ऐक मित्रा

Submitted by संतोष वाटपाडे on 22 January, 2016 - 00:16

भुकेचा अर्थ जेव्हा पुर्णतः समजेल मित्रा
तुला ढेकूळसुद्धा आवडू लागेल मित्रा...

जिभेवर गोडवा अन बर्फ़ डोक्यावर असू दे
उभा पर्वत तुझ्यासाठी पहा सरकेल मित्रा..

स्वतः माणूसकीने वागणे आधी सुरु कर
जगाचे चित्रही केव्हातरी बदलेल मित्रा...

नको तू सापळा लावूस रस्त्यावर कुणाच्या
तुझाही पाय तेथे नेमका अडकेल मित्रा...

जगाचे लक्ष वेधायास कर सत्कार्य काही
तुझे दुष्कृत्य तर ना सांगता पसरेल मित्रा...

सुखाची हाव नुसती...चांगली नसते कधीही
मिळाया सौख्य...आधी दुःख थोडे झेल मित्रा...

प्रियेला भेटताना का मिठीचा हट्ट करतो
तिला समजून घे...बघ ती कशी बिलगेल मित्रा...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच संतोष .... आवडले तुमचे काव्य...
मित्राला खरेच मितवा (मित्र-तत्त्वज्ञ-वाटाड्या) ह्या नात्याने वास्तव आणि रास्त उपदेश मस्त गुंफलेत

भुकेचा अर्थ जेव्हा पुर्णतः समजेल मित्रा
तुला ढेकूळसुद्धा आवडू लागेल मित्रा... >>>>>

.......... वास्त्ववादी मतला !

खुप छान Happy