पद्मा आजींच्या गोष्टी ३ : आजोबा आणि साप

Submitted by पद्मा आजी on 10 February, 2016 - 14:42

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला प्रोसाहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.

मी आज तुम्हाला माझ्या आजोबांची गोष्ट सांगणार आहे. एकदा आम्ही सगळे भावंडे जमली असताना माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितली.

वडिलांनी गोष्टीला सुरवात केली. "एकदा काय झाले, तुमचे आजोबा दर्यापूरचे काम आटपून घरी आले. त्या वेळी बस किंवा रेल्वे नव्हत्या जास्त. बरासचा प्रवास पायी पार पाडावा लागे.

आजोबा आले आणि माडी वरच्या खोलीत जाऊन जात्या वर डोके ठेवून झोपी गेले. तुमची आजी स्वयंपाक करत होती. त्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला नैवद्य दाखवून मग जेवणाची पद्धत होती.

तुमच्या आजीने मला सांगितले "जा रे बापुना उठव आणि जेवायला बोलव."

मी गेलो वरच्या खोलीत आणि बघतो तर काय वडील झोपले होते शांतपणे आणि त्यांच्या डोक्यापाशी एक मोठा नाग फणा काढून बसलेला. माझी तर बोबडीच वळली.

मी धावत खाली आलो आणि आई ला म्हटले. "आई, आई, साप... साप."

"कुठे?"

"बापू...बापूंच्या डोक्यापाशी. लवकर चल."

आई ने लक्षच दिले नाही पहिल्यांदा. "चल. काय बोलतोस. कुठला साप. घरात कुठून आला? ताट मांड चल."

पण मी तिला ओढलेच हात धरून. "खरे सांगतोय. मोठ्ठा नाग आहे." मला तर रडायलाच येत होते भीतीने.

तुमची आजी जेव्हा वर आली तर नाग बघून ओरडायला लागली. "अहो उठा. अहो उठा पटकन. बघा. साप आहे मोठ्ठा." ती ओरडून सगळ्यांना बोलवायला लागली. "साप...साप."

त्या सगळ्या कोलाहलात साप हलायला लागला. बापूही जागे झाले. त्यांनी एक डोळा उघडून नागा कडे बघितले आणि परत डोळे बंद करून पडले व म्हणाले. "तो मला काय करणार नाही. तो आला तसा निघून जायेल. घाबरू नका. आवाज न करता खाली जा. मी येतो नंतर."

"अहो पण..."

"जा. जा. सापाला घाबरवू नका."

पण आजी काही हलायला तयार नाही. रडत रडत तिने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.

बापूंनी पुढे म्हटले. "अग, तुला माहिते आहे ना आपल्या घराण्यात साप पासून धोका नाही. ती गोष्ट ठावूक नाही का? जा. सापाला घाबरवू नका. जा म्हणतो ना मी."

बापू आम्हला समजावत असतानाच नागाने तोंड वळविले आणि तो हळूच खाली उतरला. व शांतपणे गत्च्ची कडे निघून गेला.

नंतर घरी काका वगैरे आल्यानंतर सगळ्यांनी सापाला शोधले पण तो काही सापडला नाही.

मी मग तुमच्या आजोबांना त्यांनी ज्या गोष्टी चा उल्लेख केला होता त्या बद्द्ल विचारले. तेव्हा त्यांनी मला एक जुनी गोष्ट सांगितली. -- पाळेकर घराण्यात म्हणे कोणी एक आंधळे गृहस्थ होते. ते दररोज गोदावरी नदीच्या घाटावर येउन बसत असत आणि सूर्याला अर्घ्य देवून ध्यान करत. बरेच लोकही त्यांना मानत. त्यावेळी हमखास ऎक नाग त्यांच्या आजुबाजू घोटाळे. कधी कधी तर आगदी खेटून असायचा. ते आंधळे गृहस्थ पण त्याच्या अंगावरून हात फिरवत असत. तेव्हापासून सापांचे रक्षण करायचे असा आपल्या घराचा नियम होता.

गोष्ट ऐकल्यावर मी लगेच माझे कॉलेजी डोके चालविले व वडलांना म्हटले. "अहो तो साप विषारी नसेल."

वडील पण हसले व म्हणाले. "जेव्हा तुझ्या आजाबांनी मला हि गोष्ट सांगितली तेव्हा मी सुद्धा हेच म्हटले. पण नंतर एक लक्षात आले -- बरे झाले बापू घाबरून घाईत उठले नाहीत. त्यांनी शांतपणे घेतले म्हणून आपत्ती टळली."

काही का असेना, पण मी मात्र नंतर बरेच दिवस वरच्या खोलीत एकटे जायचे टाळले.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसंगावधान म्हणून मस्त गोष्ट आहे. "पण नंतर एक लक्षात आले -- बरे झाले बापू घाबरून घाईत उठले नाहीत. त्यांनी शांतपणे घेतले म्हणून आपत्ती टळली." हे बाकी अगदी बरोबर वाटते

मस्त

छान