फ़्रुट श्रीखंड

Submitted by मुग्धा केदार on 18 February, 2016 - 01:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साधं श्रीखंड ( फक्त चक्का आणि आवडीप्रमाणे साखर घालुन घरी केलेले )- चक्क्याचे प्रमाण १.५ किलो.
डाळिंबाचे दाणे - एक मोठे डाळिंब
चिकु, सफरचंद - प्रत्येकी पाव किलो,
केळी - २ मध्यम
काळी अणि साधी द्राक्ष - एकुण पाव किलो,
काजु तुकडा , बेदाणे, बदामाचे पातळ काप - प्रत्येकी ५० ग्रॅम,
अर्धी वाटी साखर - कॅरमल करण्यासाठी
दुध मसाला एवरेस्ट ५० ग्रॅम ची डबी,

क्रमवार पाककृती: 

१)नॉनस्टीक पॅन मध्ये साखर वितळवुन त्याच कॅरमल करुन घ्यावं त्यात थोडा थोडा सुकामेवा घालुन पटापट मिक्स करुन तुप लावलेल्या डिश मध्ये काढुन ठेवावं.
२) श्रीखंडामध्ये आधी दुध मसाला मिक्स करुन घ्यावा.
३) चिकु, सफरचंद, केळी सारख्याच आकाराचे मध्यम तुकडे करावेत. द्राक्षं मध्ये कापुन अर्धी करुन घ्यावी.
४) फळे, सुकामेवा घालुन व्यवस्थीत पण हलक्या हाताने मिक्स करावं , फ़्रुट श्रीखंड तयार आहे.
फ़्रीजमधे ठेवुन द्यावं, लागेल तसं वाढायला घ्यावं.

वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर अवलंबुन आहे. :)
अधिक टिपा: 

१) कॅरमल कोट केलेले सुकामेव्याचे तुकडे श्रीखंड खाताना दाताखाली आले कि खुप छान लागतात. ही स्टेप वगळुन तसाच सुकामेवा पण घालु शकता. मी आईस्क्रीम मध्ये पण असे तुकडे घालते.
२) दुध मसाला आणि फळे एकाच वेळी मिक्स करु नयेत. फळांचे तुकडे मोडतील आणि अगदी हलक्या हाताने केल्यास मसाला नीट लागणार नाही.
३) फळान्मुळे पाणी सुटून फ्रूट श्रीखन्ड एरवीच्या श्रीखंडापेक्षा सैल होऊ शकतं, म्हणुन फ़्रीजमधे ठेवुन द्यावं, लागेल तसं वाढायला घ्यावं. अजिबात पाणी सुटत नाही. अगदी २-३ दिवसही छान राहतं.
३) आपल्या आवडीप्रमाणे फळे घालू शकता, दुध मसाल्याची चव खुप छान लागते, त्याला ऑप्शन म्हणुन इतर फ्लेवर सुद्धा वापरु शकता.

माहितीचा स्रोत: 
बाहेर खावुन न आवडल्याने स्वप्रयोगातुन तयार झालेली यशस्वी पाककृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, चक्क्याचंही प्रमाण दे शक्य झालं तर. म्हणजे किती लिटर दुधाचा साधारण किती किलो चक्का होतो वगैरे...
ही कॅरमलाईज्ड सुक्यामेव्याची टिप भारी आहे. मी अंमलात आणणार नक्कीच.

ह्या फ्रूट श्रीखंडात शक्यतो संत्री/ मोसंबी अशी पाणी सुटणारी फळं घालू नयेत. आंबा, चिकू, केळी, सफरचंद, द्राक्षं अशी घट्ट गराची फळं घातली तर फळांचं पाणी सुटत नाही.

मला तर साध्या श्रीखंडात दूध मसाल्याची अ‍ॅडिशन भारी वाटतेय. अगदीच सोपीही आहे.
कॅरॅमल वाली आयड्यापण मस्त. दोन्ही पाहायला हवं करून! टू डू लिस्ट बरीच वाढली आज!

रच्याकने, आम्रखंड देसाई बंधूंचं आणून पाहा एकदा. उच्च चवीचं आहे. चितळे, वारणा मागे पडतात!

मी म्हशीचं फुल क्रीम दुध ४.५ लिटर घेतल होतं त्याचा १.५ किलो चक्का झाला. वजन केल नव्हतं पण घरी चक्क्याचं वेगळं पातेल आहे त्यावरुन साबा नी सांगितलं.

ह्या फ्रूट श्रीखंडात शक्यतो संत्री/ मोसंबी अशी पाणी सुटणारी फळं घालू नयेत. आंबा, चिकू, केळी, सफरचंद, द्राक्षं अशी घट्ट गराची फळं घातली तर फळांचं पाणी सुटत नाही. >>>> बरोबर मंजिरी ताई
पण हे सुद्धा श्रीखंड जास्त वेळ बाहेर राहिल तर सैल होत.

मस्त आहे रेसिपी. अंधेरीच्या गजालीमध्ये थालीमध्ये फ्रूट श्रीखंड असायच खूप टेस्टी पण घरी करायचं डोक्यात आलं नव्हतं. टूटीफ्रूटी सुध्दा घालता येईल.

मी हे श्रीखंड चार बगंल्याला अंधेरीला माझ्या चुलता भावाकडे द्सर्‍याच्या दिवशी खाल्ले आहे. त्यात एक मस्त गुलाबी रंग पण होता. तो नक्की कशाचा असेल? त्यावेळी मी इतका विचार करुन पाहिले नाही. ९५ ची गोष्ट आहे ही.

स्फूर्तीचे फृट श्रिखंड मिळते ते आवडते. त्यात वेगळीच फळे अ सतात. त्यातले फक्त अननस ओळखू आले पण ते कॅनमधील असावे. व्हॅनिला इसेन्स पण असावा असे वाटले.

स्फूर्तीचे फृट श्रिखंड मिळते ते आवडते. त्यात वेगळीच फळे अ सतात. त्यातले फक्त अननस ओळखू आले पण ते कॅनमधील असावे. व्हॅनिला इसेन्स पण असावा असे वाटले.

फ्रूट श्रीखंडात कॅन्ड फ्रूट्स त्यातलं सिरप काढून घातले तरी चांगले लागतात. मला पायनॅपल फार आवडतं त्यातल्या त्यात. सन ड्राइड मँगो स्लायसेस मिळतात त्याचे बारीक तुकडे पण मस्त लागतात.

कॅरमलाइज्ड ड्राय फ्रूट्सची आयड्या भारी आहे.

यात पाणी सुटून घट्टपणा कमी होतो व चवही बिघडते असा एक दोन दा अनुभव आला आहे. कॅरेमेल ची चव सुद्धा दही बेस्ड पदार्थाच्या मानाने उपरी वाटते. पण ट्राय केले पाहिजे Happy

कॅरॅमलाईज्ड सुका मेवा बनवताना त्यात बटर स्कॉच इसेन्स घातला तर ते मिश्रण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवायला वापरता येतं Happy
मस्त कृती Happy

गुड कॅच Biggrin

कॅन्ड फ्रूट्स वापरणार असाल तर सिरप काढून टाकून मग फळांचे तुकडे घालावेत Happy

धन्यवाद मुग्धा. काल फ्रुट श्रीखंड तुमच्या रेसिपी ने केले. एकदम हिट. मी डाळिंब , द्राक्ष,आणि ड्राय फ्रुट वापरले. दुध मसाला ची आयडिया एकदम भारी. धन्स परत एकदा .

Back to top