या पुस्तकातून घडतं. ह्या वेदनेने, दुःखाने भरलेल्या आयुष्याचा अर्थ तरी काय ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणारे अनेक उतारे आहेत - त्या कुणा एकाची स्वगतं. पुस्तकांत मानवी वेदनांचं गहिरं दर्शन असलं तरी पुस्तकाचा सूर उदास नाही. एरवी परदुःख शीतल भासत असले तरी ह्या वाटेवरचे सहप्रवासी म्हणून आपण वेदनेची सहानुभूती घेतो तेव्हा आपल्याला वेदनेपेक्षा वात्सल्याची, करुणेची अधिक जाणीव होते. हे पुस्तक वाचल्यावर आपण अधिक चांगले माणूस होतो असे मला वाटते!

कुणा एकाची मधल्या एका व्यक्तिरेखेविषयी लिहायचे झाले तर मी यशोदेबद्दल लिहीन. यशोदा फार कमी बोलते. पण तरीही तिची कहाणी आपल्यापर्यंत पोहोचतेच. कारण दुर्दैवी आहे. स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी असं म्हटलं की जी दुःखं, ज्या वेदना एका स्त्रीच्या आयुष्यात आल्या असतील असे आपल्या मनात येते त्या यशोदेच्या कहाणीत हजर आहेत. बालवयात विवाह आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर अकाली वैधव्यामुळे माहेरी परत येणं - त्या काळच्या अनेक मुलींच्या नशिबी ही कहाणी लिहिली जायची त्यातलीच एक यशोदा. पण तरीही तिच्या दर्शनाने मला ती कधीच अबला वाटत नाही. दैवाचं दान अनुकूल नसताना देखील आयुष्याचा डाव खेळत रहायला एक धैर्य लागतं. ते यशोदेकडे आहे. यशोदा तिचा डाव मजबुरीतून खेळत नाहीये. ती मोठ्या निश्चयाने मिळालेलं दान स्विकारून आपलं आयुष्य जगत्येय. तिच्या परिघात शक्य असतील तितके choices घेण्याचं स्वातंत्र्य तिने अबाधित राखलंय. म्हणूनच एका अनोळखी, तरुण, तापाने फणफणलेल्या परिक्रमावासीला, त्या कुणा एकाला, तिचे बब्बाजी परगावी निघालेले असताना घरात ठेवून घेण्याचा, त्याची सुश्रुषा करण्याचा निश्चय ती बोलून दाखवते आणि निभावतेही. लोक काय म्हणतील ह्यापेक्षा यशोदेला आपल्या मनाची ग्वाही अधिक महत्वाची वाटते. हे सोपे नाही.

ह्या परीक्रमेतले यशोदेसोबत घालवलेले दिवस हे कोण्या एकाच्या आणि यशोदेच्याही आयुष्यातील मोलाचे दिवस आहेत. हे दोन अभागी जीव - ज्यांना लहान वयात अपार दुःख, वेदना सोसाव्या लागल्या (ज्याने दोघांना अकाली प्रौढत्व आले आहे) - ज्यांना आयुष्याने स्नेहापासून वंचित ठेवलं ते अक्षरशः 'यथा काष्ठं च काष्ठं च' अशाप्रकारे एकमेकांसमोर येतात. त्या दिवसांत त्यांच्यात जे स्नेहबंध निर्माण होतात ते मानवी नात्यांमध्ये क्वचित पहायला मिळतात. म्हणूनच कदाचित ही नाती नेहमी अनाम राहिली आहेत. '

यशोदा ज्ञानी आहे, व्यवहारचतुर आहे पण तरीही तिच्यात एक निरागस भोळेपणा दडलेला आहे. कारण तिने अजून हे जग पाहिलेलेच नाही. तिच्या मर्यादांनी आखून दिलेल्या वर्तुळातच तिचे आजवरचे आयुष्य गेले आहे. ह्याउलट तो कुणी एक - पायाला चक्र असल्यासारखा, आयुष्याची कोणतीही चौकट नसलेला, जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक लबाड्या, दुष्कृत्ये पाहिलेला. यशोदेशी कधी कोणी कामाशिवाय फारसे बोलत नसावे. त्यामुळे ती अबोल, अंतर्मुख झाली आहे. आणि त्या कुणाला तर आपुलकीची, विचारपुशीची सवयच नाही. मात्र यशोदेसारखा श्रोता लाभताच तो तिच्यापाशी आपले मन मोकळे करू लागतो. तिलाही उत्सुकता आहे बाहेरच्या जगात डोकावण्याची. त्याच्या वाणीत तिलाही बोलतं करण्याचं सामर्थ्य आहे. त्यांच्यात संवाद सुरु होतो. तिच्याशी कोणी बोलणारं नाही आणि त्याला कोणी पुसणारं नाही. नियतीने एक सुंदर अवकाश या दोन जीवांना मिळवून दिला आहे. त्यांच्या ह्या संवादाचे मूक साक्षीदार म्हणजे आपण!

यशोदा उत्तम गृहिणी आहे. आभाळाएवढे दुःख पदरी पडूनही ती कडवट, उदासीन झालेली नाही. उलट बब्बाजींच्या पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांवर तिची निरपेक्ष माया आहे, प्रेमळ धाक आहे - त्यांची ती आईप्रमाणे काळजी घेते आहे. तिच्या ह्या गुणांची, प्रेमाची, औदार्याची जाणीव त्या कुणा एकाला होते. त्याला हेही जाणवतं की यशोदेला किती गृहीत धरलं जातं. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत समाजातलं स्त्रियांचं दुय्यम स्थान आणि त्यापायी त्यांच्या वाट्याला येणारी दुखः हा विषय चिरंतन आहे. त्या दुःखाची जातकुळी ओळखणाऱ्या आणि त्याची जाण असलेल्या लेखकांमध्ये गोनीदांचे नाव अग्रभागी येईल. कदाचित म्हणूनच कुणा एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक त्यांनी तिला अर्पण केले आहे - ती- युगा अठ्ठाविसांची वेदना.

असं शक्यच नाही की यशोदेला एका भटक्याला घरात ठेवून घेण्याचे परिणाम माहिती नव्हते. पण कदाचित त्या दोघांना याची कल्पना नसते की या काही दिवसांत त्यांच्यात स्नेहाचे बंध निर्माण होतील. दोघांना त्यांच्या मर्यादांची जाणीव आहे. तिला तिच्या जागेहून हलता येणार नाही. तिला वाटतं ह्याने बब्बाजींच्या पाठशाळेचा भार स्वीकारावा त्या निमित्ताने इथेच रहावं. पण तो भटका आहे - एका जागी स्थिरावणं त्याच्या प्रकृतीत नाही. शिवाय परिक्रमा? ती अर्धवट सोडता येणार नाही. त्याला निघावंच लागेल. त्याच्या मनात येतं एकदा तिला विचारावं, माझ्या बरोबर चल. तू नाव देशील ते नातं मला मान्य आहे. पण तो बोलू शकत नाही. जसं त्याला स्थिरावणं अशक्य तसं तिला बंडखोरी करून चौकटीबाहेर पडणं अशक्य. जेव्हा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येते तेव्हा ती त्याला साफ सांगते - "भैय्या तुम्ही परिक्रमेला निघा!" तिचा विश्वास आहे स्वतःवर, स्वतःच्या निर्णयांवर. त्याक्षणी आपल्याला यशोदेच्या आत्मबलाची जाणीव होते. आणि तो कुणी एक पुनःश्च परीक्रमेसाठी बाहेर पडतो. ह्या बिंदूवर येऊन कादंबरी संपते. पण केवळ कागदावर संपते. आपल्या मनात तर ती चालूच रहाते - आयुष्यभर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व नवीन प्रतिसादांसाठी खूप आभार!
अशोक मामा, भेदक नाही म्हणायचं मला. poignant = evoking a keen sense of sadness or regret. अशा अर्थाचा काहीतरी शब्द हवा आहे.
सई, खरंय! फार ताकदीच्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत गोनीदांच्या कादंबऱ्यांच्या. यशोदेविषयी लिहिणं म्हणजे धाडसच केलं मी! इतक्या कमालीच्या प्रतिभेने आणि संयततेने रेखाटली आहे तिला गोनीदांनी की कितीही लिहिलं तरी न्याय दिला असं वाटणार नाही.

वा ! मला आवडलं. परत एकदा यशोदेच्या भावविश्वात ( काही क्षण का होईना ) ह्या परिचयामुळे जाता आल. जिज्ञासा - मस्त लिहितेस तू.

कोणा एकाची भ्रमणगाथा मी श्राव्य स्वरूपात ऐकलं होतं.
ते इतकं आवडलं - त्यांची लिखाणाची शैली, अत्यंत चपखल सुंदर उपमा, भाषा, मांडणी, व्यक्तिरेखा, तरलता.. त्यामुळे त्यांची अजून दोन पुस्तक वाचायला घेतलीत.. दास डोंगरी राहतो आणि स्मरणगाथा.
स्मरणगाथा वाचत असताना अजून काही संदर्भ शोधण्यासाठी शोध घेतला केल तेव्हा ह्या लेखापाशी आले.

जिज्ञासा तुम्ही खूप छान परीक्षण (?)/ विवेचन केलयत / विस्तृत परिचय करून दिलायत .. कितीतरी ठिकाणी अगदी अगदी होऊन जातं. निसर्ग, नर्मदामैया, अंगावर येणारा पंगतीचा प्रसंग, आणि सर्वात उत्कृष्ट रीतीने उलगडत जाणारा यशोदा आणि त्याच्यातील संयमी स्नेहबंध.
मला अजून एक सशक्त वाटलेला / लक्षात राहिलेला भाग म्हणजे मठाधिपतींचा ..

हा परिचय वाचल्यावर तर अजून एकदा भ्रमण गाथा वाचायचे (ऐकायचे) ठरविले आहे.
Happy

सर्वात आधी छन्दिफन्दि ह्यांचे आभार, हा धागा वर काढल्याबद्दल.
"कुणा एकाची भ्रमणगाथा" ह्या पुस्तकाचे परीक्षण / विवेचन / विस्तृत परिचय जे काय आहे ते खूप आवडले. ही कादंबरी शाळेत शिकत असताना वाचलेली. त्या आठवणींना उजाळा मिळाला. अगदी त्याच वेळी शरच्चंद्र लिखित "श्रीकांत"ही वाचली होती. दोन्ही कथांत बरचसे साम्य आहे असे वाटले. यशोदा आणि राजलक्ष्मी ह्या व्यक्तिरेखांमध्येही साम्य आहे. चूक भूल होत असेल तर माफ करा.
नंतर जेव्हा इंग्रजी साहित्य वाचायला सुरवात केली तेव्हा गोनीदा, वि स खांडेकर आणि तत्सम लेखकांचे गारुड मनातून उतरले. खरतर आमच्या मित्र मंडळींच्या कट्ट्यावर ह्या लेखकांची यथेच्छ टिंगल टवाळी पण चालायची.
शब्द महत्वाचे की आशय महत्वाचा? हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे.
भनसालीचे सिनेमे आणि हे लेखक दोनीही एकाच पठडीतले. हे माझे वैयक्तिक मत. इथे कुणाला पटणार नाही ह्याची जाणीव आहे. तारिही लिहिले आहे.

शब्द महत्वाचे की आशय महत्वाचा? हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. शब्द हे केवळ साधन आहे साध्य नाही. जसे कपडेपट भव्य सेट्स म्हणजे सिनेमा नाही. मी काय म्हणतो आहे हे समजाऊन घ्यायचे असेल तर इंग्रजीत अर्नेस्ट हेमिंग्वे किंवा मराठीत श्री म माटे वि द घाटे रत्नाकर मतकरी पेंडसे तेंडूलकर ह्यांचे लिखाण वाचा आणि मग गोनीदा किंवा वि स खांडेकर ह्यांच्याशी तुलना करा.
शेवटी जैसे जिसकी सोच!

शब्दांच्या विटा रचायचे. टिवी, फोटो असलेली पुस्तकं फार नव्हती तेव्हा चालून गेले लेखन.
गोनिदांचं एक पुस्तक होतं माझ्याकडे. दक्षिणवारा. दहापंधरा काळी पांढरी चित्रे होती त्यात. पर्यटन पुस्तकं ललित अंगाने लिहिलेली ठीक, किंवा कसे जावे माहिती सांगणारी उत्तम. पण दोन्ही नसेल तर वायाच.

२०२२ नंतर यूट्यूबवर आलेले विडिओ नेमकं काम करू लागले.

केशवकूल,
शब्द हे केवळ साधन आहे साध्य नाही.
याला अनुमोदन.
पण गो नी दांडेकर आणि संजय लीला भन्साळी??
आशय सकस नसेल तर शब्दांचे मनोरे उभारून चांगली कलाकृती निर्माण करता येत नाही. आशय सकस असेल आणि तो योग्य शब्दांत मांडता आला नाही, तरी दर्जेदार कलाकृती निर्माण होत नाही. त्यामुळे माझ्या मते दोन्ही महत्त्वाचं.
गो. नी. दांडेकरांच्या पुस्तकांमधल्या आशयाबद्दल प्रश्नच नाही, पण शब्दही किती नेमके, चित्रदर्शी असायचे त्यांचे. ते त्या आशयासाठी नुसते समर्पक नव्हते, तर आशयाचा सशक्तपणा वाढवणारे होते. पोकळ आशयाभोवती शब्दांचा नुसता फुलोरा नव्हता आणि दुःखाला चकचकीत वेष्टणात सादर करण्याचा चलाखपणा नव्हता.
संजय लीला भन्साळी??

srd, गो नी दांडेकर टूरिस्ट गाईड लिहीत नव्हते Happy
पुलंनी 'अपूर्वाई' च्या पुढच्या कुठल्या तरी आवृत्तीच्या प्रस्तावनेत लिहिलंय की एका वाचकाचं त्यांना पत्र आलं की तुम्ही इंग्लंडला जाऊन आल्यावर मधल्या काळात आता तिकडे बरेच बदल झाले आहेत, त्यामुळे तुम्ही अद्ययावत माहितीची भर घातली तर हे पुस्तक अधिक उपयुक्त होईल, वगैरे. त्यावर पुलंनी म्हटलंय की प्रवासवर्णन आणि टूरिस्ट गाईड, यात माझ्या या वाचकाची गल्लत झाली आहे Happy

जिज्ञासा, लेखावर प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता बहुतेक. सुंदर झालाय लेख. मला गोनीदांबद्दल या गोष्टीचं विशेष वाटतं की जगाची कुरूपता इतक्या लहान वयात इतक्या जवळून पाहूनही त्यांचं अंतःकरण इतकं कोमल राहू शकलं.

वावे आभार
कुठे मिळाली तर "श्रीकांत" अवश्य वाचा. गोनीदा सेंटीमेंटल लिहित होते. सेंटीमेंटल वाचणे माला जमत नाही. इलाज नाही.
लिहिण्याच्या स्टाइल बद्दल बोलायचे तर बायबल हे माझे गाइडबुक आहे. कधी वेळ मिळाला तर जरूर वाचा.
“Use short sentences. Use short
first paragraphs. Use vigorous English. Be positive, not negative” (qtd. in
Fenton 31). Other guidelines included the recommendation that slang is effective only if it’s new and a caution against using adjectives.

'

'श्रीकांत' वाचलेली नाही. मिळाली तर वाचून पाहीन.

आपल्याला कुठल्या शैलीतलं लेखन आवडावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे.
'चांगलं लेखन' याला शैलीच्या दृष्टीने एकच एक फॉर्म्युला नाही आणि नसावा असं माझं मत आहे. In fact, अशा कुठल्या फॉर्म्युल्यात लिहिण्याचा फार अट्टाहास केला तर ती त्या त्या महान लेखकाच्या शैलीची केवळ नक्कल होते!

श्री. ना. पेंडसे छोट्या छोट्या वाक्यांमधे लिहायचे, फार लांबलचक वर्णनं करायचे नाहीत. पण भैरप्पा सविस्तर वर्णन करतात. दोघेही उत्कृष्ट कादंबरीकार म्हणून ओळखले जातात.
कुसुमाग्रजांची शैली वेगळी, बोरकरांची वेगळी, मर्ढेकरांची वेगळी, विंदांची वेगळी. पण हे सगळे उत्कृष्ट कवी होते.
तुम्हाला गो. नी. दांडेकरांची शैली आवडत नसेल तर ठीक आहे. पण म्हणून त्यांना संजय लीला भन्साळीच्या बरोबरीने बसवणं खटकलं म्हणून लिहिलं.

Pages