माती सुंदर असते. अनेक उत्तमोत्तम कलाकृती मातीतून घडत असतात. सुंदर शिल्पे, दिवाळीला लखलखून टाकणाऱ्या पणत्या, काहिलीने त्रासलेल्या जीवाला थंडगार पाण्याने शांतवणारी मडकी, आपल्याला विसावा देणारे आपले घर - हे सगळे मातीतूनच तर घडत असते. तिचे सौंदर्य शतपट होते ते हिरवाईच्या सृजनात. पण हे सगळे अलौकीक सौंदर्य दाखवायला ’माती’ हा शब्द तोकडा पडतो. खरे तर तो त्या सौंदर्याची अवहेलनाच करतो. माती म्हटले की ’मातीमोल होणे’, ’मातीत जाणे’ असेच काहीबाही आठवत राहते आपल्याला. मातीच्या सौंदर्याला खऱ्या अर्थाने न्याय देतो तो शब्द म्हणजे मृण्मयी ! माती मला कायमच सुंदर वाटत आली आहे, मृण्मयी हा शब्द पण वाचला / ऐकला होता. पण या दोन बाबींची माझ्या मनात सांगड घातली ती गोनीदांच्या ’मृण्मयी’ने. गोनीदांचा शब्दांच्या बाबतीतला चोखंदळपणा अगदी शिर्षकापासूनच जाणवायला लागतो. ही गोष्ट आहे मातीची, तिच्यातून उमलणाऱ्या निसर्गाची आणि त्या मातीची अनावर ओढ असलेल्या जीवांची. मृण्मयी या शिर्षकापासूनच घेतलेली पकड कादंबरी शेवटपर्यंत सोडत नाही.
हे जग पंचमहाभूतांपासून बनले आहे - तसेच आपले शरीरही ! सगळ्या शरीरांत ह्या पाचही तत्वांच्या उर्मी, त्यांच्याविषयीची ओढ असतेच. पण काही शरीरांत एखाद्या तत्वाविषयीची ओढ अनावर असते. पाण्याच्या ओढीने कोणी कोलंबस बनतो, जेआरडी सारख्यांना आकाश साद घालते तर मातीच्या ओढीतून बनते मृण्मयीची नायिका मनू ! पहिले दोघे वास्तव जगात अस्तित्वात होते आणि तिसरे केवळ कादंबरीतले पात्र आहे. पण या पात्राशी खूप जवळीक असणाऱ्या काही व्यक्ती माझ्या आयुष्यात होत्या. त्यामुळे हे कादंबरीतले पात्र काही पूर्णपणे काल्पनिक नाहीये.
उत्तम कलाकृतीचे एक लक्षण म्हणजे ती कालातीत असते. मी ही कादंबरी तीन वेळा वाचली आहे - वेगवेगळ्या वयात - आणि प्रत्येक वेळी ती मला आवडतच गेली आहे. प्रत्येक वाचनात आधीपेक्षा काही तरी नवीन कळले आहे आणि जे नविन कळले ते आवडलेच आहे.
आजपर्यंत निसर्गाविषयी अनेक जणांचे लेखन वाचले त्यातले काही जणांचे मनापासून आवडलेले आहे. पण त्या सगळ्यांपासून या कादंबरीत असलेला निसर्ग खूप वेगळा आहे, उत्कट आहे. दुर्गाबाई निसर्गाविषयी लिहितात ते खूप ज्ञानपूर्ण असते. ते ओघवते वाचता येत नाही. कळून घ्यायला थोडा वेळ लागतो. गोनीदांची लेखणी मात्र झरझर निसर्गचित्रं काढत जाते आणि तितक्याच सहजपणे ती आपल्या मनावर उमटत जातात. बरं निसर्गचित्रे म्हणावीत तर ते पण तितकेसे बरोबर नाही. व्यंकटेश माडगुळकरांसारख्या निसर्गप्रेमींच्या कादंबरीत जी असतात ती निसर्गचीत्रं. वाचतच रहावी अशीच असतात ती पण ती पुसली तर कादंबरीला धक्का लागणार नाही. गोनीदांच्या बहुतेक सगळ्याच लेखनात निसर्ग असतो पण मॄण्मयीत मात्र निसर्ग आहे तो एक पात्र म्हणून. यातून निसर्ग काढला तर कादंबरीच विस्कटून जाइल. या निसर्गामुळेच मी पहिल्यांदा कादंबरीच्या प्रेमात पडलो. तिच्यातल्या इतर गोष्टी नंतर दिसत गेल्या.
माझ्या वडिलांचे बालपण कोकणात गेले होते. फक्त १५-१६ वर्षे ते कोकणात होते आणि उरलेले सगळे आयुष्य मुंबईत. पण तरीही त्यांच्या बोलण्यात सतत कोकणच्या आठवणी, त्याचे कौतुक डोकवायचे. आणि ते ऐकून मला नेहमी प्रश्न पडायचा की आयुष्याचा इतका थोडा काळ घालवूनही त्यांना त्या भूमीचे इतके अप्रूप का ? माझ्या त्या प्रश्नाचे उत्तर मला कादंबरीत मिळाले. आयुष्यात फक्त एकदाच कोकणातल्या आमच्या घरी जाऊनही मलाही त्या कोकणाची एक अनामिक ओढ का आहे या कोड्याचीही उकल तिनेच केली. बाळाची नाळ आईशी जोडलेली असते. हे नाळेचे नाते फक्त एकाच पिढीपुरते असते. पण मातीची नाळ मात्र घराण्यातल्या अनेक पिढ्यांशी जुळलेली असते. उगाच जमिनीच्या निर्जीव तुकड्याला आई म्हणत नसावेत.
सगळी कादंबरी बोली मराठीत आहे. बहुतेक भागात कोकणातली चित्पावनी बोली आहे तर थोड्याश्या भागात वैदर्भिय बोली. आपण शहरात वापरत असलेली नागरी मराठी लिहायला ठिक आहे पण बोली म्हणून ती कहिशी रुक्ष वाटते. अशा रसरशीत बोली भाषेतले लिखाण वाचले की तो रुक्षपणा जास्तच जाणवतो. प्रकाशकांनीही त्या बोली भाषेचे व्याकरण खूप छान सांभाळले आहे. ती बोली माझ्या आसपास खूप वापरली जायची त्यामुळे त्यातल्या सानुनासिक जागा दाखवणारे अनुस्वार, न्-कारान्त शब्द हे सगळे वाचताना मला खूप मजा आली. कधीकधी आपण कादंबरी वाचत नसून ऐकतोय असे वाटण्याइतका बोली भाषेचा बाज यात सुंदर सांभाळला आहे.
गोनीदांच्या लिखाणातली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांची ओघवती भाषा. कुठेही न अडखळता त्यांचे लेखन वाचता येते आणि त्याची मजा लुटता येते. आणखी एक खुबी म्हणजे आपण नेहमी वापरत असलेल्या अगदी साध्या आणि मोजक्याच शब्दातून ते कितीतरी मोठा आशय आणि तो देखील अगदी अचूकपणे मांडतात. या कादंबरीतले मला आठवणारे उदाहरण देतो. आकाशातली आभा, त्यात दिसणारे रंग यावर पहिली-दुसरीतला मुलगा निबंध लिहू शकेल. आपल्यालाही तो आशय पकडायला निदान साताठ शब्द खर्ची घालावे लागतील. पण फ़क्त दोनच शब्दात गोनीदा हे सगळे प्रकरण मांडतात - तेजमाखले आकाश ! माणुस प्रेमात पडणारच ना अशा शब्दांच्या !
पण निसर्ग, गोष्ट, भाषा या सगळ्यांच्या पल्याड खरी मृण्मयी आहे - तीचा शेवट आणि वाचताना येणारा अध्यात्मिक अनुभव. हा अनुभवायचा भाग आहे. तुम्ही कोणत्या वयात कादंबरी वाचता यावरही अनुभवाची खोली अवलंबून आहे. पहिल्या वाचनात मला शेवट जराही नव्ह्ता आवडला. तेंव्हा अद्भुताच्या जगातून बाहेर पडलो होतो पण तरीही कथेचा शेवट सुखान्तच असावा असे वाटायचे. दुसऱ्या वाचनात मनूच्या धीराचे कौतुक वाटले होते, पण त्या पलीकडे काही नव्हते जाणवले. तिसऱ्या वेळी वाचताना जे काही सापडले ते मात्र खूप तरल होते. पुढे कधी वाचलीच तर अजूनही काही सापडेल.
जगताना आपल्याला दुःखांची निरंतर साथ असते (गोनीदांचा शब्द - जन्मकष्ट) आपल्याला आपल्या दुःखांचे अप्रूपही असते. ते अप्रूप आपल्याला अधिकच कष्टी बनवत असते. पण जर आपल्या पलीकडचे बघता आले तर समजते की आपल्या भोवतलच्या प्रत्येकालाच दुःख आहे. आपले हे दुःख जर उधळून देता आले तर उरेल तो खरा मी.
छान ओळख.
छान ओळख.
छान लिहिलंय, माधव
छान लिहिलंय, माधव
सुंदर ओळख. गोनिदांचे
सुंदर ओळख.
गोनिदांचे प्रत्यक्ष बोलणेही असेच तल्लीन होऊन ऐकावे असे असे. मी प्रत्यक्ष नाही ऐकले त्यांना पण अनेकदा दूरदर्शनवर पाहिले आहे. मातीचे ढेकूळ आणि सुकलेले पान यावर बेतलेली त्यांची कथा अजून आठवतेय.
( खुप पाऊस येतो तेव्हा ढेकूळ आपल्या डोक्यावर पान ठेवते आणि खुप वारा वाहतो त्यावेळी ढेकूळ पानावर ठिय्या मांडून राहते हे प्रसंग त्यांनी छान खुलवले होते. )
मृण्मयीचा सुंदर परिचय.
मृण्मयीचा सुंदर परिचय.
सुंदर.
सुंदर.
शेवटचा परिच्छेद तर मृण्मयीच
शेवटचा परिच्छेद तर मृण्मयीच सार आहे.
अप्रतिम लेख, माधव..
सुरेख लिहिलंय.
सुरेख लिहिलंय.
सुंदर लिहिलेय माधव . लेख खूप
सुंदर लिहिलेय माधव . लेख खूप आवडला .
काय सुंदर लिहिलंय! अप्रतिम!
काय सुंदर लिहिलंय! अप्रतिम! पुस्तकाचा गाभा तुमच्या परीक्षणात तुम्ही पकडला आहे.
मी मृण्मयी वाचली नाहीये पण वीणा देव आणि कुटुंबीय ह्यांचे कादंबरीचे अभिवाचन ऐकले आहे. अक्षरशः नकळत ऐकता ऐकता पाणी आले होते डोळ्यात!
तुमचे परीक्षण वाचून ही कादंबरी हाती घेण्याचा मोह होतो आहे. पण अशा पुस्तकांचा एक खूप genuine problem असतो. ती तुम्हाला पुस्तकांत ओढून घेतात इतके की तुम्ही ह्या जगातले राहातच नाही काही दिवस!
मस्त लिहीलंय! फार आवडलं.
मस्त लिहीलंय! फार आवडलं.
अप्रतिम लिहिले आहे.
अप्रतिम लिहिले आहे.
मस्त लिहीलय. आवडलच.
मस्त लिहीलय. आवडलच.
सुंदर लिहिलंय ...
सुंदर लिहिलंय ...
माधव, फार छान ओळख करून दिलीत.
माधव, फार छान ओळख करून दिलीत. तेजमाखलं आभाळ... अगदी अगदी. इथं रेंगाळायला न झालं तरच नवल. लोण्यानं माखलेली भाकरी किंवा रंगांनी माखलेली मुद्रा परिचित आहे, पण तेजानं माखलेले आभाळ? याचा अर्थ मनात जेवढा झिरपत राहतो तेवढं नवल वाटत राहतं. इतक्या साध्या शब्दांचं नवल का बुवा? असं म्हणून याऐवजी आणखी कोणती शब्दयोजना शक्य होती असा विचार डोक्यात यावा तर हुडकून हुडकून मग हाच निष्कर्ष पुढे येतो, - की नाही! ही जी शब्दरचना आहे, त्यातून जे डोक्यात शिरलं आणि मेंदूपुढे उभं राहिलं ते दुसर्या कोणत्याच शब्दरचनेत उभं राहिलं नसतं!
मस्त लिहिलंय..खूप आवडलं
मस्त लिहिलंय..खूप आवडलं
फार फार सुरेख, अप्रतिम
फार फार सुरेख, अप्रतिम लिहिलंत.
वाह्,सुंदर शब्दरचना!!! खूप
वाह्,सुंदर शब्दरचना!!! खूप आवडला मृण्मयी चा परिचय!!
सुरेख लेखन, जीव अडकवून
सुरेख लेखन, जीव अडकवून ठेवणाऱ्या पुस्तकाचा तितकाच उत्कट आढावा.
फार छान....
फार छान.... विशेषत:....
<<<<पण निसर्ग, गोष्ट, भाषा या सगळ्यांच्या पल्याड खरी मृण्मयी आहे - तीचा शेवट आणि वाचताना येणारा अध्यात्मिक अनुभव. हा अनुभवायचा भाग आहे. तुम्ही कोणत्या वयात कादंबरी वाचता यावरही अनुभवाची खोली अवलंबून आहे. पहिल्या वाचनात मला शेवट जराही नव्ह्ता आवडला. तेंव्हा अद्भुताच्या जगातून बाहेर पडलो होतो पण तरीही कथेचा शेवट सुखान्तच असावा असे वाटायचे. दुसऱ्या वाचनात मनूच्या धीराचे कौतुक वाटले होते, पण त्या पलीकडे काही नव्हते जाणवले. तिसऱ्या वेळी वाचताना जे काही सापडले ते मात्र खूप तरल होते. पुढे कधी वाचलीच तर अजूनही काही सापडेल.>>> +111
खुपच छान, प्रभावी लिहिलंय.
खुपच छान, प्रभावी लिहिलंय. शेवटचा परिच्छेद आवडला.
गोनीदांनी त्यांच्या आयुष्यातल्या दोन्ही महत्त्वाच्या भौगोलिक परिसरांना इथे पात्रं म्हणुन परिणामकारकरित्या वापरलं आहे. जन्मले, वाढले म्हणुन व-हाडाबद्दल आत्मियता, तर नाळ कोकणाशी जुळलेली. तात्यांचं वर्णन गोनीदांच्या स्वतःच्याच मनोवस्थेचं वर्णन वाटतं. त्यांचं कोकणप्रेम मृण्मयीतून शब्दाशब्दातून झिरपतं.
सगळे एकापेक्षा एक सरस लिहिताहेत.
दिनेश, 'मोगरा फुलला'च्या ध्वनीमुद्रिकेत गोनीदांच्या आवाजातल्या अभिवाचनाचेही तुकडे आहेत. आकाशवाणीवर अधून मधून उषाताई पागेंनी घेतलेल्या त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे भागही प्रसारीत होत असतात.
फार छान लिहिलंय! अचूक
फार छान लिहिलंय! अचूक सांगितलयत!
खूपच छान लिहिलं आहे माधव.
खूपच छान लिहिलं आहे माधव.
कादंबरीची भाषा आणि गोनिदांची भाषा याबद्दल लिहिलेले दोन्ही परीच्छेद जास्त आवडले. संपूर्ण सहमती. शेवटचा परीच्छेदही खूप मस्त लिहिला आहे.
संपूर्ण लेख थोडा अजून लांब चालला असता. अश्या आवडत्या विषयावर हातचं काही न राखता लिहिणं (उधळून देणं) आणि वाचकांनी अधाश्यासारखं ते वाचून व्यक्त होणं ही खूप सुरेख अनुभूती असते.
नेहमीच लिहित राहा
ज्ञानेश्वरी वाचणारी,
ज्ञानेश्वरी वाचणारी, अभ्यासणारी, त्यावर प्रवचन करणारी अशी अनेक प्रकारची मंडळी आहेत. मात्र गोनिदांची मृण्मयी ही ज्ञानेश्वरी "जगणारी" आहे - अशा उंचीवरची व्यक्तिरेखा गोनिदाच लिहू जाणोत... कारण ज्ञानेश्वरीचे अंतरंग गोनिदांनी जाणले होते.... (अभ्यासाने नव्हे तर ज्ञानेश्वरीवरील निस्सिम प्रेमाने.. )
मनूला तिच्या वडिलांमुळे ज्ञानेश्वरीविषयी प्रेम वाटू लागले - त्यांच्या पश्चात ती ज्ञानेश्वरीवर निरुपण करु लागली आणि तिच्या लग्नानंतर मात्र तिला अतिशय कठोर वास्तवाला सामोरे जावे लागले ज्यात तिच्या ज्ञानेश्वरीप्रेमाचा कस लागतो. तिचे ज्ञानेश्वरीमय जीवन नुसते वाचतानाही वाचकाला आपण काहीतरी अतिशय विलक्षण, देवाघरच्या माणसाला पहातोय, जाणतोय असे वाटू लागते - अशी जगावेगळी गोनिदांची मानसकन्या ... तिच्या आठवणीनेही ह्रदय गलबलून जाते, मनाला एका निवांत, निश्चल अनूभुतीचा लाभ होतो ...
श्री. माधव यांनी - "पण निसर्ग, गोष्ट, भाषा या सगळ्यांच्या पल्याड खरी मृण्मयी आहे - तीचा शेवट आणि वाचताना येणारा अध्यात्मिक अनुभव." ही जी नेमकी नस पकडली आहे त्याकरता त्यांना मनोमन धन्यवाद...
अतिशय सुंडर आणि नेमका लेख.
अतिशय सुंडर आणि नेमका लेख. पुस्तक हलक्या हातांनी समजावत उलगडून दाखवल्यासारखा लेख. काही कही शब्दरचना अप्रतिम.
नेहमीच लिहत रहा, माधव!
सगळ्यांना धन्यवाद! ती
सगळ्यांना धन्यवाद!
ती तुम्हाला पुस्तकांत ओढून घेतात इतके की तुम्ही ह्या जगातले राहातच नाही काही दिवस! >>>
@जिज्ञासा, हो. त्या हरवलेल्या अवस्थेतच खूप काही जाणवून जते.
@गजानन, १००% सहमत.
संपूर्ण लेख थोडा अजून लांब चालला असता. >>>
@मंजूडी, हो मला पण अजून लिहायचे होते. त्याकरता म्हणून पुस्तक पण काढून ठेवले होते. पण हल्ली वाचायला वेळ मिळत नाहीये. मग जेवढे पुस्तक डोक्यात आहे त्यावरूनच लिहीले.
(No subject)
वाह!!! काय छान ओळख करुन
वाह!!! काय छान ओळख करुन दिलेली आहे. मी बघते किंडलवर असेल हे पुस्तक.
मृण्मयीबद्दल छान लिहिलं आहे .
मृण्मयीबद्दल छान लिहिलं आहे .
हे कृष्णवेध मधून -
मग हा काय करील ? कीं यमुनेवर जाऊन थांबेल ? तिचा असीम प्रवाह पाहून त्याचें मन खचेल ? तो परत फिरेल ? पुनः कंसाच्या या दारुण कारागृहांत पाऊल घालील ? तो कांहीं का करीना ! आतां हें शरीर कुब्जेचें नाहीं. हें त्या पाटीतल्या अद्भुतावरून ओवाळून टाकलेलें नाणें. तेव्हां त्या इवल्यावर पहारा करीत राहायचें. कंसाच्या पोहोंचेंत तें आहे, तोंवर त्यावरून दृष्टी ढळू द्यायची नाहीं. निकराचा क्षण उगवतांच हें तुच्छ शरीर झोंकून द्यायचें हें दुर्बळ, गंजलेलें शस्त्र वापरून टाकायचें.
वसुदेव घाटावर पोंचला. घाटाच्या पहिल्या पायरीवर थांबली कुब्जा. जों जों वसुदेव खालीं उतरूं लागला, तों तों टोपलींतलें रूपडें कुब्जेला दिसूं लागलें. मनानें ती अगदी जवळ पोंचली-
अहा ! कशी या रूपाची कोंवळीक !
जणूं उगवत्या केशरपुष्पांतल्या केसरांचा पुंज !
जणूं नीलकमलांच्या गर्भकोशांतला तंतुसमूह-
जणूं अलगद हातांनीं सोललेलें चान्दिण्याचें फळ-
जणूं अनाघ्रात प्राजक्तीचीं फुलें-
जणूं मंदाग्नीवर तापूं ठेवलेल्या गाईच्या दुधावरल्या सायीचा नाजुक तवंग-
छे छे! शब्द अपुरे आहेत. अगदीच दुबळे आहेत ते.
अग बाई! वसुदेव पाण्यांतसा उतरतोय् ? गोकुळांत का जातोय् तो ? नंदाकडे ? वेडा आहे, कीं काय, हा ? एवढ्या प्रचंड पुरांत- “वसुदेवाऽ!” पण किंकाळी कांहीं फुटली नाहीं. ती कुब्जेच्या गळ्यांतच गोठली. पुढलें जें अद्भुत तिनें पाहिलें, त्यानें तिची दृष्टि विद्ध झाली. भान हरपलें. क्षणभर तिच्या हृदयाचें स्पंदनहि थांबलें- वसुदेव गळ्यापर्यंत पाण्यांत शिरला, पण पाणी कांहीं त्या टोपलींत शिरलें नाहीं. त्या चिमण्याच्या पायांचा अंगठा बाहेर डोकावत होता. त्याला यमुनाजलानें स्पर्श केला. स्पर्श केला, आणि मग तें त्याच्याभोंवतींच घोंटाळत राहिलें. त्या चरणकमलाभोंवतीं रुंजी घालीत. आंत शिरायचें साहस त्याच्याच्याने करवलें नाहीं. पाहतां पाहतां वसुदेव दृष्टीच्या पैल गेला. पावसाच्या धारांआड हरपला. कंसाच्या पोहोंचेपलीकडे.
>>>>>जणूं अलगद हातांनीं
>>>>>जणूं अलगद हातांनीं सोललेलें चान्दिण्याचें फळ
आहाहा ... काटा आला अंगावर. काय वर्णन आहे.