हिमालयाच्या दुर्गम पर्वतरांगामध्ये पाकिस्तान, भारत आणि चीन यांच्या मधोमध वसलेला आहे डाँगरिला आणि त्याचा हुकुमशहा आहे जनरल डाँग, जो 'कभी राँग नही होता'.. (म्हणून असे शीर्षक!) अमरीश पुरीला असले विचित्र दिसणारे व्हिलन साकारायची जबरी हौस असावी. मोगॅम्बो असताना तो सोनेरी विग घातला होता, इथे बाकी बरंचसं टक्कल ठेवून मागे शेंडीची लांबलचक वेणी घातली आहे. गायीम्हशी चरताना जशा माशा वारायला शेपटी उडवत असतात अगदी तशाच पद्धतीने डाँग आपली वेणी हाताने उडवताना दाखवलाय. आपण कधीच चुकीचं वागत नाही, हे माणसाने स्वतःच ठरवून टाकलं की तो जसा वागेल तसाच वागणारा हा डाँगआहे. डाँगरिला दुर्गम भागात वसल्याने तिथे व्यापारउदीम, शेतीबिती काहीच होत नसावं, त्यामुळे डाँगरिला देशाच्या उत्पन्नाचा स्रोत काळे/वाईट धंदे हा असणार हे ओघानेच आलं.
सुरुवातीला डाँगचं क्रूरकर्मा असणं एस्टॅब्लिश करणारा एक तपशीलवार प्रसंग होतो. डाँगला भेटायला त्याच्या सैन्यातला कॅप्टन वगैरे दर्जाचा एक घाबरलेला माणूस धापा टाकत येताना दिसतो. मग डाँग कसा वेळेचा पक्का आहे हे दाखवणारा एक संवाद एका दुय्यम व्हिलनच्या तोंडी.. काय तर म्हणे, बरं आहे तू उनसठ सेकंद लेट आहेस. एक मिनिट झालं असतं तर तुला गोळी मारण्याचे आदेश होते. यावर तो माणूस उगीचच सुटकेचा नि:श्वास टाकतो. अजून सिनेमाची जेमतेम सुरुवात असल्याने तो तसाही थोड्या वेळाने मरणारच आहे, हे अनिअ सिनेमांचा खोलवर अभ्यास केलेल्या लोकांना लगेच समजू शकतं. असो. तो आत जातो तर डाँगने जेवणाची सगळी जय्यत तयारी केलेली असते. अगदी कर्त्या गृहिणीसारखा तो टेबलाभोवती हिंडून हे आणलं का, ते ठेवलं का वगैरे पाहत असतो. मग एकदम संतापून तिथे उभ्या अटेंडंटला थोबाडीत देऊन 'इमरती कहां है, इमरती लाओ' वगैरे सांगतो. एकीकडे आलेल्या माणसाबरोबर हसून बोलणे चालू! बोलण्याचा विषय - त्या माणसाच्या नेतृत्त्वाखाली भारतात कारस्थान करायला पाठवलेली डाँगच्या सैन्याची तुकडी कारस्थान फेल होऊन गारद होणे आणि हा एकटाच वाचणे! त्यामुळे आपण त्या दीर्घ शॉटमध्ये केवळ 'हा याला केव्हा आणि कसा टपकवणार?' याची वाट पाहतो. सगळे पदार्थ एकदाचे टेबलावर आल्यावर त्या माणसाला जबरदस्तीने जेवायला बसवून डाँग आपण ज्याची वाट पाहत असतो त्या विषयाला हात घालणारे वाक्य टाकतो, "ठहरो! ये खाना तुम्हारे लिये नही है... ये खाना ब्राह्मणोंके लिये है.. आज तुम्हारा श्राद्ध है ना!" एवढं बोलून प्रचंड धार्मिक असलेला डाँग 'शोम शोम शोम शामो शाशा..' असं मंत्रपठण करू लागतो. दुसर्या माणसाने पूर्ण प्रसंगात प्रचंड घाबरल्याचे युनिफॉर्म एक्स्प्रेशन (युनिफॉर्म घालून) देऊन अभिनयाची पराकाष्ठा केली आहे. दुसर्या दिवशी असलेल्या डाँगरिला अॅन्युअल डे परेडमध्ये हा माणूस सर्वांसमक्ष गोळी झाडून घेऊन आत्महत्या करेल, असं डाँगचा उजवा हात टॉम आल्टरने जाहीर केल्यावर तो प्रसंग एकदाचा संपतो.
दुसर्या दिवशी परेडच्या वेळी तो माणूस पटांगणाच्या मध्यभागी आणि डाँग लांबवरच्या स्टेजवरून पाहत असताना दोनेक हृदयद्रावक वाक्ये बोलून स्वतःवर गोळी झाडून मरतो. त्यावेळेस त्याचा क्लोजप शॉट असल्याने त्याच्या चेहर्यावरचे भाव आपल्याबरोबरच डाँगलासुद्धा इतक्या दुरून दिसतात. कारण नंतर तो त्याच्या बायकोजवळ येऊन "मरताना तुझा नवरा डाँगच्या बहादूर शिपायासारखा मेला नाही. त्याच्या चेहर्यावर माझ्याविषयी नफरत होती.." असा डायलॉग टाकतो. (मानवी भावभावनांच्या सूक्ष्म पदरांची सखोल जाण असलेला खलनायक!) खरंतर त्या माणसाने आदल्या दिवशीचा युनिफॉर्म आणि एक्स्प्रेशन दोन्ही तसेच ठेवले आहेत, हे आपल्याला जाणवेल. पण 'डाँग कभी राँग नही होता..', हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
आता भारतातून हिरोंचं डाँगला मारायला आगमन व्हायचं असेल तर डाँगने भारताची सॉलिड कुरापत काढायला हवी. त्यामुळे या माणसाच्या मृत्यूला भारतीय लष्करप्रमुखच जबाबदार असल्याचं डाँग ठरवून टाकतो. (कसं?.. ते नाही विचारायचं. डाँकराँनहो..) त्यामुळे आता त्याला मारणं आलं. तो माणूस डाँगच्या हल्ल्याच्यावेळी कमीत कमी लोकांबरोबर असल्यास डाँगची दहशत आणि एकूणच कामगिरीतलं थ्रिल उणावेल म्हणून डाँग त्याला सविस्तर पत्र लिहून त्याला २६ जानेवारीच्या परेडमध्येच उडवणार असल्याची वार्ता कळवतो. सिनेमा अजूनही सुरुवातीच्याच स्टेजमध्ये असल्याने आणि कथानकाची गरज म्हणून डाँग यशस्वी होणार, याची प्रेक्षकाला खात्री असते. पुन्हा याही दृश्यात आपण केवळ 'केव्हा आणि कसं?' याचीच वाट पाहू लागतो. तर थोडंफार नावीन्य म्हणून यात डाँगने आसपास पेरलेले त्याचे तोतये दाखवून किंचित मनोरंजन केलं आहे. पोलिस प्रत्येक तोतयाला पकडत बसले असताना खरा डाँग मात्र परेडमधल्या एका टँकमधून कामगिरी पार पाडतो. नंतर तिथे इतके लोक आणि फौज आणि पोलिस असताना निसटूनही जातो.
आता सिनेमात मुकेश खन्नाची एंट्री होते. तो अकरा महिने अमेरिकेत राहून नुकताच परतला आहे आणि आता त्याला डाँगला मारायची मोहीम हाती घ्यायची आहे. अमेरिकेत अकरा महिने काय करत होता, अकराच महिने का?, वगैरेंचा उलगडा जरा नंतर होतो. त्याला कुठल्याही प्रसंगी स्वरचित शेर आणि ओव्हरअॅक्टिंगचं कॉम्बो वापरायची सवय. आल्या आल्या एक सहकारी त्याला 'सर आप ११ महिने अमेरिका मे रहकर नही बदले..' असं कॉम्प्लिमेंट देतो तर त्यावर तो काहीतरी -
'११ महिनों मे बदल जाये हम वो चीज नही..
अरे हम मर्द है, कोई कमीज नही..' असला शेर-कम-जवाब देतो. याच्या शेरांची पातळी पाहता डाँगला केवळ शेर ऐकवून हा गारद करू शकला असता. पण दुर्दैवाने तो फायनल हाणामारीच्या आधीच मरतो. (डाँग आणि तो समोरासमोर आलेल्या प्रसंगातसुद्धा त्याने डाँगला 'दानवीर कर्ण की नाजायज औलाद' अशी तपशीलवार शिवी दिली आहे. ती शिवी ऐकूनच बहुधा डाँगने शेवटच्या मारामारीआधीच त्याला मारायचं नक्की केलं असावं.)
त्याचा वरिष्ठ अधिकारी असलेल्या शम्मी कपूरच्या मनात याने डाँगला मारायच्या कामगिरीवर जाऊ नये, असं आहे. हे मतभेद ठळकपणे दाखवायला ते एकमेकांकडे अजिबात न पाहता, प्रसंगी एकमेकांकडे पाठ करून बोलतात. दोघांनी ओव्हरअॅक्टिंगची परिसीमा केली आहे. कदाचित 'जो जास्त ओव्हरअॅक्टिंग करेल तो जिंकला आणि त्याच्याच मनासारखं होणार' असं ठरलं असावं. मुकेश खन्ना नुकताच 'महाभारत' आटोपून या सिनेमात आला असल्याने तो जिंकतो. (तो महाभारत आटोपून आल्याचा संदर्भ चक्क सिनेमात एका संवादातही आहे.) मग तो शम्मी कपूरकडे पाठ करून एक कागद त्याच्या हातात देतो. एकंदरीत आविर्भावावरून मला वाटलं 'इस्तिफा'.. पण तो डाँगला मारायचा प्लॅन निघाला. तर त्या प्लॅननुसार तो सैन्यातील काही विभागांतल्या सर्व मिळून चार जॉंबाज कॅप्टन लोकांना या कामगिरीसाठी निवडतो. त्यापैकी एक कायम 'खडॅक!' असं म्हणणारी एकता... उरलेले तीन नसिरुद्दीन शाह, आदित्य पांचोली आणि जावेद जाफरी. सैन्यातली नोकरी ही खूप तणावपूर्ण असल्याने ते फावल्या वेळात रिलॅक्स व्हायला स्विमिंग पुलात पोहणार्या लेडीज स्पेशल बॅचच्या मुलींना पाहणे, आचरट डायलॉग मारणे, मग स्वत:ही मुलींचे कपडे घालून, भयंकर मेकप करून पाण्यात उतरणे, वगैरे गोष्टी करत असतात. त्यापैकी नासिर हा कलाकार.. तो एका टोपी घातलेल्या मुलीचं निरंतर चित्र काढत असतो.. ('जरा तसवीर से तू, निकल के सामने आ..' हे गाणं त्यालासुद्धा म्हणता आलं असतं.) मग कामगिरीला निघायचं ठरल्यावर डॉंगरिलाला पोचायचं कसं याची चर्चा होते. मग मुकेश खन्ना म्हणतो की त्यांना सुरक्षित जायला एकच रस्ता आहे पण तो दुर्गम आहे आणि तिथे काही भागात सूर्याचा प्रकाशसुद्धा पोचत नाही, पण एक माणूस पोचतो. तो म्हणजे धर्मेंद्र.. (कवी नोहे!) धर्मेंद्र हा गैरसमजामुळे सैन्यातून काढून टाकलेला असल्याने त्याच्या मनात जरा नाराजी असते, पण तो या लोकांना मदत करायला तयार होतो. आता सूर्याची किरणेसुद्धा न पोचणारा प्रदेश दाखवायचा असल्याने सर्व शूटिंग बंद स्टुडिओत केलेलं आहे. तर त्या थर्माकोलच्या बर्फातून कष्टाने वाट काढताना एकताबाई खड्ड्यात पडतात, ज्यात बर्फगार पाणी, पाणवनस्पती आणि पाणसाप असं सगळं यथासांग असतं. यातून त्यांना आदित्य पांचोलीने वाचवल्यावर ते लगेच हातात हात घालून गाणं गातात, त्यामुळे त्याला यथासाँगसुद्धा म्हणता येईल. असो.
पुढे वाटेत ते धबधब्यातून उभाच्या उभा कडा चढत असताना वरून डाँगचे लोक हल्ला करतात, तेव्हा मुकेश खन्ना आपला खोटा पाय काढून मधमाशांच्या पोळ्यावर फेकतो आणि मधमाशा केवळ व्हिलन लोकांना चावून पळवून लावतात. मुकेश खन्ना अमेरिकेत कशासाठी गेला होता, ते या प्रसंगात आपल्याला कळतं.
सुमारे अकरा महिन्यांपूर्वीचा फ्लॅशबॅक -
मुकेश खन्ना त्याच्या मुलीला घेऊन यॉटवरून ट्रिपला गेलेला असताना एका बेटाच्या किनार्यावर त्यांना एक बाई मरून पडलेली दिसते. मग तो आणखी शोध घ्यायला आतल्या भागात जातो तर तिथे डाँगने पकडून आणलेल्या मुली, स्वतः डाँग आणि त्याची माणसं दिसतात. अमुक इतक्या मुली सुसाईड बॉम्बर, अमुकांची किडनी, डोळे विका अशी वाटणी डाँग करत असताना मध्येच एका मुलीकडे बोट दाखवून 'हिला तर आमच्या हॅरममध्ये पाठवा' म्हणतो. ('एवढा मोठा व्हिलन पण बाईचा नाद अजिबात नाही हो!' असा बट्टा लागू नये, हा हेतू असेल. कारण बाकी डाँगच्या आसपास औषधालासुद्धा बायका नाहीत.) तर या सर्व मुलींना शूर मुकेश खन्ना सोडवतो. पण त्याची मुलगी डाँगचे लोक पकडून नेतात आणि तिला सोडवून न्यायला डाँग पुढच्या अॅन्युअल डेपर्यंतची म्हणजे वर्षभराची मुदत याला देतो. (हा डाँग असल्या कारवाया फक्त अॅन्युअल डेलाच करत असल्याने त्याची दहशत काहीशी फिकी वाटते, असं मी इथे नमूद करू इच्छिते. खतरनाक व्हिलनने कसं अष्टौप्रहर काम करायला हवं. 'फरिश्ते'मधल्या राजा जयचंदकडून याने सदैव कार्यरत राहणं शिकायला हवं होतं असं वाटून गेलं. अॅन्युअल मीटिंग नसताना जयचंद हंसांच्या रथात बसून शहरात फिरून लोकांवर 'कोणताही मोटिव्ह नसलेले अन्याय'(सौजन्य - फारेंड) करत असतो. इथे एक तो सुरुवातीचा माणूस आणि मुकेश खन्ना सोडले तर फार कुणी मरत नाही.) मुकेश खन्नाचा एक पाय कापतात. म्हणून अकरा महिने अमेरिकेत राहून खोटा पाय बसवताना मुकेश खन्नाने सर्व काही प्लॅन केलेलं असतं.
आता त्या पायाचा मधमाशांच्या पोळ्यावर फेकून मारायला उपयोग केल्याने तो सैल होतो आणि सारखा निघायला लागतो. तिथे जखम व गँगरीन होतं आणि त्याचं ऑपरेशन करायची वेळ येते. डॉंगरिलात सगळीकडे डाँगचे लोक फिरत असताना बाकी लोक त्याला युक्तीने पूर्ण रिकाम्या हॉस्पिटलमध्ये नेतात व ऑपरेशनची तयारी करू लागतात. त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्याने हेच चारपाचजण ऑपरेशन करणार असतात. तेवढ्यात डाँगच्या सैन्याची तुकडी सिंथियाच्या (शिखा स्वरुप) नेतृत्त्वाखाली हॉस्पिटलवर हल्ला करते. मुकेश खन्नाला ऑपरेशन थिएटरमध्ये भूलबिल न देता, नुसतंच तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून झोपवून ठेवलेलं असतं. त्यामुळे हल्ला सुरू झाल्याझाल्या तो लंगडी घालत हॉस्पिटलभर फिरायला लागतो. बाकीच्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर जायला सांगून स्वतः एकटाच लढाई करतो. (फारेंडाच्या माहितीसाठी - 'क्रांती'तल्या मल्टिगन शॉटची थोडी सुधारित आवृत्ती इथे आहे. दिलीपकुमारने काठी वापरली होती, मुकेश खन्ना दोर्या वापरून तोच परिणाम साधतो.)
डाँगरिलात पोचल्यावर नासिरुद्दीन शाहला त्याने काढलेल्या चित्रांतली, टोपी घातलेली मुलगी जुले(असंच ऐकू आलं, ज्युली असं नाही.)च्या रुपात सापडली आहे. तिचा भाऊ जेलू (मग ती जुलेच असावी. त्यांच्या गरीब आईवडिलांना फार अक्षरं न परवडल्याने त्यांनी आहे त्यातच स्पेलिंगचे फेरफार करून पोरांची नावं ठेवली असतील.) डाँगच्या सैन्यात अधिकारी असल्याने तो कँटोन्मेंट परिसरात राहत असतो. त्याच्या घराची मागची बाजू एका दरीकडे असल्याने त्याच्या घराच्या मागच्या भिंतीला भगदाड पाडून बाकीच्यांनी डाँगरिला कँटोन्मेंटमध्ये शिरकाव करावा असं ठरतं. आता जुलेला एकटीला भिंत तोडायला जमणार नाही म्हणून ती आणि नासिर लग्न केल्याचे नाटक करून जुलेच्या भावाच्या घरी हनीमूनसाठी जातात. (डाँगरिलामध्ये बहुधा कुठल्याच देशाची वकिलात नसल्याने त्यांना बाहेर कुठे जायचं म्हटलं तरी व्हिसा मिळाला नसता.) मग तिथे खोलीचे दार बंद करून ड्रिलने भिंत तोडू लागतात. तो आवाज बाहेर ऐकू गेल्यावर जेलूचे नोकर विचारणा करतात तेव्हा सुहागरात आणि भिंत तोडणे वगैरेबद्दल एक अतिशय पांचट वाक्य नासिरच्या तोंडी आहे. असो. जेलूच्या घरातून कॅन्टोंमेंटमध्ये घुसलेले हे लोक मग तिथे डाँगच्या लोकांना मारायला लागतात.
त्यानंतर डाँगच्या वीणावादनाचा एक प्रसंग आहे. डाँग वीणा वाजवत असतो आणि एक बाई नाचत असते. वीणा वाजवताना डाँगची बोटं रक्तबंबाळ होऊ लागतात तरी ती बाई नाचायची थांबत नाही म्हणून शेवटी तो तिला तलवारीने मारूनच तिचा नाच थांबवतो. (म्हणूनच कुठल्याही गोष्टीत 'कुठे थांबायचं?' हे कळणं महत्त्वाचं!) पण त्याच्या रागाचं कारण वेगळंच असतं. नासिरला भेटलेली निरागस जुले ही खरी डाँगची हस्तक! आता नासिरच्या प्रेमात पडल्यावर तिला उपरती होते पण तरीही ती डाँगसाठी काम करतच राहते. त्यामुळे शेवटी नासिर तिला गोळी घालतो. ('कुठे थांबायचं?' हे कळणं फारफार महत्त्वाचं.) ती शिखाबाईंची खबरी म्हणून काम करत असते. त्यामुळे एकूणच शिखाबाईंवर सोपवलेल्या कामगिर्या फ्लॉप झाल्याने डाँग चिडलेला असतो. तशातच डाँगरिलाचा अॅन्युअल डे जवळ आल्याने त्याला अॅक्टिव्हली काम करणं गरजेचं असतं. त्यामुळे पुन्हा जेवणाची तयारी करून (अटेंडंटच्या थोबाडीत मारून 'इमरती कहां है? इमरती लाओ'सकट! तोही अटेंडंट असला भारी की थोबाडीत खाल्ल्याशिवाय इमरती आणत नाही म्हणजे नाही.) परत एकदा 'ब्राह्मण-श्राद्ध' डायलॉग शिखाबाईंसाठी होतो. त्यांनी त्यावेळी चेहर्यावर कसलेच भाव न दाखवून खरंतर डाँगचा पोपट केला आहे. (डाँगची दहशत सिनेमातल्या लोकांनासुद्धा वाटत नाही. शेपटीने माशा उडवत फिरणार्या गायीची कुणाला दहशत वाटेल का?) मग डाँगच्या बाजूच्या कुणाचंतरी चांगल्या लोकांना माहिती पुरवायला मतपरिवर्तन व्हायला हवं म्हणून शिखाबाईंना जावेद जाफरी आणि आदित्य पांचोली वाचवून घेऊन जातात. आदित्य पांचोली आणि एकताची ऑलरेडी जोडी जमल्यामुळे शिखाबाईआणि जावेद जाफरी असं कॉम्बो ठरतं. नासिरला हिरोईन उरत नाही, त्यामुळे फायनल हाणामारीत तो मरणार की काय, असं वाटलं. कारण जुलेला स्वतःच्या हाताने गोळी घातल्यावर ती हृदयद्रावक वाक्यं बोलून मेल्यावर स्वतःच्या रक्तानं तिच्या कपाळी कुंकू लावण्याचा एक इमोशनल सीन आहे. सहसा असे केलेले लोक मग शेवटच्या मारामारीत आपलं योगदान देऊन झालं की डोळे मिटतात. (आठवा, जलजला.. किमी काटकर ही थोडीशी व्हिलनिश बाई मरते आणि जोडीतला दुसरा शत्रुघ्न सिन्हा त्याला एवढे वाचवून घोड्यावर लादून जलजल्यातून वाचवून बाहेर घेऊन येतात तरी मरतो. (घोड्याची मेहनत वाया!)) पण यात तसं होत नाही.
अखेर डाँगरिला अॅन्युअल डे परेडच्या वेळी डाँग आपले उरलेले (ठेवणीतले!) तोतये पेरून ठेवतो व स्वतः उंच टेकडीवर जाऊन बसतो. आता सिनेमा शेवटाकडे आल्याने मात्र हिरो गँग यशस्वी होते आणि कधीच राँग नसलेल्या डाँगचा 'हे लोक टेकडीवर पोचू शकणार नाहीत' हा आडाखा राँग होऊन तो मरतो.
.. तरी सिनेमा संपत नाही.
या सिनेमात व्हिलनचे तोतये या गोष्टीप्रमाणेच अजूनही काही नावीन्यपूर्ण गोष्टी आहेत.
१. शम्मी कपूर डाँगला सामील तर गुलशन ग्रोव्हर, प्रेम चोप्रा हे लोक सज्जन दाखवणे. गुलशन ग्रोव्हरला दोनेक दृश्यानंतरच शम्मी कपूरकडून मारून अक्षरशः वाया घालवलं आहे. पण यामुळे काही काळ मुरलेले अनिअ प्रेक्षकसुद्धा गोंधळतात, हे कबूल करायला हवं. मी बराच वेळ शम्मी कपूरची व्हिलनबरोबर काम करण्यात काहीतरी मजबूरी असल्याचं कळण्याची आणि गुलशन ग्रोव्हर आणि प्रेम चोप्रा डाँगला जाऊन मिळण्याचीही वाट बघितली. शेवटपर्यंत तसं काही झालं नाही त्यामुळे सिनेमा प्रभावी ठरला. डाँगला संपवून हिरो लोक विमानातून परतत असतात तेव्हा शम्मी कपूर त्यांना गोळ्या घालायला म्हणून येतो. पण गोळ्या मारण्याआधी तो बोलत बसतो. 'इफ यू वॉन्ट टू शूट.. शूट! डोन्ट टॉक!' असा सुविचार सांगून धर्मेंद्र शम्मी कपूरला गोळी मारून संपवतो.
२. सुसाईड बॉम्बर बनवण्यासाठी आणलेल्या मुलींना रोज हिप्नोटाईज केले जात असते. त्यात त्यांना दगडांभोवती गोल गोल फिरायला लावून डाँगच्या आवाजातली 'डाँग तुम्हारा भगवान है' वगैरे असलेली टेप ऐकवण्यात येत असते. (हिप्नोटाईज होण्याऐवजी त्या मुली पकलेल्या दिसतात त्या या टेपमुळेच!) त्यात भारताच्या मुली कशा भारी आहेत हे सांगणारा संवाद म्हणजे - "या अमुक अमुक देशातील मुली, यांना रोज बारा तास हिप्नोटाईज केले जाते.. त्या दुसर्या मुली आहेत त्यांना चौदा तास.. यांना तर अठरा तास रोज हिप्नोटाईज करावे लागते, या भारतीय मुली आहेत. त्यांना हिप्नोटाईज करणे कठीण आहे."
सिनेमा संपल्यावर एकच प्रश्न मनात आला, डॉंगच्या श्राद्धाला तरी त्या अटेंडंटने थोबाडीत न खाता आठवणीने इमरती आणली असेल काय?
सहि लिहिलय,
सहि लिहिलय,
भन्नाट जबरी.
भन्नाट जबरी.
म्हणूनच कुठल्याही गोष्टीत
म्हणूनच कुठल्याही गोष्टीत 'कुठे थांबायचं?' हे कळणं महत्त्वाचं!>>> भन्नाट!
अमेरिकेत अकरा महिने काय करत होता, अकराच महिने का?>>> लीव्ह अँड लायसंसवर अमेरिकेत राहिला असेल
महान!! अफाट लिहीलंयस.
महान!! अफाट लिहीलंयस.
तहलका,
तहलका,
पैचान कौन?
पैचान कौन?
भारी लिहिलंय यथासाँग...
भारी लिहिलंय
यथासाँग... इमरती.... कुठे थांबायचं ....
तुफान लिहीलय. पण हे तिघे (
तुफान लिहीलय.:फिदी: पण हे तिघे ( नसीर, अदित्य आणी जावेद) किती पाचकळ वाटतायत.:फिदी:
जबरी कुठे थांबायचं ,
जबरी
कुठे थांबायचं , यथासाँग >>>> केवळ महान
"कवी नोहे" ही भयानक उच्च कोटी
"कवी नोहे" ही भयानक उच्च कोटी आहे हे वाचता वाचता तेथे थांबून खाली येउन लिहून जातोय :D. आता उरलेला वाचतो.
भारी... आणि पिक्चरही भारीच
भारी... आणि पिक्चरही भारीच होता हा
लहानपणी पाहिलेला.. सर्व कलाकार विसरलेलो.. पण अमरीश पुरी त्याच्या डाँग या नावासह डोंगरीला या गावासह आणि डाँग कभी राँग नही होता या संवादासह, आणि एवढेच नहे तर शोम शोम शामोशाशाय की काय मुजिकसह लक्षात होता.. एकदा चड्डा साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत
श्रमाता इज बॅक! _/\_ भन्नाट
श्रमाता इज बॅक! _/\_
भन्नाट रिव्ह्यू आणि शब्दखुणा!
भारी लिहिलंय! फक्त एक
भारी लिहिलंय! फक्त एक दुरुस्ती - ती कॅप्टन सिंथिया (जावेद जाफ्रीची जोडी) सोनम नाहिये काही, ती शिखा स्वरुप आहे (चंद्रकांता फेम)!
हा मी लिहिलेला तहलकाचा रिव्ह्यू - http://www.maayboli.com/node/53223
आता कोणीतरी ऐलान - ए - जंग चे परीक्षण लिहायचं मनावर घ्या म्हणजे अनिल शर्मा ची देशभक्तिपर ट्रिलॉजी कव्हर होईल (ऐलान ए जंग, फरिश्ते आणि तहलका)
शाम शाम शामो शामा. लै भारी
शाम शाम शामो शामा. लै भारी सिनुमा आहे. ऐलाने जंग अजुन भारी. तो अमरापूरकर थोट्टी थोट्टी म्हणत चिडवतो ते तर फारच भारी
अरे हो, ती शिखा स्वरुप आहे.
अरे हो, ती शिखा स्वरुप आहे. करते एडिट थोड्या वेळात.
मस्त लिहीलंय
मस्त लिहीलंय
मस्त. मला पन ते लीव एं ड
मस्त. मला पन ते लीव एं ड लायसन्स च डोक्यात आलं कालच अॅग्रिमंत्ट रजिस्टर केल्यानि.
मुकेश खन्नाच्या शायरीसाठी
मुकेश खन्नाच्या शायरीसाठी लेखिकेस अनेक प्लस वन.
रामदास आठवले फार प्रभावी झाले असते या रोलमधे.
कोकण मे फेमस है हापूस
विदर्भ मे पिकता है कापूस
मै चला गया पार्लमेंट हाऊस
मंत्री की जगह बना दिया माऊस
द एण्डची पाटी आधी दाखवून मग सिनेमा रिवाइंड करावा लागला असता.
धमाल आहे! एकसोएक पंचेस
धमाल आहे! एकसोएक पंचेस
काय भयंकर आहे,,कस्काय पाहू
काय भयंकर आहे,,कस्काय पाहू शकला तुम्ही...देवा..
चिरफाड करुन टाकली आहे सिनेमाची..
कितीही येवो कितीही जावो..पण गुंडा ला तोड नाही..
श्रद्धा, फारेण्ड आणि आणखी एक
श्रद्धा, फारेण्ड आणि आणखी एक दोघे या अशा सिनेमांवर इतके डिटेल मधे कसे काय लिहीतात ? जनता जानना चाहती है कि इनका ट्रेड सीक्रेट क्या है ? बारीकसारीक प्रसंग आठवून लिहीणे म्हणजे बफर साईज, क्लस्टर्स, रॉम मजबूत असलं पाहीजे. कारण थेटरच्या बाहेर आलं की अनेक तपशील विसरले जातात असा दांडगा अनुभव आहे.
फार दिवसांनी सिनेमाची चिरफाड
फार दिवसांनी सिनेमाची चिरफाड करणारा लेख आलाय.. एक नंबर जमलाय.. काही पंचेस तर भन्नाट..
कापोचे, तुम्हाला काय वाटतं,, एका दिवसात संपवतात की काय हे लोक पिक्चर बघून.. पारायणं करावी लागतात असले लेख लिहायचे म्हणजे..
बाब्बौ ...!! पारायणांचे
बाब्बौ ...!! पारायणांचे घाव सोसल्याशिवाय लेख येत नाही हेच खरे..
कल्पनाही सहन न होणारा
कराण्णा पोचाण्णा चेट्टीयाड (स्वामी)
तपशीलवार शिवी>> यथासाँग,
तपशीलवार शिवी>>
यथासाँग, कुठे थांबायचं, तोही अटेंडंट असला भारी की थोबाडीत खाल्ल्याशिवाय इमरती आणत नाही म्हणजे नाही. >>>>
भन्नाट लिहिलय.
तो इमरतीवाल्या अटेंडंटचा पंच
तो इमरतीवाल्या अटेंडंटचा पंच अतिशय भन्नाट आहे.
मुकेश खन्ना तेव्हा अजून भीष्म महाछायेतच होता. नसीरूद्दिन शहाबद्दल काय बोलावे? आणि हो, शम्मी कपूर "तिकडे" आणि प्रेम चोप्रा इकडे हे काही केल्या मनाला पटत नाहीच.
हा हा हा! जबरी लिहिलय.
हा हा हा! जबरी लिहिलय.
सुपर्र्र! श्र इज बॅक कुठं
सुपर्र्र! श्र इज बॅक
कुठं थांबायचं _//\\_
परिक्षण वाचून काल पाहिलाच
परिक्षण वाचून काल पाहिलाच
अफाट लिहीलंय !!
अफाट लिहीलंय !!
यामध्येच ते "मोटा साला" आहे
यामध्येच ते "मोटा साला" आहे ना?
Pages