समुद्रावरील वादळांप्रमाणे चाचेगिरी हा देखील कुतूहलाचा विषय.
निसर्गाशी हातमिळवणी असो अथवा दोन हात करणं असो, त्यात एक प्रकारचा रोमांच असतो कारण निसर्ग अफाट ताकदवान असला तरी नेहमीच नियमबद्ध वागतो. मात्र असं काही चाचेगिरीबद्दल म्हणता येत नाही.
भर समुद्रात चाचेगिरी चालते – याचं आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. खरं तर मधल्या काळात चाचेगिरी बंद का झाली होती? याचंच आश्चर्य वाटायला हवं.
समजा आपण एकटे नोटांची पुडकी खिशात घेऊन किर्र अंधार्या रात्री जंगलातल्या निर्जन रस्त्यावरून निःशस्त्र जात असलो तर आपल्यावर हल्ला व्हायला कितीसा वेळ लागणार? त्यातून आपण जर दररोज तसेच जात असलो तर चोरांना हळदीकुंकवासहित आमंत्रणपत्रिका पाठविण्यासारखंच नाही का?
बोटीची स्थिती अशीच असते. बोट तर महाग असतेच, त्यावर भरलेला माल त्याहूनही महाग असतो. शेकडो किंवा हजारो मैलात सुरक्षा दलाचा मागमूस नाही. बोटीवर शस्त्रास्त्र नाहीत. (याची कारणं पुढे येतील.) वेग खूपच कमी (साधारण ताशी वीस-पंचवीस कि.मी.). कायम ती तशीच डुलंत डुलंत मार्गक्रमणा करंत राहाणार याची खात्री.
या सर्वामुळे एके काळी चाचेगिरी फोफावली होती. मात्र कालांतराने पृथ्वीवरच्या इंचन् इंच भूभागावर कोणत्या ना कोणत्या राज्यकर्त्याची सत्ता आली. त्यामुळे चाच्यांना हेडक्वॉर्टर्स राहिले नाहीत, पकडलेली बोट घेऊन कुठे जाता येईना आणि मिळवलेली लूट कुठेही निर्धास्तपणे ठेवता येईना, वापरता येईना. हळुहळु चाचेगिरी संपुष्टात आली. गरीब देशांच्या आसपास तुरळक प्रकार चालू राहिले पण फार दखल घेण्याइतपत नव्हते.
गेल्या वीस वर्षात मात्र या दैत्यानी आपलं डोकं पुन्हा वर काढलं आहे. अल्-कायदा नी धर्मसत्ता पसरविण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये अराजक माजवण्याच्या उद्देशानी भरपूर शस्त्रास्त्र उपलब्ध करून दिली आहेत. ठिकठिकाणच्या warlords ना अंकित करून घेतलं आहे. कित्येक देशांमध्ये सरकारची सत्ता अबाधित नाही.
ज्वलंत उदाहरण म्हणजे सोमालिया. राजधानी मोगादिशू. सरकारची सत्ता जेमतेम राजधानीपुरतीच मर्यादित आहे. बाकी देशभर ‘अल शबाब’ नावाच्या कट्टर धर्मांधांचं अधिपत्य. अराजकतेमुळे लोक उपासमारीनी मरू लागल्यावर सार्या जगानी दखल घेतली आणि त्यांना मदत म्हणून धान्य पाठवलं. ते तिथल्या वॉरलॉर्डनी सरळ लुटून साफ केलं. मग आपण त्यांना आणखी धान्य दुसर्या बंदराला पाठवलं. ते खुशाल तिथल्या वॉरलॉर्डनी ढापलं.
झोपेची वेळ, कानाची पाळ आणि भुकेची नाळ. वाढवावी तितकी वाढते. आता त्यांना बंदरात आलेल्या बोटी लुटणं पुरेसं वाटेना. जवळपास विदेशी मच्छीमारी बोटी असायच्या त्या पकडून आणायला सुरवात केली. बोट विकायची आणि मच्छीमारांना ओलीस ठेवून त्यांच्या मालकाकडून पैसे उकळायचे. या दूरवर मच्छीमारी करणार्या बोटी आपण गेटवे-ऑफ-इंडियापाशी बघतो त्यांहून मोठ्या असतात खर्या, पण त्यांचे मालक देऊन देऊन किती पैसे देणार? मग मोठ्या बोटी काबीज करायला सुरवात झाली.
सुरवातीचे प्रयत्न केविलवाणे होते. पण पायरीपायरीनी चाच्यांच्या साधनसामुग्रीमध्ये सुधारणा होत गेली. एके ४७ बंदुका, रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड्स, ऍल्यूमिनियमच्या वेगवान होड्या, वॉकी टॉकी, टेलिस्कोपिक शिड्या वगैरे. पण या ऍल्यूमिनियमच्या होड्यांनी किनार्यापासून फार दूर जाता येईना. मग काबीज केलेल्या बोटींनाच ‘मदर शिप’ बनवून त्यावर सर्व सामुग्री लादून दोन दोनशे मैलावरच्या बोटींवरही हल्ले करायला सुरवात केली.
बोट पकडून आणली की बोटीच्या मालकाशी वाटाघाटी सुरू व्हायच्या. वीस दशलक्ष डॉलरपासून मागणी सुरू होऊन साधारणपणे तीन ते पाच दशलक्ष डॉलरना सौदा व्हायचा. संपूर्ण मोगादिशूचा जी.डी.पी. देखील इतका नसेल. अराजक म्हणजे काय असतं त्याचा भन्नाट नमुना. ज्यानी बोट पकडून आणली आहे त्याच्या शेजारचा वॉरलॉर्ड त्याच्यावरच हल्ला करणार म्हणजे आयतीच बोट मिळावी! या हल्ल्यात बोटीला आणि त्यावरच्या क्रूला इजा होण्याची शक्यता दाट.
२००३ साली अशाच एका हस्तांतरात एका खलाशाला जून महिन्यात इजा झाली. त्या वर्षी डिसेंबर महिन्यात खंडणी घेऊन बोटीची सुटका झाली त्याच्या दोन आठवडेच आधी तो खलाशी इन्फेक्शननी वारला! तोपर्यंत त्याचे किती हाल झाले असतील त्याची कल्पना देखील आपल्याला येणं अशक्य आहे!
सोमालियाच्या चाच्यांची कार्यपद्धति (modus operandi) अशी.
वर उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वी काबीज केलेल्या बोटीवर सामुग्री लादून किनार्यापासून दोनतीनशे मैल दूर यायचं. आपणही एक नॉर्मल बोट आहोत अशी बतावणी करायची. येणार्या जाणार्या बोटींवर नजर ठेवायची. ज्या बोटीचा वेग कमी आहे आणि जिची उंची कमी आहे तिच्यावर हल्ला करणं सोपं. अशी हेरली की तिच्या जवळ जाऊन दोन ऍल्युमिनियमच्या होड्या बंदुकधारी चाच्यांसह सोडायच्या. यांना शक्तिशाली इंजिनं असतात. त्या सहज बोटीला गाठतात. चाच्यांना बोटीवर चढणं मात्र सोपं नसतं. वर चढायला थोडं तरी स्थैर्य होडीला असावं लागतं. त्यासाठी त्या होडीची नाळ आमच्या बोटीला टेकवून घट्ट दाबून ठेवावी लागते. ही क्रिया चालत्या बोटीच्या डाव्या वा उजव्या बाजूंना करणं शक्य नसतं. बोटीच्या मागच्या बाजूलाच (त्याला stern म्हणतात) करावं लागतं. मात्र तिथे बोटीच्या पंख्यामुळे (propeller) पाणी घुसळंत असतं. त्यामुळे त्यांची होडी प्रचंड डचमळंत असते. त्यातच शिडी बोटीच्या डेकवरच्या हॅन्डरेलला अडकवायचा प्रयत्न करतात. अडकवता आली तर वर चढतात.
आता हे सगळं होत असताना बोटीवरचे लोक काय हातावर हात ठेवून बसलेले असतात का? याचं उत्तर दोन कालखंडात विभागूया.
कालखंड एक : चाचेगिरी सुरू झाली होती, पण अजून जगानी एकत्रितपणे त्याची दखल घेतलेली नव्हती.
ज्या भागात चाच्यांचा सुळसुळाट आहे तिकडे बोट जाण्याची वेळ आली तर प्रत्येक बोटीचा मालक आपापल्या विचार आणि ऐपतीप्रमाणे बोटीला संरक्षण देत असे. याहीपेक्षा ‘संरक्षण देण्याचा प्रयत्न करंत असे’ हे म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. बोट सोमालियाच्या जितक्या जास्त लांबून नेता येईल तितकी न्यायची, मागे आणि दोन्ही बाजूंना शंभर फुटांपर्यंत हॅन्डरेल्सना रेझर वायर आणि दोनदोनशे लिटरचे ड्रम्स लावायचे जेणेकरून बोटीवर चढणं अवघड होईल, ब्रिजवर काम करणार्यांना बुलेटप्रूफ जाकिटं, नाइट विजन गॉगल्स वगैरे आयुधं द्यायची. बाकी भगवंतावर सोडायचं.
बोटींवरच्या लोकांनी आपापल्या कल्पकतेनी हत्यारं निर्माण केली. बोटीच्या मागच्या बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि दिशा नियंत्रित करता येतील अशा वॉटर कॅनन लावल्या. चाच्यांची होडी येऊन चिकटली की त्यात बदाबदा पाणी ओतायला कॅनननी सुरवात करायची. या छोट्या होड्या त्यात पाणी भरलं की नियंत्रणाबाहेर जातात.
चाच्यांच्या दृष्टीने त्यांचा सगळ्यात वीक पॉइंट म्हणजे जेव्हां ते शिडी लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हांचा. तेव्हां जर कोणी डेकवर आडवा पडून हातातल्या काठीनी ही शिडी फक्त ढकलंत राहिला तर चाच्यांना फारसं काही करता येत नाही. शिडी ढकलणं ही क्रिया अगदी सोपी. पण ती करणार्याचं काळीज वाघाचंच पाहिजे! त्याच्या आणि चाच्यांच्या मध्ये साधारण फक्त पंधरा वीस फुटांचं अंतर असतं आणि त्यांच्याकडे बंदुका असतात! दोघांच्या मध्ये बोटीच्या मागची उभी आणि डेकची आडवी अशा दोन पोलादी भिंती असतात पण या दोनही बुलेटप्रूफ करण्याच्या दृष्टीने बनविलेल्या नसतात.
आमच्या बोटीचा पाठलाग एकदा चाच्यांनी केला होता पण आमची बोट महाकाय होती. तीन लाख टन. जिला VLCC (Very Large Crude Carrier) म्हणतात ती. अति उंच. बहुदा त्यामुळेच हल्ला करण्यापर्यंत मजल गेली नाही.त्यामुळे मला स्वतःला चाच्यांना कधी सामोरं जावं लागलं नाही. मात्र माझ्या एका मित्राला याचा वाईट अनुभव आला. आमच्याच कंपनीच्या एका बोटीवर तो चीफ इंजिनियर होता. हा स्वतः एकदम बेडर. हल्ला झालाच तर एका इंजिनिअरनी फनेल (धुरांडं) च्या वर जायचं आणि तिथून चाच्यांची होडी काय करते आहे आणि ते कुठून शिडी लावण्याचा प्रयत्न करंत आहेत त्याची वॉकी-टॉकीवर running commentary देत राहायची. डेकवर माझा मित्र, बोसन (म्हणजे खलाशांचा म्होरक्या) आणि थर्ड ऑफिसर या तिघांनी आडवे पडून चाच्यांची शिडी ‘टी’ आकाराच्या हत्यारानी ढकलंत राहायची आणि ती हॅन्डरेलला लावता येणार नाही अशी व्यवस्था करायची, असं ठरलं होतं.
त्यांच्या दुर्दैवानी हल्ला झालाच. ठरल्याप्रमाणे हे तिघे स्टियरिंग रूमच्या मागच्या दरवाज्यापाशी पोहोचले. तिथून मागच्या डेकवर पोटावर रांगत गेलं तर पाण्यात असलेल्या होडीमधल्या चाच्याला दिसण्याची शक्यता नाही. माझा मित्र पुढे. ते दोघे मागे. हा रांगत रांगत ठरलेल्या जागी पोहोचला. मागे वळून पाहातो तो या दोघांचा पत्ता नाही! समोर बंदुकधारी, मागे आपल्याच लोकांनी पळ काढलेला. एखादा कच्च्या दिलाचा असता (कच्च्या कशाला, नॉर्मल दिलाचा असता) तरी त्याचा धीर सुटला असता. या पठ्ठ्यानी आपली जागा अजिबात सोडली नाही. हातातलं हत्यार सज्ज करून चाच्यांची वाट पहात पडून राहिला. त्याच्या सुदैवानी चाच्यांना आपली होडी steady करता आली नाही आणि अर्ध्या तासानी त्यांनी हल्ल्याचा नाद सोडला पण जाताजाता रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड्स मारून गेले.
बरं. बोटींवर बंदुका आणि दारुगोळा का ठेवला जात नाही? फार पूर्वी ठेवत असंत. कॅप्टनच्या Strong Room मध्ये ठेवलेल्या असंत. पण आता नसतात. ह्याची कित्येक कारणं आहेत.
त्या चोरून नेण्यासाठीच बोटींवर हल्ले होत असंत. निदान बंदरात तरी तसं होऊ नये म्हणून बोट बंदरात आली की त्या शहराचं पोलीस खातं तिथे चोवीस तास पहारा लावतात. त्याचा सर्व खर्च बोटीच्याच मालकाकडून वसूल करून घेतला जातो. शिवाय कागदी घोडे भरपूर नाचवायला लागतात ते वेगळेच.
बोटीवरचे लोक (बहुदा दारू प्यायल्यावर) आपापसातले मतभेद मिटवायला याच बंदुका वापरायचे. मतभेद नाहीत तरी एक मतदार तरी नक्की मिटायचा!
एखादा स्थानिक चोर किंवा हल्लेखोर आपल्या हातून मारला गेला तर स्थानिक कायद्याप्रमाणे आपण खुनी ठरतो.
सारं जग चाचेगिरीच्या प्रश्नावर एकत्रित तोडगा काढीना त्यामुळे काही कंपन्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर बोटींना सशस्त्र संरक्षक दल द्यायला सुरवात केली. मात्र आपण जेव्हां आंतरराष्ट्रीय वातावरणात असतो तेव्हां असे एकतर्फी निर्णय अंगाशी येतात.
असं समजा की एक बोट सुएझ कालव्यातून दक्षिणेकडे येऊन सोमालियाच्या उत्तरेच्या किनार्याजवळून दुबईला जाणार आहे. एका ब्रिटिश कंपनीकडून हे सशस्त्र दल घ्यायचं ठरलं आहे. हे काही कोठल्या देशाचे सैनिक नव्हेत जे आपल्या स्वतःच्या हवाई दलाच्या विमानाने जाऊ शकतील. ते असतात Mercenaries. नेमबाजीच्या रायफल्स ऑलिम्पिक्स ला नेणं आणी अशी जीवघेणी शस्त्र नेणं यात फरक आहे. विमानकंपन्या दारूगोळा न्यायला तयार नसतात. का? कारण ज्वलनशील पदार्थ आणि स्फोटक पदार्थ यामध्ये एक मोठा फरक आहे. काड्यापेटीच्या काडीच्या टोकाला जो गंधक असतो तो ज्वलनशील. पण त्याला जळायला मात्र हवेतला प्राणवायू लागतोच. जर तो त्याला आपण मिळू दिला नाही तर जळणारा गंधकदेखील विझवता येईल. अग्निशमनात अवलंबिलेली एक पद्धत ही असते. मात्र स्फोटकांमध्ये स्वतःचा प्राणवायू असावाच लागतो. कारण स्फोट होण्यासाठी सगळीच्या सगळी दारू काही नॅनोसेकंदात जळावीच लागते. तरच पुरेसा दाब निर्माण होतो. त्याला जर का आग लागली तर विझवणार कशी?
शिवाय कोणत्याही देशात दुसर्या देशाच्या नागरिकाला सशस्त्र असायला परवानगी नसते. मग इजिप्त त्यांना का परवानगी देईल? बरं, इतक्या सगळ्यातून ते बोटीवर चढलेच, तर जिकडे उतरणार तिकडचा देश परवानगी देणार का? जर नाही दिली तर किती काळ हे लोक बोटीबरोबर हकनाक फिरत राहाणार? एक काळ असा होता की उतरण्या आधी हे Mercenaries असलेली शस्त्रं आणि दारुगोळा बोटीवरून पाण्यात विसर्जन करून टाकंत. पण देशांची हद्द समुद्रकिनार्यापासून दोनशे मैलापर्यंत असते. त्यामुळे अशी शस्त्रं फेकणं हा देखील गुन्हाच असतो. कॅप्टनला आणि त्या Mercenaries ना, असं दोघांनाही जबाबदार धरलं जातं. या गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा होऊ शकते. थोडक्यात काय, तर आंतरराष्ट्रीय वातावरणात एकतर्फी निर्णय घेता येत नाहीत.
जगाला हा प्रश्न सोडवायला इतका काळ का लागला याचं संयुक्तिक कारण देणं अवघड आहे पण उदाहरण दिलं की लगेच समजेल. जेव्हां आपल्या विधानसभेत शेतकर्यांच्या आत्महत्या या समस्येवर उहापोह होतो तेव्हां बहुतांशी MLA ना आत्महत्या केलेल्या शेतकर्यांमध्ये काडीचाही रस नसतो. प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा असतो आणि पक्षातही प्रत्येक मेंबरचा स्वतःचा. पाणी अगदी नाकाशी आलं की मगच निर्णय होणार. तोपर्यंत एकमेकावर कुरघोडी. आंतरराष्ट्रीय स्थरावर हेच चालतं.
त्या काळात जे नाविक पकडून ओलीस ठेवले गेले त्यांना हॉरिबल अनुभव आले.
एखादी बोट काबीज केली गेली की बोटीच्या मालकाला चाच्यांकडून फोन यायचा. एक नव्हे, कित्येकांकडून. खरोखर बोट आहे त्यापैकी कोणाच्या ताब्यात? हे कळण्यासाठी बोटीवरच्या कॅप्टन किंवा चीफ इंजिनियरला फोनवर बोलायला द्यायचे. तो बोलायला लागला की त्याच्या पाठीत रट्टा घालायचा. त्याची किंकाळी तिकडे ऐकू गेली की मालकावर जास्त दबाव येणारच! मालक बधत नाही असं वाटलं तर नाविकांना घरी फोन करायला भाग पाडायचे. संभाषण सुरू झालं की त्याच्या कपाळाला किंवा कानशिलाला बंदूक लावून चाप ओढायचा पण अशा तर्हेनी, की गोळी आत न शिरता चाटून गेली पाहिजे. त्याची जी काही हालत व्हायची ती घरच्यांना live ऐकायला लागायची!
बोट काबीज केली रे केली की त्यावरच्या सर्व वापरण्यासारख्या आणि विकण्यासारख्या वस्तू लुटून न्यायचे. जेवणखाणासकट. मग रोज सकाळ संध्याकाळ फक्त भात आणि पाणी. कधी डाळ असेल कधी नाही. काही बोटींना सुटायला चार चार वर्षं लागली! बोटीवरच्या लोकांचे अतोनात हाल!
बोट काबीज केलेला म्होरक्या, लक्ष ठेवणारे पहारेकरी, स्वयंपाकासाठी असलेल्या बायका यांचा स्वभाव आणि मूड यावर क्रूला मिळणारी वागणूक आणि जेवण अवलंबून असायचं. हा बंदिवासातला काळ काही जणांना जीवघेणा ठरला तर काही जण वजन वाढवून आले! शप्पथ!
या काळात बोटीवरचा सर्व क्रू दिवसरात्र ब्रिजवर पहार्यात बसवून ठेवले जायचे! करायला काही नाही. भयानक उकाडा! दाटीवाटीनी बसलेले किंवा पडलेले. आंघोळीला गोडं पाणी नाही. आंघोळच केली नाही तर कालांतरानी शरीराला दुर्गंधी यायला लागायची. खारं पाणी घेऊन केली की मिठामुळे कंड सुटायची. मग चिडचिड, कुरबुर, लहान सहान गोष्टीवरून भांडणं. एखाद-दुसरा मनानी खचायला लागला आहे असं वाटलं की बाकीचे त्याला समजावायचे. पण प्रत्येकाची मानसिक शक्ती एकसारखी नसते. कित्येकांना घरी परत आल्यावरसुद्धा तोल सांभाळता आला नाही.
बोटीवर नोकरी करणार्यांना Jack of all असणं जरुरीचं असतं. त्यानुसार नोकरी लागल्याबरोब्बर पहिल्या बोटीवर पाय ठेवण्याआधी आपापल्या कामाव्यतरिक्त वेगवेगळी प्रशिक्षणं (‘प्रशिक्षण’ या शब्दाचं अनेकवचन असतं की नाही हे मला खरं तर माहीत नाही) दिली जातात. त्यातलं एक म्हणजे ‘ओलीस ठेवून घेतलं तर तोल कसा सांभाळावा?’ हे. त्यात एक वस्तुस्थिती मनावर बिंबवली जाते. ती म्हणजे, काहीही ‘झालं तरी ओलिसाला जीवित ठेवणं हे अपहरणकर्त्याच्या दृष्टीनी जरूर असतं. तोच त्याचा पगार असतो. त्यामुळे त्यानी कितीही धमक्या दिल्या, हाल केले तरी तो जिवाला धोका करणार नाही’. या अंतिम सत्यावर विश्वास ठेवायचा. कारण त्या परिस्थितीत कशावर तरी विश्वास ठेवणं फार जरूर असतं. त्यानीच आपला समतोल सांभाळता येतो.
बर्याच देशांच्या नौदलाच्या बोटींनी त्या परिसरात गस्त घालायला सुरवात केली आणि हळुहळु परिस्थिती सुधारायला लागली. मात्र समुद्राचं क्षेत्रफळ इतकं अफाट आहे की जगातल्या सगळ्या नौसेना एकत्र आल्या तरी पूर्ण सुरक्षितता अशक्य आहे. त्यामुळे बोटींना जाण्यायेण्यासाठी IRTC (Internationally Recommended Transit Corridor) ठरवली गेली. या कॉरिडॉरमध्ये रक्षण करणं जास्त सोपं झालं पण तरीही चाचे बोटीवर चढण्याआधी नौसेना त्यांच्या मदतीला पोहोचू शकेलच असं सांगता येईना.
आज देशोदेशींचे जे Special Forces आहेत त्यांचं ट्रेनिंग आणि कुवत इतकी जबरदस्त असं आहे की ते कुठल्याही टेररिस्टला धुपवतील. मात्र त्यांची सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे ‘ओलीस’. धुमश्चक्रीत ओलीस कोण आणि टेररिस्ट कोण हे समजत नाही. ओलीस मरतात. शिवाय लवकरच टेररिस्टांचा नायनाट केला नाही तर ते ओलिसांना मारून टाकण्याची शक्यता असते. समीकरणात ‘ओलीस’ जर असतील तर या Special Forces ना एक हात मागे बांधून लढायला सांगण्यासारखंच असतं.
यामधून Citadel (बालेकिल्ला) ही संकल्पना बोटींवर वापरायचं ठरलं. कित्येक किल्यांच्या मधोमध एक बालेकिल्ला असायचा. बालेकिल्ल्याच्या भिंती जाड असतात, त्यात दारुगोळा आणि अन्न साठवलेलं असतं. शत्रू जर किल्ल्यात शिरलाच तर किल्लेदार बालेकिल्ल्यातून शेवटची झुंज देतो. (ज्यांनी Panic Room हा चित्रपट पाहिला आहे त्यांना याची कल्पना येईल.) बोटीवर एक असा सिटाडेल बनवलेला असतो. बहुतेक बोटी ह्याला इंजिनरुममध्ये बनवतात. यात जेवणखाण, पाणी, प्रथमोपचार आणि कम्युनिकेशन इक्विपमेंटदेखील असावी लागते.
चाच्यांनी पाठलाग सुरू केल्याबरोबर जवळपासच्या नौदलांना बातमी दिलेलीच असते. जर का चाचे बोटीचा ताबा मिळवणारच असं दिसायला लागलं तर सर्वांनी सिटाडेलमध्ये माघार घ्यायची आणि ही बातमी नौदलाला कळवायची. नौदल लौकरात लौकर सैनिक बोटीवर हेलिकॉप्टरनी उतरवतात. जो मनुष्य दिसेल तो चाचाच असणार याची खात्री असल्यामुळे काही मिनिटातच चाच्यांना संपवतात किंवा अटक करतात.
‘मर्स्क अलाबामा’ नावाच्या बोटीवर जे सोमालियाजवळ नाट्य घडलं त्याचा चित्रपट ‘कॅप्टन फिलिप’ खूप जणांनी पाहिला असेलच. जर कॅप्टन फिलिप चाच्यांच्या हाती सापडण्याआधीच सिटाडेलमध्ये परतला असता तर या नाट्यानी वेगळं वळण घेतलं असतं.
चाच्यांविरुद्धच्या या मोहिमेत भारतीय नौदलाचं चांगलंच योगदान आहे. जे चाचे शरण आले नाहीत त्यांना नौदलानी घपाघप उडवले. जे शरण आले त्यांना तुरुंगात टाकले. पण एक उपरोधिक सुविचार आहे. No good deed goes unpunished. चाच्यांनी भारतीय नाविकांवर बदला घेण्याचं ठरविलं.
‘M.T.Asphalt Venture’ नावाची बोट चाच्यांनी काबीज केली. त्या बोटीवर सात भारतीयांसह वेगवेगळ्या देशांचे लोक काम करंत होते. कालांतरानी बोटीच्या मालकाकडून खंडणी वसूल करून त्यांनी बोट आणि बाकी सगळे लोक सोडले पण त्या सात भारतीयांना बंदीच ठेवलं. बोटीच्या मालकाला आता बोट परत मिळाल्यामुळे इंटरेस्ट राहिला नाही. त्यामुळे या साता जणांना कोणीच वाली नव्हता. ते काही परत येणार नाहीत असं वाटायला लागलं होतं. सुदैवानी गेल्या वर्षी त्यांची सुटका झाली.
बाजारी अर्थव्यवस्थेत ग्राहक निर्माण झाला की विक्रेता निर्माण होतोच. असा एक काळ होता की युरोपच्या गुन्हेगारी जगतात (Underworld मध्ये) चाच्यांच्या ग्रुपचे शेअर विकत घेता येत होते! मिळाले तर वर्षभरात पैसे दसपट होऊन मिळतील नाहीतर शून्य!
हळुहळु का होई ना, हा कालखंड संपला. हत्यारबंद सैनिकांना जगभर राजमान्यता मिळाली.
कालखंड दोनः आजची परिस्थिती अशी आहे की चाच्यांचा धोका ज्या परिसरात आहे तिथून जर बोट जाणार असेल तर हल्ली हत्यारबंद सैनिक आधीच्या बंदरावरून घेतले जातात. साधारणपणे चौघांची टीम असते. टेहेळणीचं काम आमचं. बंदुका चालवण्याचं त्यांचं. दिवसा टेहेळणी सोपी. नुसत्या डोळ्यांनी आणि दुर्बिणीनी. रात्री मात्र आपले डोळे अगदीच कुचकामी. चाच्यांच्या होड्या लहान असल्या कारणानी रडारवर दिसत नाहीत. त्यासाठी Night Vision Binoculars आम्ही वापरतो. हा एक अफलातूनच प्रकार आहे. अंधार्या रात्री जेव्हां डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही अशी परिस्थिती असते तेव्हां हे वापरले की तीनशे मीटर दूरवर पाण्यावरचे तरंगदेखील स्पष्ट दिसतात. मात्र हिरव्या रंगात. ऍक्शन चित्रपटात हे आपल्याला बघायला मिळतं.
बोट ही एखाद्या वाळवंटात बांधलेल्या किल्ल्यासारखी असते. हल्लेखोराला लपायला अजिबात जागा नसते. त्यामुळे जर आपल्याकडे चांगल्या बंदुका असतील तर रक्षण करणं सोपं. आमच्या सिक्यूरिटी टीमकडे दोन प्रकारच्या गोळ्या असतात. एक फ्लेअर (flare). यानी फक्त झगमगीत उजेड पडतो. दिवाळीतल्या बाणांसारखा. ह्या आधी इशार्यासाठी (warning) मारतात. तरी चाचे थांबले नाहीत तर पुढच्या गोळ्या नॉर्मल. जीवघेण्या.
सुरवातीला चाचे एके ४७ वापरायचे. त्याची रेंज पाचशे मीटरपेक्षा कमीच असते. तेव्हां आमच्याही बंदुका साध्या असायच्या. पण कुठल्याही लढाईत arms race ही अपरिहार्यच असते. त्यांनी रशियन बनावटीच्याच पण जास्त लांब पल्ल्याच्या रायफल्स वापरायला सुरवात केल्यावर सिक्यूरिटी टीम्स त्याहून जास्त पल्ल्याच्या दुर्बीण असलेल्या sniper रायफल्स वापरायला लागले. sniper रायफल्सनी एके ४७ सारखा बेछूट गोळीबार केला जात नाही. एका वेळेस एकच गोळी उत्तम नेम घेऊन मारायची. तिला खूप अंतर कापायला लागत असल्यामुळे या गोळीवर वार्याचा खूपच प्रभाव पडतो. आणि समुद्रावर जमिनीपेक्षा नेहमीच वारा बराच जास्त असतो. त्यामुळे आता ते Large boreच्या स्नायपर रायफल्स वापरतात. जड गोळी त्यात ती अडीच हजार मीटर जायची म्हणजे रायफलचा खांद्याला दणका (recoil) जबरदस्त लागतो. एकदा मी सैनिकाला मस्का लावून गोळी चालवून बघितली होती. बोटीच्या पुढच्या टोकाला एक टारगेट लावलं होतं. एक फूट बाय एक फूटचा पत्रा. मी साधारण साठ फुटांवरून गोळी मारली. दणक्यानी बंदूक इतकी हलली की गोळी टारगेटच्या मधोमध सोडूनच द्या, पत्र्यालादेखील लागली नाही.
‘तेथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे.’ ही ओळ आठवली.
या व्यतरिक्त बोटीच्या मागच्या डेकला रेझर वायरनी वेढलेलं असतं. चाच्यांना या वायरला ओलांडून येणं खूपच अवघड असतं.
आपल्याला माहीतच असेल की Riot Police गर्दीला पांगवायला वॉटर कॅननचा उपयोग करतात. आमच्याकडे अग्निशमनासाठी जे होझेस् आणि नॉझल्स् असतात ते एक प्रकारचे वॉटर कॅननच असतात. त्यांचा उपयोग देखील चाचेशमनासाठी करता येतो. जेव्हां अडीच इंच व्यासाच्या नॉझलमधून दहा किलोग्रॅम गेज प्रेशरनी (घरच्या प्रेशर कुकरमध्ये साधारण एक किलोग्रॅम गेज प्रेशर असतं) पाणी कोणाच्याही अंगावर मारलं की एखाद्या मुष्टियोध्यानी एकानंतर एक न थांबता ठोसे मारल्याचा इफेक्ट येतो. कोणताही मनुष्य त्याच्या विरुद्ध चालू देखील शकत नाही. उभीच्या उभी लोखंडी भिंत चढणं तर विसराच.
एकंदर काय, तर आता या सुरक्षा व्यवस्थेचा चांगला जम बसला आहे. निदान सोमालियाच्या बाबतीत तरी. मात्र आता नायजेरियाच्या पश्चिमेला हा प्रश्न बोटींना भेडसावतोय. भरीस भर म्हणजे नायजेरियाचं सरकार बोटींना स्वतःचे बंदूकधारी रक्षक ठेवायला परवानगी देत नाही. नायजेरियन रक्षकच घ्यावे लागतात. आणि त्यांच्या सैनिकांवर आपल्याला भरोसा वाटत नाही.
तिथले चाचे तेलवाहू बोट (टॅन्कर) काबीज करतात. त्यांच्याकडे स्वतःची एक छोटी तेलवाहू बोट असते तिला या मोठ्या बोटीला बांधतात, हजारो टन तेल या बोटीतून त्यात ट्रान्स्फर करतात आणि मग सोडून देतात. या सगळ्या द्राविडी प्राणायामाला साधारण सहा दिवस लागतात. तोपर्यंत बोटीशी संपर्क तुटलेला असतो. सरकारात चांगलेच लागेबांधे असल्याशिवाय चाच्यांना इतकी मोठी चोरी करता येणार नाही पण पुराव्यानिशी सिद्ध करणं अजून काही शक्य झालेलं नाही.
एकंदर जगात सगळीकडेच इतकी अशांतता पसरली आहे की त्या मानानी आज चाचेगिरी फारशी धोकादायक राहिलेली नाही असं म्हणायला हरकत नाही.
एकदा रशियन नौदलानी आम्हाला संरक्षण दिलं होतं त्यावेळचे दोन फोटो.
बोटीबद्दलच्या आधीच्या लेखांच्या लिंक्स
http://www.maayboli.com/node/56300
http://www.maayboli.com/node/56385
मस्त लेख
मस्त लेख
छान लेख. एकुणच तुमचे अनुभव
छान लेख. एकुणच तुमचे अनुभव वेगळेच असतात. वाचायला मजा येते पण ...
छान लेख. एकुणच तुमचे अनुभव
छान लेख. एकुणच तुमचे अनुभव वेगळेच असतात. वाचायला मजा येते >>> +१
खुप मस्त लेख आवडला.
खुप मस्त लेख
आवडला.
छान लेख.
छान लेख.
आवडलं लिखाण बरीच नवीन माहिती
आवडलं लिखाण
बरीच नवीन माहिती पण कळली
धन्यवाद __/\__
नेहमीप्रमाणेच थरारक. या
नेहमीप्रमाणेच थरारक.
या क्षेत्राबद्दल किती कमी लेखन आहे मराठीत . एकतर माझ्या अंदाजाप्रमाणे या क्षेत्रात मराठी टक्का कमी आणि त्यातून लिहिते हात आणखी विरळा.
आम्ही मायबोलीकर भाग्यवान !
नायजेरियाच्या पश्चिमेला
नायजेरियाच्या पश्चिमेला म्हणजे पोर्ट हारकोर्ट ला का ? मी तिथे दोन वर्षे काढली आहेत ( १९९६-९८ ) पण तेव्हाही तो भाग सुरक्षित नव्हताच नंतर तिथे खलाश्यांना ओलिस धरायचे अनेक प्रकार झाले. आणि नायजेरीन सरकार म्हणाल तर ते कधीच अस्तित्वात नव्हते !
सोमालियातले बरेच लोक आता केनयात दिसतात. त्यांच्याकडे भरपुर पैसा असतो आणि घरे वगैरे ते रोख पैसा देऊन खरेदी करतात. नैरोबीतल्या काही जागा तर त्यांनी पुर्णपणे व्यापल्या आहेत ( त्यांना स्थानिक गुजराथी वरीया म्हणतात, नकी माहित नाही पण वरून आलेले असा अर्थ असावा ) खास त्यांच्यासाठी शाळा पण आहेत. त्या बायका स्वतः दुकानेही चालवतात ( हा प्रराक्रम गेली अनेक वर्षे केनयातल्या गुजराथी बायका करत होत्या ) वाणी अगदी मिठ्ठास असते त्यांची.
मस्त लिहिलंय. दिनेशदा +१
मस्त लिहिलंय.
दिनेशदा +१
छान लेख!!!
छान लेख!!!
जबरदस्त लेख.. वाचू तितके कमी
जबरदस्त लेख.. वाचू तितके कमी आहे या विषयावर.. ईंटरेस्ट तसाच राहतो ..
आम्ही मायबोलीकर भाग्यवान .... +७८६
मस्त लेख इंटरेस्टिंग विषय आहे
मस्त लेख
इंटरेस्टिंग विषय आहे हा
मस्त लिहिलंय..
मस्त लिहिलंय..
मस्त लेख. मला वाचताना कॅप्टन
मस्त लेख. मला वाचताना कॅप्टन फिलिपची आठवण येत होती आणि तुम्ही देखील उल्लेख केला आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंच भाग्यवान आहोत आपण
खरंच भाग्यवान आहोत आपण माबोकर्स..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इतक्या अनोळख्या दुनियेबद्दल इतकी सविस्तर माहिती मिळत आहे तुमच्यामुळे.. धन्यवाद!!!
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लेख!!
मस्त लेख!!
अप्रतिम लेख ! समुद्रावरील
अप्रतिम लेख !
समुद्रावरील जीवनावर प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेलं कांहीं मराठीत [ भाषांतरीत नसलेलं ] वाचायला मिळणं दुर्मिळच !!
मस्त लेख..
मस्त लेख..
इतक्या अनोळख्या दुनियेबद्दल
इतक्या अनोळख्या दुनियेबद्दल इतकी सविस्तर माहिती मिळत आहे तुमच्यामुळे.. धन्यवाद!!! >>>>+१११११
अरे व्वा फोटो पण मस्तच.
अरे व्वा फोटो पण मस्तच.
सर्वजण, मनापासून
सर्वजण,
मनापासून धन्यवाद.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील.
काही प्रकाशचित्रं आज मी त्यात वाढवली आहेत. इथे ती टाकायला त्यांचा आकार कमी करावा लागतो त्यामुळे त्यांची क्लॅरिटी खूपच कमी झाली आहे. क्षमस्व.
दिनेश - पोर्ट हारकोर्टबरोबरच लेगॉस, फोर्काडोस वगैरे. तुम्ही तिथे राहिलात हे कौतुकाचंच आहे. आम्हाला आमच्या स्थानिक एजंटनी सक्त ताकीद दिली होती. मी किंवा तिथला चर्चचा पाद्री यांव्यतरिक्त कोणाहीबरोबर बाहेर जायचं नाही!
आम्ही तिथे असतानाच एक लग्न अटेंड करून तीन गाड्यांचा ताफा घरी परत होता. तीन गाड्या एकत्र म्हणजे निदान शहरात तरी सुरक्षित असं कोणालाही वाटेल. पण त्यांचा ताफा अडवून लुटला गेला. पैसे, दागिने, घड्याळं आणि तीनही गाड्या चोरीस तर गेल्याच, पण बायकांच्या ज्या कपड्यांना जर लावलेली होती ते कपडे देखील काढून नेले!
सिंडरेला - कॅप्टन फिलिपच्या चुकीमुळे आम्हाला धोक्यात पडावं लागलं असा दावा बोटीवरच्या बाकीच्या लोकांनी त्याच्यावर दाखल केला आहे. हा चित्रपट बनण्याच्या खूप पूर्वीच नॅशनल जॉग्रफिकवर या घटनेवर प्रोग्रॅम दाखवला होता.
मस्त लेख!
मस्त लेख!
नवीन आणि रोचक माहिती मिळाली.
नवीन आणि रोचक माहिती मिळाली. तुमची लेखनशैली फार आवडते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लेख
मस्त लेख
फारच सुरेख आणि माहितीपूर्ण
फारच सुरेख आणि माहितीपूर्ण लेख! ह्या विषयावर इतक्या अधिकारवाणीने मराठीतून लिहिणारे फारच कमी असतील. त्यामुळे तुमचे आभार! अजून जरूर लिहा!
सुंदर...नविन माहिती मिळाली...
सुंदर...नविन माहिती मिळाली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच मस्त लिहिलयं..लिहित
खुपच मस्त लिहिलयं..लिहित राहा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो पन भारीच..
मलासुद्धा कॅप्टन फिलीप्स आठवला
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा, फोटो मस्तच ...
वा, फोटो मस्तच ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages