काय परीक्षण लिहू.... थिएटरमधील दिवे लागले तरी काही काळ दिसेनासे झालेले. ईतके अश्रूंचे थेंब पापण्यात साठलेले. तरी काही निरीक्षणे नोंदवतो, तेच परीक्षण समजा.
१) या वर्षातला "मी पाहिलेला" सर्वात उत्कृष्ट चित्रपट.
२) स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेची जोडी पुन्हा एकदा हिट.
३) चित्रपट हसवतो, चित्रपट रडवतो, क्लायमॅक्सला अशी काही उंची गाठतो की पुन्हा पुन्हा पाहावे आणि पुन्हा पुन्हा डोळ्यात पाणी यावे.
४) मुन्नाभाईच्या सिक्वेलसारखी करामत मुंबई पुणे मुंबईच्या सिक्वेलनेही केली आहे.
५) आधी मला वाटलेले हा चित्रपट ‘हम आपके है कौन’ सारखा सूरज बडजात्या स्टाईल लग्नाची विडिओ कॅसेट असेल. मात्र अंदाज सपशेल फसला. लग्नाच्या बोहल्यावर चढताना, आयुष्यभराचा जोडीदार निवडताना, आपले आयुष्य बदलवून टाकण्याची शक्यता असणारा हा निर्णय, एकदा लग्न झाले की पुन्हा सहजपणे बदलता न येणारा असा हा निर्णय आपण घाईघाईत आणि चुकीचा तर घेत नाही ना आहोत, यात मुक्ताचा जो वैचारीक गोंधळ दाखवला आहे ते एका स्त्रीच्या द्रुष्टीकोनातून ईतक्या प्रभावीपणे आजवर कुठल्याही चित्रपटात मांडले नसावे. हिच या चित्रपटाची कथा आहे, हाच या चित्रपटाचा गाभा आहे.
६) चित्रपटाचे नाव मुंबई-पुणे-मुंबई असले तरी मुंबई-सोलापूर, पुणे-कोल्हापूर काहीही चालले असते. यात मुंबई विरुद्ध पुणे हा वाद चवीपुरताच आहे. दोघे एकाच शहरातील दाखवले असते तरी वर सांगितलेल्या चित्रपटाच्या मूळ गाभ्याला धक्का लागला नसता.
७) हिरोईनने ड्रिंक्स घेणे, कामानिमित्त रात्री उशीरापर्यंत बाहेर राहणे, तिचे आधीचे अफेअर असणे, ते तुटल्यावरही त्याच्याशी मैत्रीचे संबंध राखून असणे. चित्रपटात एक आधुनिक स्त्री दाखवताना स्त्री-पुरुष समानता अश्या काही गोष्टींतून दाखवली जाते, तसेच याला समाजाने स्विकारले आहे असेही दाखवले जाते. यात हे स्विकारणे सहजपणे आले आहे. एक प्रेक्षक म्हणूनही आपल्याला यात काही वावगे वाटत नाही. एका मराठी चित्रपटासाठी हे यशच आहे.
८) मुक्ताच्या कॅरेक्टरने याच वर्षात पाहिलेल्या तनू वेड्स मनूची आठवण काही ठिकाणी करून दिली. मात्र तो चित्रपट (मला आवडला असला तरी) बरेच ठिकाणी विस्कळीत आणि अतार्किक वाटलेला, हा अचूक बांधला गेलाय.
९) यात तीन कॅरेक्टर असले तरी हा लव ट्रॅंगल नाहीये. चांगल्या लोकांशी काही वाईट होऊ शकत नाही आणि खर्या प्रेमाची कधी ट्रॅजेडी होऊ शकत नाही हे फील गूड वातावरण चित्रपटभर राहते.
१०) मुक्ता बर्वेच्या अभिनयाबाबत शंकाच नव्हती, तिच्यासाठी ही भुमिकाही परफेक्ट होती. पण कित्येक द्रुश्यात स्वप्निलही आपल्या अभिनयाची छाप सोडून जाईल असे खरेच वाटले नव्हते. खास करून चित्रपटाच्या दुसर्या भागात, जेव्हा आपल्यातील अल्लड कॅरेक्टरला जपत तो त्यासोबत प्रगल्भपणाही दाखवतो. स्वप्निलला अश्या भुमिकांसाठी शुभेच्छा.
११) प्रशांत दामले हा रंगभूमी गाजवणारा अवलिया मोठ्या पडद्यावर फारसा दिसत नाही. याला या निमित्ताने बघून घ्या. काय कमाल टायमिंग आहे या माणसाची. हा कधी आपल्या विनोदांनी खळखळून हसवतो तर कधी आपल्या प्रसन्न वावराने चेहर्यावर हास्य फुलवतो.
१२) सुहास जोशी, आसावरी जोशी, सविता प्रभुणे, विजय केंकरे .. हे दोन्हीकडचे सहाय्यक कलाकार आपापली भुमिका आपल्या लौकिकाला जागत चोख बजावतातच, पण यांच्या कास्टींग बद्दल फुल मार्क्स द्यायला हवेत.
१३) गाणी फार काही सुपरहिट नाहीत, जी सिनेमा संपल्यावर गुणगुणत बाहेर पडावे. मात्र बोअरही करत नाहीत. श्रवणीय आहेत.
१४) संवाद मात्र मस्त आहेत. बरेच द्रुश्यात रंगत भरायचे काम संवाद करतात. मग ते चुरचुरीत संवाद असो वा इमोशनल. मस्त मस्त मस्त.
१५) हा माझ्यासारख्या वाह्यात मुलालाही आवडला तर डिसेंट कॅरेक्टरमध्ये मोडणार्या माझ्या ग’फ्रेंडलाही आवडला. हा कोणालाही आवडू शकतो. हा तुम्हालाही आवडेल. आम्ही दोघेही आता आमच्या घरच्यांनाही हा दाखवायचा प्लान बनवत आहोत, म्हणजे हा मागच्या पिढीलाही आवडेल असा आम्हाला विश्वास आहे
- ऋन्मेऽऽष
.......................................................................................................
.......................................................................................................
आधीचा धागा >
मुंबईकर आणि पुणेकर या दोन वृत्ती आहेत, दोन स्वभाव आहेत, दोन भिन्न पैलूंची व्यक्तीमत्वे, दोन जीवनपद्धती आहेत.. वगैरे वगैरे पाल्हाळ मी लावणार नाही कारण हे सर्वांनाच ठाऊक आहे. फक्त उदाहरणे प्रत्येकाच्या अनुभवाप्रमाणे बदलतील.
तर, ही दोन अडीज तासांच्या अंतरावर असलेली दोन शहरे. पण तरीही दोन ध्रुवांवरची असल्यासारखी त्या शहरांतील दोन माणसे. जेव्हा एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडतात, तेव्हा काय धमाल ऊडू शकते, याची चुणूक आपल्याला मुंबई-पुणे-मुंबईच्या पहिल्या भागात दिसली. ज्यांनी तो काही कारणांनी मिसला असेल, शक्यता कमीच आहे, तरीही त्यांनी हा रिलिजायच्या आधी पहिला भाग नक्की बघा. स्वप्निल आणि मुक्ताची यात जशी केमिस्ट्री जमलीय त्याला तोड नाही, या एकाच कारणासाठी ‘मुंबई-पुणे-मुंबई १’ तुम्हाला हमखास आवडेल. त्याऊपर यात आपल्या मुंबई-पुण्याचा आपलेपणाचा एक स्पेशल तडकाही आहे.
पहिल्या भागाची लिंक - https://www.youtube.com/watch?v=jblvKuq_a_k
असो, तर बस्स तीच चटकदार केमिस्ट्री पुन्हा घेऊन आता त्याचा दुसरा भाग येतोय. एक झलक खालच्या लिंकवर बघू शकता.
मुंबई पुणे मुंबई २ - ऑफिशिअल ट्रेलर https://www.youtube.com/watch?v=rmJnb3vMjqM
याच चित्रपटाची चर्चा करायला हा धागा.
........................................................
चर्चेसाठी मुद्दाम वेगळा धागा का?
तर,
1) हा एक बहुचर्चित "मराठी" चित्रपट आहे.
2) पहिल्या आठवड्यात चित्रपट बघून आलेले यावर परीक्षण लिहीतीलच याची खात्री नसते.
3) बरेच चांगले मराठी चित्रपट लोकांपर्यंत वेळीच न पोचल्याने मरतात. असे या चित्रपटाबाबत होऊ नये असे वाटते.
4) याच चित्रपटाबाबत मला हा जिव्हाळा का यामागचे कारण स्वप्निल जोशी किंवा मुक्ता बर्वेचा मी फॅन आहे असे नसून "मुंबई पुणे मुंबई - १" या चित्रपटाचा मी फॅन आहे. हा माझा अत्यंत आवडता (क्रमांक 2 चा) मराठी चित्रपट आहे. कधीही, कितीही वेळा आणि कुठूनही सुरू करून मी हा बघू शकतो. आणि तितक्याच वेळा यातील "कधी तू" हे गाणे ऐकू शकतो.. नव्हे ऐकतो
5) हिंदी चित्रपटांतील खान सुपरस्टार्सचा एक पॅटर्न आहे. सलमान ईदला चित्रपट काढणार, आमीर दिवाळीला चमकणार, तर नाताळचा रोमांटीक सीजन शाहरूखचा. पण यंदा मराठीत एक ब्लॉकबस्टर चित्रपट हिंदी सिनेमांना टक्कर देत ऐन दिवाळीला प्रदर्शित होतोय. तर तो जास्तीत जास्त चालावा हीच ईच्छा. (ब्लॉकबस्टर का याचे उत्तर वरची ट्रेलरची लिंक बघून समजेल. तो फील प्रोमो बघूनच येतोय. आम्हा मुंबईच्या पोरांना काही चित्रपट पोस्टर बघूनच समजतात की सुपरहिट जाणार की सुपरफ्लॉप.)
6) मराठी चित्रपट बरेचदा एकेका साच्यात अडकत आलाय. कधी तमाशापटच बनायचे, तर कधी ग्रामीण बाजाची चलती होती. मग एक नॉनसेन्स कॉमेडीचा काळ आला. त्यानंतर एक गेला काळ होता, ज्यात व्यावसायिक फॅक्टर दुर्लक्षून पुरस्कार मिळवायलाच मराठी चित्रपट बनताहेत का असे वाटू लागलेले. मग हळूहळू व्यावसायिक बाबींकडेही ध्यान दिले जाऊ लागले, पण ते ऐटीत जमवायला दुनियारीपर्यंत वाट बघावी लागली. तरीही मोठमोठे कलाकार घेत ‘हम आपके है कौन’ पठडीतील एक फॅमिली मनोरंजनपट बनवावा हे कोणाला सुचले नव्हते, वा सुचले तरी प्रभावीपणे जमले नव्हते. अखेर मुंबई पुणे मुंबईची सुपरहिट जोडी घेत आता हा चित्रपट येऊ घातलाय. हा चित्रपट एक ट्रेंड सेट करायची शक्यता आहे. तर आपणही या बदलाचे स्वागत करायला हवे.
७) ...........
८) ...............
९) .....
हे तुम्ही भरा,
साथ दे तू मला - https://www.youtube.com/watch?v=i0Cj7FwEDnY
एंजॉय
अॅडवान्समध्ये धागा काढलाय, त्याचा फायदा उचलत अॅडवान्स बूकिंगच करा.
- १२ नोव्हेंबर
मी आज पाहिला. मस्तच आहे
मी आज पाहिला. मस्तच आहे सिनेमा. काल कट्यार पाहिला आणि आज हा. म्ह णजे केशर वेलची घातलेली उत्तम बर्फी आणि मग बेल्जिअन चॉकोलेट आइस क्रीम अशी अवस्था झालेली आहे.
सर्वात प्रथम स्वजो फारच गोड आणि बारिक दिसलेला आहे.. मुक्ताचे कपडे व दिसणे मस्त. तिची लाल पँट व काळा कुर्ता फारच सुरेख दिसतो. मुलांना विचार करायला निर्णय घ्यायला त्यांची स्पेस देणे आवश्यक आहे. हे अतिशय नाजूक व फर्म पद्धतीने सांगितले आहे. अगदि सहज सर्व फ्लो होते. संवाद अति उत्तम लिहीलेले आहेत. मुक्ताची चूक तिला समजून येइ परेन्त जरी स्वतःला त्रास झाला तरी गप्प बसेन पेशन्स ठेवेन हा स्वप्निल च्या कॅरेक्टरचा विचार इतका अगदी अगदी
वाटवून गेला. बेस्ट गाइज डू कम फ्रॉम पुना. असे राहून राहून वाटते सिनेमा बघताना. स्वप्निल, तयाचे बाबा, अर्ण व,
अर्णव हे वेग ळे रसायन आहे. जास्त ग्लोबल. पॉलिश्ड निळे डोळे. पण स्वप्निल सर्व संवादात बाजी मारतो.
मुक्ता स्वप्निलचे भांड्ण होते अर्णव समोर तो प्रसंग, नरिमन पॉइंटच्या तिथे दोघे बसतात तो संवाद सुरेख घे तला आहे.
त्याला उकडते ते ही अगदी नॅचरल.
फार्म हाउसला जाताना गाण्यात एक ठिकाणी स्वप्निल लाल जॅकेट घालून सीन मध्ये येतो तेव्हा अगदी किलर दिसतो.
रुन्मेष नक्की तसे जॅकेट घेइल. असे वाटून गेले. सर्व आर्ट डिरेक्षन चांगले आहे. त्यांचे मुंबईचे घर, छोटे टेरेस गार्डन,
तिथला नर्म रोमांन्स. फार सुखद.
मध्यांतरा नंतर सिनेमा जरा जरा सिरीअस होतो. वाड्याचे नेपथ्य अगदी सुरेख दिसते. पुणे- मुंबई फरक सटली दाखवले आहेत. संवादात पण आहेत. पण अति करत नाहीत. स्वप्नि ल ते एक प्रभाव अशी अॅक्षन कर तो तेव्हा त्याचे फॅन्स अगदी
खूश होतील.
छान आहे लग्न.
सरप्राईझ एलिमेन्ट ट्रेलरने
सरप्राईझ एलिमेन्ट ट्रेलरने राखुन ठेवलाय हे विषेश आहे मग, कारण अर्णव चा उल्लेख इतक्या वेळा आधिच्या भागात आला की पुढच्या भागात तो असेलच कुठेतरी अस वाटतच होत मला...
बरा आहे मला आवडला. माझ्या
बरा आहे मला आवडला. माझ्या डोळ्यात नक्कीच पाणी आले.
आमच्या मालकीण बाईंना आवडला नाही. चिरंजीवांना घेऊन गेलो होतो. त्यांना मराठी टीव्ही सिरीयल (जी ते बघू शकत नाहीत) मोठ्या पडद्यावर दाखवत आहेत असे वाटले. (थोडक्यात १ विरूध्द २). पण ठिक आहे. कंटाळा येत नाही.
आज कालच्या मुली गौरी (मुक्ता) इतक्या कन्फ्युजड माझ्या पहाण्यात तरी नाहीत. (जरा अतीच दाखविले/ताणले आहे). शेवटी गौरीचे एक्सप्लनेशनही गंडले आहे.
लाल जॅकेट >> ते लॉकेट
लाल जॅकेट >> ते लॉकेट देतानाचे ना, जी फॉर गौरी आणि जी फॉर गौतम .. प्रभाव
छोटे टेरेस गार्डन, तिथला नर्म रोमांन्स. फार सुखद >>> अगदी अगदी. मी प्रसंगानुरूप सविस्तर लिहिले असते तर हे वर आवर्जून टाकले असते.
स्वप्निलबाबत मी मुद्दाम अति लिहिणे टाळले, उगाच तेवढेच निमित्त नको. पण चित्रपट बघून आलेले यातील स्वप्निल आवडला हे सांगतील नक्की.
रीयाजी, शनिवारी बघितला का
रीयाजी, शनिवारी बघितला का पिक्चर.. आवडला तर आवडला, नाय तर नाय, काय तर सांगा
नाही बघितला शनिवारी आम्हाला
नाही बघितला
शनिवारी आम्हाला वर्किंग होतं आणि रविवारी हाऊसफूल होते आमच्या घराजवळचे शोज
या आठवड्यात बघेन
आज कालच्या मुली गौरी (मुक्ता)
आज कालच्या मुली गौरी (मुक्ता) इतक्या कन्फ्युजड माझ्या पहाण्यात तरी नाहीत. (जरा अतीच दाखविले/ताणले आहे). शेवटी गौरीचे एक्सप्लनेशनही गंडले आहे.>>>सह्मत
माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण गौरी आणि तिच्या वडिलांचे संभाषण आणि हळुवार नाते. जे मी पर्सनली रिलेट करू शकले.
पण ज्या अपेक्षेने पहायचा होता चित्रपट, तितका नाही आवडला. मुंबई पुणे मुंबई (१) खूप जास्त चांगला होता.
शिवाय कट्यार पाठोपाठ हा पाहिल्याने कट्यार जास्त चांगला वाटला
आवड्ला पिक्चर. >>>>> शिवाय
आवड्ला पिक्चर.
>>>>> शिवाय कट्यार पाठोपाठ हा पाहिल्याने कट्यार जास्त चांगला वाटला>>> ह्या दोन पिक्चरची तुलनाच नाही होउ शकत. वेगळे आहेत दोन्हि.
कट्यार सुप्पर च आहे. पण हा ही मस्त आहे.
आज कालच्या मुली गौरी (मुक्ता)
आज कालच्या मुली गौरी (मुक्ता) इतक्या कन्फ्युजड माझ्या पहाण्यात तरी नाहीत. (जरा अतीच दाखविले/ताणले आहे). शेवटी गौरीचे एक्सप्लनेशनही गंडले आहे>>> असेच वाटले
पहिला भाग जास्त छान होता. हाही आवडला. एकदा बघायला चांगला आहे.
ऋन्मेऽऽष चे पॉईंट ६ आणि ७ ही पटले आणि आवडले.
सुहास जोशी, आसावरी जोशी आणि विजय केंकरे खास. वडिल आणि मुलीमधले नाते छान दाखवले आहे.
बाकी स्वप्निल बारिक झाला ते बरे झाले चांगला दिसतो सिनेमात.
खुप छान...
खुप छान...
हो. मी पाहिलेला सकाळचा 9 चा
हो. मी पाहिलेला सकाळचा 9 चा शो सुद्धा हाऊसफुल्ल होता.
आता कट्यार साठी बूक माय शो चेक करत होतो तर या दोन्ही चित्रपटांचे शो बर्यापैकी भरलेले दिसत आहेत.
दोन वेगळ्या धाटणीचे पण उत्तम मराठी चित्रपट हिंदीला टक्कर देत एकाच दिवशी प्रदर्शित होणे आणि दोघांनाही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणे हे चित्र बरेच दिवसांनी किंवा माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच दिसतेय.
पहिल्या आठवडय़ाच्या अखेरीस हे
पहिल्या आठवडय़ाच्या अखेरीस हे दोन्ही चित्रपट सात कोटी रुपयांच्या घरात पोहोचले असून दोन्ही चित्रपटांनी जवळपास सारखीच कमाई केल्याचे चित्र दिसते आहे. दोन चांगले मराठी चित्रपट एकत्र प्रदर्शित झाल्याचा परिणाम तिकीटबारीवर दिसून येतो आहे.
‘मुंबई पुणे मुंबई २’ या चित्रपटासाठी लोकांची मागणी वाढल्याने गेल्या आठवडय़ात शोजची संख्या ५८७ होती ती ६८० पर्यंत वाढवण्यात आली असून आता कतार, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लंडन येथेही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाच्या सूत्रांनी दिली.
- लोकसत्ता
http://www.loksatta.com/manoranjan-news/mumbai-pune-mumbai-2-and-katyar-...
शो वाढवलेतच, तर हाऊसफुल्ल बघून परतू नका, पुढचा विकेंड राखून ठेवा
पाहिला मी, हलका फुलका सिनेमा
पाहिला मी, हलका फुलका सिनेमा म्हणून ठिक आहे, अॅक्टींग परफॉर्मन्सेस , कास्टींग , गाणी वगैरे आवडली पण आता मुक्ता सारखं माझं कनफ्युजन झालय , नक्की इतरांनी पाहिलेला सिनेमा मी पाहिला कि दुसराच कुठला यात कनफ्युजन होतय कारण सगळ्यांना खूपच आवडला! इमोशनल वाटला वगैरे रिव्ह्युज वाचले होते इथे , मला तरी कथानक काही झेपलं नाही !
बर्याच तृटी दिसल्या !
१. मुंबई पुणे मुंबई -१ मधे आणि या सिनेमात नक्की किती काळ लोटलाय ?
स्वप्नील दिसतो पार्ट १ सारखाच ( तिथेही गुटगुटीत बालक आणि इथेही) पण मुक्ता फारच मोठी दिसायला लागलीये एकदम, पहिल्या सिनेमापेक्षा १० वर्षांनी मोठी दिसतेय एकदम :(.
हेअरस्टाइल सुध्दा वेगळी , ही तीच व्यक्ती का दुसरी कोणी असा प्रश्नं पडावा इतकी मोठी दिसतेय !
२. मुक्ता आणि स्वप्नील दोघांची पसंती होऊन लग्नाच फॉर्र्मल ठरवायला गच्चीत भेटतात तेंव्हा ती त्याला पहिल्यांदा विचारते कि तुझं प्रोफेशन काय !
या आधी लग्नं ठरे पर्यंत हे विचारलेलच नसतं ??
३.इथे बर्याच जणांनी लिहिलय शेवटी डोळ्यातून पाणी आलं वगैरे , मला मात्रं हे नक्की काय चाललय असा प्रश्नं पडला होता शेवटची डॉयलॉगबाजी बघून
आय मीन ठिक आहे, मुलीला कनफ्युजन आहे लग्नाच्या निर्णयाबद्दल , या कनफ्युजन मधे साड्या दागिने वगैरे खरेदी होते, अगदी सासरची गिफ्ट नवीन फ्लॅटच्या किल्ल्या पण घेते, पण लग्नाच्या २ दिवस आधी अगदी मेंदी काढून झाली तरी एवढी मॅच्युअर्ड , पस्तिशीची मुलगी नक्की लग्नं कराव कि नाही बद्दल कनफ्युज्ड ? सिरियसली ?
नक्की कधी ठरवणार असते मग ती फायनली कन्व्हिन्स्ड आहे कि नाही ते ?
राजवाडेंना करण ़जोहर च्या कुछ कुछ होता है च्या क्लायमॅक्स मधला डोळ्यात प्राण आणून लग्नाची आशा बाळगणारा शाहरुख फारच आठवत होता बहुदा , स्वप्नील भयंकर त्याच्या प्रभावात वावरतो !
४.कुछ कुछ मधलाच अजुन एक सीन , आठवा काजोल शारुख मैत्रीपूर्ण इमोशनल गळाभेट बघताना राणी तिथून हळूच निघून जायला लागते त्यावेळी एका खान्द्यावर काजोल विसावली असताना शाहरुखच्या पाठीला डोळे असल्याने तो निघून जाणार्या राणीलाही एका हाताने थांबवतो , याचच मराठी व्हर्जन राजवाडे दाखवतो, एकीकडे स्वप्नीलशी भांडण चालु आहे, त्यांचं भांडण पाहून निघून चाललेल्या अर्णव ला मुक्ता "थांब अर्णव" म्हणत हात पकडून त्यालाही भांडण ऐकायला थांबवते , थिएटर मधे जाम हशा पिकला त्या सीन ला !
५.आजकाल स्पॉन्सर्ड सीन्स ची जी ट्रेंड आली आहे, त्याचा हा सिनेमा कळस गाठतो , सिनेमाभर दोन्ही कुटुंब काहीना काही प्रॉडक्ट्स्च्या अॅड्स चालु ठेवतात !
यात शुध्द तूप, चहा, वामन हरि पेठे, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स, बिल्डर्स इ. अनेक विविध उत्पादनांचा समावेश आहे! तूपाच्या अॅडनी तूपकट स्वप्नील ला पूर्ण वापरलय .. आधी फक्त खाण्यासाठी तूपाची अॅड आली मग त्याच्या टाळक्यावर आई तूप चोळताना दाखवली आहे, पब्लिकची हसून पुरेवाट झाली एक एक नवीन अॅड बघताना !
६.हायजिन : मुक्ताकडे स्वप्नील किती रुळला दाखवताना एक भारी विनोदी सीन आहे !
चिखलाच्या हातानी स्वप्नील होणार्या सासर्याबरोबर बागकाम करत असतो म्हणून त्याला होणारी सासू पोहे भरवत असते
, तेव्ढ्यात मुक्ताची मैत्रीण येते, मग सासूबाई पोहे भरवायचं ़काम मैत्रीणीला देतात,मग मैत्रीण पोहे भरवते स्वप्नीलला इथपर्यन्त ठिक आहे पण त्याच चमच्यानी स्वतः ही खाते , एकाच बाउल मधे एकाच चमच्यानी 'एक घास तुला एक घास मला ' करत फार ओळख नसलेली मैत्रीण आणि स्वप्नील एकमेकांचे उष्टे पोहे ़खात बसतात...यक्स !!!!
७. मुक्ताचे कपडे : अॅक्टींग मधे ती बापमाणूस आहे यात काहीच दुमत नाही पण ग्लॅमरस कपडे, शॉर्ट ड्रेसेस यात भयंकर अगदी कमालीची अवघडलेली दिसते मुक्ता !
वेस्टर्न कपडे विचित्रच आहेत तिचे फ्रॉक टाइप गावठी काहीतरी..
इंडीयन मधे एक ड्रेस अगदीच विचित्रं , ती स्वप्नीलला भेटायला पुण्याला येते तेंव्हा चुडिदार स्टाइल होजियरी टाइट्स वर जीन्स वर घालतात तसा छोटा कुर्ता फारच विचित्रं दिसतं ते , अशी फॅशन आली आहे कि काय सध्या तिथे ?
८. पूर्ण सिनेमात मुंबईची मुक्ता पुणेरी मराठी बोलते आणि स्वप्नील पुणेरीच्या नावाखाली हायब्रिड मराठी
सध्या खरच असं बोलतात का पुण्यात माहित नाही पण काँप्लिमेंट्स देताना ' एक नंबर' असा शब्दप्रयोग टिपिकल पुणेरी नक्कीच नाही ! 'मस्तं , छान' असेच शब्द वापरताना ऐकलाय पुण्यात , मी तरी 'एक नंबर' वगैरे प्रकार मायबोलीवर ऐकलेत फक्त
तसच ते ड्रायव्हिंग डिरेक्शन्स देताना 'वरच्या अंगाला, खालच्या अंगाला' शब्द कोणी पुणेरी लोक वापरतात ?
ही स्वप्नीलचीच भाषा बहुदा !
बाकी 'प्रधान' असून ते काकी' म्हणण्या ऐवजी काकू कसे म्हणतात, मंगळसूत्रं १ वाटी ऐवजी २ वाट्यांचं कां ई. पॉइंट्स सुध्दा काढले सीकेपी मैत्रीणींनी
असो, तर जनरल बॉलिवुडि सिनेमा असता तर वरचे सगळे पॉइंट्स सोडून दिले असते पण राजवाडें कडून अजुनही आशा असते ( हो , 'गैर ' पाहूनही ).
कलाकारांबद्दल :
संगीत आवडलं, त्यात जावेद अलीचं हिंदी गाणं फारच सुरेख पण का टाकतात मराठी सिनेमात हिंदी गाणी माहित नाही !
कलाकारांमधे प्रशान्त दामले बेस्ट आहे, अगदीच क्युट सासरा, बेस्ट कॉमेडी टायमिंग :).
मुक्ता बर्वे, सुहास जोशी, आसावरी जोशी, सविता प्रभुणे, श्रुति मराठे सगळे छान , विजय केंकरेंऐवजी विनय आपटे हवे होते , फार मिस करणार त्यांना ऑडियन्स !!
अर्णव च्या रोल मधला 'गुंतता ह्र्दय' मधला अभय नाही आवडला इथे !
स्वप्नील बरेचदा फार लाउड अॅक्टींग करतो, त्याची जीभ जड आहे का बोलताना ? मधेच 'स' ला 'श' म्हणतो !
तरी काही सीन्स चांगले केलेत स्वप्नीलने, स्वप्नील -मुक्ता केमिस्ट्री मस्तं आहे .
मला वाटलं होतंच ! बोलका
मला वाटलं होतंच ! बोलका बाहुला बोबडा पण निघाला
तूपाच्या अॅडनी तूपकट स्वप्नील ला पूर्ण वापरलय .. आधी फक्त खाण्यासाठी तूपाची अॅड आली मग त्याच्या टाळक्यावर आई तूप चोळताना दाखवली आहे >>
एकाच बाउल मधे एकाच चमच्यानी 'एक घास तुला एक घास मला >>>>> अरारा यक्स!
डोळ्यात प्राण आणून लग्नाची आशा बाळगणारा शाहरुख >> स्वप्निल ला ते तसं पॅशनेट वगैरे बघणं जमत नाही हं पण अजिबात. मी मधे तूही रे बघायचा प्रयत्न केला. रोम्यान्टिक सीन्स अगदी बघवत नाहीत त्याच्या तुपकटपणामुळे.
१. मुंबई पुणे मुंबई -१ मधे
१. मुंबई पुणे मुंबई -१ मधे आणि या सिनेमात नक्की किती काळ लोटलाय ?
स्वप्नील दिसतो पार्ट १ सारखाच ( तिथेही गुटगुटीत बालक आणि इथेही) पण मुक्ता फारच मोठी दिसायला लागलीये एकदम, पहिल्या सिनेमापेक्षा १० वर्षांनी मोठी दिसतेय एकदम अरेरे.
हेअरस्टाइल सुध्दा वेगळी , ही तीच व्यक्ती का दुसरी कोणी असा प्रश्नं पडावा इतकी मोठी दिसतेय !
>>>
सिंपल!
स्वप्निल चिरतरुण आहे, मुक्ता नाहीये
पोस्ट बाकी भारी आहे
तेंव्हा चुडिदार स्टाइल
तेंव्हा चुडिदार स्टाइल होजियरी टाइट्स वर जीन्स वर घालतात तसा छोटा कुर्ता >> ही फॅशन होती तिथे, मला तसा एक सेट माग्च्या ट्रिपला (२-३ वर्शापुर्वी) मिळाला होता, एक लॉन्ग टॉप -एक शॉर्ट टॉप आणीएक कॉमन दोघाबरोबर वापरता येइल अशि लेन्गिन्ग, मी शॉर्ट टॉप जिन्स वर वापरला.
रिव्ह्यु भारी!
डिज्जे
डिज्जे
डीजे - धमाल निरीक्षणे
डीजे - धमाल निरीक्षणे आहेत.
मात्र 'एक नंबर' आता खूप प्रचलित आहे गेल्या ५-६ वर्षांत.
बॉर्न अॅन्ड ब्रॉट अप इन पुणे
बॉर्न अॅन्ड ब्रॉट अप इन पुणे मंडळींना 'एक नंबर' असं म्हणताना ऐकते आहे अनेक वर्षांपासून.
ह्म्म.. एक नंबर त्याही
ह्म्म.. एक नंबर त्याही आधीपासून आहे प्रचलित. मी, माझी भावंडं म्हणायचो..
Hmm बाहेरच्या मित्रं
Hmm बाहेरच्या मित्रं मंडळींकडून शिकले असणार तुम्ही लोक 'एक नंबर'
नेक्स्ट ट्रिप मधे शोधते अता 'एक नंबर ' ऐकु येतय का !
त्या अर्थानी म्हणायचच झालं तर इंग्लिश मधून उसने घेतलेला डेव्हिड धवन स्टाइल 'नं वन ' किंवा 'टॉप ' ऐकायला आणि बोली भाषेला जास्तं सवयीचे वाटतात एक वेळ, पण 'एक नंबर' हे काहीतरी चूकीचं वाटतं ऐकताना
स्वप्नील त्याच्या सासर्याला एक नं म्हणजे काय सांगत असतो त्या सीनला काही मुंबईकर मंडळी ओरडली कि अरे हा आमचा शब्द आहे, पुणेरी मुलगा काय शिकवतोय हा शब्द मुंबईकराला
मुंबईकर सही (सई नव्हे)
मुंबईकर सही (सई नव्हे) बोलतात.
आम्हाला बालपणी सही मे दही असेही बोलायची सवय होती.
पण ह्यात स्वप्नील MPM १
पण ह्यात स्वप्नील MPM १ पेक्षा जास्त चांगला, आणि जरा कमी गुटगुटीत दिसलाय, अन खरच अभिनय सुरेख केलाय!
आपल्याला आवडला ...
प्रभाव ... प्रभाव पडला बर
मला तरी कथानक काही झेपलं नाही
मला तरी कथानक काही झेपलं नाही !
>> हा साधा सिनेमा आहे. घरगुती. तुम्हाला हवी तशी धमाल नाही आहे त्यात.
छान केलेय परीक्षण. चित्रपट
छान केलेय परीक्षण. चित्रपट नक्कीच बघावासा वाटतोय.
नं. २ तो स्वतः सांगतो ना
नं. २ तो स्वतः सांगतो ना पहिल्या पिच्च्चरात की मी "यमार" आहे म्हणुन.
डीजे च्या पोस्ट मधला एकुण एक
डीजे च्या पोस्ट मधला एकुण एक पोइंट पटला.
स्पॉन्सर्ड सीन्स ने खरेच वात आणलाय. कथेच्या ओघात सहज येत नाहीत ते सीन्स.
उष्टे पोहे ही खटकलेच होते :ईईईई:
मुक्ताला कपडे बेक्कार दिलेत
सिनेमा मध्ये शेवटाकडे लग्नघरात सग्ळे एकत्र जमतात. तेव्हा कित्येक सीन्स मध्ये लोकांच्या पाठी दिसल्यात. कॅमेरामनला नीट अँगल घेणे शक्य नव्हते का?
बँड बाजा, लगीन घाई असे एक गाणे आहे. त्यात एक्स्ट्राज ना साऊथ इंडीयन पेहराव का दिलाय?
Pages