लिओनार्डो डीकॅप्रिओ....जर्मन आई आणि इटालियन वडील...दोघेही अमेरिकन नागरीक, यांचा मुलगा. जगभर अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून, अतिशय देखणा आणि लोकप्रियतेचे प्रतीक बनून राहिला आहे. १९७४ मध्ये जन्मलेल्या या मुलाने बालपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती आणि अमेरिकन टीव्हीमधून जाहिरातीद्वारा तो सतत छोट्या पडद्यावर चमकत राहिला. याचा अनुभव आणि फायदा त्याला पूर्णवेळ चित्रपट उद्योगात प्रवेश मिळवून देण्यास झाला. वयाच्या १८ व्या वर्षीच त्याने रॉबर्ट डी नीरो समवेत १९९३ मध्ये आलेल्या 'धिस बॉयज् लाईफ" मध्ये एका युवकाची भूमिका वठविली आणि त्यापुढील इटिंग ग्रेप व बास्केटबॉल डायरीजमधून सहजसुंदर अभिनयामुळे आणि विलक्षण देखणेपणामुळे सर्वसामान्य प्रेक्षक लोक तसेच निर्माते दिग्दर्शकांच्या नजरेत भरू लागला. त्यातील एक बडे नाव होते...जेम्स कॅमेरून. या धडाडीच्या आणि कल्पक दिग्दर्शकाने त्याला हॉलिवूड सृष्टीतील सर्वाधिक गल्ला मिळविलेल्या "टायटॅनिक" चित्रपटातील जॅक डॉसन या प्रमुख भूमिकेसाठी निवडले आणि या चित्रपटाने सर्व जगात जे काही अभूतपूर्व यश मिळविले त्या लोकप्रियतेचा फायदा दोन्ही कलाकारांना....लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि नायिका केट विन्स्लेट याना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप असा मिळाला. त्याचा फायदा दोघांनीही घेतला. "मॅन इन द आयर्न मास्क.... कॅच मी इफ यू कॅन...गॅन्ग्ज ऑफ न्यू यॉर्क...." आदी चित्रपटातील लिओनार्डोच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी त्याला आघाडीचा अभिनेता तर बनविलेच शिवाय मार्टिन स्कोरसेसे, स्टीव्हन स्पिएलबर्ग आदी सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या गळ्यातील तो ताईतच बनला. "ब्लड डायमंड" सारख्या राजकीय पार्श्वभूमी आणि काळेगोरे भेदावर असलेला चित्रपट असो, संघटीत आणि मेट्रो शहरातील गुन्हेगारीवर आधारीत "डीपार्टेड" सारखा दिग्गजांच्या भूमिका असलेलाच चित्रपट असो किंवा गल्फ देशातील हेरगिरीबाबतचा "बॉडी ऑफ लाईज" असो....सार्या चित्रपटांचा नायक असलेला लिओनार्डो दिग्दर्शकांचाही लाडका बनत चालला. प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत गेल्यामुळे स्टुडिओ सिस्टिमदेखील या नावावर फिदा झाली असल्यास त्यात नवल नाही. प्रचंड बजेटसचे प्लॅन्स बनत गेले आणि त्यांचा केन्द्रबिंदू ठरला हा प्रत्येक भूमिकेतील राजा...लिओनार्डो डीकॅप्रियो...२०१० चा इन्सेप्शन घ्या किंवा हॉवर्ड ह्यूजेसची कहाणी असलेला एव्हिएटर घ्या...तसेच जे.एडगर...प्रत्येक भूमिका स्वीकारण्यापूवी त्या पात्राचा इतिहास तपासून त्यानुसार केवळ अभिनयच नव्हे तर आपले लूक्स आणि देहयष्टीही तशीच असण्यामागे त्याने घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगेच आहेत.
अशा गुणी अभिनेत्याला हॉलीवूड चित्रपटसृष्टीतील मानाचे पान ठरलेले "ऑस्कर" पारितोषिक मिळावे ही त्याच्या जगभरातील चाहत्यांची इच्छा होती....आणि तशी असण्याचे कारण त्याने साकार केलेल्या लक्षणीय भूमिका. ऑस्करसाठी त्याला सर्वप्रथम मानांकन मिळाले ते १९९३ साली सर्वोत्कृष्ट सहा.नायकाचे "व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप" मधील अर्नीच्या भूमिकेसाठी...नंतर पुढील काळात तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे मानांकन मिळाली....२००५ एव्हिएटर, २००७ ब्लड डायमंड आणि २०१४ वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट....या सर्व वेळी ऑस्करने त्याला हुलकावणी दिली. या व्यतिरिक्त आम्हा लिओ प्रेमी रसिकांना डीपार्टेड आणि रीव्होल्युशनरी रोड तसेच इन्सेप्शन साठीही त्याला मानांकन मिळायला हवे होते असे वाटत राहिले.
पण अखेर २०१५ साल उजाडले आणि त्याला मिळाली एक जबरदस्त भूमिका...."द रेव्हेनंट" या चित्रपटातील नायकाची. चित्रपटात त्याचे दर्शन म्हणजे बर्फाळ प्रदेशातील....सन १८२३ सालातील घडामोडी....त्याने साकारलेली एका सैन्य तुकडीच्या मार्गदर्शकाची भूमिका...तो ही कशी जगला आणि कशारितीने ती पूर्ण क्षमतेनिशी दर्शविली आहे ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहाणे गरजेचे आहे. या चित्रपटातील याच भूमिकेसाठी त्याला जगभरातून अनेक पारितोषिके मिळाली आहेत...पण त्याची आणि त्याच्या चाहत्यांची भूक होती ती ऑस्करची. ते त्याला मिळायला हवेच हवे अशी हवाच तयार झाली.
आज अखेरीस अॅकॅडेमीने ते स्वप्न पूर्ण केले आणि यंदाच्या "ऑस्कर" बहुमानासाठी लिओनार्डो डी कॅप्रिओ याची "रेव्हेनंट" मधील ह्यू ग्लास या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाल्याचे जाहीर झाले आहे.
अभिनंदन !!
आभार सर्वांचे.... ~ इतक्या
आभार सर्वांचे....
~ इतक्या मोठ्या प्रमाणात (अगदी संपूर्ण भारतात....) लिओनार्डो डी कॅप्रिओ ला मिळालेल्या ऑस्करबद्दल त्याच्याविषयी प्रेम उफाळून आल्याचे जे चित्र दिसत आहे त्याचा खरोखरी खूप आनंद होत आहे. हॉलिवूडवर आपण सारेच आदराने प्रेमाने बोलत लिहित असतो....तरीही एका अभिनेत्याविषयी सर्वांच्या हृदयी असलेले हे प्रेम विलक्षणच म्हणावे लागेल.
मामा तुम्हाला एक विनंती आहे,
मामा तुम्हाला एक विनंती आहे, त्याच्या भाषणाचा सारांश लिहा इथे!
जरूर लिहितो....माझ्याकडे आहे
जरूर लिहितो....माझ्याकडे आहे ते भाषण....पण इथे न देता तो स्वतंत्र धागा बनवा असे तुझ्यासारख्याच तीन चार मित्रांनी मला विनंती केली आहे, मला ते पटले आहे....म्हणजे सारांश न देता पूर्ण रुपात दिले तर ते जास्त चांगले होईल.
पत्रकार : लिओनार्डो भारतात
पत्रकार : लिओनार्डो भारतात वाढलेल्या असहिश्णुतेबद्दल आपले काय मत आहे ???

लिओनार्डो कप्रिओ : XXXX ! मी अजिबात पुरस्कार परत करणार नाही
म्हणजे सारांश न देता पूर्ण
म्हणजे सारांश न देता पूर्ण रुपात दिले तर ते जास्त चांगले होईल.

>>>>> ज्जे ब्बात... यासाठी आगाऊ धन्यवाद
आह्हा!!! सुंदर लेख!!! अतिशय
आह्हा!!! सुंदर लेख!!! अतिशय आवडता आहे लियोनार्डो.. खूप अभिनंदन!!
.. अनफॉर्चुनेटली हाच एक सिनेमा सुटलाय पाहायचा.......
मला तर आता लिओचा लेंडल होतो
मला तर आता लिओचा लेंडल होतो कि काय अशी भीती वाटायला लागली होती. >>>>> लेंडल न होता त्याचा इव्हानिसेविच झाला ते एक बरं झालं.
समयोचित, थोडक्यात पण नेमका
समयोचित, थोडक्यात पण नेमका लेख. खूपच छान लिहीलेय.
वर्षू नील.... ~ अगदी न विसरता
वर्षू नील....
~ अगदी न विसरता तुम्ही हा चित्रपट जरूर जरूर पाहा. पहिल्या काही वेळातच तुम्हाला उमजून येईल की यंदाचे ऑस्कर लिओनार्डो डी कॅप्रिओ ला का प्रदान केले गेले आहे. पडद्यावर तो अभिनेता नाहीच....संवाद तर दोन पानाचे देखील नाहीत त्याला...जर लिहून काढले तर. आहे तो फ़क्त त्याचा बर्फ़ातून प्रवास आणि पूर्ण प्रतिकूल परिस्थितीशी त्याने दिलेली जिगरबाज टक्कर.
कापोचे ~ धन्यवाद. तुम्हा सर्वांना लेख आवडला हे खरे, पण त्याहीपेक्षा लिओनार्डोला ऑस्कर मिळाले यामुळे झालेला आनंद मला फ़ार भावला.
पराग ~ लेंडल आणि इव्हानिसेविच.....मन पुन्हा त्या काळात गेले....सोबतीने समोर आले जिमी कॉनर्स, मॅक्नरो, बेकर आदी दिग्गज...... लेंडलने जगातील सर्व विजेतेपद मिळविली...पण पहिल्या क्रमांकाच्या विम्बल्डनने त्याला अखेरपर्यंत हुलकावणी दिली. "ऑस्कर" च्या बाबतीत रिचर्ड बर्टन आणि पीटर ओ’टूल या अभिनेत्यांच्या वाट्याला हेच दु:ख आले त्याचीही क्लेशदायक आठवण आहेच मनी.
मस्त लिहिलंय. लिओच्या
मस्त लिहिलंय.
लिओच्या कारकिर्दीचा उत्तम आढावा. >> +१
लिओ ऑल टाईम फेवरेट. (कोणाचाच नावडता असेल असे वाटत नाही) त्यामुळे उशिरा का होईना वेल डिझर्व्ड ऑस्कर मिळाला म्हणून आनंद झाला.
थॅन्क्स मो.... ~ मला जास्त
थॅन्क्स मो....
~ मला जास्त आनंद झाला तो एवढ्यासाठी की आपणा सर्वांनाच लिओनार्डोला "वेल डीझर्व्हिंग ऑस्कर" मिळायला हवे...आणि ते त्याच्या बहराच्या कारकिर्दीतच; अगदी तसे झाले याची खुषी जगभरातील त्याच्या चाहत्यांना आहेच आहे. पॉल न्यूमन देखील असाच लिओ सारखा सदैव उत्साहाने उसळलेला अभिनेता होता....पण त्यालाही अनेकवेळा ऑस्करने हुलकावण्या दिल्या. शेवटी साठी ओलांडल्यानंतर एकदाचे ते मिळाले.
मुळातच ईंग्लिश चित्रपट बघत
मुळातच ईंग्लिश चित्रपट बघत नसल्याने याचा टायटॅनिक वगळता ईतर कोणताही चित्रपट पाहिला नाही. त्या चित्रपटातील सारेच आवडलेले. अर्थात हा देखील. खास करून शेवटच्या द्रुश्यात विलक्षण .. चटका लावून जातो.
पण बरेच जणांकडून याचे कौतुक ऐकत आलोय. याला ऑस्कर मिळाल्याचा आनंदही फेसबूक व्हॉटसपवर बरेच जणांना झालेला बघतोय. त्यामुळे अभिनंदन
अवांतर - शेवटचे याला फेसबूकवर एका पोस्टमध्ये पाहिलेले. एका बाजूला शाहरूख त्याच्या आगामी रईस चित्रपटाच्या लूकमध्ये होता आणि दुसरीकडे हा जवळपास त्याच लूकमध्ये होता. याच्या फोटोवर ओरिजिनल लिहिलेले आणि शाहरूखला डुप्लिकेट म्हटलेले.
तर ती त्याची कोणत्या चित्रपटातील भुमिका होती?
Pages