भंसाळींचे रामायण आणि महाभारत

Submitted by वाट्टेल ते on 20 November, 2015 - 13:01

माननीय संजय लीला भन्साळी यांची उतू जाणारी प्रतिभा, सिनेअभिव्यक्त होण्यासाठी, एका दादल्याच्या २ बायकांमध्येच अडकून पडली आहे. हिंदी सिनेसृष्टीचे त्यामुळे अपरिमित नुकसान होत आहे. या लेखाद्वारे त्यातून त्यांना बाहेर काढून, रामायण आणि महाभारत या आमच्या आद्य साहित्याच्या प्रांगणात त्यांच्या प्रतिभेला उधळायला लावण्याचा आमचा मानस आहे. हल्ली ३-४ दिग्दर्शकांनी एकत्र येउन (वि)चित्रपट बनवण्याचे प्रयत्न झाले होते त्याचे पुढचे पाऊल म्हणून भन्साळींनी, बडजात्या, थोडेसे करण जोहर, गोवारीकर बगैरे मंडळीना जोडीला घेऊन ऱामायण, महाभारतासारखा मोठा canvas घेऊन त्यावर काम करायचे मनावर घ्यावेच. आजवर अनेकांनी लिबर्टीच्या नावाखाली जे ऱामायण व महाभारत आमच्या माथी मारले, भंसाळी काका त्याला अशा उंचीवर नेऊन ठेवतील की पुन्हा म्हणून कॊणी त्याच्या जवळपास फ़िरकण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाहीत.

हिंदी (वि)चित्रपटांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मोठा डोलारा उभा करण्याच्या धांदलीत कथा , पटकथा, संवाद लिहिण्यास अजिबात फुरसत नसते. आम्ही याबद्दल उदार चोप्रांना सांगताच त्यांनी त्यांच्या काकांच्या घरातून महाभारत मालिकेच्या राही मासूम रझा यांनी लिहिलेल्या संवादांच्या वह्या लगोलग आणल्या. मालिकेच्या संवादांच्या त्या जाडजूड वह्या बघून, इतके संवाद लिहून सध्याच्या काळानुसार whatsapp वर पाठवण्यास किती data खर्ची पडला असता या कल्पनेने सध्याच्या सर्व मालिका लेखकांना अश्रू आवरेनासे झालॆ. एकूण काय की कथा आणि सर्व ड्वायलॉग लिहून तयार आहेत. फक्त बरीच काटछाट करावी लागेल, कोणते संवाद ठेवायचे ते ठरवण्यासाठी माझ्याकडचे random dialogue selector app वापरून ठरवत जाऊ. माझ्या नवऱ्याशी जुनी भांडणे उकरून काढून बोलताना काय बोलायचे हे मी त्या app वरूनच ठरवत असते आणि भांडणात मीच नेहमी जिंकते त्यामुळे हे app अतिशय effective आहे यात शंका नाही.

हे असे काही भव्य दिव्य करायचे घाटत आहे याची कुणकुण नितीन चंद्रकांत देसाई यांच्यापर्यंत पोहोचली. “कुणकुण” म्हणण्यापेक्षा मोठ्ठा घंटानाद म्हणणे जास्त योग्य ठरेल कारण आमचे सगळेच कसे नेहमी भव्य दिव्य मोठ्ठे मोठ्ठेच असते. खरेतर ते आधी भन्साळींवर रागावले होते. झाले असे की देसाई यांनी tv च्या छोट्या पडद्यासाठी बाजीराव मस्तानीची निर्मिती केली. त्यांच्या प्रथेप्रमाणे ती साहजिकच इतकी भव्य होती की ती बघण्यासाठी आम्हाला मोठ्ठा नवीन TV घ्यावा लागला आणि खिशाला मोठ्ठे भगदाड पडले. अर्थात सगळ्या मोठ्ठयाची आस लागली की भगदाडही मोठ्ठेच पडणार म्हणा. असो ! तर तेव्हाचे कितीतरी खांब, पडदे , कारंजी, पलंग आणि काय काय तसेच पडून होते ते त्या भन्साळींना पुन्हा वापरता आले नसते का असा त्यांचा रास्त सवाल होता. मग आम्ही त्यांची समजूत काढली की भन्साळींचे हे असेच. पंजाबी कम बंगाली देवदाससाठी मराठी देसायांना art direction करायला द्यायचे आणि मराठी बाजीराव मस्तानी कोणीतरी अय्यंगार - धात्रक वगैरेंना घ्यायचे. बंगाली सुन्दऱ्यांसाठी ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित हे अनुक्रमे कानडी आणि मराठी item घ्यायचे आणि सौभाग्यवती काशीबाई भ्रतार बाजीराव यांच्यासाठी पिग्गी chops नावाच्या पंजाबी फटाक्याला निवडायचे. बंगाली शाहरुख देदेदेदेदेवदास ( कककककिरणचा प्रभाव अजूनही असल्याने आमचा keyboard अडकला ) ची आई स्मिता जयकर आणि बाजीरावाची सोवळी आई तन्वी आझमी. भन्साळींचे हे सगळे विविधतेत एकता (कपूर नव्हे) प्रकरण लक्षात आल्यावर देसाई जरा शांत झाले. महाभारतासाठी तुम्हालाच घेण्यात येईल असे आश्वासन देऊन त्यांना वाटेला लावले, ते already मयसभेच्या तयारीत आहेत असे कळले आहे.

भन्साळी , महाभारत हे वैश्विक असल्याने त्यात जगभरातून कलाकार आणण्याची संधी आहे. आणि तसे ते वैश्विक नसते तरी तुम्ही थोडेच ऐकणार. तेव्हा तुम्हाला हवे त्यांना आणा फक्त मालिकेत धर्मराजाच्या भूमिकेत असणाऱ्या गजेंद्र चौहान ना घेतलेत तर FTII चे विड्यार्थी पुन्हा संपावर जातील एवढे लक्षात ठेवा. सलमान खानला बाजीरावाचा रोल करता आला नाही म्हणून तो जरा दु:खी आहे याची नुसती आठवण करून देते म्हणजे अर्जुन किंवा रामाच्या रोलसाठी त्याचा विचार करण्यात यावा. मग स्वाभाविकपणे कौसल्या किंवा कुंतीच्या रोल साठी रीमा लागू - लागू होतात. इतके केलेत की बडजात्या तुमच्यावर खुश होतील. फक्त अर्जुनला त्याची आई कुंती प्रेमाने प्रेम म्हणायची आणि साडेपाच फुटी ८ abs धारक सांडाचे हात व्यायाम करून दुखत असल्याने त्याला भरवायची वगैरे cinematic liberty तुम्हाला घ्यावी च लागेल, अर्थात त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगावे असे नाही , तुम्ही त्यात माहीर आहातच. पिग्गी आणि दिप्पीला रोल दिल्यावर आता कतरिना कैफ, सनी लिओन किंवा सोनमचा सीता किंवा द्रौपदीच्या रोल साठी विचार करणे तुम्हाला गरजेचे आहे, शेवटी सर्वांना संधी द्यायला हवी. तुमच्या सर्व जुन्या जाणत्या सर्व मंडळींना - स्मिता जयकर, आलोकनाथ, अनुपम खेर आणि असे जे साधारण सगळ्या चित्रपटात असतात त्यामुळे काम करताना निश्चित कोण आहोत ते त्यांना आठवत नाही, अशा सर्वांना त्यांच्या अभिनयाच्या घागरी ओतायला रामायण- महाभारता सारखी दुसरी स्टोरी मिळणार नाही. अमीरखानाचे tension घेऊ नका, इतक्या रोलच्या जंजाळात कोणता रोल करायचा हे त्याने ठरवेपर्यंत तुमचे अजून ४ (वि)चित्रपट काढून झाले असतील . शाहरुख खान व करण जोहर अडून बसलेच तर त्याला दुर्योधनाचा किंवा कृष्णाचा रोल द्या. अभिषेक बच्चनला रावणाचा रोल द्या, त्याला अनुभव आहे शिवाय एका बेरोजगाराला उद्योग दिल्याचे पुण्य तुम्हाला लाभेल.

महाभारत आणि रामायण म्हणजे नृत्य आणि संगीताचा महापूर हे मी सांगायला नकोच. तुम्हाला नेहमी आवडते तसा २ बायांचा dance घालायचा असेल तर दशरथाच्या ३ राण्यांचा किंवा, सीता - मंदोदरीचा ,करू शकाल. महाभारतात तर द्रौपदी - सुभद्रा, गांधारी - कुंती , अंबा-अंबिका-अंबालिका अशी अनेक combination करता येतील . अर्जुनाचा बाईच्या म्हणजे बृहन्नलेच्या वेशात पण dance असेलच, हे वैभव मांगले , सचिन किंवा सुबोध भावेच्या लक्षात आलं तर ते महाभारताचे कथानक हडप करतील, आणि तुमच्या भव्य दिव्य महाभारता ऐवजी आम्हाला दशावतारी नाटक बघावे लागेल तेव्हा जरा घाई करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काहीही झाले तरी द्यूताच्या वेळेस द्रौपदी आणि तिचे ५ पती असा dance अवश्य येउद्या. त्यात guest appearance म्हणून धृतराष्ट्र , विदुर वगैरे मंडळी आणि शेवटी भीष्म म्हणून अमिताभ बच्चनला आणलेत की न भूतो न भविष्याति असे हे गाणे व dance होईल , आता खर्च जरा जास्त होईल पण काळजी नसावी , आम्ही petition , विरोधी मंडळीची फौज तयार ठेऊच , काय बिशाद आहे पहिल्या दिवशी ५०० कोटींची कमाई झाली नाही तर …

तर बाजीराव मस्तानीच उरकतय तोवर ही जुळवाजुळव करायला लागाच. अजून एक जाता जाता - रामायणात सर्वात महत्वाचे character अयोध्येतला धोबी आहे आणि महाभारतातले सर्वात मोठे character व्यास मुनी म्हणजे महाभारताचा निर्माता म्हणजे तुम्हीच आहात संजय लीला भंसाळी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या धाग्यावर वाद-विवाद सुरू होऊन, चिखेलफेकीच्या मार्गाने, भावना दुखवत दुखवत, विषय, राष्ट्रीय आणी जातीय राजकारणापर्यंत पोहोचायच्या आधीच सांगतो: मस्त लिहीलय!

अमीरखानाचे tension घेऊ नका, इतक्या रोलच्या जंजाळात कोणता रोल करायचा हे त्याने ठरवेपर्यंत तुमचे अजून ४ (वि)चित्रपट काढून झाले असतील . शाहरुख खान व करण जोहर अडून बसलेच तर त्याला दुर्योधनाचा किंवा कृष्णाचा रोल द्या. अभिषेक बच्चनला रावणाचा रोल द्या, त्याला अनुभव आहे शिवाय एका बेरोजगाराला उद्योग दिल्याचे पुण्य तुम्हाला लाभेल. <<< भारीये. रावनाचा रोल अर्जुन रामपालला पण देऊ शकता. त्यालाही अनुभव आहे. शाहरूखला कृष्ण करा आनी काजोल राणीबरोबर् त्याचा गरबा ड्यान्स ठेवा. मै तो भूल चली करन का देस, रोहित का घर प्यारा लगे.

बंगाली शाहरुख देदेदेदेदेवदास ( कककककिरणचा प्रभाव अजूनही असल्याने आमचा keyboard अडकला )
>>>>>
शाहरूखवर नेहमी ही अनावश्यक टिका टर उडवणे का होते?
अगदी मिमिक्री करतानाही त्याच्यासारखी अ‍ॅक्टींग आणि स्टाईल कोणाला जमणे अशक्य, पण हे कक कक तत पप अन खी खी खी करून वेळ निभावून नेतात.

हे वगळता बाकी उत्तम !

अभिषेक बच्चनला रावणाचा रोल द्या, त्याला अनुभव आहे शिवाय एका बेरोजगाराला उद्योग दिल्याचे पुण्य तुम्हाला लाभेल >> हे भारी आहे.

@ऋन्मेऽऽष - ती कोपरखळी होती, शा.खा. ला तुम्हाला नव्हे!
उगाच भावना वगैरे दुखावल्याचा आव आणु नका
प्लीजच बरं का!

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काहीही झाले तरी द्यूताच्या वेळेस द्रौपदी आणि तिचे ५ पती असा dance अवश्य येउद्या. त्यात guest appearance म्हणून धृतराष्ट्र , विदुर वगैरे मंडळी आणि शेवटी भीष्म म्हणून अमिताभ बच्चनला आणलेत की न भूतो न भविष्याति असे हे गाणे व dance होईल
<<
धमाल Biggrin
पांडव : अर्जुन रामपाल, ह्रितिक, रणबीर, शाहिद, वरुण धवन आणि आलोकनाथ धृतराष्ट्र Proud

बन्डु,
प्रत्येकाच्या भावना आपापल्या हिशोबाने दुखाऊ शकतात.

आता हेच बघा ना. महाभारत खरे घडलेय की नाही हे आपल्याला माहीत नाही, असा विचार करून एखादा त्यावर आपल्या भावना दुखावून घेत नाही.
पण त्याच महाभारतातील कृष्णाला देव मानल्यास, त्याच्या रासलीलांवर केलेले पांचट विनोद भावना दुखाऊ शकतात. रामायणातील रामावर केल्यास दंगलीच घडतील.

एखाद्याच्या व्यंगावर केलेला विनोद हा बरेचदा हिणकस समजला जातो, पण अश्याच एका विनोदावर मी वर खेद व्यक्त केल्यावर तुम्हाला ते भावना दुखावण्याचा आव वाटले.
कारण इथे तुमचे तुम्ही ठामपणे ठरवूनच टाकलेय की त्या विनोदात कोणाला काही भावना दुखवायचे कारणच नाही. जर कोणाच्या दुखावल्या तर तो आव आणत असेल नाहीतर त्याच्या विचारांमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल.

हो, वरच्या पोस्टमध्ये माझ्या काही भावना दुखावल्या नाहीत हे खरे आहे, पण तसा आवही आणलेला नाहीये, तर हाच मुद्दा मांडायला तो प्रतिसाद टाकलाय ईतकेच Happy

शा खा मध्ये असे काही व्यन्ग असल्याचे मला माहीत नव्हते , तसे असते तर वरील उल्लेख टाळला असता. माझी समजूत आहे की ती व्यक्तिरेखेची लकब किन्वा व्यन्ग आहे , शा खा ला नव्हे आता शा खा ने ज्याचा रोल केलाय त्याला सुद्धा काही बोलायचे नाही असे तुम्हाला वाटत असेल तर कठीण आहे. आणि तुमच्याइतका नाही तरी मला शा खा आवडतो

वाट्टेल ते, माझी वरचे पोस्ट वाचा, प्रत्येकाच्या भावना आपापल्या हिशोबाने दुखाऊ शकतात, आणि आपण प्रत्येक दुखावल्या जाणार्‍या भावनांचा आदर केला पाहिजे हा मुद्दा क्लीअर करायला मी ते मुद्दाम लिहिले होते.

तसे त्या उदाहरणात शाहरूखने साकारलेल्या भुमिकेचे का असेना, बोबडे किंवा अडकत बोलणार्‍या लोकांच्या व्यंगावर केलेलाच विनोद झाला ना तो.
जर एखाद्याच्या जाडेपणावर, एखाद्याच्या काळ्या रंगावर, एखाद्याच्या स्त्री असण्यावर विनोद दुखावणारा असू शकतो तर हा ही तसा असू शकतो.

बाकी माझ्या स्वत:च्या भावना शेवटच्या कधी दुखावल्या गेलेल्या आठवत नाहीत, पण एकेकाळी लोकांचे वीक पॉईंट ओळखून त्यांच्या भावना दुखावणे हा माझा खेळ होता. हल्ली सुधारलोय Happy

मस्त लेख आहे हा !
शाखा वरच्या न केलेल्या टीके / टर सकट
ऋनम्या - चिल यार, शाखा चा अनुल्लेख नाही केलेला हे बघ ना Wink

अगाइग!!! धम्माल्ल !! खुप आवडलं.

ऋ जरा गप रे. जिथे तिथे शाखा माखा काय.

एवढं झकास लिहिलय ते बघ की जरा.

ऋनम्या - चिल यार, शाखा चा अनुल्लेख नाही केलेला हे बघ ना>>>>>> Lol +१

भारी आहे Lol Lol Lol

मराठी बाजीराव मस्तानी कोणीतरी अय्यंगार - धात्रक वगैरेंना घ्यायचे.>>> नक्की आठवत नाही पण बहुदा मटामधे वाचले की धात्रक बाई मराठी आहेत. मटाने त्यांचे ह्या शिणुम्मच्या कामगिरी बद्दल Uhoh कॉतुकही केले होते.

एवढं मन लावून जीव ओतून लिहिलंय की हे वाचून भन्साळी फिलीम प्रदर्शीत करण्णे रहित करतील आणि चित्रपट संन्यास घेतील. Happy
मस्त

तसे त्या उदाहरणात शाहरूखने साकारलेल्या भुमिकेचे का असेना, बोबडे किंवा अडकत बोलणार्‍या लोकांच्या व्यंगावर केलेलाच विनोद झाला ना तो.
<<
कैच्याकै.

त्या शाहरूखने तोतरे बोलण्याची अ‍ॅक्टिंग केलेली आहे. ती फेमस झाली. मिमिक्री म्हणजे त्याची नक्कल. मग मिमिक्रीवाला त्याच्या त्या फेमस तोतरेपणाची नक्कल नाही करणार, तर काय त्याने दारू पिउन स्टेडियमवर घातलेल्या गोंधळाची नक्कल करेल?

शाहरूख म्हणजे ** असल्यासारखी भक्ती चाल्लिये तुमची 21.gif