.
३० सप्टेंबर २०१५
पापा !
ते सुद्धा पा पा पा पा नाही तर सुस्पष्ट आणि खणखणीत पापा ..
ते सुद्धा मम्मा बोलायच्याही आधी आधी..
फिलिंग शब्द, इमॉटिकॉन्स आणि स्मायलींच्या पलीकडले
.
.
२ ऑक्टोबर २०१५
वीज चमकते तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग थोड्यावेळाने आवाज ऐकू येतो.
हेच सायन्स वापरून आम्ही ब्रश केल्यावर चूळ भरतो.
आधी शांतपणे ग्लासातले पाणी पिऊन घेतो, मग फुर्रर करून आवाज काढतो. वीज काही आपल्या डोक्यावर कोसळत नाही, आणि आमच्या तोंडातले पाणी काही बेसिनमध्ये पडत नाही
.
.
५ ऑक्टोबर २०१५
मोठी माणसं विनोद करतात, लहान मुलं विनोद घडवतात.
शनिवारी परीबरोबर तिच्या आजोळी चाललो होतो. गर्मीने हैराण परेशान झालो होतो. सुदैवाने प्लॅटफॉर्मवरचा फॅन चालू होता. परीला घेऊन त्याखाली उभा राहिलो आणि म्हणालो, चल बाबड्या थोडी हवा खाऊया. तसे तिने वर पंख्याकडे पाहिले, तोंडाचा आ वासला आणि हॉप हॉप करत जमेल तितकी हवा खाऊन टाकली
तरी नशीब आम्हाला तसे करताना कोणी पाहिले नाही. नाहीतर हवा खाण्यावर सुद्धा टॅक्स बसायला सुरूवात झाली असती
.
.
८ ऑक्टोबर २०१५
काल परीशी खेळून दमलो आणि बिछान्यावर पडलो. गर्मीचा सीजन म्हणून उघडाच वावरत होतो, तरी अंगमेहनतीने आपला जलवा दाखवलाच. छातीला घामाच्या धारा लागल्या होत्या. परीने ते पाहिले आणि माझेही लक्ष वेधले. मी तिचा हात झटकला आणि दुर्लक्ष केले, तशी गायबली आणि दोन मिनिटात पुन्हा उगवली. यावेळी मात्र तिच्या हातात लॅपटॉपची स्क्रीन पुसायचा छोटासा नॅपकीन होता. का, तर माझा घाम पुसायला
'जो पेट देता है वही रोटी भी देता है' या उक्तीचा प्रत्यय आला. घाम काढणारीही तीच आणि घाम पुसणारीही तीच
.
.
१० ऑक्टोबर २०१५
डोळे मिचमिचे करत आम्ही बोटांच्या चिमटीत पकडतो तेव्हा आम्हाला आमचा फोटो काढून घ्यायचा असतो. ही हुक्की रात्रीचे दोन वाजताही येऊ शकते किंवा संध्याकाळी पप्पा दमूनभागून घरी आल्यावरही येते. बरं आम्ही कुठेही फोटो काढत नाही, तर बेडरूम हाच आमचा फोटो स्टुडीओ आहे. तिथेच जावे लागते. दिवस असो वा रात्र, फोटो काढायच्या आधी बेडरूमच्या सर्व लाईट्स लावाव्या लागतात. कारण त्यामुळे फोटो चांगला येतो हे क्षुल्लक ज्ञान आम्हाला प्राप्त झाले आहे. फोटो देखील मोबाईलच्या कॅमेर्याने नाही तर डिजिटल कॅमेर्यानेच काढावा लागतो. कधी एकामध्येच काम भागते तर कधी सात-आठ काढावे लागतात. प्रत्येक वेळी फोटो काढून झाल्यावर तिला कॅमेरा हातात घेत फोटो कसा आला हे बघायचे असते आणि त्यावेळी कॅमेरा जपणे ही सर्वस्वी पप्पांची जबाबदारी असते.
एकीकडे पप्पांचा असा छळ चालू असताना दुसरीकडे परीची आई मात्र ‘आय अॅम लविंग ईट’ म्हणत खदखदून हसत असते. कारण एक काळ असा होता जेव्हा मी माझ्या मॉडेलिंगची हौस तिच्या हातात कॅमेरा थोपवून भागवायचो.
तर, या जन्मात केलेल्या कर्माची फळे याच जन्मात मिळतात ती अशी
.
.
१३ ऑक्टोबर २०१५
काल डोके जरा पित्ताने चढले म्हणून बिछान्यावर झोपलो होतो. बायको उशाशी बसून डोक्याला बाम चोळत होती. परीने ते पाहिले आणि तिला ढकलत माझ्या छाताडावर बसली. नको नको तुझे हात बामने खराब होतील म्हणे म्हणे पर्यंत तिने माझ्या डोक्याला हात घातलाही. थोडे पापण्यांच्या वर, थोडे कानशिलांच्या बाजूला, डोके देखील असे चेपू लागली जसे नेमके मला अपेक्षित होते. जे या आधी बायकोला कित्येकदा समजवल्यानंतर जमले होते, ते परीने पहिल्या निरीक्षणातच जमवले होते. थोडी ताकद तेवढी कमी पडत होती. पण मग त्याची तशी गरजही नव्हतीच, डोके असेच हलके झाले होते
काही म्हणा! कितीही धिंगाणा घालो! तरी पोरीत एक श्रावण बाळ लपला आहे. फक्त आता तो कुठवर टिकतो हे बघायचे आहे
.
.
१७ ऑक्टोबर २०१५
आमच्याकडे प्रत्येक गोष्टीची एक सिस्टीम असते. आमचा नाच धिंगाणाडान्स असला तरी त्याचा एक ठराविक सेट अप असतो. गाणे पप्पांच्या मोबाईलवरच लावले जाते. मोबाईल बेडवर एका ठराविक जागीच ठेवावा लागतो. बेड हाच आमचा स्टेजही असतो. सध्या आमच्या घरातील रॉकस्टार परी असल्याने स्टेजवर नाचायचा बहुमान तिलाच मिळतो. पप्पा स्टेजसमोर पब्लिकच्या भुमिकेत असतात. पण तरीही त्यांनाही नाचावे लागतेच. ते देखील चांगले अन व्यवस्थितच नाचावे लागते. कारण परी एक स्टेप कतरीनाची बघून करते, तर दुसर्या स्टेपला पप्पांना फॉलो करते.
बरं यातून सुटकाही सहज होत नसते. एकच गाणे पाच-सहा वेळा लावले जाते, आणि पप्पांनी थकल्यावर बेडवर बसून नाचायची आयडीया केली, तर त्यांना पुन्हा स्टेजच्या खाली ढकलले जाते. जोपर्यंत आमच्या बसंतीचे पाय थकत नाहीत तोपर्यंत पप्पांनाही नाचावे लागते.
या आधी मी एक कमालीचा उत्कृष्ट बाथरूम सिंगर होतो. परीने तितक्याच ताकदीचा बेडरूम डान्सर बनवलेय
.
.
२० ऑक्टोबर २०१५
पोलिस कंट्रोल रूम १००
फायर ब्रिगेड १०१
परीने डायल केला १११
वाचले आजोबा .. फोन त्यांचा होता
.
.
२१ ऑक्टोबर २०१५
या जनरेशनला फसवणे ईतके सोपे नाही. माझा स्वत:चा बरेचदा पोपट झाला आहे. एखादी वस्तू भुर्र फेकल्याचे नाटक करावे, आणि तिने त्याला न फसता, इथे तिथे शोधून ती हुडकून काढावी असे कित्येकदा झालेय.
काल जेवणानंतर तिने पाणी प्यावे म्हणून आम्ही तिची मनधरणी करत होतो. पण तिच्या हातात दिलेली पाण्याची बाटली ती आम्हाला पुन्हा पुन्हा रिटर्न करत होती. शेजारच्या दादाने मग आयडीया केली. 'दिल चाहता है' स्टाईल आमीर खान जसा खोटा खोटा मासा खातो, तसेच खरेखुरे भासवून खोटे खोटे पाणी प्यायचे नाटक केले. आणि 'आता तू पी' म्हणत, पुन्हा तिच्या हातात बाटली सोपवली.
मग काय, तिनेही लगेच ती बाटली घेतली, तोंडापासून दोन सेंटीमीटर अंतरावर धरली, आणि ओठांचा चंबू करत खोटेखोटेच पाणी प्यायला सुरुवात केली
अश्याप्रकारे पुन्हा एकदा तिच्या निरीक्षण शक्ती आणि लबाडवृत्तीचा अनोखा संगम बघून आज्जीने हसत हसत कपाळावर हात मारून घेतला
.
.
२२ ऑक्टोबर २०१५
काल डोळ्यात काहीतरी कचरा गेला. बिछान्यावर पडलो आणि बायकोला डोळ्यात फुंकर मारायला सांगितले. परीचे लक्ष गेले. मग काय, एखादा वेगळा प्रकार पाहिला तर तो आम्हाला करायचाच असतो. त्यातही ती पप्पांची सेवा असेल तर तो आमचा हक्कच असतो.
ओठांना अगदी जवळ आणून माझ्या डोळ्यांवर हळूवार फुंकर मारू लागली. तिचे ते प्रेम बघून पडल्यापडल्याच गहिवरून गेलो. टच्चकन डोळ्यात पाणी आले, आणि कचरा त्यातच वाहून गेला
.
.
२४ ऑक्टोबर २०१५
ऑक्टोबर हिट आणि गर्मीची पण आपलीच एक मजा आहे.
मी आणि परी दोघे उघडबंब होतो. फॅन फुल्ल ऑन करतो. खिडक्या उघडतो पण पडदे लावतो. ती मम्मीची ओढणी कंबरेला बांधते. मी माझी बनियान माझ्या कंबरेला गुंडाळतो. अफगाण जलेबी गाणे लावतो. आणि दोघे मस्त घाम येईपर्यंत नाचतो
.
.
२६ ऑक्टोबर २०१५
फायनली चांदोमामा आवडायच्या वयात आम्ही पोहोचलो आहोत. गेले दहा-बारा दिवस त्याला कलेकलेने वाढताना बघत आहोत.
कधी बेडरूमच्या खिडकीतून, तर कधी हॉलच्या खिडकीतून. दर दहा मिनिटांनी, पडदा सरकवत, तो आहे ना जागेवर हे चेक करत आहोत.
कधी खिडकीवरच उशी ठेऊन त्यासमोर ठाण मांडून बसत आहोत. तर कधी तो दिसावा म्हणून सायकलवर चढायचा स्टंट करत आहोत.
जरा ढगाआड गेला की आम्ही बेचैन होतो. पण दिसताच क्षणी, चांsदोमामाss करत, ये ये म्हणत त्याला बोलावत राहतो.
आज तर काय कोजागिरी पौर्णिमा, म्हणजे जणू चांदोमामाचा हॅपीबड्डेच
पण सेलिब्रेट करायला, नेमका आज आमचा बाबड्या घरी नाहीये
काही हरकत नाही, उद्या बीलेटेड साजरा करूया
- तुमचा अभिषेक
आई ग्गं.. या कॅडबरी चे हे
आई ग्गं.. या कॅडबरी चे हे छोटे छोटे तुकडे भार्रीच ग्वाड आहेत रे... !!! मनात मिठास भरून राहते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिले आहेस रे अभिषेक,
मस्त लिहिले आहेस रे अभिषेक, खुपच छान!
एकदा येउन भेटायलाच हवं तुला आणि परीला.
कित्ती गोडं !
कित्ती गोडं !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिचे ते प्रेम बघून
तिचे ते प्रेम बघून पडल्यापडल्याच गहिवरून गेलो. टच्चकन डोळ्यात पाणी आले, आणि कचरा त्यातच वाहून गेला >>>>> वाचताना अगदी अस्सच्च झाल...
Toooo cute..... keep posting
Toooo cute..... keep posting
हवा खाऊन टाकली
हवा खाऊन टाकली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खूपच छान... गोड अगदी
खूपच छान... गोड अगदी
मस्त ! काही ठिकाणी अगदी टचिंग
मस्त ! काही ठिकाणी अगदी टचिंग लिहीलंयत.
खुप सुंदर अभिषेक... माझा
खुप सुंदर अभिषेक... माझा अथर्व पण आता ५ नोव्हेंबरला १.५ वर्षाचा होईल. हे सगळं मीही थोड्याफ़ार फ़रकाने अनुभवते आहे. पण एवढ्या सुंदर शब्दात मांडता येणार नाही. खरचं तुम्हाला आणि परीला भेटायला यायला हवं एकदा.
खूप छान.
खूप छान.
कधीही या भेटायला मयेकर,
कधीही या भेटायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मयेकर, हल्ली ती दूध वा पाणीही खायला लागलीय, दातांनी कचकच चावत .. बस्स नखरे नुसते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप मस्त वाटत रे हे वाचुन.
खूप मस्त वाटत रे हे वाचुन. छान लिहीतोस.
गोड लिहीलंय अशाच सर्व आठवणी
गोड लिहीलंय
अशाच सर्व आठवणी लिहीत चला.
खुप सुंदर अभिषेक..... माझाही
खुप सुंदर अभिषेक..... माझाही मुलगा आत्ता १.३ वर्षाचा झालाय आणि थोड्याफार फरकाने आम्ही घरी हेच अनुभवत आहोत त्यामुळे खुप रिलेट झालं..... मस्त एकदम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान !
खुप छान !
सगळ्या परी-कथा फारच गोड आहेत.
सगळ्या परी-कथा फारच गोड आहेत. प्रत्येकाला आपापल्या मुलांची आठवण आली असेल.
लिहिण्याची स्टाइल तर अप्रतिम. हे सर्व कधीतरी एकदम प्रकाशित करा असं म्हणेन. अनेकांनी मुलांच्या भावविश्वात शिरण्याचा प्रयत्न केलाय आतापर्यंत. पण हे तर फर्स्ट हॅण्ड अनुभव. काल्पनिक वगैरे नाहीत, खरेखुरे, जिवंत.
अत्यंत वाचनीय.
हीरास अनुमोदन. अतिशय
हीरास अनुमोदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय आवडताहेत परीच्या लीला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिशेक तुमचा हा अनुभव खरच खुप
अभिशेक तुमचा हा अनुभव खरच खुप छान आहे.
खूपच छान .
खूपच छान .
धन्यवाद प्रतिसादांचे, हीरा
धन्यवाद प्रतिसादांचे,
हीरा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज पुन्हा वाचला हा धागा आणि
आज पुन्हा वाचला हा धागा आणि पुन्हा एकदा प्रतिसाद द्यावासा वाटतोय.
वाचुन एकदम फ्रेश झाले. हीराने लिहील्याप्रमाणे सगळ्यांना स्वतःच्या मुलांच्या त्या-त्या वयातील लीला आठवल्या असतील.
परीला आणखी थोडी मोठी होऊ द्या. ती बोबडे बोल बोलू लागली ना, की तुमच्या घरची अशी एक 'स्पेसिफिक भाषा' जन्म घेईल. परी उच्चारत असलेले अनेकानेक शब्द तिच्या उच्चारानुसारच तुम्ही सारे उच्चारु लागाल, क्वचित मूळ शब्द/त्याचा उच्चार याचाही विसर पडेल. (स्वानुभवाचे बोल).
त्या काळातील फेसबूक स्टेटसच्या प्रतिक्षेत..........!
आशिका +१ माझा मुलगा लहान
आशिका +१
माझा मुलगा लहान असताना बेलगाडि ला भु ह्म्मा म्ह्णायचा, बोट म्ह्णजे भु मम.
खुप गोड आठवणि आहेत या.
मस्तच क्षण. परवा माझी लेक
मस्तच क्षण. परवा माझी लेक यूएस ला गेलेली. एअर पोर्ट वर रडायचे नाही अशी आधीच धमकी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिळालेली होती. मी पण मजेतच होते. पण आत जायच्या आधी तिने मिठी मारली तेव्हा हे सर्व
परिकथा क्षण एकदम आठवले. आणि भरून आले. दीज आर द बेस्ट टाइम्स.
अभिषेक मस्तच रे..खूप खूप गोड
अभिषेक मस्तच रे..खूप खूप गोड ..... डोळ्यात पाणी आणलसं.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला आणि परी च्या आईला भेटले आहे...आता परी ला भेटायलाच पाहिजे