मध्यंतरी एक जण भेटला. चाळीशीतला होता. काहीही कमी नाही. हुशार आहे, घर-दार, नोकरी, बायको मुले सगळे काही व्यवस्थित आहे. पण चेहरा सदा दुर्मुखलेला, त्रस्त. त्याचाशी बोलण्यातून जाणवले की “आता पुढे काय” च्या प्रश्नांनी तो ग्रस्त आहे. त्याला सुख टोचायला लागले होते.
कुठल्या तरी स्वयंघोषित अध्यात्मिक व्यक्तीच्या प्रवचनाला जाऊन त्यातून “शांती” मिळवण्याचे प्रयत्न चालू होते. ग्रोसरी करताना भेंडी सुद्धा नीट बघून घेणारा हा अध्यात्मिक क्लास ला शेकडो डॉलर्स आरामात खर्च करत होता. त्याला “विरंगुळ्याचा रोग” लागला होता.
माणसाला आवश्यक गरजा आणि त्या पेक्षा जास्ती अशी भौतिक सुखे मिळाली की हळूहळू ते सुख टोचायला लागते. जे काही आहे त्यात काहीतरी कमी आहे, अजून काहीतरी पाहिजे अशी जाणीव तयार होते. कितीही चैन, मजा केली तरी मिळणारे सुख हे त्या प्रमाणात नसते. ही जाणीव म्हणजे एक प्रकारची मानसिक पोकळी असते. यातून ‘विरंगुळ्याचे रोग’ तयार होतात. वर म्हटल्याप्रमाणे अनेक प्रयत्न, कष्ट करून सुख संपत्ती मिळवल्यावर अजून मिळवायचे काही राहिलेले नसते, कामात सुद्धा तोच तोच पणा येऊ लागलेला असतो आणि पुढील जीवन तेवढ्याच उमेदीने जगण्याचे प्रयोजन हरवलेले असते.
भरीत भर म्हणजे आपण ह्या पोकळी मुळे असे हरवल्यासारखे झालो आहोत हीच जाणीव नसते.
यातून एक अनामिक भीती, हुरहूर, काहीतरी हरवल्याची खंत निर्माण होते. छोट्या छोट्या निर्णयासाठी किंवा मानसिक शांती साठी मग कुठल्यातरी गुरु, बाबा, माता, स्वामी यांचा आधार घ्यावा लागतो. कुणी आपल्या घरातल्या गोष्टींच्या दिशा बदलून किंवा ठराविक दिशेला पाणी, झाडे ठेवून सगळा बदल होईल अशा आशेत प्रयत्न करतात. कुणी घरच बदलतात आणि ठराविक दिशेला दार , बाथरूम वगैरे असेलेले घर घ्या अश्या सल्ल्या साठी हजारो डॉलर्स खर्च करून, घर बदलण्याचा अति खर्चिक उपक्रम करून पाहतात.
पण खरा बदल आपल्यात आणि आपल्या मानसिकते मध्ये करावा लागतो आणि त्याचा परिणाम दिसायला वेळ द्यावा लागतो. मानसिक आणि शारीरिक परिश्रम करावे लागतात. पण त्या पेक्षा दुसऱ्या कुणावर तरी आपला भार टाकणे आणि त्यातून उपाय शोधणे जास्त बरे वाटते. स्वत:च्या प्रश्नांची जबाबदारी दुसऱ्या कुणावर टाकली की आपल्या शांती साठी पण त्याला जबाबदार धरायला आपण मोकळे होतो.
खरे तर आपल्या सर्वांकडे (म्हणजे मध्यम ते उच्च मध्यम वर्गीय लोकांकडे) कडे जे जे आणि जितके आहे ते अनेक लोकांचे आयुष्याचे स्वप्न असते! गेल्यावर्षी मुंबईमध्ये थोडा काळ असताना आम्ही आमच्या स्वयंपाक करून देणाऱ्या बाईंशी सहज बोलत होतो. तिला तीन मुले. अश्यात तिचा नवरा सर्वांना सोडून गायब झाला. सर्वांचे तिलाच करावे लागते आणि सासरच्या लोकांचे पण ऐकून घ्यावे लागते जणू काही तिच्यामुळेच तो सोडून गेला. तरी पण तिच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास दिसला आणि लढायची इच्छा दिसली ते पाहून वाटले की कोणत्या फालतू आणि मुख्यत: स्वनिर्मित दुख्खांसाठी आपण रडत असतो?
नीट पाहिले तर खरच सर्व काही व्यवस्थित आहे आणि तरी पण आपण हरवलेले,कशाच्या तरी शोधात असतो. खरं तर काहीच करायची गरज नसते. फक्त रोज स्वत:ला सांगायचे की दुसऱ्यांकडे कितीही असले तरी माझ्याकडे मला पाहिजे तेवढे सर्व आहे आणि सध्याच्या परीस्थितीमध्ये मस्त चाललेलं आहे आणि कितीही धावले तरी आपल्या पुढे कुणीतरी असणारच आहे. त्यामुळे शांती समाधान या साठी सुद्धा कुणाच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाहीये. प्रश्न आणि उत्तर दोन्ही आपल्यापाशीच आहे. बुद्धानी म्हटल्याप्रमाणे आपण आज जे आहोत ते गेल्या काही वर्षांच्या आपल्या निर्णयाचा परिणाम आहोत त्यामुळे उद्याच आपण वेगळे हवे असू तर आजचा निर्णय वेगळा पहिजे.
आणि म्हणून कश्याच्या मागे धावायचेच असेल तर ते असे पाहिजे की त्यात आपले तन-मन हरवून जाईल आणि कुणाला दुसऱ्याला त्याचा फायदा होईल. यामुळे असल्या विरंगुळ्याच्या रोगा साठी वेळच राहणार नाही. अगदी एवढे करून वेळ रिकामा मिळालाच तर झकास झोप काढावी, सिनेमा बघावा, बाहेर फिरून यावे, आणखी कुणाला तरी न मागता मदत करावी. सगळे देव,अध्यात्म, शांती आपल्यातच आणि आपल्या आजूबाजूला आहे. फक्त आपल्याकडून त्यासाठी हात पुढे करण्याची आणि दोन पाऊले टाकण्याची कमी आहे.
खुप छान..
खुप छान..
छान..आनी खरय हे.
छान..आनी खरय हे.
अगदी बरोबर.
अगदी बरोबर.
सहमत १००% छान लिहीलंय .
सहमत १००% छान लिहीलंय .
मस्त लेखन आवडले.
मस्त लेखन आवडले.