सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .
सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!
सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .
सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!
सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस
सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड
ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड
२०१४ च्या मार्चमध्ये चांगलं सायकलिंग सुरू राहिलं. शतक केल्यानंतर काही दिवसांनी अजून एक राईड केली. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर सायकल चालवली. प्रत्येक राईडची वेगळीच मजा असते. आणि जरी एकाच रूटवर सायकल चालवली, तरी प्रत्येक दिवशी वेगळी मजा येते.
ह्या राईडसाठी दुपारी साडेतीनला निघालो. मोठी राईड नाहीय, फक्त चाळीस किलोमीटर परिसरात फिरायचं आहे. गूगल मॅपवर रूट ठरवला आणि निघालो. ह्या राईडमध्ये दोन धरण बघायला मिळतील. भामा असखेड डॅम रस्त्यावर जाईन आणि ते दूरूनच बघेन आणि येताना जाधववाडी डॅम बघेन व भंडारा डोंगराला वळसा घालून येईन. साधा, कच्चा आणि खराब असे सर्व रस्ते चाकांखाली येतील. मार्च महिना असल्यामुळे गरम होतं आहे आणि वाटेतही हिरवळीऐवजी रखरखीत भाग जास्त दिसतोय.
शरद जोशींचं घर आणि शेतकरी संघटनेचं कार्यालय
ह्या परिसरात औद्योगिकीकरण बरंच वाढत आहे. त्यामुळे हायवेपासून बरंच आतपर्यंत कंपन्या दिसतात. हळु हळु इंडस्ट्रियल एरिया संपला आणि रस्ता ग्रामीण भागामध्ये आला. दुपार असल्यामुळे खूप गरम होतंय, पण हळु हळु वातावरण हलकं होत जाईल. मानवी वस्तीपासून निसर्गाच्या जवळ जाताना लगेच ताजेपणा मिळतो. एक शांतता! आणि ती आपल्याला रिचार्ज करते.
भामचन्द्र गिरी- इथे जायचं बाकी आहे
पुढे अगदी कच्चा रस्ता लागला. काही वेळ संभरम झाला. पण पुढचा रस्ता मिळाला. ह्या परिसरात हॉटेल नाहीय. मला नाश्त्यासाठी थांबावं लागेल. पुढे जात राहिलो. एक चढ लागला. कडक ऊन्हात तो पार केला. इथे छोटा घाट असावा. एक तिठा आहे. दोन लोक बसलेले दिसले, पण हॉटेल नाहीय. इथून थोडं पुढे गेल्यावर दूरवरून भामा असखेड धरण दिसलं. सकाळी आलो असतो तर तिथे जाऊ शकलो असतो. आता पुढे जाणं शक्य नाही आहे, कारण परत जाताना मला हायवेवरून जायचं आहे आणि त्यावर हेवी ट्रॅफिक आहे. त्यामुळे रात्र होण्याच्या आत हायवेवरून गेलेलं ठीक राहील.
दूरवरून दिसणारं भामा असखेड धरण
तिठ्यानंतर चांगला रस्ता मिळाला. आता जाधववाडी डॅमजवळून इंदुरीला जाईन. इथेही अनेक कंपन्या लागल्या. एक हॉटेलही मिळालं. इथे छोटी गावं आणि बरीच वस्ती आहे. पुढे जाधववाडी धरण लागलं. पण रस्ता परत कच्चा झाला. अर्थात् इंदुरी इथून फक्त पाच किलोमीटर आहे आणि समोर भंडारा डोंगर दिसतोय. थोडा वेळ डॅमजवळ थांबलो आणि निघालो. अडवलेलं पाणी असूनही सुंदर आहे.
दूरवरून जाधववाडी डॅम आणि भंडारा डोंगर
पुढे रस्ता आणखी खराब झाला आणि भंडारा डोंगराच्या पायथ्याशी येईपर्यंत तसाच राहिला. हळु हळु इंदुरी गावाची वस्ती सुरू झाली आणि मगच रस्ता ठीक झाला. मन किती अस्वस्थ असतं! चांगला रस्ता मिळाला आणि पुढे हायवे आहे, ह्याची शाश्वती मिळाली. त्यानंतर किती बरं वाटलं! पण गंमत म्हणजे मी तसाही रस्त्यावरच होतो, एखाद्या दरीत किंवा दुर्गम डोंगरात नव्हतोच, तरी मन अस्वस्थ होतं! असो. इंदुरीमध्ये परत थोडा नाश्ता केला. आता अंधार पडायच्या आत घरी पोहचायचं आहे. खराब रस्त्यांवर सायकल चालवल्यानंतर हायवेवर सायकल चालवणं मस्त वाटलं. उरलेला टप्पा लवकरच पूर्ण झाला आणि अंधार वाढायच्या आत घरी पोहचलो. नंतर बघितलं तर कळालं की, मी ४८ किलोमीटर फक्त साडेतीन तासांमध्ये गेलो. आणि मध्ये मध्ये रस्ता कच्चा व खराबसुद्धा होता.
ह्या दिवसांमध्ये सायकल तर मस्त चालवली, पण हळु हळु एक कटु सत्य समोर आलं. मी ज्या गोष्टीसाठी इतकी सायकल चालवत होतो, ती होणार नाहीय. २०१४ मध्ये लदाख़ला सायकलवर जाणं मला जमत नाहीय. मी ती योजना सोडून दिली आहे. त्याचे तपशील ठरवले होते, कसं, कुठे जायचं हे ठरवलं होतं. पण काही कारणांमुळे जाता येणार नाही. जेव्हा हे निश्चित झालं तेव्हा काही काळासाठी सायकल 'पंक्चर' झाली! किंवा सायकलच्या स्वप्नाचा फुगा फुटला! त्यामुळे मार्चमध्ये इतकी सायकलिंग होऊन आणि मस्त टेंपो मिळूनही नंतर मोठी गॅप आली. नंतर फक्त चाकण ते पुणे हीच एक राईड झाली व त्यानंतर दोन महिने सायकल फक्त उभी होती.
भंडारा डोंगराच्या पायथ्याजवळून जाणारा रस्ता
रूटचा पहिला टप्पा
रूटचा दुसरा टप्पा
जेव्हा जेव्हा आपण धडपड करतो, तेव्हा एखादं उद्दिष्ट असतं. जर ते उद्दिष्ट नसेल, तर आपण दिशाहिन होतो. हेच झालं. काही काळासाठी सायकल थांबली. पण इतकी चांगली मैत्री झालेली होती, ती सोबत कशी थांबणार! सायकल तर चालवणारच आहे. जे काही होतं, ते चांगलंच होतं. जर आपल्याला चूक वाटत असेल तर त्याचा बहुतेक वेळेस हाच अर्थ असतो की, आपल्या विचारसरणीमध्ये कुठे तरी खोट आहे. जर लदाख़ला गेलो जरी असतो, तरी तयारी अगदीच कमी होती. त्यामुळे ह्या दोन- तीन महिन्यांच्या गॅपचाही फायदा झाला. नंतर जेव्हा परत सायकल चालवणं सुरू केलं, तेव्हा अनेक गोष्टी कळाल्या. असो.
पुढील भाग १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
खुप छान लिहिलेय, पुढील
खुप छान लिहिलेय,
पुढील टप्प्यास शुभेच्छा!
गावातली सफर मस्तच
गावातली सफर मस्तच
भारीच आडबाजुला खराब
भारीच आडबाजुला खराब रस्त्यांवरुन फिरला आहेस की. अन तरीही अॅव्हरेज चांगलेच मिळाले.
फोटोही लय भारी. भन्नाट.
छान लिहीलय.
इतकी वर्षे पिंचीमधे राहुनहि कधी कुठे गेलो नाहिये ते लेख वाचल्यावर प्रकर्षाने जाणवतय.