बेस्ट उपमा कसा जमवावा

Submitted by सायो on 22 February, 2016 - 08:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाजलेला बारीक रवा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे,कढिपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, सुकी लाल मिरची एखाददोन, तूप- बर्‍यापैकी सढळ हाताने, कोथिंबीर, ओलं खोबरं, फोडणीचं साहित्य- तेल, मोहरी, हिंग, रव्याच्या दुप्पट उकळीचं पाणी. लिंबाची फोड हवी असल्यास, बारीक शेवही आवडत असल्यास.
ऑप्शनल जिन्नस- भिजवलेली चणा डाळ, बारीक चिरलेला कोबी.

क्रमवार पाककृती: 

बारीक गॅसवर रवा छान भाजून घ्यावा. अगदी लालसर रंग नसला तरी चालेल. भाजताना त्यात चमचाभर तूप घालावं. एकीकडे रव्याच्या दुपटीपेक्षा किंचित जास्त पाणी उकळत ठेवावं. (१ वाटी रव्याला सव्वा दोन वाट्या)
चिरलेल्या कांद्याचं प्रमाण टोमॅटोच्या तुलनेत कमी असावं. बाकीचे जिन्नसही बारीक चिरून घ्यावेत. तेलाची मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यात चणा डाळ घ्यायची असल्यास पाणी काढून परतून घ्यावी. त्यातच हि. मिरच्या, लाल मिरच्या, कढिपत्ता घालावा. त्यात आलं, कांदा, टोमॅटो घालून परतून एक वाफ काढावी. मग त्यात उकळीचं पाणी मोजून घालून पुन्हा एक उकळी काढावी. मग त्यातच मीठ घालून रवा वरून पेरत घालावा. पुन्हा झाकण घालून गॅस बारीक करून वाफ काढावी. हे सगळं मिश्रण ओलं असतानाच वरून सढळ हाताने तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी. मस्त मऊसूत उपमा तयार.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी रव्याचा दोन मोठ्यांना दोनदा पुरतो.
अधिक टिपा: 

टिपा काहीच नाहीत. दिसायला साधा प्रकार वाटत असला तरी मनासारखा जमतोच असं नाही म्हणून इथे रेसिपी द्याविशी वाटली.

माहितीचा स्रोत: 
माहित नाही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इस मे अंडा कहाँ हय?
शब्दखुणांत शाकाहारी अंड्याचे प्रकार दिसताहेत.

का दिसत होतं माहीत नाही पण आता बदल केलाय (म्हणजे काय केलं ते नक्की मलाही कळलं नाही) असो, सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मस्त. कार्यालयातल्या लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी नाश्त्याला असतो हा उपमा...मस्त लागतो.

हो मेधावि. परवा मला खरंतर तुझ्या रेसिपीने सांजा करायचा होता पण तेवढ्याकरता मायबोलीवर लॉगिन करायचाही कंटाळा आला होता. शेवटी उपमाच केला नेहमीच्या पद्धतीने.

मी दोन चमचे उडीद डाळ १५ मिनिटं गरम पाण्यात भिजवून घालतो उपमा करताना. आणि पाणी वेगळं गरम करत नाही.
फोडणी करून त्यात पाणी घालतो आणि पाण्याला उकळी आली की त्यात भाजलेला रवा हळूहळू घालतो.

बाकी साहित्य आणि कृती तीच.

इथे सर्वणा भवन आहे त्यात खिचडी म्हणून उपमा सदृश पदार्थ मिळतो. बरीच वर्ष झाली खाल्ल्याला. नीट लक्षात नाही पण त्यात चणाडाळ आणि काही भाज्याही असतात बहुतेक. त्यात कोबीही असतो म्हणून मी ही घालते. मस्त मऊसूत होतो.

मस्तच,

मी दोन चमचे उडीद डाळ १५ मिनिटं गरम पाण्यात भिजवून घालतो उपमा करताना. आणि पाणी वेगळं गरम करत नाही.>+१ एक भांडे धुवायला कमी.

सर्वाणा भवन असेल.. तिथे रवा खिचडी नावाचा प्रकार मिळतो तो उपमा सारखा असतो. त्याचा जगभरात शाखा आहेत.

कार्यालयातल्या लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी नाश्त्याला असतो हा उपमा...मस्त लागतो.
➡➡➡➡

वाह काय आठवण काढलीत. मी खास या उपम्यासाठीच लहानपणी आईबरोबर लग्नाला जायचो. त्यानंतर ते लग्न कोणाचे आहे. मी मुलाकडचा आहे की मुलीकडचा याच्याशी माझे काही घेणेदेणे नसायचे. हल्ली होतात का हा उपमा असलेली लग्ने? आमच्याईथून तरी हरवलीत.. आता माझ्याच लग्नाला ठेवावा लागेल

>>त्यानंतर ते लग्न कोणाचे आहे. मी मुलाकडचा आहे की मुलीकडचा याच्याशी माझे काही घेणेदेणे नसायचे>> लहानपणी तसंही ह्या सगळ्याशी देणंघेणं कुणालाच नसायचं. बरोबरच्या भावंडांना भेटण्यातच जास्त इंटरेस्ट असायचा.

माझे दोन पैसे.

१) उपमा फोडणीस टाकायच्या आधी. काजू काप मंद आचेवर तेलात गुलाबी परतून घ्यावेत व वेगळे ठेवावेत
२) फोडणीत उडीद डाळ/ भिजवलेली हरबरा डाळ घालून परतून घ्यावे व मग जिरे व मोहरी कढी पत्ता, मिरची चे बारीक तुकडे थोडा हिंग घालून मग त्यात कांदा बारीक चिरलेला व मटार घालायचे. ( मला कोबी आवडत नाही उपम्यात मी गाजर, फ्लावर मटार कांदे घालते.
३) मग उकळते पाणी फोडणीत घालायचे व उ कळी आली की त्यात चवीचे मीठ, एक चमचा तूप व एक चमचा दही घालायचे. हे उकळले की मग तो रवा घालायचा. व दोन ते तीन वाफा काढायच्या.
सर्व्ह करताना ते काजू तुकडे, खोबरे व कोथिंबीर वरून घालायची.

बरोबर क्रिस्प मेदू वडा व चटणी असल्यास पूर्ण ब्रेकफास्ट.

उपम्याची पाकृ आवश्यक होती.

दरवेळी अगदी जसाच्या तसा न बनणारा पदार्थ आहे हा!

धन्यवाद!

मी टोमेटो किंवा भाज्या घालत नाही. फोडणीत डाळ आणि कांदा लालसर परतला की भाजलेला रवा हळद आणि कोथिंबीर्‍ घालून पुन्हा थोडा परतते. पाणी उकळून आधीच बाजुला ठेवलेले असते (पाणी उकळतानाच त्यात मीठ घालते). रवा थोडा परतल्यावर गॅस बंद करुन त्यात हळू हळू उकळेलेले पाणी घालते. एकदा चमच्याने मिक्स करून, झाकणावर पाणी ठेवून एक वाफ काढते.

रवा कोरडाच पण खमंग भाजून वेगळा ठेवायचा. त्यानंतर फोडणी करून उडीद डाळ आणि चणाडाळ कोरडीच त्या फोडणीत लालसर परतून घ्यायची, कांदा कढीपत्त्याची पानं ही घालून परतून घ्यायचं. मग रवा घालून एकदा परतायचं; सगळी फोडणी रव्याला नीट माखली की मग उकळीचं पाणी घालून वाफ आणायची. नीट शिजला की त्यात चमचाभर साजुक तूप कडेनी सोडायच आणि गरमागरम खायला घ्यायचा. साजुक तूप + कढीपत्त्याच्या पानांचा एक मस्त सुवास येतो या उपम्याला. नुसताही मस्त लागतो.

हवं असेल तर मटार घालता येतात, फ्लॉवरही मस्त लागतो. वरून भुजीया शेव/ आलू भुजीयाही मस्त लागतो. लाड करायचे असतील तर काजू वगैरे तळून घालता येतील. चटणी + सांबार बरोबर असेल तर बर्‍यापैकी हेवी नाश्ता/ ब्रंच होतं.

मी टोमेटो किंवा भाज्या घालत नाही. फोडणीत डाळ आणि कांदा लालसर परतला की भाजलेला रवा हळद आणि कोथिंबीर्‍ घालून पुन्हा थोडा परतते. पाणी उकळून आधीच बाजुला ठेवलेले असते (पाणी उकळतानाच त्यात मीठ घालते). रवा थोडा परतल्यावर गॅस बंद करुन त्यात हळू हळू उकळेलेले पाणी घालते. एकदा चमच्याने मिक्स करून, झाकणावर पाणी ठेवून एक वाफ काढते. >>> +१ माझी ही हीच कृती आहे. आंबटपणासाठी लिंबू घालते, ते नसेल तर उकळते पाणी घाल्ताना ताक/दही चालते.

मला पुणे विद्यापीठातला किंवा लग्नाकार्यात मिळतो तो पांढरा उपमा प्रचंड आवडतो. पण साबांचे म्हणणे आहे कि बाहेर रवा पुर्ण भाजत नाहीत. कच्चाच असतो बराचसा. त्यामुळे त्याला चांगली चव आली तरी पचायला जड असतो.
(कोण रे म्हणतंय तिकडे "नाचता येईना..." Proud )

पांढरा उपमा भाजत नसतील तरी उकळते पाणी घालतात म्हणून शिजतोच वाफा व्यवस्थित काढल्या की. Happy आमच्या नणंदेच्या साबा पांढरा पण चविष्ट उपमा करतात. आमच्या घरी आपल भाजून लाल केलेल्या रव्याचा उअप्मा खायची सवय, पण तो ही चांगला लागतो. Happy

अनघा Happy Happy

तसा भुकेच्या वेळी आवडतोच. पण मनापासुन खावा असा पांढरा उपमाच. त्यात पुणे वि. मधला तर.. Yummmmm...gif

उपमा झाला की गॅस बंद करुन झाकण ठेउन पाच दहा मिनिटे तसाच ठेवायचा आणि मग खायचा. मस्त मऊ मोकळा होतो.

Lol

जे आहे ते तसंच राहू दे. लोकांना जी कुठली पाकृ आवडेल ते ती करतील.

रच्याकने, इथलं शीर्षक संपादित करू शकतेस - 'बेस्ट उपमा कसा जमवावा' आणि पुढे कंसात - 'कोबीसहीत' Proud

Pages