बेस्ट उपमा कसा जमवावा

Submitted by सायो on 22 February, 2016 - 08:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाजलेला बारीक रवा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे,कढिपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, सुकी लाल मिरची एखाददोन, तूप- बर्‍यापैकी सढळ हाताने, कोथिंबीर, ओलं खोबरं, फोडणीचं साहित्य- तेल, मोहरी, हिंग, रव्याच्या दुप्पट उकळीचं पाणी. लिंबाची फोड हवी असल्यास, बारीक शेवही आवडत असल्यास.
ऑप्शनल जिन्नस- भिजवलेली चणा डाळ, बारीक चिरलेला कोबी.

क्रमवार पाककृती: 

बारीक गॅसवर रवा छान भाजून घ्यावा. अगदी लालसर रंग नसला तरी चालेल. भाजताना त्यात चमचाभर तूप घालावं. एकीकडे रव्याच्या दुपटीपेक्षा किंचित जास्त पाणी उकळत ठेवावं. (१ वाटी रव्याला सव्वा दोन वाट्या)
चिरलेल्या कांद्याचं प्रमाण टोमॅटोच्या तुलनेत कमी असावं. बाकीचे जिन्नसही बारीक चिरून घ्यावेत. तेलाची मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यात चणा डाळ घ्यायची असल्यास पाणी काढून परतून घ्यावी. त्यातच हि. मिरच्या, लाल मिरच्या, कढिपत्ता घालावा. त्यात आलं, कांदा, टोमॅटो घालून परतून एक वाफ काढावी. मग त्यात उकळीचं पाणी मोजून घालून पुन्हा एक उकळी काढावी. मग त्यातच मीठ घालून रवा वरून पेरत घालावा. पुन्हा झाकण घालून गॅस बारीक करून वाफ काढावी. हे सगळं मिश्रण ओलं असतानाच वरून सढळ हाताने तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी. मस्त मऊसूत उपमा तयार.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी रव्याचा दोन मोठ्यांना दोनदा पुरतो.
अधिक टिपा: 

टिपा काहीच नाहीत. दिसायला साधा प्रकार वाटत असला तरी मनासारखा जमतोच असं नाही म्हणून इथे रेसिपी द्याविशी वाटली.

माहितीचा स्रोत: 
माहित नाही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित, अगदी थोडा. पाव वाटी वगैरे. मस्त लागतो. इनफॅक्ट अशी वेगळी चव कळत नाही. पण कोबीमुळे पोहे, उपमा मऊ होतो असं मला वाटतं.

सायो, मी कालच तुला सांगणार होते हे की तुझी उपम्याची रेसिपी पण असताना बेस्ट उपमा अश्या नावाने का लिहिली आहेस दुसरी? :प Proud

मस्तय रेसिपी. साधारण अशीच करते. एकदा तो पांढरा उपमा करून बघायचाय.

ताक/दही >> मी ताकद ही असं वाचून भंजाळले काही काळ. उपमा करायला ताकद लागते की काय असं वाटून गेलं ना! :ड

कोबी ??????खरचं का? >>> घालणार असाल तर खराच कोबी घाला.

आमच्याकडे उपम्याचे विविध प्रकार असतात. झटपट कारायचा झाल तर अगदी केवळ बटाटे घालून. निवांत करायचा झाला तर कधी कोबी, कधी गाजर. कधी टोम्याटो वगैरे हाती सापडतील त्या भाज्या घालून उपमा करण्यात येतो. दही/ ताक (मामी, प्लीज नोट द शब्दरचना) ओलं खोबरं काजू शेंगादाणे हे मस्ट आयटम्स आहेत. कढीपत्ता ताजाच हवा. फोडणीमधेय उडीदाची डाळ, चणा डाळ आणि हिंग मोहरी ही मुख्य स्टार कास्ट. आयटम सॉंगचे बजेट असल्यास मटार अथवा फ्लॉवर. उपमा शिजत आला की वरून चमचाभर तूप घालणे.

मी कायमच रवा व्यवस्थित् भाजून ठेवलेला असतो. तरीही फोडणी होइपर्यंत रवा मायक्रोवेवला जरा शेकून घेते.

मस्त आहे रेसिपी. एकदा करुन बघेन. उपमा कधीतरीच मनासारखा जमतो मला.
पण हल्ली मला कांदा घातलेला उपमा नाही आवडत. सौदिंडियन स्टाईल पांढरा, मऊ, तळलेली उडीद डाळ, काजू, कढीपत्ता घातलेला उपमा आवडतो.

बटाटा घातलेला उपमा खाल्ला आहे पण नाही आवडला.

भूक लागली ना,
कोणी उपमा देता का उपमा,
उपम्याच्या बेस्ट रेसिपीज वाचून
लाळ टपकवणार्‍या जीभेला,
कोणी असा बेस्ट उपमा देता का उपमा...

कार्यालयातल्या लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी नाश्त्याला असतो हा उपमा..
ह्याची रेसिपी सांगा न कोणीतरी . आजकाल जग्नात पण हा उपमा ठेवत नाहीत .

हो!

मस्त आहे फोटो प्राजक्ता .. एकदम अ‍ॅपिटायझिंग .. Happy

पण मला कोबी किंवा गोभी हे दोन्हीं पदार्थ उपम्यामध्ये घालणे ये बात कुछ जमी नही ..

Pages