फाटक - २

Submitted by घायल on 19 November, 2015 - 14:40

मागील भागासाठी येथे क्लिक करा

तसं अगदीच रटाळ आयुष्य नाही.

दिवस येतात , जातात. या संथपणाची सवय झालीय. शरीर साथ देत नाही म्हणून आराम कि आरामामुळं शरीर साथ देत नाही हे समजत नाही. आता कुणी येतही नाही. मुलगा नोकरी धंद्यानिमित्त बाहेर गेला ते नंतर आलाच नाही. पत्रं यायचं. फोन आल्यावर फोन आले होते. पण ही गेल्यानंतर फोन सुद्धा यायचे बंद झाले.

मुलगी यायची. पण शहरात चला म्हणायची. ही गेल्यानंतर ती स्वतः नाही आली. पण एजंट येऊन गेला होता एक दोनदा. तिस-यांदा पण आला होता म्हणे. त्या वेळी काही बोलणं झालंच नाही. त्यानंतर मग लोक यायचे बंद झाले.
पेपरवाला बिल घेऊन गेला. नंतर आलाच नाही. सरकारी नोटीस , पत्र सुद्धा कुणी घेऊन येत नाही. बरीच वर्षे झाली पत्रं घेऊन पोस्टमन आलेला.

एजंट्सचा ससेमिरा मात्र सुटला. बंगली विकणे आहे अशी अफवा सुटली होती वाटतं शहरात. एका एजंटला तुम्ही सांगा, तो गावभर करतो. मी कुणालाच कळवलेलं नव्हतं. प्रश्नच नव्हता.

मागच्या बाजूला पेरूच्या बागा होत्या. फणस, पपई अशी फळझाडं होती. पाच एकरात आंबा पण भरपूर होता. लिंबाला शेकडो लिंब लागायची. त्याचा वास मस्त यायचा. रात्री फुलांचे वास दरवळायचे. ही असे पर्यंतच. नंतर माळी सोडून गेला आणि बाग वाळली.

पेरूची मोठी झाडं आहेत अद्याप. आंबे कुणी काढत नाही. खूप माणसं आली तर इथे गप्पा मारायला म्हणून हे सगळं केलं होतं. घराला लागून वस्ती होती. ती पाहूनच इथे बंगली बांधली होती. पण नंतर खाली मिल झाली. इकडच्या जागा कूणी शेठने घेतल्या म्हणे. वस्ती उठली. आता सोबतीला कुणीच उरलेलं नाही. वर पाण्याच्या टाकीचा चौकीदार राहतो. त्याचीच बायको डबा बनवून पाठवते. ही सोय पण मुलीने लावून दिलेली. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार.

पूर्वी जरा बरं होतं. मुगाचे डोसे पण यायचे. पण रोजच खाऊन कंटाळा यायचा. मग कधीतरी हळूच गंमत करायचो. कुणालाच माहीत होऊ द्यायचं नाही. हळूच खायचं. मग दोन दिवसांनी डॉक्टरला बोलवावं लागायचं. पोट हे असं टम्म फुगायचं. डॉक्टरांना काहीच कळायचं नाही. काही खाल्लं का ? या प्रश्नाला निरागसपणे नाही असं उत्तर दिलं की ते आधी संशयाने पहायचे. पण अभिनय बेमालूम केलेला असल्याने नंतर बुचकळ्यात पडायचे. डॉक्टर म्हणजे निर्सगोपचार केंद्राचे चालक. आधी यायचे तपासायला.

आता बोलवतात केंद्रावर. कुणी नसतं बरं का त्यांच्याकडे. पण उगीचच उद्या वेळ नाही नाहीतर आलो असतो. तुम्हीच या असा निरोप देतात. त्या निमित्ताने मग बाहेर जाणं होतं. जर आपण तक्रार केली तर महिन्याला बोलवतात. नाही केली की मग त्यांचा फोन येतो तीन चार महीन्यानंतर. नाहीच आला तर मग सहा महीन्यांनी मीच करतो.

यांना पेशंटची आठवण कशी नाही ?

त्यांन अजून सांगितलेली नाही गंमत. त्रास होतो. पण घासपूस तरी किती खायची माणसानं ?

गेल्या खेपेला असंच गंमत करत होतो बहुतेक तेव्हांच तो उगवला.

या लोकांना कसलेही मॅनर्स नाहीत.. दार वाजवायचं नाही, बेल दाबायची नाही. फोन करायचा तर लांबच राहीलं. बर आआवाज तरी द्यायचा ना ?

कि सरळ घरात घुसून शोधायला लागायचं ?
माणूस काहीही करत असतं. बरं आला ते आला आणि चक्क निघून गेला.

त्याला मागून आवाज दिले तर संशयास्पद रित्या पळाला. नक्की काय करायचं होतं त्याला ?
कसला डाव होता ? आणि मला पाहून दचकला का ?
कि मी असेन हे त्यानं गृहीतच धरलेलं नव्हतं ?

हाती पायी धड असतो तर पाठलाग करून उत्तरं नसती का मिळवली ? पण तो आला नाही हे चांगलंच झालं. अहो, नाहीच विकायचंय घर हे कितीदा सांगायचं ?

पण बेटा बदनामी करून गेला.
ब-याच नाही नाही त्या वदंता उठल्या. बहुतेक आपलं गि-हाईक दुस-याकडे जाऊ नये म्हणून ?
हे एजंट लोक असेच असतात सगळे.

तेव्हांपासून सगळे यायचे बंद झालेत. राम सोडून.
राम पण फाटकातून आत येत नाही.

दोन जगात विश्व विभागलंय आणि त्यात ते एक फाटक आहे मोडकळीला आलेलं. मला तरी कुठे आवडतं फाटकातून बाहेर जायला ?

बाहेर लोक काय बोलतात याची कल्पना नव्हती हे एका परीने बरंच होतं. या वयात राग येणं झेपत नाही आताशा. कुणी काही तोंडावर बोललेलं खपत नाही. तामसी स्वभावाला औषध नाही. निसर्गोपचाराने आवाक्यात आहे. तिखट खायचं नाही. मसाला नाही. तेल नाही. सामीष आहार नाही. एव्हढी पथ्यं आहेत. आराम पडतो म्हणून निमूट पाळायची.

राग मात्र सहन होत नाही. राग यायचे इनपुट्स बंद झाल्याने हल्ली दिवस चांगले जातात. हे सगळं कुणाला समजणार ? मुलीला कळत असेल बहुधा. पण नक्की नाही. ती तिच्या जगात व्यस्त !

हिला मात्र सगळं माहीत होतं. अगदी सूक्ष्मात सूक्ष्म गोष्ट सुद्धा तिला ठाऊक होती.
गंमत पण तिला ठाऊक झाली होती शेवटी शेवटी. किती लपून छपून करत असे.
पण बायकोपासून लपवणं कठीण आहे हे खरंच.

तिच्यासाठी विजेच्या पाळण्याचं काम सुरू केलं होतं मागच्या बाजूला. किचनच्या आणि जिन्याच्या मधे जी बोळ होती तिच्या लोखंडी दरवाजाला लागून विजेचा पाळणा बनत होता. खाली रस्त्याला जायला यायला ही सोय होणार होती. पोर्च मधे मोटर किंवा रिक्षा येऊ शकत होती. पण इकडे ना टॅक्सी ना रिक्षा !

खाली जायची यायची सोय तिलाही आणि मलाही हवीच होती.
पाळणा तयार होत आला होता.

वापरही सुरू झालेला. मग ठेकेदाराने ९०% पैसे गोड बोलून काढून घेतले आणि आलाच नाही. आता उरलेलं काम उरल्या पैशात कोन करणार ?

मग पाळणा वर खाली करून पाहिला. तर चालू होता. हळू हळू त्याचा वापर सुरू केला. हिला भीती वाटायची. पण नाईलाज म्हणून तिनेही वापर सुरू केला.

आणि एक दिवस..

जोरदार आवाज झाला. मी काठी टेकवत खाली बोळीकडे निघालो

पाळण्याला बाजूने जाळी बसवायची राहिली होती. फक्त एका अँगलला धरून उभं रहायचं. बोळीतून दरवाजा उघडला. पाळणा खाली थांबत होता . पण मोकळाच,.

आणि खाली ती निश्चेट पडली होती. काय झालं हे कळालंच नाही.
घसरून पडली की पाळण्याचा दोष ?
त्या दिवशी आरडाओरडा करूनही मदतीला लवकर कुणी आलं नाही. सर्वत्र फोन फिरवले. पोलीसच आधी पोहोचले. तेव्हां तिच्याजवळ पोहोचू शकलो.

पोलिसांनी कसलाच त्रास दिला नाही. अपघात दिसत होता. शिवाय त्यांना फाईल बंद करायची घाई होती. साक्षीदार कुणीच नाही. तक्रारदार कुणी नाही. कसला संशय नाही. थोडक्यातच आटोपलं. मुलगी आणि जावई आले होते. मुलाचा फोन तेव्हां आलेला. तो शेवटचा !!

तेव्हां पासून ती भिंतीवर आहे.
माझासमोरच्या भिंतीवर. कारुण्याने पाहतेय.

कदाचित माझ्या एकटेपणाबद्दल असेल ते !

कशाला अडकतेस माझ्यात ?
मी मजेत आहे. तुला चांगलं ठाऊक आहे !

बायकांचा आत्मा ना, असा नाही मुक्त व्हायचा सहजासहजी ! इथेच घुटमळतेय ती बहुतेक.

लोक हल्ली बंगली बद्दल वाट्टेल ते बोलत असतात.

झपाटलेली वास्तू म्हणे !

काही च्या काहीच

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वातावरण चांगले रंगवले आहे. काही ठिकाणी जरा वेल्हाळपणा आहे पण ज्या वयोमानाकडून हे येते आहे त्यानुसार बरोबर आहे.

आता पुढील भाग पण आणा. जोडप्यातला एक जाणे, खुन की आत्महत्या यातले संधिग्धता, एकाकी माणूस, एकाकी घर, लोकप्रवाद, लोक घरात यायला घाबरणे, एकुण घराची रचना त्यातले जुनाट जीने, उध्वस्त बाग हे सर्व मस्त जमून आले आहे - अर्थातच यात बरेच पोटेंशियल आहे.
तेव्हा २५ भागांची चित्तथरारक मालिका तर नक्की बनेल.

होऊन जाउ द्या!

छान