नेहमीसारखीच संथ पावलं टाकत तो मंडळाकडे निघाला. घनघोर युद्धात पराभूत झालेल्या नगरातल्या रस्त्यांवर उत्तररात्री पसरते तशा शापित आणि उदास छायेचा अंमल दाटल्यासारखा त्याला भासला. उत्तररात्र, जी सरताच उजाडणारी पहाट पहिल्या किरणांबरोबर घेऊन येईल रणांगणावर अचेत पडलेल्या आपल्या प्रियजनांच्या नाशाच्या अप्रिय वार्ता आणि पाठोपाठ येतील क्रूर नियतीच्या असंख्य वारांनी जागोजागी छिललेली त्यांची निष्प्राण कलेवरं. त्याला वाटले, ही आजची रात्रही तशीच आहे, अपेशी, भयाण. अशा वेळी मूक रूदन करण्यापलिकडे कुठलीही अवस्था मनाला प्राप्त होणे शक्य नाही. थरथरत्या काळजाचा टवका ऊडून आत्ताच काहीतरी निसटून दृष्टीआड झालंय.
मंडळातले हॅलोजनचे पिवळे धगधगीत दिवे अगदी रोजच्यासारखेच आजही प्रखर ज्वाळांचे अत्युष्ण झोत अंगावर फेकत कसोशीनं जळत होते. त्या प्रचंड ज्वाळांच्या झळा आपटून हिरवट पडलेलं निळं कापडही अगदी रोजच्यासारखंच वार्यावर फडफडंत होतं. अंगावर येणारा उदबत्त्यांच्या धुपाचा घमघमाट आजही तिथल्या हवेत भरून राहिला होता, पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.
प्रत्येक पावलागणिक, मंडळात आज अजिबातच हालचाल नसल्याचं त्याला जाणवत होतंच, पण ह्या निर्जीवतेचं कारण चटकन उमगेना. चालण्याची गती वाढवण्याची इच्छा मनात येऊनही पायात ती उतरलीच नाही. संथ पावलं टाकत मंडळाच्या मंडपात आल्यावर समोर सुना, ओकाबोका स्टेज पाहून दु:खाच्या वेदनादायक प्रसंगी एका पवित्र नेणिवेबरोबर लखकन् चमकून यावा तसा क्षणभर पदराआडून पाहिलेला आपल्या आईचा पुसटसा चेहरा त्याला पुन्हा आठवला, धूसर होत चाललेल्या आठवणीसारखा. शहारल्यासारखा तो जागीच खिळला.
त्याला वाटले, हा आत्ता झाला तो साक्षात्कारच! आज गणरायाने आपला निरोप घेतला पण आपल्याला लागून राहिलेल्या ध्यासाचं दान तो आपल्या ओंजळीत टाकून गेला. तो आला त्या पहिल्या दिवशीच ध्यानीमनी नसतांना आपल्याला आई आठवावी आणि आज तो नसतांना पुन्हा! हा कसा योगायोग? ही कशी आपल्या मनाची चमत्कारिक अवस्था? मुळात आपली आई नेहमी आपल्याजवळ होतीच, आपल्या मनात रचून ठेवलेल्या तिच्या असंख्य प्रतिमांमध्ये! पण त्या प्रतिमा साक्षात्कारासारख्या आपल्या डोळ्यांसमोर तरळून याव्यात अशी व्याकुळता, अशी लीनता आपल्या मनात यापूर्वी कधीच दाटून आली नाही. कदाचित ती साधण्यासाठी निकडीच्या पवित्र विचारांची शुद्धता, शुचिताही आपण कायमची गमावून बसलो आहोत.
आपले सारे आयुष्यच आपण बेफिकीरीने जगलो, त्यात कधी दोन क्षणही स्वस्थपणे आपल्या मनाशी स्वच्छ बोललो नाही. एखाद्या कायम दुर्लक्षिलेल्या आजारासारखं नेहमीच त्याचं अस्तित्वं नाकारायला बघितलं. हाही आपलाच एक चेहरा आहे, आणि इथवर वागवत आणलेल्या दुसर्या कुठल्याही चेहर्यापेक्षा तो जास्त खरा, नैसर्गिक आणि सूक्ष्म आहे हे न उमगून आपण सदैव त्याची प्रतारणाच करत आलो. हटकून दुर्लक्ष केलेला आजार एक दिवस होत्याचं नव्हतं करीत धरणीकंपासारखा हादरवून सोडतो, तशीच आपल्या मनात वर्षोनुवर्षे साठून, गोठून राहिलेल्या प्रश्नांची ही वावटळ, जिच्या पहिल्याच तडाख्यानं आपल्या सध्याच्या बेगडी अस्तित्त्वाच्या चिंधड्या उडवल्या.
मुळात जन्मतः आपण असे नव्हतो, नसूच! भौतिक, ऐहिक गोष्टींचा हा चिखल आपल्याला ह्या समाजाच्या जगरहाटीत चिकटला, ज्यात आपण वाहवत गेलो आणि आपले अस्तित्व बरबटून कायमचे हीन, मलीन होईपर्यंतही शुद्धीवर आलो नाही. ह्या जगरहाटीत आपल्या परिघात येणारे हरेक नाव आपण आपल्या अस्तित्वाशी जोडत राहिलो, प्रत्येक गावात आपल्या पाऊलखुणा कोरत राहिलो पण ही आनंदाची शोधयात्राही सगळा व्यवहारच ठरली. निकोप, निर्भेळ आनंद शोधण्याच्या प्रयत्नात आपल्या मनाशी, आपल्यातल्या मूलतत्वाशी, आत्म्याशी जोडलेली नाळ आपण आपल्याच हातांनी कायम तोडत होतो. आता ही नाळ पुन्हा जुळणे म्हणजे ह्या जगरहाटीतून अस्तित्वहीन होणे, विरून जाणे.
इथल्या रहाटगाडग्यात फिरून फिरून सांडल्यासारखे आपले हे आयुष्य! थेंबाथेंबांनी हिंदकळून वाहल्यासारखे! तिथे ना आनंदाचा खळखळाट ना समाधानाचा संथ प्रवाह. येणार्या प्रत्येक नव्या दिवसागणिक, फिरणार्या प्रत्येक गाडग्याचा आकार घेऊन पुन्हा जन्म घेतल्याप्रमाणे आपण नवा चेहरा, नवा आकार धारण करतो, पण वाहत्या दिशेचा प्रवाह आपल्या कह्यात नाही. ह्या समाजाने दगडधोंड्यांत बांधून काढलेला हा चर! यात आपले आयुष्याचे वळण मुक्त, स्वच्छंदपणे वाहणे शक्य नाही.
असे ठेचकाळत ह्या जगरहाटीत अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड आता नको. प्रत्येक नव्या प्रश्नागणिक उठणार्या यातना आणि प्रत्येक उत्तरामागून येणारे क्लेशही आता नकोत. अस्तित्वहीन होण्याचा मार्ग आता शोधला पाहिजे! जिथे अस्तित्वाच्या, जिवंतपणाच्या संवेदनाही विरून जातील तीच आपली वाट..... आनंदाची, समाधानाची. ही वाट जिथे संपेल तिथे आपलं आयुष्य मुक्त, स्वच्छंद असेल....
गणरायाच्या विरून गेलेल्या अस्तित्वाचा अद्यापही मागे उरलेला जिवंत दरवळ उरात भरून संथ पावलं टाकत तो माघारी वळला.
समाप्त.
आवडल ह्या एका शब्दात नाही
आवडल ह्या एका शब्दात नाही व्यक्त करता येणार प्रतिक्रिया
वाह ! सुंदरच झाली लेखमाला!!
वाह ! सुंदरच झाली लेखमाला!!
गणेशोत्सवाचा मूळ उद्देश -
गणेशोत्सवाचा मूळ उद्देश - जाग्रुती. फार काळ दुर्लक्षलेले आजार - आजार आहेत हे मान्य करून, त्यांच्या मूळाशी जाऊन आत्मशोध. (मग पुढची यशोगाथा). देवाच्या रूपकातून फार छान उतरलेय हे सर्व.
सद्य सामाजिक परिस्थितिवर भाष्य, उत्सवाचा जोश, कार्यकर्त्यांच्या व्यक्तिरेखा हे सर्वच छान, पण तो बोनस! मूळ गाभा खुलवण्यासाठी.
मला गणरायाच्या निरोपाची तगमग आणि देवाला झालेला साक्षात्कार यांची गुंफण फार आवडली.
तुमच्या लेखणीत ताकद आहे. प्लिज लिहित रहा. पु.ले.शु.
वंदना यांच्या शब्दाशब्दाला
वंदना यांच्या शब्दाशब्दाला अनुमोदन. वंदना- फार सुंदर आणि नेमकं लिहीलत तुम्हीही.
लिहीत रहा बोविश. खूप पोटेन्शियल दिसतय.
मला सर्वात आवडली ती म्हणजे देवाच्या तगमगीसाठी वापरेली भाषा. अप्रतिम.
मुख्य म्हणजे अशा लिखाणाला प्रतिसाद किती येतील याची तमा न बाळगता लिहीलसं त्याबद्दल कौतुक आहे तुझं.
मधून मधून पॅरालिसीस बाय अॅनालिसीस होतय की काय अशी भिती वाटत होती मला. "झूल" चा फॉर्म वापरायला फार धाडस लागतं. वे टु गो.
छान लिहिला आहे शेवटचा
छान लिहिला आहे शेवटचा भाग.
लेखमाला आवडली.
>>विरून गेलेल्या अस्तित्वाचा
>>विरून गेलेल्या अस्तित्वाचा अद्यापही मागे उरलेला जिवंत दरवळ >> अगदी...!
मस्त लेखमाला. सुंदर शैली.
मस्त लेखमाला. सुंदर शैली. आईचं रूपक वापरण्याची कल्पनाही आवडली.
>> पॅरालिसिस बाय अॅनालिसिस
हो, मलाही थोडं तसं वाटलं - पण या लेखनाचा उद्देशच आत्मशोध असल्यामुळे ते काहीसं अपरिहार्य झालं असावं. एका त्यामानाने छोट्या सूत्रात बर्याच प्रश्नांचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला आहे.
लिहीत रहा.
रैना ला अनुमोदन, गणपतीसाठिची
रैना ला अनुमोदन, गणपतीसाठिची तगमग नि त्याला जोडलेले आइच्या रुपकातून येणारे introspection, निव्वळ अप्रतिम !!! नुसते वाचून काढल्याशिवाय ह्यावर इतर एकही प्रतिक्रिया देणे म्हणजे त्यावर अन्याय आहे.
दिवाळी अंकामधे काही तरी लिहाल अशी आशा.
गणपतीच्या गडबडीत सलग वाचायचे
गणपतीच्या गडबडीत सलग वाचायचे राहून गेले होते हे भाग. आज परत एकापाठोपाठ एक वाचून काढले अन पाच मिनिटे तशीच बसून राहिले! काय काय आवडलं लिहायचं झालं तर सगळेच भाग पूर्ण इथे कॉपी/पेस्ट करावे लागतील. तरी आईच्या रुपकाची ( मेलोड्रामाटिक न होता वापरलंय ते एकदम खासच) कल्पना, पोलिसांशी संवाद हे विशेष उल्लेखनीय.
वा! कादंबरी आवडली. लिहिण्याची
वा!
कादंबरी आवडली. लिहिण्याची शैली आवडली.