तांबुसल्या पालवीचा ऋतू हाकेवर होता
तुझ्या पळसमिठीत प्राण केशरला होता
केली नजरबंदी तू ,दिशा चुकले पाखरू
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?
सोनधारा ओतल्यास बहाव्याच्या अंगावर
तूच शिंपडला वर्ख फुलपंखी स्वप्नांवर
अंती वन्ही होत राना अग्निदंश केलास तू ...
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?
दरी डोंगरी फिरलो ,स्वप्ने वेचित हिंडलो
खटमधु करवंदी क्षणांनी त्या गाभुळलो
शेव गुंतला जाळीत हळु सोडविलास तू ...
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?
उंच पठारावरती देह शांत टेकलेले
गुढ पाषाणांभोवती सांजस्पर्श फिरलेले
अव्यक्तशा जाणिवेला रंगभान दिलेस तू .....
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ
रात्री चंद्रचांदण्यांचा वेलु खाली ओणावला
तुझा माझा देह शुभ्र तारकांची माला झाला
धुके ओढून पहाटे रानभरी झालास तू...
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?
चंद्रलेप तो कायेस होरपळ कशी साहु ?
............ माणिक वांगडे
अप्रतिम... खुप छान.
अप्रतिम... खुप छान.
खुप सुंदर शब्दकळा !
खुप सुंदर शब्दकळा !
सायु आणि दिनेशजी
सायु आणि दिनेशजी प्रतिसादशून्य रखरखाटात तुम्हा दोघांच्या प्रतिक्रिया मला ओएसिस सारख्या वाटल्या
अगदी मनापासुन धन्यवाद!!!
भूईकमळ, कविता आवडली.
भूईकमळ, कविता आवडली.
पळसमिठीत प्राण केशरला
पळसमिठीत प्राण केशरला >>>>
खटमधु करवंदी क्षणांनी त्या गाभुळलो >>>>>
सोनधारा ओतल्यास बहाव्याच्या अंगावर >>>> हे सारे फारच आवडले ......
बाकी सारी कविता सुर्रेखच ...
कडव्याकडव्यात निसर्गातल्या,
कडव्याकडव्यात निसर्गातल्या, दिनमानातल्या रंगांची, छायाप्रकाशातली होळी खेळली जातेय.. पहिल्या दोन कडव्यातले उष्णरंग तांबुस, पळस , सोन,बहावा, अग्नी ..दुसऱ्या दोन कडव्यात सावल्या जमत जातात.. करवंदी , जांभूळ , पठार , सांजस्पर्श ..आणि शेवटी चंद्रचांदणरात्र आणि पुन: धुकेरी पहाट.
रंगभान देणं ते हेच !
सुरेख!! प्रत्येक कडव्याची छटा
सुरेख!! प्रत्येक कडव्याची छटा निराळी, सुंदर!!
'रंगभान' असे शीर्षक समर्पक वाटावे...
मस्त !
मस्त !
>>>कडव्याकडव्यात
>>>कडव्याकडव्यात निसर्गातल्या, दिनमानातल्या रंगांची, छायाप्रकाशातली होळी खेळली जातेय.. पहिल्या दोन कडव्यातले उष्णरंग तांबुस, पळस , सोन,बहावा, अग्नी ..दुसऱ्या दोन कडव्यात सावल्या जमत जातात.. करवंदी , जांभूळ , पठार , सांजस्पर्श ..आणि शेवटी चंद्रचांदणरात्र आणि पुन: धुकेरी पहाट.
रंगभान देणं ते हेच !<<< भारतींशी सहमत!
कवितेतील चित्रदर्शीत्व (शब्द बरोबर आहे की नाही माहीत नाही) आवडले.
पण कविता म्हणजे रंग, प्रतिमा, मोहक शब्द ह्यांची उधळण नव्हे. (कविता वाचून हुरहुर लागायला हवी असे माझे तूर्त मत आहे, पुढे कदाचित तेही बदलेल, माहीत नाही).
गावाहून आल्या आल्या तुमच्या
गावाहून आल्या आल्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांना उत्तर लिहावयाचे ठरवलेले.
प्रतिसादातील दिरंगाईसाठी क्षमस्व!
मंजुताई ,शशांकजी आणि सुप्रिया सर्वाचे अगदी मनापासून आभार.
भारतीजी बुडत्याला तुमच्या शब्दांचा आधार!
शिवाय तुमच्या प्रतिसादाने तर मलासुध्दा
नजाणवलेल्या गोष्टी दृष्टीपुढे आल्या.तुमची खूप आभारी आहे.
के.अंजली, तुम्ही सुचवलेले शीर्षक जास्त समर्पक आहे परिष्करण करताना नक्कीच विचार करीन.
बेफिकीरजी ,तुम्ही बोललात ते अगदी खरय
तो टप्पा कवितेत कधी येईल किंवा नाही माहीत नाही .......
पळसमिठीत प्राण केशरला
पळसमिठीत प्राण केशरला >>>>
खटमधु करवंदी क्षणांनी त्या गाभुळलो >>>>>
सोनधारा ओतल्यास बहाव्याच्या अंगावर >>>> हे सारे फारच आवडले ......
बाकी सारी कविता सुर्रेखच ...<<<<<+++१११११११
मैथिली , खुप खुप
मैथिली , खुप खुप धन्यवाद!!!अगदी ओळींसकट कळवल्याबद्दल ....
सुरेख .....मस्त...डोळ्यासमोर
सुरेख .....मस्त...डोळ्यासमोर दृश्य उभे राहिले...
खुप धन्यवाद!
खुप धन्यवाद! भाग्यश्री..sorry , गडबडीत तुमचे आभार मानायचे राहुनच गेलं .
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
शब्दकळा उत्तम झाल्यात.
शब्दकळा उत्तम झाल्यात. विशेषतः पळसमिठी हा शब्द आवडला. (पळसाचा कोणता गुण अपेक्षित आहे हे इथे किंवा विपूत शक्य झाले तर कळवावे अशी विनंती).
शेव गुंतला जाळीत .... या शब्दाचा अर्थ कळाला नाही.
बाकी कवितेबद्दल काय बोलावे.
उत्तम शब्दचित्र तर आहेच पण ते अत्यंत बोलके आहे. एखाद्या आर्ट गॅलरीत जवळजवळ मांडलेली चित्रांची सीरीज असावी. त्या चित्रांचा एकत्रित परिणाम अत्यंत लोभसवाणा !
सोलू नये म्हणतात कविता, पण हळुवार शृंगारातून शेवटच्या चित्रातला उत्कट, स्वर्गीय प्रणयानुभव. तुम्ही खूप खूप खूप ताकदीने पेललंय हे सर्व.
कवितेचं हे रूप मोहक असतंच, नै का ?
कैपोचे सर , सगळ्यात आधी
कैपोचे सर , सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद ! इतकी उत्कटसुंदर प्रतिक्रिया दिलीत त्या बद्दल .
आता शब्दांची गुंफण पाहुया .सगळ्या रानाचा कायाकल्प करणारा चैत्र जवळ आलाय. थोडयाच दिवसांत पिंपळ पानांची कांती तांबुस किरमिजी होऊन जाईल पण त्या आधीच पळस गर्द केशरी फुलांनी अंगोपांगी पेटत गेलाय पळस ज्या रानवाटांवर धगधगलेला दिसतो त्याच्या आसपासची इतर झाडे त्यावेळी दृष्टीस जाणवत पण नाहीत . इतकी तो नजरबंदी करून टाकतो . मैना, बुलबुल यासारखी पाखरे मग मधाच्या मोहापायी त्यावर झेपावतात म्हणून प्रियकराला रंगील्या पळसाची उपमा दिलीय अर्थात ती सुद्धा त्या केसरियात गर्द रंगत चाललीय डोळयात, रक्तात, प्राणभर पळसाच्याच केशरझळा …[पूर्वीच्या काळात पळसफुलांच्याच रंगाने होळी खेळत असत . ]
आता एक आठवण … तिचा पदर[शेव], करवंदीच्या जाळीत अडकतो तेव्हा तो हळूवार हातांनी जराही विदीर्ण न होऊ देता सोडवतो हाच मित्र आता तिच्या मनाच्या चिंध्या करून हरवलाय,रानभरी झालाय. म्हणजेच तो विक्षिप्त स्वभावाचा असतो म्हणुनच तिला कळत नाहिये की नक्की काय करू,कोणती त्याची गोष्ट स्मरणात ठेवू नी कुठली विसरून जाऊ ? …
पुन्हा एकदा आभार...
निगप्रेमी मनीमोहोर,अतिशय
निगप्रेमी मनीमोहोर,अतिशय आभारीय तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादांसाठी ...
खुपच सुंदर कविता...मनापासून
खुपच सुंदर कविता...मनापासून आवडली...
<<दरी डोंगरी फिरलो ,स्वप्ने वेचित हिंडलो
खटमधु करवंदी क्षणांनी त्या गाभुळलो
शेव गुंतला जाळीत हळुच सोडवला तू ...
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?
यातला हळुच शब्द खटकला
<<रात्री चंद्रचांदण्यांचा वेलु जेव्हा खाली ओणावला
तुझा माझा देह शुभ्र तारकांची माला झाला
धुके ओढून पहाटे रानभरी झालास तू...
सांग काय आठवु मी , काय विसरून जाऊ ?
चंद्रलेप तो कायेस होरपळ कशी साहु ?
यातली पहिली ओळ लयीत नाही वाचता आली.....बाकी अतिशय उत्तम रचना....
संतोषजी , प्रतिसादासाठी
संतोषजी , प्रतिसादासाठी मनापासून आभारी .
रात्री चंद्रचांदण्यांचा वेलु जेव्हा खाली ओणावला>>> यातला जेव्हा हा शब्द मी नुकताच गेल्या आठवडयात तेथे घातलेला कारण जेव्हाने तो समा लगेच बदलून जातो अस दाखवायचं होत पण आता तुमचा प्रतिसाद वाचताना अष्टाक्षरीच्या नियमाचाच भंग झालेला समजून चुकले. … लक्षात आणून दिल्याबद्दल ,खूप धन्यवाद !
' हळुच सोडवला तू' ...>>>या ओळीस तोच अर्थ कायम ठेवुन त्या अलवार कृतीला पर्यायी शब्द अजून मिळाले नाहीत .हा हळुच शब्द मलाही बरेच दिवस खटकत होता . सध्या तात्पुरती 'शेव गुंतला जाळीत हळु सोडविलास तू .'
असा बदल केला आहे..
हाय.... घायाळ ग... पुन्हा
हाय.... घायाळ ग...
पुन्हा जिओ...
पळसमिठीत प्राण केशरला>> वाह..
पळसमिठीत प्राण केशरला>> वाह..
उत्तम शब्दचित्र तर आहेच पण ते अत्यंत बोलके आहे. एखाद्या आर्ट गॅलरीत जवळजवळ मांडलेली चित्रांची सीरीज असावी. त्या चित्रांचा एकत्रित परिणाम अत्यंत लोभसवाणा !>>> +१००
अवल, किती गोड उत्स्फुर्त
अवल, किती गोड उत्स्फुर्त प्रतिसाद धन्यवाद!!!
मॅगी , तुमची देखील दाद सुखावुन गेली.आभारी आहे.
भुईकमळ निसर्गचित्र ऊभ केलत
भुईकमळ
निसर्गचित्र ऊभ केलत तुम्ही तुमच्या शब्दांनी .
खूप सुंदर !!!!!